माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.

विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे. माझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे'  ते त्याकरिताच.

मला वाचनाचं वेड कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण अवांतर वाचनाला सुरवात केली तेव्हा मी चौथी पाचवीत वगैरे असेन. मी मराठी माध्यमातून शिकलोय. माझ्या अवांतर वाचनाला हातभार लावला तो आमच्या शाळेतल्या लायब्ररीयन बाईंनी. त्या बाईंचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. इतर विद्यार्थ्यांना त्या बाई आपल्या टेबलावर परत आलेलीच पुस्तकेच इतरांना देत. पण माझे वाचनाचे वेड पाहून त्या मला खास उशिरा बोलवत. मी उशिरा गेलो की मग त्या मी सांगेल ते कपाट उघडून मला पुस्तकं चाळू देत. आणि मला आवडेल ते पुस्तक माझ्या नावावर मला देत. इतरांना सात दिवसातून एक पुस्तक मिळे तर त्या मला रोज एक पुस्तक वाचायला देत. ५ वी ते १० पर्यंत आमच्या शाळेतल्या लायब्ररीमधील वीसेक कपाटातली एकूणएक पुस्तकं माझी वाचून झाली होती. अगदी भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी यांच्या बालसाहित्यापासून ते गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथासंग्रहापर्यंत लहानथोर लेखकांची सर्व पुस्तके मी वाचून काढली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी एका कपाटावर एकावर एक रचून ठेवलेली यजुर्वेद, सामवेद आणि भगवद्गीता यांची पाच सहा किलो वजनाची गलेलठ्ठ पुस्तकं वाचायला मागितली. त्या लायब्ररीयन बाईंनी मला कोपरापासून हात जोडले. "बाळा रे! हे सर्व वाचण्याचं तुझं आता वय नाहीये". त्यावेळी उठता, बसता, जेवता माझ्या हातात गोष्टींचं पुस्तक असे. माझे वडील माझ्यावर चिडत. "अरे! जरा जेवणाकडे लक्ष दे, नाहीतर नाकात घास जाईल". रस्त्याने चालतानाही माझं लक्ष खाली असे. आणि कुठलाही छापील कागद दिसला की मी तो बिनदिक्कत उचलून वाचत असे. कधीतरी वाचायला काही नसलं तर वाचलेलंच पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचे. अशी त्याच त्याच पुस्तकांची कितीतरी पारायणं मी तेव्हा केली होती. माझी आत्या एका म्युनिसिपल शाळेत शिक्षिका होती. मे महिन्याच्या सुट्टीत आमची शाळा बंद असल्याने मला वाचायला काही नसे, तेव्हा ती आत्या तिच्या शाळेच्या लायब्ररीतील पुस्तकांची थप्पीच्या थप्पी मला वाचायला घरी आणून देत असे.

शाळा संपली. पुढे शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. लग्न झालं. त्याकाळात दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तकांचा वाचून फडशा पाडायचो. जवळ स्कुटर होती. पुटूपुटू जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. पुढे कल्याणला आलो. २९ व्या वर्षी मूल झालं. आणि सगळा घोटाळा झाला. संसार, नोकरी, आणि मूल यांच्यात पूर्ण गुरफटलो गेलो. लायब्ररीत जाणेयेणे होत नसे. माझं अवांतर वाचन पूर्णपणे ठप्प झालं. पण एक मात्र झालं. रोज ट्रेनने येऊन जाऊन दोन तासाचा प्रवास सत्कारणी लावला. तेव्हा प्रवासात मी रोज दोनेक तरी वर्तमानपत्र वाचत असे. त्याबरोबर येणाऱ्या पुरवण्या मी आधाश्यासारखा वाचून माझी अवांतर वाचनाची भूक शमवे.

अशातच काही वर्षांपूर्वी मोबाईलचे आगमन झाले. मोबाईलवर सर्फिंग करता करता मला मायबोली संकेतस्थळाचा शोध लागला. माबोचा सभासद होण्यापूर्वी मी दोन वर्षे फक्त माबोचा वाचनमात्र होतो. माबोवरसुद्धा पुष्कळ वाचन केले. वाचता वाचता मला असे वाटू लागले की आपणही आपल्या आवडलेल्या लेख, कथांना प्रतिसाद द्यावा. आपलेही मत नोंदवावे. म्हणून मी मायबोलीचा रीतसर सभासद झालो. आवडलेल्या लेख, कथा, कवितांना प्रतिसाद देऊ लागलो. सुरवातीला मी एका ओळीचा प्रतिसाद लिही. 'आवडले, छान लिहिलंय, झकास आहे, वगैरे'. मग हळूहळू माझी भीड चेपली. मी चारपाच ओळीत माझे मत मांडू लागलो.

मी माबोचा सभासद होऊन चार एक महिने झाले होते. दीडवर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१६ साली तो दिवस नव्हे रात्र उजाडली, जेव्हा माझ्यासारख्या वाचकाचे एका नवलेखकात रूपांतर झाले. एका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला. त्या रात्री माबोवर मी एक धागा वाचत होतो. त्यामध्ये रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण मालिकेचा उल्लेख होता. आमच्या तरुणपणी दूरदर्शनवर ही मालिका फारच प्रसिद्ध झाली होती. त्यासंबंधीच्या माझ्याही काही आठवणी उचंबळून येऊ लागल्या. मी प्रतिसादात दोनचार आठवणी सलग लिहून काढल्या. पण पाहतो तर प्रतिसाद चांगलाच मोठा झालेला. एक प्रकारे लेखच झाला होता. मग माझ्या मनात आले, हे सर्व आपण प्रतिसादात न लिहिता त्याचा नवा धागाच का काढू नये?

पण माझी नवा धागा काढायची हिम्मत काही होईना. माझ्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. प्रतिसादात काही लिहिणे वेगळे आणि स्वतंत्र लेखन करणे वेगळे. लेख सर्वच जण वाचणार. लोकं काय म्हणतील? लोकं माझ्या लिहिण्यावर बरेवाईट टीका करणार. कोणी वाद घालणार. कोणी माझ्या मागे हसणार. टिंगल करणार. मग मला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे होणार. माझ्या मनावर भयंकर ताण येऊ लागला. तरीही मी स्वतःला धीर दिला. जे व्हायचे ते होऊन जाऊ दे. मी नवा धागा काढणारच. मग मी त्या प्रतिसादात थोडाफार बदल करून त्याचा मध्यरात्री १ वाजता एक स्वतंत्र धागा काढला. आणि त्याला नाव दिले 'दूरदर्शनवरील रामायण मालिकेची एक आठवण'

पुढचे दोन दिवस माझे कठीण गेले. मी गुपचूप माझा तो लेख उघडून बघायचो, की काही प्रतिसाद आलाय का? आणि माझ्याकरिता आनंदाची गोष्ट होती, की सर्व प्रतिसाद सकारात्मक आले होते. काहींनी माझ्या लिखाणाचे कौतुकही केले होते. ते पाहून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. मग कालांतराने मी छोटे छोटे लेख, कथा लिहून माबोवर प्रसिद्ध करू लागलो. ते वाचून त्यावर काही नकारात्मक प्रतिसादही येत होते. पण तोपर्यंत माझीही भीड चेपली होती. तशा प्रतिसादांनाही तोंड द्यायला मी शिकलो होतो. माझे लिखाण बऱ्याच जणांना आवडू लागले होते. काही लोकं व्यक्तिशः भेटल्यावर माझे अभिनंदन करू लागले. मी विविध मराठी संकेतस्थळावरही लिहू लागलो. माझा स्वतंत्र ब्लॉग तयार केला. व्हाट्सएप, फेसबुकद्वारे माझे लेख, कथा मी विविध वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो.

मला निव्वळ वाचक या भूमिकेतून लेखकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये मायबोली, मिसळपाव आणि ऐसी अक्षरेवरील लेखक आणि वाचकांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. मायबोलीवरील 'आपला कट्टा' भाग १ या धाग्यावरील अक्षय, मेघा, च्रप्स, सायुरी, पंडित, अंबज्ञ आणि धागामालक र।हूल यांनी वेळोवेळी माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनाचा मी शतशः ऋणी राहीन. अक्षय यांचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला हा निबंध लिहिण्यास प्रवृत्त केले. तसेच फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माझ्या मित्रमैत्रिणींचेही मी आभार मानतो, की ते माझे मोडके तोडके लेख, कथा गोड मानून मला लिखाण करायला नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. धन्यवाद.

(समाप्त)

ता. क. - वरील निबंधात माझे साहित्यिक लिखाण कधी आणि कसे सुरू झाले हे लिहायला मला खूप गंमत आली. मी माझ्या भूतकाळात पुन्हा फिरून आलो. सुरवातीला लिखाण करायला आणि त्याकरिता माहिती गोळा करायला मी घेतलेली  मेहनत आठवली. तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय आठवले. लोकांना आपले लिखाण आवडेल की नाही, हया मानसिक अस्वस्थतेमध्ये जागवलेल्या रात्री आठवल्या. माझ्या लिखाणावर लोकांनी ओढलेले ताशेरे तसेच त्यांनी केलेले कौतुकही आठवले. हा निबंध लिहिण्याचा माझा एक खरोखरच सुखद अनुभव होता. या विषयावर मला तुमचेही अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. त्यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. एवढं वाचन शालेय जीवनात करूनही लेखन मात्र उशिरा का सुरू केले? नेहमीच्या अभ्यासातले निबंध लिहितांना काही वेगळी शैली होती का? तिथे लेखनाला वाव होताच. बाकी तुमचा आवडीचा लेखन प्रकार कोणता? आवडीचा विषय समिक्षा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अचरटबाबा, धन्यवाद.

एवढं वाचन शालेय जीवनात करूनही लेखन मात्र उशिरा का सुरू केले?  >>> ह्या वयात मला जाणवते की लेखनकला माझ्यामध्ये लहानपणापासून होती. शालेय जीवनात मला निबंध लेखनात बक्षिसेही मिळाली होती. नातेवाईकांना पत्र लिहायचो तेव्हा पत्रातील हृदयस्पर्शी साहित्यिक मजकूर वाचून ते मला नावाजायचे. बीएला असतानाही मराठीत चांगले मार्क मिळत. पण माझी मलाच जाणीव नव्हती की माझ्याकडे लेखनकला आहे, किंवा कोणी ते माझ्या नजरेतही आणून दिलं नाही. संसाराचा गाडा ओढता ओढता मला स्वतःला ओळ्खयचेच राहून गेले. आता वयाच्या ५४ व्या वर्षी आंतरजालावरील संकेतस्थळावर प्रतिक्रिया देता देता मला शोध लागला की मी काहीतरी साहित्यिक रचना करू शकतो. नशिबाचा खेळ. तसा आता आयुष्यात वेळही तसा कमी राहिलाय म्हणा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यंतरी फेसबुक स्टेट्स वाचले. ते जमलेच पण संस्थळांवर आलात हे उत्तम केले. वेळ काढा. पेपरांतही लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदिच्छेकरीता मी आपला आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिरसाष्टांग नमस्कार ह्यासाठी की खालील मजकूर वाचून तुम्ही, माझ्या मनात तुमच्याबद्दल वैयक्तिक आकस वगैरे आहे असं समजू नये. हे जे मी लिहीतोय ते तुमच्याप्रतीच्या सद्भावनेने आणि दर्जेदार मराठी साहित्य अजून वाचायला मिळावं, आणि कोणीतरी हे लिहीलंच पाहिजे आणि ऐसीवरचा खवचटपणा फार उच्च पातळीवरचा आहे. फक्त ह्याच कारणासाठी.
-
सर्वात पहिलं म्हणजे हे लिहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. हे कोणीतरी कंठरवाने होतकरू साहित्यिकांना सांगितलं पाहिजे.

माझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे' ते त्याकरिताच.

फक्त माबोवर नाही, अक्षरश: प्रत्येक देशातल्या प्रत्येक भाषेतल्या होतकरू साहित्यिकांना हे लागू होतं. शुद्धलेखनासाठी, दर्जा वाढवण्यासाठी... ते असो.

नंतर तुम्ही जे लिहीलंय अक्षरश: त्याच परिस्थितीतून मीही गेलेलो आहे. अखंड अखंड वाचत रहाणं हा माझा चांगला दहाबारा वर्षं छंद होता. अजूनही तसं पुस्तक मिळालं की मी ते संपवल्याशिवाय खाली ठेवत नाही. त्यामुळे मला तो परिच्छेद वाचून खूप आनंद झाला.
पण, पण पण...

एका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला.

परत तुमचं अभिनंदन, ५४व्या वर्षी नवीन काही करु पाहणं लोकांना फार कठीण वाट्टं (म्हणे).
मी मला जे म्हणायचंय ते साखरेत घोळवून सांगत नाही.
तुमचं ज्या साहित्यिक फुलपाखरात रुपांतर झालंय ते सुंदर अजिबात नाही.
तुम्ही सुमार लिहीता.
तुम्ही लोकसत्ताच्या रविवारी जो बालरंग यायचा (आणि आता तो लोकरंगातल्या एकाच पानात कोंबून येतो, ज्याम पकाऊ फॉर्मात) त्यात तुम्ही फारतर लिहू शकालतुमचं लेखन फारतर प्रसिद्ध होऊ शकेल. तुम्ही खूप वाचलंय असं तुम्ही म्हणता. पण त्या वाचनाने स्वत:च्या लेखनाकडे त्रयस्थपणे पहायची दृष्टी तुम्हाला दिलेली नाही, हे थोडं दुर्दैवी आहे. जर ती तशी दिलेली असेल आणि तरीही तुम्हाला तुमचं लिखाण दर्जेदार वाटत असेल तर मात्र फारच बिकटे अवस्था. मध्यंतरी तुम्ही ते व्हॉट्सॅप (हा शब्द असा आणि असाच लिहायचा असतो.) स्टेटसची एक मालिका काढली होती. ती शुद्ध पकाऊ होती. तुम्ही लहान मुलांसाठी लिहीता हे मी आत्ता म्हटलंय. ते एक कौशल्यपूर्ण काम आहे. पण लहान मुलांसारखं लिहू नका. प्लीज.

सध्या तुम्ही पोरकट-पकाऊ ह्या बॉर्डरवर काहीतरी लिहीता.

मीही असं लिहायचो. आजूबाजूचे लोक (नातेवाईक-आप्त-मित्र-सुह्रद का काय ते) तेव्हाही प्रशंसा करायचे. त्यांची तेव्हढी पोहोच नसते. त्यांची टीका आणि प्रशंसा दोन्ही मनावर घ्यायची नसते. एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना 'ते असं आहे. ते असं दिसतं. ते पाहून असं असं पाहिल्याची मला आठवण येते.' इत्यादी चौथीच्या निबंधांत असतं. स्वत:ला वाटतं ते सादर करणं; की रसिकांना आवडेल ते सादर करणं, (कला नेणीवोद्भव असावी की रसिकाभिमुख) ह्या त्रिकालाबाधित वादाच्या दोन्ही टोकांना पडलेले असंख्य कलाकार आहेत, जे खूप क्वचित अजरामर वगैरे होतात. तिथपर्यंत जायचं असल्यास दोन्हीमधील समतोल साधायचा प्रयत्न तुम्हांस केला पाहिजे. हे असे, सुवर्णमध्य गाठलेले कलाकार, लेखक/कवी मात्र नक्कीच दर्जेदार म्हणून गणले जातात. प्रत्येक कलाकृती ही त्या 'पर्सनल टच'मुळेच अजरामर होत असते. तर प्लीज हा प्रयत्न तुम्ही करा.
-
शेवटी,
मायबोलीवरचा तुमचा लेख मी पाहिला. त्यात लोकांनी तुमच्या लेखनकौशल्यावर शेरे न देता स्वत:च्याच अनुभवांवर जास्त लिहीलेलं आहे. त्यात प्रतिक्रिया देणारे कोण, इ. मी पाहिलं. वैयक्तिक टीका मी नेहमीच टाळतो. कोणाचे शेरे गंभीरपणे घ्यावेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे.
मआंजावर एक भारी असतं ते म्हणजे स्वत:ची फार अशी माहिती सांगावी लागत नाही. म्हणून लोक तुमच्यावर वैयक्तिक हल्ले करू शकत नाहीत. त्याचाच व्यत्यास म्हणजे कोणीही येऊन दुगाण्या झाडून जाऊ शकतं. त्यामुळे, माझा हा प्रतिसाद दुर्लक्षण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. पण, आपण फार चांगलं लिहीतो ह्या एका भासात जगू नका. प्लीज.

लोभ असावा.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

@ १४टॅन, आपण लिहिलेल्या पत्रामधून आपली माझ्या लिखाणाविषयीची कळकळ जाणवली. आपण माझ्या लिखाणाच्या गुणवत्तेबद्दल लिहिलेले सर्व मुद्दे मी मान्य करतो. आपण मला जे मार्गदर्शन केलेय ते मी फार मोलाचे समजतो आणि त्याच मार्गावर चालण्याचा माझा प्रयत्न राहील. आपणांवर माझा लोभ कायमच राहील याचा विश्वास बाळगावा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री टॅनोबा चौदावे, फारच परखड हो. म्हणजे इतकं थेट लिहायला कुणी धजावत नाही.
-
खूप वाचन अशासाठी करायचे की मराठी साहित्यातील संदर्भात आपली चूक होऊ नये.
विषयांतील वेगळेपणा जपण्यासाठी या वाचनाचा उपयोग होतो. म्हणजे अगोदर काय होऊन गेलं आहे हे माहित असणे गरजेचं असतं.
शैलीबद्ल बोलायचं तर उचललेली, कुणासारखी वाटणारी उपयोगाची नसते. वाचनामुळे शैलीवर अवांछित प्रभाव पडू नये.
विषय सादरीकरणाचा प्रामाणिकपणा वाचकांना प्रत्येक वाक्याबरोबर गुंतवून लेखनाच्या शेवटापर्यंत नेत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान प्रतिसाद. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे एक मित्र माकडांनी टाईपरायटर बडवला तर कितपत वाचनीय लेखन तयार होईल यावर संशोधन करित होते.

याहू ! त्यांच्या माकडांशी स्पर्धक निर्माण झाला आहे ! आगे बढो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

@ खुशालचेंडु, आगे बढो! >>> आपल्या प्रोत्साहनाकरिता मी आपला आभारी आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0