Skip to main content

दूरची दिवाळी

संकल्पना

दूरची दिवाळी

- देवदत्त

स्मरणरंजनाला कोणी कितीही नावं ठेवली, तरी आपल्या भूतकाळातील आठवणींचा अक्षय ठेवा असा सहजासहजी विसरणं शक्य नसतं. आजच्या युद्धमान युगातील जीवनसंघर्ष अनुभवणाऱ्या एका मध्यमवयीन मध्यमवर्गीय इसमाने दिवाळीच्या निमित्ताने लिहून काढलेल्या या काही आठवणी. ऐंशीच्या दशकातील मुंबईतील निरागस बालपणाच्या या निरागस आठवणी वाचकांना त्यांच्या बालपणीची अनुभूती देतील अशी आम्ही आशा करतो.

---

माझ्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सुरू होतात त्या नरकचतुर्दशीपासून. भल्या पहाटे उठून आम्ही अभ्यंगस्नान करायचो. फराळाचा सुवास घरी दरवळत असला तरी ओढ लागली असायची ती फटाक्यांची. जायफळयुक्त वाफाळती आयरिश कॉफी पटकन पिऊन आम्ही फटाके फोडायला पळायचो.

सोसायटीतली सगळी मुले-मुली इमारतीच्या मधल्या अंगणात जमायचो. नेहमीप्रमाणे काड्यापेटी आणायला सगळेच विसरायचे. एवढ्यात भाऊ पाध्यांच्या कथेत वर्णन केल्यासारखी एखादी तेजस्वी पणती कोणाच्या घरासमोर दिसली तर खूप आनंद व्हायचा.

फटाक्यांची सुरूवात नेहमी फुलबाज्यांनी करायची असा आमचा अलिखित नियम होता. मग भुईचक्र, अनार असे शोभेचे फटाके उडवायचो. नंतर लवंगांची माळ फोडायचो. शेवटी लक्ष्मीबॉम्ब, सुतळी बॉम्ब, नापाम बॉम्ब यांच्या दणक्यांनी आसमंत हादरून टाकायचो.

किती छान होते ते दिवस!

---

दिवाळीची सुट्टी सुरू झाली की वर्गातली बरीच मुलं गावी जायची. आम्ही काही मुलं मात्र मुंबईतच राहायचो. शाळा चालू असताना पाठ्यपुस्तकं मारूनमुटकून वाचत असलो, तरी दिवाळी अंकांची मात्र आम्ही चातकाच्या चोचीनं वाट बघायचो.
दिवाळीतला पॉकेटमनी फटाक्यांवर खर्च होत असल्यानं इतर खरेदीसाठी आम्ही स्वकमाई करायचो. शेजाऱ्यापाजाऱ्यांचा बाजारहाट करून देणं, पेपरची लाईन टाकणं, मुरूम खणणं, अशी फुटकळ कामं करून आम्ही दोनतीनशे रूपये कमावत असू.

काही दिवाळी अंकांना खूपच मागणी असायची. पेपरवाल्या पोऱ्याकडे रदबदली करूनही किशोर किंवा कुमारचे दिवाळी अंक मिळणं दुरापास्त होतं. मग चंपक, जत्रा, ठकठक हे अंक वाचून दुधाची तहान ताकावर भागवत असू. कधी दहावी दिवाळीचा अप्राप्य अंक मिळालाच तर अधाशासारखा एका बैठकीत वाचून संपवायचो. 'ऐसी अक्षरे'चा अंक वाचण्यासाठी आम्ही अक्षरश: ओढाओढ करायचो. एकदा तर अंक टर्रकन फाटला होता.

विविध देशातल्या परीकथा, शिकारकथा, चित्तरकथा, शब्दकोडी यांनी नटलेले छापील आणि ऑनलाईन दिवाळी अंक आमच्या बालपणीचा आनंदाचा ठेवा होते. तसाच आनंद आजच्या पिढीलाही लाभो, हीच सदिच्छा.

---

दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. आजच्या धकाधकीच्या जीवनात घरी फराळ करायला फारसा कोणाला वेळ नसतो. आमच्या लहानपणी मात्र सगळा फराळ घरचाच असावा असा प्रघात होता.

दिवाळीची सुट्टी लागली की सामुग्री खरेदी करायची जबाबदारी आम्हां मुलांवर असे. विशिष्ट पदार्थात विशिष्ट सामुग्री वापरण्यावर आई आणि आजीचा भर होता. अगदी रोजच्या जेवणातही कोबीच्या भाजीतली चणाडाळ, खिरीतली वेलची, पुलियोगारेतील आमसूल अशा गोष्टी सप्रेंच्या दुकानातूनच घेतल्या जायच्या, तर दिवाळीची काय कथा?

तर, दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यावर भलीमोठी यादी घेऊन आम्ही खरेदीला जात असू. रवा, मैदा, बेसन, भाजणीचं पीठ अशा गोष्टी तर असतच. पण विशिष्ट स्वादासाठी शेंगदाण्यांचं, खोबऱ्याचं, तिळाचं, घोरपडीचं अशी वेगवेगळी तेलंही घ्यावी लागत. खरेदीला जाताना तर आम्ही गप्पा मारत चालत जायचो, पण पिशव्या भरल्यावर मात्र ट्राममध्ये बसून मुंबईची शोभा बघत यायचो.

टीव्हीवर छायागीत वगैरे बघताबघता सगळी धान्यं आणि इतर सामुग्री निवडणे, पाखडणे, खोवणे, टोमणे यांत तीनचार दिवस सहज जात. मग खऱ्या पाकसिद्धीला सुरूवात.

त्या काळात अर्थातच पाईप गॅस नव्हता, आणि गॅस सिलेंडर यायला फार वेळ लागत असे. त्यामुळे दिवाळीचा स्वैपाक आम्ही पेट्रोमॅक्सवरच करायचो. आई आणि आजी तळणी सांभाळत, आणि आम्ही मुले करंज्यांचे सारण भर, जायफळाच्या पीठात रवा घाल, शंकरपाळीच्या लाट्या काप, अशी कामे करत असू.

सगळा फराळ झाला, की टपरवेअरच्या डब्यांमध्ये भरून फडताळात ठेवला जाई. नरकचतुर्दशीपर्यंत डबे उघडले जात नसले, तरी त्या सुवासाच्या आठवणींवरच आम्ही दिवस कंठत असू.

---

दिवाळीचे वेध लागले, की आम्हां मुलांना कंदिलाचं वेड लागायचं. दरवर्षी नवनवीन क्लृप्त्या लढवून आकाशकंदील बनवणं हा आमच्या डाव्या हातचा खेळ होता. कॉलनीत आकाशकंदील स्पर्धेत आमचं रजतपदक कधीच हुकलं नव्हतं.
तर, सुरुवात करायचो ते रंगीत कागद, पुठ्ठा, खळ, चिकलपट्टी, कात्री अशी सामग्री जमवून. मग मंदारदादाला मस्का लावून कॅडवरचं सुबक डिझाईन मिळवायचो. मग सगळेजण मिळून त्या डिझाईनबरहुकूम कापाकापी वगैरे करून एका बैठकीत आम्ही सगळं काम संपवायचो.

जवळपास सगळेजण षटकोनी कंदील बनवत; पण आम्ही मात्र अष्टकोन, गोल, मोबियस स्ट्रिप अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंदील बनवायचो. कधी सुश्राव्य अनुभूती मिळावी यासाठी कंदिलात विंड चाइम्स किंवा ड्रीमकॅचर लावायचो. विविधरंगी झिरमिळ्या लावून आत विजेचा बल्ब किंवा बुन्सेन बर्नर लावला, की कंदील तयार!

---

दिवाळीचा किल्ला करणे हा आम्हां मुलांचा जीव की प्राण होता. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून आम्ही किल्ल्याची तयारी सुरू करत असू.

सर्वप्रथम किल्ल्याचं चित्र काढायचो. अभेद्य तटबंदी, त्याबाहेर खंदक, हेटाळणी बुरूज, मुदपाकखाना, तळघरातील अंधारकोठडी, भुयारी मार्ग हे सगळं सर्वांच्या मनाजोगतं होईपर्यंत रेखाटनं करायला लागायची.

मग आईसक्रीमच्या काड्यांचा सांगाडा तयार करून त्याला चिकणमातीचा लेप देऊन किल्ल्याचा सांगाडा बनवायचो. बाकीचं काम हलक्या हातांनी काळजीपूर्वक करावं लागे. माती वाळून कडक झाल्यावर गेरू, चुना आणि मोरचूद वापरून किल्ल्याला रंग द्यायचो. शेवटी किल्ल्याबाहेरील डोंगरउतारावर गवताच्या बिया पेरून त्यांच्यासाठी ठिबकसिंचनाची सोय करायचो.
किल्ल्याला चुकून कोण्या माणसांचा किंवा कुत्र्या-मांजराचा धक्का लागू नये म्हणून प्लेक्सिग्लासचे आवरण लावायचो. दिवाळीच्या दिवशी किल्ल्याचे अनावरण करून, पीटर डिकॉस्टाच्या घरातील गायी, मेंढ्या, मेंढपाळ वगैरे किल्ल्याबाहेर शोभेसाठी ठेवायचो.

दिवाळीचे चार दिवस दिमाखात मिरवणारा किल्ला, दिवाळीच्या शेवटच्या दिवशी उरल्यासुरल्या फटाक्यांचा वापर करून उद्ध्वस्त करताना फार मजा यायची. म्हणतात ना, ऑल्स वेल दॅट एन्ड्स वेल!

विशेषांक प्रकार

अमुक Fri, 23/11/2018 - 21:03

In reply to by राजेश घासकडवी

सहमत आहे.

हा लेख मुशोसाठी आला, त्या वेळी मला त्यातली अनेक वाक्यं विचित्र वाटल्याने मी चक्क त्या 'सुधारण्या'बाबत शंका विचारल्या होत्या, नि शिफारसी केल्या होत्या. पूर्ण लेखाचा सूर मला कळलाच नव्हता त्या वेळी. मात्र नंतर त्या माझ्याच आकलनातल्या उणिवा असल्याचं ध्यानात आलं नि जाम हसलो; माझ्यावर नि लेखात साधलेल्या दुर्मीळ विनोदामुळे. माझ्या शिफारसी न स्वीकारल्याबद्दल संपादकांचे अभिनंदन नि माझी लेखक-संपादकांप्रति क्षमायाचना. मस्त गंडलो!

एखाद्या गोष्टीकडे विशिष्ट दृष्टीने पाहिल्यावर तीच गोष्ट किती वेगळी दिसते, हे निरीक्षण नवीन नाही. पण इथे नव्याने अनुभवाला आली नि चकित झालो. देवदत्तचे आभार!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/11/2018 - 21:13

In reply to by अमुक

म्हणतात ना, ऑल द्याट एण्ड्स वेल.

या सगळ्यात 'कंदिलात मोबियस स्ट्रिप' वाचून मी सगळ्यात जास्त हसले. वायझेड आहे हा मनुष्य!

बॅटमॅन Fri, 23/11/2018 - 21:30

ट्यूबलाईट अलर्ट.

लेखात कायतर मजा चालूये हे कळतंय पण रेफरन्स, कण्टेक्स्ट, इ. कायच न कळल्याने नीट झेपत नाहीये. तरी कुणा नॉनट्यूबलाईटने जरा पष्ट केले (पूर्ण नाही पण जरा तरी) तरी माशाल्ला.

१४टॅन Fri, 23/11/2018 - 22:16

In reply to by बॅटमॅन

असेच म्हणतो. अगदी लाईट ग्रे ह्यूमर भासतोय, पण ती माझ्याच आकलनातली चूक असावी.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/11/2018 - 22:21

In reply to by बॅटमॅन

वाफाळती आयरिश कॉफी (यात व्हिस्की असते); भाऊ पाध्ये आणि दिवाळी या दोन गोष्टी एकत्र येत नाहीत; नापाम बाँब व्हिएतनाम युद्धातला सगळ्यात दुष्ट बाँब समजला गेला. नापाम बाँबमुळे होणाऱ्या हिंसेचे फोटो अमेरिकी माध्यमांमध्ये छापून आल्यावर व्हिएतनाम युद्धविरोधात जनमत मोठ्या प्रमाणावर तापलं.

दिवाळी अंकांची वाट चातकाच्या चोचीनं बघत नाहीत, पावसाची वाट चातकाची चोच वगैरे; 'ऐसी'चा दिवाळी अंक सातच वर्षं जुना आहे - स्मरणरंजन करण्याएवढा जुना नाही आणि टर्रकन फाडणंही अंमळ कठीण असतं; सध्या स्मरणरंजन करणाऱ्या लोकांच्या लहानपणी ऑनलाईन दिवाळी अंकच काय, आंतरजाल हा प्रकारच नव्हता.

आता बाकीचं आपापलं वाचून पाहा.

राही Fri, 23/11/2018 - 23:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भाऊ पाध्यांची भाषा ही अगदी सडकछाप तत्कालीन बंबैय्या मराठी होती. सुंदर मुलीसाठी ' पणती' हा शब्द त्यांनी पुष्कळ वेळा वापरला आहे. आजच्या ' हिरवळ' सारखा.
नापाम बॉंब, चातकाची चोच हे छान आहेच पण ध्यानीमनी नसताना अचानक घुसलेल्या घोरपडीच्या तेलामुळे मात्र मला जोरदार ठसका लागला. सगळा फराळ घरीच करायचा मात्र भाजणीचे पीठ विकत आणायचे ही सूक्ष्मताही आवडली.आणि ऐशीच्या दशकात ट्राम होती की नाही कोण बघायला गेलंय म्हणून ठोकून देतो ऐसा जे.( हेही खरोखरीच्या ' गेले ते दिवस' छापात असतंच) . ते मुरुम खणणंही तसंच. ठोकुंदेतोऐसाजे.
तसाच तो हेटाळणीबुरुज इतका अचानक समोर आला की नेहमीच्या सरावानुसार टेहळणीबुरुज असेच वाचले डोळ्यांनी. मग बसलेला धक्का सुखद होता. आणि ते पेट्रोमॅक्सवरचे जेवण. पेट्रोमॅक्स हा एक झगझगीत प्रकाशाचा कंदिलविशेष आहे, त्यावर जेवण? आणि तो जायफळाच्या पिठात रवा, शंकरपाळ्यांच्या लाट्या कापणं वगैरे.
अनपेक्षितपणे बसलेल्या अशा धक्क्यांमुळे गंमत वाढली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 24/11/2018 - 02:46

In reply to by राही

कॅड (Auto CAD)वरचं डिझाईन कंदिलासाठी, कंदिलात बुन्सेन बर्नर, मोरचूदाचा (निळा) रंग किल्ल्याला, दिवाळीच्या किल्ल्याला मुदपाकखाना, दिवाळीचा फराळ टपरवेअरमध्ये भरणं, पाककृतींमधलं जिन्नस पाखडणे-खोवणे-टोमणे यांकडेही लक्ष द्या. जुन्या-नव्या, टेक्नोक्रॅट-टेक्नोमंद सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी निवडायला पुरेसे चहाड आहेत.

असे विनोद एरवी किती विनोदी वाटले असते कोण जाणे! पण 'बालगंधर्व' चित्रपटात सुबोध भावे जरदोसी साडी नेसलेला दिसतो; अशा छापाच्या गोष्टी व्यावसायिक कृतींमध्ये दिसतात. त्यावर बरेचदा उत्तर 'सोड ना, किती विचार करतेस' छापाचं असतं. स्मरणरंजन करायचं पण त्यातही अचाट स्वातंत्र्य घ्यायचं, याची टिंगल आहे. दिवाळी अंकाचं निमित्त म्हणून दिवाळीच्या स्मरणरंजनाची गंमत.

'न'वी बाजू Mon, 05/09/2022 - 05:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टीव्हीवर छायागीत वगैरे बघताबघता सगळी धान्यं आणि इतर सामुग्री निवडणे, पाखडणे, खोवणे, टोमणे यांत तीनचार दिवस सहज जात.

करेक्ट मी इफ आय अॅम राँग, परंतु, माझी स्मृती जर मला दगा देत नसेल, तर, ‘छायागीत’ हा प्रकार आठवड्यातून एकच दिवस असायचा ना? (बहुधा गुरुवारी रात्री, नऊ ते साडेनऊच फक्त (चूभूद्याघ्या.)?)

'न'वी बाजू Sat, 24/11/2018 - 08:25

In reply to by राही

तसाच तो हेटाळणीबुरुज इतका अचानक समोर आला की नेहमीच्या सरावानुसार टेहळणीबुरुज असेच वाचले डोळ्यांनी.

कदाचित तो खरोखरच हेटाळणीबुरूज असेल. बोले तो, आत घुसू पाहणाऱ्याच्या टाळक्यावर उकळते तेल नाहीतर वितळलेले शिसे ओतण्यासाठी कदाचित त्याचा उपयोग असेल. (हे नॉर्मल किल्ल्यांमध्येसुद्धा सर्रास चालायचे म्हणतात.) कदाचित, तेल (किंवा शिसे) ओतण्यापूर्वी त्या आगंतुकास वेडावून दाखविण्याची (म्हणून 'हेटाळणी'.) प्रथा असेल. कोण वेडावतेय, म्हणून वर पाहिले, की दिले ओतून.

१४टॅन Fri, 23/11/2018 - 22:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे ते लाईट ग्रे ह्यूमर बरोबरच होतं. चालायचंच. कित्येकदा मनातलं 'हे उत्तर किती फालतू आहे' म्हणून वर्गात गप्प बसल्यावर तेच उत्तर बरोबर असल्याचं कळल्यावर जे व्हायचं ते झालं.

'न'वी बाजू Sat, 24/11/2018 - 07:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(मुंबईतली) ट्राम आणि ऑनलाईन दिवाळी अंक यांचे एकसमयावच्छेदेकरून गुण्यागोविंदाने नांदणे तर रोचकच, परंतु

त्या काळात अर्थातच पाईप गॅस नव्हता,

हीदेखील एक गंमत आहे.

बोले तो, मुंबईत पाईप गॅस पार ब्रिटिशांच्या जमान्यापासून आहे. अर्थात, पुढे जशा ट्राम गेल्या, तद्वत मुंबईतील पाईप गॅस वितरणाची व्याप्तीही बरीच कमी झाली असावी, परंतु पूर्णपणे उच्चाटन झाले नाही. नवीन कनेक्शने देत नसतीलही कदाचित, परंतु लेगसी कनेक्शने पार १९७०-८०च्या दशकांपर्यंत जिवंत होती, असे ऐकिवात आहे; कदाचित अजूनही असतील. थोडक्यात, ज्या काळाचे वर्णन हा लेख करतो (असे वाटते; चूभूद्याघ्या.), त्या काळात मुंबईत अतिशय मर्यादित क्षेत्रात का होईना, परंतु पाईप गॅस निश्चित उपलब्ध होता.

..........

बाकी, ममव जर पुलियोगरै करू लागले, तर त्यात आमसुले पडणे हे स्वाभाविकच आहे. आणि, पेट्रोमॅक्सवर स्वैपाकाचे म्हणाल, तर, मुंबईकर काय वाट्टेल ते करू शकतात - मुंबईकर्स विल बी मुंबईकर्स - त्यामुळे, त्याचेही आश्चर्य वाटावयास नको.

(तूर्तास इत्यलम्|)

राही Sat, 24/11/2018 - 10:35

In reply to by 'न'वी बाजू

लालबाग, परळ, हिंदु कॉलनी या भागांत नळाचा गॅस होता. अगदी १९८०-८५ पर्यंत असावा. पण त्याला पुरेसा दाब नसल्याने तो मंद पेटे म्हणून कित्येकांनी जोडीला गॅस सिलिंडर घेतले होते. जुन्या पाइप्ड गॅसची जोडणी ओट्याला दोन किंवा तीन वायनांसारखी छिद्रे करून त्यातून दिलेली पाहिल्याचे अंधुक आठवते. त्या काळचे ओटे लांबरुंद असावेत कारण कारण सिलिंडरची एक किंवा दोन ' स्टववाली शेगडी' त्या ओट्यावर गुण्यागोविंदाने नांदत असे.
जाता जाता : पुळिओदरै की पुळिओगरै ?

'न'वी बाजू Sat, 24/11/2018 - 20:15

In reply to by राही

जाता जाता : पुळिओदरै की पुळिओगरै ?

विकी पुलिओदरै, पुलिओगरे आणि पुलिहोरा असे तीन विकल्प/पाठभेद दाखवितो. त्यामुळे, टू बी ऑन द सेफर साइड, आपण टॅमरिंड रैस म्हणून त्याची बोळवण केलेली बरी.

सामो Fri, 23/11/2018 - 23:23

मजेशीर आहे. डाव्या हातचा खेळ, सुश्राव्य ड्रीमकॅचर, जायफळाच्या पीठात रवा, मुरूम खणणं, अशी फुटकळ कामं, भूतकाळातील आठवणींचा अक्षय ठेवा :D

अस्वल Sat, 24/11/2018 - 05:53

वर म्हटल्याप्रमाणे प्रचंड टंग इन चीक लेख आहे.

============
मी थोडा कन्फ्यूज झालो - संदर्भ मुद्दाम चुकीचे दिलेत हे कळलं, पण संगती लागली नाही.
मला वाटलं एखादा भविष्यकाळातला मनुष्य निव्वळ ऐकीव माहितीवर "दिवाळी" अशा सणाबद्द्ल हे लिहितोय आणि लिहिताना वहावत गेलाय ..असं वाटलं.
भाऊ पाध्ये वगैरे संदर्भ हुकले :(

अबापट Sat, 24/11/2018 - 06:09

लेखाचं शीर्षक वाचून मी हा लेख वाचणं टाळलं होतं. पण मग लेखकाचं नाव बघून भीत भीत सुरवात केली.
आन लै दंगा झाला ना राव मग.
धमाल आहे हो लेखक. तुम्हाला लाल सलाम

देवदत्त Sat, 24/11/2018 - 06:57

प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. यामुळे हुरूप वाढून अधिक लिहिण्यास प्रोत्साहन मिळेल.

इतर काही हिंट्स:

लवंगांची माळ
पेपरची लाईन टाकणं + पेपरवाल्या पोऱ्याकडे रदबदली
चंपक, जत्रा, ठकठक: जत्रा ?
दहावी दिवाळी (हा दहावीच्या परीक्षेत उत्तम मार्क कसे मिळवावे यासाठीचा अंक असायचा. पाटिवि, बालमोहन, नूमवि इत्यादी शाळांचे प्रिलिमचे पेपर्स वगैरे चित्तथरारक लेखन यात असे)
चित्तरकथा
पुलियोगारेतील आमसूल
रजतपदक (सुवर्णपदक नाही)
ठिबकसिंचनाची सोय
प्लेक्सिग्लासचे आवरण
पीटर डिकॉस्टाच्या घरातील गायी, मेंढ्या, मेंढपाळ (नेटिव्हिटी क्रेडलमधले पुतळे)

राही Sat, 24/11/2018 - 07:39

In reply to by देवदत्त

जत्रा, दहावी दिवाळी,ठिबक सिंचन, नेटिविटी, क्रेडल हे लक्ष्यात आले होते. पण लवंगांची माळ हुकली. मी ते सरावानुसार लवंग्यांची असेच वाचले. स्वत: लाइन टाकत असताना पेपरवाल्या पोराकडे रदबदली हे विचित्र वाटले पण धावत्या वाचनात मेंदूत ठसले नाही. हे अगदी पिकू चित्रपटासारखे झाले. दोनदा पाहिल्यावर काही जागा कळल्या होत्या.
बाकी घोरपड, दहावी दिवाळी, डिकॉस्टा, जत्रा , बुंसेन बर्नर, पेट्रोमॅक्स हे ग्रेटच.
स्मरणरंजन छान उतरलंय. आमचंही रंजन झालंच. पण स्मरणविव्हलता नीट पकडली नाहीय. आणखी काही उसासे, हुंदके चालले असते.
अर्थात एकंदरीत ग्रेटच.

राजेश घासकडवी Sat, 24/11/2018 - 11:21

In reply to by राही

मला वाटतं स्मरणविव्हलता, उसासे मुद्दामच टाळलेले आहेत आहेत. 'त्यावेळी काय मज्जा असायची राव!' म्हणताना त्यावेळचं एक गोग्गोड, 'रवा घातलेल्या जायफळाच्या पिठाच्या लाडवासारखं' चित्र डोळ्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न असतो. या चित्ररंजनाची चेष्टा आहे.

तिरशिंगराव Sat, 24/11/2018 - 10:28

संपूर्ण लेख, प्रतिक्रियांचे गाईड वाचल्यावरच उलगडला. पण तरीही त्यातली, विसंगती हाच का विनोद, असा मनांत प्रश्न उभा राहिलाच! उलगडून सांगितल्यावरही हंसू येत नसेल तर, माझ्याबद्दलच्या डायग्नॉसिसला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली! असो, हे उर्वरित जिणे क्रमप्राप्तच!!!

अस्वल Sat, 24/11/2018 - 11:12

In reply to by तिरशिंगराव

तिरशिंगराव .. तुमच्या चेहेऱ्याचे काही स्नायू थोडे हलले का?

तिरशिंगराव Sat, 24/11/2018 - 20:11

In reply to by अस्वल

नाही हलले स्नायु. पण अदितीचा लेख वाचून बरेच हलले!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 24/11/2018 - 20:52

In reply to by तिरशिंगराव

काल मला 'शाळेच्या मदतीसाठी एक धाव' असलं कायसंसं इमेल आलं. त्यात शाळेची वेबसाईटही आहे. त्या सायटीवर प्रमाणलेखनाच्या चिकार चुका आहेत. त्या काढल्या तर लोक 'जाऊ दे गं, महत्त्वाचं काय आहे ते पाहा' म्हणतील.

इथे प्रतिसादांमध्ये लिहिलेले विनोद हा एक पदर. हा विनोद आहे, या 'चुका' मुद्दाम केल्या आहेत, असं सांगावं लागतं; कारण 'सोडून दे ना', 'चालतंय' असं म्हणणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी नाही. त्या प्रकारांची टिंगल हा दुसरा भाग आहे. देवदत्तनं टिंगल केली तरी त्याच्याकडे सहृदयता आहे; मी थेट गोळ्या झाडते. म्हणूनही मला देवदत्तचे विनोद आवडतात. स्वतःबरोबर मला २४ तास काढावे लागतात; त्यातून थोडी विश्रांती मिळते.

भाऊ Tue, 06/09/2022 - 14:14

अजून एक..
सुरुवात करायचो ते रंगीत कागद, पुठ्ठा, खळ, चिकलपट्टी, कात्री अशी सामग्री जमवून. :)

हे जयदीप यांच्या वर लिहिले असावे. दिवाळी विशेषांकात ते नियमित लिहीतात असे वाटते

तिरशिंगराव Wed, 07/09/2022 - 16:17

हे अशा प्रकारचं, प्रथम वाचताना हंसु येतं, दुसऱ्या वेळेस फक्त चेहेऱ्यावरचे स्नायु हलतात, तिसऱ्या वेळेस मात्र काहीच होत नाही.

'न'वी बाजू Wed, 25/10/2023 - 22:36

In reply to by तिरशिंगराव

Some people laugh thrice at a joke – first, when it is told to them; second, when it is explained to them; and third, when they (finally) get it.

सई केसकर Sun, 24/09/2023 - 22:39

बाकी सगळं ठीक आहे. पण घरी फराळ तयार करायचो असं लिहून नंतर "भाजणीचे पीठ" विकत आणायला बाहेर जायचो असं लिहिल्याने स्मरणरंजनाचा अपमान झाला आहे.
घरी फराळ करणारे लोक भाजणी घरातच खमंग (हा शब्द यायलाच हवा) भाजून ती बाहेरच्या गिरणीतून दळून आणतात. हेच ममव लोक पुढे उमव झाल्यावर (त्यांचे भिकेचे डोहाळे सुटत नाहीत म्हणून) घरघंटी नावाचा एक प्रकार विकत घेऊन भाजणीही घरीच दळू लागतात. त्यातही काही उद्यमशील उमव (residual ममवपणा मिरवायला) ७ रुपये किलोने बिल्डिंगीतल्या इतरांनाही भाजणी दळून देतात. त्यामुळे दिवाळीच्या आसपास लिफ्टमध्ये आयांनी कामाला लावलेली किशोरवयीन मुलं तोंड वाकडं करून दळणाचा डबा घेऊन जाताना दिसतात.
विकतच्या भाजणीच्या चकल्या करणे हे साचे वापरून उकडीचे मोदक करण्यापेक्षाही भयानक आहे. त्यामुळे मी देवदत्त यांचे पाच मार्क कापणार.

'न'वी बाजू Sun, 24/09/2023 - 22:54

In reply to by सई केसकर

पण घरी फराळ तयार करायचो असं लिहून नंतर "भाजणीचे पीठ" विकत आणायला बाहेर जायचो असं लिहिल्याने स्मरणरंजनाचा अपमान झाला आहे.

सॉरी, परंतु, तुम्हाला या लिखाणाचा गाभा, पर्पज़, रेझों द’एत्र वगैरे वगैरे समजलेच नाही, असे खेदपूर्वक परंतु विनम्रतया सुचवावेसे वाटते.

(थोडक्यात, तुम्ही ज्याकडे निर्देश करीत आहा, तो बग नसून फ़ीचर आहे.)

आता कोणाचे मार्क कोणी कापायचे, ते तुम्हीच ठरवा. (तुम्ही निर्देशिलेला मुद्दा माझ्या नजरेतून यापूर्वी सुटला होता खरा, परंतु, तुमच्या जागी जर मी असतो, तर त्याबद्दल पाच मार्क कापण्याऐवजी मी देवदत्त यांना पाच मार्क अधिकचे – बोनस! – दिले असते.)

असो चालायचेच.

सई केसकर Sun, 24/09/2023 - 23:25

बोनस देणार कारण ते पुरुष आहेत. तुम्ही स्त्रियांना अधिक ट्रोल करता असं एक निरीक्षण.

'न'वी बाजू Wed, 25/10/2023 - 22:18

In reply to by सई केसकर

मी कोणालाही ट्रोल करण्यापूर्वी त्यांचे लिंग पाहात नाही.

(असो. देवदत्तच्या (माझ्या मते उत्तम) धाग्यावर (माझे) अधिक अवांतर नको, म्हणून (माझ्याकडून, या प्रतिसादमालिकेपुरता) पूर्णविराम. बाकी तुमचे चालू द्या.)

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 01:53

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)