Skip to main content

भाषांतराचे प्रयोग

एका फॅनफिकमधे ही कविता मला भेटली. बेहद्द आवडली.

Passing stranger! you do not know how longingly I look upon you,
You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)
I have somewhere surely lived a life of joy with you,
All is recall’d as we flit by each other, fluid, affectionate, chaste, matured,
You grew up with me, were a boy with me, or a girl with me,
I ate with you, and slept with you—your body has become not yours only, nor left my body mine only,
You give me the pleasure of your eyes, face, flesh, as we pass—you take of my beard, breast, hands, in return,
I am not to speak to you—I am to think of you when I sit alone, or wake at night alone,
I am to wait—I do not doubt I am to meet you again,
I am to see to it that I do not lose you.

--"To a Stranger," Walt Whitman

होऊ दे काय व्हायचं ते, असं म्हणून भाषांतराची हिंमत केली.

आवृत्ती १
वाटेवरल्या मुशाफिरास

परिचयाची खूण नाही, नाही वा लवलेशही
स्पंदनांचा मात्र तुझिया भास हो मज प्रत्यही
आसावल्या स्वप्नांतही तू स्वप्न होऊन राहसी
कोण जाणे कोणत्या जन्मातुनी ये ओढ ही?
आज या पिकल्या क्षणी वाटांस वाटा भेटता
गाठ नाही, भेटही पण, स्पर्श होई निसटता
या क्षणातून वाहिले, जे जे उधळले, जे राखले
कोण जाणे कोणत्या जन्मात येईल सांगता?
हेच होते हेच सारे, होय, हे मज लाभलेले
हातांत हातां गुंफुनी मन एकमेकां वाहिलेले
स्तन्य माझे, वीर्य माझे - ओठांतुनी ओठांतही
कोण जाणे कोणत्या जन्मात आपण प्राशिले?
मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
कातरी वेळांत दचकून तुज पुन्हा आठवायचे
पडतील फिरुनी गाठी अपुल्या, नक्की, मला ही खातरी
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे

आवृत्ती २
वाटेवरल्या मुशाफिरास

तुझ्यावर खिळलेल्या माझ्या नजरेतली ही ओढ तुला पुरती ठाऊक नाही.
तुझेच स्पप्न पडत आले आहे मला वारंवार, तुला खरेच ठाऊक नाही.
कुठल्यातरी एका जन्मात नक्की खिदळलो आहो आपण एकमेकांसोबत
आपल्या ओझरत्या स्पर्शाच्या या निसटत्या क्षणातून,
वाहत निघाले आहे आपल्यामधून बरेच काही...
कुठल्यातरी एका जन्मी
ऐकले आहेत आपण एकमेकांच्या नाडीचे ठोके कान लावून
दिले-घेतले आहेत काही चिमणीचे घास, काही ऊबदार श्वास -
इतके की - आता आपल्या शरीरांतही केवळ आपले असे,
फार काही उरले नाही...
वाटेवरच्या या निसटत्या क्षणीही अचूक माझ्यापाशी पोचते आहे तुझी नजर
तुझ्या अंगाचा गंधही पोहोचतो आहे थेट इथवर
तसे तुझे तरी हात मोकळे कुठे आहेत?
माझ्या अंगांगांचे सारे वळसे वेढून बसले आहेतच की तुलाही...
इथून पुढली वाट मात्र एकट्यानेच काटायची आहे.
माझ्या ओठांवर असणार आहे लाखबंद मोहोर,
नि रात्रीलाही तुझ्या आठवणीचाच काय तो आधार आहे.
पण मला ठाऊक आहे -
अमावास्या जरी झाली, तरी उजाडायचे काही राहत नाही
फक्त तोवर हरपू द्यायचे नाही तुला क्षितिजापार...
मग गाठ पडायची काही राहत नाही!

***
वास्तविक मुक्तछंद मला आवडणारा प्रकार. इथे तर मूळ कवितेतही तोच आहे. पण मला आवडली मात्र पहिली आवृत्ती.

या कवितेच्या भाषांतराच्या अजून काही आवृत्त्या, काही सुधारणा, सुचवण्या... यांचं स्वागत आहे. :)

तिरशिंगराव Tue, 06/08/2013 - 17:15

दोन्ही आवृत्या आवडल्या. पण जास्त दुसरी. शब्दशः भाषांतर न करताही ,कवितेचा गाभा कसा उलगडून दाखवता येतो , त्याची ही दोन उदाहरणे आहेत.

मनीषा Wed, 07/08/2013 - 08:51

कविता आणि भाषांतर .. दोन्हीही सुरेख.
मला वाटते, गद्य साहित्याच्या भाषांतरापेक्षा कविता, काव्याचे भाषांतर करणे जास्तं कठीण असेल का?

नंदन Wed, 07/08/2013 - 11:39

मूळ कविता वाचून 'तच्चेतसा स्मरति नूनमबोधपूर्वं, भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि' आठवून गेलं. लिंगनिरपेक्ष डूब दिलेलं.

दोन्ही अनुवाद उत्तम. मलाही पहिली आवृत्ती थोडी अधिक आवडली.

काही किंचित सुचवण्या:

हेच होते सर्व काही, एकदा/तेधवा मज लाभलेले
हात हातीं गुंफुनी मन एकमेकां वाहिलेले
(यात मूळचा अनुप्रास राहत नाही, हे मान्य.)

हारुन शेख Wed, 07/08/2013 - 14:18

वाह ! तुमच्या रसिकतेला सलाम ! खूपच सुंदर आहे कविता.आणि तुमची दोन्ही भाषांतरेही अप्रतिम आहेत. मीपण प्रयत्न केलाय. पण तरीपण वाटतंय कविता कवेत घेत आलेली नाही.

" अनामिका तुला कळणार नाही
किती उत्कटतेने मी बघतोय तुझ्या वाटेकडे अपलक,

तू तोच ज्याची वाट बघितली प्रत्येक क्षणी,
की तीच तू जिची आस होती मनी ,
नकळे, नुमजे, स्वप्नांसम धुसर आठवणी,

तुझ्या सोबतीत जगणे आनंदी गाणे होते,
हात घेऊन हातात, लक्ष तारकांनी उजळलेल्या वाटेवर चालणे होते,
हे पक्के स्मरते.

आणि आठवतेय आपले दूर जाणे,
एकत्र वाहत आलेल्या प्रवाहासारखे होतो आपण,
अडखळलो प्रचंड पाषाणाशी आणि झाल्या दोन धारा,
प्रेमाची स्नेहल वात होती, तुटली तेव्हा सांधायला नव्हते हात,
निष्पापपण विरघळले,परिपक्व झालो आपण,
तरी पावित्र्याचा गंध मंद दरवळत राहीला मनात,
बरोबर वाढलो,घडत गेलो,
तू होतीस मैत्रीण माझी की हे मित्र स्मरत नाही आता,
पण आतड्याची ओढ होती एकमेकांना,
हे पक्के स्मरते.

स्मरतेय तृप्तीचे घास भरवले एकमेकांस ,
आणि निद्रेच्या कुशीत विसावलो अनेकदा सोबत,
मी-तू पणाच्या रेषा पुसल्या अन ,
अनाहत, अभंग झाली शरीरे,

तू दिलेस मला तुझ्या डोळ्यातले चांदणे,
तू दिलेस मला तुझ्या चेहऱ्यावरचे उबदार ऊन,
तू दिलेस मला मांसल मिठीचे आश्वासन,
निरोप घेतांना मीही वाहिले माझे अस्तित्व तुझ्या ओंजळीत,

तू परत भेटशील तेव्हा शब्द नाहीत माझ्याजवळ तुझ्याशी बोलायला,
एकटा असतांना मी विचारांच्या निराकार जगात तुझीच प्रतिमा घडवत बसतो,
निस्वप्न निद्रेच्या भीतीने जागेपणीच रंगवतो तुझी स्वप्ने,
तू येशीलच कधीतरी ही खात्री आहे मला,
म्हणून उत्कटतेने मी बघतोय तुझ्या वाटेकडे अपलक,
पापणी लवत नाही, कारण आता परत भेटशील तेव्हा,
हरवायचे नाहीये तुला,
हरवायचे नाहीये तुला.

तिरशिंगराव Wed, 07/08/2013 - 17:29

In reply to by हारुन शेख

हारुन शेखसाहेब,

तुमचं भाषांतरही खूपच आवडलं याची नोंद व्हावी.

मेघना भुस्कुटे Wed, 07/08/2013 - 14:24

@तिरशिंगराव
आभार! मला शब्दश: भाषांतर करताच येत नाही. मग ती कविता 'कविता' राहत नाही असं वाटतं. म्हणून हे बळंच स्वातंत्र्य! सूर तोच पकडता आला, तरी पावलं म्हणायचं. :)
@मनीषा
हो, मलापण असंच वाटतं. गद्य साहित्यापेक्षा कवितेचा अनुवाद करणं जास्त कठीण. कारण कवितेत अर्थाच्या एकाहून अधिक पाकळ्या असतात. होता होईतो सगळ्या पकडायच्या, नि तरी भाषेची गंमत निसटू द्यायची नाही, हे १००% यशस्वी कधीच होत नाही. प्रयत्न करत राहायचं!
@नंदन
अगदी अगदी! बाकी तुझी सुचवणी पर्फेक्ट. पण माझ्या डोक्यात होतं निराळंच. कवीनं समोरच्या व्यक्तीसोबत शरीर, मन, मैत्र असं सारं अनुभवलं आहे. इतकं, की परकं काही उरलंच नाही. ही जवळीक, हक्क दर्शवायला मी 'हेच होते, हेच सारे, होय, हेच...' असा प्रयोग केला. आता त्यातून ते सगळं तसंच्या तसं पोचतं की नाही, कुणास ठाऊक. पण प्रयत्न तरी तसा होता. :P

मेघना भुस्कुटे Wed, 07/08/2013 - 14:39

@हारुन शेख
आहा! कसलं भाषांतर आहे अहो हे! वाह!
एकच मला थोडं खटकलं - मूळ कवितेचं अल्पक्षरत्व भाषांतराला नाही. थोडं पाल्हाळिक झालं आहे भाषांतर. पण चांगल्या भाषांतरात ते होतंच - काही निसटून जाऊ नये, अशी धडपड करताना.
खास आहे तुमचं भाषांतर. कविता कवेत आली नाही, असं अजिबातच नाही वाटत. उलट - 'निष्पापपण विरघळले,परिपक्व झालो आपण, तरी पावित्र्याचा गंध मंद दरवळत राहीला मनात...' हे chaste नि matured दोन्हीला कवेत घेतं. तसंच 'अनाहत, अभंग झाली शरीर'...' हेपण.
वा! मजा येतेय. :)
बादवे, अपलक म्हणजे? एकटक का?

'न'वी बाजू Thu, 08/08/2013 - 20:01

In reply to by मेघना भुस्कुटे

'अपलक' = अ + पलक अशी फोड असावी काय? कारण, शेवटच्या चरणात 'म्हणून उत्कटतेने मी बघतोय तुझ्या वाटेकडे अपलक' नंतर लगेच पुढच्याच ओळीत 'पापणी न लवण्या'चा उल्लेख आहे, यावरून हा अंदाज.

मिलिंद Wed, 07/08/2013 - 17:57

दोन्ही अनुवाद छान आहेत, पण मुक्तछंदातील जास्त आवडला.

शिवोऽहम् Wed, 07/08/2013 - 20:09

मात्र इथे छंदाची चाकोरी थोडी हललेली वाटते..

"कातरी वेळांत दचकून तुज पुन्हा आठवायचे
पडतील फिरुनी गाठी अपुल्या, नक्की, मला ही खातरी
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे"

हे कसे वाटते?

"स्तब्ध निमिषी तव स्मृतींचे कवडसे शोधायचे
वळणावरी भेटु पुन्हा, आहे मला ही शाश्वती
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे"

मेघना भुस्कुटे Wed, 07/08/2013 - 21:04

In reply to by शिवोऽहम्

ऐला, तुमचं भाषांतरही भारी आहे. 'वळणावरी' मला सुचला असता तर धन्य झाले असते मी! पण 'शाश्वती'पेक्षा मला 'खातरी' जास्त मराठी आणि कमी संस्कृताळलेला वाटतो, हेही आहेच. (बाकी त्या शेवटच्या कडव्यात काहीतरी गंडलंय खरं!)

ही मी आधी केलेली नि बाद केलेली दोन कडवी. ही जास्त बरी होती का? काय की! मला कळेनासं झालं.

मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
सादही नच घालता, मौनात गाणे साह्यचे
याच जन्मी याच जन्मी सांधून येतील बंध ते
तोवरी या निजखुणेला गर्भार होऊन वाह्यचे

***

मात्र तोवर एकट्याने, चालायचे, चालायचे
सादही नच घालता, मौनात गाणे गायचे
उमलून येईल याच जन्मी अंतरी निजखूण ही
तोवरी वाटेवरी तव सावलीपरी राह्यचे

शिवोऽहम् Thu, 08/08/2013 - 09:23

In reply to by मेघना भुस्कुटे

"मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
सादही नच घालता, मौनात गाणे साह्यचे
याच जन्मी याच जन्मी सांधून येतील बंध ते
तोवरी या निजखुणेला गर्भार होऊन वाह्यचे"

फारच सुंदर! असाही कवितेचा 'प्रोफाईल' भावला. अनादिअनंत काल-प्रवाहातील एखाद्या वळणावर आपण भेटणार नाही कशावरुन? पण तोवर हा मौनराग आळवायचा आणि स्मृतीपटलावरची स्मरणवर्तुळे निरखायची, हा रस्ता अटळ असावा.

विषयांतर होईल कदाचित, पण शाश्वती पेक्षा खातरी जास्त आपला का वाटावा बरे?

मेघना भुस्कुटे Thu, 08/08/2013 - 10:22

In reply to by शिवोऽहम्

शक्यतो तत्सम शब्दापेक्षा देशी शब्द वापरायचा, असा प्रयत्न असतो म्हणून.
विषयांतरच आहे, (नि हे सगळं इथे लागू पडत नाही,) पण - संस्कृतमधले शब्द मराठीत कधीकधी अतिरेकी तुपकट, भोंदू वाटू शकतात; नि देशी शब्दांना कमी प्रतीचं लेखण्याची आपल्यात उग्गाच प्रथा आहे, तिला खोडून काढायचं, म्हणून.

शिवोऽहम् Thu, 08/08/2013 - 11:13

In reply to by मेघना भुस्कुटे

सहमत. 'अडगुलं मडगुलं' मध्ये श्री. विश्वनाथ खैरे यांनी ह्याचा मस्त उहापोह केला होता.

असो, धाग्यावरचे सगळेच भावानुवाद आवडले.

बॅटमॅन Thu, 08/08/2013 - 13:03

In reply to by मेघना भुस्कुटे

पण - संस्कृतमधले शब्द मराठीत कधीकधी अतिरेकी तुपकट, भोंदू वाटू शकतात; नि देशी शब्दांना कमी प्रतीचं लेखण्याची आपल्यात उग्गाच प्रथा आहे, तिला खोडून काढायचं, म्हणून.

सहमत आहे, पण सद्यःस्थितीत हे इतकं जाणवत नाही. पन्नासेक वर्षांपूर्वी हे जास्त खरं होतं. इंग्रजी शब्दांनी संस्कृत शब्दांची जागा घेणे काही दूर नाही बादवे.

अवांतरः

*अन जुन्या काळातही, पंडित कवींचाच जास्त आग्रह होता याबद्दल- बाकीचे निवांत होते. तुलनेने संस्कृत शब्दांचे कोपरे अवश्य तेव्हा घासून, कधी तद्भव तर कधी अरबी-फारसी शब्द घालून सजवलेली वीररसाची रेसिपी म्हणून भूषणाची कविता जबरी आवडते-वर्ण्यविषय हे देखील एक प्रमुख कारण त्यामागे आहे हेवेसांनल.*

मेघना भुस्कुटे Thu, 08/08/2013 - 14:13

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेयमहोशयांनी भूषणावर एखादा अभ्यासपूर्ण फर्मास लेख लिहावा आणि आम्हां अज्ञ पामरांना थोडी मज्जा अनुभवू द्यावी अशी विनंती करते.

मिलिंद Fri, 09/08/2013 - 09:22

In reply to by मेघना भुस्कुटे

शब्द कोणता वापरावा हा कवयित्री ह्या नात्याने सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही दिलेले कारण इथे कितपत लागू पडते ह्याविषयी साशंक आहे. "देशी" हा शब्द तुम्ही प्राकृत/महाराष्ट्री/मराठी ह्या अर्थाने वापरला असावा, अन्यथा संस्कृत ही सुद्धा देशीच भाषा आहे. खात्री ह्या शब्दाचा प्रवास/व्युत्पत्ती खातर (अरबी) --> खातरी (हिंदुस्तानी) --> खात्री (मराठी) असा आहे, आणि शाश्वतीचा शाश्वत (संस्कृत) --> शाश्वती (मराठी) असा. म्हणजे दोन्ही शब्द मूळ मराठी/प्राकृत नाहीत. तसे असले तरी दोन्ही मराठीत दीर्घकाळ रुळलेले व रुजलेले आहेत.

मेघना भुस्कुटे Fri, 16/08/2013 - 10:30

In reply to by मिलिंद

'देशी' या शब्दाची निवड चुकली.
माझा संस्कृतवर थोडा सकारण राग आहे. मला न-संस्कृत शब्द हवा होता. किंबहुना संस्कृताहून हिंदुस्तानीला प्राधान्य, असा. म्हणून.

'न'वी बाजू Fri, 16/08/2013 - 16:44

In reply to by मेघना भुस्कुटे

माझा संस्कृतवर थोडा सकारण राग आहे.

पण... पण... पण... येथे तर आपण 'माझा संस्कृतवर काही राग नाही' असे प्रतिपादिले आहे!

हे खरे, की ते खरे?

आता उंट बहुधा डोंगराखाली आला असावा, असे मानावे काय?

(अवांतर: 'स्तन्य', 'वीर्य' यांना मराठमोळे प्रतिशब्द सापडले नाहीत काय?)

मेघना भुस्कुटे Fri, 16/08/2013 - 20:56

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही अगदी बाप-श्राद्ध न्यायाला धरूनच बसलात की! (कोलटकर झिंदाबाद! ;-))
असं बघा - संस्कृतला मराठीचे नियम लावा किंवा जगातले सगळे संस्कृत बोलणारे लोक आधी ठार मारा - असा हेका धरण्याइतका काही माझा त्या भाषेवर डूख नाही. माझ्या भाषेत संस्कृतातून आलेले शब्द आहेत, हे मी पुसू शकत नाही. (’वीर्य’ नि ’स्तन्य’ आहेत, तसे परिचय, स्वप्न, स्पंदन, स्पर्श, निर्धार... हेही आहेतच की.) पण नाही आवडत मला माझ्या भाषेतला नियमांमध्ये चालणारा संस्कृतचा अनाठायी वरचष्मा नि भेदभाव. तशीच, काही शब्द केवळ संस्कृतातून आलेले म्हणून भारदस्त असतात ही एक समजूतही नाही आवडत. त्यावर उतारा म्हणून मी माझ्या लिहिण्यात शैलीला अनुसरून, दातांखाली खड्यासारखे लागतील असे संस्कृत शब्द शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करते. विशेषकरून इथे: ज्या लयबद्ध कवितांमधून संस्कृत’प्रचुर’ शब्द योजण्याची प्रथा आहे, अशा कवितांमध्ये हिंदुस्थानी वा इतर न-संस्कृत शब्द योजून त्या विरोधाभासातली गंमत चोखाळून बघायला मला आवडते.
तर आता यावर - ’राग आहे की राग नाही, हे आधी सांगा’ या बालिश प्रश्नाचं काय उत्तर देणार? तुम्हांला सोईस्कर असेल ते धरून चाला, माझी काही हरकत नाही. :)

बॅटमॅन Thu, 08/08/2013 - 12:39

भाषांतराचा प्रयोग मस्त जमलेला आहे. मेघनाची दोन भाषांतरे पाहिली. मूळ कवितेच्या शैलीप्रमाणे दुसरे भाषांतर जास्त आवडले. पहिल्या कवितेत गेयतेच्या नियमामुळे थोडा आशय कॅप्चर झाला नाही असे वाटते. विशेषतः "सायलेंट लाँगिंग" जे मूळ कवितेत खूप सुंदर मांडलेले आहे. दुसरे भाषांतर त्या निकषावरही खूप सरस उतरलेय.

हारुन शेख यांचे भाषांतरही मस्त आवडले. कल्पना जरा अजून स्पष्ट केल्यात. वाचताना सुंदररीत्या उलगडत जाते सगळे. अल्पाक्षरापेक्षा अंमळ वेगळा प्रयत्न आवडला.

एकुणात, उत्तम कविता करायची तर मुक्तछंद ट्राय केलाच पाहिजे हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा प्रयत्न.

धनंजय Thu, 08/08/2013 - 22:26

वॉल्ट व्हिटमनची स्फूर्ती घेऊन रचलेल्या कविता छान आहेत.

("भाषांतराचे प्रयत्न" असे का म्हटले आहे, कोणास ठाऊक.)

अनेक वर्षांपूर्वी मी व्हिटमनच्या कवितांनी फार भारावून जायचो. आजकाल तितकासा हेलकावत नाही. मी स्वतः भाषांतराचा प्रयत्न करायला गेलो, पण खरे म्हणावे, तर थोडा कंटाळलोच. भाषांतर करण्यापूर्वी आणि करता-करता मूळ कविता सारखी सारखी वाचावी लागते, गुणगुणावी लागते, मनात घोळावी लागते. तसे करताना मला कंटाळाच आला. :-( इंग्रजीमध्येच मला (मुक्त, होय मुक्त) लय सापडेना.

कालांतराने व्यक्तीची अभिरुची बदलते, त्याचे हे उदाहरण असावे.

मेघना भुस्कुटे Thu, 08/08/2013 - 22:58

मीच काढलेला धागा असल्यामुळे धनंजयच्या प्रतिसादाला 'खवचट' श्रेणी देण्याची सुविधा नाही! मला मुद्दा कळला आहे. :ड

धनंजय Fri, 09/08/2013 - 03:27

अनोळखीच ओझरत... अगा!
आसुसून बघणं माझं ना कळायचं तुला.
स्वप्ना-स्वप्नात झपाटणारं आहेस ध्येय तूच का
आयुष्यभरच्या शोधाचं?
सरता-सरता आठवतंय लख्ख, अख्खं, शुद्ध :
आनंदी एकत्र जीवन आपलं : सवंगडी वाढलो असू.
बागडलो, भिडलो असू. जेवलो असू, निजलो असू एकत्र.
अन् तुझं शरीर ना राहिलं तुझंच, अन् माझं ना माझंच.
क्षणात सुखावतायत मला तुझ्या नजरा, चर्या, काया
अन् बदल्यात घेऊन टाकलेयस माझे हात, दाढी नी छाती...
नाही बोलणं मी तुझ्याशी! पण एकांतात स्मरणं,
वाट पाहत राहाणं, निश्चित पुन्हा भेटणं,
अन् हरवू ना देणं.

---
(ठीकाय, माझी अभिरुची बदलली असली तरी विटमनची कविता आवडू शकण्याइतपत आधीची अभिरुची मी जागवू शकतो.)

ऋषिकेश Tue, 13/08/2013 - 10:50

मृत्युशय्येवर अनोळखी भासणार्‍यास,

तुला खरच माहित नाही की मी तुला बघतोय?
तु तोच स्वप्निल की तीच स्वप्नशलाका जी मी शोधत होतो
जिच्यासोबत मी आयुष्य आनंदाने जगलो हे नक्की!
आता आठवायचेच तर,
एकमेकांबरोबर बागडणे, विहरणे,
अगदी तरल, प्रेमळ, विशुद्ध, प्रौढ नाते,
माझ्याबरोबर तुझे वाढणे, तुच माझा मित्र अन् मैत्रिणही असणे,
आपले एकत्र खाणे, अन् तुझ्यामाझ्या शरीरांतील द्वैत संपेपर्यंत झोपणे,
तुझे डोळे, चेहरा, स्पर्श मला देत असताना माझी लव, उर, हातांचा परतवा घेणे.
सारे काही आठवते!
सध्या एकाकी असताना किंवा जागी रात्र जागताना - तुझ्याशी बोलता येत नाही!
मला जराही शंका नाही की तु पुन्हा भेटशील - रोज तुझीच वाट पाहतो!
आता हाच ध्यास आहे की तुला गमवायचे नाही!

शिवोऽहम् Fri, 16/08/2013 - 11:50

In reply to by ऋषिकेश

उत्तम ट्विस्ट!

बादवे, व्हिट्मनच्या इतर कवितांमध्येही हा 'पासिंग स्ट्रेंजर' डोकावतो. व्हिट्मनवर होमोसेक्शुअल असल्याचा संशय होता. त्यात ह्या अशा 'पासिंग एन्काऊंटर्स' चा काही हात असावा का? तसेही क्वेकर्स चळवळीत 'स्ट्रेट' असणे एवढे महत्वाचे नव्हते.

हे पहा:

[हू इज नाऊ रिडिंग धिस]:
Or may-be a stranger is reading this who has secretly loved me..

कोण जाणे कधी आसुसून भेटला असेल धुक्यात
आणि वाचत असेल हे माझे शब्द..

[सॉन्ग ऑफ द ओपन रोड]:
Do you know what it is, as you pass, to be loved by strangers? Do you know the talk of those turning eye-balls?

कळेल का
सरत्या वाटेवर एखाद्या अनामिकाचे गाढ आलिंगन
इतके का बरे सुखावते?
आणि वळुन रोखलेल्या त्या नजरा काय म्हणतात मागे
याचा काही अंदाज?..

ऋषिकेश Fri, 16/08/2013 - 10:36

In reply to by मेघना भुस्कुटे

'Passing' या शब्दाचा वेगळा अर्थ घेतला (मरणोन्मूख, Who is about to Pass) तर कवितेचा संदर्भच बदलतो आणि एक प्रयोग म्हणून मुद्दामच त्या दृष्टिकोनातून भाषांतर केले.

'न'वी बाजू Fri, 16/08/2013 - 16:45

"जाऊ द्या, आपल्याला काय कळते त्यातले," असे म्हणोन, कवितेत मोठे गम्य असणार्‍या येथील विद्वज्जन रसिकांच्या मांदियाळीत आपले अडाणी तोंड उघडावयाचे नाही, असे ठरविले होते खरे, परंतु एका सतत भेडसावणार्‍या शंकावलीपोटी राहविले नाही, आणि येथील एकाही उपस्थित रसिकवर मातृरक्तास ना हे प्रश्न पडले, ना कोणी हे प्रश्न उपस्थित केले, ना या शंकावलीचे समाधान जेणेंकरोन होऊ शकेल असा काही शेरेवजा मुद्दा कोणी परस्परेकरोन प्रतिपादिला, जेणेंकरून शंका अनुत्तरितच राहोन अधिकाधिक भेडसावू लागली, तिचे काही करोन समाधान व्हावे, एतदर्थ, 'स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' या न्यायास अनुसरून हाती घेतलेला हा या अडाण्याचा अडाणी (परंतु प्रामाणिक) पृच्छाप्रपंच. गोड मानून घेतला जावा, नि शंकासमाधानही व्हावे, झालेच तर ज्ञानवर्धनही व्हावे, एवढीच माफक अपेक्षा.

स्तन्य माझे, वीर्य माझे - ओठांतुनी ओठांतही
कोण जाणे कोणत्या जन्मात आपण प्राशिले?

१. मूळ कविता स्तन्य आणि वीर्याच्या उल्लेखाकरिता जंगजंग पछाडली, परंतु तीत कोठेही तसले उल्लेख आढळले नाहीत. नेमके कोठे आहेत, त्याकडे कोणी उपस्थित विद्वज्जन निर्देश करू शकेल काय? की कसेही करून 'स्तन्य' आणि (विशेषतः) 'वीर्य' हे शब्द कोल्ड प्रिंटात आणून दाखवायचेच, एतदर्थ केलेला हा आटापिटा आहे?

२. स्तन्य 'माझे', आणि वीर्यही 'माझे'च? हे नेमके कसे शक्य आहे? इतकी स्वयंपरिपूर्णता या विश्वात निदान मानवजातीच्या संदर्भात तरी पाहिलेली नाही. (रामकृष्ण परमहंस नॉटविथष्ट्यांडिंग; चूभूद्याघ्या.)

की येथे 'माझे' या शब्दाच्या एकाच पंक्तीतील लागोपाठच्या दोन उल्लेखांत अर्थच्छटेचा काही सूक्ष्म फरक आहे? म्हणजे, (निवेदक आहे की निवेदिका, यानुसार), स्तन्य आणि वीर्य यांपैकी कोणतेतरी एक 'निवेदका/दिकेच्या शरीरातून स्रवलेले' या अर्थी 'माझे', तर दुसरे हे 'निवेदक/दिका त्यावर मालकीहक्क सांगू पाहतो/ते' या अर्थी 'माझे', असे काहीतरी?

३. स्तन्याचे एक वेळ ठीक आहे, पण वीर्य ओठांत? यक्क!

(की येथे - जाऊ दे! 'ओठां'च्या स्थाननिश्चितीच्या संदर्भात कोणताही अप्रस्तुत प्रश्न येथे प्रस्तुत करू इच्छीत नाही. केवळ, संस्कृतात ओठांसाठी 'अधर' ही शब्दयोजना रोचक आहे, एवढेच निरीक्षण या निमित्ताने येथे नोंदवू इच्छितो.)

४. पुढील पंक्तीतील 'प्राशना'च्या उल्लेखाबाबतही अशीच काही शंका आहे. म्हणजे, स्तन्याच्या बाबतीत ठीकच आहे; वीर्याच्या संदर्भातही त्या उल्लेखास आक्षेप असा नेमका काही नाही (कारण हा शेवटी ज्याच्यातिच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे; त्यास आक्षेप घेणारे आम्ही नेमके कोण?), परंतु त्यातून जे एक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते, ते नेमके तसेच उभे राहाणे अपेक्षित आहे किंवा कसे, याचा विचार कवीने/कवयित्रीने/भाषांतरकर्त्याने/भाषांतरकर्त्रीने करावयास हवा, असे राहूनराहून वाटते. त्याउपर, हे चित्र तसेच अभिप्रेत आहे किंवा कसे, याबाबत काही स्पष्टीकरण उपलब्ध केले गेल्यास कवितेच्या आस्वादाच्या (तसेच जॉन्र-निश्चितीकरणाच्या) दृष्टीने ते उपयुक्त ठरावे, असेही सुचवू इच्छितो.

सांगण्याचा मुद्दा: 'स्तन्य', 'वीर्य' असे शब्द कोल्ड प्रिंटात आणण्यास तत्त्वतः कोणताही आक्षेप नाही. (हे दोन्ही वैध मराठी शब्द आहेत, अत एव योग्य त्या संदर्भात त्यांच्या शीतमुद्रणास वस्तुतः कोणासही काही प्रत्यवाय असण्याचे काही कारण वरकरणी दृग्गोचर१० होत नाही.) मात्र, संदर्भ अथवा गरज असो वा नसो, असे शब्द ओढूनताणून कसेही करून वापरण्याचा अट्टाहास (त्यासही नेमका आक्षेप असा नाही - शेवटी व्यक्तिस्वातंत्र्य आहे - पण...) अनाकलनीय वाटतो. विशेषतः भाषांतर करताना, आणि तशातही मूळ मजकुरात असा कोणताही उल्लेख निदान थेट तरी नसताना, असे करण्याचे प्रयोजन कळत नाही. शिवाय, अप्रत्यक्षरीत्या का होईना, असा उल्लेख हा या ठिकाणी सुसंदर्भ आहे असे आर्ग्युमेंटापुरते जरी मानले, तरी साटल्य नावाचीही काहीतरी चीज असते, असे सुचवावेसे वाटते. अर्थात, हाही ज्याच्यातिच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे, म्हटल्यावर याही बाबतीत आक्षेप असा नेमका काही नाही.

मात्र, केवळ हौसेखातर११ हे किंवा असे शब्द कोल्ड प्रिंटात आणण्यास आक्षेप असा काही नाही, असे एकदा म्हणून झाल्यावर, तरीही, असे शब्द अट्टाहासाने वापरताना आजूबाजूच्या संदर्भात त्यातून प्रतीत होणार्‍या अर्थाचाही विचार जरूर व्हावा, अन्यथा आम्हांसारख्या काव्यनिरक्षरांकरिता असा प्रकार हा केवळ हास्योत्पादक ठरतो, असे कळकळीने सुचवावेसे वाटते.

(बाकी, मूळ कवितेचे भाषांतर करण्याचा प्रयत्न अन्य काही सदस्यांनीही केलेला आहे, तो बहुधा चांगलाच असावा. कवितेतले - या ठिकाणी मूळ कवितेतले आणि तिच्या भाषांतरांतलेसुद्धा, आणि एकंदरीतच काव्यप्रांतातले - काहीही गम्य नसल्याकारणाने, त्या संदर्भात कोणतेही बरेवाईट मत प्रदर्शित करण्यास आम्ही असमर्थ आहो. मात्र, वरील बाबतीत प्रामाणिकपणे जे जाणवले, ते मांडले. चूभूद्याघ्या.)

========================================================================================================================================
तळटीपा:

मराठीत: 'माई का लाल'.

मराठीत: 'मांडला'.

'एतदर्थ'करिता मराठीत 'याकरिता' असा शब्द सामान्यतः प्रचलित एवं रूढ आहे, याची आम्हांस पूर्ण कल्पना आहे. परंतु जित्याची खोड! कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार? (- पु.ल.)

वरील पहा.

आ ला कोलटकर?

परमहंसांना पाळी येत असल्याबद्दलची किंवदंता ऐकलेली आहे; खरेखोटे तेच जाणोत. परंतु त्यांना स्तन्यही येत असल्याबाबत निदान ऐकलेले तरी नाही. बाकी, परमहंस हे पुरुष होते, असे सांकेतिक शहाणपण (मराठीत: 'कन्व्हेन्शनल विज़्डम') असल्याकारणाने, त्यांना बहुधा वीर्यही येत असावे, असे येथे केवळ गृहीत धरले आहे; प्रत्यक्ष पुराव्याअभावी याविषयी कोणताही निर्वाळा देऊ शकत अथवा इच्छीत नाही. (चूभूद्याघ्या.)

नॉट द्याट वुई आर एव्हर लाइकली टू आस्वादोफाय धिस सो-कॉल्ड कविता, अस बीइंग 'ब्ल्याक लेटर ईक्वल टू बफेलो' काइंड ऑफ फेलोज़ इन दि प्रांता ऑफ कविताज़, बट इन दि होप द्याट समबडी सम डे माइट जस्ट फाइंड सच अ स्पष्टीकरण टू बी यूज़फूल, एनलायटनिंग अँड अम्यूज़िंग (दो नॉट नेसेसरिली इन द्याट ऑर्डर)... वुई रिमेन, युअर्स ट्रूली, एट सेटेरा.

मराठीत: 'कोल्ड प्रिंटात आणणे'.

मराठीत: 'हरकत'.

१० याचा अर्थ जमल्यास - आणि तेवढीच खाज असल्यास - शब्दकोशात शोधावा. प्रत्येक शब्दाचा अर्थ देत बसण्याचा आम्हांस तूर्तास कंटाळा आलेला आहे. (च्यामारी, भटे असलो म्हणून काय झाले?)

११ शेवटी हौसेला मोल नाही, हेच खरे. या संदर्भात, 'भाडखाऊ लोकशाही, भारतीया तूच मर' ही अन्य एका थोर कवयित्रीची अशीच एक अजरामर काव्यपंक्ती राहूनराहून आठवते.

पाषाणभेद Sun, 18/08/2013 - 05:22

In reply to by मेघना भुस्कुटे

'न'वी बाजू आपण महान आहात. --8^=

Walt Whitman फारच शौकीन गडी दिसत होता. कुणालाही मुळ कविता द्वैअर्थी वाटत नाही काय?