बाळूगुप्ते
बाळूगुप्ते आमच्या चाळीत रहायचा. चाळ चांगली मोठी होती आणि आमचं बिऱ्हाड त्यांच्यापासून तसं लांबचंच. रोज ज्यांच्या घरांतून मुक्तपणे फिरायचं, रोज जे लायनीत भेटतात, ज्यांच्याकडे वाटीभर साखर उसनी घ्यायला जायचं किंवा 'कोण आलंय त्यांच्याकडे' म्हणून कान टवकारायचे त्या शेजारपाजाऱ्यांपलिकडे. बराच पलिकडे. बरखा ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जाताना अमोघला बोलवायचं असेल तेव्हा कधी गॅलरीत दिसायचा. पण तरीही त्याच्याविषयीच्या काही आठवणी ताज्या आहेत. विशेषतः त्याने माझे दोन भ्रमनिरास केले, ते तर मी कधीच विसरू शकणार नाही. त्यातल्या पहिल्यातून मला निदान काहीतरी शिकायला तरी मिळालं. पण दुसऱ्याविषयी तसंही म्हणता येत नाही.
चाळीत त्याला अगदी पोराटोरांसकट सगळेजण बाळूगुप्ते म्हणून ओळखायचे. एकच शब्द. कधीकधी बाळ्यागुप्ते म्हणण्याइतपतच थोडा बदल. आम्हा पोरांपेक्षा पंचवीसतीस वर्षांनी मोठा असूनही. मीदेखील त्याला कधी आदराने काका वगैरे म्हटलं नाही. 'बाळ्यागुप्तेने शैलूला हरवला. शेवटच्या गेममध्ये काय सॉल्लिड कट मारली. क्वीन या पॉकेटमध्ये आणि ब्रश करून कव्हर त्या पॉकेटमध्ये...' वगैरे आम्ही मित्रांच्यात बोलायचो. पण त्या शब्दाभोवती एक वलय होतं. मोठी लोकं त्याच्याविषयी बोलताना तो कोणीतरी वेगळा असल्याप्रमाणे बोलायचे. लहान मुलाच्या कानाला जेमतेम जाणवण्याइतका फरक. विशेष नाही.
त्याला मी जेव्हा जेव्हा बघितलं आहे ते पांढरा शर्ट आणि काळी पॅंट या वेशातच. त्याच्या खोलीत मी जेव्हा क्वचित बघितलं आहे तेव्हा तो लुंगी आणि मळकी बनियन घालून असायचा. पण जरा लोकांच्यात थोडं मिसळायचं म्हणून बाहेर थोडा बरा जोड घालत असावा. फुलशर्ट, ढगळसरच, न खोचलेला. पॅंट बारीक पायांना वेष्टण घालणारी. एकंदरीत किडकिडीत, पाच फूट पाच इंच बहुधा. गळ्यात एक छोटासा ताईत, आणि हो, त्याकाळी मवाली लोक घालत तसा गाठ मारलेला रुमाल - लाल रंगाचा. शर्टाची वरचं एखाद-दुसरं बटण सोडून दिलेलं. तो कुठच्याही अर्थाने देखणा म्हणावा असा नव्हता. पण काहीतरी आकर्षक होतं त्याच्यात. चेहरा काळसर, रापलेला, काहीसा खडबडीत, पंचकोनी, टोकदार हनुवटी. छानशा मिशा. दाट केस नेहमी मध्यभागी दुभंगलेले. मागून बारीक, पण पुढची झुलपं अधूनमधून मागे करण्यासाठी ठेवलेली.
त्याच्या हालचालींमध्ये एका उत्तम खेळाडूंप्रमाणे ग्रेस होती. असे लोक थोडेच दिसतात, पण दिसतात. बारीक, सडसडीत, आणि तरीही डौलदार. बहुतेकवेळा ते सफाईदारपणे कॅच घेतात, आणि सहज हालचाल करून अपेक्षेपेक्षा वेगाने अचूक थ्रो करतात. तसाच बाळ्यागुप्ते दिसायचा. गच्चीवर पतंग उडवताना पेच लागल्यावर ढील देण्याऐवजी झपाझपा हाताने पतंग खेचून घेताना हाच सराईतपणा, सहजपणा दिसायचा.
त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांत काहीतरी जादू होती. सर्वसाधारणपणे आपल्याला माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून ओळखता येतं की या माणसाचा स्वभाव काय आहे. जगाला वैतागलेले, सतत आपण चूक तर करत नाही असा विचार करत घाबरलेले, चिंताग्रस्त, दुःखी, आढ्यताखोर, गर्विष्ठ असे बरेच चेहरे दिसतात. बाळूगुप्तेचा चेहरा या सर्वांपलिकडचा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक मंदसे धुंदीचे भाव असायचे. आयुष्यात बरंच भोगून आणि सहन करून तृप्त आणि मुक्त झालेल्याने कॅफेत बसून रस्त्यावर हलणारं पॅरिस बघावं तसा सर्व जगाकडे बघायचा. एक उदार जाणतेपणा आणि बालिश मिश्किलपणाच्याही छटा त्यात असायच्या.
पण सगळ्यात पुढे यायची ती मस्त धुंदी. आत्तापर्यंत फार थोडी माणसांमध्ये ही धुंदी टिकून राहिलेली पाहिली आहे. अंगात एक साधासाच कु़डता, हवेत चालल्याप्रमाणे तरंगणारी चाल, पानाने रंगलेलं तोंड, बोटांत स्टायलिश सिगरेट, ओठांत गुणगुणतं गाणं, आणि मनगटाभोवती गजरा शोभून दिसणारे खूप लोक नसतात. बाळ्यागुप्तेला ते शोभून दिसायचं. नुसतं एवढंच नाही, तर कॅरमचा गेम बघत असतानादेखील तो तशाच जगात मश्गुल असल्याप्रमाणे दिसायचा.
बाळूगुप्ते खरा जिवंत व्हायचा तो दसरा-कोजागिरी उत्सवात. हा उत्सव म्हणजे चाळवासियांसाठी वर्षभरातला एक हाय पॉइंट असायचा. पाच दिवस लाउडस्पीकरवर दणाणून सोडणारी गाणी लागायची. लहान मुलांसाठी पाटीपूजन, स्पर्धा, संध्याकाळी मोठ्यांच्या स्पर्धा, नाटकं, पडदा उभारून त्यावर दाखवलेला हिंदी सिनेमा, 'मी अत्रे बोलतोय' किंवा 'अंतरीच्या नाना कळा' सारखे एकपात्री प्रयोग, आणि शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभ. पाच दिवसांच्या या भरगच्च कार्यक्रमाची आमच्यासाठी खरी सुरूवात आधी व्हायची ती कॅरमच्या स्पर्धांमुळे. चाळीत दोन चांगल्या दर्जाचे कॅरम होते. आणि भाग घेणारे पुष्कळ. त्यात सिंगल्स-डबल्स वगैरे उपप्रकारही असायचे. त्यामुळे सगळ्यांचे खेळ पूर्ण करायचे तर दोनतीन आठवडे तरी लागायचे. मग चौकात पहिल्या मजल्यावरच्या राण्यांचा चॅंपियन बोर्ड बाहेर यायचा. एरवी चौकातला दिवा मिणमिणता असला तरी यावेळी कॅरम गरम रहाण्यासाठी चांगला शंभर पॉवरचा दिवा वरून खाली अगदी कॅरमपासून दीड फुटापर्यंत सोडला जायचा. चौकाच्या मोडलेल्या खिडकीतून पाणी किंवा कचरा येऊ नये म्हणून गजांवर गोणपाटाचं कव्हर यायचं. हस्तिदंती स्ट्रायकर बाहेर यायचे. आणि त्या आठ बाय दहाच्या अंधारलेल्या चौकात खेळणारे चौघं, बघणारे वीसेक जण, दिव्याच्या प्रकाशात स्पष्ट दिसणारी बोरीक पावडर, स्ट्रायकर सोंगटीला आपटल्याचे आवाज, आणि कोण जिंकणार याचं टेन्शन दाटून भरून रहायचं. त्या क्षणापुरतं हातात अलगद फिरवला जाणारा स्ट्रायकर, बोटांमधली नाजूक थरथर, आणि स्ट्रायकरसमोर दिसणारी सोंगटी यापलिकडे जग नसायचं. त्या क्षणापुरते चाळीतले कनिष्ठ मध्यमवर्गीय आपलं विश्व विसरून विंबल्डनची मॅच बघणारे इंग्लिश लॉर्ड व्हायचे. कारण त्या हरवलेपणाला जातपात नसते, उच्च-नीच वर्ग नसतो, काखेत घामेजलेला शर्ट आणि फॅशनेबल महागड ब्लेझर हा भेदभाव नसतो. असते फक्त एक धुंदी.
या धुंदीवर तो जोपासला गेला होता. कॅरम ठेवलेला चौक छोटासाच असायचा. त्याच्या रहात्या खोलीइतकीच जागा. थोडी लहान कदाचित. चौकात उतरणाऱ्या जिन्यावर बसलेल्यां किंवा चौकात येणाऱ्या गॅलरीपर्यंत पसरून मान वर करून बघणाऱ्यांची लोकांची जागा हिशोबात घेतली तर कदाचित थोडी मोठी. पण बंदिस्त जागेत जगावेगळा रहाणारा हा मनुष्य या जागेत तेवढ्या वेळपुरतं राज्य करत असे. त्या राज्यातली लाल राणी, आणि काळे पांढरे सैनिक. त्यांना काबीज करणारा स्ट्रायकर. स्ट्रायकरवर स्थिर डोळे आणि नजाकतदार हात. डोळ्यात चालणारी गणितं, स्वतःलाच दिलेली आव्हानं. नाजूक कट मारून किंवा डबलटच करून सोंगटी गेली की मुलगी चांगल्या घरी उजवल्याचं समाधान. या सर्वांभोवती त्याचं आयुष्य घुटमळायचं. मग त्यासाठी दहा बाय दहाचा चौक हे अमर्याद विश्व बनायचं. खिडक्यांना लावलेली गोणपाटं, चौकाच्या भिंतींचे उडलेले पोपडे त्या दिव्यापलिकडच्या अंधारात बुडून जायचे. शिल्लक रहायचा तो फक्त कॅरमवर सोडलेल्या दिव्याचा झगझगीत झोत, एखाद्या आरोपीच्या उलटतपासणीसाठी त्याच्या तोंडावर पोलिस टाकतात तसा. कॅरमचे डोळे दिपवून टाकून त्याच्या अंतर्मनात निरखून पहाणारा. पहाणारांच्या रोखलेल्या श्वासांवर अल्लद तोलून धरलेला स्ट्रायकर, तो ताण धनुष्याच्या दोरीप्रमाणे खेचून धरणारा बोटांचा ताण, आणि स्ट्रायकर सुटल्यावर सोंगटीपर्यंत जाऊन होणाऱ्या जादूने सुटलेला श्वास. गायकाच्या खास लकबीला जाणकार श्रोत्याने दिलेल्या दादेप्रमाणे त्या श्वासाबरोबर सहज सुटणारी वाहवा. हीच ती धुंदी. नऊ बोर्डनंतर खेळ संपायचा पण ताना मनात रुंजी घालाव्यात त्याप्रमाणे ते क्षण अनेकांच्या डोळ्यांमध्ये साठून चाळीच्या खोल्यांमध्ये जेवायला, पाणी भरायला परत जात असत.
ही नशा मीही अनुभवलेली आहे. मीही लहान असताना कॅरम खूप छान खेळायचो. आठवी नववीत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज चार चार तास कॅरम खेळून माझा हात चांगलाच बसलेला होता. आमच्या वयाच्या मित्रांमध्ये सगळ्यात चांगला खेळायचो. कॅरमच्या स्पर्धांत मीही भाग घेतलेला होता. पहिल्या फेऱ्यांमध्ये बहुतेक वेळा हौशे लोकंच सापडतात, तसे मलाही मिळाले. मी दोन राउंड सहज जिंकलो. तिसऱ्या राउंडला जो होता त्याचं नाव मला आठवत नाही आता. पण चाळीतला चांगला प्लेयर होता. नेहमी सेमीफायनलच्या आसपास पोचायचा. आत्ताही तीच परिस्थिती होती, मला हरवलं की सेमीफायनल. त्याच्याबरोबर मी खेळणार म्हटल्यावर घरातल्यांचे चेहरे किंचित उतरलेले दिसले. काहींनी 'राजेश, एकदम टफ फाइट द्यायची बरं का.' असं म्हणून मी हरण्याची तयारी करून ठेवलेली होती. पण अवसान उसनं घेऊन दादाने 'अरे काही काळजी करू नकोस. तू आरामात जिंकशील' हे थोड्याशा अविश्वासानेच म्हटल्याचंही आठवतंय.
आणि मी ती मॅच जिंकलो. दादा आणि ज्योत्स्नाताई ती मॅच बघायला होते. त्या दिवशी माझा हात इतका सफाईने चालू होता, की विचारता सोय नाही. पहिल्या दोन डावांत मी ८-० मागे होतो. पण बोरिक पावडर हातात भिनली, दिव्याने हात थोडा गरम झाला आणि अगदी कठीण कठीण सोंगट्या आपसूक जायला लागल्या. त्यावेळी काहीच भीती नव्हती. सोंगटीला कुठे मारायचं याचा विचार करण्याची गरज पडत नव्हती. नुसतं मनात म्हणायचं, ही सोंगटी त्या पॉकेटमध्ये, आणि त्या दुसऱ्या सोंगटीला किंचित धक्का, स्ट्रायकर सोडून द्यायचा. आणि नेमकं हवं तेच होत होतं. सुरूवातीला त्याचा खेळ बघायला आलेले प्रेक्षक हळूहळू मला पाठिंबा द्यायला लागले. नववीतला पोरगा इतक्या सहज या मोठ्या माणसाला घुमवतोय हे चित्र केव्हाही आकर्षकच असतं. अनेकांनी उत्स्फूर्तपणे माझ्या पाठीवर दिलेल्या शाबासकीतून मलाही त्या दिवशी आपण कोणीतरी खास असल्यासारखं वाटलं.
सेमीफायनलला मॅच होती बाळूगुप्तेबरोबर.
यावेळी मात्र अवसान घेताना पठाणाकडेच जाण्याची पाळी आल्याप्रमाणे परिस्थिती आली. ऐशीच्या दशकात तशीही महागाई प्रचंड, चाळीतल्या मध्यमवर्गाचं पिचलेलं आयुष्य त्यामुळे उसनवारीलाही मर्यादा होती. आणि बाळूगुप्तेचा खेळ मी स्वतः पाहिलेला असल्याने ही उसनवारी फुकटातच जाणार याची कल्पना मला त्या वयातही होती.
डाव सुरू झाला. बाळूगुप्तेचा गेम असला की खूप लोक जमायचे, पण यावेळी मी कसा खेळतो हे बघायलाही काही आले होते. आधीच्या डावाची कीर्ती थोडी पसरल्यामुळे ही सेमीफायनल रंगणार असा विश्वास होता बहुतेक. मला जरा थोडं बरं वाटलं. अंडरडॉगला लोक जास्त उत्तेजन देतात, कौतुक करतात. त्यात मी तर नववीतला पोरगा. म्हणून सगळेजण मला 'राजेश, मस्त खेळायचं बरं का' म्हणत होते. उत्कंठा आधीच ताणल्या होत्या. दुसरी सेमीफायनल आमच्या गेमनंतरच होती. त्यात खेळणारे शैलू आणि संजू देखील बघत उभे होते. आपण जिंकलो तर बाळूगुप्तेला कसं हरवायचं हा विचार करत. त्याच्या खेळाच्या खाचाखोचा पुन्हा एकदा तपासून बघत.
पहिलाच डाव मी जिंकलो. ७ पॉइंट्स. चाळीच्या भाषेत 'बाळूगुप्ते ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गेला'. क्वीन घेताना कव्हरसुद्धा घेण्याचा ट्राय मारायला नको होता. आता माझा ब्रेक होता. पहिला डाव जिंकल्यामुळे मला जरा मोकळं वाटत होतं. आता पुढचे चारही गेम्स त्याने घेऊन २९-७ हरवलं तरीही आता त्यात लाज नव्हती. माझी क्वीन गेली तरी, बोर्ड मिळाला. आता मी ९, बाळूगुप्ते ०. दोन लागोपाठ जिंकल्यामुळे बाळूगुप्तेला टफ फाइट तरी देऊ शकू असं वाटायला लागलं.
आता चौकातली गर्दी वाढायला लागली. मी लहान असल्यामुळे मी घेतलेल्या प्रत्येक सोंगटीबरोबर कौतुकाचा वर्षाव व्हायला लागला. पुढचे दोन बोर्ड बाळूगुप्तेने जिंकले मी एक जिंकला. स्कोअर होता मी १४, बाळूगुप्ते १५. इतक्या बरोबरीत खेळ चालला होता त्यामुळे बघणारे आणखीनच वाढले. लहान मुलं मोठ्यांच्यातून वाट काढून कॅरमच्या जवळ येऊन बघत होते. वरचा जिना पूर्ण भरला होता. माझ्या मागे उभे असलेली कॉलेजमधली पोरं मला चढवत होती. 'ही सोंगटी घेतलीस तर तुला माझ्याकडून एक थम्सअप!' असा ओरडा सुरू होता. अजून दोन बोर्डनंतर स्कोअर होता मी २३, बाळूगुप्ते २२. अजून दोन बोर्ड शिल्लक होते. पण याच बोर्डात मॅच संपण्याची शक्यता होती. कारण २३ वर असल्यामुळे क्वीन कव्हरला ५ पॉइंट होते. बाळूगुप्तेने ब्रेक केला. त्याने सटासट सोंगट्या घेतल्या. क्वीन घेणं काही त्याला पहिल्या फटक्यात जमलं नाही. माझाही हात आता सुंदर चालत होता. बोर्ड संपायची वेळ आली तेव्हा माझ्यासाठी क्वीन, कव्हर आणि बाळूगुप्तेच्या दोन सोंगट्या इतकं शिल्लक होतं. क्वीन किंचित कठीण होती, पण फार नाही. कव्हर हाताखालीच होतं. बाळूगुप्तेची एक सोंगटी माझ्या सोंगटीच्या मागे घट्ट अडकली होती. आणि स्ट्रायकर माझ्या हातात होता.
या दोन सोंगट्या घेतल्या की मी जिंकणार. खरंतर कव्हर सोप्पं असल्यामुळे क्वीन आत गेली की झालं. माझे २९ पॉइंट होणार. मी जिंकणार. कोणीतरी म्हणालं की 'ही क्वीन घेतलीस तर एक थम्सअप आणि एक कॅंपाकोला'
आत्तापर्यंत मी चार थम्सअप आणि दोन कॅंपाकोला मोजले होते. वर्षातून एकदोनदा कधीतरी गोल्डस्पॉट वगैरे मिळण्याच्या काळात एकदम सहा कोल्ड्रिंक्स म्हणजे प्रचंडच होतं. इतका वेळ खेळताना मी जिंकण्याचा विचार केलाच नव्हता. डोळ्यासमोर माझ्या सोंगट्या होत्या, अंगात चढणारी धुंदी आणि पलिकडे माझा आयडॉल. आणि कदाचित त्याचमुळे मी इतका भन्नाट खेळत होतो. सहा कोल्ड्रिंक्स आणि प्रत्यक्ष बाळूगुप्तेबरोबर जिंकण्याची शक्यता ही माझ्या डोळ्यासमोर आली. बक्षिसाचे पन्नास रुपये अजून दूरच होते, पण त्या सगळ्या विचारांनी माझ्यासमोरच्या सोंगट्या किंचित ढळल्या. हातात इतका वेळ न दिसलेली थरथर आली. मध्यभागी असलेल्या क्वीनला कट मारून ती समोरच्या डाव्या पॉकेटमध्ये टाकणं हे माझ्यासाठी काही फार कठीण नव्हतं. दहापैकी नऊवेळा मी सहज मारायचो. आत्ताच मात्र ती दहावी वेळ येईल की काय अशी शंका बळावायला लागली. मी आसपास बघितलं. अंधारलेले चेहरे अंधुक दिसत होते. पण बाळूगुप्ते हरणार बहुतेक इथपर्यंत त्यांच्या मनाची तयारी झालेली होती. क्वीन गेली नाही तर अजून पुढचा डाव आहेच, पण ती गेली तर माझ्या नावाने जल्लोश करायला ते तयार होते. सगळीकडे शांतता पसरली होती. मी आवंढा गिळून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण ती जादू गेल्यासारखं झालं. इतका वेळ असलेला ओघ तुटला होता. आता माझा खेळ सहज, आतून येण्याऐवजी यांत्रिक कौशल्य पणाला लावण्याप्रमाणे होणार होता.
...आणि माझी क्वीन गेली नाही. बाळूगुप्तेच्या चेहेऱ्यावर आनंदापेक्षा काहीसे वेगळेच भाव आले. ते त्यावेळी मला कळले नाहीत. नंतर कळले. त्याने क्वीन-कव्हर घेतलं, डाव मात्र मला मिळाला. मी २४ तो २२.
पण पुढचा डाव मात्र अत्यंत कंटाळवाणा झाला. मला साध्यासाध्या सोंगट्या अर्थातच जात होत्या, पण जराही कठीण सोंगटी घ्यायची का कोण जाणे, भीती वाटत होती. आता मला क्वीन कव्हरची पडली नव्हती. मी पुढे होतो, मला फक्त डाव जिंकायचा होता. तरी माझा टच गेला होता. स्ट्रायकर आपला अवयवच असल्याप्रमाणे पुढे जात नव्हता. हात थरथरत होता. तितक्या कठीण नसलेल्या सोंगट्याही माझ्या हातून चुकल्या. बाळूगुप्तेने क्वीन कव्हरसकट माझ्या चार सोंगट्या वरती ठेवल्या. त्याने गेम जिंकला. लोक काहीशा अपेक्षाभंगाने गेले. तरीही इतकी टफ फाइट दिल्याबद्दल प्रथम बाळूगुप्तेने अभिनंदन केलं. "मस्त खेळलास. ती एक क्वीन घेतली असतीस तर जिंकला असतास" डोळे बारीक करून मऊ हसत तो म्हणाला. "टेन्शन आलं" मी म्हणालो. त्याने फक्त मिष्किल हसून मान हळूवार हलवली. मग माझ्या अगदी जवळ येऊन तो म्हणाला "कसलं? हरण्याचं? की जिंकण्याचं?"
त्या वर्षी बाळूगुप्तेने शैलूला हरवून बक्षीस जिंकलं. मी हरलो तरी इतका चांगला खेळल्याबद्दल खूप लोकांनी कौतुक केलं. किंबहुना त्या मॅचमुळे माझं नाव चाळीत सगळीकडे झालं. "आयला तू बाळूगुप्तेला टेंशन आणलं होतंस. सेकंडलास्ट बोर्डला तो गॅसवर होता" हे खूप जणांनी म्हणून दाखवलं. पुढची बरीच वर्षं हे कौतुक मला पुरलं. त्यानंतर मी चाळीच्या स्पर्धेत दरवेळी भाग घेतलाच असं नाही. हातही तितका बसलेला राहिला नाही. तरीही खेळ फार बिघडला नव्हता. त्यातली धार आणि ग्रेस कमी झाली होती.
कॅरम खेळताना दोन पद्धतींनी खेळता येतो. एक म्हणजे अत्यंत सुरक्षित पद्धत. ज्या सरळसोट सोंगट्या दिसतात त्या घेत जायच्या. बिकट वाट वहिवाट न करता शिस्तबद्धपणे हातच्या सोंगट्या घ्यायच्या. पळतीच्या पाठी हातच्या संपल्याशिवाय लागायचं नाही. आणि त्यातही लाल सोंगटी प्रतिस्पर्ध्याच्या लाईनच्या पलिकडे असेल तर मुकाट्याने रिबाउंड मारून आपल्या बाजूला खेचून घ्यायची. तिला कट मारून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. तसं करताना शिवाय तो स्ट्रायकर रिबाउंड होऊन आपल्या उजव्या भिंतीला चिकटलेलं कव्हरही त्याच वेळी जाईल असा प्रयत्न तर नाहीच करायचा. कारण तो प्रयत्न यशस्वी झाला तर टाळ्या पडतात हे खरं आहे. प्रतिस्पर्ध्याच्या मनातही वचक बसतो. पण चुकला तर क्वीन त्याच्या हातात पडते, आणि आपल्या सोंगटीने त्याला लागलेलं बूचही उघडतं. २९ पॉइंटच्या खेळात ७ पॉइंटचा आपला डाव जाऊन प्रतिस्पर्ध्याला ६ पॉइंट मिळणं म्हणजे १३ चा फरक. हा फारच मोठा धोका झाला. हे धोक्याचं गणित कायम डोक्यात ठेवलं की सर्वसाधारणपणे जिंकणं कठीण नसतं. अगदी जिंकलं नाही तरी सर्वसाधारणपणे 'चांगला खेळतो' अशी प्रतिमा निर्माण करता येते. खेळाच्या शेवटी जिंकलो नाही तरी आपण ठीकठाक खेळलो अशी इतिकर्तव्यता येते.
पण असे खेळाडू फार थोड्या वेळा सर्वोच्च पातळीला पोचतात. एखाद्या सोंगटीवर, तिच्या कठीणपणावर प्रेम करून तिच्यासाठी आख्ख्या डावाची बाजी लावण्याची जिद्द असणाऱ्यांमधूनच जगज्जेते पैदा होतात. कारण हे धोके पत्करले नाहीत तर खेळ विशिष्ट मर्यादेपलिकडे जातच नाही. सरळसोट सोंगट्या घेणं कठीण नसतं, एकदा हात बसला की एक डाव दुसऱ्यासारखाच होतो. पण प्रत्येक नवीन सोंगटी, नवीन पट हे स्वतःच्या कर्तृत्वाला आव्हान समजणारे आणि ते पेलण्याची ईर्षा बाळगणारेच खरे खेळाडू. गायनक्लासात जाऊन, मेहनत करून, हुबेहुब 'ओंकारस्वरूपा, सद्गुरूसमर्था...' म्हणणारे खूप असतात. पण स्वतःचं घराणं वसवणारा वसंतराव देशपांड्यांसारखा विरळाच. वसंतरावांच्या गाण्यातून जी जातीवंत गायकाची ताना पेलण्याची ताकद आणि त्यांना लीलया भिरकावून देण्याची रग दिसते ती फार थोड्यांकडे. बाळूगुप्तेच्या अंगात तशी रग, तशी गुर्मी होती. म्हणूनच त्याचा खेळ बघणं म्हणजे आनंद असायचा. एखाद्या थरारक चित्रपटाप्रमाणे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत असे. त्याच्या सात सोंगट्या वर आहेत, अपोनंटच्या फक्त दोन. त्यातल्या एका सोंगटीमागे क्वीन अडकून आहे, आता काय करणार हा? अशा वेळेला त्याच्यातला कलाकार जागा व्हायचा. एक सरळ सोंगटी घेताना तिसरी आणखीन कठीण करायची पण क्वीनच्या समोरची सोंगटी अलगद सरकवायची. दुसरी घेताना त्या तिसऱ्या कठीण सोंगटीला धक्का मारून ती आपल्या बाजूला आणायची. हातची एक सोंगटी इतक्या जोरात घ्यायची की उजव्या बाजूला चिकटलेली क्वीन हलून वरती येते आणि मग वाटतं, की अरे आता डाव बराच बरा झाला की. बाळूगुप्तेवर दहा अकरा पॉइंट चढणार असं वाटत होतं, आता दोनतीनच चढतील बहुतेक. पण आणखीन एखादी जीवघेणी कट लागते, आणि पुढच्या चार सोंगट्या एकामागोमाग एक सटासट जातात. बाळूगुप्तेला सात पॉइंट मिळतात. आख्ख्या डावात ताणलेले श्वास सुटत ताणत शेवटी मोकळे होतात. दिव्याभोवतीच्या अंधारातल्या कुजबुजीतून, कौतुकाने हलणाऱ्या मानांतून बाळूगुप्ते पुन्हा एकदा अनभिषिक्त सम्राट असल्याचं सिद्ध होतं.
माझा खेळ एकेकाळी असा अमर्याद, बिनधास्त होता. सेहवागच्या बॅटिंगसारखा. आता तो बदलून गेला होता. त्यातली नैसर्गिक सहज न रहाता घासून, मेहनत करून होतो तसा झाला होता. तीनचार वर्षांनी मी आणि माझ्या भावाने डबल्समध्ये भाग घेतला होता. समोर दुसरे भाऊ भाऊ होते. दोन्ही टीम्स तशा तुल्यबळ होत्या. पण का कोण जाणे आमच्या टीमच्या दोघांपैकी कोणाचाच हात नीट चालत नव्हता. पहिल्या तीन डावांतच ०-१६ असे मागे पडलो होतो. माझ्या मागेच बाळूगुप्ते जिन्याच्या तिसऱ्या पायरीवर फाकवलेल्या गुढग्यांवर कोपरं आणि हातावर हनुवटी ठेवून बारीक डोळ्यांनी खेळाकडे बघत होता. अचानक त्याने शेजारच्याकडे वाकून त्याच्या कानात कुजबुजला. 'याचा खेळ फार नॅचरल होता एके काळी.' मला तो आमच्या चौघांपैकी नक्की कोणाविषयी म्हणत होता हे आधी कळलं नाही. पण नंतर तो म्हणाला त्यातलं 'चार वर्षांपूर्वी याला खेळवलं होतं...' इतकंच ऐकलं. आणि काहीतरी मौल्यवान गमावल्याचं दुःख मला झालं. आधीच माझा खेळ काही फार चांगला चालत नव्हता. पुढच्या दोन बोर्डांत हरून मी आणि माझा भाऊ गप्प गप्प घरी गेलो. आता आम्ही चाळीत रहात नसलो तरी जुने रहिवासी असल्यामुळे चाळीच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला चाळीची बिलकुल हरकत नव्हती. संपूर्ण बसच्या प्रवासात आम्ही काही बोललो नाही. भावाला हरल्याबद्दल वाईट वाटत होतं. मला त्यापलिकडे सुन्न झालं होतं. मी बाळूगुप्तेला टफ फाइट दिली हा माझ्या आत्मप्रतिमेचा भाग होता. आता इतक्या दिवसांनी कळतं की त्यात काही विशेष नाही, त्याने खेळवलं म्हणून मी जवळपास जिंकलो. त्या सगळ्याला काही अर्थ नाही म्हणजे. बाळूगुप्तेने केलेला हा माझा पहिला भ्रमनिरास. यातून सावरलो, पण पुढच्या धक्क्यातून मात्र मी बराच काळ सावरलो नाही.
भाऊकाका म्हणजे माझा काका. बाळूगुप्तेचा बालमित्र. त्याच्याप्रमाणेच थोडा रंगेल. पूर्वी एके काळी चाळीत रहायचा पण आता अंधेरीला घर घेतलं होतं. चाळीशी फारसा संबंध शिल्लक नव्हता, पण जिथे तारुण्य घालवलं तिथली नाळ तुटत नाही. बाळूगुप्तेबरोबरची एके काळची मैत्री हा त्याच नाळेचा भाग होता. खरं सांगायचं झालं तर त्यांची मैत्री किती खोलवरची होती याची तितकीशी माहिती मला नव्हती. पण दोघेही आपापल्या परीने मस्त कलंदर होते. बाळूगुप्तेचा कलंदरपणा अजून संपला नव्हता. भाऊकाका मात्र ते योग्य वेळी सर्व मागे सोडून व्यवस्थित मध्यमवर्गीय नोकरीला लागला होता. एका चांगल्या आंतरराष्ट्रीय कंपनीत मिडल मॅनेजमेंटपर्यंत पोचला होता. ऐषोआरामाचं आयुष्य वगैरे नसलं तरी एक स्थैर्य होतं. दैदिप्यमान यश नव्हतं पण व्यवस्थित सरळसोट मार्गावर संसार चालू होता. तारुण्यातला मस्तीच्या खुणा आता त्याच्या सिगरेट धरण्याच्या स्टाइलमधून दिसायच्या. जेवायला सगळे कुटुंबीय जमलेले असताना भाऊकाका सावकाश, दोन बीअर घेऊन थोडी 'भूक वाढवून' यायचा, त्यातून तरुणपणी अनुभवलेल्या धुंदीची आम्हाला कल्पना यायची.
आम्ही दोघं हरलो त्यानंतर दोन चार वर्षांनी भाऊकाका चाळीत आला होता, आणि बोलता बोलता म्हणाला 'बाळ्याला मी सहज हरवीन'. हे ऐकून मला धक्काच बसला. कारण भाऊकाकाशी मी स्वतः बऱ्याच वेळा खेळलेलो होतो. आणि दर वेळी जिंकलो होतो. तो चांगला खेळायचा यात वादच नाही. पण बाळूगुप्तेला च्यॅलेंज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. चाळीतल्या कॅरम स्पर्धा अजून सुरू व्हायच्या होत्या. स्पर्धेचं आयोजन करणारे लोक अशी जुनी रायव्हलरी पुन्हा जागी होणार या कल्पनेने खुश झाली. त्यामुळे चाळ सोडून वीस वर्षं होऊन गेली असली तरी चाळीच्या टूर्नामेंटमध्ये भाग घ्यायला भाऊकाकाला काहीच अडचण पडली नाही.
मॅचच्या आधी चाळीत आमच्या घरी उत्साहाचं वातावरण होतं. भाऊकाका मस्त खेळतो, तेव्हा नक्कीच टफफाइट मॅच होईल असं दादाचं म्हणणं होतं. तर बाळूगुप्ते सहज जिंकेल असं ताईला वाटत होतं. चाळीतल्या कॅरम खेळणाऱ्या तरुण पोरांमध्येसुद्धा थोडं कुतुहल होतं. आमच्या पोरासोरांमध्येही त्या मॅचविषयी बोलणं झाल्याचं आठवतं. इतर पोरांचं मत अर्थातच बाळूगुप्तेला होतं. एकंदरीत चांगलीच हवा तयार झाली होती.
मॅच सुरू झाली तेव्हा भाऊकाका मस्त दोन बीअर चढवून आला होता. बाळूगुप्तेही त्याच्या नेहमीच्या धुंदीत होता. चौक भरगच्च होता. जिन्यावरही गर्दी होती. त्यामुळे वरखाली जाणाऱ्यांना ट्रॅफिक जॅममधून रस्ता काढत काढत चढावं लागत होतं. त्यांच्या काहीतरी खेळकर गप्पा टप्पा झाल्याचं आठवतंय. पन्नाशी ओलांडलेले दोघे जुने दोस्त एकमेकांना प्रेमाने शिव्या घालत, दिलखुलास हसत काहीतरी बोलले. आणि मॅच सुरू झाली.
बाळूगुप्तेबरोबरच्या माझ्या खेळाचे मला दर डावानंतरचे स्कोअर इतक्या वर्षांनी आठवतात. त्या मॅचचे आठवत नाहीत. सुरूवातीला दोघंही जबरा खेळत होते एवढंच आठवतंय. 'आयला, भाऊकाकाने सॉलिड प्रॅक्टिस केलेली दिसत्ये. इतका चांगला खेळताना त्याला कधी बघितला नव्हता.' असा विचार केल्याचंही आठवतं. बाकीचे बारकावे फार लक्षात नाहीत. पण बाळूगुप्तेने केलेला तो माझा दुसरा भ्रमनिरास, म्हणून काहीसा खट्टू होऊन घरी गेलो हे विशेष लक्षात आहे.
भाऊकाकाच्या हातून बाळूगुप्ते हरला. माझ्यासाठी तो मोठा धक्का होता. आपला काका जिंकला याचा आनंद वाटण्याऐवजी बाळूगुप्ते हरला याची रुखरुख लागली. इतके दिवस मी ज्याला माझा हीरो मानलं त्याच्याकडून ही अपेक्षा निश्चितच नव्हती. एक प्रकारची प्रतारणा झाल्यासारखं वाटलं होतं. भाऊकाका त्या दिवशी चांगला खेळत होता हे खरं होतं. तो जिद्दीला पेटला होता हेही नक्की. त्या रात्रीपुरता त्याने आपला गेम उंचावला होता. हातात इतके दिवसांत कधी न दिसलेली सफाई होती. आपल्या तरुणपणाची याद पुन्हा त्याला आली होती. आणि तो त्या धुंदीत परत पोचला होता. बाळूगुप्तेचा खेळ मात्र का कोण जाणे पण काहीसा ओढून आणलेला आठवत होता. पण तरीही प्रतारणेची भावना काही गेली नव्हती. तो गेम जिंकल्यानंतर भाऊकाकाचाही टूर्नामेंटमधला रस गेला होता, कारण पुढची मॅच तो शैलूबरोबर तशी अगदीच सहज हरला.
नंतर विचार करताना मला माझ्या पहिल्या भ्रमनिरासाबद्दल तितकं वाईट वाटलं नाही. मला त्याने खेळवलं यात खरंतर त्याचा मोठेपणाच दिसून येतो. त्याच्या नजरेतून बघितलं तर त्याला समोर बसलेला नववीतला पोऱ्या दिसतो. याच्या खेळात स्पार्क आहे. किती आहे ते तर बघू? ते बघण्याच्या हौशीसाठी सगळा डाव त्याने बाजीवर लावला. एक सोंगटी घेतली तर मी जिंकेन आणि तो हरेल इथपर्यंत त्याने मला येऊ दिलं. त्यावेळी ती सोंगटी घेण्याइतकी माझी तयारी नव्हती. डाव जिंकेन की नाही, याचा विचार त्याने सोडला. मात्र माझ्या मनात ती सोंगटी घेताना त्याच प्रश्नाने ताबा घेतला. आपण डाव जिंकू की नाही या चिंतेपलिकडे जर गेलो नाही तर डाव जिंकणं कठीण जातं हे त्याने मला सांगण्याचा प्रयत्न केला. भाऊकाकाशी खेळताना तो का हरला याचं उत्तर मला पूर्णपणे सापडलेलं नाही. कदाचित त्याचं वय झालं असेल. कदाचित आत्तापर्यंतची धुंदी त्याला भोवली असेल. कारण त्यानंतर तीनचार वर्षांतच तो अकाली गेल्याचं कळलं. पण तरीही एक रुखरुख कायम राहिली.
धुंदीत वाटचाल करतानाही पावलं लडखडत का होईना पण तोल सांभाळायचा असतो या धादांत संसारी सत्याची जाणीव बाळूगुप्तेला त्या खेळाच्या वेळी शिवून गेली का? ही धुंदी नक्की किती ताणता येते? कधीतरी वेडसर तारुण्य सोडून संसारी जबाबदारीचं ओझं पेलण्याची गरज असते का? भाऊकाकाबरोबर खेळताना, 'ही धुंदी वेळीच सुटली असती तर आपलं भलं झालं असतं' असा काही विचार त्याच्या मनाला विटाळून गेला का? भाऊकाकाच्या समोर इतक्या वर्षांनी बसताना, बायकोच्या तुटपुंज्या पगारावर दहा बाय दहाच्या खोलीत चाळकरी मजा मारायच्या ऐवजी सोफिस्टिकेटेड ऑफिसमध्ये टायबिय लावून आपण बॉसची हांजीहांजी करू शकलो असतो, ही त्याला आपली हार वाटली असेल कदाचित. माझ्याकडे दुसरं काय आहे? दहा बाय दहाची खोली आणि हा दहा बाय दहाचा चौक आणि हा तीन बाय तीनचा कॅरम.... मग काही करून हा खेळ तरी जिंकायचा ही ईर्षा निर्माण झाली का त्याच्या मनात? म्हणूनच तो हरला का?
आयुष्यात एकेक सोंगटी कधी जागच्या जागी बसते तर कधी एकही शॉट नीट लागत नाही. कधी कधी जिंकण्याच्या जिद्दीपायीच हरायला होतं. बाळूगुप्तेने मला ते दोनदा शिकवलं. एकदा माझ्या कळत्या आयुष्याच्या सुरूवातीला. दुसऱ्यांदा त्याच्या आयुष्याच्या शेवटी.
पण तो नको होता हरायला भाऊकाकाबरोबर.
विशेषांक प्रकार
लेख
दिवाळी अंकांमधल्या सर्व लिखाणापेक्षा हा लेख थोडा अधिक माझ्या जिव्हाळ्याचा आहे. याच व्यक्तीबद्दल मी अन्यत्र लिहिलेलं आहे. http://www.aisiakshare.com/node/519 . एखाद्या मनस्वी, गुणी माणसाबद्दल त्याच्या संपर्कात आलेल्या दोन वेगवेगळ्या माणसांना आवर्जून लिहावंसं वाटावं, यातच सर्व काही आलं.
स्मरण
मी काल हा घासकडवींचा लेख पाहिला तेव्हाच हा प्रश्न आला होता. तेव्हा अदितीने सांगितलं की, तुम्ही स्वतंत्रपणे लिहिलं आहे. थोडा मोह झाला शोध घेण्याचा, पण न कळत का होईना तुलना होईल आणि ती नको, यास्तव शोध टाळला. आत्ताही तुलना केली नाही. कारण दोन्हीचं स्वतंत्र स्थान आहे. :-)
दोन व्यक्तिचित्रं
लेख स्वतंत्रच आहे. पण त्याची सुरूवात झाली ती मुक्तसुनीतच्या वरच्या लेखामधूनच. त्यावर प्रतिसाद टंकायला लागलो आणि तो इतका मोठा व्हायला लागला की त्याचा स्वतंत्र लेखच बनवायचं ठरवलं. एकाच माणसाला दोघा जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघितलेलं असतं. माणूस तोच असल्यामुळे अर्थातच साम्यं येणारच. पण वेगळ्या प्रसंगांतून उभी रहाणारी चित्रं किंचित वेगळी असतात. त्या माणसाने आपल्यावर काय परिणाम केला याचं चित्रण तर खूपच वेगळं होऊ शकतं.
मात्र व्यक्तिचित्र लिहावंसं वाटावं असंच व्यक्तिमत्व होतं हे खरंच.
+ १
मलाही. पण म्हटलं असतील वेगवेगळी माणसं म्हणत सोडला तो विचार तिथंच.
मस्त लेख. एकदम नॉस्टॅल्जिक करणारा. रात्ररात्र चालणार्या कित्येक कॅरमच्या टूर्नामेंट्स, त्या गाजवणारे कित्येक 'काका'लोक आठवून गेले! झकास.
तिरशिंगरावांसारखंच विचारतो. हे बाळूगुप्ते म्हणजेच 'बाळकृष्ण पंढरीनाथ गुप्ते' का?
काही विशेषणं लावायला नको
काही विशेषणं लावायला नको वाटतं आहे. काही लिहिलं तरी निरर्थकच ठरेल, अशा उंचीवरचा लेख आहे.
पण - शेवटचा (बाळूगुप्तेच्या हरण्याचं विच्छेदन करणारा) परिच्छेद मात्र मला नको इतका स्पष्ट, बटबटीत, रसभंग करणारा वाटला. आधी न बोलता सोडून दिलेलं बरंच काही, तिथे एकदम गर्दी करून आलं नि चांगल्या कवितेखाली तिचं नवनीतछाप रसग्रहण खरडून ठेवल्यासारखं वाटलं. अर्थात हा म्हटलं तर इतक्या अपेक्षा निर्माण करणार्या आधीच्या लेखनाचा गुण.
पण म्हणून चुटपुट काय कमी होत नाही...
start to finish?
लेख फार अावडला, पण मे. भुं. शी सहमत.
हा विषय निघालाच अाहे तर जाणकारांसाठी एक प्रश्न: कॅरममध्ये start to finish हा प्रकार किती अवघड अाहे? म्हणजे प्रत्येक सराईत खेळाडूला हा केव्हातरी साधलेला असतो, की यापेक्षा दुर्मीळ अाहे? त्याचा काही ठरलेला algorithm असतो का? (म्हणजे फोडताना इतक्या जोराने अमूक ठिकाणी मारायचं, त्यानंतर ही सोंगटी असा असा कट मारून घ्यायची इत्यादि…?)
स्टार्ट टु फिनिश
हे तितकं कठीण नाही. साधारण अंदाज द्यायचा झाला तर एखाद्या बॅट्समनला टेस्ट मॅचमध्ये सेंचुरी करणं जितकं कठीण असतं तितपत ते कठीण असतं. मी स्वतः माझ्या आयुष्यात दोनतीन वेळा केलेलं आहे. चांगले कॅरमपटू अधिक नियमितपणे करू शकतात. या मध्ये काही अल्गोरिथम - निदान सोंगट्यांच्या पातळीवर - नसतो. पण पहिला ब्रेक जर चांगला झाला तर दोन सोंगट्या पहिल्या फटक्यात जातात, आणि इतर अनेक आपल्या बाजूला ओढल्या जातात. त्यातल्या काही सरळसाध्या असतात. त्या घेताना इतर सोंगट्यांना धक्के मारून त्या सोप्या सोप्या करत जाणं किंवा लागलेली बुचं काढून टाकणं हे कौशल्याचं काम असतं. पहिल्या पाचसहा सोंगट्या चांगले खेळणारे घेऊ शकतात. पुढच्या कठीण असतात (किंवा कठीण असतात म्हणून त्या नंतरसाठी रहातात). त्या घेताना कधी आक्रमकपणे सगळ्या घेण्याचा प्रयत्न करायचा आणि कधी बचावात्मक खेळून समोरच्याला एक किंवा दोन संधी द्यायच्या हे डावपेच करावे लागतात.
मस्त लेख! "टेन्शन कसलं?
मस्त लेख!
"टेन्शन कसलं? हरण्याचं? कि जिंकण्याचं?" - हे फार आवडून गेलं. जित पेलणं, वाटतं तितकं सोपं नाही. बरेचदा, 'आपण जिंकू शकतो' हा विचारच पेलण्याची आपली ताकद नसते, आणि हातातोंडाशी आलेला विजय आपण घालवून बसतो.