Skip to main content

फ्लायदुबई FZ 1073.. अशक्य ते शक्य..

फ्लायदुबई या एअरलाईनच्या फ्लाईट FZ 1073 बद्दलची बातमी आता सगळ्यांच्या समोर न्यूज चॅनल्स, यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स आणि अन्य मार्गांनी येते आहे.

विमानाशी सबंधित काहीही घटना आणि दुर्घटना घडली की तिच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवत राहणं आणि त्याविषयी चर्चा आणि अपडेट धागा काढत राहणं ही एक सवयच बनली आहे.

ही लेटेस्ट घटना एकदम एखाद्या थरारक सिनेमाच्या कथेला मागे टाकणारी आहे.

३४,००० फुटांवर हवेत घडलेली अत्यंत भयंकर, भीषण, रक्त गोठवणारी सत्यघटना आहे. नेहमीप्रमाणे विमानांच्या जगात अशा घटना घडल्या की सुरुवातीला विखुरलेले आणि सनसनाटी बातम्यांचे तुकडे येतात, खूप अफवा पसरतात, अर्धवट माहितीचे झरे जिवंत होतात.. आणि मग यथावकाश हळूहळू खरा टेक्निकल डेटा समोर यायला लागतो.

हा धागा या संपूर्ण घटनेचे धागेदोरे गोळा करण्यासाठी आणि या विलक्षण घटनेचे अपडेट्स नोंदवले जावेत म्हणून सुरू करत आहे.

नेहमीप्रमाणे आधी निव्वळ अ- ललित वस्तुनिष्ठ माहिती:

विमान कंपनी: फ्लायदुबई
फ्लाईट नंबर: FZ 1073 (दुबई ते तेल अवीव)
विमानाचं मॉडेल: बोईंग ७३७ मॅक्स (Boeing 737 MAX 8) जे आपल्या एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने खूप मोठ्या संख्येने ऑर्डर केलं आहे आणि वापरत पण आहेत.

पायलट इन कमांड (PIC): कॅप्टन स्मित मच्छार

फर्स्ट ऑफिसर (को-पायलट): ओमानी नागरिक (याचं नाव का लपवलं आहे हा एक वादग्रस्त मुद्दा निर्माण झाला आहे.)

प्रवासी आणि क्रू: सुमारे १७० प्रवासी (चुभूदेघे) क्रू नेमका किती होता ते बघावं लागेल. पण सुदैवाने दोन ड्यूटीवर नसलेले पायलट पण प्रवाशांमध्ये बसलेले होते. या लेखात मी या सर्व लोकांच्या जिवंत राहण्याला चमत्कार म्हणणार आहे त्यातला एक महत्वाचा भाग.

क्रूझिंग अल्टीट्यूड: फ्लाईट लेव्हल ३४० (३४,००० फूट). यासाठी माझा फ्लाईट लेव्हल संबंधित लेख शोधू शकता जर इंटरेस्ट असेल तर.

इमर्जन्सी लँडिंग: ताबुक विमानतळ, सौदी अरेबिया

आता घटनाक्रम आणि नेमकं काय झालंय ते बघूया. कारण मीही जशाजशा बातम्या वाचत गेलो तसं तसं आगोदर सरळ वाटणारी घटना अधिकाधिक क्लिष्ट आणि सिरियस होत गेली.

विमान जॉर्डन आणि सौदी यांच्या सीमेजवळ आपल्या ठरलेल्या क्रूझ लेव्हलवर (३४ हजार फूट वर लिहिल्याप्रमाणे) उडत असताना अचानक कॉकपिटमध्ये आजवर न झालेलं काहीतरी अघटित घडलं. को-पायलटने (ज्याचं नाव अजूनही लपवलं आहे) अचानक धारदार शस्त्राने पायलट इन कमांड कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर एकदम अनपेक्षित हल्ला चढवला. हे बहुधा काही वैयक्तिक भांडण नव्हतं, तर प्राथमिक माहितीनुसार विमानाचे कंट्रोल कॉलम्स खाली दाबून आणि इंजिन पॉवर म्हणजे थ्रॉटल फुल पॉवरमध्ये सेट करून विमान जमिनीवर आदळवण्याचा तो प्रयत्न होता असं सध्या तरी दिसतं आहे.

कॉकपिटमध्ये को पायलटने चाकू (जो अनेक माध्यमांत सांगितला जातोय पण प्रत्यक्षात विमानाच्या इमर्जन्सीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांतल्या कुऱ्हाडीसारखं एक उपकरण होतं.) वापरून मुख्य पायलटवर जो जीवघेणा हल्ला केला त्यात कॅप्टन स्मित यांच्या अनेक नाजूक जागी घाव बसले. डोक्यावर, पोटावर आणि इतर अनेक जागी. त्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही कॅप्टन स्मित यांनी प्रतिकार चालू ठेवला. ट्रू एअरमनशिप..

ही जीवघेणी झटापट सुरू असताना विमानाने अंदाजे ३० सेकंदांत ३४,००० फुटांवरून थेट १७००० फुटांपर्यंत थरकाप उडवणारा सूर मारला. रडारवर हा ड्रॉप पाहणाऱ्या कोणाचेही ठोके चुकावेत असा हा दर होता.

डेव्हिल इज इन द डीटेल्स. प्रथमदर्शनी हा केवळ एका माथेफिरू किंवा अतिरेकी हल्ल्याचा आणि सुटकेचा प्रसंग वाटेल; पण एक एव्हिएशन अभ्यासक म्हणून डेटा आणि फिजिक्सच्या चष्म्यातून पाहिलं तर खूप गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि माझी काही निरीक्षणं आणि अंदाज आहेत आपल्या त्या भारतीय पायलट इन कमांडबद्दल.. जी खरी ठरतात का हे काळच सांगेल.

पहिलं म्हणजे वीक स्पॉटवर वार झाला असता तर ? आणि कॉकपिट लॉक उघडायला काही सेकंद उशीर झाला असता तर..??!!

जर्मनविंग्जच्या अपघातानंतर ९/११ चे नियम आणि कॉकपिटचे आतून लॉक होणारे दरवाजे खूपच चर्चेत आले होते. जर को-पायलटने केलेला वार कॅप्टनच्या गळ्यातील कॅरोटिड आर्टरीवर किंवा छातीवर लागून कॅप्टन स्मित दुर्दैवाने तात्काळ गतप्राण अथवा बेशुद्ध झाले असते, तर आज आपण १७० किंवा अधिक मृतांची बातमी वाचत असतो. कारण तसं झालं असतं तर कॉकपिटमध्ये त्या आत्मघातकी को पायलटला रोखणारं कोणीच शिल्लक राहिलं नसतं. बाल बाल बचना या उक्तीचं हे उदाहरण का आहे यातला हा पहिला मुद्दा.

आता दुसरा पॉईंट बघूया. ज्यामुळे या सर्व लोकांचं जिवंत असणं हे किती अशक्य कोटीतलं आणि केवळ उच्च कोटीचं नशीब असल्याशिवाय कसं अशक्य होतं हे अधिकाधिक स्पष्ट होईल.

थोडा तांत्रिक भाग अपरिहार्य आहे. इथवर जे वाचक टिकून आहेत त्यांनी नेटाने पुढे वाचा.

मुद्दा एक.. स्ट्रक्चरल लोड आणि एअरफ्रेमचं विघटन ऊर्फ डिसइंटिग्रेशन (Aero Structural Stress):
बोईंग ७३७ मॅक्ससारखी प्रवासी विमानं साधारणपणे +२.५ जी (गुरुत्वाकर्षण) ते -१ जी लोड फॅक्टरसाठी डिझाइन केलेली असतात. ३०-४० सेकंदांत १६-१७ हजार फूट खाली येणं म्हणजे हा निव्वळ नॉर्मल डिसेंट (खाली उतरणं) नव्हता. तो हेतुपुरस्सर पूर्ण पॉवरवर (फुल थ्रॉटल म्हणतात तसा) केलेला स्टीप डाईव्ह होता. विमान ऑलरेडी प्राणघातक स्पिनमध्ये गेलं होतं. अशा स्थितीत विमानाच्या फ्रेमची ताण सहन करण्याची जी एक सर्वाधिक मर्यादा असते ती जवळपास ओलांडली गेली होती.

आतापर्यंत जे कळलं आहे त्यानुसार विमानाच्या टेल रडरला (Tail Rudder) आणि शेपटीच्या भागात असलेल्या स्टेबिलायझरचं प्रचंड नुकसान झालं आहे.

मुद्दा दोन.. अशा तीव्र वेगात जेव्हा विमान आवाजाच्या वेगाच्या मर्यादेकडे जातं, तेव्हा हवेचा डायनॅमिक दाब विमानाचे पंख किंवा शेपूट हवेतच उखडू शकतो.(डिसइंटिग्रेशन)

या घटनेत त्या फिरत फिरत खाली पडणाऱ्या पानासारख्या कोसळण्यातून बाहेर पडताना (पुल आऊट प्रोसिजरमध्ये) जर वैमानिकाने किंचितही जास्त जोरात कंट्रोल कॉलम मागे खेचला असता, तरी अतिरिक्त जी फोर्सेसमुळे विमानाचे हवेतच तुकडे झाले असते. विमान हवेत शाबूत राहणं हा त्या बोईंगच्या डिझाइनचा आणि रिकव्हरी करणाऱ्या हातांचा चमत्कार आहे. जरी अनेक मिडियांमध्ये त्या ऑफ ड्यूटी पायलट्सनी विमान सांभाळलं असं लिहिलं असलं तरी माझं विश्लेषण ठामपणे सांगतं की सर्वात महत्वाची कृती म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत आणि कोणतीही हालचाल करणं अशक्य होईल अशा नोज डाईव्ह स्थितीत (शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत) देखील ते जीवघेणं कोसळणं थांबवून विमान पुन्हा क्षितिजसमांतर स्थिर अवस्थेत आणणं.. आणि तेही सबुरीने योग्य प्रमाणात विमानाचं नाक वर उचलत.. हे केवळ स्थितप्रज्ञ मनुष्यच करु शकतो. हॅट्स ऑफ टू कॅप्टन स्मित.

मुद्दा ३.. तीस सेकंदांचा खेळ..
३४ हजार फुटांवरून १७ हजार फूट खाली येण्यासाठी जर अर्धं मिनिट लागलं असेल तर उर्वरित १७,००० फूट अंतर कापून जमिनीवर स्फोट होण्यासाठी त्यांच्याकडे हार्डली आणखी ३० ते ४० सेकंद उरले होते. टाइम वॉज लाईफ. हा त्या चमत्काराचा आणखी एक भाग..

मुद्दा ४.. निगेटिव्ह जी फोर्स आणि मानवी हालचालींचं भौतिकशास्त्र..
काही बातम्यांमध्ये असं म्हटलं गेलं की प्रवाशांनी धावत जाऊन कॉकपिटमध्ये को पायलटला पकडलं आणि विमानाची रिकव्हरी केली. पण फिजिक्सच्या दृष्टीने विचार करा..

जेव्हा विमान पूर्ण थ्रॉटलवर नोज-डाउन फेकलं जातं (जे त्या को पायलटने केलं), तेव्हा केबिनमध्ये प्रचंड भयंकर निगेटिव्ह जी (ऋण गुरुत्वाकर्षण) निर्माण झालं. अशा वेळी उभे असणारे लोक आणि विमानातल्या सर्व वस्तू थेट छतावर आदळतात. अशा स्थितीत कोणालाही पायावर उभं राहून कॉकपिटच्या दिशेने धावणं फिजिकली अशक्य आहे.

त्यामुळे माझ्यामते या घटनेचा खरा क्रम असा असावा..

गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतः आधी हल्लेखोर को पायलटच्या हल्ल्याच्या वेदनेला सहन करत त्याच्या तावडीतून कंट्रोल्स आपल्या हातात घेतले. को पायलटने विमान कोसळून नष्ट व्हावं म्हणून फुल पॉवरवर सेट केलेला थ्रॉटल मागे ओढला.
विमानाचं नाक वर ओढून तो मरणाकडे नेणारा डाईव्ह शांत चित्त ठेवत योग्य नियंत्रित प्रकारे रोखला.. त्यांनी विमानाला साधारण १७,००० फुटांवर जवळपास एक जी फोर्सवर, म्हणजे नॉर्मल अवस्थेत स्थिर केलं. विमान स्थिर झाल्यावरच कॅप्टनने कॉकपिट डोअरचा अनलॉक स्विच दाबला असणार. कॉकपिट डोअर उघडून, पॅसेंजर्स आणि कॅबिन क्रू आतमध्ये घुसून कोपायलटला जेरबंद करुन मग जे ऑफ ड्यूटी पायलट विमानात होते त्यांनी पायलट सीट्सवर बसून विमान नियंत्रित करणं हे डाईव्ह होत असताना शंभर टक्के अशक्य होतं. त्यामुळे आता कॅप्टन स्मित यांनी केवळ कॉकपिटचं दार उघडलं इतकंच श्रेय दिलं जातं आहे ते माझ्यामते अन्यायकारक आहे. कॅप्टन स्मित यांनी आधी पहिल्या पंधरा सेकंदात जर ते कोसळणं नियंत्रणात आणलं नसतं, तेही गंभीर जखमी अवस्थेत आणि को पायलटशी झगडत झगडत.. तर पुढचं सगळं अशक्य होतं.

मुद्दा ५... द मल्टिपल मिरॅकल्स.. विचार करा.. दार उघडल्यावर प्रवाशांनी आत घुसून त्या हल्लेखोर कोपायलटला बांधून टाकलं.

पण सर्वात मोठा स्ट्रोक ऑफ लक म्हणजे याच विमानात फ्लाईदुबईचेच २ अतिरिक्त वैमानिक, ऑफ ड्यूटी क्रू , हे प्रवासी म्हणून प्रवास करत होते..

कॅप्टन मच्छार प्रचंड रक्तस्त्रावामुळे झपाट्याने अशक्त होत जात असताना या क्वालिफाईड वैमानिकांनी कॉकपिटची सूत्रं आपल्या हातात घेतली. वेळेत डॅमेज असेसमेंट केली, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाला सौदी अरेबियातल्या ताबुक नावाच्या विमानतळावर सुखरूप उतरवलं.

एव्हिएशनच्या इतिहासात अशा घटना "झीरो सर्व्हायव्हल प्रॉबेबेलिटी" मानल्या जातात. एकाच वेळी पायलटवर हल्ला, आत्मघातकी डाईव्ह, हवेत तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेली एअरफ्रेम आणि तरीही अगदीच जीवघेण्या जखमा न होता सर्वजण जिवानिशी जमिनीवर उतरणं.. हे निव्वळ नशीब नाही, तर कॅप्टन स्मित मच्छार यांनी मरणाच्या दारात दाखवलेली "एअरमॅनशिप" आहे

FDR (फ्लाईट डेटा रेकॉर्डर) आणि CVR (कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) या दोन्हींचं विश्लेषण आल्यावर नक्की किती जी फोर्स नोंदवले गेले, एअरस्पीड किती होता, डाईव्हमधून ती केवळ काही सेकंद हातात असताना केलेली कौशल्यपूर्ण रिकव्हरी कोणी केली हे सगळं स्पष्ट होईलच.

तूर्तास अपडेट्स सुरू ठेवण्यासाठी हा धागा खुला करतो आहे. तुम्हीही अपडेट्स आणि तुमची मतं नोंदवत रहा..

चिंतातुर जंतू Fri, 02/10/2026 - 08:01

धन्यवाद! खरोखरच चित्तथरारक घटना आहे. आणखी अपडेट्सच्या प्रतीक्षेत.

स्वयंभू Sun, 04/10/2026 - 02:04

ध्रूव राठीचा व्हिडिओ किंवा रील
https://youtu.be/aZJVNgtUK_8?si=K8iosmAxhHTT-EkC

काही निरीक्षणे:
मोदींनी स्मित मच्छार बद्दल लिहिले असेल कौतुक केले असेल सोकॉल्ड पुरोगामी याबद्दल वाच्यता करणार नाहीत

एकूणच हिंदुत्ववादी गटातटांनी स्मित मच्छार बद्दल आघाडी घेतली आहे म्हणजे उजवीकडचे वगळून सगळीकडचे गटतट सर्वांना शक्यता पडताळून योग्य तो प्रतिसाद देतील

तसेही बरीच मंडळी असे काही घडले नाही म्हणून कांगावा करत होते पण कारण घटना इस्रायलशी निगडित होती म्हणून असेल कदाचित!

जो कोणी ओमानचा कोपायलट आहे तो कट्टर विचारसरणीचा आहे म्हणे! म्हणजे कुठला कट्टर हे पडताळून योग्य ती दखल घेतली जाईल याची नोंद घ्यावी याठिकाणी!

समजा विमान अपघातात सगळे प्रवासी क्रू मेंबर्स सकट गेले असते तर काय घडले असते? किमान वाढीव ट्रिगर मिळाला असता युद्ध करण्यासाठी इस्रायलला..

एक वदंता अशी पण आहे/होती हे सगळे फ्रेम करून वेल स्क्रिप्टेड आहे वगैरे. कळेल भविष्यात.

पण समजा भविष्यात हे प्रकरण आणखी जास्त खोलात जाऊन पुराव्यानिशी बाहेर आले तर हायजॅक करून घातपात करण्याचा कट रचला होता हे सिद्ध झाले तर काही वात्रट लोक इस्रायली लोकांना अद्दल घडवण्यासाठी केलं तर बिघडलं कुठे म्हणून जस्टीफाय करत बसतील!

(अतीअवांतर) शेवटचे महत्त्वाचे (कोपायलट जिहादी होता हे गृहीत धरून) - समजा त्या ओमानच्या कोपायलटला जिहाद वगैरे करून आपली योग्यता सिद्ध करून ७२ हूरांसोबतचा आनंद घ्यायचा असेल तर अडवणूक करणारे पापे किंवा अव्होन किंवा सिन कुठे फेडणार? एखाद्या जिहाद्याने कठोर परिश्रम करून कौशल्य आत्मसात केले असेल आणि प्रत्यक्षात व्यवहारिक जगात वापरायचे असेल त्याला जालीम दुनिया अजिबात यशस्वी होऊ देत नाही.
तूर्तास एवढेच!

'न'वी बाजू Sun, 04/10/2026 - 03:41

In reply to by स्वयंभू

प्रस्तुत धागा हा या घटनेत नक्की काय घडले याचा (aviationच्या दृष्टिकोनातून) वेध घेण्यासाठी असावा, आणि विशेषेकरून राजकीय दृष्टिकोन (आणि/किंवा राजकीय कॉन्स्पिरसी थियऱ्या) पसरविण्यासाठी नसावा, अशी माझी समजूत आहे. (चूभूद्याघ्या. धागाप्रवर्तक गरज वाटल्यास याविषयी योग्य तो खुलासा करतीलच.)

ध्रुव राठीचा प्रस्तुत व्हिडिओ मी पाहिला नाही; पाहण्याचा इरादाही नाही. परंतु, त्याने या संदर्भात काही राजकीय प्रमाद केला, असे आपणांस बहुधा सुचवायचे असावे, असे प्रतीत होते.

तसे असल्यास,

१. ध्रुव राठीचा अथवा त्याच्या व्हिडियोचा विषय (जो या धाग्यावर आतापावेतो कोणीही चकार शब्दानेसुद्धा काढला नव्हता) या धाग्यावर वा (या संदर्भात) या संकेतस्थळावर सर्वप्रथम आपण काढलात, असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

२. ध्रुव राठीने जो काही राजकीय प्रमाद केला असावा (चूभूद्याघ्या), तोच प्रमाद (विरुद्ध बाजूने) या प्रतिसादाद्वारे आपणही करू पाहात नाही आहात काय, याचा अवश्य विचार करावा, असेही कळकळीचे आवाहन या निमित्ताने आपणांस करू इच्छितो.

याउपर, प्रस्तुत धाग्यास राजकीय/सामाजिक/धार्मिक रंग  आपणांस द्यायचाच जर असेल, तर आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे अर्थातच स्वागत आहे. परंतु, त्या परिस्थितीत, या प्रयोजनाकरिता उपयुक्त तथा साजेशी अशी इतर संकेतस्थळे मराठी आंतरजालावर उपलब्ध आहेत, जेथे याकरिता कदाचित आपले स्वागतही होऊ शकेल, त्यांच्या सेवांचा लाभ घेण्याचा विचार अवश्य करावा, असेही अत्यंत सौहार्दपूर्णरीत्या सुचवू इच्छितो.

आगाऊ आभार.


(@संपादनमंडळ: जरा इथे लक्ष द्या की राव! तुमची कामे काय मी करायची काय इथे?)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/10/2026 - 05:17

In reply to by 'न'वी बाजू

संपादनमंडळांतली एक म्हणून - 'न'वी बाजू यांच्या प्रतिसादाला पूर्णतया +१ 

कोण हे तथाकथित पुरोगामी आणि त्यांना विमानांमधलं काय समजतं, यात मला काहीही रस नाही. मात्र सदर धागा, आणि त्यातले तपशील हे पूर्णतया ही घटना समजून घेण्यासाठी, आणि विशेषतः कॅप्टन स्मित माछर (किंवा जो काही उच्चार आहे), यांचं कौतुक करण्यासाठी आहे. त्यांचं कौतुक अशासाठी की जीवघेणा हल्ला झालेला असूनही त्यांनी धीरोदात्तपणे, प्रसंगाचं भान राखून १७०+ लोकांचे जीव वाचवले.

त्या धीरोदात्तपणाच्या बरोब्बर उलट, आणि थुंकल्यासारखा (होय, हा शब्द मुद्दाम वापरला आहे) प्रतिसाद लिहिण्याची काहीही गरज नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/10/2026 - 05:18

गवि, समयोचित आणि उत्तम लेख. तुम्हाला जसजसे तपशील कळत जातील तसे ते इथेही लिहीत राहा.

'न'वी बाजू Sun, 04/10/2026 - 06:52

मुद्दा ३.. तीस सेकंदांचा खेळ..
३४ हजार फुटांवरून १७ हजार फूट खाली येण्यासाठी जर अर्धं मिनिट लागलं असेल तर उर्वरित १७,००० फूट अंतर कापून जमिनीवर स्फोट होण्यासाठी त्यांच्याकडे हार्डली आणखी ३० ते ४० सेकंद उरले होते. टाइम वॉज लाईफ. हा त्या चमत्काराचा आणखी एक भाग..

शाळाकॉलेजात शिकलेले फिजिक्स आता पूर्णपणे rusty झालेले आहे, तथा कागदावर गणित (तेही एफपीएस टू एसआय कन्व्हर्शने करीत) मांडण्याचा प्रचंड कंटाळा आहे, परंतु तरीही, केवळ आत्यंतिक प्राथमिक (तथा वरवरच्या) तर्काने (जो कदाचित — बहुधा — चुकीचाही असू शकेल):

In an object accelerating towards earth, जर पहिले १७,००० फूट पडायला ३० सेकंद (= अर्धे मिनिट) लागले असतील, तर उरलेले तेवढेच अंतर पडायला ३० सेकंदांहून कमी (गणित केलेले नाही, परंतु कदाचित पुष्कळच कमी) लागू नयेत काय?

की माझेच लॉजिक कोठे चुकते आहे?

(Which is to imply that what the Indian pilot may have purportedly done to save the situation appears to be far more impressive than originally thought. अर्थात, चूभूद्याघ्या.)
 

गवि Sun, 04/10/2026 - 13:29

In reply to by 'न'वी बाजू

अगदी बरोबर. इथे त्यावेळी उपलब्ध माहितीवरून असं दिसतं की विमानाचं त्वरण हे गुरुत्वाकर्षणाच्या स्वाभाविक त्वरणापेक्षा अधिक होतं. त्यामुळे (आणि अगदी स्वाभाविक g सहित देखील ) असे लिनियर कालमापन चुकीचे आहे. असेच कोसळत राहिले असते तर उरलेले अंतर कापायला कमीच वेळ लागला असता हे तुमचे म्हणणे योग्य.

अर्थात एक आहे की अगदी नोज डाईव्ह, जमिनीकडे नाक रोखून उभेच्या उभे विमान खाली पडते आहे असे चित्र नसावे. ते वेगाने खाली ग्लाईड होत असणार. शिवाय ते खाली वर खाली असे थोडे उलटसुलट देखील आले गेले असंही दिसतं आहे. त्यामुळे लेखातली मांडणी थियरी स्वरूपाची ठरू शकते.

तिरशिंगराव Sun, 04/10/2026 - 21:17

त्या शूर पायलटच्या नांवाविषयी वेगवेगळे उच्चार लिहिले जात आहेत. पण ज्यांना गुजराती समाजाबद्दल माहिती आहे, त्यांना माहीत असेल की तिथे एक नागर बाह्मण आणि ब्रह्म क्षत्रिय समाजात, प्राण्यांची नावे हीच आडनांवे असतात. उदाहरणार्थः- मांकड, मंकोडी, हाथी, घोडा, मच्छर अशी आडनांवे असतात. त्यामुळे, त्याचे नांव स्मित मच्छर असेच आहे, असे माझे गुजराती मित्र सांगतात. त्यांत त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही.
आता त्या ओमानी पायलटचे नांव जगजाहीर झाले आहे, त्यामुळे ते काही लिहित नाही. बाकी टेक्निकल बाबी सांगण्यात गविंइतका योग्य कोणी नसावा. स्मित मच्छर हा वडनगरचा आहे.

गवि Mon, 05/10/2026 - 16:52

अपडेट: अधिकृत तपासात को पायलटची कबुली जाहीर झाली आहे. प्रमुख मिडियांमध्ये असल्याने खूप लिंक्स देत नाही. थोडे सोर्सेस पुढे दिले आहेत.

एकूण सारांश असा दिसतो की.. या लेखातल्या आतापर्यंतच्या सर्व नव्हे पण काही प्रमुख तांत्रिक अंदाजावर शिक्कामोर्तब होतं आहे. शिवाय को पायलटचा हेतू जो आतापर्यंत केवळ संशय म्हणून होता तो आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेला दिसतो.

काही सोर्स असे: यूएईचे प्रॉसिक्युटर जनरल हमाद सैफ अल शमसी (उच्चारी चुभूदेघे), सौदी सुरक्षा यंत्रणा आणि जागतिक माध्यमांमधून (वॉल स्ट्रीट जर्नल, गार्डियन वगैरे) समोर आलेली अत्यंत महत्त्वाची अधिकृत माहिती खालीलप्रमाणे:

ज्या सह-वैमानिकाचं नाव गुप्त ठेवण्यात आले होते, त्याचं नाव हमाम अल-हमामी असं आहे. त्याचं वय २९ वर्षं, आणि तो ओमानी नागरिक आहे.

सौदी अरेबिया आणि यूएईच्या तपास अधिकाऱ्यांसमोर त्याने थेट गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचा उघड हेतू हे विमान इस्रायलच्या हद्दीत किंवा जमिनीवर नेऊन क्रॅश करण्याचाच होता. म्हणजे ९-११ सारखाच.

चौकशीत तो म्हणाला की, त्याला मरण्याची अजिबात भीती नव्हती. प्रवाशांनी त्याला कॉकपिटमध्ये जेरबंद करून बांधल्यानंतरही तो "मला मारून टाका, मला संपवून टाका" (Kill me) असं सतत ओरडत होता.

यूएई सरकार(!?) ने आता या संपूर्ण घटनेला अधिकृतपणे दहशतवादी कृत्य म्हणून घोषित केलं आहे.

काही माध्यमांनी बाहेरून सुरा किंवा चाकू आणला गेला असा जो दावा केला होता, तो चुकीचा ठरला आहे. विमानातच इमर्जन्सी उपकरणांमध्ये संकटकाळी वापरायला ठेवलेली "कॉकपिट क्रॅश ॲक्स" म्हणजेच छोटी पण तीक्ष्ण कुऱ्हाड काढून को पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर मागून डोक्यावर आणि शरीरावर अनेक जोरदार खोल वार केले. ९/११ नंतर कॉकपिट एवढं अभेद्य केलं गेलं की बाहेरून आत काही नेता येत नाही किंवा कोणाला सहज आत जाताही येत नाही. पण दुर्दैवाने आतच ठेवलेलं इमर्जन्सी टूल एका वैमानिकाने दुसऱ्याविरुद्ध शस्त्र म्हणून वापरलं.

यातून आता आणखी खोल नवीन अविश्वासाचे प्रश्न उभे राहणार. दोन पायलट्सना एकमेकांपासून संरक्षण देणं किंवा त्यांच्यामधे पुन्हा अभेद्य पार्टिशन करणं असे उपाय करायचे का? इतक्या पातळ्यांवर अविश्वास दाखवून फ्लाईट ऑपरेशन्स सुरळीत पार पडतील का? दोघांपैकी कोणताही पायलट आक्रमक निघू शकणार असेल तर कोणा एकाकडे दुसऱ्याचे कंट्रोल काढून घेण्याची ज्येष्ठता ठेवणे देखील अशक्य. म्हणजे पायलट इन कमांड आणि को पायलटला अगदी समान अधिकार देणं पण दोघांनाही पलीकडच्या व्यक्तीचे कंट्रोल्स निकामी करण्याचा हक्क देणं हा प्रकार निरर्थक वाटतो. पायलट्सचं मानसिक स्क्रिनिंग तरी किती आणि कसं करणार? त्यात नैराश्य, मनोविकार कदाचित जाणवतील पण कट्टर विचार आणि त्यानुसार कारस्थानी कट हे कसं ओळखणार अशा तपासण्यांतून? असे नवे प्रश्न उभे राहताहेत.

आणि उद्या कॅबिन क्रू असा निघाला तर ? किती भिंती बांधणार?

लेखात जे म्हटलं होते की डाईव्ह चालू असताना आणि ऋण जी फोर्सेस तीव्र असताना कोणालाही उठून कॉकपिटकडे धावणं भौतिकदृष्ट्या अशक्य किंवा अत्यंत अवघड होतं.. यावर प्रत्यक्षदर्शी प्रवासी यानिव हायून आणि इतर प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीने शिक्कामोर्तब केलं आहे.

त्यांनी दिलेल्या जबाबातलं सर्वात महत्त्वाचं वाक्य (आशय):

"विमान जेव्हा भयानक वेगाने खाली कोसळत होते, तेव्हा आम्ही सीटवरून इंचभरही हलू शकत नव्हतो. पण एका क्षणी जेव्हा विमानाचा तो तोल पुन्हा सावरला (Plane balanced out.. G-forces leveled off), आणि त्यानंतरच आम्ही कॉकपिटच्या दिशेने धावू शकलो.

यावरून निर्विवाद सिद्ध होतं की:

कॉकपिटचं दार उघडण्यापूर्वी, रक्तबंबाळ आणि अंगावर घाव झेलत असताना, नजर अंधुक होत असताना, अंगात ताकद नसताना आणि त्या भयानक नोजडाईव्हमधून विमानाचं नाक वर ओढून, थ्रॉटल नियंत्रित करून विमानाला पुन्हा "१ जी" वर स्थिर करण्याचं अशक्यप्राय काम कॅप्टन स्मित मच्छार यांनीच केलं होते. त्यानंतर त्यांनी जिवाच्या आकांताने दार उघडलं आणि इतर प्रवाशांनी आत घुसून त्या माथेफिरूचा ताबा घेतला. त्या प्रवाश्यांचं धाडस आणि श्रेय कणभरही कमी नाही. आणि पुढे विमान ताब्यात घेऊन योग्य विमानतळावर लँडिंग करून जखमींना वेळेत वाचवणारे ते ऑफ ड्यूटी पायलट्स देखील तितकेच कौतुकास पात्र.

आता ब्लॅक बॉक्स डेटा आणि इतर काही अधिकृत अपडेट येण्याची वाट पाहू. इतरांनीही अपडेट्स लिहावे.

गवि Mon, 05/10/2026 - 22:01

एव्हिएशन ऊर्फ विमानन क्षेत्रात squawk code (स्क्वॉक कोड) हा कॉकपिटमध्ये पायलटद्वारे सेट केला गेलेला चार आकडी नंबर असतो. प्रत्यक्ष तोंडी न बोलता (रेडिओ बंद पडला तरी) देखील समांतर प्रक्रियेने एक यांत्रिक संदेश सतत ट्रान्समिट करण्यासाठी हे कोड सेट करण्याची सोय असते.

कोड आणि पायलट्स शिकत असताना त्यांचे अर्थ लक्षात ठेवण्याच्या ज्या शाब्दिक युक्त्या करतात (ज्याला mnemonics म्हणतात) त्या अशा:

७५०० (7500) : "सेव्हन फाईव्ह स्टे अलाईव्ह" (हायजॅक / जिवाला धोका)
७६०० (7600): "सेव्हन सिक्स रेडिओ फिक्स" (Radio Communications problem)
७७०० (7700): "सेव्हन सेव्हन, गोईंग टू हेवन" (General Emergency / Critical Distress)

कॅप्टन स्मित यांनी कसातरी ७७०० हा कोड सेट करण्यात यश मिळवलं. नंतर जेव्हा विमान ऑफ ड्यूटी पायलट्सच्या काबूत आलं तेव्हा त्यांनी ७५०० हा हायजॅक कोड सेट केला.