मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग ५)
याआधीच्या लेखांचे दुवे : भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
(सूचना : पुष्कळ चित्रं असल्यामुळे पान लोड व्हायला वेळ लागतो आहे म्हणून इथे लहान आकारांत चित्रं दिली आहेत. त्यामुळे अधिक तपशीलात चित्र पाहण्यासाठी चित्राचा दुवा वापरा)
हिएरोनिमस बॉश आणि पीटर ब्रुगेल ह्या दोन फ्लेमिश चित्रकारांनी काढलेली तत्कालीन इटालियन चित्रशैलीपेक्षा खूप वेगळी आणि असुंदर मानवी शरीरं आपण गेल्या भागात पाहिली होती. सतराव्या शतकात होऊन गेलेल्या एका फ्लेमिश चित्रकाराची छाप मात्र आणखी वेगळी होती. आपल्या रविवर्म्यावरही त्याचा नंतर प्रभाव पडणार होता. मांसल शरीरं दाखवून एक प्रकारचा उत्तान भाव आणण्यात वाकबगार असणाऱ्या ह्या चित्रकाराचं नाव पीटर पॉल रूबेन्स होतं. इटालियन रनेसॉन्सचा त्याच्यावर प्रभाव होता; पण हळूहळू त्यानं आपली एक वेगळी शैली त्यातून निर्माण केली. राफाएल आणि लुकास क्रानाकच्या 'थ्री ग्रेसेस' गेल्या भागात दाखवल्या होत्या. वर दिलेल्या रूबेन्सच्या थ्री ग्रेसेस (१६३५) त्या तुलनेत किती मांसल आहेत पाहा.
त्याच्या 'बाकानालिया'मधल्या (१६१५) स्त्रिया आणि पुरुष तर ओंगळ वाटू शकतील इतके मांसल आहेत.
रुबेन्सच्या हाती लहान मुलांचा गुलाबी गोबरेपणासुद्धा अंमळ जास्त 'क्यूट' होतो :
अतिशयोक्त चित्रणातून नाट्यमयता आणि भव्यता साकारणारी ही शैली 'बारोक' म्हणून ओळखली जाते. बर्निनी हा इटालियन शिल्पकार ह्या शैलीचा वापर फार वेगळ्या पद्धतीनं करतो. त्याच्या 'रेप ऑफ प्रॉसेर्पिना' ह्या शिल्पामध्ये स्त्रीच्या मांसात रुतलेल्या पुरुषाच्या बोटांतून नाट्यमयता साकारते. (इथे हे लक्षात घ्यायला हवं की हा 'रेप' म्हणजे बलात्काराची लैंगिक कृती नाही; तर अपहरण आहे.)
बर्निनी किंवा रूबेन्स हे कमालीचे यशस्वी कलाकार होते. त्यांच्या किंचित आधी धूमकेतूसारखा उगवून अचानक अदृश्य झालेला एक कलाकार आपल्या कलेमुळे आणि कलाबाह्य जीवनामुळे इतका यशस्वी होऊ शकला नाही; पण मानवी शरीरांच्या चित्रणात त्यानं जे अनोखे प्रवाह आणले त्यांचा समकालीन कलाकारांवर मोठा प्रभाव पडला. त्याच्या शैलीच्या प्रभावामुळे युरोपियन चित्रकलेमध्ये एक क्रांतीच घडली. ह्या चित्रकाराचं नाव मायकेलॅंजेलो मेरिसी द काराव्हाजिओ.
अतिशय वास्तववादी शैलीतलं शरीर गडद काळ्या वातावरणात अत्यंत वेधक रीतीनं चित्रित करण्यानं त्यात नाट्यमयता कशी भरता येते हे काराव्हाजिओची अनेक चित्रं पाहून कळतं. उदाहरणार्थ हा क्युपिड पाहा -
युद्ध, विज्ञान, संगीत, राज्यव्यवहार ह्या सर्वांवर अखेर प्रेमच बाजी मारून जातं असा प्रतीकात्मक संदेश देणारं हे चित्र आज 'चाइल्ड पॉर्नॉग्राफी' वाटेल. ते जिच्यासाठी काढलं गेलं त्या उमरावणीनंदेखील ते झाकून ठेवलं होतं. अगदी निवडक पाहुण्यांनाच ते दाखवलं जाई. पण अशी 'सुंदर' चित्रं काढण्यापुरती आपली कला मर्यादित ठेवणं काराव्हाजिओला अशक्य होतं. काराव्हाजिओचा वास्तववाद आधीच्या चित्रकारांच्या शैलीपेक्षा कसा वेगळा आणि क्रांतिकारक होता, ते लक्षात येण्यासाठी सेंट पीटरला क्रूसावर चढवण्याच्या प्रसंगाच्या मायकेलॅंजेलोनं काढलेल्या चित्राची काराव्हाजिओच्या चित्राशी तुलना करू -
![]()
मायकेलॅंजेलोनं काढलेलं हे चित्र (१५४६-१५५०) व्हॅटिकनमध्ये आहे.
काराव्हाजिओनं १६०१ मध्ये काढलेलं हे चित्र रोममधल्या एका चर्चच्या चॅपेलमध्ये आजही पाहता येतं. इथे लक्षात घेण्यासारखा पहिला भाग म्हणजे हे चित्र पाहणाऱ्याच्या दृश्यपातळीवरच आहे. त्यामुळे हा प्रसंग अगदी तुमच्यासमोर घडतो आहे; आणि कुणा महान संताच्या आयुष्यात नव्हे, तर हाडामांसाच्या माणसांच्या आयुष्यात घडत असावा असं वाटतं. दुसरा भाग म्हणजे ह्यात मानवी शरीराचं आदर्शीकरण नाही. त्यातले तपशील बारकाईनं पाहिले तर लक्षात येईल की सेंट पीटर आणि त्याचा क्रूस पेलणारा अशा दोघांच्या पावलांवरची माती चित्रात दिसते. आधीच्या पिढीतल्या मायकेलॅंजेलो किंवा दा विन्ची यांच्या, किंवा नंतरच्या रुबेन्स-बर्निनी यांच्या मानवी शरीरांच्या गुळगुळीत-चकचकीतपणाचा अभाव हा काराव्हाजिओच्या शैलीच्या प्रभावामागचा एक महत्त्वाचा घटक होता. त्याचा तेव्हाच्या प्रेक्षकांना धक्काही बसला. आता हे सांगितल्याशिवाय कळणार नाही, पण एका य:कश्चित, क्रूस वाहून नेणाऱ्या माणसाचा पार्श्वभाग आणि मळकट पाय हे असे थेट आपल्या नजरेसमोर येतात म्हणून लोकांना हे चित्र तेव्हा धक्कादायक वाटलं होतं. सिनेमात क्लोज-अपचा वापर करून जसा प्रसंग प्रभावी करता येतो, तसं तंत्र इथे वापरलेलं दिसतं. मायकेलॅंजेलोच्या चित्रात प्रसंगाच्या प्रेक्षकांनी चित्राचा मोठा भाग व्यापलेला असल्यामुळे ते भव्य समूहचित्र होतं; तर इथे गडद रंग, मोजक्या व्यक्तींचा क्लोज-अप आणि एकूण रचना चित्राला अधिक गहिरं करतात.
राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्याकडे पैसा भरपूर असायचा. त्यामुळे कलेचे आश्रयदाते तेच असत. आता मात्र युरोपात मध्यमवर्गाचा उदय झाला होता. आपली सदभिरुची जाहीर करण्यासाठी हा वर्ग पैसे खर्च करून कलाकारांकडून कलानिर्मिती करून घेऊ लागला. त्यामुळे ह्या काळात चित्रांचे विषयही बदलले. व्यक्तिचित्रं मोठ्या प्रमाणात काढली जाऊ लागली. हान्स होलबेनचे गब्रू राजदूत आपण गेल्या भागात पाहिले. पण अशा चित्रांतही सौंदर्य किंवा श्रीमंतीचं चित्रण हा चित्रहेतू असे. काराव्हाजिओसारख्यांच्या वास्तवदर्शी चित्रांमुळे सतराव्या शतकात मात्र वेगळे चित्रविषय येऊ लागले. फ्रान्झ हाल्स ह्या फ्लेमिश-डच चित्रकाराचं नाव घेतल्याशिवाय सतराव्या शतकातलं व्यक्तिचित्रण कसं बदलत होतं ह्याचा अंदाज येणार नाही. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ रने देकार्त ह्याचं हाल्सनं काढलेलं चित्र (१६४९-१६७०) मासल्यादाखल पाहा -
चित्रातल्या देकार्तचे बटबटीत डोळे, सुजीर चेहरा ह्यामुळे हे व्यक्तिचित्रण असुंदर पण अस्सल वाटतं. त्याचं हे चित्र तर समकालीन चित्रकलेपेक्षा त्याच्या कलेचं वेगळेपण अधिकच तीक्ष्णपणे जाणवून देतं -
एक तर ह्या बाईचा वेश आणि हातातला बीअरचा मग पाहता ती समाजाच्या निम्न स्तरातली आहे हे उघड आहे. दुसरं म्हणजे ती नशेत धुंद किंवा वेडसर असावी असं तिच्याकडे पाहून वाटतं. म्हणजे बऱ्यापैकी असुंदर वास्तव दाखवण्याची चित्रकाराची इच्छा ह्यात स्पष्ट दिसते. तिसरी गोष्ट म्हणजे आखीवरेखीव रेषांपेक्षा ब्रशच्या निवडक फटकाऱ्यांनी इथे चित्र सजीव झालेलं आहे. हेदेखील त्या काळात क्रांतिकारक होतं. ह्यामुळे एकोणिसाव्या शतकात व्हॅन गॉघसारख्या चित्रकाराला हाल्सचं व्यक्तिचित्रण मर्मभेदी वाटलं आणि त्याच्यावर हाल्सचा प्रभाव पडला.
व्यक्तिचित्रण म्हटल्यावर अपरिहार्य असं आणखी एक सतराव्या शतकातलं नाव म्हणजे रेम्ब्रां. त्याची तैलरंगातली आत्मचित्रं किंवा इतर चित्रं प्रसिद्ध आहेतच, पण आपल्या विषयाला अनुसरून त्याचं एक अनोखं एचिंग पाहा -

मूत्रविसर्जन ही एक दैनंदिन क्रिया आहे, पण ती चित्रविषय असण्याचा प्रघात तेव्हा नव्हता. स्त्रीदेहाच्या नग्नतेला आकर्षक रितीनं चित्रित करण्याच्या तेव्हाच्या प्रघातांना छेदून केलेलं हे एक वास्तवदर्शी चित्रण आहे.
रूबेन्सनं चितारलेली अतिशयोक्त शरीरं ज्या काळात युरोपात लोकप्रिय होती, त्याच काळात वेगळा आणि वेगवेगळ्या तऱ्हांचा वास्तववादी विचार करणारे काही कलाकार आपली कला सादर करत होते हे दाखवण्याचा ह्या भागात प्रयत्न केला आहे. धर्माच्या लौकिकानं लोकांचे डोळे दिपवण्यासाठी काढलेली नाट्यमय चित्रं आणि नवमध्यमवर्गानं आपल्या घरांच्या सजावटींसाठी काढलेली चित्रं असाही फरक या काळात स्पष्ट दिसू लागला. कष्टकरी, सामान्य माणसं आणि त्यांचे नित्यक्रम यांनाही ह्या काळात चित्ररूप लाभलं. देकार्त, पास्काल, गॅलिलिओ, न्यूटन, बेकन अशा लोकांमुळे इतर क्षेत्रांत जशी ह्या काळात आधुनिकतेची सुरूवात होऊ लागली होती, तशी ती चित्रकलेतदेखील होऊ लागली असं त्यामुळे म्हणता येईल.
(क्रमशः)
हा ही भाग आवडला.
बियरवाल्या बाईचं चित्र पाहून कल्की कोचलीन आठवली. चकचकीत बाहुल्यांच्या बॉलिवूडमधे लौकीकार्थाने सुंदर नसणारी कल्की चित्रपटांमधे तगड्या भूमिकांमधे दिसते याची अशीच गंमत वाटली होती. तशीच गंमत काही वर्षांपूर्वी सुनिधी चौहानच्या आवाजामुळेही वाटली होती. लता, आशाच्या मागून अलका याज्ञिक, साधना सरगम अशा पातळ आवाजाच्या गायिकांच्या मागून जाड्याभरड्या आवाजाच्या सुनिधीने गोग्गोडपणा खूपच कमी केला.
छान
हाही भाग अतिशय आवडला. परवाच एका कार्यक्रमात दिएगो वेलास्केसच्या 'द पोर्ट्रेट ऑफ हुआन दे पारेहा'बद्दल ऐकले होते - त्याबद्दलही वाचायला आवडेल.
>>> त्यातले तपशील बारकाईनं पाहिले तर लक्षात येईल की सेंट पीटर आणि त्याचा क्रूस पेलणारा अशा दोघांच्या पावलांवरची माती चित्रात दिसते.
-- शब्दशः मातीचे पाय :)
व्हेलास्केझ, व्हेलास्केझ आणि व्हेलास्केझ!
>>परवाच एका कार्यक्रमात दिएगो वेलास्केसच्या 'द पोर्ट्रेट ऑफ हुआन दे पारेहा'बद्दल ऐकले होते - त्याबद्दलही वाचायला आवडेल.
![]()
कुणीतरी व्हेलास्केझचं नाव काढलं तरच त्याला पोतडीतून बाहेर काढायचं असं ठरवलं होतं. रुबेन्स आणि बर्निनीचा हा समकालीन, पण या दोघांपेक्षा तो मला खूप भावतो. काही काळ रुबेन्स आणि तो एकाच राजदरबारी काम करत होते. व्यक्तिचित्रणात गुंतागुंत आणि विषयवैविध्य आणण्याची व्हेलास्केझची हातोटी विलक्षण होती. हुआन दे पारेहा त्याचा कृष्णवर्णीय सहाय्यक (गुलाम) होता. कृष्णवर्णीय व्यक्ती एकल व्यक्तिचित्राचा विषय होऊ शकते हे तेव्हा नवीन होतं. त्यात मुळात व्हेलास्केझला तत्कालीन पोप पाचवा इनोसंट ह्याचं चित्र काढायचं होतं. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून त्यानं हे चित्र काढलं असं म्हणतात. पण पोपचं चित्र काढून व्हायच्या आधीच हे चित्र गाजू लागलं. त्याचं प्रथम प्रदर्शन झालं ती जागादेखील खास होती. दर वर्षी रोमच्या धर्मसत्तेच्या अधिष्ठानाखाली एक चित्रप्रदर्शन भरे. खुद्द राफाएलच्या कबरीपाशी हे होई. अशा पवित्र जागेत पोपच्या चित्राऐवजी पूर्वतयारी (स्टडी) म्हणून काढलेलं, आणि तेही एका कृष्णवर्णीयाचं चित्र गाजणं ही केवढी मोठी घटना असेल याचा अंदाज येऊ शकतो. नंतर अर्थात पोपचं चित्रदेखील गाजलं. त्यातला उद्दाम, हेकेखोर किंवा रागीट भाव अगदी सहज लक्षात यावा असा आहे. लाल पार्श्वभूमीवर लाल खुर्चीत लाल वस्त्र पांघरून पोप असला तरीही त्याची भेदक नजर त्या सर्वाला छेदत जाते आणि दर्शकाला भिडते. हे कौशल्य विलक्षण होतं.
![]()
दोन्ही चित्रं १६५० सालची आहेत.
हाडामांसाची माणसं त्यांचे गुणदोष न झाकता, आणि तरीही त्यांच्याविषयी आस्था वाटेल अशी दाखवणं हे व्हेलास्केझच्या वास्तववादाचं मला भावणारं स्वरूप ह्या शारीरिक व्यंग असणाऱ्या माणसाच्या व्यक्तिचित्रातही (१६४५) दिसतं.
![]()
छ्या
(सूचना : पुष्कळ चित्रं असल्यामुळे पान लोड व्हायला वेळ लागतो आहे म्हणून इथे लहान आकारांत चित्रं दिली आहेत. त्यामुळे अधिक तपशीलात चित्र पाहण्यासाठी चित्राचा दुवा वापरा
)
छ्या... या चित्रात 'तसं' काहीही नाही की आवर्जून मोठी करून पहावीत. तशीही चित्रं द्या, त्यांचाही आस्वाद घेऊ. ;-)
बाकी लेखन वाचतो आहे.
रुबेन्स शैली
>मांसल शरीरं दाखवून एक प्रकारचा उत्तान भाव आणण्यात वाकबगार असणाऱ्या ह्या चित्रकाराचं नाव पीटर पॉल रूबेन्स होतं
'फ्रोजन व्हिनस'च्या चित्रात रुबेन्सने शरीराच्या माध्यमातून नेमके काय दाखवले होते याचा एक रोचक व्हिडीओ
काय लिहिणार!.. सगळी माहितीच
काय लिहिणार!.. सगळी माहितीच रोचक आणि नाविन्यपूर्ण आहे.
वाचतोय, बघतोय आणि समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय इतकेच! :)