Skip to main content

बीभत्स रस - एक स्तवन

टीप - ह्या रसावर कधीच काहीच खास लेखन न आढळल्याने एक फूलाची पाकळी.
========================

मेलेल्या कुत्र्याच्या शरीरावर
घोंघावणाऱ्या प्रत्येक माशीला ,
किंवा चोच आतड्यांत रुतवून
सडकं मांस टिपणाऱ्या हर एक गिधाडाला ,
की मग गटाराच्या आजूबाजूला लोळणाऱ्या
छोटेखानी डुकरांना -
ह्या बीभत्सरसाच्या नैसर्गिक अनुयायांना माझा साष्टांग नमस्कार !

शेंबूड बाहीला न पुसता तो
बिनदिक्कत स्वाहा करणाऱ्या,
किंवा उलटी तोंडापर्यंत आली तरी
तिला धैर्याने गिळून टाकणाऱ्या,
अथवा शरीरावरील जखमांकडे
सपशेल दुर्लक्ष करून त्या जखमा चिघळवणाऱ्या
हर एक बीभत्सपुत्रांना माझा त्रिवार मुजरा !

पिवळ्या पुस्तकात दडलेल्या
निर्लज्ज अवयवक्रीडांना
आंतरजालावर पसरलेल्या
बटबटीत संभोगदृश्यांना
आणि हो, निष्पापावर रोखलेल्या
किळसवाण्या नजरांच्या धन्यांना -
ह्या बीभत्सतेच्या विद्यार्थ्याचा रक्तलांच्छित सलाम!

शृंगारापासून दुरावलेल्या
निलाजऱ्या अवयव-कलेला,
बटबटीत भावनांना कागदावर
ओकणाऱ्या साहित्याला
कानातून पू वाहील अशा
सार्वजनिक संगीतपूजेला
ह्या बीभत्सतेच्या पुजाऱ्याचा अर्पण प्रसाद!

अमुक Wed, 16/04/2014 - 07:20

ह्या रसावर कधीच काहीच खास लेखन न आढळल्याने

........... उदाहरणे अनेक सापडतील.

एकट्या आरती प्रभूंच्याच कवितांतली काही उदाहरणे आठवणीतून देत आहे -

चार डोळे : दोन काचा, दोन खाचा
यात कोठे प्रश्न येतो आसवांचा ?
का त्वचेच्या वल्कलांची घाण व्हावी
ही शिसारी पुण्यवंतानांच यावी
आम्ही आहो गर्वगेंदाचे पुजारी
पिंक पुच्छीं टाकी नेमाने पुढारी
यात कोठे प्रश्न येतो भुंकण्याचा ?
सर्व थोरां हक्क आहे थुंकण्याचा..
कोरड्या ओठी जिभेचे व्यंग ओले
सर्व इच्छांचेच आता लिंग झाले
आपुले ना आपुल्या प्रेतास खांदे
वाढू दे ना बेंबीच्या देठास दोंदे
इंद्रियांचा इंद्र उद्गारे क्षतांचा,
"यात कोठे प्रश्न आत्म्याच्या व्रताचा ?"

---
किंवा दुसर्‍या एका कवितेतल्या पुढील ओळी ...

...
...
विसरू पहातो एकेकट्याला
रांगेतल्या या व्यंगार्थ काया
पाळीत जातो सुतके स्वतःची
हिजडा जसा की धरी ब्रह्मचर्या

अगदीच कोणी रस्त्याकडेला
स्वस्तांत मरतां नयनांत दोन्ही
उत्स्फूर्त भीती वेळीप्रसंगी
उडवीत खांदे देतोहि वन्ही

उसनी मिळाली शरीरे अम्हांला
विक्रीस जोड्यांइतुकी तयार
चिंता न त्रागा रांडेप्रमाणे
नियमीत घेतो सनदी पगार

....
....
------
किंवा 'कचेरीची वाट' या कवितेतल्या काही ओळी -
...
...
कानाच्या भोकाशी लाव फक्त फोन
इमानी ठेवावी धडावर मान

अश्रूंनाही म्हण वाळणारा घाम
घाल आतडीचा उरास लगाम

हृदयास म्हण हालणारा पंप
लाळेच्या तारेशी सदा असो कंप

गळ्यातली वांती गळ्यात ठेवून
पिकदाणींतले शब्द घे वेचून

थोरांनी टाकील्या श्वासा लाव नाक
कण्यासही हवे किंचितसे पोक

नको उमटाया स्तनांवर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ

....
....
-------
तुमच्या प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा.

नगरीनिरंजन Wed, 16/04/2014 - 10:16

In reply to by अमुक

छान उदाहरणे! बीभत्सपणामागे काही कारण वा भावना असेल तर कविता परिणामकारक होते. निव्वळ बीभत्सपणासाठी बीभत्सपणा नको वाटतो.

राजन बापट Fri, 18/04/2014 - 09:47

In reply to by अस्वल

खानोलकरांच्या "अजगर" कादंबरीमधे थोट्याचा तो प्रसंग असाच बीभत्स आहे.

विष्ठेत नि चिखलात सडलेलं आयुष्य काढणार्‍या थोट्याला एक मध्यमवय कललेली बाई मातृत्वाच्या भावनेनं उचलून घेते, त्याला न्हाहू माखू घालते. त्याला खायला दिल्यावर, खायची धड सवय नसलेला तो ताटातच ओकतो. त्यावेळी मूलबाळ नसलेल्या त्या बाईला वात्सल्यभावना अनावर होऊन ती त्याला कडेवर घेऊन पदराखाली घेते. तिच्या स्तनाच्या भाराखाली थोटा गुदमरतो. नंतर पौरुष जागं झालेल्या थोट्याच्या अंगाकडे लक्ष गेल्यावर बाई म्हणते, "माझं लेकरू जातीने पुरुष आहे बरं !"

हा सगळा प्रसंग अत्यंत उमळून आणणारा आहे यात शंका नाही.

अस्वल Fri, 18/04/2014 - 22:46

In reply to by राजन बापट

जी एंच्या कथांमध्ये पावलोपावली चपखल बीभत्सता जाणवत रहाते.
आसपासच्या माणसांचं, गर्दीचं वर्णन करताना जी ए बरेचदा ह्याचा वापर करतात.

"पारधी" कथेतील डॉक्टरांचे वर्णन करताना जी ए म्हणतात -
त्यांच्या फिकट, नासलेल्या मांसासारख्या चेहेऱ्याकडे बघून दादासाहेबांना उमळून आले. डोळे तर अधू होतेच, व ते आता भीतीने निर्जीव झाल्यामुळे दोन किडे चिरडून चेहऱ्यावर टोचल्याप्रमाणे दिसत होते. एक परपुष्ट अळी समोर उभी राहून 'हे काय' असं विचारीत होती.

अळी , हिरवट द्रव , उडून पडलेल्या चकत्या - सारे कोपर्यात पायाने ढकलल्याप्रमाणे समोरून नाहीसे झाले

मन Wed, 16/04/2014 - 13:08

माझ्या एका धाग्याला मागे काहिंनी बीभत्स म्हटलं होतं; ते आटह्वलं.
http://www.aisiakshare.com/node/1969
.
.
मला स्वतःला त्यात बीभत्स काय ते कळ्ळं नै.
हांन, बोरिंग, फडतूस, , कंटाळवाणं, निरर्थक असं काहीही कुणाला वाटलं; तर ते समजू तरी शकतो.

राजन बापट Fri, 18/04/2014 - 09:41

बीभत्सरसाचे एक जुने उदाहरण :

कोणाचे तरि पोर हे दिसतसे आहे किती घामट!
त्याचे ते झबले!- इथे किळस हो, त्याची मला वाटत!
हा, हा, या झिपर्‍या भिकार उडती निर्बंध डोईवरी
त्यांना तेलफणी असे लवतरी माहीत जन्मांतरी?
ही बोटे चघळीत काय बसले!- रे राम रे - लाळ ही!
काळी काय गळ्यातुनी जळमटे आहेत पन्नास ही!
शी शी! तोंड अती अमंगळ असे आधीच हे शेंबडे-
आणि काजळ ओघळे वरुनि हे! त्यातून ही हे रडे!!

तिरशिंगराव Fri, 18/04/2014 - 20:02

पुनरुक्तीचा दोष स्वीकारुनही पुन्हा एकदा दादा कोंडक्यांच्या 'विच्छा' मधले कवन लिहितो.

नाकामधुनी उंट लोंबती
उवा माखल्या केसांत
मळ्या गळ्यावर चिकटून बसल्या
मळी साचली कानात
अजागळागत चिरगुट अंगी
वास तयाला घामाचा
रुपगर्विता असली येता
कराल धावा रामाचा.