तेरा ट्रेडीसनल अत्याचार
तेरा ट्रेडीसनल अत्याचार
फार पूर्वीपासून मी धार्मिक वाङ्मय आणि रूढींची टिंगल करत आले आहे. का याचा विचार करत असताना असं वाटलं, काही शेजारीपाजारी होते तसे लोक शिंग फुटल्यानंतरच भेटले असते, तर कदाचित मी धर्मद्वेष्टी झालेही नसते. पण ’देवाच्या मनात’ तसं होणं नव्हतं.
आत्ता आहे त्याच्या साधारण ७५% उंची असतानाची गोष्ट. अगदी टिपिकल हिंदू, शहरी, विभक्त कुटुंबाप्रमाणे आमच्याही घरात कोणीही सासुरवाशीण नव्हती. आम्ही चौघेही घराचे मालक. आता कोणाचा विश्वास बसणार नाही, पण माझ्या लहानपणी महाराष्ट्रात वीजतुटवडा वगैरे नव्हता. ठाण्यात संध्याकाळी अंधार पडल्यावर बटणं दाबून घरात उजेड होत असे. समईच्या शुभ्र कळ्या उमलवण्याइतपत कोणाकडे वेळ नव्हता आणि तशी वेळ आलेलीही नव्हती. त्यातून आई-बाबांचा प्रेमविवाह असल्यामुळे आई किंवा बाबा कोणाच्यातरी आठवणीनं झुरण्याचीही शक्यताही कमीच होती. घरातल्या दोन्ही मास्तर लोकांना संध्याकाळच्या वेळेस पोरं घरात बसलेली बघवत नसे. त्यामुळे दुपारी अभ्यासाला बसवायचं आणि संध्याकाळी खेळायला घराबाहेर पाकटवायचं अशी पद्धत. एकंदर खास शहरी आयुष्यामुळे दिवेलागण या प्रकाराचं महत्त्व समजण्यासारखी परिस्थिती नव्हती, अंधार पडताना पाहून डोळे भरून येण्याचं ते वयही नव्हतं आणि 'शुभंकरोति' वगैरे प्रकारांवर घरी कोणाचा विश्वासही नव्हता. हे असं काहीतरी म्हणतात हे इकडेतिकडे वाचूनच समजलं होतं.
आमचं घर तळमजल्यावरच. संध्याकाळी खेळून झाल्यावर आम्ही कोणाकडे जाण्यापेक्षा बाकीची पोरंच आमच्याकडे पाणी पिण्यासाठी किंवा धडपडलं असेल तर औषध लावून घेण्यासाठी यायची. त्यामुळे खेळून घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे यापलीकडे कोणाच्या काही सवयी असतील याची कल्पना येणं जरा कठीणच होतं. हा निरागसपणा वाढत्या वयानुसार कमी व्हायला लागला. एकदा खेळून झाल्यावर राहुलचा नवा मेकॅनो बघायला आम्ही त्याच्या घरी गेलो. तर हे 'शुभंकरोति' काय आहे ते अनुभवायला मिळालं. घरचे सगळेच 'शुभंकरोति' आणि रामरक्षा म्हणायला लागले. तसे हे सगळे श्लोक आमच्या शाळेनंसुद्धा रटून घेतले होते. पण हे असलं काही घरीही म्हणायचं असतं, निदान काही लोक म्हणतात, हे मला तेव्हाच समजलं. मग काहीबाही कारणानं दिवेलागणीच्या वेळेस कधीमधी राहुलकडे गेलो असलो की, रामरक्षा आणि ते झाल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं हे प्रकार पाहिले. Be Romans in Rome, वाक्प्रचार खूप उशिरा समजला. पण परीक्षा नाही, काही नाही, उगाच कशाला मोठ्यांचा पाया पडायचं? मी आणि भाऊ संध्याकाळच्या वेळेस त्यांच्या घरी जाणं टाळायला लागलो. क्वचित कधी आई-बाबांनी तिकडे पिटाळायचा प्रयत्न केलाच, तर "ते जेवत असतील...", "शाळेत राहुलशी भांडण झालंय." असल्या काहीही सबबी काढून आम्ही हे टाळायचो.
एक ती दिवेलागणीची वेळ वगळता ते घर मजेशीर होतं. राहुल आणि मी एकाच वर्गात होतो. लहानपणी एकमेकांच्या झिंज्या ओढणे, आम्ही दोन भावंडं आणि राहुल या तिघांपैकी दोघांनी युती करून तिसऱ्याचा कात्रज करणे वगैरे प्रकार आम्ही एकत्र शिकलो. माध्यमिक शाळेत असताना मी आणि राहुल एकत्र अभ्यास, एकमेकांना अभ्यासात मदत वगैरे करायचो. नाना रानडे दिवसात पहिल्यांदा भेटल्यावर मला 'गुड माँर्निंग' म्हणायचे. असं काही करताना दिवसाची वेळ कोणती हे पाहण्याची रूढी त्यांना आवडत नसे. आणि माझा उल्लेख "ही माझी 'गुड मॉर्निंग' मैत्रीण" असा करताना आमच्या वयातला फरकही विसरण्याची त्यांची तयारी असायची. (हा फरक मी कध्धी कध्धी विसरायचा नाही, ही समज मला कध्धीच आली नाही.) शिवाय माझ्या वेंधळेपणामुळे मला त्यांच्या घरी बरेचदा जावं लागत असे. घराची किल्ली घरात आणि मी घराबाहेर राहून लॅच लॉक झाल्यामुळे अशी वेळ माझ्यावर बरेचदा यायची. (शेवटी एकदा ती किल्लीशिवाय बंद न होणारी लॅचेस गोदरेजने काढली आणि माझा आत्मा मुक्त झाला.) मग मी कधी सोहोनींच्या घरी, कधी रानड्यांच्या घरी असं बरेचदा व्हायचं. अशा वेळेस मी नक्की कधी धर्मबुडवेपणा करेन याचा नेम नव्हता.
अशीच एक दुपार. घरातले सगळे घराबाहेर, आपापल्या शाळा-कॉलेजांमधे आणि मी एकटी अंगणात. माझ्या किल्ल्या शिरस्त्याप्रमाणे घरात राहिल्या. अजून भूक लागली नव्हती, त्यामुळे घड्याळही पाहिलं नव्हतं. मी अंगणात उनाडत होते आणि वरून काकूनं पाहिलं. माझा गोरा वर्ण माध्यान्हीच्या उन्हात रापताना पाहून त्या माउलीला माझ्या लग्नाची काळजी वाटली का भुकेची, याची मला कल्पना नाही. घरातल्या अंबेपेक्षा ही माउली फारच वेगळी होती. नायलॉनच्या, न्यूट्रल रंगांच्या साड्या, जाडीशी वेणी, शांत चेहेरा आणि क्वचित कधी राग, वैताग व्यक्त केलाच, तर तो फक्त राहुलवरच. तिला मी कधीही घरातल्या इतर कोणावर किंवा बाहेरच्याही कोणत्या व्यक्तीवर रागावलेलं पाहिलेलं नव्हतं. अगदी राजकारणी लोकांवरही नाही. आजी तर राहुलवरही वैतागायची नाही.
काकूनं वरून हाक मारली. "उन्हात फिरू नकोस. आजारी पडशील. आमच्याकडे बस. आई किंवा बाबा आले की जा घरी." अंगण ते दुसरा मजला असा वाद घालण्यात फार हशील नव्हता. मी वर गेले. "जेवायच्या वेळेला आली आहेस, आता जेवूनच जा." नानांनी सूचना केली. मला ब्रह्मांड आठवलं. इथे जेवायला हरकत नाही, पण घरी माझ्यासाठी तयार आहे ते शिळं कोण खाणार? सकाळच्या पोळ्यांना मी रात्री शिळ्या समजते याचा आईला राग होताच. जेवणावरून नाना आणि माझं भांडण सुरू झालं. ते किती वेळ चाललं असतं याचा नेम नव्हता, पण आजीनं हटकलं. "अहो, तुमची औषधाची वेळ झाल्ये; पोळ्याही होतायंत. दोघेही आत जाऊन काय ते भांडा." मी त्या दोघांच्या गनिमी काव्यात सापडले.
आत पाहिल्यावर प्रश्न पडला, "काकू आणि आजीचं पान दिसत नाहीये." जेवढा गोंधळ माझ्या चेहेर्यावर होता, तेवढाच गोंधळ त्या दोघींच्या चेहेर्यावर दिसत होता. "अगं, मी पोळ्या करते आणि मग बसतोच आम्ही!" मला समजेना, जिनं एवढे कष्ट करून आम्हांला खायला घालायचं, तिच्यासाठी न थांबता आपण कसं गिळायचं! मला काय प्रॉब्लेम आहे हे काकूला समजेना. "तू पोळ्या करून घे ना, आम्ही थांबतो. आईसाठी आम्ही घरी थांबतोच की!" या रानड्यांच्या घरी आम्ही इतपत पडीक असायचो की, कोण किती जेवणार याचा अंदाज मलाही होता; मग या कर्त्या बाईला का समजू नये? पण आम्ही दोघीही परस्परांना लंब असणाऱ्या दोन मितींमधे होतो. आमचा संवाद म्हणजे ती मराठीत आणि मी बंगाली-गुजरातीत बोलत आहोत असा चालला होता. नाना आधीच तिथे डायनिंग टेबलवर बसले होते. त्यांची चुळबूळ वाढली होती. "तुम्ही बसा जेवायला. नानांना वेळ चुकवून चालणार नाही." तेही होतंच. आमच्या घरी कोणालाही हार्ट अटॅक आलेला नव्हता आणि कोणाचं वयही सत्तरीच्या घरात नव्हतं. यापुढे मला आर्ग्युमेंट सुचलं नाही. त्यामुळे का होईना, ही डायनिंग टेबलवरची पहिली यशस्वी माघारच झाली. नाही म्हणायला आजोबा यायचे तेव्हा आमच्यासारखेच आईसाठी थांबायचे. पण टायमिंग चुकल्यावर हे सुचून काय फायदा; फुरसतीत उत्तरं द्यायला हे इंटरनेट होतं थोडंच?
पहिली पोळी झाल्यावर तिनं पाव-पाव पोळी आम्हां तिघांच्या पानात वाढली, नाना, राहुल आणि मी. गरमागरम पोळी गेल्या अनेक वर्षांत ताटात पाहिली नव्हती; कदाचित ही पहिलीच वेळ. तव्यावरून थेट पानात अशी सोय आमच्याकडे नव्हतीच. पोळी असो किंवा भाकरी, तिला डबाच दिसायचा. पण ही अशी हुकमी अशी संधी सोडण्याएवढी तत्त्वनिष्ठा माझ्याकडे नाहीच. बोटं, जीभ भाजण्याची पर्वा न करता मी थेट तुकडा मोडून तोंडात टाकला. गरम पोळीच्या पहिल्या घासाला भाजी, आमटी नसली तरी चालतं. इथे तर पोळीला आधीच तूपही होतं. दोन दातांना सुख मिळतं न मिळतं, तोच सगळे माझ्याकडे बघतायंत असं वाटलं. खरंच सगळे माझ्याकडे बघत होते. नानांच्या उजव्या हाताची चिमूटही हवेतच, ताटाच्या बाहेर तरंगती दिसली. 'आता काय?' असा प्रश्न माझ्या चेहेर्यावर लिहिलेला होता. बाकीच्यांचे चेहेरे असे चमत्कारिक का हे मला समजेना. त्यांनी थेट कृतीमधूनच उत्तर दिलं.
"वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे..."
बॉलिवुडी आदर्श बाळगत मी आपलं लिप सिंकींग करताना एकीकडे 'आत्ता कुणाचं लग्न आहे का काय?' वगैरे विचार चेहेर्यावरून लपवायचा प्रयत्न केला नाही. मनातल्या मनात लाजेकाजेचे तुकडे गोळा करताना पोळीची फक्की मारून बसले. यथावकाश प्रार्थना संपली. मला वाटलं, झालं आता सगळं. पण नाही. राहुल अजूनही स्वस्थ बसून होता. पिवळ्याधम्मक सनमायका चिकटवलेल्या डायनिंग टेबलावर चित्रावती घालून झाल्या. पुरुषांनी मुद्दाम अन्न, पाणी ताटाबाहेर ठेवायचं आणि बायकांनी मागून ते साफ करत बसायचं, यामागचं लॉजिक विचारण्याची माझी हिंमत झालेली नाही. एकदा चित्रावती घालून झाल्यावर मात्र खरोखरच वदनी कवळ गेला. पोटात अन्न गेल्यावर मग वातावरण थोडं सैलावलं. "तुम्ही नाही म्हणत, 'वदनी कवळ घेता'?" मला संधीच हवीच होती, ती राहुलने दिली. "नाही. तुम्हांला तरी काय गरज आहे प्रार्थनेची? काकू चांगला स्वयंपाक करते की." चार-सहा दिवसांपूर्वी कोणत्याशा बी-ग्रेड चित्रपटात पाहिलेला ड्वायलाक मी डकवून दिला. मला वाटलं की, काकूला कौतुक वाटेल. तिनं मागे वळून पाहिलंही नाही. नानांनी आम्हां दोघींकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि आमटीचा भुरका मारला. पण मला खरंच तिच्या हातचं जेवायला आवडायचं. त्यांच्याकडे आमटीत नारळ असायचा; आमच्याकडे आमटी कधीच नसायची. मीच कुरकुर करायचे ही गोष्ट निराळी. शिवाय आमच्याकडे भाजी आवडली नाही, तरी आपल्या वाट्याची संपवायला लागायची. माझ्या तर सोडाच, राहुलच्याही मागे त्याचे घरचे कोणी "भाजी खायलाच पाहिजे" म्हणून धोशा लावल्याचं पाहिलं नव्हतं. मजाय याची! पण रोज काय 'वदनी कवळ घेता'? अशी पोळी ताटात थंड होताना बघायची शिक्षा मिळण्यापेक्षा कोबीची भाजीसुद्धा गिळणं सोपं आहे की. आता हा एपिसोड घरी नको समजायला. किल्ली विसरल्याबद्दल नाही, पण रात्री शिळं खावं लागेलच. वर पुन्हा घरी ती 'वदनी कवळ घेता'ची भानगड नको सुरू व्हायला! नशिबानं आई-बाबांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली.
पुढे नानांना हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला. शारीरिक ताकद कमी झाली, तरी त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. काही दिवसांतच त्यांच्या गोरागोमट्या चेहऱ्यावर तजेला परत आला. पांढरं धोतर, पांढरा झब्बा घालून ते फार दिवस निस्तेज दिसले नाहीत. तो झटका सुदैवाने फक्त 'वॉर्निंग शॉट' निघाला. रोज झेपेल तेवढा व्यायाम करणं भाग होतं. संध्याकाळी वर्दळ वाढायच्या आधी ते आजूबाजूला एक फेरी मारून यायचे. त्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ विश्रांती घ्यायचे आणि मग सावकाश दोन मजले चढून जायचे. असेच एकदा आमच्याकडे अशोक काका आले होते, तेव्हा या दोघांची भेट झाली. काका बाबांचे 'बिछडे हुए' मित्र. ते एक वर्षभर आमच्याकडेच राहत होते. त्यांचं काम ठाण्यात असायचं. संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमारास काका घरी घरी यायचे तेव्हा मी घरी असायचे. काकांकडे पाहून, हे नक्की कोण असावेत, याचा अंदाज घेणं कठीण होतं. हाफशर्टातूनही दिसणारे हात पाहूनही त्यांच्या कमावलेल्या शरीराची कल्पना येत असे, पण पोट मोठ्ठं सुटलेलं. दुसऱ्या माणसाच्या आवडीप्रमाणे काय वाट्टेल त्या विषयावर ते गप्पा मारणार. कसेही वेडेवाकडे प्रश्न विचारले, टिंगल केली तरी त्यांना राग आलेला पाहिला नाही, पण आवाज मात्र १०० लोकांसमोर भाषण देत आहेत असा. नानांच्याही बाबतीत तशीच काहीशी गंमत होती. गोरागोमटा वर्ण, वयाप्रमाणे उडलेले केस आणि मध्यम बांधा, उंची. संघातल्या उत्सवांचा अपवाद वगळता नेहेमीच पांढरंशुभ्र धोतर, अंगातलं जानवं कधी नजरेला पडणार नाही एवढा व्यवस्थितपणा, पण कॉंग्रेसी आहेत का उजवे का समाजवादी हे काही समजू नये. चेहऱ्यावरून हा माणूस वाचन करणारा असावा असं वाटेल, पण नानांचं शिक्षण किती हे मलाही माहीत नाही.
या दोघांसाठी पाणी घेऊन आले, तर काका नानांना रामरक्षेचा अर्थ विचारत होते. काका कोणालाही प्रश्न विचारायला लागले की आपण गुणी बाळासारखं शांत राहायचं; जमलंच तर आणखी आहुती टाकायच्या. "पण नाना, मला एक सांगा, तो राम बद्धपद्मासन घालून, सीतेला मांडीवर घेऊन आणि धनुष्य खांद्याला लावून ध्यान करत कसा बसणार?" मग काकांनी मला तिथेच बद्धपद्मासन करायला लावलं. स्वतःची शबनम माझ्या डाव्या खांद्याला अडकवली. शबनम खांद्यावरून ओघळून जमिनीवर जाऊन स्थिरावली. नशीब, मांजर या दोघांना घाबरून आधीच पळून गेली होती, नाहीतर तिला सीतेसारखं माझ्या मांडीवर बसवलं असतं. "हे कसं हो जमणार नाना?" उत्तर मिळालं नाही. नाना 'विचार करून उत्तर देणार' म्हणाले. ते घराबाहेर पडल्यावर काका आणि मी बराच वेळ खिंकाळत बसलो.
मग पुन्हा मी रानड्यांकडे गेले होते, तेव्हा नानांनी हा विषय काढला. त्यांच्याकडे उत्तर सोडून बरंच काही होतं. "रामरक्षा, रामायण आणि इतर धार्मिक साहित्याबद्दल प्रश्न विचारणंच चूक आहे. तेव्हाच्या ऋषिमुनींनी उगाचच लिहिलं आहे का हे?" मी काय बोलणार; मला संस्कृतमधे गती नाही, ना धर्म वगैरे गोष्टींमधे. नेमकं काकांनाही बरंच काम लागलं, ते बरेच उशिरा घरी यायचे. या दोघा वीरांची भेट बरेच दिवस झाली नाही. तेही बरंच म्हणा. माझं बौद्धिक घेतल्यानंतर नानांचा राग बराचसा ओसरला. घरी रात्रीच्या जेवणांच्या वेळेस काकांनी रिकाम्या पाठांतराची बरीच टिंगल करून झाली. "हे काय नुसतं जातं ओढत बसतात! धान्य असो अगर नसो. घरघर आवाज येतो नुसता." त्यात आमच्या ब्लास्फेमिक विनोदांवरूनही काका हसले, पण ते काही अधार्मिक नव्हेत.
शेवटी अशाच एका रम्य संध्याकाळी दोघांची भेट झाली. अर्थातच रामरक्षेचा विषय निघाला. माझं बौद्धिक घेतलं, तरी काकांचं बौद्धिक घेणं नानांना जमणारं नव्हतं. काकांनी त्यांचा अंत पाहिला आणि शेवटी स्पष्टीकरण दिलं, "हे बद्धपद्मासन, धनुष्य खांद्याला लावलंय, हे सगळं एका वेळेला केल्याचं वर्णन नाहीये. वेगवेगळ्या वेळी राम असा दिसतो हे वर्णन आहे." नानांचं पुन्हा काकांबद्दल मतपरिवर्तन झालं. ते गेल्यावर मी विचारलं, "काका, पण सीता डाव्या मांडीवर; हे फारच explicit नाही का होत?" त्यांना या प्रश्नाची अपेक्षा असावीच. "तुला काय वाटतं, आपले पूर्वज काय सोवळे होते? शेंडीगोपाळांना काही माहीत नसतं आणि उगाच पूर्वजांचा सोवळेपणा मिरवतात."
असेच एका संध्याकाळी काका घरी आले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच समजत होतं, काहीतरी गॉसिप मिळणार. "इकडे ये, गंमत सांगतो." मला चहाची तहान लागली होती. त्यांना म्हटलं, "आत स्वयंपाकघरातच या, तिथेच बोलू." काकाही लगेच म्हणाले, "हां, तेच बरं होईल." निश्चितच काहीतरी मजेशीर मालमसाला असावा. ते सांगायला लागले, "मी आत्ता रिक्षातून उतरलो. रिक्षावाल्याने रिक्षा थोडी अलीकडे थांबवली. त्यामुळे मला एक वेगळंच परिप्रेक्ष्य मिळत होतं." काका टिंगल करायला लागले की त्यांच्या जिभेवर शब्दकोश नाचायचे. "आणि हे बिल्डिंगमधून बाहेर येणाऱ्यांना पटकन दिसलं नसतं. आमची पैशांची देवाणघेवाण सुरू असताना नाना बाहेर पडत होते. समोरून चाळिशीच्या एक बाई जात होत्या. स्वतःची काळजी घेणाऱ्यांतल्या असाव्यात. नानांनी त्यांच्याकडे अगदी मान वळवून, लांब जाईपर्यंत, टक लावून पाहिलं. त्या दिसेनाशा झाल्यावर पुन्हा समोर बघायला लागले, तर त्यांना मी दिसलो. मी हा एपिसोड पाहिल्याचं त्यांना समजलं असणार. नानांचा चेहेरा कसा झाला सांगतो तुला! एखाद्या पाकीटमाराने पाकीट मारलं आणि ते रिकामं निघालं म्हणून ते परत ठेवायला जाताना तो पकडला गेला तर कसा होईल, तसा त्यांचा चेहेरा झाला होता."
अगदी याच्याच पुढच्या आठवड्यातली गोष्ट. दिवाळीची सुट्टी सुरू होती. झोपेतून उठल्याउठल्या बाबांनी नानांकडे पाकटवलं. काहीतरी निरोप द्यायचा होता. दात कसेतरी घासले आणि वर गेले. झोपेतून उठलेला अवतार असाच होता. दारातूनच काकूला निरोप सांगितला. समितीतून हळद-तिखट मागवायचं होतं का असंच काहीतरी होतं. काकूचे बेसनाचे लाडू नुकतेच झाले होते. त्या वासाचा अर्थ मला लागायच्या आतच तिनं आत बोलावून लाडूची वाटी हातात दिली. नानांनी पाहिलं. "हे काय कपडे आहेत का काय?" जागं होण्याचा प्रयत्न करून मी स्वतःकडे जमेल तेवढं वरपासून खालपर्यंत पाहिलं. मराठी मध्यमवर्गीय मुली नव्वदीच्या दशकात जेवढी फॅशन करायच्या, त्यापेक्षा अंमळ कमीच फॅशन होती. घरी कोणीही या कपड्यांबद्दल एक शब्दही काढला नव्हता. "काय झालं? वरपासून खालपर्यंत सगळं तर घातलंय." काकूनं हा संवाद ऐकला आणि उलट टपाली निरोप देऊन मला हाकललं.
संध्याकाळी, अंधार पडल्यावर बाहेरून फटाक्यांचे आवाज यायला लागले होते. राहुलसाठी पीसी घेतला होता ते बघायला आम्ही भावंडं वर गेलो होतो. तिथे घरातले तिन्ही पिढ्यांमधले पुरुष हजर होते. डेमो वगैरे झाला, शंकरपाळे तोंडात टाकत गप्पा सुरू झाल्या. "अदिती, आता तू मोठी झालीस. आता अधूनमधून साडी नेसत जा," मधले रानडे म्हणाले. मी म्हटलं, "विज्यादादा, तूही आता मोठा झालास. तूही सणासुदीला धोतर वगैरे नेसून आदर्श ठेवायला हरकत नाही."
त्यापुढे म्हणे बराच 'बवाल' झाला, पण बाबांनी माझ्यापर्यंत काही येऊ दिलं नाही. आम्ही पोरंसोरं मात्र गॉसिप करताना राहुलची बायको शॉर्ट्स आणि तंग कपडे घालणारी असावी, असं नेहमी म्हणायचो.
राहुलचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं, माझ्या लग्नानंतर दोनतीन महिन्यांतच. आमच्या दुर्दैवाने म्हणा किंवा रानड्यांच्या सुदैवाने म्हणा, त्याला शॉर्ट्स, तंग कपड्यांऐवजी अंगभर कपडे घालणारी बायको मिळालेली आहे. मी, माझा नवरा आणि भाऊ त्यांच्या लग्नाला गेलो होतो. अनेक वर्षांनी रानडे कुटुंबीयांची भेट झाली. नानांना तोपर्यंत हृदयविकाराचा तिसरा झटका येऊन गेला होता. वयामुळे तब्येतही बरीच खालावल्यासारखी वाटली. माझ्या "काय, कसे आहात नाना?" या प्रश्नाचं उत्तरही अपेक्षित होतं, तसंच मिळालं. "मंगळसूत्र घातलं नाहीस ते!" या विषयावर खोटं बोलणं जिवावर आलं. "माझ्याकडे नाहीये मंगळसूत्र. त्यातल्यात्यात बरे कपडे घालून लग्नाला आल्ये हे काय कमी आहे का?"
आता नाना नाहीत. फेसबुकावर सौ. रानडे-ज्युनियर फ्रेंडलिस्टीत आहे. ती हरताळका, मंगळागौरी वगैरेंचेही फोटो टाकते. सुदैवाने फेसबुकावर ते दिसू नयेत अशी व्यवस्था करता येते. आजकाल मला धर्म, रूढी, परंपरा यांचा ताप कमी होतो.
विशेषांक प्रकार
आवडला
समविचारी असल्याने लेख आवडला हे सांगायलाच नको.
आमच्या नातेवाईकांत, आंघोळीहून आल्यावर २१ वेळा अथर्वशीर्ष म्हणणारा एक होता. पाटीवर २१ आंकडे लिहून, एकएक टिकमार्क करत येरझारा चालू असायच्या. तो जरा लांब गेला की मी एखादा मार्क वाढवायचो. त्याचा गोंधळ व्हायचा. त्यांच्याकडे गणपती असायचा. आरतीला निव्वळ प्रसाद मिळतो म्हणून मी जायचो. तर आरती पाठ नाही याचे त्या घरच्यांना काय आश्चर्य वाटायचे. चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्याशिवाय जेवायला मिळायचे नाही.त्यांच्याघरी गेलो तर जबरदस्तीने चित्रावती घालायला लागायच्या. त्याचं सायंटिफिक एक्सप्लनेशन गंमतीदार होतं. 'अरे, म्हणजे किडामुंगी तिथेच घुटमळतात, पानात येत नाहीत." असे बरेच काही.
माझे आई वडील अगदी प्रॅक्टिकल. वडील म्हणायचे, ' देवाच्या मूर्तीपेक्षा फक्त, कर्तृत्वान आदरणीय लोकांसमोर हात जोडावेत. पण तसा प्रसंग फारसा येत नाही. 'भादरणीय' व्यक्तींना अगदी व्यवस्थित भादरतो. आता, सहसा माझ्या वाटेला असले लोक जात नाहीत.
म्हणजे तुम्हीपण उद्योग केलेत
म्हणजे तुम्हीपण उद्योग केलेत की!
ते किडामुंग्यांचं स्पष्टीकरण मी ही ऐकलं आहे. "एकेकाळी जमिनी सारवलेल्या असायच्या. ताटाबाहेर तुम्ही खंदक टाकलात तरी इतरत्र खोदकाम करून मुंग्या येऊ शकतात. मग काय?" असा प्रश्न विचारल्यावर पाठीत झटक्याचा फटका मिळाला होता. मग काही महिन्यांनंतर "डायनिंग टेबलवर किड्यामुंगी कसे येणार?" असा प्रश्न-धपाटा-गप्प बसणं हे सायकल झालं. आणखी एक स्पष्टीकरण होतं ते म्हणजे घरातल्या पाळीव प्राण्यांसाठी हे अन्न असतं. पण आमच्या घरी एक मांजर, आजोळी दोन कुत्रे, एक बोका एवढा परिवार असताना आम्ही कोणी चित्रावती घालत नाही आणि घरी एकही पाळीव प्राणी नसणारे असं का करतात, वगैरे प्रश्न त्यांच्या घरी विचारू नकोस अशी तंबी घरून मिळाली होती.
पाळीव प्राणी / अवांतर
आणखी एक स्पष्टीकरण होतं ते म्हणजे घरातल्या पाळीव प्राण्यांसाठी हे अन्न असतं. पण आमच्या घरी एक मांजर, आजोळी दोन कुत्रे, एक बोका एवढा परिवार असताना आम्ही कोणी चित्रावती घालत नाही आणि घरी एकही पाळीव प्राणी नसणारे असं का करतात, वगैरे प्रश्न त्यांच्या घरी विचारू नकोस अशी तंबी घरून मिळाली होती.
त्यांच्यात नेमके कोणाला 'पाळीव प्राणी' म्हणून संबोधतात, याचा शोध घेणे कदाचित रोचक ठरावे.
(अवांतर: कोकणस्थांत चित्राहुतींना 'चित्रावती' म्हणतात काय?)
मांजरांच्या घरात घरमालक कोण
मांजरांच्या घरात घरमालक कोण आणि पाळीव कोण, याचं उत्तर स्पष्टच असतं.
(अवांतर: कोकणस्थांत चित्राहुतींना 'चित्रावती' म्हणतात काय?)
कोकणस्थ का देशस्थ हे ही थोडं अवांतरही असेल. माझ्या लेखी, चित्राहुती/चित्रावती म्हणजे नक्की काय, या शब्दाचा उगम काय हे माहित नसणारे चित्रावती म्हणतात. मला विचाराल तर, "चित्राहुती म्हणताय का, मग तसं असणार" असं म्हणून चेंडू तटवून लावेन.
काही संभाव्य प्रत्युत्तरे / प्रत्यार्ग्युमेंटे
(म्हणजे, नॉट द्याट आय अॅम ट्रायिंग टू आर्ग्यू फॉर - ऑर अगेन्ष्ट - द ट्र्याडिशन ऑफ चित्राहुती [ऑर 'चित्रावती', अॅज़ सम अदर्ज़ प्रिफर टू कॉल इट], पण हे म्हणजे आपले उगीचच खाज म्हणून.)
"एकेकाळी जमिनी सारवलेल्या असायच्या. ताटाबाहेर तुम्ही खंदक टाकलात तरी इतरत्र खोदकाम करून मुंग्या येऊ शकतात. मग काय?"
१. चित्राहुती ही, आफ्टर ऑल, केवळ फर्ष्ट लाइन ऑफ डिफेन्स आहे.
२. यू क्यान मेक अ षिष्टम फूलप्रूफ, बट यू क्यानॉट मेक इट ड्यामफूलप्रूफ.
"डायनिंग टेबलवर किड्यामुंगी कसे येणार?"
१. टेबलाच्या पायावरून चढून. पायांनी चालत. (हे झाले मुंग्यांबाबत. किडे उडतही येऊ शकतात.)
२. काय? डायनिंग टेबलावर चढून आलेल्या मुंग्या बघितल्या नाहीयेत कधी? मी चिक्कार बघितल्याहेत. (फार कशाला, प्रथम झाडावर चढून, झाडाच्या एका फांदीला स्पर्श करत टेलिफोनखात्याने निष्काळजीपणे हवेतून लोंबकळत टाकलेल्या टेलिफोनच्या तारेवरून तारेवरची कसरत करत इमारतीच्या तिसर्या [पुण्याच्या मापनपद्धतीप्रमाणे; मुंबईच्या मापनपद्धतीप्रमाणे दुसर्या] मजल्याच्या खिडकीतून घरात प्रवेश करणारा उंदीरदेखील याचि देही याचि डोळां पाहिलेला आहे.)
३. आणि 'आकाशात् पतिता: पाला:'चे काय? जरा त्यांनादेखील कोणीतरी आपले म्हणा रे!
(पाली उडी मारून थेट ताटात प्रवेश करू शकतात, असे जर आपले आर्ग्युमेंट असेल, तर स्पष्टीकरणार्थ वरील 'चित्राहुती ही, आफ्टर ऑल, केवळ फर्ष्ट लाइन ऑफ डिफेन्स आहे' या आर्ग्युमेंटाकडे पाहावे. तसेही, आमच्या [पुण्याच्या] घरात परंपरेने पुष्कळ पाली असूनही, आजवर एकाही पालीने कधी थेट कोणाच्या पानात उडी मारल्याचे निरीक्षण अथवा ऐकिवात नाही. हा चित्राहुतीचा परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे, बहुधा चित्राहुतींकडे आकर्षित होणार्या किड्यामुंग्यांकडे आकर्षित झाल्यामुळे पाली थेट पानात उडी मारत नसाव्यात. [अर्थात, मी स्वतः चित्राहुती टाकत नाही - उभ्या आयुष्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या वेळा टाकल्या असतील - पण तरीही आजवर एकाही पालीने माझ्याही पानात उडी टाकलेली नाही. मी नसलो, तरी माझ्या घरच्या पाली या कदाचित परंपरा पाळणार्यांतल्या असाव्यात, हे कदाचित यामागील कारण असू शकेल. फॉर द्याट म्याटर, आजवर एखाद्या पालीने इतर कोणाच्या चित्राहुतींवरही उडी मारल्याचे ऐकलेले नाही म्हणा. वेल, नेव्हर माइंड. द थियरी वॉज़ वर्थ अ ट्राय. असो.])
चित्रावती
दादा म्हणजे माझे आजोबा चित्रावती घालायचे. त्यावेळी आमची मनी मांजर त्यांच्या पाटाच्या उजव्या बाजूला येउन बसायची म्हणजे चित्रावतीच्या अगदी जवळ. पण ती चित्रावतीत तोंड घालायची नाही. अधुन मधून म्याव म्याव करायची. तरी लक्ष नाही दिल की मग पंजाने आजोबांच्या मांडाला स्पर्श करुन मग म्याव म्याव करायची मग आजोबा दिला थोडा तुकडा देत असत. शहाणी होती मनी.
ओम चित्राय: स्वाहा|
ओम चित्रगुप्तायः स्वाहा|
ओम यमाय स्वाहा|
ओम यमधर्माय स्वाहा|
ओम सर्वेभ्यो भुतेभ्यो स्वाहा|
त्यानंतर पहिल्या घासाला
ओम पानाय स्वाहा
मच मच ( घासाचा आवाज) पुढच्या घासाला
ओम व्यानाय स्वाहा
मच मच पुढे
ओम उदानाय स्वाहा
'
'
ओम समानाय स्वाहा
'
'
ओम ब्रह्मणे स्वाहा
सहमत / असहमत
समविचारी असल्याने लेख आवडला हे सांगायलाच नको.
'लेख आवडला', इतपत सहमत. 'समविचारी'बद्दल कल्पना नाही. (Inasmuch as no two thinking persons can possibly think alike. [Or, even, the same thinking person may not essentially think alike all the time.] Only programmed minds can think alike. And, incidentally, fools seldom disagree.)
आमच्या नातेवाईकांत, आंघोळीहून आल्यावर २१ वेळा अथर्वशीर्ष म्हणणारा एक होता. पाटीवर २१ आंकडे लिहून, एकएक टिकमार्क करत येरझारा चालू असायच्या. तो जरा लांब गेला की मी एखादा मार्क वाढवायचो. त्याचा गोंधळ व्हायचा.
हे पटले नाही. रादर, आवडले नाही. म्हणजे, असतो एखाद्याला ओसीडी. पण म्हणून इतका छळ?
त्याच्या फेटिशच्या आड येण्याचा आपणांस अधिकार काय? आणि हे नुसते आड येणेही नव्हे, धिस वॉज़ अ क्याल्क्युलेटेड मूव टू टॉर्चर, टॉर्मेंट द फेलो, विथ नो पर्पज़ सर्व्ड अदर द्यान टू डिराइव अ पर्वर्टेड प्लेझर औट ऑफ इट. प्रयोगशाळेतल्या पांढर्या उंदरांनादेखील याहून अधिक एथिकली वागवतात - किमानपक्षी, वागवले जावे अशी अपेक्षा असते.
अटरली स्याडिष्टिक, अँड रादर क्रुएल. सर्टनली, नथिंग टू बोष्ट अबौट. (अँड डेफिनिटली नथिंग टू रैट अबौट, ईदर/ऐदर१अ होम, ऑर ऑन पब्लिक फोरम्ज़/फोरा१ब.)
त्यांच्याकडे गणपती असायचा. आरतीला निव्वळ प्रसाद मिळतो म्हणून मी जायचो. तर आरती पाठ नाही याचे त्या घरच्यांना काय आश्चर्य वाटायचे. चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्याशिवाय जेवायला मिळायचे नाही. त्यांच्याघरी गेलो तर जबरदस्तीने चित्रावती घालायला लागायच्या.
घ्या! म्हणजे, जायची गरज आपली, जायचा निर्णयही आपलाच. आणि तेही वर ऑन युअर ओन टर्म्ज़. गंमत आहे.
'बेगर्ज़ क्यानॉट बी चूझर्ज़,' असे (रादर नम्रपणे) सुचवू इच्छितो.
(बाकी, कोणाला कशाचे आश्चर्य वाटू शकेल, याचा नेम नसतो. आपल्या झापडांपलीकडचे आणि प्रीकन्सीव्ड नोशन्सपलीकडचे काही दिसले, की त्याचे आश्चर्य वाटावे, हा मनुष्यस्वभाव आहे. पण कोणास असे आश्चर्य वाटते, याचे आपणांस आश्चर्य का वाटावे? कधी चारचौघांत राहिला नाहीत काय?
फार कशाला, कधी चुकून पुण्यास गेलो आणि चारचौघांत कडमडलो, तर माझ्यासारखा पुणे-३०मध्ये वाढलेला माणूस अस्खलित मराठी बोलू शकतो, याबद्दलही लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेले ऐकलेले आहे. प्रीकन्सीव्ड नोशन्स, दुसरे काय? यात आश्चर्यकारक काहीही नाही.
तर सांगण्याचा मुद्दा, कोणास कशाचे आश्चर्य वाटावे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अगदी आपणांसही अशाप्रकारे दुसर्याच्या आश्चर्य वाटण्याचे आश्चर्य वाटले, तरी त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. असो.)
त्याचं सायंटिफिक एक्सप्लनेशन गंमतीदार होतं. 'अरे, म्हणजे किडामुंगी तिथेच घुटमळतात, पानात येत नाहीत." असे बरेच काही.
त्यापेक्षा, 'आमच्या घरात अशी रीत आहे, सबब तू अमूकअमूक कर (नाहीतर इथे गिळायला येऊ नकोस, आपल्या घरी जाऊन गीळ)', असे 'एक्स्प्लनेशन' रादर अधिक प्रामाणिक झाले असते. पण ज्याचीत्याची रीत. असो.
(कदाचित, वर म्हटल्याप्रमाणे, हे पर्यायी 'सायंटिफिक एक्स्प्लनेशन' हे 'डिप्लोम्याटिक' असू शकेल, किंवा कदाचित ते आपणांपेक्षा२ रादर त्यांच्या स्वतःच्या कन्झम्प्शनकरिताही असू शकेल. पण आपणांस काय त्याचे?)
वडील म्हणायचे, 'देवाच्या मूर्तीपेक्षा फक्त, कर्तृत्वान आदरणीय लोकांसमोर हात जोडावेत. पण तसा प्रसंग फारसा येत नाही.
- आपल्या वडिलांस किंवा आपणांस देवाच्या मूर्तीपुढे हात जोडावासा नाही वाटला, त्यांचा आणि आपला प्रश्न. मला देवाची मूर्ती दिसली आणि हात जोडावासा वाटला नि मी जोडून मोकळा झालो, माझा प्रश्न. मला देवाची मूर्ती दिसली नि एखादवेळेस हात जोडावासा नाही वाटला नि म्हणून नाही जोडला, तरीही माझा प्रश्न. तिसर्या कोणास दर वेळेस देवाची मूर्ती दिसल्यावर हात जोडावेसे वाटत असतील, तर तो (ओसीडी असेलही कदाचित, किंवा नसेलही, पण) त्याचा प्रश्न. ('त्याचा'मध्ये 'तिचा' आणि नपुंसकलिंगी 'त्याचा'ही अंतर्भूत आहे.)
- आपल्या वडिलांस किंवा आपणांस जर कर्तृत्ववान आदरणीय लोकांसमोर हात जोडावेत, असे वाटत असेल, तर तो त्यांचा आणि आपला प्रश्न. कर्तृत्ववान आदरणीय लोकांसमोर (म्हणजे, अशी एंटिटी यदाकदाचित अस्तित्वात असेलच, तर. या बाबतीत माझा अॅग्नॉष्टिकतेकडे कल आहे.) तरी हात काय म्हणून जोडायचे, असे जर मला वाटत असेल, तर तो माझा प्रश्न.
असो. मुद्दा याहूनही वाढवता येईलही कदाचित, परंतु तूर्तास त्यावर (आतापर्यंत घातली त्याहून) अधिक ऊर्जा खर्ची घालण्यास रस नाही.
'भादरणीय' व्यक्तींना अगदी व्यवस्थित भादरतो.
आपली मर्जी. (नॉट द्याट यू रिक्वायर ऑर रिक्वेष्टेड माय परमिशन, पण तरीही.)
असो.
आपला नम्र,
- (युअर ओन फ्रेंडली नेबरहूड जालीय लेफ्ट लिबरल) 'न'वी बाजू.
==============================================================================================================================
१अ, १ब आपण जे काही म्हणत असाल ते. 'आमच्या'त अनुक्रमे 'ईदर' आणि 'फोरम्ज़' म्हणतात; 'आपल्यां'त (कदाचित 'साहेबी' प्रभावामुळे) अजूनही अनुक्रमे 'ऐदर' आणि 'फोरा' म्हणत असल्यास कल्पना नाही.
२ द्वितीयपुरुषी आदरार्थी३ अनेकवचनी.
३ जनरीत्यर्थ.
श्रेणि देण्याइअतक कर्म अजुन
श्रेणि देण्याइअतक कर्म अजुन खात्यावर जमा झालेल नाहि, तुमचा प्रतिसाद अतिशय मार्मिक वाटला. मुळ लेखावर पण हयाच्याशी साधर्म्य असलेला प्रतिसाद देण्याची इछ्छा झाली. म्हणजे परंपरा आणि कर्मकांड ह्यावरिल लेखिकेच्या मतांशी तत्वतः सहमत पण holier than thou हा अटिट्युड प्रचंड खटकला. ह्याच अटिट्युड ने वागणारे रानडे आजोबा खटकलेत ही विसंगती नाहि का?
'जगा आणि जगु द्या' (जो पर्यंत त्रास फक्त चिडचिड इतपत मर्यादित आहे) हे एक तत्व म्हणुन मान्य करायला काय हरकत आहे.
श्रेणि देण्याइअतक कर्म अजुन
श्रेणि देण्याइअतक कर्म अजुन खात्यावर जमा झालेल नाहि, तुमचा प्रतिसाद अतिशय मार्मिक वाटला. मुळ लेखावर पण हयाच्याशी साधर्म्य असलेला प्रतिसाद देण्याची इछ्छा झाली. म्हणजे परंपरा आणि कर्मकांड ह्यावरिल लेखिकेच्या मतांशी तत्वतः सहमत पण holier than thou हा अटिट्युड प्रचंड खटकला. ह्याच अटिट्युड ने वागणारे रानडे आजोबा खटकलेत ही विसंगती नाहि का?
'जगा आणि जगु द्या' (जो पर्यंत त्रास फक्त चिडचिड इतपत मर्यादित आहे) हे एक तत्व म्हणुन मान्य करायला काय हरकत आहे.
???
विरोधाभास वाटला दोन वाक्यात.
रूढी, परंपरा ज्याला पाळायचेत त्याला पाळू देत. उगाच दुसर्या लोकांवर, विशेषतः लहान पोरांवर, संस्कार करायची जबाबदारी आपलीच आहे असा आव नक्कीच आणू नये. पण जे त्या परंपरा पाळत नाहीत त्यानी पाळणार्यावर सारखी टीका करण, खिल्लि उडवणं हे अजिबात समर्थनीय नाही.
ह्या ऐवजी पण जे त्या परंपरा पाळतात त्यानी न पाळणार्यावर सारखी टीका करण, खिल्लि उडवणं हे अजिबात समर्थनीय नाही. असं हवं होतं का?
उर्वरित प्रतिसादाच्या उलट हे वाक्य आहे सध्याचं आपलं.
चिखलफेक करू नये हे मान्य आहे.
चिखलफेक करू नये हे मान्य आहे. पण कशाला चिखलफेक म्हणावी हा वादाचा विषय बनू शकतो.
खिल्ली उडवण्याचं म्हणाल तर या दिवाळी अंकातच उत्पलने अनेकांची खिल्ली उडवली आहे. अगदी नावं घेऊनही असं केलं आहे. ज्यांच्याबद्दल आदर वाटावा त्यांचीही टिंगल आहे. पण कुठेही पातळी न सोडता असं केलं आहे त्यामुळे त्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही.
मस्त लेखन. रामरक्षा भीमरुपी
मस्त लेखन.
रामरक्षा भीमरुपी हा माझा लहानपणी अविभाज्य भाग होता. खेळात देखील मी बुरुडाकडून तयार करुन घेतलेले धनुष्यबाण वापरत असे.रुढी परंपरांनी माझे लहानपण यथेच्च लडबडलेले होते. मी रामरक्षेचा अंगार करुन इतरांना द्यायचो. रामरक्षा म्हणताना जेवढी राख जोरात चोळू तेवढा तो अंगारा पॉवरफूल अशी माझी समजूत होती. आमच्या रामाच्या देवळातच मागील बाजूला कपडे वाळत घातले असायचे. मला तिथे जायला जाम भीती वाटायची मग तोंडाने राम राम पुटपुटत पळत पळत घाईने कपडे काढून आणत असे. जाम टेन्शन यायच. मी रामाची भक्ती करायचो. बद्धपद्मासान घालून ध्यानस्थ होउन श्रीराम जयराम जयजय राम हा मंत्र म्हणायचो. थोड्यावेळाने एक डोळा हळूच बारीक करुन देवाने दृष्टांत वगैरे काही दिला का असे बघायचो. एकदा मला मुर्तीचा हात हलल्याचे देखील वाटले होते. तपस्वी गुरुजी म्हणायचे की श्रीराम जयराम जय जय राम हा एकच मंत्र असा आहे की तो संकटप्रसंगी तर म्हणायचाच पण तो शौच्याच्या वेळी म्हटला तरी चालतो.त्याला काही पथ्य नाही....
असो.... आजही त्याची कमोडवर वा संकट प्रसंगी ती नॉस्टल्जिक आठवण येते. :)
क्या बात है!
ओघवत्या शैलीत लिहिलेला खुसखुषीत लेख खूप आवडला. 'ट्रेडीसनल' शेजार्यांच्या गमतीदार आठवणी, विसंगती वगैरे सांगतानाही त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा जाणवत राहिला (तो अपेक्षित नसतानाही). शेजार्यांशी असलेले संबंध (विशेषतः भारतात) हे थोडे डिसफंक्शनल फॅमिलीसारखे असतात; सहवासाने, माणूसकीच्या पातळीवर तयार झालेल्या नात्यांत अनेक विसंगती, भेदभाव, संघर्ष, नाकखुपसेपणा असला तरी त्यात एक प्रकारची ऊबही असते (नेमाडेंच्या 'हिंदू'ची आठवण झाली :-)). आमच्या शेजारी रहाणार्या कोकणी आज्जी अतिशय खडूस म्हणून प्रसिद्ध होत्या. शिवराळ भाषा, त्याच शिवराळ भाषेत व्यक्त होणारा ब्राम्हणद्वेष, पाच मुलींच्या पाठीवर झालेल्या मुलाला लाडावून ठेवणे, मुलींना कामाला जुंपत त्यांच्यावरही (शिवराळ भाषेतच) आगपाखड करत रहाणे वगैरे त्यांची स्वभावविशेष होते. पण त्यांच्या काटेरी बाह्यरुपामागचे प्रेमळपण अनुभवायला सहा वर्षांचे मूलच असावे लागते. एकदा त्यांच्या झाडावर (त्यांची नजर चुकवून) चढून पेरू चोरताना फांदी तुटून खाली पडले आणि आता आपण पकडले जाणार म्हणून पळून जात होते पण त्यांनी पकडलेच. त्यावेळी अगदी प्रेमाने कुठे लागले नाही ना याची चौकशी करून वरून काही खाऊ दिल्याने मला बसलेला धक्का अजूनही आठवतोय. कधी आजारी असले तर चारचारदा आमच्याकडे येऊन चौकशी करत. त्यांच्याकडे जेवायच्या वेळी गेले तर त्यांच्याबरोबर माझेही 'समिष' ताट वाढत आणि तोंडाने "आणि म्हणं ही बामणं शुद्ध" असे पुटपुटत. मागे अनेक वर्षांनी आईला भेटल्या तर फार आपुलकीने माझ्याबद्दल विचारत होत्या असे कळले,त्यांची आपुलकी आणि जिव्हाळा वरवर दाखवायची नव्हती याबद्दल मला खात्री आहे.
तुझ्या लेखातल्या ट्रेडीसनल अत्याचाराबद्दल त्राग्याबरोबरच हेही सारे जाणवून गेले. राहुलच्या बायकोवर मात्र अन्याय होतोय असे वाटले...म्हंजे फ्रेंडलिस्टमधे तर घ्यायचे आणि परत "कस्ला हा प्रतिगामीपणा" म्हणून नाक मुरडत त्यांचे फीड दडवायचे ये बहुत उच्चभ्रू नाईन्साफी आहे :-)
'ट्रेडीसनल' शेजार्यांच्या
'ट्रेडीसनल' शेजार्यांच्या गमतीदार आठवणी, विसंगती वगैरे सांगतानाही त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा जाणवत राहिला (तो अपेक्षित नसतानाही)
या प्रसंगांचा विचार करायला लागल्यावर मलाच प्रश्न पडला होता, मी या लोकांशी का बोलायचे? (हा जिव्हाळा पुरेसा स्पष्ट होत नाहीये, अशी भीती लिहीताना वाटत होती.) तेव्हापासून आजपर्यंत माझ्यात बराच फरक झालाय हे खरं.
राहुलच्या बायकोवर मात्र अन्याय होतोय असे वाटले...म्हंजे फ्रेंडलिस्टमधे तर घ्यायचे आणि परत "कस्ला हा प्रतिगामीपणा" म्हणून नाक मुरडत त्यांचे फीड दडवायचे ये बहुत उच्चभ्रू नाईन्साफी आहे
तिच्याशी दोन-चार तास भेटण्यापलिकडे संबंधच आलेला नसताना मी हे करणं ही नाईन्साफी असू शकते; ज्यांच्या घरच्यांनी मला माझ्या लहानपणी पिडलेलं नाही त्यांची फोटोफीड्स, फोटो बहुदा आवडत नाहीत तरीही, सुरू आहेत. (चला, लवकरच फेसबुकाला ट्रेन करणे आले! ;-) )
काही खुसपटे
माझ्या लहानपणी महाराष्ट्रात वीजतुटवडा वगैरे नव्हता. ठाण्यात, संध्याकाळी अंधार पडल्यावर बटणं दाबून घरात उजेड होत असे.
महाराष्ट्रात बृहन्मुंबई आणि ठाणे वगळता अन्यही बराच मोठा भूभाग आहे, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
(पुणेदेखील आहे!!!)
(अतिअवांतर: 'एमएसईबी'चे 'मण्डे टू सण्डे इलेक्ट्रिसिटी बंद' हे विस्तृत रूप ऐकले नाहीयेत काय कधी?)
फेसबुकावर सौ. रानडे-ज्युनियर फ्रेंडलिस्टीत आहे.
"सौ." रानडे-ज्युनियर???
काय वाचतोय मी हे? तुमच्याकडून???
धन्यवाद
ती तिचं नाव तसंच लावते. तिचं नाव बदलणारी (आडनाव सोयीपुरतं बदललेलं असलं तरी) मी कोण?
वस्ताद, हं!
बाकी तुम्ही चित्राहुती/चित्रावती घालता का हो?
थ्यांक्यू!!!
माझे प्रतिसाद लोक वाचत नाहीत, अशी आजवर जवळजवळ खात्रीवजा का होईना, पण केवळ अटकळ होती. आज (निदान तुमच्यापुरता तरी का होईना, पण) पुरावा मिळाला.
थ्यांक्स फॉर द कन्फर्मेशन!
(उत्तर इथे आहे. पालींच्या संदर्भात. अर्थात, न वाचण्याकरिता.)
सध्या मी काहीही वाचत नाहीये;
सध्या मी काहीही वाचत नाहीये; माझ्या कोण्या श्रीमंत काका-मावशीने माझ्यासाठी तीन कोटी चौदा लाख रुपये सोडले तरी ते मृत्युपत्र वाचायला मला वेळ नाहीये. इथले प्रतिसाद आपले उगाच स्वतःच्या धाग्याचा ट्यार्पी वाढवण्यापुरतेच. (ही आणखी एक आहुति.)
पण तुमचे प्रतिसाद अगदी जरूर वाचते. मतं पटणं, न पटणं नंतर. विनोद महत्त्वाचा.
नवी बाजू
तुमचे प्रतिसाद मी ही वाचतो. माझ्या प्रतिक्रियेचे जे डिसेक्शन तुम्ही केले आहे ते खूपच आवडले. पण हे जे सॅडिस्टिक वागत होतो तेंव्हा मी १८ वर्षाखालील म्हणजे अल्पवयीन होतो. अल्पवयीन मुलांनी काय वाट्टेल ते केले तरी चालते ना आपल्या देशांत!
चित्रावतींबद्दल मी संपूर्ण सत्य लिहिले नव्हते, ते आता लिहितो. चित्रावती पानाच्या कुठल्या बाजूला घालायच्या असतात हे मला कसं माहित असणार ? आमच्या घरी नव्हताच असला प्रकार. त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याकडे चित्रावती घातल्या तेंव्हा डावीकडे घातल्या.(तेही इतरांनी खाणाखुणा केल्यावर) माझ्या दुर्दैवाने माझे जमदग्नी आजोबा बाजूलाच बसले असल्याने माझा भरपूर उद्धार झाला.
लेख भलताच आवडला! हे "संस्कार"
लेख भलताच आवडला! हे "संस्कार" वगैरे प्रकार फार आधीपासून हास्यास्पद वाटत आलेले आहेत आणि आई-वडीलांनी त्यांच्या आजूबाजूच्या असल्या वातावरणातही काही खुळचट प्रकार करण्यास भाग पाडले नाही याबद्दल त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत.
पण प्रत्येकाच्या नशिबी असे नसते आणि बंडखोरीचा किंवा स्वतंत्र विचार करायचा स्वभावही नसतो त्यामुळे या संस्कारांना बळी पडलेल्या लोकांची टिंगल करावीशी वाटत नाही.
स्वतःच्या फायद्यासाठी किंवा उगाचच होलियर दॅन दाऊ आव आणून असल्या गोष्टींचा प्रचार करणारे डोक्यात जातात हेही तितकेच खरे.
'न'वे "परिप्रेक्ष्य"
("परिप्रेक्ष्य" म्हणजे, बायेनीचान्स, 'पर्स्पेक्टिव' काय हो? मग तसे मराठीत, माणसाला समजेलसे म्हणा की राव!)
सौ. राहुल रानड्यांच्या पर्स्पेक्टिवातून, विरुद्ध बाजूची पार्टी ही "धर्मबुडवी" असेलच कशावरून? (हा एका प्रकारे सौ. राहुल रानड्यांचा साचाच - म्हणजे सामान्य माणसाच्या मराठीत ज्याला 'स्टीरियोटाइप' म्हणतात तो - झाला नाही काय?)
उलटपक्षी, सौ. राहुल रानडेंची विरुद्ध बाजूच्या पार्टीबद्दलची प्रतिमा ही "शॉर्ट्स घालून (शॉर्ट्स घालते म्हणून) उगाचच स्वतःला शहाणी समजणारी" अशी (नि इतकीच) नसेल कशावरून? (अर्थात, हाही स्टीरियोटाइपच असू शकतो म्हणा; फक्त, 'न'वा स्टीरियोटाइप, इतकेच.)
खुसखुशीत लेख.
खुसखुशीत लेख. लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून अगदी आपल्या माणसांत आल्यासारखं वाटलं. कालच पार्टीत कुणाच्यातरी ओळखीची एक भारतीय बाई म्हणे दिवाळी कधी असते हे विसरली म्हणून मोठ्या पोटतिडकीने चर्चा चालली होती. माझ्याकडून ती चूक बऱ्याच सणाबाबत होते म्हणून मी घाबरून चुप्प बसले होते (मध्येमध्ये त्या सगळ्या बायका माझ्याकडेच खुन्नस ठेऊन बघत होत्या कि काय असं वाटत होतं. ). जाताना मी साडी नेसले होते, पण गळ्यात नेकलेस आणि हातात बांगड्या घालायची विसरले होते, तर त्यांनी त्यांच्या घरातून आणून मला ते घालायला लावलं (प्रेम तर आहेच हो!). गौरीला सजवतात तशा त्या सजून आल्या होत्या आणि माझा काय कोण जाणे मुडच गेला होता. माझ्यात नक्कीच काहीतरी प्रोब्लेम आहे असं मला वाटायला लागलं होतं. पण आज हा लेख वाचून परत थोडं नॉर्मल वाटायला लागलंय.
लेख खुसखुशीत आहे . 'रानडे' हे
लेख खुसखुशीत आहे :). 'रानडे' हे नाव सोयीसाठी बदलले आहे काय? फूल्टू पब्लिकमधे धुलाई करण्यामागे इतरही काही चाळकरी कारणे नसावीत.
स्पेक्ट्रमच्या दुसर्या टोकाला पण हेच लोक आहेत, माझ्या ओळखीत एक र्हॅशनलिस्ट फ्यामिली आहे, त्यांच्याकडे गेल्यावर घरातल्या प्रत्येक गोष्टीत परंपरा कशी मोडीत काढली आहे हे बर्याच वेळा ऐकून घ्यावं लागतं, एखादी गोष्ट करण्यापेक्षा दुसरी न करण्यासाठी म्हणून ही करतो अशा थाटाच्या भूमिका ऐकणं मजेशीर असतं, ह्या सगळ्याची कारणं लहानपणी झालेल्या ट्रॅडिशनल अत्याचारात असतात हे ही ते सांगायला कमी करत नाहीत.
शक्य आहे, पण...
ह्या सगळ्याची कारणं लहानपणी झालेल्या ट्रॅडिशनल अत्याचारात असतात हे ही ते सांगायला...
हे खरेही असू शकते (म्हणजे त्याचा जेनेसिस तसा असू शकतो), पण तरीही...
यावरून आठवले. अवांतर आहे, विषयाशी काहीसे असंबद्ध आहे, पण तरीही इथे डकविण्याचा मोह आवरत नाही.
"Capitalism, it is said, is the exploitation of one human being by another. Communism is just the other way round."
(श्रेयअव्हेर: जॉर्ज मिकॅशच्या [बहुधा] 'हाउ टू बी पुअर'मधून साभार. पुस्तक याक्षणी डोळ्यांसमोर नसल्याकारणाने, उद्धृताच्या शब्दांत जरासे इकडेतिकडे झाले असल्यास दिलगीर आहे.)
लेख आवडला. टिंगल करून काही
लेख आवडला. टिंगल करून काही फारसे या बाबतीत तरी साधत नाही असे वाटते. तुम्हाला घरी बोलावून मुद्दाम ट्रेडीसनल वागून तुमचे अत्याचार करण्याची कॉन्स्पीरसी देखील काही लोक करत असावे अशी एक शंका आहे.
एक प्रसंग आठवला. साधारण एक वर्षाच्या मुलीला तिचे आजी-आजोबा देव्हार्या समोर उभे धरून प्रार्थना करून घेत होते ' सर्वांना सुखी कर......चांगली बुद्धी दे'. दे हा शब्द आल्यावर समोरच्याने काहीतरी देणे अपेक्षित आहे हे त्या बाळाला कळले. 'दे..दे' अस म्हणत ते बाळ देव्हार्यातल्या देवांना ओढायला पुढे उसळी घेऊ लागले. आजी-आजोबा आणि सगळेच उपस्थित खळखळून हसले.
छान अनुभव कथन.
संस्कृती, परंपरा, समजुती आणि रीती या खरच फार फार अवघड गोष्टी आहेत. आणि त्यातही त्या व्य्क्तीगणिक, समुहानुसार बदलतात हे विशेष.
पण ते शुभंकरोती आणि वदनीकवळ वगैरे, मी सुद्धा माझ्या मुलाला शिकविले आहे.
म्हणजे मी फार देवभक्त किंवा श्रद्धाळू आहे असे नाही, पण असे केल्याने (बहुदा), मला माझ्या ओळखीचे, सुरक्षित असे वातावरण अनुभवता येते म्हणून.
लेख अतिशय खुसखुशीत आहे. नवी
लेख अतिशय खुसखुशीत आहे. नवी बाजू यांचे प्रतिसाद फार आवडले. एकंदर मजा आली.
.
याईक्स पाली ताटात ऊडी मारतात हे वाचूनच इतकी तंतरली. पण पाली उड्या घेतात हे सत्य आहे. मी अनुभवले नसले तरी ऐकून आहे.
.
डायनिंग टेबलच्या पायावरुन चढुन येण्यार्या मुंग्या तसेच तारेवरची करत करणारे उंदीर वाचून आमच्या शेजारी एक बाई होत्या त्यांचा पॅरॅनॉइया आठवला. त्या खूप काळजीने व अत्यंत कन्व्हिक्शनपूर्ण सांगत असत की आजकाल डासही माजलेत. मच्छरदाणीच्या सूक्ष्म चौकडीतून पहील्यांदा २ पाय आत घालतात, नंतर डोके व मागचे पाय ओढुन चंचुप्रवेश करतात.
वा वा! मजा आली. च्यामारी,
वा वा! मजा आली. च्यामारी, येता जाता शुभंकरोति-वदनीकवळ-रामरक्षा-दिवेलागणी वगैरे दवणीय कढ काढणारे लेख दिसतात, हा लेख वाचून कसं मस्त घरच्यासारखं वाटलं! बाकी -
- माझा गोरा वर्ण माध्यान्हीच्या उन्हात रापताना पाहून त्या माऊलीला माझ्या लग्नाची काळजी वाटली का भुकेची याची मला कल्पना नाही.
- नशीब, मांजर या दोघांना घाबरून आधीच पळून गेली होती, नाहीतर तिला सीतेसारखी माझ्या मांडीवर बसवलं असतं.
- "काय झालं? वरपासून खालपर्यंत सगळं तर घातलंय."
हे कायच्याकाय भारी! अजून पाहिजे, असं वाटेवाटेस्तोवर लेख संपला, इतकीच काय ती तक्रार.