नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?

नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?
नास्तिक असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुळात आपण नास्तिक आहे कि नाही हे ठरवणे सुद्धा फार अवघड आहे. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा किंवा देवा धर्माचे अस्तित्व न मानणारा माणूस, हा प्रचलित पण फार संकुचित अर्थ झाला. देव न मानणे ह्याकरता निरीश्वरवादी ही संज्ञा आहे, तसच अज्ञेयवादी ही संज्ञा देवाच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका किंवा संशय व्यक्त करणाऱ्यासाठी वापरली जाते. नास्तिक ह्या शब्दाची फोड करून पहावे म्हटले तर देवाचे अस्तित्व नाकारणारा असा अर्थ अनेक ‘जन’ जो काढतात, पण तो ओढून ताणून काढलेला अर्थ वाटतो. नास्तिक ह्याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे ज्या गोष्टीचे अस्तित्व ह्या जगात(भौतिक दृष्ट्या) नाही अशा गोष्टी किंवा संकल्पना नाकारणे होय.
नास्तिक्य( किंवा आस्तिक्य), निरीश्वरवादी आणि अज्ञेयवादी ही भूमिका माणसे निरनिराळ्या कारणाने घेत असतात. म्हणजे “ह्या विश्वात परग्रहवासी आहेत कि नाहीत हे अजूनतरी खात्रीन सांगता येणे मुश्कील आहे...” असे विधान जेव्हा एखादा वैज्ञानिक करतो तेव्हा तो अज्ञेयवादी विधानच करत असतो, पण आपण त्याला लगेच नास्तीक्याशी जोडून पाहत नाही. सगळा घोळ केवळ आणि केवळ देव ईश्वर ह्या एका संकल्पनेपाशी सुरु होतो.धर्म सुद्धा नाही. धर्म नावाच्या गोष्टीचे अस्तित्व समाजामध्ये पुरातन काळापासून आहेच. ज्ञात इतिहासात असा एकाही कालखंड नाही कि ज्यात धर्म आणि त्या अनुषंगाने घडलेल्या घटना/ उत्पात नाहीत.आणि त्याबरोबर हेही खरे कि मानव प्राणी सोडला तर इतर कुठल्याही प्राण्यात धर्म ही संकल्पना नाही. मुळात त्यांच्यात एखादी संकल्पना असणे ( आणि त्याभोवती समजुती, तदनुषंगिक क्रिया कलापांचे कर्मकांडाचे जाळे असणे) ही संकल्पनाच नाही. मग तो प्राणी प्रगत असो वा आदिम, एकलकोंडा असो वा सामाजिक ...
इतर सगळ्या सामाजिक प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये नक्की भेद काय आहे ह्याचा विचार जर करू लागलो तर मला वाटते व्यापार,न्याय आणि धर्म ह्या तीन गोष्टी प्रकर्षाने समोर येतात . मानवाच्या अगदी कुठल्याही आदिम टोळीत ह्या तीन गोष्टी ह्या ना त्या रूपाने अस्तित्वात आहेतच. तसे पाहू जाता मानव हा काही एकमेव किंवा सगळ्यात पहिला प्राणी नाही, समाज करून राहणारा. मुंग्या मधमाशा ह्यासारखे कीटक तर लाखो वर्षापासून समाज व्यवस्थेत राहत आले आहेत त्यात समूहातल्या प्रत्येकाचे स्थान, कार्य निश्चित असते. तसेच सिंह, चित्ते, लांडगे, कुत्रे, माकडं ,हरणं, गवे अशांचे छोटे छोटे समूह किंवा बर्यापैकी मोठे कुटुंब असते ज्यात प्रत्येकाचे काम, पद आणि कुटुंबातली मान ह्याचे निश्चित स्वरूप असले तरी ती व्यवस्था कीटकांच्या इतकी भक्कम आणि अपरिवर्तनीय असत नाही. एखादी कामकरी मुंगी किंवा मधमाशी तिला वाटले म्हणून लढाऊ मुंगी / मधमाशी किंवा राणी मुंगी व्हायची इच्छा करत नाही आणि होतही नाही. त्यामानाने सामाजिक वृत्तीच्या सस्तन प्राण्यात बरीच सहिष्णुता असते. स्वत:ची योग्यता सिद्ध करून एखादा नर किंवा मादी टोळीचा प्रमुख होऊ शकतो आणि आधीच्या प्रमुखाला मारून टाकणे,हाकलून देणे किंवा समुहातच पण निम्नस्तरावर ठेवणे ह्या गोष्टी सर्रास घडतात. अशाच प्रकारच्या घटना माणसाच्या टोळीत-समाजात घडताना आपण सहज पाहू शकतो पण मग माणसात आणि ह्या इतर प्राण्यात फरक तो काय? फक्त जास्त परिष्कृत बुद्धीमत्ता , हत्यारे निर्माण करणे , शेती करणे, इतर उद्योग करणे थोडक्यात तंत्रज्ञान वापरणे एवढाच फरक आहे का? म्हणजे हा फक्त गुणात्मक फरक आहे का. तर नाही. तसे अजिबात नाही. सुरुवातीलाच हे आपण मान्य करू कि मानव हा काही पृथ्वीवरचा सगळ्यात जास्त शक्तीशाली , सगळ्यात जास्त प्रभावशाली किंवा जगण्याच्या स्पर्धेत सगळ्यात जास्त काल टिकून उरलेला प्राणी नाही. पृथ्वीवर जीवन साधारण गेले साडेतीन ते चार अब्ज वर्षे फुलत आहे, आणिआपण ह्या पृथ्वीवर आल्याला जेमतेम तीन ते चार लाख वर्षे झालीत. अगदी ताणून ताणून मागे नेले तरी आपल्या अस्तित्वाचा इतिहास पाच सहा लाख वर्षांच्या मागे जात नाही. मुंग्या माधामाशांसारखे अनेक कीटक, सर्प, मगरी, शार्क ह्यासारखे जीव गेली कोट्यावधी वर्षे ह्या जीवनाच्या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून आहेत त्यांच्या तुलनेत आपण अगदीच लिंबू टिंबू आहोत . त्यातून आपण म्हणजे होमो सेपियन्स साधारण ७० ते ७५ हजार वर्षापूर्वी आफ्रिकेत उद्भवलो आणि हळू हळू सर्व पृथ्वीवर पसरलो. युरोपात असलेले आपले भाई बंद निअंडर्थल मानव अगदी हल्ली म्हणजे साधारण ३०-३५ हजार वर्षापूर्वी नामशेष झाले आणि आपण म्हणजे होमो सेपियन ही मानवाची अख्या पृथ्वीवर शिल्लक असलेली एकमेव जमाती / प्रजाती आहे. दुसरी मानवाची प्रजाती नाही. जरी युरोपियन, आशियाई , मंगोलियन, कोकेशियान असे अनेक मानव वंश असले तरी आपण अजून तरी एकच प्रजाती आहोत.त्यामुळे जगातला कुठला ही निरोगी मानव नर नि:संकोचपणे जगाच्या कुठल्याही निरोगी मादीशी संग करून निरोगी-पुनरुत्पादनक्षम प्रजा उत्पन्न करू शकतो. इतर प्राण्यांचे तसे नाही त्याना आपण एकाच प्रजातीचे आहोत कि नाही हे आधी पाहावे लागेल. {प्राण्यांची एकच प्रजात म्हणजे असे प्राणी कि ज्यात नरमादी एकत्र संग करून पुनरुत्पादनक्षम अशी संतती जन्माला घालू शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर वाघ आणि सिंह हे मांजर कुळातले प्राणी असूनही त्यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत त्यामुळे एखादी वाघीण आणि सिंह एकत्र येऊन पुनरुत्पादन क्षम असे पिल्लू जन्माला घालू शकत नाहीत-जरी असे प्रयोग मानवानी केले आणि अशी संकरीत प्रजाती तयार केली तरी ती पुनरुत्पादन क्षम नव्हती तसेच ती निसर्गात राहून स्वत:चे अन्न स्वत: मिळवण्याच्या योग्यतेचीही नव्हती. त्याना लायगर- सिंह आणि वाघीण ह्यांचे पिल्लू आणि टायलोन-वाघ आणि सिंहीण ह्यांचा बछडा असे नाव आहे. किंवा अगदी प्रचलित उदाहरण म्हणजे घोडा आणि गाढव ह्यांच्या पासून तयार होणारे खेचर – हे कामाला उत्तम असते पण जन्मात: नपुंसक असते त्यामुळे निसर्गात ते स्वत:ची पिल्ले जन्माला घालू शकत नाही.}
पण तरी माणसात आणि इतर सर्व प्राण्यात मुलभूत असा फरक आहे कि गेल्या साडेचार अब्ज वर्षांच्या जीवनाच्या इतिहासात टिकून राहण्याच्या स्पर्धेत एखादी किंवा खरेतर कुठलीच शारीरिक क्षमता/ वैशिष्ट्य न वापरता केवळ बुद्धिमत्ता वापरून माणूस अजून पर्यंत टिकून उरला आहे हे तर झालेच पण त्याने बुद्धिमता वापरून ह्या स्पर्धेतला आता असा एक टप्पा गाठला आहे कि त्याला ह्या स्पर्धेतला एक खेळाडू म्हणून भाग घ्यायची गरज उरली नाही. त्याने निसर्गावरच, ह्या स्पर्धेवर मात करत हळूहळू तो ह्या स्पर्धेत कोण टिकणार, कोण नामशेष होणार! हे ठरवणाऱ्या पंचाच्या भूमिकेत जात आहे. इतर प्राण्यात वनस्पतीत सोयीस्कर बदल घडवून त्यांना आपल्या सोयी प्रमाणे संकरीत करायची प्रक्रिया तो खरेतर गेली किमान १०-१२ हजार वर्षे वापरतोय. पशुपालन शेती आणि औषध निर्मिती हे त्याचेच प्रकट स्वरूप आहे. निसर्गाच्या /जीवनाच्या स्पर्धेत, अव्वल येण्याची ही प्रक्रिया नसून ती आता निसर्गाला आणि जीवनाच्या स्पर्धेलाच आपल्या दावणीला बांधण्याची ही प्रक्रिया झालीये . हे फक्त मानवाने बुद्धेमत्तेच्या जोरावर मिळवलेय. इतर कुणाही प्राण्याला हे जमलेले आहे का?तर उत्तर आहे “नाही” निसर्गात इतर अनेक प्राणी बुद्धीमान आहेत. भरपूर बुद्धिमान आहेत पण तरी ते मानवाने जे मिळवले ते का मिळवू शकले नाहीत? त्यांच्यात सहकार्य करण्याची भावना कमी आहे का? तसे तर अजिबातच नाही. साधी माकडं झाडावर असताना वाघ किंवा बिबट्या येत असेल तर आवाज काढून जमिनीवर चरणाऱ्या हरणाना सावध करतात त्याबदल्यात हरणं त्याना काही मदत करू शकत नसतील तरीही . मग सहकार्य ही देखील ती गोष्ट नाही ...अरे मग काय आहे ती गोष्ट ... नास्तिक्य ह्या विषयावर चालू केलेले हे विवेचन कुठे चालले आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण हे विषयांतर अजिबात नाही . सांगतो कसे ते.
आपण आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्याना अनेक गोष्टी शिकवतो म्हणजे हस्तांदोलन करणे, कोलांट्या उद्या मारणे , तोंडात चेंडू धरून आणणे, मालेत मणी ओवणे वगैरे, हे आपण कसे शिकवतो तर त्याना काही बक्शिश म्हणजे खाऊ देऊन किंवा शाबासकी देऊन. हे बक्षीस आपल्याला त्याला लगेच द्यावे लागते आणि वारंवार असे केले कि त्याला कळते कि ही एखादी गोष्ट केली कि आपल्याला बक्षीस मिळते पण हे बक्षीस भौतिक रुपात आणि लगेच मिळावे लागते . त्याउलट तुमच्या मुलाला तुम्ही सांगू शकता कि तू जर अभ्यास करून परीक्षेत पहिला नंबर आणलास तर तुला मी सायकल घेऊन देईल आणि तो ते ऐकेतो ही. असे करून आपण त्याला एक स्वप्न दाखवतो जे त्याला प्रिय असते किंवा नापास झालास तर शिक्षा करू असेही स्वप्न त्याला दाखवतो जे त्याला प्रिय नसते आपण करत असलेल्या गोष्टीची बक्षिसी आपल्याला भविष्यात मिळेल असा भरवसा त्याला वाटतो. भरवसा विश्वास इतर प्राण्याताही असतो पण तो फक्त ते ज्याना जवळून ओळखत असतात अशांच्या बाबतच असतो अनोळखी माणसाने काही सांगितले म्हणून तुमचा कुत्रा किंवा पोपट त्याचे काही ऐकेलच असे नाही नव्हे ते नाहीच ऐकत. आता प्रत्यक्ष संपर्काने, संनिकर्षाने भरवसा किंवा विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेला साहजिकच मर्यादा आहेत आणि कोणत्याही प्राण्यात अशा भरवशाच्या नात्यांची संख्या फार थोडी असते.
माणसाने मात्र ही प्रक्रिया फार जास्त परिष्कृत केली आहे, पुढे नेली आहे आणि ती इतकी गुंतागुंतीची झाली आहे. पण त्याच बरोबर ती आपल्या हाडी माशी इतकी भिनली आहे कि सहज ओळखू येणे कठीण आहे. दोन कुत्रे अगदी ओळखीचे असले तरी असे नाही होत कि एक कुत्रा दुसर्याला म्हणाला तू तुझ्या पोळीतली अर्धी मला दे कारण मला ही भूक लागली आहे आणि तू माझी भूक भागवलीस तर ते एक पुण्यकर्म असून आपला श्वानदेव तुझ्यावर प्रसन्न होईल आणि श्वानस्वर्गात तुला शेकडो रुचकर पोळ्या मिळतील. असे होऊच शकत नाही. दोन कुत्रे सोडा आपण ही आपल्या कुत्र्याला असे काही सांगू शकत नाही , त्याला ते कळणार नाही आणि पटणार तर अजिबातच नाही. पण माणसात मात्र हे सहजच होते
कागदाच्या एका तुकड्याला काय महत्व असते , पण आपण एका अनोळखी भाजीवाल्याला तो तुकडा देऊन त्याबदल्यात भाजी घेतो आणि तो ही आपल्याला भाजी देतो कारण त्याला खात्री असते कि हा कागदाचा तुकडा तो पुढे वापरून असेच एखाद्या गोष्टीचा व्यवहार करू शकतो. मी पैसे आणि आर्थिक व्यवहाराबद्दल बोलतोय हे शेंबडे पोर पण सांगेल. बहुसंख्य लोक ह्या कागदाच्या तुकड्याचे, त्यावर असलेल्या गवर्नरच्या सहीचे महत्व मान्य करतात म्हणून पैसा, वित्त ही गोष्ट टिकते, आणि व्यवस्थित काम करते. त्यातल्या फार थोड्या लोकांनी त्या गवर्नरला पाहिलेले असते. व्यापार , मोठे मोठे उद्योग, न्यायसंस्था , धर्म संस्था, राष्ट्र, जात-जमात विषयक संस्था ह्या अशाप्रकारे काम करतात. अनेक वेळा त्यात गफलती होतात, त्या संस्था प्रत्येक वेळी त्यानी दाखवलेले स्वप्न, दिलेले आश्वासन पाळत नाहीत, पाळू शकत नाहीत. कंपन्या बुडतात , अर्थव्यवस्था कोसळते , कायदा आणि सुव्यवस्था बिघडते. माणसे ही त्यावर विश्वास न ठेवता पर्याय शोधतात. पण एक गोष्ट निश्चित की ते हे स्वप्न पाहणे आणि आणि ते स्वप्न आपल्याला भविष्यात इच्छित फळ देईल असा विश्वास बाळगणे सोडत नाहीत. एखादा बाबा चालू निघाला कि त्याचे भक्त त्याला सोडतात आणि दुसरा एखादा बाबा पकडतात , हिंदू धर्माला वैतागून कोणी बुद्ध होतात कुणी धर्म आणि देव झुठ आहे म्हणतात.निरीश्वरवादी होतात. पण सगळे जण पैसा त्याचे महत्व मात्र मानतात. पैसा नावाची गोष्ट निसर्गात अस्तित्वात आहे का? नाही. तरी आपण ही संकल्पना घेऊन जगात कुठेही जाऊन वंश, रंग, भाषा, संस्कृती, चालीरीती सगळ्या बाबत अनोळखी असलेल्या माणसाशी व्यवहार करतो.आर्थिक व्यवहार सुरळीत चालू राहतात. तीच गोष्ट न्याय संस्थेची न्याय नावची गोष्ट निसर्गात अस्तित्वात नाही. अपराधाची शिक्षा हा प्रकारही नाही. सिंहांच्या कळपाचा नेता म्हातारा झाला आणि दुसर्या शक्तिशाली नराने त्याला हाकलून त्याचे पुढारपण हिसकावून घेतले कि तो त्याचे बछडे मारतो आणि आपला वंशच चालावा म्हणून त्याच कळपाताल्या माद्यांशी संग करून नवी प्रजा उत्पन्न करतो. त्या माद्याही आपल्या पिल्लाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या त्या खुन्याशी संग करून पुढची पिल जन्माला घालतात. कुठे आहे न्याय? किंवा मुंग्यांच्या मध्ये राणी मुंगी निरनिराळ्या रसायनांच्या साह्याने लाखोच्या संख्येने इतर मुंग्याना गुलाम म्हणून वागवतात. एखादी कामकरी मुंगी बंड किंवा क्रांती करून मुंग्यांचे समाजवादी प्रजासत्ताक स्थापन करत नाही. करू शकत नाही. हवेत तरंगत असलेल्या संकल्पनांच्या आधारे वास्तवातले व्यवहार फक्त मानवच नियंत्रित करतो किंवा करू शकतो/ धर्म आणि अर्थ ह्या त्यातल्या सगळ्यात जास्त यशस्वी संकल्पना आहेत. जगातले बहुसंख्य लोक त्यावर विश्वास ठेवतात म्हणून त्या काम करतात. अर्थात त्याना तसा तो ठेवायला उद्युक्त करायला काही भौतिक फळ द्यावे लागते, एखाद्या देवाला किंवा बाबाला नवसाला पावावे लागते ( म्हणजे तसा आभास निर्माण करावा लागतो किंवा योगायोगाचा आधार घ्यावा लागतो) एखाद्या आर्थिक व्यवहारात माणसाना फायदा व्हावा लागतो. कंपन्यात गुंतवलेल्या भांडवलावर नफा मिळावा लागतो.
ही अत्यंत असाधारण क्षमता फक्त मानवात आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर, संकल्पनेवर विश्वास ठेवून आपले इहलोकातले व्यवहार नियंत्रित करणे म्हणजे आस्तिक्य, हो ना. त्या व्यापक अर्थाने पहिले तर कुणीच नास्तिक असू शकत नाही. हां! तो निरीश्वरवादी, अज्ञेयवादी अगदी अगदी सर्वासंगपरीत्यागी-वैरागी असू शकतो पण नास्तिक नाही ....
मग पुढे काय होणार , नास्तिक्य आणि आस्तिक्य ह्या वादांचा अंत काय होणार त्याबद्दल पुढच्या भागात...
क्रमश:
(सहज आठवलंम्हणून : मागे एकदा शाकाहार मांसाहार ह्या विषयावर लिहिलेल्या लेख निमित्ताने चर्चा ( वाद) करताना एकाने म्हटले होते कि माणूस हा काही मांसाहार करायला उत्क्रांत झालेला नाही. तो आणि त्याचे पूर्वज पूर्वीपासून शाकाहारीच होते आणि आहेत. आता हा लेख शाकाहार मांसाहार ह्या विषयावर नसल्याने पुढचे उत्तर प्रत्त्युत्तर इथे तपशीलात देत नाही पण लक्षात ठेवायचा मुद्दा असा कि माणूस किंवा कोणताही सजीव एखादी गोष्ट करायला किंवा न करायला म्हणून उत्क्रांत होत नाही. ते उत्क्रांतीचे उद्दिष्टच नाही तर एखादी नवीन गोष्ट सजीव करतो (बहुतेक वेळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी म्हणून ) आणि तो उत्क्रांत होतो. थोडे गोंधळाचे वाटेल पण विचार करून बघा, ते असेच आहे .)
--आदित्य
संदर्भ - Sapiens: A Brief History of Humankind- Yuval Noah Harari
हे गोफ जन्मांतरीचे - सुलभा ब्रह्मनाळकर

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुर्वी वेदप्रामाण्य नाकारणार्‍या लोकांना नास्तिक म्हणायचे. आता ईश्वर शब्दाचे वावडे असणार्‍यांना किंवा ईश्वर या संकल्पनेला शत्रू मानणार्‍यांना आणि अश्रद्ध असणार्‍यांना नास्तिक म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घाबरून कोणती कर्मकांड न करणारा प्रॅक्टिकल नास्तीक।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घाबरुन कोणताही 'अच्रतपना' न करणारा, प्रॅक्टिकल ज्यास्ती!(स्वत:ला ज्यादा समजणारा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

If you make human believe either its will benefit or punish them they tend to do it respectively.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रचलित पण फार संकुचित अर्थ झाला

इथपर्यंत वाचल्यावरच शंका आली होती, पण पहिला परिच्छेद वाचून खात्रीच झाली.

"खूप जवळून पाहिलं तर बाईलाही मिश्या दिसतात" या वाक्याची आठवण झाली.

कोणत्याही भौतिक परिणामाचं अचूक मोजमाप करता येत नाही, कारण जे यंत्र वापरून मोजमाप करायचंय ते मोजमाप करण्यासाठी अपुरं तरी असतं किंवा स्वत:च्या गुणधर्मांमुळे जे मोजायचंय त्यावर परिणाम करतं. त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्रांत कोणत्याही गोष्टीची अचूक व्याख्या करणं जवळजवळ अशक्य असतं.

त्यामुळे व्याख्याव्याख्या खेळून काहीही सिद्ध करता येतं. (उदा० मोबाईल हा मोबाईल नाही. क्रिकेट हे क्रिकेट नाही.) कारण लाखात/कोटीत एखादी केस सापडतेच जी व्याख्येला खोटी ठरवू शकते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अस्तिक असण्याचा कंटाळा आला की नास्तिकते कडे जायच अन नास्तिक असण्याचा कंटाळा आला की अस्तिकतेकडे जायच हाय काय आन नाय काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सतत दुसर्याला जज करणे, हेदेखील अज्ञानाचे प्रतीक म्हणावे काय? जिथे (गोंदवलेकर) महाराजानी सांगितलेले आहे कि अनन्यभावाने नामस्मरण करा, ते एक जरी केलेत तरी कल्याण साधेल, तिथे जर आपण आपला बहुमूल्य वेळ परनिंदा , मग ती मनात का होईना करण्यात घालविला, किंवा दुसर्याशी तुलना करण्यात खर्ची केला तर आपल्यासारखे करंटे आपणच. हे सर्व मनास पटते, पण ......................
............................... मन प्रचंड हट्टी असतं आणि नाना क्लुप्ती लढवून, नामी शकला लढवून ते त्याचे म्हणणे गळी उतरवत असते. मग ते प्रतिवाद करते - जर आपण लोकांच्या दोषांकडे दुर्लक्ष केले तर आपणही त्या मार्गाने जाण्याची भीती असते. जज करणे , गुणावगुणांची चिकित्सा करणे हा बुद्धीचा गुणधर्म उत्क्रान्तीचा टप्पाही असू शकतो.

एखादी गोष्ट पटवून देण्यात मग ती खरोखर हिताची असो वा नसो, मनाचा हात कोणीही धरू शकत नाही, हे परत परत, वारंवार लक्षात आलेले आहे. नाम घेणे सुरु केले रे केले की मनाची भुणभुण सुरु होते, आयुष्याच्या सरतेशेवटी कळले की नावात तर रामच नव्हता (पन नॉट इन्टेन्डेड) तर काय? तर काय म्हणजे काय! आभाळ कोसळणार आहे काय? केला प्रयत्न, नाही झाला सफळ. पण सांगायचा मुद्दा हा की मनाकडे सबबींचा तुटवडा अजिबात नाही. आणि विशेष करुन अध्यात्म, व्यायाम अशा बाबतीत तर सबबी अगणीत आहेत. मध्येच पोटशूळ उठल्यासारखा विचार उठतो - अरे जग कुठे चाललय, आपण कशाला धरुन बसलोय. आपण हस्तीदन्ती मनोऱ्यात तर रहात नाही आहोत ना. विशेषत: पूर्वी तर हमखास , अगदी हटकुन होई की स्तोत्रांचे पुस्तक हाती घेतले रे घेतले की 'चालू घडामोडींबद्दलच्या अज्ञानाची हमखास टोचणी लागे. मग ना स्तोत्र धड होई ना करंट अफेअर्स बद्दल वाचन. पण अशा क्षणी होतंय काय ना आपण आस्तिक रहातोय ना पूर्णतः: नास्तिक. या हेलकावे खाण्याचा फार कंटाळा येतो. ईश्वराच्या अस्तित्वाचा एखादा अनुभव यावा असे मनापासून वाटते. तसा काहीसा अनुभव आला.-

माझ्या टीनएजर मुलीचे काही विचार माझ्या विचारांशी जुळत नाहीत. ती ऐकून घ्यायचे नाव घेत नाही व माझी काळजी तर कमी होत नाही. अशा वेळी एक पालक म्हणून, जी चिंता वाटते तिच्यावर उपाय एकच - ईश्वराचे नाव घेऊन , आपल्या अपत्यास सद्बुद्धी देण्याची हात जोडून प्रार्थना करणे. ज्येष्ठ प्रतिपदेपासून, म्हणजे २-३ दिवसांपूर्वी मी रोज संध्याकाळी आंघोळ करून विष्णुसहस्रनाम म्हणणे चालू केलेले आहे. एक अनुभव आला. जो की मानला तर अनुभव आहे म्हटली तर क्षुल्लक गोष्ट आहे. शेवटी घटनांची सांगड लावण्याचे स्वातंत्र्य निसर्गाने, ईश्वराने आपल्याला प्रत्येकाला दिलेले आहे. आणि घडलेली शुभ घटना, मी एक ईश्वरी कृपेचे प्रतीक मानते. शेवटी ईश्वर काही आपल्याला येऊन कानात सांगणार नसतो की त्याची कृपादृष्टी आहे. आपणच ते अंतर्श्रवणेंद्रियानी जाणून घ्यायचे असते. एक एवढेच लक्षात आले, की त्याचे आमच्याकडे लक्ष आहे. आणि मानसिक बळ वाढले.

फेसबुकवरति एक तर कमीत कमी नेटवर्किंग ठेवलेले आहे आणि प्रकृतीस अनुकुल असे रामनाम , नामस्मरण, अनुभूती वगैरे ग्रुप जॉइन केलेले आहेत. अतिशय एन्जॉयेबल ग्रुप्स आहेत. एकेक स्तोत्रवषयक अनुभव, ऐकुन अंगावर अक्षरक्ष: काटा येतो. भक्तीभावविषयक खरच उत्तम विचार कानी पडतात. याचा अर्थ सर्व आयुष्य अगदी धुतल्या तांद्ळासारखं शुभ्र , स्वच्छ चालले आहे असे नाही. पॉर्न पहाणे, आहारावर नियंत्रण नसणे, पटकन राग येणे, "दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही" म्हणतात तो प्रकार असे नाना विकार आहेतच. पण आयुष्य बरे चालले आहे. टचवुड!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आस्तिक' या शब्दाचा आणि 'देव' ही संकल्पना यांचा दुरान्वे सुद्धा संबंध नाही! जो वेदांना मानत नाही, वेदप्रामाण्य अमान्य करतो तो नास्तिक, असे साधे सोपे गणित आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचा आणि विचार करा!