Skip to main content

बाळ्याकाका

हे खरं तर खूप वर्षांपूर्वीचं आहे. तीसेक वर्षं झालीत. ती बिल्डींग, ती शाळा, ते गाव सगळं सगळं काही आउट ऑफ फोकस चित्रासारखं आहे. जवळच्या नात्यातल्या बहुतेक व्यक्ती आहेत; परंतु त्या वर्तुळाबाहेरच्या लोकांना भेटायचा योग आता येत नाही.

बाळ्याकाका हा असाच, जवळच्या वर्तुळापलिकडचाच. नातेवाईक असता तरी जवळच्या वर्तुळात राहिला असता का अशी शंकाच होती. चारपाच घरं पलिकडे रहायचा. आधी मुळात चाळीच्या वस्तीत जागा टीचभर. पण त्यातही परत बाळ्याकाकाचं घर एकाच खोलीचं. या खोलीच्या संसारात तो नि त्याचं कुटुंब. नेहमी जायचा यायचा रस्ता त्याच्या घरावरूनच जायचा. त्यामुळे, एका बाटलीत लावलेल्या मनिप्लँटच्या वेलाचं दर्शन नित्याचं. हा मनिप्लँट चा वेल म्हणजे त्या घराची खासीयत. इतक्या मोठ्ठ्या चाळीत इतका छान वाढलेला हिरवागार वेल त्यांचाच. तो वेल आणि त्या वेलाशेजारी बाल्कनीला उभा असलेला बाळ्याकाका ही माझी लहानपणीची त्याची आठवण. शिडशिडीत उंच, केस मागे वळवलेले, चॉकलेटी रंगाचा कुर्ता, स्वच्छ लुंगी , पायात स्लीपर्स, आणि हो , कधीकधी काळी टोपी ! हातामधे सिग्नेचर संभाजी छाप विडी. एकेकाळी म्हणे तो सिग्रेटी फुकायचा, पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा बिडीच. नेहमी दिलखुलास हसू. "काय रे, आजीने सोडला का तुला खेळायला ?" अशा स्वरूपाचा मिष्किल प्रश्न.

शाळा भरायच्या आधीही तो भेटायचा, सुटल्यावरही. कधी लवकर घरी आलो तरी दुपारीही स्वारी हजर. माझा संबंध त्याच्यापेक्षा त्याच्या मुलांशीच अधिक यायचा, खेळायच्या निमित्ताने. पण एक गोष्ट खरी. इतर मोठ्या माणसांशी भेटण्या-बोलण्यात आणि याच्याशी बोलण्यात फरक जाणवायचा. त्याच्या वयाच्या इतर लोकांप्रमाणे कौटुंबिक चिंतांनी ग्रस्त असा मला तो नॉर्मली कधी दिसला नाही. इतर मोठ्या माणसाना घाई असायची, गडबड असायची. हा "घरीच."

त्याचं दार नेहमीच बंद असायचं आणि आमच्या घरातले मोठे किंवा आजूबाजूचे शेजारी त्याच्याशी आवर्जून बोलायला क्वचितच जायचे. "त्यांच्या घरी जायचं नाही" अशी मला जनरल इन्स्ट्रक्शन असली तरी शेवटी मुलं शेजारच्या मुलांकडे नाही जाणार तर कुठे जाणार. त्याची मुलं माझ्याच वयाची ; त्यामुळे सकाळी दात घासल्या घासल्या आम्ही एकमेकांकडे जायचो. आजीने एकंदर या प्रकाराकडे काणाडोळा करायचंच ठरवलं. त्याची मुलं मला उठवायला यायची : "ए जाड्या, उठ. झोपतोस काय ! चल टेस्ट मॅच खेळायला." टेस्ट मॅच म्हणजे ग्यालरीमधे रबरी बॉल आणि ब्याट घेऊन अंडर आर्म. आम्ही खालच्या मजल्याच्या ग्यालरीला नाव दिले होते "वानखेडे", आमच्या मजल्याला "फिरोजशहा कोटला" आणि वर "ब्रेबॉर्न". "ब्रेबॉर्न" एकेकाळी खेळायला उपलब्ध होतं पण तिकडे एकांनी पाणी भरायचं मोठं पिंप ठेवल्यामुळे ते अगदीच पोपट झालं होतं आणि म्हणून त्याचं नाव "ब्रेबॉर्न". तर बाळ्याची पोरं आमच्याकडे गुळाला मुंगळे लागावे तशी असायची.

पर्यायाने मी देखील बाळ्याकाकाच्या घरी जाणे अपरिहार्यच होते. सकाळी चहाच्या वेळी गेलो तर खारी बिस्कीटं. जेवायच्या वेळी शक्यतो जायचं नाही - नाहीतर हावरट म्हणतील - हा नियम होताच; पण कधीतरी वेळ यायची. गुजराथी आणि बामणी शेजारपाजारपेक्षा अगदी निराळा वास त्यांच्या जेवणाला यायचा : खास सीकेपी मसाला. आणि हो, जेवणात कधी अंडं, कधी मासे , कधी चिकन. बाळ्याकाकाची बायको मूकबधीर - म्हणजे तेव्हाच्या भाषेत मुकी - होती. तिचा उल्लेख नावाने करायच्या ऐवजी "मुकी" असा केला जायचा. हे सगळं आता इतकं खटकतं , पण एरवी प्रेमळ , सज्जन असलेल्या आजूबाजूच्या माणसांनाही खटकायचं नाही. तर मुकी कुठेतरी जायची कामाला. बाळ्याकाकाचं सिंगल खोलीचं घर, त्याची नसलेली नोकरी, त्याच्या बायकोची कधी असलेली- कधी नसलेली नोकरी, त्याच्या मुलांचं म्युनिसिपाल्टी शाळेत जाणं , या सर्व बाबींना लक्षांत घेऊनही, बाळ्याकाकाचं घर आमच्या घराइतकं कळकट , पसारे घातलेलं नसायचं. घरात भांडीकुंडी बेताची, सामान कमीच, पण कसलातरी उच्चभ्रूत्वाचा फील तिथे यायचा खरा. एक बाज होती, पण एकंदर टापटीप.

एखाद्या मुलाला ज्या गोष्टींबद्दल आकर्षण वाटावं असं बाळ्याकाकाकडे काय नव्हतं ? तो माझ्या माहितीतल्या माणसांमधे सर्वोत्कृष्ट पतंग उडवायचा, भोवरे फिरवणे , गोट्या खेळणे, हे त्याने मला दाखवलं. या सर्व कामात त्याची पोरं पटाईत होती. मी जेमतेमच. मुख्य म्हणजे तो आमच्याबरोबर "टेस्ट मॅच" सुद्धा खेळायचा. त्याच्या छोट्या पोराने - ज्याला आम्ही सारे पिल्लू म्हणायचो - त्याने बॉल मारला की "शॉट शॉट शॉट शॉट शॉट" असं म्हणायचा. या माणसाने मला प्रथम बुद्धिबळ दाखवलं. स्पास्की, कारपॉव्ह , कॉर्चिनॉय ही नावं मी प्रथम त्याच्याकडून ऐकली. क्वीन्स गँबिट म्हणजे काय , बुद्धीबळं राजे महाराजे कसे मोठ्ठ्या महालात दासदासींबरोबर खेळायचे याच्या स्टोरीज मी तिथे ऐकल्या. आणि हो, त्याची एक डायरी होती. आम्हाला कधी मिळायची नाही पण एक दोनदा मी पाहिली होती. हिरव्या शाईत , अत्यंत लफ्फेदार अक्षरांत लिहिलेलं "गा़लिब" हे नाव आणि दोन-दोन ओळींच्या हिंदीसदृश भाषेत लिहिलेल्या रचना मी पहिल्यांदा तिथे पाहिल्या. दुसरी तिसरीतल्या मुलाला काय डोंबल कळणार या सगळ्यातलं. पण ते अत्यंत आकर्षक वाटायचं. बाकीची मोठी माणसं कधी बाळ्याकाकासारखं ब्रिल्क्रीम लावायची नाहीत. त्याचा जो चपचपीतपणारहित सुगंध होता तो तेलापेक्षा निश्चितच अधिक आकर्षक होता.

बाळ्याकाकाच्या सहावासातल्या माझ्या बालपणीच्या जेमतेम पाच वर्षांतल्या सहवासातले अनेक प्रसंग अजूनही आठवतात. एकदा चेस खेळत असताना खेळ बाजूला राह्यला आणि तो राजे-बादशहा लोक बुद्धीबळं खेळायचे कसे ते सांगायला लागला. एकदा म्हणे इराणचा बादशहा दिल्लीच्या कुठल्याशा बादशाहाबरोबर बुद्धीबळं खेळायला आला. दोघांनी आपापल्या बेगमा पणाला लावल्या होत्या. दिल्लीचा बादशहा हरायला आला. त्याच्या बेगमेने त्याच्या कानात एक डाव सांगितला. त्या डावात म्हणे आपला हत्ती बळी द्यायचा होता आणि लगेच पुढच्या दोन खेळींमधे मात होती. तो डाव खेळून दिल्लीच्या बादशहाने आपली बेगम वाचवली. "आराम रामत् , पिलो पियाद, पेशकुनो अश्त, किश्त , मात " अशा शब्दांचा फार्सी (हा आमचा नंतरचा अंदाज !) मंत्रही त्याने म्हणून दाखवला; इतकंच काय त्याने त्यावेळच्या "एंडगेम" मधे कुठली प्यादी कुठे होती तेही पटावर मांडलं. आता कल्पना करा , "किलबिल" आणि "भारत माझा देश आहे" यांसारख्या गोष्टींवर वाढलेल्या दुसरी तिसरीतल्या मुलांना हे सगळं किती अजब वाटत असेल ! "मग इराणची बेगम कुठे रहायला लागली ? त्यांनी परत नव्याने लग्न केलं का ?" अशा अर्थाचा प्रश्नही मी विचारल्याचं मला आठवतंय. हे विचारण्याचं धैर्य अर्थातच मी तो बाळ्याकाका होता म्हणूनच केलं हे सांगणे नलगे. तो जोरजोरात हसत होता इतकंही आठवतंय !

राज कपूर त्याचा फेवरीट. त्याची सगळी गाणी त्याला पाठ. आणि हो. हा इसम बासरी आणि सर्वात मेजर म्हणजे बुलबुलतरंग वाजवायचा ! "जाली नोट" , "आवारा" , "उजाला" या सारख्या चित्रपटांची गाणी , त्यांचे किस्से आम्हाला ऐकायला मिळायचे. अमिताभ बच्चनच्या भजनी लागलेल्या आमच्या पोराटोरांना हे सगळं नवलाचं. देवानंद कसा चालतो, दिलीपकुमारचे केस कसे उडतात, मेहबूब खान म्हणजे काय चीज होती याचे धडे मी शिरीष कणेकरांचं लिखाण आणि भाषण ऐकण्याधीच घेतले. पतंग उडवण्यामागे त्याचं एक शास्त्र कसं असतं, ढाल्या पतंग म्हणजे काय, तुडतुड्या म्हणजे काय, ढील देणे, पतंग बदवणे , काटाकाटी , मांजाचे प्रकार, छडी म्हणजे काय, पतंग पकडायची कशी हे सारं तो रसभरित वर्णन करून सांगायचा. संक्रांतीला रात्री त्याने कंदील लावलेला पतंग उडवला तेव्हा मी पाय धरायचा बाकी होतो. काडेपेट्यांना मांजा लावून ग्यालरीच्या या टोकापासून दुसर्‍या टोकाला जाऊन टेलिफोन कसा बनवायचा, भोवर्‍याची हातजाळी कशी घ्यायची हे सांगण्याचं कौशल्य आणि निवांतपणा या गोष्टी त्याच्याकडे होत्या तेवढ्या इतरांकडे कशा असणार.

बाळ्याकाकाच्या सहवासात भरपूर गंमत असतानाच , हा माणूस एक आउटसायडर आहे हे कळत नकळत समजत होतं. (आउटसायडर हा शब्द कोणाच्या लेकाला माहिती होता, ते सगळं नंतर सुचलेलं !) मजल्यावर एकाच कडे असलेल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर मॅच् बघण्याकरता सगळे जमले तरी हा मात्र खिडकीबाहेरून बघायचा. कधी कुणाच्या घरी ऐसपैस बसून गप्पा मारल्यात असं दिसायचं नाही. इतर माणसं त्याला हाडहुड करायची नाहीत पण आम्हा मुलाना न समजलेला एक दुरावा तिथे जाणवायचा. एकदा टिव्हीवर "कलयुग" नावाचा सिनेमा होता. आम्ही तो पाहिला. मी तिसरीत असेन. शशी कपूरच्या निर्मितीसंस्थेने बनवलेली महाभारताच्या थीमवरची एक अत्यंत प्रगल्भ चित्रकृती. सिनेमा संपल्यावर बाळ्याकाकाकडे गेल्यावर तो म्हणाला "सिनेमा समजला का ?" मी म्हणालो "होऽ ! समजला ना". "अरे काय बोंबलायला समजला. मला नाही समजला तर तुला काय समजणारे !"

मात्र आठवड्या पंधरवड्यामधे साधारण दुपारी एक विशिष्ट वेळ अशी यायची ज्यावेळी बाळ्याकाकाकडे ठराविक लोक यायचे. त्यावेळी त्याची मुलं खेळायला बाहेर यायची आणि त्या दुपारी त्यांच्याकडे जाणं मलाच काय त्याच्या मुलानाही अलाऊड नव्हतं. बाळ्याकाकाकडे एका हिरव्यापिवळ्या दांडीला एक काळा पाईप जोडलेला होता आणि वर एक तांब्याचं भोक पडलेलं फुलपात्र होतं. त्याच्या बुंध्यात कसलीतरी हिरवी पावडर तो भरायचा आणि त्याचा धूर त्याच्या घराबाहेर त्या विशिष्ट दुपारी यायचा. बाळ्याकाका या विषयावर बोलायचा नाही, मात्र त्याची पोरं मात्र "बाबा चुंगी चुंगी करताहेत" असं सांगायची ! हा शब्द मी परत कधी ऐकला नाही. माझ्या आयुष्यात पाहिलेला हा पहिला हुक्का. हे इतकं सवयीचं झालं होतं की "ते" लोक दिसले की आपल्याला तिकडे जायचं नाही हे न सांगताच कळलेलं असायचं. मग आख्खी दुपार "टेस्ट मॅच".

ऑल थिंग्ज कम टू अ‍ॅन एंड या न्यायाने, माझं बालपण संपणारच होतं. पण त्याच्या आधीच मला ती शाळा नि गाव सोडून जावं लागलं. जुन्या बिल्डींगच्या , गावाच्या, माणसांच्या आठवणी - विशेषत: पहिल्या वर्षी - प्रचंड यायच्या. त्यात बाळ्याकाकाच्याही. नवीन गावाला जाताना मला बहुतेक सर्वांनी भावपूर्ण निरोप दिला होता, पण बाळ्याकाका यातही नव्हताच. म्हण्टलं ना , तो आउटसायडर होता !

नंतर मी ऐकलं ते फार वाईट होतं. त्याच्याकडे पोलीस येऊन गेले. त्यानंतर काही दिवस म्हणे तो कोठडीत होता. या दरम्यान त्याची तब्येतही बिघडली होती. आणि झाल्या प्रकरणातून तो शेजारपाजारच्या सर्वांशी भांडून बसला होता. माझ्या आजीसारख्या माऊलीलाही जेव्हा काहीतरी लागेलसं बोलला आणि मग मात्र माझी सुटीवर गेल्यावर त्याच्या पोरांशी खेळ्ण्याची पंचाईत झाली. मोठी माणसं भांडली आणि मुस्कटदाबी मात्र झाली लहान पोरांची.

मग कधीतरी बाळ्या गेल्याची खबरही मला मिळाली. तेव्हा तर फोनही नव्हते. मीच सुटीचा कधी गेलो तर कळलं की आता बाळ्याकाका नाही. त्याची मुलं आमच्याकडे फिरून यायला लागली आणि "जाड्या उठ. झोपतोस काय सुटीचा" म्हणून सकाळच्या टेस्ट मॅचेस सुरू झाल्या. एकदा कधीतरी "जीना यहां मरना यहां" आमच्या टिव्हीवर लागलं आणि एकदम बाळ्याकाकाची मुलं रडायला लागली. कलेचा परिणाम प्रत्यक्ष घटनेपेक्षाही अधिक गडद असतो , याचं याहून मोठं उदाहरण मला दुसरं माहिती नाही.

असो. इतकी वर्षं झाली आणि इतक्या हजार मैलांवर, प्रस्तरांवर प्रस्तर चढत गेले तरी "हुई मुद्दत के गा़लिब मर गया पर याद आता है, वो हर इक बात पे कहना, के यूं होता तो क्या होता !"

Node read time
7 minutes
7 minutes

चिंतातुर जंतू Fri, 10/02/2012 - 01:45

लेखन आवडलं. त्या निमित्तानं पुन्हा एकदा काही प्रश्न पडले. अशी काहीशी प्रवाहाबाहेर असणारी, विक्षिप्त मानली जाणारी माणसं मला तरी आजकाल फारशी भेटत नाहीत. पूर्वी ती मध्यमवर्गीय परिसरात (अल्पसंख्य, पण) असायची. आता ती नाहीत हा सार्वत्रिक अनुभव आहे का निव्वळ व्यक्तिगत अनुभव आहे? सार्वत्रिक असेल तर त्यामागचं कारण काय असू शकेल? मध्यमवर्गीय परिसरात आता अशा माणसांना फारसं स्थान नाही का? की अशा माणसांचा विक्षिप्तपणा आता बंद दारांआड राहतो, पण समोर येत नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/02/2012 - 02:56

In reply to by चिंतातुर जंतू

लहानपणी आसपास कोणी असा विक्षिप्त इसम नव्हता तरी माझा एक जवळच रहाणारा लांबच्या नात्यातला एक भाऊ 'इन मेकिंग' होता. मात्र कशीबशी बारावी पास झाल्यानंतर त्याची गाडी फारच घसरली आणि आता त्याच्याबद्दल अशा काही हृद्य आठवणी कोणी लिहेल असं मला वाटत नाही. आता संपर्कही राहिला/ठेवला नाही. लहानपणी मात्र त्याचे कारनामे त्याला हिरो बनवावं असेच असायचे. तो वयाने माझ्यापेक्षा एखाद वर्षानेच मोठा, पण आमच्या बिल्डींगमधली आम्ही सगळी पोरंटोरं त्याचे कारनामे डोळे विस्फारून ऐकायचो आणि पहायचो.

तीन वर्षांचा डिप्लोमा साडेसहा वर्षांनंतर पूर्ण केलेलाही एकजण आमच्या बिल्डींगमधे होता. त्याच्या कॉलेजवयातले प्रसंग असेच विचित्र मानावे असे, मोठ्यांकडून आणि त्याच्याही तोंडून ऐकलेले. पण नंतर तो पुढे सामान्य आयुष्यातच रूळला.

सन्जोप राव Fri, 10/02/2012 - 04:48

लेखन काहीसे अपूर्ण वाटले. लेखकाचे नाव वाचून रुंदावलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्यासारखे वाटले नाही. रॉय च्या तुलनेत बाळ्याकाका किंचित अशक्त, थोडासा उबवलेला वाटला. अशी तुलना करु नये ही मान्य करुनही.
राहता राहिली बाब समाजातल्या अशा 'बाहेरच्या' लोकांची. बाळ्याकाकाला किमान लोकांनी एकटे राहू तरी दिले. एरवी अशा लोकांना खेचून, ओढून कधी एकदा आपल्या धुरळ्यात सामील करुन घेतो असे समाजाला होत असते. 'डिफरंट ड्रमर' हे थोरोचे वाक्य काही लोकांनी लिहायचे आणि काहींनी वाचायचे, इतकेच. बाकी जनता रुमाल उडवत, गुलाल फेकत, ढिच्यांग ढिच्यांग जगत असते. त्यात फेर न धरणारा प्रत्येक जण आउटसायडरच.
समाजातली विक्षिप्तांची संख्या कमी होत आहे का हा चिंतातूर जंतूंचा प्रश्न पटला. समाजातली विक्षिप्तांची संख्या वाढली पाहिजे असे काही दिवसांपूर्वी कुणीतरी केलेले विधान आठवले.

ऋषिकेश Fri, 10/02/2012 - 09:09

लेखन आवडले, व्यक्तिचित्र नीट रेखाटले जाते.. मात्र का कोण जाणे जिवंत होऊन फारसे डोळ्यापुढे उभे राहत नाही. बहुदा अनुभवापेक्षा-प्रसंगांपेक्षा वर्णनात्मक भाग जास्त वाटला ..

चिंजंनी विचारलेल्या प्रश्न मात्र पटला. हल्ली एकुणच समाज साचेबद्ध झालाय (असे निदान वाटते तरी). वैविध्य हे केवळ तुमच्या वैयक्तिक सवयींपुरतं आणि आर्थिक स्तरामुळे आपोआप जे येत असेल तेव्हढंच. 'वेगळेपण' नाकारणे आणि एकाच छापाचे ठोकळे घडणे हा मुक्त अर्थव्यवस्थेचा इफेक्ट-साईडइफेक्ट म्हणावा का? कारण असाव अनुभव फिलिंग मला अमेरिकेतही आलं होतं. एकाच छापाची घरे, रस्ते, इमारती, दुकाने, कपडे आणि माणसे!

मन Fri, 10/02/2012 - 11:02

लेखन आवडले.
बाकी "अरेरे विक्षिप्त कमी झाले हो.आम्हाला बरे वाटावे म्हणून लोकांनी स्वतःचे काहीही करुन घ्यावे हो" किंवा
"अशा भटकलेल्या माणसांमुळेच एक रंग समाजाला येतो हो. असे लोक आसपास हवेत होत" किंवा
"सर्वच मेंढरे ठरवून दिलेल्या एका रेषेत जात असताना एखादेच मेंढरू आपली नवीन वाट चोखाळते, धडपडत, काट्याकुट्यांनी जाउन नवीन मार्गच शोधते व त्याचे इतरांनी अनुकरण केल्यावर तो राजमार्ग होत. तस्मात् अशी बंडखोर मेंढरे समाजात हवीत "
ह्यातली आर्तता, आख्ख्या जगाची चिम्ता करने, वैचित्र्याची आवड आसणे समजू शकतो. पण ह्यापैकी बहुतांशांना असे बाळे आपला फावला वेळ बरा जावा म्हणून आपल्या शेजारच्या घरात हवे असतात असे वाटू लागले आहे.मग त्याच्या घरच्यांचे काही का होइनात किंवा प्रौढ झाल्यावर म्हणा उतारवयात का होइना बाळ्याचे काही का होइनात असा सूर दिसतो. बाळ्याचे कुटुंबीय,आप्त, हितचिंतक म्हणून असा विचार केल्यास "असेच विक्षिप्त व्हावेत " किंवझ "बाळ्याने नाही त्या मार्गावर अशीच उत्तम प्रगती करावी" असे किती जण म्हणू धजतील?
ह्याच्याशी काहिसा संबंधित पण थोडेसे वेगळ्या धाटणीचे उदाहरण म्हणजे जालावरचाhttp://www.mimarathi.net/node/698 हा लेख.

ऐन तारुण्याच्या धुंदित किंवा ध्येयांधळे होउन काहीतरी जगावेगळे रहायची सवय जडाते. धुंदी/नशा/मस्ती उतरताच किम्वा उदात्त ध्येयातील प्रेरना आटू लागताच आयुष्याच्या ऐन संध्याकाळी अशा व्यक्तिंची जी हालत होते, ती आप्तांना बघवत नाही. हीनदीन, लाचार व पश्चातापदग्ध जिणे आता उल्टवता येत नाही. झालेला रोग एक्वेळ बरा होइल हो, पण गेलेला काळ परत आणता येत नाही.
टिपिकल मिडिओकर उतारवयास लागताच "छ्या दिलखुलास जगताच आलं नाही" अशी जी तक्रार चॉकलेटी वातावरणात अन् गलेलठ्ठ पगार घेउन करतात ती स्थिती अशा लाचार जिण्यापेक्षा लाखपट परवडली.इतराम्च्या मनोरंजनासाठी स्वतःची नासाडी अशांनी करुन घेउ नये हेच उत्तम.

एक आमच्या माहितीतले एक काका असेच "मी मनसोक्त मनासारखे जगणार.चारचौघांपेक्षा वेगळे जगणार " असे म्हणत विनोबांच्या मार्गावर व्रतस्थ वगैरे रहायला निघाले होते.धुंदी दोन्-अडीच दशके पुरली पण पन्नाशीला टेकताच त्या "ब्रह्मचारी" माणसाची जी मानसिक अवस्था व जीवन्वैचित्र्य झाली , ती शत्रूचीही होउ नये असे म्हणावे लागले.सभ्यतेच्या नियमांमुळे विस्तृतही लिहिता येत नाही. समजून घ्याल ही आशा. हे एक उदाहरण दुर्दैवाने असे शेकडो आहेत.

माय्-बापाचा सल्ला धुडकावून काही लाख पोरं पोरी रोज मुंबैत येउन धडकतात ते थेट अमिताभ बच्चन वगैरे बनण्यासाठी.काही असे बनतातही, काही "लाफ्टर च्यालेंज"सारख्या शोज् मधून पुढेही येतात. पण इतरांचे काय? कदाचित ते आहे तिथे राहिले असते व मळलेल्या वाटेने गेले असते, तर बरे झाले असते अशीच त्यांची पुढच्या काळात भावना होते.
नाट्यवेड घेउन येणारे सर्वच काही NSD वाले अल्काझी होते नाहीत, नसीरुद्दीन शहाही होत नाहित. कुठेतरी स्पॉट बॉयचे काम करुन त्यांना समाधान मानवे लागते, घरी-गावी असते तर स्थिरस्थावर असू शकलेल्या आयुष्याच्या कल्पना करत. कित्येक उपाशी टाचा घासूनही मरतात.

त्यांचे हे जे काही गौरवीकरण चालू आहे ते म्हणजे फक्त दृष्टीआड सृष्टी ह्या नियमाने सुरु आहे किंवा टाचा घासत मेलेल्या मेंढरांकडे थंडपणे बघण्याचा मुर्दाडपणा आल्यामुळे सुरु आहे असे वाटते.ह्या प्रकारातही कुणाला विनाकारण पोळावे लागते ह्याची कुणालाच कल्पना नाही, हे पाहून आतड्यास पीळ पडतो आहे.ह्यांच्याबद्दद्ल कौतुक असणे म्हणजे "चुलीवरच्या भाकरीची चव कशाला मिळतेय हल्ली" असे म्हणत त्या भाकर्‍या फक्त खाण्याचा अनुभव असलेले लोक नॉस्टेल्जिक होतात तसे वाटते.(साभार Nile) कुणाकडेही अशी वाट भरकटलेली, आप्तदु:खकारक , पीडादायी अवलाद न येवो ह्या माझ्या आख्ख्या मानवजातीला शुभेच्छा.

अंदमानातील उघड्यानागड्या जरावा आदिवासींकडे "ह्यांना (आमच्या मनोरंजानासाठी) असेच उघडे नागडे ठेवा" असे म्हणणे आणि "हे असे लोक असले पाहिजेत" हे स्वतः सुखवस्तू माणसाने म्हणणे एकाच धर्तीवरचे आहे. "आम्ही असेच राहू, तुम्ही आमच्यासाठी तसेच बनून रहा." हे ते टोनिंग आहे.
माझा मूळ स्वभाव हा टिपिकल भारतीय स्वभाव म्हणवला जाणारा emotional fool ह्या प्रकारातला आहे, हे मान्य करुनही हे सांगू इच्छितो की ह्याचा त्रास होण्यासठी तुम्ही भावनिक मूर्ख असलेच पाहिजे असे नाही. संवेदनशील असाल तरी हा त्रास होइलच.

--मनोबा

ऋषिकेश Fri, 10/02/2012 - 11:46

In reply to by मन

त्यांचे हे जे काही गौरवीकरण चालू आहे ते म्हणजे फक्त दृष्टीआड सृष्टी ह्या नियमाने सुरु आहे किंवा टाचा घासत मेलेल्या मेंढरांकडे थंडपणे बघण्याचा मुर्दाडपणा आल्यामुळे सुरु आहे असे वाटते.

हे काहिवेळा बरोबर असावे. मात्र वरील प्रतिक्रीयांतील रोख तसा वाटला नाही.
एखाद्याचा विक्षिप्तपणा हा जसा त्याच्या घरच्यांना भोगावा लागतो तसा तो प्रत्येक 'मोठ्या झालेल्या विक्षिप्तांच्या' घरच्यांना भोगायला लागला आहे. मात्र अनेक 'थोर' हे मुळात विक्षिप्त (सामान्यांपेक्षा वेगळे - चाकोरीबाह्य) होते यावर दुमत नसावे. अश्यावेळी विक्षिप्तांचे कमी होणारे प्रमाणे हे 'थोर' व्यक्ती घटण्याशी डायरेक्टरी प्रपोर्शनल वाटते.

ह्या प्रकारातही कुणाला विनाकारण पोळावे लागते ह्याची कुणालाच कल्पना नाही, हे पाहून आतड्यास पीळ पडतो आहे.

कल्पना नाही असे वाटत नाही. त्याची क्ल्पना असुनही 'प्रवाही व प्रगतीशील' समाज राहण्यासाठी विक्षिप्तांची गरज असतेच असते. नाहितर एकसुरीपणामुळे त्याला डबक्याचे किंवा प्रवाह असुनही नवे प्रवाह तयार न होण्याने नाल्याचे स्वरूप कधी आले कळत नाही

कुणाकडेही अशी वाट भरकटलेली, आप्तदु:खकारक , पीडादायी अवलाद न येवो ह्या माझ्या आख्ख्या मानवजातीला शुभेच्छा.

वेगळी वाट चोखाळणे म्हटल्यावर काहि भरकटणार तर काहि आपल्याबरोबर इतरांनाही भरकटायला लावून तीच मुळ वाट आहे असे भासवणार हे आलेच. तेव्हा ही 'प्रगतीची किंमत' आहे असे वाटते.

अंदमानातील उघड्यानागड्या जरावा आदिवासींकडे "ह्यांना (आमच्या मनोरंजानासाठी) असेच उघडे नागडे ठेवा" असे म्हणणे आणि "हे असे लोक असले पाहिजेत" हे स्वतः सुखवस्तू माणसाने म्हणणे एकाच धर्तीवरचे आहे.

हा प्रश्नच वेगळा आहे. त्यावर वेगळेच लिहावे लागेल तेव्हा इथे लिहित नाही

अर्थात, 'शिवाजी शेजारी व्हावा' तसे 'विक्षिप्तही शेजारीच व्हावेत' असे वाटणे दुर्दैवी असले तरी नैसर्गिक व्यवहारी आहे असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/02/2012 - 23:25

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशशी सहमत.

अचानक काही बदल घडल्यामुळे विक्षिप्तांची संख्याच कमी झाली आहे का? आणि असं असेल तर त्यामागचं कारण काय असेल?
किंवा
असे लोकं अजूनही आहेत, पण आपल्या बंद भिंती-दारांआड आता आपल्या दृष्टीस ते पडत नाहीत?
असा काहीसा जंतूंचा प्रश्न असावा. दोन्ही शक्यतांमधे गेल्या तीसेक वर्षात समाजात काय बदल घडले आहेत याबद्दल किंचित लाऊड थिंकीग असावं असं वाटतं.

"समाजात विक्षिप्तांची संख्या वाढावी" हे अरूण टिकेकरांचं विधान काय किंवा 'शाळा'मधे नरूमामा मुकुंदाला म्हणतो, "यांच्यासारखे लोकं काही करून दाखवतात. घासू आणि चष्मिष्ट पोरांमुळे समाज घडत नाही." यांत फार फरक नाही. तशीही समाजात विक्षिप्तांची संख्या वाढली की एकूण विक्षिप्तपणा चटकन दिसून येणार नाही असं वाटतं. एकाप्रकारे कॉण्ट्रास्ट कमी झाल्यावर चित्र धूसर वाटतं तसं काहीसं.

ऋता Fri, 10/02/2012 - 13:34

छान लिहायला जमलं आहे. लहानपणी भेटलेल्या अशा काही व्यक्तिंची आथवण आली.

............सा… Fri, 10/02/2012 - 19:34

लेख खूपच आवडला. फक्त बाळ्याकाका सीकेपी असल्याचा उल्लेख आवश्यक होता का विचार करते आहे : ) असो तसाही तो उल्लेख व्यक्तीचित्रणाच्या ओघातच आला आहे आणि पूरकच आहे पण तरीही.

मन यांचा प्रतिसाद आवडला.

पैसा Fri, 10/02/2012 - 20:58

आजचा दिवस वसूल झाला! रावसाहेबाना आणि इतर काही जणाना अपूर्ण वाटलेलं हे व्यक्तीचित्र एका ५ ते १० वर्षाच्या मुलाने पाहिलेल्या माणसाचं इतक्या वर्षानी काढलेलं चित्र आहे हे लक्षात घेतलं, तर काहीसा धूसरपणा अपरिहार्य आहे. जेव्हा लोक आपल्याला ६/७ वर्षाचा असतानाचं सगळं लख्ख आठवतं असं म्हणतात, तेव्हा ते किती खरं बोलतात मला तरी शंकाच आहे. कल्पनेने एखादं व्यक्तीचित्र रंगवणं सहज शक्य आहे, पण मग ते सच्चं झालं नसतं. मुसु, बरेच दिवसानी मला आवडेल असं काही लिहिलंत. धन्यवाद!

मी Fri, 10/02/2012 - 23:23

लेख छान आहे, पहिल्यांदा एकदम वपुंच्या जे.के.मालवणकरची आठवण झाली, पण बाळ्याकाकापेक्षा तुमची आठवण म्हणून हा लेख जास्त जाणवतो त्यामुळे जे.के. साधर्म्य फारकाळ टिकत नाही, ते चांगलच आहे.

लेख छान आहे.

राजन बापट Sat, 11/02/2012 - 00:10

इथल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

"बाळ्याकाका" सारख्या व्यक्तीचित्रांमुळे समाजातल्या "मुलखावेगळ्या" माणसांची संख्या कमी होते आहे का, एकंदर समाजाचे सपाटीकरण होत आहे का , आणि अशा स्वरूपाचे सपाटीकरण होणे श्रेयास्पद आहे का , परंपरागत मूल्ये आणि जीवनसरणीच्यापेक्षा वेगळं जगणार्‍यांना किती किंमत मोजावी लागते , एकंदर "सौदा" फारच महाग पडतो का या संबंधातले मतमतांतर वाचनीय झाले आहे.

या स्वरूपाच्या व्यक्तींकडे आणि एकंदर समाजातल्या अशा घटकांकडे बघण्याच्या बाबत "दृष्टी तशी सृष्टी" हे सूत्र राबवणे अपरिहार्य ठरते. बाळ्याकाका आम्हा मुलांकरता - आणि आमच्यापेक्षा कितीतरी अधिक त्याच्या मुलांकरता - काही अत्यंत सुरेख आठवणींचा गुच्छ त्याच्याही नकळत ठेवून गेला हे उघडच आहे. परंतु मूकबधीर पत्नी जमेल तसं काम करून संसार ओढते आहे, चरितार्थ चालवण्याचा कुठलाही विशेष प्रयत्न या व्यक्तीने केलेला नाही, एकंदर आयुष्य आपल्या छंदीफंदीपणामधे काढले ही (बहुदा त्या काळच्या प्रौढवयातल्या व्यक्तींची) निरीक्षणे काही चुकीची नाहीतच. थोडक्यात, आम्हा मुलांकरता एका रम्य दुनियेचा जादूगार असलेला माणूस त्याच काळात एक बेजबाबदार - आणि स्वार्थी - माणूस अशी प्रतिमा वागवत होताच. ज्या व्यक्ती एरवी त्यांच्या कार्यमग्नतेमुळे, आणि एकंदर कष्टांमुळे आम्हा मुलांना उपलब्ध नव्हत्या किंवा फारशा इंटरेस्टींग वाटत नव्हत्या त्या आपापल्या कुटुंबांचे पोट भरण्याकरता आपापल्या प्रकारे कार्यरत होत्याच.

पण निसर्गाप्रमाणे लहान मुलांचे जगही "एमोरल" - नीतीमत्तेच्या संदर्भात निरपेक्ष - असते म्हणतात. हा दृष्टीकोन न्याय्य नाही , पण नक्कीच अधिक रंगीबेरंगी आहे.

सत्तरीच्या दशकापर्यंतच्या आर्थिक व्यवस्थेमधे हा माणूस टिकला; त्याचं कुटुंब मुंबईसारख्या महानगरीमधेही टिकलं. मुलं म्युनिसिपाल्टीमधे का होईना , शिकू शकली. रोज नाही तरी दर रविवारी सामिष आहार करण्याइतपत स्वस्ताई तेव्हा होती. नव्या जगात "बाळ्याकाका" कितपत टिकू शकतील मला शंका आहे. "महागाई" हा शब्द भारतीय संदर्भात आपण चीन-पाकिस्तान युद्धांनंतर सत्तरीमधेही ऐकत होतो; पण आता आपण निश्चितच अधिक उघडपणे मार्केटच्या चढउतारांचा सामना करतो. म्युनिसिपाल्टी शाळांची काय व्यवस्था आहे माहिती नाही, पण रेशनव्यवस्था, सेंटरवर मिळणारं दूध यांच्या सारख्या गोष्टी इतिहासजमा झालेल्या आहेत. नवीन जगात पूर्वीपेक्षा संधी अधिक असतील, बेकारीची समस्या कमी भेडसावत असेल ; पण रिकाम्या माणसाची खैर नाही असं वाटतं खरं.

नगरीनिरंजन Sat, 11/02/2012 - 09:57

व्यक्तिचित्रण आवडले आणि चाकोरी सोडून जगणार्‍यांची गरज आणि त्यांना चुकवावी लागणारी किंमत यावरची चर्चाही आवडली.

नवीन जगात पूर्वीपेक्षा संधी अधिक असतील, बेकारीची समस्या कमी भेडसावत असेल ; पण रिकाम्या माणसाची खैर नाही असं वाटतं खरं.

याच्याशी सहमत आहे. स्टीव जॉब्जचा आदर्श मानणार्‍यांचा जमाना आहे. वेगळं काही करायचं असेल तर आधी भरपूर पैसा कमवा आणि मग काय करायचं ते करा असा नवा व्यवहारी विचार आहे.

नंदन Sat, 11/02/2012 - 10:03

लेख आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा आवडली. 'स्वधर्मे निधनं श्रेयः' इ. कितीही खरे असले तरी परिस्थितीमुळे येणार्‍या मर्यादा, कुटुंबियांवर पडणारा ताण इ. बाबी पाहता हा फार मोठा ग्रे एरिया आहे, हे खरं.

धनंजय Sat, 11/02/2012 - 19:45

व्यक्तिचित्र आवडले. चरसी आणि बॉलिवूडप्रेमी हरितात्याच आहे - स्वप्नरंजनात मुलांना बेगम-बादशहा, राजकपूरचे प्रात्यक्षिक दर्शन देणारा.

परंतु काही वाचकांनी वर म्हटल्याप्रमाणे असेही वाटले : लेखकाला हे अधिक प्रभावी करता आले असते. पण विचार करून कुठला स्पष्ट मुद्दा सापडत नाही. कदाचित मुद्दा हा असेल : माझ्या मनावर लेखाचा प्रभाव होऊ लागतो, ते लेखन लहानपणाच्या आठवणीत थेट आणि प्रामाणिकपणे शिरतो तेव्हा :

तिकडे एकांनी पाणी भरायचं मोठं पिंप ठेवल्यामुळे ते अगदीच पोपट झालं होतं आणि म्हणून त्याचं नाव "ब्रेबॉर्न".

अशा तपशिलांतही त्या लहान मुलाच्या अनुभवांत मला लेखक गोवतो.
पण मधूनमधून आजचा प्रौढ टिप्पणी करतो, तेव्हा त्या लहानपणच्या अनुभवातून खरेपणा कमी होतो म्हणा, किंवा माझी ती मनःस्थिती विचलित होते, म्हणा.

(आउटसायडर हा शब्द कोणाच्या लेकाला माहिती होता, ते सगळं नंतर सुचलेलं !)

परंतु हे मी म्हणतो आहे, ते पश्चाद्बुद्धीने - "काय म्हणून पहिल्या छूटमध्ये मी हवा तितका का गुंतलो नाही?" - यावर अति विचार करून सापडलेले जुजबी उत्तर आहे.

रोचना Mon, 13/02/2012 - 15:32

चांगला लेख आणि चर्चा. वाचायला सुरुवात केली आणि पहिला विचार डोक्यात आला - अरे, डाउन विथ नॉस्टॅल्जिया! (मुसु, ह.घ्या!)

क्षिप्रा Tue, 14/02/2012 - 10:42

लेखन चांगले झालेय. पण व्यक्तीचित्रण न वाटता व्यक्तीवर्णन जास्त वाटलं. मजा आली वाचताना कारण हा विक्षिप्तपणा तसा हल्ली खरंच कमी झालाय की काय असं वाटतं.

मंदार Tue, 14/02/2012 - 21:13

बाळ्याकाका आवडला. अशाच प्रकारच्या वातावरणात लहानपण घालवल्यामुळे आणि अशाच विक्षिप्त व्यक्तींना ओळखत असल्यामुळे लेखातील भावनेशी अधिक जवळीक निर्माण झाल्यासारखी वाटली.

रुपाली जगदाळे Thu, 29/03/2012 - 21:09

व्यक्तिचित्रण आवडले. पण तुमच्या बालपणीच्या आठवणींत, कल्पनाशक्तीने अजून भर घालून बाल्याकाकाच्या स्वभावात थोडे अधिक बारकाव्याने शिरता आले असते असं वाटलं. अर्थात हे फक्त माझे मत, लिहिण्याचे धाडस करतेय..
मला वाटतं, असे विक्षिप्त लोक अजूनही असतात. फक्त त्यांचं विक्षिप्तपण कदाचित बंद दाराआड राहत असावे. कारण समाज अशा लोकांना स्वीकारत नाही, मग एकटे पडण्या ऐवजी ते समाजात मिसळण्याचा प्रयत्न करतात.आणि परदेशात आधीच मुठभर असलेल्या मराठी लोकांच्यात विक्षिप्त वागून अजूनच एकटे पडायची पाळी! मी "समाजाच्या असलेल्या आपल्याकडून अपेक्षा" यावर एक बंडखोर कविता लिहिलेली आहे, कधीतरी पोस्ट करेन.

सन्जोप रावांची प्रतिक्रिया आवडली. आमच्या भागात तर ती एकदम चपलख बसते. ;)

बाकी जनता रुमाल उडवत, गुलाल फेकत, ढिच्यांग ढिच्यांग जगत असते. त्यात फेर न धरणारा प्रत्येक जण आउटसायडरच.>>

राजन बापट Mon, 02/04/2012 - 01:07

In reply to by आतिवास

प्रसंग असा कुठला घडलेला नाही. याआधीसुद्धा एक व्यक्तिचित्र लिहिलेलं होतं. अनेक महिन्यांनी असं काही लिहावंसं वाटलं, इतकंच.

काही व्यक्ती अनेक वर्षांपासून आपल्या मनात रेंगाळत असतात; इतक्या वर्षांनंतरही त्यांच्याबद्दलच्या आठवणी ठसठशीतपणे आपल्यापाशी असतात. कधीतरी मोकळा वेळ मिळाल्यावर आपण त्यांच्याबद्दल लिहू जातो, इतकंच.