एक हवाई उद्घाटन (धागा प्रतिसादासाठी खुला केला आहे)
एका शुभमुहूर्तावर एका पुलाचं उद्घाटन होणार असतं. मंत्रीमहोदयांचं हेलिकॉप्टर पुलावर मुहूर्ताच्या ठीक पंचवीस मिनिटं आधी लॅंड होणार. लोकल नेत्यांची बत्तिशी तपासून व त्यांना आपली बत्तिशी दाखवून झाली की मंत्रीसाहेब तात्पुरत्या उभारलेल्या पोडियमवर भाषण करणार. भाषणाचा मसूदा तीन तीन वेळा त्यांनी घोकलेला आहे. राष्ट्रीय एकात्मता, ग्लोबलायझेशन, भारत आणि इंडियाला जोडण्याची स्वप्नं वगैरे ठरलेली वाक्यं बोलून झाली की भाषणाचा मुख्य भाग सत्ताधारी पार्टीने हा पूल निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न केले आणि विरोधकांनी कसा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तरीही हा पूल झालाच, हे सांगण्यात जाणार होता. दोनतीन आयत्या वेळी केल्यासारखे वाटणारे विनोदही ठरले होते. कोण फोटो काढणार, ते कुठे कुठे प्रसिद्ध होणार याचं सगळं सेटिंग झालेलं.
प्रत्यक्ष हेलिकॉप्टर घिरट्या घालायला लागतं. खाली बघतात तो काय, पुलावर ९० स्पीड लिमिट असताना १२० च्या स्पीडने ट्राफिक चालू.
मंत्रीजी चक्रावतात. खाली सिक्युरिटीला कॉल लावतात.
'हे काय चाललंय?'
'साहेब... कसं सांगू... ट्राफिक चालू झाला साहेब.'
'ते दिसतंच आहे. पण कोणी चालू केला.'
'लोकांनीच केला साहेब.'
'लोकांनीच?'
'होय साहेब.'
'त्यांना कळलंच कसं?'
'आता साहेब एवढा मोठा पूल होतोय, लोकांपासून कसं लपून रहाणार. तुम्हीच घोषणा केलीत ना पूल होतोय, पूल होतोय म्हणून...'
'हो, पण त्यांना नुसतं पूल बघायला सांगितलं होतं. कुठे रंग वगैरे लावायचा राहिला तर सांगायला...'
'पण लोकांनी गाड्याच घातल्या सरळ. काय करणार?'
मंत्री महोदय अजूनच चक्रावलेले
'बरं मग ते रिबिनीचं काय?'
'कुठची रिबिन साहेब?'
'तीच, उद्घाटनाची, कापायची रिबिन...'
'साहेब ती लावायला पण झेपली नाही. इतका ट्राफिक... तो कंट्रोल करतानाच नाकी नऊ आले. काल रात्री रिबिन लावून ठेवली होती. पण आज ती कुठाय कोण जाणे.'
'मग उद्घाटन कसं करणार? मी कातरी घेऊन आलो आहे. '
'तुमची कातरी ठेवा तुमच्याकडेच साहेब. इथे फार वापरावी लागेल असं वाटत नाही. '
'मग काय करू?'
'साहेब, मी काय म्हणतो, नुसतंच तुमच्या हेलिकॉप्टरच्या मायक्रोफोनमधून सूचना द्या. उद्घाटन पार पडलं म्हणून. आणि द्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा...'
मंत्रीमहोदय चक्रावलेले. फोटो अपॉर्च्युनिटी गेली म्हणून. पण त्यांनी युक्ती लढवली. त्यांच्याबरोबरच्या कॅमेरामनला खालचं व्हिडियो शूटिंग करायला लावलं. मग कॅमेरासमोरच एक पट्टी धरली, ती कापली. आणि सोबतच्या रिपोर्टर्सना म्हणाले
'हवाई उद्घाटन करणारा मीच पहिला हे तुमच्या सगळ्यांच्या रिपोर्टात आलं पायजे'
तर सांगायचा मुद्दा काय, की दिवाळीच्या शुभमुहुर्तावर ऐसी अक्षरे डॉट कॉम चं अधिकृतरीत्या हवाई उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
पुलावरील वाहतूक
मला विशेष आनंद होतो की, उद्धाटनापूर्वीच पुलावर गाडी घालण्यासाठी उत्सुक असलेल्या पहिल्या रांगेत जे दोघेतिघे होते त्यात मीही होतो. मंत्री येवोत वा ना, पण त्या पूलावरून प्रवास करताना निखळ आनंद होणार हे त्याचवेळी जाणवले.
मात्र हेही सांगणे अगत्याचे वाटते की, पूल देखणा असला तरी नवा असल्याने वाहतुक सजगपणे करण्याची अंतिम जबाबदारी 'मंत्रीमहोदय व त्यांचे सहयोगी' यांची नसून ड्रायव्हिंग करण्यार्यांची आहे.
अशोक पाटील
शुभेच्छा...
'ऐसी अक्षरे'ला माझ्या देखील शुभेच्छा... येथील मित्रांशी काही गोष्टी बोलायच्या आहेत... अक्षर माध्यम एक अतिशय प्रबल माध्यम आहे ह्याची जाणीव असून सुद्धा ध्वनी ह्या माध्यमाशीच माझी स्वाभाविक मैत्री झाली... वाचन लेखनाची फारशी गोडी नाही (परंतु ती लागावी असे जरूर वाटते.. ) त्यातून मराठी, ही माझी मातृभाषाही नाही.. मग ह्या संस्थळावर मी का आले? तर मला वाटते.. इथे अक्षर माध्यमाची ताकद आणि गांभीर्य ओळखलेली जाणकार मंडळी वावरतात.. त्यांच्या मदतीने मी मराठी व अन्य भाषान मध्ये काही चांगले वाचन करू शकेन.. काही (बाळबोध) प्रश्न विचारू शकेन.. त्याच बरोबर संगीकला क्षेत्रात मला येत असलेले बरेवाईट अनुभव देखील नमूद करू शकेन.. इथे उपस्थित असलेल्या कलावंत विचारवंत सदस्यांच्या सहवासात मी कदाचित अधिक संवेदनशील कलाकार आणि माणूस होईन अशी स्वार्थी सदिच्छा घेऊन मी आलेय.. त्यातून.. आगे आगे गोरख जागे.. !!! - दिलतितली
प्रतिसाद आवडला.
तुमच्या प्रतिसादातून समृद्ध अपेक्षा दिसल्यामुळे पुन्हा एकदा जबाबदारीची जाणीवही झाली आहे.
"ऐसी अक्षरे" हे अक्षरांपुरतंच, लिखित कला, साहित्याइतपत मर्यादित राहू नये अशी इच्छा आहे. तेव्हा कलाकारांसाठी काही विशेष तांत्रिक सोयी, गोष्टी करायच्या असल्यास तुमच्याकडून इन्पुट्स घेऊन आम्ही गृहपाठही करू.
संस्थळाची माहिती
वर 'संस्थळाची माहिती' असा टॅब आहे. तिथे गेल्यास "ऐसी अक्षरे संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी" असा धागा दिसेल. तिथे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळावे.
कापाकापीच करा तुम्ही! आता
कापाकापीच करा तुम्ही!
आता सुरू केलीच आहेत वेबसाईट तर येते मी पण तिथे. ;-)
फोटो जालावरून साभार