Skip to main content

हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला “हाजार चुराशीर मा” पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरुन गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभुती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही. अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकर यांचा प्रत्यक्ष परिचय असल्याने आणि त्यांचा बंगाली भाषेचा प्रदीर्घ व्यासंग माहित असल्याने अनुवाद उत्तम असणारच याची खात्री होती. शिवाय लेखकाची शैली अबाधित ठेवण्यावर त्यांचा भर असतो हे त्यांनी आपल्या अनुवादाबद्दल बोलताना मुद्दाम नमुद केलं होतं त्याचा देखिल प्रत्यय हे पुस्तक वाचताना पुरेपुर आला.

हे छोटेखानी पुस्तक कलकत्त्याच्या मुक्तीदशक म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कालखंडात घडलेल्या तरुणांच्या हत्याकांडावर आधारलेले आहे. सुजाता ही श्रीमंत खानदानी घरातील मध्यमवयीन स्त्री. पती, मुले, सासु यांच्या गराड्यात वावरणारी. देखणी, अबोल सुजाता बँकेत नोकरी करते. आणि एक दिवस तिला फोन येतो की तिचा सर्वात धाकटा आणि सगळ्या मुलांमध्ये तिचा सर्वाधिक लाडका असलेला मुलगा व्रती हत्याकांडात मारला गेला आहे. तिला आपल्या मुलाच्या बाहेरच्या उद्योगांबद्दल काहीच कल्पना नसल्याने हा तिच्यावर वज्राघातच असतो.त्यानंतरचे सर्व कठीण सोपस्कार उरकतात ते सुजाताच्या मनावर कायमच्या खोल जखमा ठेऊनच. या प्रसंगाला दोन वर्षे उलटुन जातात. पुन्हा तोच दिवस येतो. व्रती ज्या दिवशी मारला जातो त्याच दिवशी घरी नेमका धाकट्या मुलीचा साखरपुडा असतो. त्या दिवसभराच्या चोवीस तासात जे वादळ सुजाताच्या मनात आणि बाहेर घडतं त्यावर हे पुस्तक बेतलेलं आहे.

सुजाताच्या मनात प्रश्नांचं काहुर उमटलेलं असतं. सतत दोन वर्षे ती ह्या प्रश्नांची उत्तरे शोधीत आहे. तिच्या कडुन काही चुक झाली काय? आपल्या मुलाचं असं कसं झालं? आपल्याला आधी काहीच कल्पना कशी आली नाही? आणि ही उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात तिची भेट व्रतीच्या गरीब मित्राच्या आईशी होते. हा मित्र देखिल व्रतीबरोबरच मारला गेला आही. मात्र यांची अवस्था भयानक आहे कारण त्याच्या मोठ्या बहिणीशिवाय घरात कमवणारं कुणीच नाही. सुजाताला या घराबद्दल आणखि ओढ असण्याचं कारण व्रती शेवटच्या दिवशी येथे येऊन थांबलेला आहे. पुढे सुजाताची भेट व्रतीच्या प्रेयसीशी देखिल होते. या सार्‍यांकडुन सुजाता काही धागेदोरे मिळवते. स्वतः विचार करुन काही धागे जुळविण्याचा प्रयत्न करते. हे करतानाच तोला आपल्या अवतीभोवतालच्या माणसांशी देखिल झगडावं लागतं.

सुजाताच्या जवळपासची माणसे तिच्याहुन अगदीच भिन्न आहेत. स्वार्थी, कामासक्त नवरा, छ्ळवादी सासु, कणाहीन मुले, बेवडे जावई, काही नातलग व्याभिचारी, उथळ, आणि अशा गराड्यात तिला व्रती अगदीच वेगळा वाटतो. हळुहळु तिला त्याचे वागणे कळु लागते, पटु लागते. या सार्‍या प्रस्थापीतांविरुद्धच त्याचा लढा असतो. त्याला बदल घडवुन आणायचा असतो. त्याच्या मृत्युची बातमी पेपरात येऊ नये म्हणुन यशस्वी धडपड करणार्‍या नवर्‍याबद्दल तिला तिरस्कार वाटु लागतो. जवळचे सरकारी नोकरीतील, पोलिसातील कही जण व्रतीच्या भयानक, क्रुर मृत्युला कारणीभूत झालेले असतात. त्यांना तिचे मन क्षमा करु शकत नाही. कायमचा गेलेला मुलगा, कसलिही खुण मागे न ठेवता. त्याला पोलिसात फक्त एकच नाव मिळते. क्रमांक एक हजार चौर्‍यांशी. आणि सुजाता ही या एक हजार चौर्‍यांशीची आई. बस. मामला खत्म.

महाश्वेतादेवींनी लिहिलेल्या या कादंबरीची ताकद त्यांच्या शैली इतकीच त्या विशिष्ठ घटनाक्रमात आहे. फक्त एका दिवसात घडत जाणारे कथानक रंगवण्याचे अतिशय अवघड काम त्यांनी कमालिच्या यशस्वीपणाने पार पाडले आहे. आई मुलाच्या प्रेमळ संबंधाचे हृद्य चित्रण त्यांनी जागोजाग केले आहे. त्यामुळे हे नाते पुढे पुढे अधिकाधीक गहीरे होत जाते आणि सुजाताचे दु:ख देखिल तितकेच गडद होत जाते.व्रतीच्या म्रूत्युचे वर्णन देखिल अंगावर शहारे आणते. महाश्वेतादेवींच्या शैलीचा जबरदस्त परिणाम वाचकावर होतो यात शंकाच नाही. काही ठिकाणचे वर्णन तर वाचवतदेखिल नाही इतके दु:ख त्यात भरलेले आहे. स्त्रीच्या कोमल भावना, तिच्या मुलाबद्दलची तिची ओढ अतिशय तरल शब्दात महाश्वेतादेवी मांडतात आणि कथानायिकेचं दु:ख हे वाचकाचं दु:ख होऊन जातं. अर्थातच यात अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकरांचा महत्वाचा वाटा आहेच. त्यांची भाषेवरील हुकुमत निर्विवाद आहे. महाश्वेतादेवीची शैली बरोबर घेऊन त्याचा मराठीत अनुवाद करण्याचे काम त्यांनी कौशल्याने पार पाडले आहे. फक्त एका ठिकाणी मला खटकलेली गोष्ट म्हणजे खालच्या स्तरावरील माणसांच्या तोंडी त्यांनी घातलेली ग्रामीण मराठी बोली. जागोजाग येणार्‍या कलकत्त्याच्या वातावरणात ही बोली निदान मला तरी खटकली. बाकी अनुवाद अतिशय प्रभावशाली. थोडक्यात एक आशय ठासुन भरलेले, अप्रतिम पुस्तक वाचण्याचा आनंद या पुस्तकाने दिला.

यानंतर एक समाज शास्त्राचा विद्यार्थी म्ह्णुन या कादंबरीकडे पाहताना मात्र माझ्या मनात काही प्रश्न उभे राहीले. त्याचा ही उल्लेख येथे केल्यास अस्थानी होणार नाही. मार्क्स, कम्युनिझम, मार्क्स्वाद याचा कसलाही उल्लेख या पुस्तकात नाही. तरीही मार्क्सवादी मांडणी जागोजाग जाणवते. मार्क्सवाद हा विद्वानांनी कितीही गुंतागुंतीचा केला तरीही या तत्वज्ञानाने अनेकपदरी जनव्यवहार सोपा करुन टाकलेला आहे आणि त्याचा प्रभाव या लेखनात दिसतो. महाश्वेतादेवींबद्दल त्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत या व्यतिरिक्त मला फारशी माहिती नाही. मात्र त्या कट्टर मार्क्सवादी असाव्यात असे मला या पुस्तकाच्या मांडणीवरुन वाटले. आणि ही मांडणी पाहणे उद्बोधक आहे. सुस्पष्टपणे काळ्या आणि पांढर्‍या या दोनच रंगवलेल्या सर्व व्यक्तीरेखा. काळ्या रंगात सर्व प्रस्थापीत भांडवलवादी रंगवलेले. ते सारे शोषण करणारे, स्वार्थी, व्याभिचारी, कामी, दारुडे, उथळ. सुजाताला तिच्या सार्‍या श्रीमंत नातेवाईकांत एकदेखिल माणुस तिच्या विचारांचा किंवा तिच्या मुलाशी सहानुभुती दर्शवणारा मिळत नाही याचे खुप आश्चर्य वाटले. सारे गरीब पांढर्‍या रंगात रंगवलेले. अगदी सद्गुणांचे पुतळे नसले तरी ते सर्व शोषित. येथे नायिकेला संशयाचा फायदा मिळतो कारण त्यांच्यातले दुर्गुण कळावे इतपत तिची त्या समाजात उठबस नाही. मात्र माझ्यासारखे वाचक जे या समाजातुन आहेत त्यांना येथिल समस्यादेखिल माहीत असतातच. त्यामुळे गुंतागुंतीचा लोकव्यवहार अगदीच सोपा केलेला वाटतो. यावर बरेच काही लिहिता येईल. मात्र एक गोष्ट नक्की तीही कि यामुळे कादंबरीच्या आस्वादात काही फरक पडत नाही. एक सामर्थ्यशाली लिखाण या कादंबरीत भेटले असे मला वाटते.

अतुल ठाकुर

समीक्षेचा विषय निवडा

धनंजय Sat, 04/01/2014 - 00:43

याच कादंबरीवर आधारलेला "हजार चौरासी की माँ" हा चित्रपट मी बघितलेला आहे. जया बच्चनचा अभिनय चांगला आहे.

पुस्तकाची ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद.

याच काळातल्या घटनांचे, त्यांतील काही पात्रांच्या आयुष्यावर दूरदेशात-दूरकाळात पडलेल्या पडसादांचे कथानक असलेली एक कादंबरी नुकतीच वाचली : झुंपा लाहिड़ीची "The Lowland". या कादंबरीत त्या काळात क्रांतीने भारावलेल्या तरुणांच्या बाबतीत काळे-पांढरे नव्हे तर करडे चित्र चितारलेले आहे. त्या काळात लहानाचे तरूण होणारे दोन भाऊ - पैकी एक समाजात होणार्‍या अन्यायाकडे दुर्लक्ष करतो, तर दुसरा क्रांतिकारी होतो. क्रांतिकारी भाऊ पोलिसांकडून खोट्यानाट्या प्रकारे मारला जातो खरा (फेक एन्काउंटर), परंतु त्यानेही आधी एका (अत्याचारांशी असंबद्ध) पोलीस कर्मचार्‍याला मारण्याच्या कटात भाग घेतला होता.
कादंबरी वाचताना एका प्रकारे आपण-बरे-आपले-भले-बरे भाऊ आपण अपुरा-अधू म्हणून समजतो; तसेच चळवळीत पडून मग काही अक्षम्य करणार्‍या भावाबाबतही आपले मन कडवट होते.

गब्बर सिंग Sat, 04/01/2014 - 03:18

एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय?

नास्तिक लोक भक्तीसंगीत, अभंग, भजने यांचा आनंद कसा लुटतात हा माझा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित आहे.

मन Mon, 06/01/2014 - 10:10

In reply to by गब्बर सिंग

कम्युनिस्ट व समाजवादाकडे झुकलेल्यांना (किम्वा निदान टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्यवादी नसलेल्यांना) गब्बरच्या प्रतिसादांचा अस्वाद घेता येतो का?
ररा क्वचित अवतरुन झकासपैकी काही लिहितात, तेव्हा गब्बर सारख्या श्रीमंत-धगदांडागे-सावकार धार्जिण्या माणसाला त्याचा आस्वाद घेता येतो का?
गेला बाजार गब्बरला नया दौर, नमक हराम वगैरे चित्रपट पहावेसे वाटतात का?
(कुणाचा अधिक अभ्यास असलयस इतर अधिक समर्पक चित्रपट सुचवावेत.)
टोकाच्या आशावादी घासकडवींना ट्राजेड्या , व इतर माहितीने खच्चून भरलेली पण चिंता व्यक्त करणारी (निराशावाद डोकावणारी) सादरीकरणे आवडत नसतीलच काय?
नगरिनिरंजन सतत "आधी होतो तसेच बरे होते. प्रगती नसून अधोगती सुरु आहे" असे अधून मधून सुचवत असले ("जुलूस") नि आदिम अवस्थेत जमेल तितके जगावेसे
त्यांना वाटत असले तरी डिस्कवरी च्यानेलवरील extreme mechanics व तत्सम कार्यक्रम वगैरे त्यांना आवडूच नये की काय?
.
.
खरेतर आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, आवडत नाही असे आपण म्हणतो तेव्हा बहुतांश वेळा आपण त्याबद्दलच अधिक विचार, थॉट एक्स्परिमेंट केलेला असतो.
फार अभ्यस्त वगैरे मंडळीच हे करतात असे नाही, पण कुठलीही विचारशील व संवेदनशील व्यक्ती हे करण्याची शक्यता अधिक.
ही विरोधभक्ती असते.
विचार पटत नसला तरी एंजॉय करता येत असावाच (त्याच्या मर्यादा लक्षात आल्या तरी).
फक्त त्याबद्दलची तिडिक असली तर गोष्ट अवघड आहे.
.
.
घाटपांडे व नरेंद्र दाभोलकर ही दोन व्यक्तिमत्वे आस्तिक आहेत की नाहित ठाउक नाही. पण फार काही भाविक वगैरे वातत नाहित.
पण कैकदा ह्यांच्या लिखाणात सहजच एखाद्या अभंगाला quote करणे सुरु असते.
आवडिने वाचून नकळत ते लक्षात ठेवले जात असलयशिवाय असे होने शक्य नाही.
ही माणसे तुकाराम, नामदेव ह्यांना quote करत असली तरी काळ्या चिकट दगडाचा कमरेवर हात ठेवलेला कुणी पंढरीचा राजा ह्यांच्या आयुष्याचे फुक्टात भले करेल असे ह्यांना वाटत नसणार.

गब्बर सिंग Mon, 06/01/2014 - 12:05

In reply to by मन

वा वा वा. मस्त प्रतिसाद, मनोबा.

पिनो न्युआर प्यायला या !!!

-------

गेला बाजार गब्बरला नया दौर, नमक हराम वगैरे चित्रपट पहावेसे वाटतात का?

(कुणाचा अधिक अभ्यास असलयस इतर अधिक समर्पक चित्रपट सुचवावेत.)

काला पत्थर हा माझा अत्यंत आवडता पिक्चर. माझ्या बायकोने सजेष्ट केला तो म्हंजे "मदर इंडिया".

कुली हा माझा अत्यंत नावडता. काय बकवास पिक्चर आहे !!!

---

ही विरोधभक्ती असते.

हे कधी ऐकलं नव्हतं. विचार करावा लागेल.

अजो१२३ Mon, 06/01/2014 - 12:07

In reply to by मन

मूळात एका माणसाचं एक तत्त्वज्ञान असतं हे मानणं चूकीचं आहे. आणि एका वर्तनाला एका विशिष्ट तत्त्वज्ञानाने मोजता येते हे तर अजूनच चूकीचे.

नितिन थत्ते Sat, 04/01/2014 - 10:44

कादंबरी (भाषांतरितच) मी वाचली आहे. येथे ओळख छान करून दिली आहे.

>>एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय?
तत्त्वज्ञान पटण्याचा आणि कलाकृती आवडण्याचा संबंध तितकासा दृढ नसतो. हीच कादंबरी उलट दिशेने (कम्युनिस्ट राजवटीत धर्म टिकवण्यासाठी लढणारा तरूण) लिहिली तरी तितकीच रंजक होईल. तुम्ही भांडवलवादी आहात की समाजवादी याने काही फरक पडू नये.

>>नास्तिक लोक भक्तीसंगीत, अभंग, भजने यांचा आनंद कसा लुटतात हा माझा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित आहे.
स्वतः नास्तिक असल्याने यावर भाष्य करू शकतो. मी याचा आनंद लुटू शकतो तो संगीत म्हणून. "भेटीलागी जीवा लागलीसे आस" ऐकताना एखाद्या आस्तिकाला (कदाचित) जी अनुभूती येत असेल ती मला येत नसेल. पण त्या अभंगात "आस लागण्याची" जी आर्तता ध्वनित झालेली* आहे ती आनंद देऊन जाते. त्या आर्ततेचा निर्देश विठ्ठलाकडे असेल किंवा एखाद्या प्रेमिकाकडे असेल. उदा. हे भजन मला "तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यूं मुझको लगता है डर" असेच ऐकू येते. :)

*ती आर्तता समजण्यात आजवर झालेल्या संस्कारांचा वाटा असतोच बहुधा.
एकच प्याला मधील सिंधूचे (बेवडा असूनही) सुधाकराशी असलेले वागणे आपल्याला पटत नसले तरी सिंधूच्या त्रासाशी आपल्याला रिलेट करून घेता येते.

'न'वी बाजू Sat, 04/01/2014 - 11:18

In reply to by नितिन थत्ते

स्वतः नास्तिक असल्याने यावर भाष्य करू शकतो.

भाष्य नास्तिकांचे प्रातिनिधिक अनुभवकथन म्हणून घेता यावे, की एका (हॅपन्स-टू-बी) नास्तिकाचे वैयक्तिक अनुभवकथन ठरावे?

नितिन थत्ते Sat, 04/01/2014 - 11:29

In reply to by 'न'वी बाजू

वैयक्तिक समजावे. अनेक नास्तिकांनी सिमिलर अनुभव कथन केले तर प्रातिनिधिक की कसे ते ठरवता येईल.

समांतर उदाहरण साबुदाण्याच्या खिचडीचे घेता येईल. नास्तिकाला उपासामागच्या भावनेशी तादात्म्य नसले तरी त्यामुळे साबुदाण्याची खिचडी खाताना त्याला मळमळून येत नाही आणि तो ती एन्जॉय करतोच.

'न'वी बाजू Sat, 04/01/2014 - 12:26

In reply to by नितिन थत्ते

सर्वप्रथम, उपासाच्या (किंवा अन्य कोणत्याही) दिवशी साबुदाण्याची खिचडी खाण्याचा (+ एन्जॉय करण्याचा) आणि आस्तिक असण्यानसण्याचा (/ उपासाच्या भावनेशी तादात्म्य असण्यानसण्याचा) काही परस्परसंबंध असण्याबाबत साशंक आहे.

दुसरे म्हणजे, (काहीसे विरुद्ध उदाहरण द्यायचे झाले, तर) मला ४ जुलैला अथवा थ्यांक्सगिविंगलासुद्धा भडभडून वगैरे येत नाही. तसेच, टर्की हा पक्षी खाद्य म्हणून सामान्यतः अजिबात आवडत नाही.

मात्र, (१) अन्य कोणत्याही दिवशी कागदाचा लगदा खाल्ल्याचे समाधान देणारा टर्की हा थ्यांक्सगिविंगच्या दिवशी, त्याच्याबरोबरच्या त्या फिक्सिंग्ज़मुळे म्हणा किंवा अन्य कशामुळे म्हणा, का कोण जाणे, पण अप्रतिम लागतो, (२) थ्यांक्सगिविंगच्या दिवशी काहीही करून टर्की खावासा वाटतो, खाल्ला नाही किंवा खाता आला नाही तर चुकल्याचुकल्यासारखेच नव्हे, तर धर्म बुडाल्यासारखे वाटते, आणि (३) थ्यांक्सगिविंगव्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी कोणी मला अगदी साग्रसंगीत, समस्त फिक्सिंग्ज़सह जरी तो टर्की देऊ केला, तरी (जगात टर्कीव्यतिरिक्त खाण्यालायक असे इतर अनेक उत्तमोत्तम पर्याय असताना) मला त्याकडे ढुंकून पाहावेसे वाटत नाही. मात्र, थ्यांक्सगिविंगच्या दिवशी (जगात टर्कीव्यतिरिक्त खाण्यालायक असे इतर अनेक उत्तमोत्तम पर्याय असूनसुद्धा) टर्की न खाण्याचा (अथवा टर्कीऐवजी इतर काही खाण्याचा) विचारही करवत नाही, आणि जर तो मिळाला नाही, तर आधी सांगितल्याप्रमाणे अशक्यप्राय अवस्था होते.

बाकी, थ्यांक्सगिविंगबद्दलची माझी धर्मभावना ही 'लांब सुट्टीसाठी आणि भरपूर खरेदीसाठी निमित्त देणारा एक दिवस' इतपतच आहे.

===================================================================================================================

वस्तुतः, थ्यांक्सगिविंगला एक तर थ्यांक्सगिविंग म्हणून, आणि दुसरे म्हणजे माझ्या या देशातील प्रथमागमनाची संवत्सरी या नात्याने, असे भडभडून येण्याकरिता मला दुहेरी कारण असूनसुद्धा.

थ्यांक्सगिविंगला तसाही काही धार्मिक सिग्निफिकन्स नाही - आणि राष्ट्रीय ऐतिहासिक सिग्निफिकन्स असला, तरी माझ्या वैयक्तिक इतिहासाशी त्याचा काहीही संबंध नसल्याने मला भडभडून येण्यासारखे त्यात काहीही नाही - ही बाब अलाहिदा.

धनंजय Sun, 05/01/2014 - 15:04

मागे मोत्झार्टच्या रेक्विएमच्या आस्वादाबद्दल मी असे लिहिले होते :

आता आस्वादाबद्दल मला पडलेला एक प्रश्न :
या सगळ्या प्रकारातील धर्मशास्त्र किंवा अखेरचा-न्याय(कयामत)-शास्त्र माझ्या विश्वासाचे नाही. ज्यांचा त्यावर विश्वास असेल त्यांना संगीताचा आस्वाद कितीतरी वेगळा मिळत असेल नाही का? देवळातही भजन ऐकताना भक्तीभावात तल्लीन झालेल्या श्रोत्याला अधिक आनंद मिळत असेल ना? मग विचार केला, की हे मोत्झार्ट (किंवा उत्तम भजन-गायक) तरी कुठे एवढे पुण्यवान असतात. आपल्या उत्तमोत्तम गायकांना बाई-बाटलीचा परहेज नसतो, तसा मोत्झार्टलाही नव्हता. मग तसा स्खलनशील गायकही तल्लीन होऊन निर्गुणात निस्संग होण्याची भजने गाऊ शकतोच ना? मग त्या धर्मशास्त्रात विश्वास नसलेल्या मलासुद्धा श्रोता म्हणून समरस होता यावे... पण कोणास ठाऊक हे पटत नाही. कदाचित आपल्या बाई-बाटली स्खलनशीलतेने पश्चात्ताप-दग्ध होऊनच मोत्झार्ट त्या करुणा भाकणार्‍या शब्दांना तसे प्रामाणिक संगीत देऊ शकला असेल.

शेवटी वाटले - असेना का माझा आस्वाद त्या धार्मिक ख्रिस्ती माणसापेक्षा लंगडा! त्या अंत्यदिनाच्या (कयामतीच्या) भीतीमध्ये आणि करुणेमध्ये हा एक संगीतमय तासभर समरस होण्यासाठी त्याला बाकी दिवसभरही तसेच "आपण-पापी-आहोत-पश्चात्तापा"ची झळ सहन करावी लागते. तो आस्वाद नाही मिळाला मला, तरी दिवसभराची मनःशांती मिळते तो सौदा चांगलाच! (पण हा माझा दृष्टिकोन. दिवसभराची झळ सोसून ते संगीत सच्चा आर्तपणे ऐकण्याचा सौदा दुसर्‍या कोणाला त्यांच्या दृष्टीने अमोलिक वाटत असेल.)

मी Sun, 05/01/2014 - 23:24

>>एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय?

तत्त्व एवढे कोते नसावे, ते प्राथमिक स्वरुपात असू शकते पण ज्ञानामुळे त्याचा विस्तार झाला नाही तर त्या कोतेपणामधे कर्मकांडाचे आस्तिकत्वच तयार होते. प्रगल्भता ही आनंद घेता येणार्‍या गोष्टींपासून वंचित करू शकत नाही.

अजो१२३ Mon, 06/01/2014 - 11:56

एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय?

मला जगातले कोणतेच तत्त्वज्ञान पटत नाही. कोणतीही ओळ सांगीतली कि त्यातली खोट सांगणार. ऑन अ‍ॅन अ‍ॅवरेज मी जीवनाचा कमी आनंद घेत असावा.

बॅटमॅन Mon, 06/01/2014 - 13:02

In reply to by अजो१२३

मला जगातले कोणतेच तत्त्वज्ञान पटत नाही. कोणतीही ओळ सांगीतली कि त्यातली खोट सांगणार.

आपल्या आस्वादाची हीच पद्धत असेल तर ;) =))

ऋषिकेश Mon, 06/01/2014 - 19:16

कडक पुस्तक परिचय. परिचयही आवडला. पुस्तक मिळाले की नक्की वाचेन.

शिवाय, यानिमित्ताने अरूणा जुवेकर या(ही) चांगला अनुवाद करतात हे कळले (नै हल्ली नव्या अनुवादकांची पुस्तके घेताना हात थरथरतोच!)

अवांतरः
नास्तिक आस्तिकांना भूरळ पाडणार्‍या रचनांचा आस्वाद घेताना अनेकदा पाहिले आहे, मात्र एखाद्या आस्तिकाने नास्तिकांचे विचार मांडणार्‍या उत्तम गद्याचा/पद्याचा/चित्राचा आस्वाद घेताना बघण्याचे भाग्य फार सहज लाभलेले नाही. (माझ्यासारखे दोन्ही पक्षांत नसणारे अधिक भाग्यवान हो! ;) )

आस्तिकांच्या अस्मितांची / भावनांची गळवे अधिक नाजूक असतात का?

मन Mon, 06/01/2014 - 20:13

In reply to by ऋषिकेश

आम्ही कधी हाटेलात गेलो तर ग्रुपमधील व्हेज वाले फक्त व्हेज पदार्थांचाच आस्वाद घेतात. नॉनव्हेजवाले दोन्हीकडे चापून हाणतात. हे आस्तिक-नास्तिकला समांतर म्हणावं काय?

अतुल ठाकुर Mon, 06/01/2014 - 20:28

In reply to by ऋषिकेश

मात्र एखाद्या आस्तिकाने नास्तिकांचे विचार मांडणार्‍या उत्तम गद्याचा/पद्याचा/चित्राचा आस्वाद घेताना बघण्याचे भाग्य फार सहज लाभलेले नाही.