कला: एक अकलात्मक चिंतन
कला: एक अकलात्मक चिंतन
लेखक - उत्पल
प्रामाणिकपणे सांगायचं तर कलाभान, कलाजाणीव वगैरे शब्दांनी आम्हांला गांगरून जायला होतं. हे शब्द आम्हांला घाबरवूनच सोडतात. ह्याचं मुख्य कारण म्हणजे हे शब्द वरचेवर आणि लीलया वापरणारे लोक चांगले भरभक्कम असतात. आपल्याला काहीतरी 'कळलं आहे' ह्याची खात्री असणारे असतात. मुख्य म्हणजे आत्मविश्वास असलेले असतात आणि आमच्यात आत्मविश्वासाचा दारुण अभाव आहे! वास्तविक सर्व कलांत आत्मविश्वास असणं ही कला श्रेष्ठ आहे हे आमच्या लक्षात आलं आहे. ही कला असली की 'मराठी साहित्य अजून रांगते आहे', 'पंजाबी कविताच जगात श्रेष्ठ आहे', 'आयरिश लोकांइतकी विनोदबुद्धी जगात कुणालाच नाही', 'मराठी नाटक आत्ता कुठे बाळसे धरू लागले आहे', 'मराठी कादंबरी संपली आहे' अशी विधानं करण्याचं धाडस येतं. आणि आम्ही तर 'आम्हांला अमुक एक नाही आवडलं' हेही भीतभीतच म्हणतो. पाणिनीचं व्याकरण, नव्वदोत्तरी मराठी कथा (हे कालखंड कसे पाडतात एकदा आम्हांला समजून घ्यायचंच आहे. आजवर आम्ही समजायचो की, ज्या वर्षाचं 'ओ'कारान्ती रूप करता येतं त्या वर्षात कालखंड पाडतात. तीस वर्षं हा एक कालखंड धरला तर वीसशेवीसला काय म्हणणार? वीसोत्तरी? काही कळत नाही बुवा. एकदा विश्राम गुप्तेंशी बोललं पाहिजे!), पर्शियन कादंबरी, सहाव्या शतकातील जातवास्तव, हे विश्व कसं निर्माण झालं, आधुनिक पदार्थविज्ञान, करंजी हा मुळात केरळी पदार्थ कसा आहे असा चौफेर अभ्यास करून लोक त्यावर अधिकारवाणीनं बोलू शकतात ह्याचं आम्हांला फार कौतुक वाटतं आणि स्वतःच्या बौद्धिक दौर्बल्याची कीव येते. हे लोक सतत कुठल्या ना कुठल्या चिंतेनं ग्रस्त असतात असाही आमचा अनुभव आहे. कला हा आस्वादापेक्षाही चिंतेचा विषय आहे असा आमचा ग्रह करून देण्यात अशा लोकांचा चांगला हातभार आहे. म्हणजे आपण एखाद्या विनोदाला मोकळेपणाने हसलो, तर त्याच वेळी हे चष्म्याच्या काचेतून वर बघत 'काय दिवस आलेत' असा चेहरा करतात. नाटक बघताना नाट्यकलेची चिंता, चित्राचं प्रदर्शन बघताना चित्रकलेची चिंता, गाणं ऐकताना संगीताची चिंता हा त्यांचा स्थायिभाव असतो. असो. आमची तशी तक्रार नाही, पण दोन घटका समजा कुणी आनंद घेतोय, तर तो 'आमच्याच पद्धतीने' घेतला पाहिजे हा आग्रह आम्हांला जरा कळत नाही. पुन्हा असो.
कला म्हटलं की का कुणास ठाऊक, पण आम्हांला एकदम आमची चित्रकलेची वही आठवू लागते. त्यावर सांडलेले रंग दिसू लागतात. बालपण वास्तविक नीट कृष्ण-धवल असताना चित्रकला नामक रंगीत आपत्तीनं केलेली गोची आठवते. चित्रकलेच्या गुरुजींचा हताश चेहरा आठवतो. आपण एखाद्या विषयात अगदी म्हणजे अगदीच मठ्ठ आहोत ह्याची जाणीव कोवळ्या वयात होणं वाईट. ती आम्हांला झालेली असल्यानं हा विषय अभ्यासक्रमात घेतल्याबद्दल आमच्या मनात चांगलाच राग होता. चित्रकलेच्या संपूर्ण कारकिर्दीत एक हत्तीसारखा दिसणारा बरा हत्ती काढल्याचं आठवतं. बाकी चित्रं म्हणजे एखाद्या गणपती किंवा नवरात्र मंडळाने उगीचच आपल्या वार्षिक अहवालात पिकासोला श्रद्धांजली वाहावी तसं होतं. इतर कलांशी फार संबंध आला नाही. पेटीच्या क्लासला जायचो. पण पेटी-तबला किंवा नाच ह्या रूटीनच गोष्टी होत्या. बरीच मुलं-मुली ते करायची. ही 'कला' आहे आणि त्यातच पूर्णवेळ काम करायचं असा निश्चय कुणी केल्याचं आठवत नाही. बाकी वक्तृत्व, काव्यगायन, नाटक हेही सुरू असायचं. त्यामुळे ज्याला 'कला' म्हणतात अशा गोष्टींशी तोंडओळख होत होती. पण ह्याची विद्यालयीन कारणं बाजूला ठेवून इतर जीवनावश्यक कला कशा आत्मसात केल्या गेल्या ह्याचा शोध घेणं बहुधा अधिक रंजक ठरेल. म्हणजे एखाद्या विशेष मुलीनं विकेट काढल्यावर तिच्यावर कविताच लिही, तिला स्वप्नातच आण हे तर होतंच, पण प्रत्यक्षात तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं, आणखी पुढे जाऊन 'पटवणं' (हा शब्द सध्या रूढ आहे की नाही माहीत नाही) ही खरी कला. मनुष्यप्राणी बालपणापासून आयुष्याशी निगडित अशा ज्या मौलिक गोष्टी शिकतो त्याला कला न म्हणणं आणि मुलाला काहीही कळत नसताना उगीच त्याला पेटीच्या क्लासला घालून वर 'त्याला आवड आहे हं' असं म्हणणं ह्याला काय म्हणावं? आम्हांला विचाराल तर जीवनासाठी कला की कलेसाठी कला हा वाद रोचक असला, तरी जीवन आणि कला ह्यांचं एकरूपत्व लोकांच्या लक्षात येऊ नये ह्याचा आम्हांला खेद होतो. ते लक्षात आलं, तर बहुधा हा वाद मुळातूनच संपेल. (आम्हांला आमचं कधीकधी कौतुक वाटतं. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात ते हेच. एरवी वर उल्लेखलेली चिंताक्रांत मंडळी कधी 'कलाभान' आलं म्हणून, तर कधी गेलं म्हणून अस्वस्थ होत असताना, फेसबुकी फूत्कार टाकत असताना आम्हांला हा विश्वास वाटतो म्हणजे आमची कमाल आहे.)
शालेय जीवनात जीवनविषयक जाणिवा (मार्कांचे माहात्म्य, मार्क जास्त आहेत म्हणजे आपण उच्च आहोत ही जाणीव, रिस्पेक्टेबल प्रोफेशनच्या डोक्यात घुसवल्या जाणाऱ्या व्याख्या इ.) विकसित होऊ लागल्या तशा जीवनकलाविषयक जाणिवादेखील (घरी खोटं कसं बोलायचं, त्याला तात्त्विक मंजुरी कशी द्यायची, सुविचार गोळा करत असतानाच त्यातला एखादा मोडायची तीव्र इच्छा झाली तर ते कसं हँडल करायचं इ.) विकसित झाल्या. ह्याच विकासात कला ह्या जाणिवेची भानगड (की भानगडीची जाणीव?) काहीतरी वेगळी आहे हे कळायला लागलं. अजिबात न कळणारं कथ्थक, कुचीपुडी हे ग्रेट आहे आणि गोविंदाचा 'स्ट्रीट डान्सर' वाईट आहे असं वर्गीकरण होऊ लागलं. मौजेची सुबक बांधणीची, नेटक्या मांडणीची पुस्तकं समोर आली आणि उत्तम उत्तम म्हणतात ते हेच हे नक्की झालं. अमुक ते चांगलं आणि तमुक ते वाईट ह्या गोष्टी मराठी मध्यमवर्गीय मार्गानं मनात येऊन बसल्या. कला हा प्रकार एकूण जबरीच होता. शिवाजीमहाराजांच्या चरित्रापेक्षा बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या सांगण्याच्या कलेनं आपण प्रभावित होत होतो हे अनेकांना अलीकडे 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बघितल्यावर मग लक्षात आलं. कला हे सुपरस्ट्रक्चर आहे असं मार्क्स म्हणतो खरा, पण कला बेसमध्ये घुसून आपल्याला हवे ते नट-बोल्ट घट्ट आणि नको ते सैल ठेवायला मदत करू शकते हा एक साक्षात्कारच होता!
आम्ही स्वतः कलेच्या बाबतीत गोंधळाच्याच स्थितीत असतो हे तर आम्ही सपशेल कबूल करतो. त्याबाबतीत शाळकरी मुलगा आणि आम्ही ह्यांत फार फरक नाही. पण कला, आस्वाद, कलेचा दर्जा आणि त्याबाबतची चर्चा आणि मत-मतांतरं हे सगळं अंतहीन आहे ह्या निष्कर्षाप्रत मात्र आम्ही आलो आहोत. आणि हा निष्कर्ष आम्ही जालीय तत्परतेनं काढलेला नसून बऱ्याच विचारांती, अगदी वैचारिक व्यायामाअंती काढलेला आहे हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. अर्थात आम्ही आमच्या वर्क-आउटमध्ये मिलिंद मालशे, सुधीर रसाळ, हरिश्चंद्र थोरात आणि इतर नामवंत ट्रेनर्सचं मार्गदर्शन अजून घेतलेलं नाही. (त्याआधी 'मुक्त शब्द' पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. वॉर्मिंग अप! बाकी गेल्या वर्षात कोठावळेंनीसुद्धा चांगला व्यायाम घडवला बरं का. कथा, कविता, नाटक, कादंबरी - प्रत्येकावर एकेक मिनी दिवाळी अंकच! आम्हाला तर काही दिवस आमच्या जिममध्ये नेहमीच्या प्लेट्सच्या जागेवर 'ललित'चे अंकच दिसत होते!) पण जरी आम्ही हे ट्रेनिंग घेतलं, तरी आमचा गोंधळ संपेल असं काही आम्हांला वाटत नाही. आता कवितेचंच घ्या. एखादी कविता वाचून आम्ही अंतर्बाह्य उन्मळून पडावं आणि तीच कविता एखाद्याला स्पर्शही करायला असमर्थ ठरावी असं घडतंच. म्हणजे वसंत पाटणकर (आणि मंडळी) यांनी 'प्रवीण दवणे यांची कविता: एक आकलन' असं पुस्तक लिहिणं जितकं अशक्य, तितकंच प्रवीण दवणे यांनी प्रशांत बागड ह्यांच्या कथांबद्दल लिहिणं अशक्य! (मध्यंतरी झालेली गंमत सांगतो. आपले भालचंद्र नेमाडे (आले!) पुण्यात येऊन ई-साहित्य संमेलनाचं उद्घाटन करून गेले आणि आम्ही गहिवरलोच. जनस्थान पुरस्कार घेताना (आणि इतर वेळीही) (कंसातले कंस फार होतायत, पण नाईलाज आहे. संपादक, कंस कमी करू नका प्लीज!) पुण्यावर मुक्तकंठाने टीका करणारे नेमाडे गुरुजी चक्क पुण्यात आले आणि त्यांनी ई का असेना, पण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं? त्यानंतर एकदा आम्हांला नेमाडे प्रवीण दवणे ह्यांच्या सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून आले आहेत असं स्वप्न पडलं होतं. दचकून उठलोच एकदम. मग थोडा वेळ 'टीकास्वयंवर' वाचलं. शांत शांत वाटलं. मग झोप लागली.) पण म्हणून प्रवीण दवणे लोकांना आवडत नाहीत असं नाही. एवढं कशाला, एकदा आमच्या एका मित्राला आवर्जून 'कोसला' वाचायला दिल्यावर 'तू म्हणालास म्हणून वाचली मी, पण मला काही आवडली नाही' असं सांगत त्यानं ती परत केली होती. आता बोला! पुढे एकदा तो मला व. पु. काळ्यांचं पुस्तक वाचताना दिसला. अशा वेळेला आमचा अहंकार गळून पडतो आणि वपुंना किंवा प्रवीण दवण्यांना इग्नोअर करता येत नाही हे जाणवू लागतं. 'ह्याचं काहीतरी वेगळंच असतं' अशा भावनेनं आमच्याकडे बघणारे आमच्या शेजारचे एक वयस्कर काका आमच्या घरून कवितांची पुस्तकं घेऊन जातात आणि अपराधी मुद्रेनं परत देतात. 'मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण काही कळलं नाही हो' अशी ती मुद्रा असते. त्यामुळे 'आम्हांला हे आवडून घ्यायचं आहे, आम्ही प्रयत्न करतो आहोत' असा आक्रोश करत जे बघून काहीही कळत नाही असं एखादं प्रायोगिक नाटक बघणारे, धापा टाकत टाकत वाङ्मयीन पोस्ट मॉर्टेम समजून घ्यायला धडपडणारे लोक दिसले की आम्ही हताश होतो आणि कला ह्या विषयाबाबत पुन्हा एकदा संपूर्ण शरणागती पत्करतो. मार्क्स सांगतो ती आर्थिक रचना आणि फ्रॉईड, डार्विन (आणि मंडळी) सांगतात ते डोक्यातल्या वायरिंगचं वैविध्य ह्या भल्या मोठ्या घुसळणीतून 'उत्तम कला, श्रेष्ठ साहित्य' असा एकच एक आऊटपुट डिफाईन कसा होणार आम्हांला कळत नाही. ह्या बाबतीत ठाम निष्कर्ष काढणाऱ्या लोकांबद्दल आम्हांला अर्थातच आदर आहे. कारण ते ठामपणे अनेक विधानं करू शकतात. (असेच एक ठामपंथी समीक्षक एकदा 'मराठीत कविता नाही' असं म्हणाल्याचं स्मरतं. त्यावर आम्ही 'नसू दे. बाकरवडी तर आहे?' असं उत्तर देणार होतो. पण ती खुमखुमी आम्ही टाळली आणि नेहमीप्रमाणे हे मनातच म्हणून घेतलं.) ठामपंथीयांची आम्हांला जाम भीती वाटते. मराठी साहित्यात काहीच ग्रेट नाही हे ठामपंथी वारंवार सांगत असल्यानं आम्ही भांबावून जातो. ('नपेक्षा' वाचून तर आम्ही पश्चिम बंगालमध्ये स्थायिक व्हायच्या तयारीला लागलो होतो. पण 'नपेक्षा'वर एकुणात आपण खूश आहोत हां! 'लिहिलेले काहीही ते वाङ्मयच' असं चौथ्याच पानावर वाचलं आणि आमचा लेखकाविषयीचा आदर वाढला. (नपेक्षा, अशोक शहाणे. लोकवाङ्मय गृह, मुद्रक/प्रकाशक - प्रकाश विश्वासराव, मुद्रणस्थळ - न्यू एज प्रिंटींग प्रेस. मि. अशोक शहाणे - प्लीज नोट!) वामपंथी जितके कडवे तितकेच ठामपंथी. (वामपंथी म्हटल्याने काहीतरी घोटाळा नाही ना झाला? आम्हांला 'डावे' म्हणायचं होतं. वाममार्गी नव्हे!)
तर मुद्दा आऊटपुट डिफाईन होण्याचा आहे. कलेचा आस्वाद सुदर्शन रंगमंचावरचं प्रायोगिक नाटक आणि बालगंधर्वमधलं व्यावसायिक नाटक ह्यांच्यातच जर 'डिफर' होतो, तर तो एका बाजूला सुदर्शन-बालगंधर्व आणि दुसऱ्या बाजूला दांडेकर पुलावरची वस्ती (किंवा भाऊ पाध्यांची वालपाखाडी) ह्यांत तर केवढा तरी डिफर होईल. दुसऱ्याला काहीतरी सांगावं ह्या प्रेरणेनं जागचा उठतो तो कलाकार. लफडं सुरू होतं ते 'काय'पेक्षा 'कसं'पाशी! आणि 'कसं'च्या व्याख्या, आकार, रंगरूप समस्त जनांना एकाच वेळी एकाच तीव्रतेनं भिडणं महाकठीण. जवळजवळ अशक्यच! म्हणजे बालपणापासून साबुदाण्याची खिचडी, वरण-भात, वपु, पुलं ह्यावर वाढलेली एक सेगमेंट; दुसरीकडे साबुदाण्याची खिचडी, वरण-भात (हे कॉमन असतं), सार्त्र, काम्यू वगैरेंवर वाढलेली एक सेगमेंट (बरेचदा पहिल्या सेगमेंटचं दुसरीत संक्रमण होतं. दुसरी कुठेही जाऊ शकत नाही. तो डिझाईन डिफेक्टच आहे!) आणि तिसरीकडे श्यामची आई आत्महत्या करेल अशा पर्यावरणात वाढलेली, साबुदाण्याची खिचडी आणि वरणभात हे आजारी पडल्यावर खायचे पदार्थ आहेत हे समजणारी सेगमेंट - ह्या सगळ्या सेगमेंट्स एकाच समाजात नांदत असतात. मग सार्वत्रिकीकरण जमायचं कसं? बरं, हीन दर्जाची कला (सलमान खानचे चित्रपट) माणसाला अधोगतीकडे नेते म्हणावं, तर उच्च दर्जाची कला (सत्यजित रायचे चित्रपट) माणसाला कुठे नेते? म्हणजे 'वाँटेड' बघितल्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची बिघडते आणि चांगला सिनेमा मागे पडतो हे मान्यच, पण मग 'पथेर पांचाली' बघितल्यानं अभिरुची प्रगल्भ होत असेल, तरी हा अभिरुचीसंपन्न प्रेक्षक आजूबाजूच्या समाजावर नक्की काय प्रभाव टाकू शकतो? कलेला मुळात काही उद्देशच नसेल, तर 'वाँटेड' काय आणि 'पथेर पांचाली' काय असा युक्तिवाद कुणी केला तर? (बाप रे! इथं आमच्याही अंगावर काटा आला हे कबूल!)
असो. प्रश्नांच्या गदारोळात राहणं हा आमचा स्थायिभावच आहे. पण कला आणि जीवन ह्यांचं एकरूपत्व असं काहीसं जे आम्ही मगाशी म्हणालो, त्याबद्दल आमचा आम्हीच (दुसरं कोण?) विचार करत आहोत. कलेची आस समजण्यासारखी, जीवनाचं व्यक्तिसापेक्ष आकलनही समजण्यासारखं… त्यामुळे मग उरतं काय? आपल्या उर्मींना वाट करून देणं! त्यातून जी चर्चा, वाद, गोंधळ व्हायचे आहेत ते होणारच. कारण 'उद्देश' काय ह्यावर एकमत नाही, पण अभिव्यक्ती मात्र नाजूक प्रकरण होऊन बसतं! इलाज नाही. समाज आणि सेगमेंट हे द्वैत मिटत नाही तोवर तरी. आम्ही ह्यावर आमच्या परीनं इलाज शोधला आहे. म्हणजे आम्ही 'सुदर्शन'ला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे 'बालगंधर्व'ला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान या दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार? सेगमेंटचं करायचं तरी काय?
माणसानं पहिल्यांदा जीवनातून कला 'ही कला आहे' अशी बाजूला काढून कधी ठेवली आणि पुढे तिची आराधना का सुरू केली, कशी सुरू केली ह्याचा शोध खोलात म्हणजे किती खोलात जाऊन घेणार? शिवाय बाजार विकसित होत होताच. त्यामुळे दोन्ही गोष्टी लांब तरी किती काळ राहणार? कलेनं आज जीवन व्यापलं आहे असं म्हणता येईल का? आज कशाला, कोणत्याही काळात कलेनं जीवन व्यापलं होतं असं म्हणता येईल का? पन्नास वर्षांनंतर अशोक शहाणे पुन्हा एकदा मराठी साहित्याबद्दल बोलताना 'आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही' (लोकसत्ता, २७ ऑक्टोबर २०१३. अशोक शहाणे, प्लीज नोट अगेन!) असं म्हणाले, तेव्हा आम्ही चमकलो. हे काही पूर्ण सत्य आहे म्हणून नाही, पण त्यात सत्यांश दिसला म्हणून. साहित्याची आजची जाणीव आणि मराठी मासिकं बहरात असतानाची जाणीव ह्यात गुणात्मक फरक पडला आहे हे चटकन जाणवलं म्हणून.
'आपला कलाव्यवहार' ह्या मर्यादित शब्दांत दडलेला गुंता बहुधा अमर्यादित आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यानं ह्या अमर्याद गुंत्याबद्दल आम्ही मर्यादितच बोलू शकतो. बाकी आम्हांला वाटतं ते एकच. कला हा मामला कलाकार आणि आस्वादक ह्यांच्यामध्ये जितका राहील आणि जितका पुढे जाईल तितकं चांगलं. लेखकाला समीक्षकांची पत्रं येण्यापेक्षा (किंवा परस्पर समीक्षाच येण्यापेक्षा) वाचकांची अधिकाधिक पत्रं येवोत. जी काही पानं भरायची आहेत, ती त्या संवादाने भरोत. समीक्षक बोलते आहेतच, वाचक-प्रेक्षक बोलते होवोत. परिसंवादापेक्षा घरातूनच अधिक संवाद होवोत. कलेची ऊर्जितावस्था म्हणजे नक्की काय ह्यावरची घुसळण विशेषज्ञ मंडळींनीच करण्यापेक्षा सर्वांनीच केली, तर कदाचित कला आपलं विशेष स्थान सोडून अलगद समाजाच्या प्रवाहात येऊन बसेल! आणि मग बहुधा आम्हांला कलाव्यवहार ह्या शब्दाची भीती वाटणार नाही! प्रवासात मनमोकळ्या गप्पा मारणारा सहप्रवासी भेटला की कसं बरं वाटतं! मजा प्रवासाची असते. ठिकाण कधीतरी येणारच असतं. आणि कलेला तर डेस्टीनेशनच नाही, फक्त प्रवासच आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त गप्पा आहेत हे कळणं महत्त्वाचं!!
विशेषांक प्रकार
लेख सगळाच आवडला त्यात शंका
लेख सगळाच आवडला त्यात शंका नाही, पण खालची काही वाक्ये लै जब्री बॉ.
कलेला मुळात काही उद्देशच नसेल तर 'वाँटेड' काय आणि 'पथेर पांचाली' काय असा युक्तिवाद कुणी केला तर? (बाप रे! इथं आमच्याही अंगावर काटा आला हे कबूल!)
हे आमच्या काही कलाकार मित्रांना ऐकवून त्यांच्या दाढीला(हजामत करत असले तरी) हात घालणार आहोत.
म्हणजे आम्ही सुदर्शनला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे बालगंधर्वला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार? सेगमेंटचं करायचं तरी काय?
हे म्हणजे क्रिकेट म्याचच्या दिवशी देशी खेळांचा जाज्वल्य अभिमान पैकी झालं ;)
माणसानं पहिल्यांदा जीवनातून कला 'ही कला आहे' अशी बाजूला काढून कधी ठेवली आणि पुढे तिची आराधना का सुरू केली, कशी सुरू केली ह्याचा शोध खोलात म्हणजे किती खोलात जाऊन घेणार? शिवाय बाजार विकसित होत होताच. त्यामुळे दोन्ही गोष्टी लांब तरी किती काळ राहणार? कलेनं आज जीवन व्यापलं आहे असं म्हणता येईल का? कोणत्याही काळात जीवन व्यापलं होतं असं म्हणता येईल का? पन्नास वर्षांनंतर अशोक शहाणे पुन्हा एकदा मराठी साहित्याबद्दल बोलताना 'आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही' (लोकसत्ता, २७ ऑक्टोबर २०१३. अशोक शहाणे, प्लीज नोट अगेन!) असं म्हणाले तेव्हा आम्ही चमकलो. हे काही पूर्ण सत्य आहे म्हणून नाही, पण त्यात सत्यांश दिसला म्हणून. साहित्याची आजची जाणीव आणि मराठी मासिकं बहरात असतानाची जाणीव ह्यात गुणात्मक फरक पडला आहे हे चटकन जाणवलं म्हणून.
अंमळ जास्तच मार्मिक.
'आपला कलाव्यवहार' ह्या मर्यादित शब्दांत दडलेला गुंता बहुधा अमर्यादित आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यानं ह्या अमर्याद गुंत्याबद्दल आम्ही मर्यादितच बोलू शकतो. बाकी आम्हाला वाटतं ते एकच. कला हा मामला कलाकार आणि आस्वादक ह्यांच्यामध्ये जितका राहील आणि जितका पुढे जाईल तितकं चांगलं. लेखकाला समीक्षकांची पत्रं येण्यापेक्षा (किंवा परस्पर समीक्षाच येण्यापेक्षा) वाचकांची अधिकाधिक पत्रं येवोत. जी काही पानं भरायची आहेत ती त्या संवादाने भरोत. समीक्षक बोलते आहेतच, वाचक-प्रेक्षक बोलते होवोत. परिसंवादापेक्षा घरातूनच अधिक संवाद होवोत. कलेची ऊर्जितावस्था म्हणजे नक्की काय ह्यावरची घुसळण विशेषज्ञ मंडळींनीच करण्यापेक्षा सर्वांनीच केली तर कदाचित कला आपलं विशेष स्थान सोडून अलगद समाजाच्या प्रवाहात येऊन बसेल! आणि मग बहुधा आम्हाला कलाव्यवहार ह्या शब्दाची भीती वाटणार नाही! प्रवासात मनमोकळ्या गप्पा मारणारा सहप्रवासी भेटला की कसं बरं वाटतं! मजा प्रवासाची असते. ठिकाण कधीतरी येणारच असतं. आणि कलेला तर डेस्टीनेशनच नाही, फक्त प्रवासच आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त गप्पा आहेत हे कळणं महत्त्वाचं!!
अधोरेखित वाक्ये कलेच्या नावाखाली नुस्ती घटपटादि खटपट करणार्यांना कळाली तर अतिउत्तम!!!!
अप्रतिम
उत्तम लेख. नर्मविनोदी शैलीआडून किती व कोणकोणत्या दिशांना मर्मभेदी बाण सोडले आहेत हे मोजायचा प्रयत्न केला खरा, पण अर्ध्यावर सोडून शेवटी फक्त ह्या उत्तम लेखाचा आस्वाद घेत राहिलो.
"...वपु, पुलं ह्यावर वाढलेली एक सेगमेंट..."
उत्पल, अशी मोट बांधलीत तर तुमच्यावर उजवे व डावे दोन्ही नाराज होतील. ही दोन वेगवेगळ्या कुळांची दैवते आहेत ना?
"शालेय जीवनात जीवनविषयक जाणिवा ...विकसित होऊ लागल्या तशा जीवनकलाविषयक जाणिवादेखील..."
शालेय जीवनात (व वयातच) मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या (एका नायिके) विषयीची लेखकाची जाणीव कौतुकास्पद असून त्यांची प्रगल्भता (वैचारिक) दर्शवते. :) (अवांतरःलेखक म्हणतात त्यप्रमाणे : (कंसातले कंस फार होतायत, पण नाईलाज आहे. संपादक, कंस कमी करू नका प्लीज!) )
वा! मस्तच. तो संहिता पिच्चर
वा! मस्तच. तो संहिता पिच्चर काही झेपला नाही अस सांगायच होत पण ऐकून घेणारा कुणी भेटलाच नाही. तो टिंग्या पिच्चर कसा आपल्यातला वाटला. असो. बरेच दिवस मी मोहेंजोदडो, हडप्पा वगैरे संस्कृतीचा व उंच मानेच्या काटकुळ्या पायांच्या व काटकुळ्या हातांच्या ज्यात जाड जाड बांगड्या आहेत अशा चित्रांचा नेमका काय संबंध हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काही जमत नाही ब्वॉ! त्या डेक्कन संस्कृतीतील समाजवादी बांध्याच्या लोकांकडे अशी चित्रे दिवाण खान्यात असतात.
हेच
त्यामुळे मग उरतं काय? आपल्या उर्मींना वाट करून देणं! त्यातून जी चर्चा, वाद, गोंधळ व्हायचे आहेत ते होणारच. कारण 'उद्देश' काय ह्यावर एकमत नाही, पण अभिव्यक्ती मात्र नाजूक प्रकरण होऊन बसतं! इलाज नाही. समाज आणि सेगमेंट हे द्वैत मिटत नाही तोवर तरी. आम्ही ह्यावर आमच्या परीनं इलाज शोधला आहे. म्हणजे आम्ही सुदर्शनला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे बालगंधर्वला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार? सेगमेंटचं करायचं तरी काय?
शहाणे(अशोक) पण हेच म्हणतात.
"...अशानं संस्कृती वाढत नाही. ती हजार अंगांनी वाढते. हजार प्रकारचे फाटे फुटले पाहिजेत. हजार प्रकारची मतं आली पाहिजेत. ती मांडली गेली पाहिजेत. त्यातून जो गदारोळ व्हायचा तो होऊ दे. त्यातून कुठलं मत टिकायचं ते टिकू दे. त्यासाठी कुणीतरी विरोध करणारा, उलटं बोलणारा लागतो. असं सगळं असायला लागतं..."
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार...
@ अदिती : शीर्षकातला शब्द अकलात्मक की अ-कलात्मक हे वाचकांवर सोडले आहे...(उत्तर टिपिकल आहे, पण खरं आहे..)...आणि लेखकराव वगैरे म्हणू नका राव...जे व्हायचं नाही, तेच म्हणायला लागलात तर अवघड आहे...:)..)
@ सहज : धन्यवाद...माझ्य ब्लॉगचा दुवा - http://mindwithoutmeasure.blogspot.in
@ मन : तुमचा प्रश्न आणि तुम्ही काढलेला दुसरा धागा यावर जरा सविस्तर लिहायची इच्छा आहे. सवडीने वेगळा धागा काढून लिहीन..तुम्ही खरं तर एका जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर लिहायला उद्युक्त केलं आहे. त्याबद्द्ल आभार...:)..
@ मी : हो..सहमत.
बाकी सर्वच मंडळींचे पुन्हा एकदा आभार...
उत्पल
बाकी सवडीने
लेखकरावांसाठी शीर्षकाबद्दलच प्रश्न आहे. शीर्षकातला शब्द अ-कलात्मक असा वाचावा का अकला-त्मक असा?