संस्कृत दिनाच्या शुभेच्छा!
कालिदास-भासादि कवीनां-
काव्यसृष्ट-मधुघटमाला
यत्पानेन च मुग्धा रसिका
मधुरसदात्री सखिबाला
जीवशिवैक्यं दर्शयमाणा
सद्य:परनिर्वृतयेsर्हा
कृत्वा पानं तृप्ता भवन्तु
संस्कृत भाषा मधुशाला||
अनुवाद:
कालिदास औ' भास-बाण की
काव्यसृष्ट मधुघटमाला
पीकर रसीया छलक उठे; यह
मधु वितरती साक़ीबाला
जीव और शिव एक दिखाती
त्वरित हर्षप्रद होती है
पियो जी भर आप इसे; यह
संस्कृत भाषा मधुशाला ||
धाग्याचा प्रकार निवडा:
तत्त्वतः...
जन-गण-मन संस्कृतात नाही
तत्त्वतः तुमचे म्हणणे बरोबर आहे. म्हणजे, 'जन-गण-मन'चा जो भाग राष्ट्रगीत म्हणून अधिकृतरीत्या स्वीकारला गेलेला आहे, तेवढ्याचपुरते बोलायचे झाले (उर्वरित कडवी मला माहीत नाहीत, म्हणून), तर 'जागे', 'मांगे', 'गाहे' यांसारखे (किंवा एवढेच) काही फुटकळ शब्द अथवा रूपे बंगालीतली अशी अधूनमधून पेरलेली आहेत खरी, म्हणून या गीतांशास 'बंगाली' म्हणणे प्राप्त ठरते. अन्यथा, (१) बोली अथवा प्रचलित बंगालीशी या भाषेचा अर्थाअर्थी संबंध असलाच, तर तो दूरान्वयाने आहे, सबब या भाषेस 'बंगाली' म्हणवत नाही, आणि (२) उपरोल्लेखित केवळ तीनच शब्द अथवा रूपे काढून टाकून त्यांच्या जागी जर योग्य ती संस्कृत रूपे घुसडली, तर प्रस्तुत गीतांश हा पूर्णतः 'संस्कृत' म्हणून सहज खपून जावा. ('वंदे मातरम्'ची जी सर्वपरिचित दोन कडवी आहेत, ती तर सरळसरळ पूर्णपणे संस्कृतात आहेत; इतर कडव्यांशी माझा परिचय नसल्याने त्यांबाबत मला कल्पना नाही म्हणून, अन्यथा, केवळ तेवढ्या दोन कडव्यांच्या आधारावर, केवळ एका बंगाली कादंबरीतून हे गीत घेतले म्हणून त्यास 'बंगाली' म्हणणे निदान मला तरी जिवावर येते.)
हे म्हणजे, पाकिस्तानच्या कौमी तरान्यातील (राष्ट्रगीत) 'तू', 'का' असली एकदोन रूपे उर्दूतील आहेत, म्हणून त्यास 'उर्दू' म्हणावे लागते, तशातलाच प्रकार आहे.
(रवीन्द्रनाथांचेच 'शोनार बांगला' - बांगलादेशचे राष्ट्रगीत - हे मात्र सरळसरळ डौन-टू-अर्थ बंगालीत आहे. गंमत म्हणजे, पाकिस्तानच्या राष्ट्रगीतकर्त्यानेच रचलेले 'आज़ाद कश्मीर'चे - अर्थात पाकव्याप्त कश्मीरच्या दक्षिण भागाचे - 'राष्ट्र'गीत - 'वतन हमारा आज़ाद कश्मीर' - हेही सरळसरळ डौन-टू-अर्थ उर्दूत आहे, हा योगायोग रोचक म्हणावा लागेल.)
खरे आहे..
उपरोल्लेखित केवळ तीनच शब्द अथवा रूपे काढून टाकून त्यांच्या जागी जर योग्य ती संस्कृत रूपे घुसडली, तर प्रस्तुत गीतांश हा पूर्णतः 'संस्कृत' म्हणून सहज खपून जावा.>>
प्रथम लेख वाचल्यावर मी देखील एकदा संपूर्ण राष्ट्रगीत म्हणून पाहिले..
रवीन्द्रनाथांचेच 'शोनार बांगला' - बांगलादेशचे राष्ट्रगीत - हे मात्र सरळसरळ डौन-टू-अर्थ बंगालीत आहे. गंमत म्हणजे, पाकिस्तानच्या राष्ट्रगीतकर्त्यानेच रचलेले 'आज़ाद कश्मीर'चे - अर्थात पाकव्याप्त कश्मीरच्या दक्षिण भागाचे - 'राष्ट्र'गीत - 'वतन हमारा आज़ाद कश्मीर' - हेही सरळसरळ डौन-टू-अर्थ उर्दूत आहे, हा योगायोग रोचक म्हणावा लागेल.>>
रोचक Indeed!
याची गरज आहे का?
माझ्या मते संस्कृत आता लवकरच कालौघात नष्ट होणार आहे. मरणपंथाला टेकलेल्या भाषेचा दिन साजरा करून काय फायदा आहे? माझ्या मते भाषेचा उपयोग म्हणजे आपले विचार दुसर्यापर्यंत पोहोचवणे. जर कालानुसार ती भाषा नष्ट झाली, तर झाली. त्याशिवाय काही अडणार आहे का? त्या जागी दुसरी भाषा संस्कृतची जागा घेईल. बदल हा निसर्गाचा नियम आहे.
माझ्या मते संस्कृत आता लवकरच
माझ्या मते संस्कृत आता लवकरच कालौघात नष्ट होणार आहे. मरणपंथाला टेकलेल्या भाषेचा दिन साजरा करून काय फायदा आहे?
तुम्हीही १०० वर्षांच्या आत मरणार आहात, वाढदिवस कशाला साजरा करता स्वतःचा?
माझ्या मते भाषेचा उपयोग म्हणजे आपले विचार दुसर्यापर्यंत पोहोचवणे. जर कालानुसार ती भाषा नष्ट झाली, तर झाली. त्याशिवाय काही अडणार आहे का? त्या जागी दुसरी भाषा संस्कृतची जागा घेईल. बदल हा निसर्गाचा नियम आहे.
बरं मग? संस्कृतला कृत्रिमपणे जगवा किंवा अज्जीच नष्ट करा असे काही म्हटलेय का लेखात? ही असली मुक्ताफळे उधळून तरी काय फायदा म्हणा.
वैयक्तिक शेरेबाजी टाळली असती तर बरे.
एखादी भाषा बोलणारी एकही व्यक्ती हयात नसली की ती भाषा मॄत समजली जाते. सध्या संस्कृत ही मातॄभाषा म्हणून नवीन कोणी बोलत/शिकत असेल असे वाटत नाही. १९९१ च्या जनगणनेनुसार, ४९७३६ लोक संस्कृत बोलत होते (संदर्भः विकिपीडिया) सध्या काय परिस्थिती आहे, माहित नाही. जे काही थोडेफार लोक बोलीभाषा म्हणून बोलत असतील, ते हळूहळू कमी होणार ही वस्तुस्थिती आहे.
"पियो जी भर आप इसे; यह संस्कृत भाषा मधुशाला ||" असे म्हटले आहे, म्ह्णून मी माझे वैयक्तिक मत दिले आहे. तुमचे मत माझ्या मताशी जुळावेच असा आग्रह नाही. तुमच्या मताचा आदर आहे.
संस्कृतची सद्यस्थिति
सध्या संस्कृत ही मातॄभाषा म्हणून नवीन कोणी बोलत/शिकत असेल असे वाटत नाही> हे विधान बरोबर आहे. पण ह्यावरून ती'मृत'आहे असा तर्कहि काढता येत नाही कारण 'बोलण्याची भाषा' अशा अर्थाने ती कधी 'जिवंत'हि नव्हती. जे जिवंतच नव्हते ते मरणार कसे? (हे विधान मी 'अभिजात' मानल्या जाणार्या उत्तरकालीन संस्कृतच्या संदर्भात करीत आहे. तिच्या वैदिक आणि आर्ष ह्या पूर्वरूपाबाबत कोणासच काही नीट माहीत नाही, यद्यपि मतमतान्तरे बरीच आहेत.)
तेव्हा ही 'अजात' भाषा तेव्हा जे आणि जितपत कार्य करीत होती ते आणि तितपत आजहि करीत आहे आणि येती दोनपाचशे वर्षे तरी हे चालू राहील असे दिसते.
संस्कृतचे आंधळे अभिमानी - ज्यांची संख्याहि बरीच मोठी आहे - बाजूस ठेवले तरी पुष्कळ विचारी लोकांना संस्कृत भाषा आणि तिच्यातील परंपरा टिकून राहाव्यात आणि त्यांचा अभ्यास चालू राहावा असे वाटते. उत्तम प्रकारचे लौकिक यश मिळविलेले माझे अनेक मित्र आपल्या शाळाकॉलेजच्या दिवसात आपल्याव्रर संस्कृत भाषेचे संस्कार झाले नाहीत ह्या उणीवेची आज हळहळ करतांना दिसतात - उदा. माझे मित्र आणि टाइम्सचे भूतपूर्व संपादक आणि वृत्तपत्रकार दिलीप पाडगावकर.
मी स्वतः Professional Sanskritist नाही आणि माझा पोटापाण्याचा व्यवसाय संस्कृतपासून मैलोगणती दूर होता. तरीहि मी शाळाकॉलेजात संस्कृत शिकलो आणि ते मजपाशी अजून उत्तम प्रकारे जिवंत आहे ह्याचा मला फार आनंद होतो.
अर्थातच 'संस्कृत भाषा कालौघात नष्ट होणार आहे' अशा भाकितांची मला आज आवश्यकता दिसत नाही आणि तसा काही पुरावाहि उपलब्ध नाही. 'अवकाशातील एखादी महाप्रचंड वस्तु पृथ्वीवर जर आदळली तर सगळी मानवी संस्कृतीच नष्ट होणार आहे आणि त्याबरोबरच संस्कृतहि नष्ट होणार आहे' इतक्या मर्यादित अर्थाने हे विधान स्वीकारायची माझी तयारी आहे पण तत्पूर्वी जवळच्या भविष्यात तरी संस्कृतला मरण दिसत नाही.
तेव्हा श्राद्धाचे ब्राह्मण सांगण्याची घाई नको!
अगदीच औचित्यपूर्ण!!
. 'अवकाशातील एखादी महाप्रचंड वस्तु पृथ्वीवर जर आदळली तर सगळी मानवी संस्कृतीच नष्ट होणार आहे आणि त्याबरोबरच संस्कृतहि नष्ट होणार आहे' इतक्या मर्यादित अर्थाने हे विधान स्वीकारायची माझी तयारी आहे पण तत्पूर्वी जवळच्या भविष्यात तरी संस्कृतला मरण दिसत नाही.>
+++१ अगदीच औचित्यपूर्ण!
संस्कृत भाषा हा भारतीय साहित्याच्या, तत्त्वज्ञानाच्या व अन्य सांस्कृतिक अंगांना, परंपरांना जोडणारा अति-महत्त्वाचा धागा आहे. तो नष्ट होतोय असे वाटत असेल तर अशा सहृदय सुजाण लोकांनी तो जपावा अशीच धारणा ठेवावी. बाकी कोल्हटकर काकांनी केलेल्या औचित्यपूर्ण मांडणीनंतर काही बोलावे असे उरत नाही!
संस्कृत ही अजून मृत झालेली
संस्कृत ही अजून मृत झालेली नसली तरी त्याच मार्गावर आहे, याबद्दल दुमत नसावे, असे वाटते. संस्कृतला मृत भाषा म्हणण्याऐवजी नामशेष होणारी भाषा म्हणणे सयुक्तिक ठरेल. दोन्हीमध्ये बोलीभाषा संपलेली असेल. आता या दोघांमध्ये फरक काय? तर नामशेष भाषा ही अस्तित्वात राहील फक्त संशोधन अथवा धार्मिक कारणासाठी. (अपवाद: हिब्रू, जवळजवळ नामशेष झालेल्या या भाषेचे उच्चाटन झाले.)
पण नामशेष होऊ घातलेली संस्कृत ही भारतातली पहिलीच किंवा एकमेव भाषा नाही. उदा. आसामची अहोम, अंदमानची अका-बो, अका-कारी या नामशेष झाल्या आहेत.
मग अशी परिस्थिती असताना संस्कृतचेच इतके प्रेम का दिसते? श्री कोल्हटकर यांनी म्हटल्याप्रमाणे काहीजण संस्कृतचे आंधळे अभिमानी असतात. काही जण ही भाषा शिकलेले असतात त्यामुळे त्यांना संस्कृतबद्दल प्रेम वाटते. दुसरा मुद्दा असा की संस्कृत ही "धार्मिक भाषा" आहे, वेद त्यात लिहिले आहेत, धर्मकार्य करण्यासाठी संस्कृत भाषा वापरली जाते.
>> जवळच्या भविष्यात तरी संस्कृतला मरण दिसत नाही.
तसे झाले तर उत्तमच, पण आज न उद्या हे अटळ आहे. मी कोणी भाषातज्ञ नाही, पण गंमत म्हणून हे वाचा.
अवांतर: संगणक क्षेत्रातल्या भाषांची यादी बघा: यापैकी किती आज वापरात आहेत? १०० वर्षानी किती वापरात असतील आणि किती विस्मरणात जातील? मग संस्कृतचे तसे झाले तर काय फरक पडतो?
मला फक्त इतकेच म्हणायचे आहे, की बदल हा निसर्गातला नियम आहे. संस्कृत वाचवण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण संस्कृत ही बोलीभाषा म्हणून संपली तरी हरकत नाही, दुसरी कुठलीतरी भाषा त्या जागी येईलच. मग संस्कृतचे ग्रंथ फक्त म्युझियममध्ये किंवा संशोधन संस्थेतच दिसले तरी काय हरकत आहे?
नवी माहिती संपादितः
>>कारण 'बोलण्याची भाषा' अशा अर्थाने ती कधी 'जिवंत'हि नव्हती. जे जिवंतच नव्हते ते मरणार कसे?
ही माहिती चूक आहे. भारतीय जनगणनेनुसार २००१ मध्ये संस्कृत ही मातृभाषा असणारे १४,१३५ लोक होते. संदर्भ
???
(अपवाद: हिब्रू, जवळजवळ नामशेष झालेल्या या भाषेचे उच्चाटन झाले.)
उच्चाटन????
आपल्याला 'पुनरुत्थान' असे म्हणावयाचे आहे काय? जवळपास पूर्णपणे विरुद्ध अर्थ लागत आहे.
(ऐकीव माहितीप्रमाणे, इस्राएलमध्ये हिब्रूचे प्रयत्नपूर्वक आणि अधिकृतरीत्या पुनरुत्थान होऊन तेथे आज ती राज्यकारभाराचीच नव्हे, पण दैनंदिन व्यवहाराचीही भाषा झालेली आहे, असे कळते. दुर्दैवाने, त्याच्या बदल्यात, मध्य आणि पूर्व युरोपातून आलेल्या ज्यूंची परवापरवापर्यंतची जिवंत, जितीजागती भाषा जी यिडिश, तिचे मात्र उच्चाटन होऊन ती नामशेष होऊ घातलेली आहे, हा दैवदुर्विलास आहे.)
दुसरा मुद्दा असा की संस्कृत ही "धार्मिक भाषा" आहे, वेद त्यात लिहिले आहेत
(पुन्हा) ऐकीव माहितीप्रमाणे, वेदांतील भाषा आणि नामशेष होऊ घातलेली संस्कृत या दोन भाषा एकच नसाव्यात, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अवांतर: संगणक क्षेत्रातल्या भाषांची यादी बघा: यापैकी किती आज वापरात आहेत? १०० वर्षानी किती वापरात असतील आणि किती विस्मरणात जातील? मग संस्कृतचे तसे झाले तर काय फरक पडतो?
ब्याड अनालोजी डिपार्टमेंटात शोभून दिसेलसे उदाहरण. यातील बहुतांश भाषा ज्यांवर वापरल्या जात होत्या, तशा प्रकारांचे नि प्रणालींचे कितीसे संगणक आज हयात अथवा वापरात आहेत? मानवी आयुर्मान तितके कमी होऊन बदल्यात मानवी उत्क्रांती तितक्या झपाट्याने जेव्हा होऊ लागेल, त्या दिवशी या मुदद्यावर या उदाहरणावरून चर्चा करू. तोवर अशी चर्चा फिज़ूल आहे.
मला फक्त इतकेच म्हणायचे आहे, की बदल हा निसर्गातला नियम आहे. संस्कृत वाचवण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण संस्कृत ही बोलीभाषा म्हणून संपली तरी हरकत नाही, दुसरी कुठलीतरी भाषा त्या जागी येईलच.
संस्कृत ही बोलीभाषा म्हणून संपल्यातच जमा आहे. 'बोलीभाषा' म्हणून ती वापरण्याचे जे थोडेफार प्रयत्न होतात, ते अॅट बेष्ट कृत्रिम म्हणता येतील. अन्य रीत्या तिचा वापर मर्यादित स्वरूपात होत असेलही.
मग संस्कृतचे ग्रंथ फक्त म्युझियममध्ये किंवा संशोधन संस्थेतच दिसले तरी काय हरकत आहे?
उलटपक्षी, तिचे आवर्जून संवर्धन करावे, त्याकरिता प्रयत्न करावेत, असे जर कोणाला वाटलेच, तर आपल्याला नेमकी काय हरकत आहे?
या निमित्ताने अवांतर परंतु
या निमित्ताने अवांतर परंतु एका एव्हरग्रीन विषयाला तोंड फोडतो.
सध्या संस्कृत ही मातॄभाषा म्हणून नवीन कोणी बोलत/शिकत असेल असे वाटत नाही> हे विधान बरोबर आहे. पण ह्यावरून ती'मृत'आहे असा तर्कहि काढता येत नाही कारण 'बोलण्याची भाषा' अशा अर्थाने ती कधी 'जिवंत'हि नव्हती. जे जिवंतच नव्हते ते मरणार कसे? (हे विधान मी 'अभिजात' मानल्या जाणार्या उत्तरकालीन संस्कृतच्या संदर्भात करीत आहे. तिच्या वैदिक आणि आर्ष ह्या पूर्वरूपाबाबत कोणासच काही नीट माहीत नाही, यद्यपि मतमतान्तरे बरीच आहेत.)
अभिजात संस्कृत ही कधीच बोलीभाषा नव्हती हे नक्की का? अभिजात संस्कृतातली काव्यनिर्मिती अन नाटकनिर्मिती पाहता काही अंशी तरी नक्कीच बोलीभाषा असावी असे वाटते. याबद्दल नेमके काही वाचायला आवडेल.
गल्लत?
बॅटमॅन सुद्धा संस्कृत काव्य लिहितात. पण म्हणजे संस्कृत ही बॅटमॅन यांची बोलीभाषा नसणार.
'मातृभाषा' आणि 'बोलीभाषा' यांत गल्लत होत आहे काय?
१. बंबैया हिंदी मुंबईच्या रस्त्यांतील आम जनता बोलते. मीही बोलतो कधीकधी.
मुंबईच्या रस्त्यातील पब्लिकपैकी किती जणांची मातृभाषा बंबैया हिंदी असेल याबाबत निदान मी तरी साशंक आहे. निदान माझी तरी नाही.
पण म्हणजे बंबैया हिंदी ही बोलीभाषा नाही काय?
२. बंबैया हिंदी सोडा. ती काव्यात असते तसली, झालेच तर रेडियो पाकिस्तानच्या बातमीपत्रांत वापरतात तसली एक-अक्षर-कळेल-तर-शपथ-छाप नको तितकी हायफंडू उर्दू, झालेच तर भारतात सरकारी कामकाजांत अथवा सरकारी पाट्यांवर वापरतात तसल्या छापाची हिंदी (रेल्वेस्टेशनांवरील नळाच्या पाटीवर 'ठंडा पानी'च्या ऐवजी उगाच 'शीतल जल', किंवा आगगाडीच्या संडासातील 'पदचलित' टोंटी वगैरे. किंवा, आगगाडीच्या डब्याला संभाषणात 'यान' वगैरे सहज म्हणून जाणारी जिवंत व्यक्ती निदान मी तरी पाहिलेली नाही; हटकून सगळे 'डिब्बा'च म्हणतात. अर्थात माझा लोकसंपर्क फार कमी आहे, परंतु तरीही अशी व्यक्ती अस्तित्वात असण्याबाबत निदान मी तरी साशंक आहे. सरकारी हिंदीत मात्र सगळी शयन-, कुर्सी- नाहीतर वातानुकूल- 'याने' असतात.) या भाषा प्रत्यक्षात मातृभाषा म्हणून नेमके कोण किंवा किती जण वापरत असतील, याबद्दल निदान मला तरी शंका आहे.
हो, या भाषांमध्ये काव्ये होतात, झालेच तर सरकारी पाट्या नि रेडियोवरची बातमीपत्रेसुद्धा निघतात, परंतु पब्लिक तसली भाषा बोलत नाही. पब्लिकच्या तोंडची हिंदीची काय, उर्दूची काय, आवृत्ती वेगळी, डौन-टू-अर्थ असते. सबब, पब्लिकची ती 'मातृभाषा' खचितच म्हणता येणार नाही.
पण म्हणून काय हिंदी, उर्दू या बोलीभाषा नाहीत?
मातृभाषा' आणि 'बोलीभाषा'
>>मातृभाषा' आणि 'बोलीभाषा' यांत गल्लत होत आहे काय?
नाही.... बॅट्मॅन यांनी बोलीभाषाच म्हटले आहे. बॅटमॅन २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात संस्कृत काव्यरचना केली होती त्याअर्थी संस्कृत ही एकवीसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही प्रमाणात तरी बोलीभाषा असणार असा निष्कर्ष आणखी हजार वर्षांनी "बॅटमॅन१०००" यांनी काढणे उचित होणार नाही असे म्हणणे आहे.
बॅटमॅन २१व्या शतकाच्या
बॅटमॅन २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात संस्कृत काव्यरचना केली होती त्याअर्थी संस्कृत ही एकवीसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही प्रमाणात तरी बोलीभाषा असणार असा निष्कर्ष आणखी हजार वर्षांनी "बॅटमॅन१०००" यांनी काढणे उचित होणार नाही असे म्हणणे आहे.
तुम्ही म्हणताहात ते योग्य आहे त्याचे कारण असे की बॅटमॅन१००० ला २१ व्या शतकातील अन्य रेकॉर्ड्स पाहता संस्कृतचे इंग्रजी-हिंदी-मराठी इ. च्या तुलनेत नगण्य प्रमाण जाणवेल. पण हा निकष कालिदास इ. च्या काळाला लावला तर मी म्हणतो ते योग्य ठरेल असे वाटते.
मान्यच, पण हा आत्ताचा काळ
मान्यच, पण हा आत्ताचा काळ झाला. आत्ताच्या काळात संस्कृतात साहित्यनिर्मिती करणारे आधीच्या तुलनेत लै थोडे लोक आहेत. जेव्हा बरेच लोक होते आणि ते पापुलर डिमांडमुळे संस्कृत नाटके लिहीत तेव्हाच्या काळापुरती तरी संस्कृत बोलीभाषा असावी असे वाटते-चूभूद्याघ्या.
गरज नसली तरी केलेलं चांगलंच
संस्कृत ही पहिली भाषा म्हणून शिकणारे लोक जगात खूपच कमी असतील (किंवा नसतीलच) हे मान्य, पण भाषा नष्ट होण्या न होण्याशी त्याचा अर्थाअर्थी संबंध नाही.
उदाहरणार्थ, लॅटिनबद्दल सर्वसाधारणपणे हीच परिस्थिती आहे. (म्हणजे ती बहुतेक कुणाची पहिली भाषा नाही.) पण युरोपअमेरिकेत वाढलेले अनेक लोक शाळाकॉलेजांत लॅटिन शिकतात अाणि त्यातल्या काहींना त्यात खूप रस उत्पन्न होतो. लॅटिन लिहितावाचताबोलता येते अशा लोकांचे क्लब्ज असतात, कॉन्फरन्सेस असतात, मासिकं असतात, हे लोक नव्या कविता किंवा नवी नाटकं लॅटिनमध्ये लिहितात, इंग्रजी कवितांची लॅटिनमध्ये भाषांतरं करतात इत्यादि इत्यादि. त्या अर्थाने लॅटिन चांगली दणदणीत जिवंत अाहे, अाणि इतक्यात मरेल असं मुळीच वाटत नाही. हे सगळं अगदी तंतोतंत एस्परँटोलाही लागू पडेल. या भाषा एका अर्थाने 'छंद' म्हणून जोपासल्या जातात हे मान्य, पण त्याने काही बिघडत नाही. इथे 'कृत्रिमपणा' वगैरे अाक्षेपांना काही अर्थ नाही. बुद्धिबळ, भरतनाट्यम्, कशिदा काढणं, हे सगळं कृत्रिमच अाहे, पण म्हणून त्याचा अभ्यास करू नये असं कोणी म्हणत नाही.
अर्थात हे सगळं करणारे लोक जगाच्या लोकसंख्येच्या मानाने खूपच कमी अाहेत. पण एखाद्या भाषेत (किंवा कलाप्रकारात वगैरे) किती जिवंतपणा अाहे हे त्यात भाग घेणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर, कष्टाळूपणावर, उत्साहावर, प्रयोगशीलतेवर इत्यादि अवलंबून असतं; नुसत्या संख्येवर नाही. (इटलीची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी अाहे, पण 'इटालियन सिनेमा' अाणि 'मराठी सिनेमा' यांच्या प्रगल्भतेची तुलना केल्यास निकाल मराठीच्या बाजूने जाणार नाही.)
अाता लॅटिन-एस्परॅँटोसारखं सांस्कृतिक (!) जीवन संस्कृतमध्ये अाहे का, किंवा असावं का, किंवा अाणता येईल का हे वेगळे प्रश्न. ज्यांना संस्कृतमध्ये गती अाहे त्यांनीच ते सोडवणं श्रेयस्कर.
संस्कृतदिनी या विषयाला तोंड
संस्कृतदिनी या विषयाला तोंड फोडणं कितपत औचित्यपूर्ण आहे याबद्दल मलाही शंका आहे. पण वर ऋषिकेशनं सूचित केलेल्या अंतर्विरोधामुळे लिहितेच. या धाग्यावर हा विषय लिहिणं उचित नसल्यास, प्रतिसाद जरूर उडवावा अगर हलवावा.
***
माझा संस्कृतवर काही राग नाही, तसंच ती बोलीभाषा होती का नव्हती, ती जिवंत आहे का मृत आहे, ती टिकून राहावी म्हणून प्रयत्न व्हावेत की न व्हावेत... याविषयी मला काहीच मत नाही. तिचा मराठीवर प्रभाव आहे हे नि:संशय. ठीक. पण मराठीच्या प्रमाणलेखनाच्या नियमांत संस्कृतला जे विशेष महत्त्वाचं स्थान बहाल केलं आहे, त्याबद्दल मला तीव्र आक्षेप आहे.
प्रमाणलेखनाचे नियम पाळावेत की न पाळावेत, उच्चारानुसार असावेत की नसावेत, त्यावर उच्चवर्णीय-सवर्ण-शिष्ट भाषेचा प्रभाव किती आणि का... या प्रश्नांमध्येही शिरण्यात मला तूर्तास रस नाही. मात्र संस्कृतचं ऋण, तिच्या संवर्धनाची आणि जपणुकीची गरज मान्य करूनही - एखाद्या मराठी भाषकाला अचूक मराठी प्रमाणलेखन करायचं झाल्यास, अमुक एक शब्द संस्कृत आहे की नाही, तो जसाच्या तसा मराठीत आला आहे की नाही, तो कसा लिहिला जातो -या गोष्टींचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे, हे मला तद्दन आचरट आणि मानहानीकारक वाटतं.
तसंच, ज्या वर्गाला केवळ आपल्या सामाजिक स्थानामुळे संस्कृतची तोंडओळख आहे, तो वगळता इतरांना हे सामाजिकदृष्ट्याही अन्यायकारक आहे, असं मला वाटतं.
याबद्दल इथल्या जाणकारांची मतं वाचण्याची मला उत्सुकता आहे.
प्रतिवाद
एखाद्या मराठी भाषकाला अचूक मराठी प्रमाणलेखन करायचं झाल्यास, अमुक एक शब्द संस्कृत आहे की नाही, तो जसाच्या तसा मराठीत आला आहे की नाही, तो कसा लिहिला जातो -या गोष्टींचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे, हे मला तद्दन आचरट आणि मानहानीकारक वाटतं.
ठीक आहे. याला दुसरा तर्कशुद्ध पर्याय म्हणजे, मराठीत परंपरेने जसे प्रमाणलेखन केले जात आले, त्यानुसार लेखन. (परंपरा कोणत्या काळापासूनची, तो काळातला बिंदू आर्बिट्ररी ठेवू. किंवा, तुम्ही हवा तो ठरवा. थोडक्यात, हे 'पारंपरिक' लेखन हे दुसर्या एखाद्या नावाखाली संस्कृतानुकारी असेलच, असे नाही.)
या पर्यायात, संस्कृतातून एखादा शब्द मराठीत जसाच्या तसा आला आहे किंवा नाही, आणि तो संस्कृतात कसा लिहिला जातो, याचे ज्ञान लिहिणारास आवश्यक राहणार नाही, हे खरेच. परंतु त्याऐवजी, काळाच्या एखाद्या आर्बिट्ररी बिंदूत तो शब्द (१) अस्तित्वात होता काय, नि (२) तेव्हा तो कसा लिहिला जात होता, याचे ज्ञान असणे आवश्यक राहील.
म्हणजे काय, एकूण एकच.
तिसरा 'तर्कशुद्ध' पर्याय म्हणजे, परंपरा वगैरे गेल्या खड्ड्यात, आज भाषा जशी प्रचलित आहे, तिच्याशी साधर्म्य राखणारे लेखन. वरकरणी हा पर्याय आकर्षक वाटतो खरा, परंतु प्रत्यक्षात तो अशक्यकोटीतील आहे, हे किंचित विचाराअंती सहज लक्षात येईल. कारण, भाषा आज जशी 'प्रचलित' आहे, म्हणजे नेमके काय? आजमितीस ठिकठिकाणी बोलल्या जाणार्या भाषांची सरासरी? हे इतके डायनॅमिक प्रकरण आहे, की 'प्रमाण' असे काही लेखन याच्या मंथनातून बाहेर काढायचे असेल, तर ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. सामान्य माणसाला पुढच्या दहा मिनिटांत काहीतरी तात्कालिक लिहायचे आहे, मग भले ते प्रेमपत्र१ असो, 'वाचकांचा पत्रव्यवहार' असो, अग्रलेख असो, एखादा प्रतिसाद असो, नाही तर 'गृह्यसंस्कार' असो. त्याला महाराष्ट्रात, झालेच तर तमाम जगात जेथेजेथे म्हणून मराठी माणूस पोहोचला आहे अशा सर्व ठिकाणी (किंवदंतेनुसार२ अशी ठिकाणे विरळा असावीत.) आजमितीस मराठी भाषा (किंवा किमानपक्षी त्याच्या तात्कालिक लिखाणात येणारे शब्द) कशी बोलली जाते, त्याची सरासरी काय, याचा हिशेब करत बसायला वेळ आहे काय?
हं, आता असा हिशेब सामान्य माणसाने स्वतः करण्याऐवजी, या कामासाठी सरकारी समित्या नेमता येतीलही. समित्यांना नाहीतरी अशा उपक्रमांवर वेळ३ घालवायला आवडतेच. मग अशा समित्या रोज पेपरांत (किंवा, आजच्या जमान्यात अपटूडेट राहायचे तर, आंतरजालावर) 'आजच्या बाजारभावां'च्या धर्तीवर 'आजचे प्रमाणलेखन' प्रसिद्ध करू शकतील. अधिकच क्रिएटिव बनायचे झाले, तर त्या शेअरच्या सायटींवर कसे वीस मिनिटांपूर्वीचे 'क्वोट' दाखवतात, तसे वेगवेगळ्या शब्दांच्या प्रमाणलेखनाच्या स्थितीचे वीस मिनिटांपूर्वीचे 'क्वोट्स' 'ऑन डिमांड' देऊ शकतील.
पण म्हणजे, साधे चार ओळींचे पत्र जरी लिहायचे झाले, तरी प्रमाणलेखनाची तात्कालिक स्थिती काय आहे, हे तपासणे आले. अगदी वीस मिनिटांच्या वारंवारितेवर जरी स्थिती अपडेट करायची नाही म्हटली, समजा, दर तीन महिन्यांनी मागच्या तीन महिन्यांची सरासरी प्रसिद्ध करायची म्हटली४, तरीही स्वतःच्या प्रमाणलेखनाच्या पूर्वग्रहणप्राप्त ज्ञानावर वा अनुभवावर अवलंबून राहता न येता, दर वेळेस नव्याने प्रसिद्ध आवृत्तीत संदर्भ तपासावा लागणार. म्हणजे, माहिती करून घेण्याच्या गोष्टींची कटकट कमी होण्याऐवजी वाढली. अशाने साधे चार ओळींचे पत्र लिहिणे अशक्य व्हावे. शिवाय, आजचे प्रमाणलेखन हे तीन महिन्यांनी कालबाह्य होऊन, आज लिहिलेला मजकूर तीन महिन्यांनी बाद (अथवा अप्रमाण, किंवा 'चूक') ठरण्याची शक्यताही वाढली.
म्हणजे, कमीत कमी कटकटींत 'प्रमाण' लेखन करायचे म्हटले, तर कोठल्यातरी आर्बिट्ररी - परंतु बर्यापैकी अचल (मराठीत: 'फिक्स्ड') - अशा प्रमाणलेखनाच्या नियमांवर अवलंबून राहणे आले. आता, नियमानुसार जायचे, म्हणजे तो नियम मुळात काय आहे, हे माहीत करून घेण्यास पर्याय नाही. मग भले ही तो नियम म्हणजे 'हा शब्द संस्कृतातून जशाच्या तसा आला, तेथे तो असाअसा लिहिला जात असे, म्हणून आपण तसातसा लिहायचा; हा दुसरा शब्द संस्कृतातून अपभ्रंश होऊन आला, म्हणून तो तमक्यातमक्या पद्धतीने लिहायचा, नि तिसरा शब्द फारसीतून आला, म्हणून तो फलाण्याढिकाण्या पद्धतीने लिहायचा' असा का असेना. त्याला इलाज नाही.
तळटीपा:
१ प्रेमपत्रात प्रमाणलेखनास जागा काय, अशी शंका येथे उपस्थित केली जाऊ शकेल, परंतु ती फिज़ूल आहे, हे अत्यंत नम्रपणे नमूद करू इच्छितो. आम्हांस जर कोणी कधी प्रेमपत्र लिहिले असतेच१अ, आणि त्यात जर का प्रमाणलेखनाच्या, व्याकरणाच्या, झालेच तर इंग्रजी स्पेलिंगाच्या (म्हणजे प्रमाणलेखनच की हो!) भाराभर चुका आढळल्या असत्या, तर केवळ त्या कारणास्तव बाकी कशाचाही विचार न करता आम्ही ते प्रेम समूळ झिडकारले असते. शिवाय, त्या पत्राची खिल्ली उडवली असती, ती वेगळीच. तर ते एक असो.
१अ काश!
२ पक्षी: 'ते भय्ये नि मद्रासी पहा, आपले बस्तान बसवायला वाटेल तिथे जायला तयार असतात. नाहीतर आपल्या मराठी माणसास आपले गिरगांव, दादर नाहीतर सदाशिव पेठ सोडून कोठेही जायला नको असते,' हे सामान्य गृहीतक.
३ (पैशाची बात मुद्दामच केलेली नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
४ आमचे यू.एस. ट्रेझरी डिपार्टमेंट कसे दर तीन महिन्यांनी डॉलरच्या संदर्भात विविध चलनांचा गेल्या तीन महिन्यांचा सरासरी बाजारभाव प्रसिद्ध करते, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हिशेबांकरिता ते प्रमाण मानले जाते, तद्वत.
मराठीत असेही शब्द आहेत जे
मराठीत असेही शब्द आहेत जे कुठून आले आणि त्यांची मूळ रूपं काय होती / आहेत, ते आजमितीला ठरवणं सर्वसामान्य वापरकर्त्याला तरी अशक्य आहे.
प्रमाणलेखनाच्या आत्ताच्या नियमांमध्ये या शब्दांच्या लेखनाची व्यवस्था आहे की नाही? तर आहे. उदाहरणार्थः भाकरी. हा शब्द तत्सम (संस्कृतातून तसाच्या तसा आलेला) नाही. तद्भव शब्दाचा अन्त्य इकार वा उकार दीर्घ लिहायचा, असा नियम या शब्दाला आहेच की नाही? किंवा विहीर. अन्त्य अक्षर र्हस्व असल्यास उपान्त्य अक्षराचा इकार वा उकार दीर्घ लिहायचा अशा नियमात तो बसतो की नाही?
म्हणजे मराठीत एखादा शब्द परंपरेनं कसा लिहिला जात होता किंवा उच्चारानुसारी तूर्तास काय प्रचलित आहे किंवा मराठीच्या लेखनासाठी नक्की कुठला प्रारंभबिंदू धरायचा... यांपैकी कशाचाही विचार न करता, आपण लेखनाचे नियम ठरवून ते पाळतोही आहोत.
माझा प्रश्न असा आहे, या नियमांना संस्कृतचा अपवाद करावा (उदा. कवी हा शब्द समासात प्रथमपदी आल्यावर र्हस्वान्त लिहायचा किंवा व्यथित या शब्दात अन्त्य अक्षर र्हस्व असतानाही थि र्हस्व लिहायचा), अशी संस्कृत कोण लागून गेली? बरं, ती असेलही तिच्या घरी थोर भाषा, सगळ्या भाषा थोरच असतात. पण मराठी भाषकानं मराठी नीट लिहिता येण्यासाठी संस्कृत जाणून घ्यावं ही जबरदस्ती का? या हिशोबानं कुठल्याही भाषेच्या वापरकर्त्याला भाषेतल्या प्रत्येक शब्दाचा इतिहास-भूगोल जाणून त्याबरहुकून लेखन करावं लागेल. हे किती गैरसोईचं आहे!
शब्द मराठीत आला, तो मराठी झाला, मराठीच्या नियमाप्रमाणे त्याचं लेखन व्हावं - असा साधा-सोपा नियम करणं इतकं अवघड आहे का?
बाकी ठीक, पण संस्कृत नियम अन
बाकी ठीक, पण संस्कृत नियम अन मराठी नियम नक्की किती ठिकाणी वेगळे, अपोझिंग आहेत हे पाहिल्यास नियमांचे लेबल कुठले हा प्रश्न इर्रिलेव्हंट ठरेल असे वाटते. तस्मात "संस्कृतच्या नियमाप्रमाणे" ही परिभाषा फक्त काढून आधीचेच नियम दडपून पुढे चालवले तरी फरक विशेष पडणार नाही.
जिथे जिथे र्हस्वदीर्घाचा
जिथे जिथे र्हस्वदीर्घाचा संबंध येतो, तिथे तिथे मराठी नि संस्कृताच्या नियमांत फरक आहे.
बरं, संस्कृतातला नियम मराठीच्या बरोब्बर विरोधी आहे, इतकंच आहे? तसंही नाही. संस्कृतात 'गणित'साठी वेगळा नियम आणि 'न्यायाधीश'साठी वेगळा नियम.
त्यामुळे परिभाषा काढून पुरणार नाही, भेदभावही काढावा लागेल.
<<या नियमांना संस्कृतचा अपवाद
या नियमांना संस्कृतचा अपवाद करावा (उदा. कवी हा शब्द समासात प्रथमपदी आल्यावर र्हस्वान्त लिहायचा किंवा व्यथित या शब्दात अन्त्य अक्षर र्हस्व असतानाही थि र्हस्व लिहायचा), अशी संस्कृत कोण लागून गेली>>
याचे ऐतिहासिक विश्लेषण व्हायला हवे.
मुळात प्राकृत भाषासमुहाचे प्रमाणीकरण विविध व्याकरण-संहितांद्वारे होत होते. चांद्र-व्याकरण, ऐन्द्र व्याकरण, शाकल्याचे व्याकरण-शाकटायानाचे व्याकरण वगैरे. त्यातले (उपलब्ध व्याकरणापैकी बहुधा कालदृष्ट्या अंतिम)असे पाणिनीचे व्याकरण हे अधिक काटेकोर असल्याने ते संमत ठरले. आणि त्यानुसार व्यवहृत होणारी प्रमाण भाषा ही संस्कृत या नावाने ओळखली जाऊ लागली.
संस्कृत व प्राकृत या भाषा एकमेकांहून वेगळ्या आहेत असे भासवले गेले. वास्तविक पाहाता प्राकृत भाषा मूळ. प्राक्+कृत! पण व्याकरणनिबद्ध आणि शास्त्रशुद्ध संस्कृतला मिळालेली प्रतिष्ठा इतक्या मोठ्या प्रमाणावर मान्यता पावली की तिला वेगळी 'भाषा' मानू लागले. ज्ञानभाषा म्हणून प्रमाणीकृत भाषेचा वापर सुरु झाला! जैन-बौद्धादि परंपरानीदेखील तिचा वापर सुरु केला.
वास्तविकत: प्राकृत बोलींचे प्रमाणीकृत व्हर्जन म्हणून संस्कृतकडे पाहायला हवं! जसे, पुण्यातील किंवा मुंबईतील प्रमाण नागर मराठीतील नाटक हे खेड्यातील ग्रामीण ढंगाच्या मराठीतून व्यवहार करणाऱ्याला समजावे यात आश्चर्य नाही, तसे लोकसत्तेतील या लेखात म्हटल्याप्रमाणे त्या 'प्रमाणीकृत भाषेतून नाट्यप्रयोग सादर' होत असतील तर ते सामान्य जनांना कळणे अवघड नाहीच.
उदा.
१) नागर प्रमाण मराठी: तो गावाला गेला.
२) ग्रामीण मराठी: त्यो गावाला गेला.
अगदी तसेच
३)'त्याला' सर्वनामाच्या वापरासाठी अभिजात संस्कृतातले 'तं' हे रूप
४)ऋग्वेदात 'त्यं' असे वापरले जाते
पण हे नॉर्म्स एका विशिष्ट काळात रिजिड झालेले दिसतात आणि प्रमाणीकृत भाषा वापरणे स्त्री-शूद्रादिंना निषिद्ध ठरवली गेली हे नाटकांतून दिसतंच! तिच्याविषयीचे हे असे वर्गीय नॉर्म्स रिजिड झाल्यामुळे तिला वेगळी भाषा म्हणून गणले जाऊ लागले. तशी पब्लिक मेमरी तयार केली गेली/झाली. अर्थात्, तरीही वर्गीय अभिसरण आणि या बोली-भाषांच्या वापरातील विधिनिषेध याचा विचार अधिक व्हायला हवा. शेल्डन पोलॉक, वगैरे लोकांनी यावर काम केलं आहे ! मराठीत आमच्या डॉ. मो. गो. धडफळे सरांनीही यावर काही लिखाण केलं आहे!
गमतीचा भाग असा की, पुढे या प्राकृत 'भाषां'नी देखील त्या प्रभावाखाली आपापली व्याकरणे पाणिनीय पद्धतीने तयार केली. पण मुळातच त्या बोली भाषा असल्याने धार्मिक वर्तुळातील रचनेपुरता त्या व्याकरणाचा प्रभाव काही काळ टिकला. आणि नाहीसा झाला. मग उनाड, अनावृततेची लाज न बाळगणाऱ्या, आपल्या भावना बोल्डपणे व्यक्त करणाऱ्या, शुद्धलेखनादिना न जुमानणाऱ्या अवधी-मैथिली-ब्रज या अल्लड बोलींचा वापर जो व्यवहारात होता तो भक्ती चळवळीतून अधिक ठळक दिसून येऊ लागला.
लोकमानसाला संतचळवळीने वाचा फोडायला शिकवल्यावर धर्म-राजसत्ता वगैरेच्या ठेकेदारांच्या 'संस्कृत'ची लोकप्रियता तिच्यातील तर्ककर्कश्श घट-पटादि चर्चा आणि एकाच पाणिनीय सूत्रावर २-२ महिने चालणाऱ्या वादसभांपुरतीच आणि त्यांच्या मर्यादित वर्तुळापुरतीच राहिली आणि कालांतराने त्यांनीही सहज प्राकृतीकरण स्वीकारले.
आता मेघना भुस्कुटे म्हणतात तसे संस्कृत कोण लागून गेली>> विषयी बोलायचं तर असं की, तिचे काटेकोर व शास्त्रशुद्ध व्याकरण ही या भाषेची शक्ती होती. तिचे हे शास्त्रशुद्धत्व अनेकांनी गौरविले आहे. ते तसे सन्मान्य आहेच. पण हीच कठोर नियमचौकट तिच्या क्षयाचेही कारण ठरली. ते कठोर नियम पाळणे व समजणे अवघड होऊन बसले म्हणून संस्कृतचा वापर कमी झाला. मराठी शुद्धलेखनासंदर्भात त्या (मराठी शुद्धलेखन) परंपरेचा इतिहास बघायला हवा. ज्ञानव्यवहार करणाऱ्या समुहावर त्याच भाषेचा प्रभाव असल्याने तिला केंद्रीभूत ठरवून मराठी व अन्य हिंद्यादि भाषांचेही व्याकरण लिहिले गेले. त्यात नियमांची शिथिलता, सुलभीकरण हे कालौघात होत आहे.. होत राहिल. दिनकर गांगलांसारखी मंडळी तुम्ही म्हणता साधारण तशाच भूमिकेसाठी अत्याग्रही आहेत. ते होत राहीलच. तशा सुलभीकरणासाठी मराठी भाषिक म्हणून माझीही काही हरक़त नाही.
पण तो दोष संस्कृतला देऊन चालणार नाही. भाषांच्या विकसनाचे डायनॅमिझम लक्षात घेता हे असे होत राहणारच! त्यामुळे संस्कृतविषयीचा अत्याग्रह इथे अभिप्रेत नाही. केवळ संस्कृत हा भारताचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे स्मरण म्हणून संस्कृतविषयी आस्था असणारे, तिचे महत्त्व जाणणारे लोक हा संस्कृत दिन साजरा करतात. तो ज्यांना आस्था आहे त्यांनी साजरा करावा आणि ज्यांना करायचा नाही त्यांनी करू नये. तस्मात्, अधिकार संविधानाने उभयपक्षांना दिले आहेत. त्यामुळे 'उपाशी बोका' महोदयांनी मांडलेल्या मताशी मी सहमत नसलो तरी त्यांना त्यांचे मत मांडायचा अधिकार आहे. अन् त्याचा प्रतिवाद करण्याचा अधिकार प्रतिवाद्यांनाही आहे.
वरील प्रतिक्रियेसंदर्भात काही
वरील प्रतिक्रियेसंदर्भात काही दुरुस्त्या व खुलासे:
१) ऋग्वेदात 'त्यं' असे वापरले जाते: उदा: प्रति त्यं चारुमध्वरं गोपीथाय प्र हूयसे । मरुद्भिरग्न आ गहि॥ ऋग्वेद १.१९.१
२)प्रमाणीकृत भाषा वापरणे स्त्री-शूद्रादिंना निषिद्ध ठरवली गेली हे नाटकांतून दिसतंच! : नाटकांतून आणि अन्य जॉन्राज्-मधूनही दिसतं!
३) दिनकर गांगलांसारखी मंडळी तुम्ही म्हणता साधारण तशाच भूमिकेसाठी अत्याग्रही आहेत. : मला शुभानन गांगल म्हणायचं होतं! ;)
४)शुद्धलेखनादिना न जुमानणाऱ्या अवधी-मैथिली-ब्रज या अल्लड बोलींचा वापर जो व्यवहारात होता तो भक्ती चळवळीतून अधिक ठळक दिसून येऊ लागला. :
तसेच काव्यशास्त्रपर ग्रंथातूनदेखील या बोलींचा वापर दिसून येऊ लागला. सुरुवातीच्या माहाराष्ट्री अपभ्रंशादि बोलीची जागा अवधी-मैथिली-ब्रज वगैरे बोलींनी घेतली!
सहमत, पुरवणी
उत्तम प्रतिसाद! अतिशय आवडला.
याला एकच सहमतीयुक्त पुरवणी जोडतो:
संस्कृत हा भारताचा अमूल्य ठेवा आहे.
यावर अजिबातच आक्षेप नाही अन् हा ठेवा अमूल्य आहे यात जराही संदेह नाही. फक्त,
तिचे काटेकोर व शास्त्रशुद्ध व्याकरण ही या भाषेची शक्ती होती. तिचे हे शास्त्रशुद्धत्व अनेकांनी गौरविले आहे. ते तसे सन्मान्य आहेच. पण हीच कठोर नियमचौकट तिच्या क्षयाचेही कारण ठरली. ते कठोर नियम पाळणे व समजणे अवघड होऊन बसले म्हणून संस्कृतचा वापर कमी झाला.
याच्याशी सहमती नोंदवून असे म्हणावेसे वाटते, की हे माहित असतानाही मराठीला कठोर नियमांच्या कचाट्यात अडकवताना किंवा त्याचा अत्याग्रह धरताना हा बोध लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे एखादे लेखन प्रमाण आहे की नाही यावरून ती भाषा लिहिणा-बोलणार्याचे वर्गीकरण "श्रेष्ठ-कनिष्ठ" असे होऊ नये याच्याशीदेखील तुम्ही सहमत असाल असे वाटते.
प्रमाण लेखनाचे नियम असणे हे चांगले आहेच, फक्त ते काळाप्रमाणे बदलते असावे, त्याचे सार्थ सुलभीकरण चालु असावे असे माझेही मत आहे.
भारीच माहितीपूर्ण
भारीच माहितीपूर्ण प्रतिसाद.
बादवे - शुभानन गांगल यांच्या मते काहीतरी 'शून्य नियम' व्हायला हवेत (म्हणजे बहुतेक कुणीही कसंही लिहावं! किंवा काय ते त्यांनाच ठाऊक!). तसं काही माझं म्हणणं नाही. नियम सोपे असावेत आणि ते पाळण्याकरता संस्कृतच्या ज्ञानाची आवश्यकता नसावी, असं माझं म्हणणं.
बाकी - संस्कृतला दोष नाहीच. दोष आपल्या भाषेला साजेसे आणि सोईस्कर नियम न करणार्या नि त्यामुळे लेखनात काहीही चालवून घेणार्या आपल्याला.
म्हटलं तर अवांतर, म्हटलं तर -
आज ही कविता वाचनात आली नि त्या संदर्भात हा वाद आठवला. कविता देण्याचा मोह अनावरः
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
कबूलाय
तिच्या पोटातच आपण वाढलो
मानतो मी
पण बाहेर आलो
की नाळ तोडावीच लागते
की नाही?
जन्मभर ती
कमरेला गुंडाळून
हिंडायला तर येत नाही?
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
तिचंच दूध आपण प्यालो
आनंदानं
आणि बिनतक्रार
त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्सिनचं प्रमाण
कमीजास्त असलं
तरी गोड मानून घेतलं आपण
जन्मभर ते दूध
पुरणार नाही
असं वाटलंवतं कुणाला?
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
तिच्याच मांडीवर आपण खेळलो
हागलो मुतलो
मार खाल्ला तिचा
हट्ट केले तिच्यापाशी
रुसलो तिच्यावर
झोपलो तिच्या कुशीत
ती कूस पण एक दिवस
सोडावी लागेल
असंही वाटलंवतं कधी?
वेगळ्याच बिछान्यावर आपल्याला
झोपावं लागेल एक दिवस
भलत्याच एकाद्या बाईच्या कुशीत
असं स्वप्नात तरी आलंवतं कधी?
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
पण आई असली प्रत्यक्ष
म्हणजे सख्खी अगदी
सावत्र बिवत्र नाही
तरी ती मेली
की लगेच तिला स्मशानात नेऊन
आपण जाळतोच की
आजारी असली
तरी शुश्रूषा करतो तिची
पाय दुखत असले तिचे
तर चेपतो पाय
पण मेली
की लवकरात लवकर तिला
घराबाहेर कशी काढायची
हा एकच विचार
सगळ्यांच्या डोक्यात असतो
मयत किती वाजता निघणार
आणि कुठून
हाच खरा सवाल असतो
अमरावतीच्या आतेबहिणीला
कळवलं की नाही
मामा येस्तंवर थांबायचं की नाही
खांद्यावर न्यायचं
की शववाहिनी बोलवायची
की हातगाडी आणायची
डेथ सर्टिफिकेट आणलं की नाही
वर्तमानपत्रात बातमी दिली की नाही
मजकूर कोण लिहिणाराय
अग्निसंस्कार करायचे तिच्यावर
विधिपूर्वक
की नुसतीच विजेच्या भट्टीत घालायची
भटजीला किती दक्षिणा द्यायची
फोटो एनलार्ज करायला दिला की नाही
किती कॉपीज सांगितल्या
जिथं ती मेली
तिथं तेवत ठेवलेल्या दिव्यात पुरेसं
तेल आहे की नाही
वगैरे वगैरे वगैरे
अनेक प्रश्न उद्भवतात
ती मेली की
आणि नंतरही
- कावळा तिच्या पिंडाला
चटकन शिवला की नाही
बॅंकेतलं तिच्या नावावरचं खातं
बंद केलं का
अस्थिविसर्जन कुठं करायचं
पण ती मेली
की बॉडी घराबाहेर कशी काढायची
कुजू लागायच्या आत
हाच प्रश्न महत्त्वाचा असतो
पण परंपरेच्या बाबतीत
ती मेली
की नुसतीच कोमात आहे
आणि कोमात असेल
तर ती कोमातच राहणार अशी
कायमची
की त्यातनं बाहेर पडायची
शक्यता आहे
हे मोठ्यामोठ्या तज्ज्ञांनाही
सांगता येत नाही
तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चट्कन
तयार होत नाही कुणी
आणि याच अवस्थेत ती
जिवंत राहणार असेल
तर तिला अशीच जिवंत ठेवायची
इन्डेफिनिटली
कृत्रिम उपायांनी
(तो सगळा खर्च कुणी करायचा)
की सगळ्या नळ्या काढत्या घ्यायच्या
व जरूर असेल
तर सुईमधून एक सूक्ष्म बुडबुडा
तिच्या रक्तात सोडायचा
याबद्दल निर्णय घेणंसुद्धा
सोपं असत नाही
पण एकादा
एवढा गुरफटलेला असतो
आपल्या आईत
मातृप्रेम
एवढं तीव्र असतं त्याचं
की त्याला हे सहन नाही होत
आपल्या आईचं हे असं मरणं
घराबाहेर जाणं
आपल्याला सोडून
आई मेली
हे कबूलच करत नाही तो
आणि कुणाला सांगत-कळवत पण नाही
तिचं मढं
तसंच घरी ठेवून देतो
त्याला वास यायला लागला तरी
किंवा जास्त हुशार असला
तेवढं कौशल्यही असलं त्याच्यापाशी
तर त्या मढ्यात पेंढा भरून
हिचकॉकसाहेबांच्या
सायकोमधल्या
अँथनी पर्किन्सप्रमाणं
तिला झोपवतो रोज रात्री
बिछान्यात तिच्या
मस्तपैकी रजई बिजई अंगावर पांघरून
उठवतो सकाळी
वेणीफणी करतो तिची
गप्पागोष्टी करतो तिच्याबरोबर
तासन्तास
तिचा आवाजसुद्धा स्वतःच काढून
स्वतःशीच बोलत कधी खेकसत स्वतःवर
कडेवर घेऊन हिंडवतो तिला घरभर
या खोलीतून त्या खोलीत
जिन्यातनं खाली वर
रॉकिंग चेअरवर बसवून ठेवतो तिला
तळघरात
तिच्या अंगावर छानपैकी शाल घालून
कुठचीही तरुण
आणि अगदीच अप्सरा नाही
पण दिसायला बरी
आणि मुख्य म्हणजे पेंढा
न भरलेली
अशी बाई बघितली त्यानं
की त्याच्यातली आई
खवळून उठते
ही बया ही शिंदळ ही रांड
आता आपल्या सोन्याला
अळुंचो मळुंचो करणार
आणि आपल्याला कचऱ्यात काढणार
या भीतीनं
आई लोणचं करते
त्या रांडेचं
स्वैपाकघरातली एक सुरी घेऊन
तिच्या भोंदू शरीरात
चिरंतन पेंढा नसून
दुसरा कसलातरी द्रव पदार्थ
भडक रंगाचा व चिकट
ओतप्रोत भरलाय
हे सिद्ध करून दाखवते
ती एक उभं तळं आहे
रक्ताचं
त्वचेनं आच्छादलेलं
आणि तिला कुठंही भोक पडलं
कापलं
किंवा भोसकलं
की त्यातनं या एकाच कंटाळवाण्या पदार्थाशिवाय
दुसरं काहीच बाहेर येत नाही
ेहे आपल्या लाडल्याला दाखवून देते
बंद जागेत कोंडलेल्या
पाकोळीप्रमाणं
सुरी सैरावैरा भिरभिरते
शेवटच्या सीनमध्ये
चिरंजीवांना
वेड्याच्या इस्पितळात ठेवलेलं असतं
जिथं बाळकोबा
आणि मातोश्री
संपूर्णपणं एकरूप झालेले असतात
अँड देन दे लिव
हॅपिली
एवर आफ्टर
- अरुण कोलटकर
कैच्याकै!
आई आहे आपली
सर्वांचीच
तिचंच दूध आपण प्यालो
आनंदानं
आणि बिनतक्रार
त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्सिनचं प्रमाण
कमीजास्त असलं
तरी गोड मानून घेतलं आपण
आईच्या दुधात डीडीटी? नाही म्हणजे, या कोलटकराची आई याला पाजताना आपल्या दुधात डीडीटी घालीत असेलही (असला दिवटा निपजल्यावर दुसरे काय करणार? डीडीटी म्हणजे झुरळ मारण्याचे औषधच ना?), आपले काही म्हणणे नाही ('मात्रा अंमळ कमी पडली' एवढी एक माफक हळहळ वगळल्यास). पण म्ह्णून 'सर्वांच्याच आईच्या दुधात डीडीटी असते' हा निष्कर्ष थोडा सरसकट वाटत नाही काय?
असो. समग्र कवितेबद्दल 'हातभर ढाळ' याहून अधिक प्रतिक्रिया देणे शक्य वाटत नाही.
पण खपते आहे म्हटल्यावर खपवणारा निपजायचाच. असो चालायचेच.
कवितेचं मूल्यमापन
कवितेचं मूल्यमापन स्वतंत्रपणे. पण मराठीनं संस्कृतची अनावश्यक ओझी वाहण्यासंदर्भात मला ती कैच्याकै मार्मिक वाटली. बाकीही बर्याच बाबतीत. पण ते असो!
बाकी कविता काहीशी पाल्हाळीक आहे. पण तिच्यातला हा 'ओव्हर दी टॉप', काहीसा उद्धट, धक्कादायक भाग म्हणजे तिचा आत्मा आहे. ती ज्या निर्विकार, नो नॉन्सेन्स सुरात या दृष्टिकोनाची खिल्ली उडवते, तो सूरच काढला, तर काय उरलं? पण हेही असोच. सापेक्ष.
डायॉक्सिन आणि डीडीटीबद्दल मला
डायॉक्सिन आणि डीडीटीबद्दल मला तपशील ठाऊक नाहीत. त्याचा काहीतरी स्पेसिफिक संदर्भ असणार. कॉलिंग जंतू.
परंपरेत मुळात खोट आहे, असा विचार मला तरी जाणवला नाही. परंपरा आपल्या जागी आपल्या काळात ठीकच. पण ती कालबाह्य होते. नि कालबाह्य झाल्यावर तिला चिकटून राहणं हास्यास्पद, धोकादायक, आचरट ठरतं - असं मला दिसतं यात.
त्यात डीडीटीचं आणि
त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्सिनचं प्रमाण
कमीजास्त असलं
तरी गोड मानून घेतलं आपण
तपशील इ. जाऊदे, एकूण टोनवरून साधक-बाधक पदार्थांबद्दल बोलणे चालू आहे इतके लक्षात येते ते बास आहे. (मलाही डीडीटी दुधात असणे वाईट इतके वगळता माहिती नाही काही-ते एक असोच) तर साधक-बाधक पदार्थांचे प्रमाण कमीजास्त आहे तरी आम्ही गोड मानून घेतले म्हणजे परंपरेत खोट आहे तरी दुर्लक्ष केले असेच ना? कालबाह्य इ. मुद्दे योग्य, पण मग कालसापेक्ष गोष्टींची तुलना करताना असे निकष लावणे चूक वाटले इतकेच.
मार्मिक!
कविता मार्मिक आणि त्यावरचे प्रतिसाद विनोदी वाटले.
>> कवितेतला काही भाग विनाकारण ओव्हर द टॉप वाटतो आहे याबद्दल सहमत.
ओव्हर द टॉप आहेच आणि तसंच अभिप्रेत आहे. मलासुद्धा गणपतीच्या २४ तास चालणाऱ्या मिरवणुका, नवरात्रीची तोरणं, १५ ऑगस्टला सकाळी सकाळी महेंद्र कपूर ऐकायला लागणं वगैरे प्रकार, किंवा पाळी चालू असताना बाईला बाजूला बसवणं, विधवांना पुनर्विवाह करू न देणं, दलितांना मंदिरात प्रवेश करू न देणं, खाप पंचायती, विशिष्ट जातीच्या लोकांना डोक्यावरून मैला वाहायला लागणं, दलितांना सवर्णांच्या उष्ट्या ताटांत जेवायला लावणं वगैरे परंपरा ओव्हर द टॉप वाटतात.
डीडीटी आणि डायॉक्सिन - ही आपल्या परिसरातून आपल्या शरीरात प्रवेश करणारी विषं आहेत. सूज्ञांना एवढं पुरेसं व्हावं. बाकीच्यांसाठी विकीपीडियावरून -
Both in Europe and in U.S.A., the emissions have decreased dramatically since the 1980s, by even 90%. This has also led to decreases in human body burdens, which is neatly demonstrated by the decrease of dioxin concentrations in breast milk.
Breast milk in regions where DDT is used against malaria greatly exceeds the allowable standards for breast-feeding infants.[111][112][113] These levels are associated with neurological abnormalities in babies.
अनुवाद मराठीतही द्या जमल्यास
संस्कृत कवितेच्या खाली अनुवाद बघून वाचायला घेतला- तो हिंदीत दिला आहे. मराठीतही द्या जमल्यास.
"संस्कृत भाषा मधुशाला" ही ओळ आवडली - बाकी कविता जरा 'खडबडीत' वाटली.(मला संस्कृत कळत नाही फारसं- म्हणजे मराठीतल्या शब्दासारखा असेल शब्द तर अंदाज येतो अर्थाचा-तितपतच.)
संस्कृत दिनाच्या शुभेच्छा तुम्हालाही.
मराठी अनुवाद
ही रचना खरंतर खूप जुनी आहे! त्यामुळे तिच्यात थोडी विस्कळितता वाटून ती 'खडबडीत' वाटणं अगदीच शक्य आहे!
मराठी अनुवाद केला नव्हता. पण साधारण असं काहीतरी करता येईल:
कालिदास-भास-बाण-मंडित
काव्यसृष्ट मधुघटमाला,
प्राशुन होती तृप्त रसिक
अन् वितरे मधुरस सखिबाला,
जीवशिवांचे मीलन घडवी
त्वरित हर्षप्रद ही होते,
यथेच्छ प्राशन करा रसिकहो,
संस्कृतभाषा मधुशाला|
शुभेच्छा!
पूर्ण सहमत, पण ...
(अकारान्त ते अ:कारान्त १६ + व्यंजनांत ३५ + अनियमित (हजारो) )* (विभक्ती ८ * वचने ३ ) * part of speech (क्रियापद कि नामसदृश) २ + ((परस्मैपदी कि आत्मनेपदी (कशाला हे प्रकार निर्मिले देव जाणो)२ + अनियमित)* वचने ३ * पुरुष ३ * (३ काळ + ४ अर्थ)...
मेमरीही खूप ऑकुपाय करते स्कोअरसोबत.
सर्वोच्च न्यायालयाचा एक जुना निकाल
भारताच्या शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये संस्कृतचे विशेष स्थान अधोरेखित करणारा सुप्रीम कोर्टाचा १९९४ सालातील निवाडा येथे पहा:
या निमित्ताने
लोकसत्तेत आलेला हा लेखः
http://www.loksatta.com/sampadkiya-news/featured-article-on-sanskrit-la…
डिस्क्लेमरः जन-गण-मन संस्कृतात नाही :)