Skip to main content

कोर्ट- एक समंजस चित्रभाषा.

चित्रपटात नायक किंवा नायिका किंवा दोघे असतात. चित्रपट आपल्याला त्यांची गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून दाखवतो. ’कोर्ट’ मध्ये ’सिस्टीम’ हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे. लोकशाहीर, वकिल, न्यायाधीश आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळेच या सिस्टीमच्या आधारे वावरणारी दुय्यम व्यक्तीरेखा आहेत. हा सिनेमा कोणा एकाची गोष्ट सांगत नाही तर ह्या सगळ्यांचे टेकू असलेली तरिही सगळ्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग असलेली सिस्टीम आहे तशी दाखवतो. इथे सिस्टीमच नायक आहे आणि खलनायकही. चित्रपटात जज्ज आहे, कोर्ट आहे तरिही जजमेंटल नसलेला असा हा चित्रपट.
नेहमीच्या सिनेमातलं कोर्ट हे नाट्यमय संवाद, वकिली युक्तीवाद, लोकांची उलटीपालटी होणारी आयुष्य यांनी परिपूर्ण असतं. इथेही वकिली युक्तीवाद आहेत पण त्यात फक्त त्यांची हुशारी नाही तर ज्या सिस्टीमचा ते भाग आहेत त्यातून आलेली भूमिका आहे आणि तेही कोणताही आव ना आणता सहज आलेलं आहे. माणूस एखाद्या परिस्थितीत सापडतो त्यातून पुढे एखाद्या मुक्कामी पोहोचतो. हा प्रवास म्हणजे त्याला केवळ अनुकूल किंवा प्रतिकूल असणार्‍या घटनांची साखळीच केवळ नसते तर त्या अनेक छोट्या-मोठ्या घटना, परिस्थिती, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी माणसं, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण यांचं एक कोलाज असतं. या गोष्टी परस्परांशी मेळ खात असोत नसोत या कोलाज मध्ये त्या आपापले रंगाकार घेउन एकत्र येतात. आरोपी नारायण कांबळे असो का जज्ज सदावर्ते असोत. त्यांच्या त्यांच्या पोझिशननुसार, जडण घडणी नुसार त्याचं वागण्याची ठराविक चौकट आहे. सिनेमातल्या प्रत्येकाने स्वत:ची आणि दुसर्‍याची चौकटही स्वीकारलीय. दुसर्‍याच्या भुमिकेबद्द्ल अनावश्यक त्रागा नाही की द्येचा पाझर नाही. हे आहे, हे असं आहे हे दाखवत कॅमेरा फिरतो. ठरवून केलेलं भाष्य कश्यावरच नाही. नेहमीच्या आयुष्यात असंच असतं. एकच पूर्ण चूक, दुसरा एखादा पूर्ण बरोबर असं नसतच ना कधी! "वीस वर्षं तुरुंगात डांबा आणि संपवा मॅटर" असं सहकार्‍यांमध्ये म्हणणारी वकील ही मानवाधिकारावरील परिसंवादात निवेदन करणार्‍या आणि वक्त्याच्या संस्थेच्या नावाच्या चुकीबद्द्ल बेफिकीर असणार्‍या सूत्रसंचालिकेइतकीच या मॅटरबद्द्ल अलिप्त आहे. कारण यात आपल्या वाटेची भूमिका पार पाडायची हीच मनोधारणा आहे आणि आपणही हेच करत असतो.
डिस्कव्हरी वाहीनीवर जंगलातलं जीवन बघताना आपल्या घश्याशी आवंढा येतो का? सिंह शिकारीवर झडप घालतो. कधी शिकार निसटते, कधी त्याला भारी पडते हे सगळं जंगलाचा, निसर्गाचा नियम म्हणून आपण बघतो. माणसंही तशीच असतात कोणी कोणाचा हेतुत: शत्रु नसतो का मित्र नसतो. प्राणी जसे निसर्गनियमाचा भाग असतात तशी ईथली माणसं सिस्टीमचा भाग आहेत. आणि आपल्या वाटेला आलेलं काम ती करताहेत. त्यात खोलात जाउन न्याय-अन्याय, सुष्ट-दुष्ट याचा न्याय निवाडा नाही केवळ पुढे आलेल्या पुराव्याने , कायद्याने आलेला न्याय आहे. तो अन्याय वाटला तरी त्याने कोणी कोलमडत नाही की फुशारत नाही कारण हे नियम, ही सिस्टीम हे त्यांच्या जगण्याचा भाग आहेत. सुरुवातीला सरकारी पुराव्यानुसार ज्या न्यायमूर्तींनी लोकशाहीर नारायण कांबळेला जामिनही नाकारला; तेच न्यायमूर्ती, ज्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप कांबळेवर आहे त्याला संरक्षक आयुधं मिळाली नव्ह्ती, सरकारी वकिलांचे पुरावे अर्धवट आहेत, त्यांचे साक्षीदार ठेवणीतले साक्षीदार आहेत हे पुढे आल्यावर जामिन मंजूर करतात. पुन्हा वेगळ्या कलमांखाली पुन्हा कांबळेला अटक झाल्यावर ही सिस्टीम नारायण कांबळेला जामिन न मिळाल्याने कोर्टाच्या सुटीच्या काळात बंदीतच ठेवते. हे ज्या जज्जने सुनावलंय तो जज्जही सिस्टीमचा भाग आहे. त्याच्याही स्वत:च्या मर्यादा आहेत. स्वत:ला डुलकी लागलेली असताना चार पोरांनी येउन भॉक्क करून घाबरवावं आणि दचकल्यामुळॆ जो हाती लागेल त्यालाच आपण थोबडावं यात जो न्याय आहे तेवढाच आणि तसाच न्याय खर्‍या कोर्ट सिस्टीम मध्ये आहे हेच हा सिनेमा दाखवतो.
सिनेमा का बघावा? तर सहज अभिनय, जे आहे ते तसंच बघण्यातला अनुभव घेण्यासाठी. कॅमेर्‍याला पल्लेदार भाषेची गरज कशी नसते त्याचा अनुभव घेण्यासाठी. छोट्या छोट्या तुकड्यातून न्याय-अन्यायाच्या मधे असलेली धारदार रेषा (धारदारपणाची जखम न करुन घेता) अनुभवण्यासाठी. क्रांती, वर्गलढा हे सगळं सिस्टीमने सामावून घेतल्याने, या जागृतीपेक्षा 'बघतोय रिक्षावाला’ सारख्या गाण्यावर नाच करण्या- बघण्यातली सुलभता मोठया स्तरावर कशी स्वीकारली गेलीय हे बघण्यासाठी. अनावश्यक गाणी, नाच, सहृदयता, निष्ठुरता यांचा समावेश नसलेली, निखळ-आहे तशी दाखवलेली- गोष्ट बघण्यासाठी. समंजस स्वीकार ही बदलाची सुरवात असते असं मानलं तर एका तरुण चमूनं न्यायव्यवस्थेवर केलेला हा सिनेमा बदलाची ही सुरुवात आहे अशी आशा पल्लवीत होण्यासाठी.

समीक्षेचा विषय निवडा

ऋषिकेश Mon, 27/04/2015 - 16:27

अजूनही कोर्ट बघितलेला नाही. या लेखनाने हा चित्रपट नक्की बघायचा ही खुणगाठ पक्की झाली.
--

फक्त सगळ्याच प्रकारच्या प्रेक्षकांकडून याची स्तुती ऐकल्याने एक प्रकारची भिती वाटू लागलीये :)

बिटकॉइनजी बाळा Mon, 27/04/2015 - 16:53

स्वत:ला डुलकी लागलेली असताना चार पोरांनी येउन भॉक्क करून घाबरवावं आणि दचकल्यामुळॆ जो हाती आला त्यालाच आपण थोबडावं यात जो न्याय आहे तेवढाच आणि तसाच न्याय खर्‍या कोर्ट सिस्टीम मध्ये आहे.
एवढी एकच शॉर्ट फिल्म केली असती तरी पुरेसे होते. बोअर सिनेमा आहे. आणि संथ पण ठोकळेबाज विरोधाभास आहेत. खरीखुरी कोर्टरूम दाखवायची हौस एवढाच एक हेतू दिसतो. मग त्यात एक कथा ओढुन ताणून बसवली आहे(संथपणे दाखवली म्हणून ती एकजिनसी होत नाही.) त्यामुळे कुठल्यातरी फेस्टिवलात फुकट पाहिला मिळाला तरच पाहावा या मतावर आलो आहे. किंवा अर्धा एक तास सेशन कोर्टात बसून यावे. लाईव्ह कव्हरेज मिळेल.

अंतराआनंद Mon, 27/04/2015 - 17:40

शुची,नील, ऋषिकेश धन्यवाद.
@ नील :- ठोकळेबाज विरोधाभास कुठे दिसला? क्लिशे या अर्थाने यात ठोकळेबाजपणा आहे असं जाणवलं नाही. मला नाही बोअर झालं. कथा ओढून ताणून आणलीय असं मला नाही वाटलं आणि कोर्टाच्या कामकाजाचं लाईव कव्हरेज मी पाहिलय. असो, शेवटी ज्याची त्याची आवड.

@ ऋषिकेश :- आवडला नाही तरी शांतपणे बसल्याजागी झोपू शकाल. ;)

अजो१२३ Mon, 27/04/2015 - 18:01

समीक्षा आवडली.
---------------------------------------------------------------------------------------------
कदाचित ज्या लोकांना न्यायव्यवस्थेवर जबरदस्त श्रद्धा आहे त्यांना पाहवयास फार आवडेल. ज्यांना भारतीय व्यवस्थांचा खोखळेपणा अगोदरपासूनच ज्ञात आहे त्यांना त्याचं रटाळवाणं दर्शन कंटाळवाणं वाटू शकतं.

कॉशन - हे चित्रपट न पाहिले असणाराचे मत आहे.

अंतराआनंद Mon, 27/04/2015 - 18:46

In reply to by अजो१२३

असं नाही हो. मी तर कश्यावरच श्रद्धा नसणारी व्यक्ती आहे. आता तुमचच लॉजिक लावायचं झालं तर ज्याला आपलं म्हणणं आक्रस्ताळेपणेच मांडल्यानेच खरेपणा सिद्ध होतो असं मानणार्‍यांना ह्या चित्रपटाची भाषा आवडणार नाही आणि शांतपणे आपलं म्हणणं सांगावं पटलं तर पटेल असं मानणार्‍यांना आवडेल :bigsmile:

बॅटमॅन Mon, 27/04/2015 - 18:49

In reply to by अंतराआनंद

नाही, अगदीच असं काही नाही. कैक गोष्टी शहरी उच्चमध्यमवर्गाला वेगळ्या आणि म्हणूनच रोचक वाटू शकतात त्या निमशहरी किंवा ग्रामीण भागातल्यांना "हॅ: यात काय विशेष" अशाही वाटू शकतात. किंवा शहरातही, उच्चमध्यमवर्ग आणि निम्नवर्ग यांच्या जाणिवा अगदी वेगळ्याही असू शकतात. त्याला अनुलक्षून अजोंची कमेंट पहावी असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2015 - 19:15

मोजक्या शब्दांत, चित्रपटात काय होतं हे न सांगता पुरेसं कुतूहल जागृत केलेलं आहे. आता चित्रपट बघायचा कसा हा प्रश्न आहेच, पण कधीतरी बघता येईल या आशेवर आहे.

अस्वल Thu, 24/09/2015 - 11:31

चित्रपट यूट्यूबवर आलाय. तिथेच बघितला (सीडी/डीव्हीडी अजूनही मिळाली नाही)
------------
नक्कीच चांगला वाटला पण ग्रेट नाही. कॅमेरा मात्र झकास, आणि सगऴ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम- इतका की त्यातले बरेच जण कलाकार आहेत की खरीखुरी माणसं हा प्रश्न पडला. शाहीरांचे पोवाडे मेजर आवडले, नंतर परत ऐकले.
पण काही प्रश्न-
( मधे काही काही शॉट्स आहेत ते जवळपास ५-१० सेकंद तसेच रहातात. कॅमेराची हालचाल नाही हे मान्य- कॅमेरा एक प्रेक्षक म्हणून आहे. पण फ्रेममधेही काहीच हालचाल नाही. मग ५-१० सेकंद ते दाखवण्याचा काय हेतू असावा? हे कळलं नाही.
सुरूवातीच्या काही प्रसंगांतला विनोद जाम आवडला. पण नंतर सिनेमा रूक्ष होत गेलाय असं वाटलं. काही भाग खूपच संथ - उदा. सरकारी वकीलीण बाई संपूर्ण स्टेटमेंट वाचतात तो प्रसंग "अहो आवरा आता, कळलं" असं म्हणायला लावणारा. हे का केलं असेल? कोर्टात किती कंटाळवाणं आणि रूटीन काम असतं हे दाखवायला?
अरे हो, आणखी एक म्हणजे ट्रेलर बघून नारायण कांबळेंभोवती चित्रपट फिरतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला फार कमी प्रसंग आले आहेत. ही छोटी फसवणूक वाटली
)
-------------
चित्रपटाविषयी आता सविस्तर वाचेन म्हणजे कदाचित ह्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील.

मेघना भुस्कुटे Thu, 24/09/2015 - 11:35

In reply to by अस्वल

एकाच दृश्यावर कॅमेरा काही सेकंद ठेवणं, कथेशी संबंधित नसलेल्या लोकांचे फुटकळ संवाद दाखवणं, वकिलीणबाईंचे भाषण दीर्घकाळ दाखवणं - हे सगळं एकाच उद्देशानं केलेलं असावं. प्रेक्षकाच्या मनात (संवेदनहीनता, असंगती आणि कंटाळ्यासकट) समग्र भाव जागृत करणे.

फसवणुकीबद्दल सहमत. ट्रेलर कापला आहे तो मनजींसाठी आणि प्रत्यक्षात सिनेमा मंजुळेंचा - असा प्रकार मलापण वाटला. हे काय बरोबर नाही. एकदम झीमराठीछाप आहे.

चिंतातुर जंतू Thu, 24/09/2015 - 11:43

In reply to by अस्वल

>> मधे काही काही शॉट्स आहेत ते जवळपास ५-१० सेकंद तसेच रहातात. कॅमेराची हालचाल नाही हे मान्य- कॅमेरा एक प्रेक्षक म्हणून आहे. पण फ्रेममधेही काहीच हालचाल नाही. मग ५-१० सेकंद ते दाखवण्याचा काय हेतू असावा? हे कळलं नाही.

ते त्या त्या प्रसंगावर अवलंबून आहे. तुम्ही उदाहरण दिलंत तर सांगता येईल.

>>सुरूवातीच्या काही प्रसंगांतला विनोद जाम आवडला. पण नंतर सिनेमा रूक्ष होत गेलाय असं वाटलं. काही भाग खूपच संथ - उदा. सरकारी वकीलीण बाई संपूर्ण स्टेटमेंट वाचतात तो प्रसंग "अहो आवरा आता, कळलं" असं म्हणायला लावणारा. हे का केलं असेल? कोर्टात किती कंटाळवाणं आणि रूटीन काम असतं हे दाखवायला?

विशिष्ट प्रसंगाबद्दल - मुद्दा कोर्टाच्या कामाच्या कंटाळवाणेपणाचा नसून ज्यात नारायण कांबळेसारख्या माणसाला अडकवलं जातंय त्या कायद्याच्या कालबाह्यतेचा, क्रूरपणाचा आणि अ‍ॅब्सर्ड असण्याचा आहे. तो त्या कलमांमधून स्पष्ट होतो. अखेर विवेक गोंबर विचारतोदेखील - इथे बॉम्ब आणि केमिकल वेपन्स कुठे दिसतायत तुम्हाला? त्यावर सरकारी वकील (अगदी रास्तपणे) म्हणते की तिथे 'एनिथिंग' आहे. म्हणजे कायद्याच्या काहीहीपणाचा कळस आहे तो.
आधी विनोद नंतर... - एकूणात अ‍ॅब्सर्डिटीचा हा गुणविशेष आहे की त्यातल्या विरोधाभासामुळे जग वरवर पाहता विनोदी भासू लागतं. मात्र, ते जर खोलवर न्यायचं असलं तर तिला धारदार करावं लागतं. 'कोर्ट'मध्ये ते तसं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे नंतर ती अब्सर्डिटी काळजाला हात घालते. मला ते अजिबात रुक्ष वाटलं नाही. नंतर विनोदी राहात नाही ह्याच्याशी सहमत. लाईटली घेण्यासारखं नाहीच करायचं आहे ते दिग्दर्शकाला.

>>अरे हो, आणखी एक म्हणजे ट्रेलर बघून नारायण कांबळेंभोवती चित्रपट फिरतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला फार कमी प्रसंग आले आहेत. ही छोटी फसवणूक वाटली

निव्वळ नारायण कांबळेंची गोष्ट त्यात नाही; पण ट्रिगर नारायण कांबळेच आहेत.

अस्वल Thu, 24/09/2015 - 20:58

In reply to by चिंतातुर जंतू

पहिला प्रसंग आठवतोय तो कांबळेंचा वकील घरी जातो आणि काहीतरी संवाद ऐकत खुर्चीत पडून असतो. संवाद्/आवाज कसले आहेत ते नीट कळलं नाही. पण सबटायटल्स नसल्याने ते कळावं अशी दिग्दर्शकाची अपेक्षा नव्हती असं वाटलं.
आणखी एक म्हणजे वकील एका रेस्टॉरंटात मित्र मैत्रिणींसोबत जातो तेव्हाचा. इथेही ते लोक स्थानापन्न झाल्यावर काहीच घडत नाही.(जवळपास २० सेकंद)
---
वकीलीणबाईंची दोन दीर्घ स्टेटमेंट आहेत, त्यातल्या दुसर्‍याची गरज मान्य आहे (एनिथिंग वालं), पण पहिलं स्टेटमेंट इतकं पाल्हाळिक आणि बोअरिंग आहे की कंटाळा यायचासुद्धा कंटाळा येतो.
---
पहिल्या भागातला वकिलाच्या घरातला प्रसंग किंवा भाषण करताना मधेच कुणीतरी येऊन "एक मिनिट" सांगणं, सगळ्यात पहिल्या कोर्टातलं वातावरण - हे सगळे प्रकार बेहद्द आवडले होते. त्यात तुम्ही म्हणालात तशी अ‍ॅबसर्डिटी पुरेपूर आहे. वासुदेव पवारच्या पत्नीची साक्षदेखील अंगावर काटा आणणारी आहे.
पण नंतर नारायण कांबळेंना येनकेन प्रकारे सरकार आत घालायला बघतंय, त्यासाठी कुठलेतरी जुने कायदे कलमं वापरतंय हा भाग वासुदेव पवारवाल्या साक्षीनंतर फिका वाटला- कदाचित कमी परिणामकारक.
त्यामानाने खटल्यातल्या मुख्य पात्रांची (कोर्टातले लोक, नारायण कांबळे निमित्तमात्र) टिपिकल आयुष्यं दाखवायची कल्पना आवडून गेली.
---
आणखी एक शंका- कॅमेरा नेहेमी एखाद्या चुकार बघ्याप्रमाणे वापरला आहे. काहीच हालचाल नाही. जणू समोर जे काही चालू आहे ते फक्त बघत रहायचं इतकया passive पद्धतीने चित्रण केलंय. ह्या प्रकाराला काय म्हणतात?

चिंतातुर जंतू Fri, 25/09/2015 - 10:50

In reply to by अस्वल

>> पहिला प्रसंग आठवतोय तो कांबळेंचा वकील घरी जातो आणि काहीतरी संवाद ऐकत खुर्चीत पडून असतो. संवाद्/आवाज कसले आहेत ते नीट कळलं नाही. पण सबटायटल्स नसल्याने ते कळावं अशी दिग्दर्शकाची अपेक्षा नव्हती असं वाटलं.

तो घरी जाऊन टीव्हीवरचे सेन्सलेस डीबेट्स ऐकतो आहे. कालबाह्य कायदे आणि असंवेदशील माणसं ह्यांच्यामुळे ज्यांच्या मूलभूत मानवी हक्कांवर गदा आलेली आहे अशा माणसांच्या बाजूनं आणि व्यवस्थेच्या विरोधात दिवसभर तो झगडला आहे. त्याच्या झगड्यातली वैयर्थता आणि त्या डीबेट्समधली वैयर्थता एकमेकांसमोर आणलेली आहे. व्यवस्थेशी झगडून दमलेला, पिऊन टल्लू झालेला वकील काहीही कळायच्या पलीकडे बधीर आहे. तेवढा तोच आपल्याला दिसतो. (पुढे ह्याचा संबंध पिऊन तर्र होऊन मगच गटारात उतरणाऱ्या सफाई कामगाराशी लागतो.)

>> आणखी एक म्हणजे वकील एका रेस्टॉरंटात मित्र मैत्रिणींसोबत जातो तेव्हाचा. इथेही ते लोक स्थानापन्न झाल्यावर काहीच घडत नाही.(जवळपास २० सेकंद)

त्याचं व्यक्तिगत आयुष्यही बऱ्यापैकी सेन्सलेस आहे. जागतिकीकरणापश्चात उपलब्ध झालेल्या चंगळवादी संधींतून तो पोकळपणा भरण्याचा त्याचा प्रयत्न आहे, पण तो पोकळपणा काही केल्या जात नाही. त्या पोकळपणाचं दर्शन घडवण्याचा हा एक भाग आहे.

>> पहिलं स्टेटमेंट इतकं पाल्हाळिक आणि बोअरिंग आहे की कंटाळा यायचासुद्धा कंटाळा येतो.

सरकारी वकिलाचं आयुष्यच काफ्काएस्क आहे. सुखवस्तू डिफेन्स लॉयरला आपण लोकांच्या उपयोगी पडतो हे किमान समाधान मिळावं म्हणून तो (आर्थिक गरज नसताना, एका एनजीओसाठी) हे काम करतोय. म्हणजे तो त्याचा चॉइस आहे. सरकारी वकिलाला मात्र कौटुंबिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पाट्या टाकाव्या लागतायत. तिचं व्यावसायिक आयुष्य प्रचंड पोकळ आणि अर्थहीन आहे. आणि तरीही अशा अनेक कांबळेंना जेलमध्ये सडत ठेवण्यात तिचा प्रत्यक्ष हातभार लागत असणार. स्वतःच्या संवेदना बधीर केल्याशिवाय ती मानसिक संतुलन सांभाळूच शकणार नाही. हे सगळं त्यातून दिसतं.

>> नंतर नारायण कांबळेंना येनकेन प्रकारे सरकार आत घालायला बघतंय, त्यासाठी कुठलेतरी जुने कायदे कलमं वापरतंय हा भाग वासुदेव पवारवाल्या साक्षीनंतर फिका वाटला-

प्रिसाइजली! हेच साधायचं आहे. जेव्हा वासुदेव पवारची गोष्ट समोर येते तेव्हा ती प्रचंड अंगावर येणारी निघते. म्हणजे, व्यवस्थेत पिचणारा नारायण कांबळे आतापर्यंत ट्रॅजिक हीरो वाटत असतो, पण आता गांधीजी म्हणतात तसं होतं - भारतात प्रत्येक माणसाला उतरंडीत आपल्या खाली आणखी वाईट जगणारं कुणी तरी दिसतं - तसं होतं. नारायण कांबळे आपल्या पॉलिटिकल कन्व्हिक्शनमुळे व्यवस्थेशी लढतो आहे. पण वासुदेव पवार? त्याच्या खाली उतरंडीत चक्क झुरळं आहेत - ती जिवंत असली तरच तो गटारात उतरणार. म्हणजे बघा.

>> कॅमेरा नेहेमी एखाद्या चुकार बघ्याप्रमाणे वापरला आहे. काहीच हालचाल नाही. जणू समोर जे काही चालू आहे ते फक्त बघत रहायचं इतकया passive पद्धतीने चित्रण केलंय. ह्या प्रकाराला काय म्हणतात?

त्या बघ्यामध्ये न्यूट्रॅलिटी अभिप्रेत आहे. जसं समोर चाललेल्या कशाशीही काहीही संबंध नसलेला प्रेक्षक एका दूरस्थ नजरेनं ते पाहील तसं काहीसं.

अस्वल Fri, 25/09/2015 - 21:21

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद.
मला स्वतःला भारद्वाज रंगन साहेबांचा रिव्ह्यू पटला. त्यात त्यांनी एक इंट्रेश्टिंग निरीक्षण नोंदवलंय -

This… Western eye, if you will, is also evident in the filmmaking, with its tableaux of static wide shots. In the absence of camera movement, we rely on other things to enliven the frames – people crossing roads and walking past doors, traffic on streets, the fluttering of paper flags above a stage, a boy practicing on Roman Rings. This is the way the Europeans (not to forget Ozu) make their art cinema, and I wonder if – just like our commercial cinema has its own voice, its own distinctive grammar – our art cinema, too, can’t find a style that’s uniquely ours.

moifightclub वाल्यांनीही असाच एक आक्षेप (आधी भरपूर स्तुती केल्यावर!) इथे नोंदवलाय.

You know the norms well, breaking away from the desi formula has sadly become another world-cinema-loved-by-fests formula in itself – take Non-actors, take long takes, unnecessarily stay back and hold the shot even when action is over, use no background music, say ok only on 897654897th take of the shots, show no emotional hook, cut it dry, nobody can cry their heart out, keyword is subtle, and other such routine stuff. It’s the Dogme 2015.

चिंतातुर जंतू Sat, 26/09/2015 - 12:07

In reply to by अस्वल

>> This is the way the Europeans (not to forget Ozu) make their art cinema

हे इतकं प्रचंड सरसकटीकरण आहे की सर्वप्रथम लेखकाला आजचा युरोपियन सिनेमा कसा आहे हेच सांगावं लागेल. शिवाय, फेस्टिव्हल्समध्ये येणारे सिनेमे जे वैविध्य घेऊन येतात त्यात नाट्यमयतेलाही जागा असते ह्याची ग्वाही तर कोणत्याही प्रतिष्ठेच्या महोत्सवाचा २०१५चा कार्यक्रमही देईल. बाकी, ह्या लोकांना ओझू आणि डॉग्मे सापडतात, पण कितीतरी पारितोषिकं मिळालेला आपल्या शेजारच्या देशातला अपिचातपाँग वीरसेथकुल सापडत नाही, हेसुद्धा गमतीशीर आहे. माझ्या मते चैतन्यची शैली ह्या दोघांपेक्षा खरी त्याच्याजवळ जाते. अपिचातपाँगचा सिनेमा आत्ताचा आहे, आणि सांस्कृतिकदृष्ट्या ओझू किंवा युरोपपेक्षा आपल्या जास्त जवळचा आहे. बाकी, शैली किंवा व्याकरण बाहेरून घेण्यात मला काहीच अडचण वाटत नाही. महत्त्वाचा मुद्दा हा, की निवडलेली शैली सिनेमाच्या आशयाला पूरक आहे का, किंवा तो अधिक परिणामकारक करण्यासाठी उपयोगी पडते का? तर 'कोर्ट'च्या बाबतीत त्याचं उत्तर माझ्या मते तरी ठामपणे सकारात्मक आहे. मुंबई महानगरपालिकेनं सुरक्षा नियम पाळले नाहीत म्हणून जो हकनाक मेलेला आहे, त्या पवारच्या विधवेला वकिलानं सीटबेल्ट बांधायला सांगणं ही साधी, अ-नाट्यमय आणि आपल्या दैनंदिन सवयीची कृती सोबत जे (पवारच्या मृत्यूचं) ओझं घेऊन येते आणि त्यामुळे जो भावनिक परिणाम साधला जातो, तो मला मराठी सिनेमाच्या नेहमीच्या कृतक् नाट्यमयतेपेक्षा अधिक सघन वाटतो.

बिपिन कार्यकर्ते Thu, 24/09/2015 - 14:14

In reply to by अस्वल

फारसे तपशीलात नाही सांगता येणार मला पण... 'नक्कीच चांगला वाटला पण ग्रेट नाही.' असं वाटण्याचं कारण म्हणजे तो फार म्हणजे फारच वास्तवदर्शी आहे. उद्या आपण एखाद्या कोर्टात गेलो तर १००% अगदी असंच असेल. आणि एका परीने म्हणूनच तो अंगावर येतो. आणि ग्रेट वाटत नाही कारण आपल्याला चित्रपटांमध्ये घातलेल्या काही एलिमेंट्सची सवय झालेली असते. थोडी नाट्यमयता, थोडं पार्श्वसंगीत तरी... असं काहीही नाहीये त्यात. मग तो 'ग्रेट' वाटत नाही आणि म्हणूनच मला तो 'ग्रेट' वाटला.

गवि Thu, 24/09/2015 - 14:32

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यावरुन....

पूर्वीच्या हिंदी सिनेमातलं कोर्ट काय सांगावं महाराजा. मज्जाच मज्जा.

प्रलयनाथ, बिल्ला, नारंग इत्यादि नावाच्या खलपुरुषांवर चाललेले खटले आणि त्यात ठकराल, चढ्ढा (शिकस्त न खाणारा) असे झुलपे झटकणारे निरनिराळे वकील, तसंच चांगल्या लोकांच्या बाजूचा फक्त अन्यायनिवारणासाठी वकिलीपेशात पुनरागमन केलेला सनी देओलछाप "तरुण" वगैरे वगैरे डोळ्यासमोर उभे राहिले.

"आपको जो सवाल पूछे जाय, बस उनका जवाब दिजिये नारंगसाब..!!"

"हां या ना? मुझे हां या ना में जवाब चाहिये.. हां या ना..?!" (चढता आवाज)

इत्यादि शब्दही कानात ऐकू आले.

( http://aisiakshare.com/node/446 )

मेघना भुस्कुटे Thu, 24/09/2015 - 14:43

In reply to by गवि

हिंदी सिनेमातलं कोर्ट या विषयात धाग्याचं पोटेन्शिअल आहे हो गवि.

'अकेले हम अकेले तुम'मधलं ते माशी-टु-माशी ढापलेलं कोर्ट. यांच्या तीर्थरूपांनी खुर्च्या दिलंवतंन भारतात कधी आरोपी नि फिर्यादीला बसायला! च्यायला, इतका काय बेअकलीपणा करायचा!

'दामिनी'तलं कोर्ट तर - असो. माझ्या दिलाजवळचा विषय आहे तो. काय ते संवाद. काय ती 'मुझे नही चाहिये इन्साफ' असं म्हणत कोर्टभर बागडणारी मीनाक्षी. काय ते टाळ्यांचा कडकडाट करणारे लोक. काय ते 'इस फैसले को दामिनी के फैसलेसे जाना जायेगा' म्हणणारे न्यायाधीश. वा वा वा! केवळ बिनतोड.

'इन्साफ का तराजू'मधल्या कोर्टाची मज्जाच निराळी. बलात्कारित बाई आली रे आली की तिला पहिली शरमिंदी करा, हाच या लोकांचा एकमेव अजेण्डा. कमॉन यार, इट गेट्स बोअरिंग. बायापण थोड्या क्रिएटिव व्हायला तयार नाहीत. तीच ती शरम. तेच ते करुण संगीत. तीच ती झुकी हुई नजरें. छ्या.

बोलावं तेवढं थोडं आहे....

घनु Thu, 24/09/2015 - 14:53

In reply to by मेघना भुस्कुटे

बायापण थोड्या क्रिएटिव व्हायला तयार नाहीत. तीच ती शरम. तेच ते करुण संगीत. तीच ती झुकी हुई नजरें. छ्या.

बोलावं तेवढं थोडं आहे....

डिट्टो, हेच म्हणायचंय. तेच सुचवलं मी ही माझ्या खालच्या प्रतिसादात.

गवि Thu, 24/09/2015 - 15:58

In reply to by मेघना भुस्कुटे

हिंदी सिनेमातलं कोर्ट या विषयात धाग्याचं पोटेन्शिअल आहे हो गवि.

फिकट ठशात दिलेला एक क्षीण प्रयत्न जाड ठशात खाली देऊन पाहतो.

http://aisiakshare.com/node/446

घनु Thu, 24/09/2015 - 14:51

In reply to by गवि

पूर्वीच्या हिंदी सिनेमातलं कोर्ट काय सांगावं महाराजा. मज्जाच मज्जा.

=))

त्यात कोर्टातली केस बलात्काराची असेल तर विचारुच नका. कोणताही सिनेमा असो, वकिलाच्या तोंडी तेच ड्वायलॉग आणि त्या हतबल बलात्कार झालेल्या स्त्री अभिनेत्रीच्या तोंडी ही तेच संवाद. एखादा असा सिनेमा व्हावा ज्यात त्या सिनेमातली बलात्कारी स्त्री उघडपणे न लाजता न घाबरता बलात्काराचे सगळे डीटेल त्या वकिलाच्या थोबाडावर मारेल आणि वकिलच लाजून शांत बसेल.

सुनील Thu, 24/09/2015 - 15:23

In reply to by मेघना भुस्कुटे

अगदी लिहा. पण जजच्या तोंडी मात्र फक्त उर्दूच हवी बर्र्का!

दफा ३०२, मुजरिम, गवाह, बाइज्जत रिहा, तमाम सबूतोंको नझरेअंदाज वैग्रे वैग्रे वैग्रे ...

बॅटमॅन Thu, 24/09/2015 - 16:08

In reply to by सुनील

तमाम सबूतोंको नजर अंदाज़ केलं तर कोर्टाचा निक्कालच लागनार की ओ =)) ते 'तमाम सबूतोंको मद्देनज़र रखते हुवे' असं पायजे.

अभिनय Fri, 25/09/2015 - 23:15

In reply to by अस्वल

यु ट्यूब वर कुठे आहे ? लिंक देऊ शकता का ?

बॅटमॅन Thu, 24/09/2015 - 15:08

In reply to by आदूबाळ

कोर्टला ऑस्कर मिळणे इतके सहज आहे का?

समजा मिळालेच तर काही नाही, अजून वरकरणी अनलायझिंग परंतु अंतिमत्ळ नालस्तीच्या जिलब्या पाडतील किंवा सरळ इग्नोर मारतील किंवा ब्यांडव्यागनीवर झेपावतील.

चिंतातुर जंतू Thu, 24/09/2015 - 15:32

In reply to by आदूबाळ

>> "कोर्ट"ला ऑस्कर मिळाल्यावर विविध ठिकाणी नालस्तीच्या पिंका फेकणारे लोक कसे रिअ‍ॅक्ट होतील?

नालस्तीच्या पिंका फेकणारे लोक कोण? ते कशाकशाची नालस्ती करतात? त्यांना कोर्ट आवडलेली नाही का?

चिंतातुर जंतू Fri, 25/09/2015 - 10:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा. खूपच विनोदी आहे. इतकी शाळा घ्यायला वेळ नाही.
(हीच प्रतिक्रिया 'मायबोली'वरच्या दुव्याबद्दलची आहे. अस्वलांना अधिक दुवे देता यावेत म्हणून तिथे बूच मारत नाही.)

आदूबाळ Mon, 28/09/2015 - 20:04

In reply to by .शुचि.

मला अस्वल म्हणूदे नाहीतर संतासिंग म्हणूदे. मुद्दा वेगळा आहे.

कोर्ट बहुतांचे अंदाज चुकवणार हे दिसायला लागलं आहे. अशा वेळी "हो भौ, चुकला अंदाज. नाय समजला फिच्चर..." असे प्रामाणिकपणे कोण म्हणणार आणि "न समजणार्‍या सिनेमांनाच ऑस्कर मिळतं" किंवा "ऑस्करला काय सोनं लागून गेलं आहे" किंवा "भारतातल्या वैट वैट गोष्टी दाखवणारे सिनेमेच गोर्‍यांना आवडतात" वगैरे मखलाशी कोण करणार याची एक उत्सुकता आहे.

बॅटमॅन Mon, 28/09/2015 - 20:06

In reply to by आदूबाळ

कोर्ट बहुतांचे अंदाज चुकवणार हे दिसायला लागलं आहे.

ते कसं काय? जरा माहिती द्याल का? मी यासंबंधीची न्यूज़ वगैरे काहीच फॉलो करत नाहीये.

अशा वेळी "हो भौ, चुकला अंदाज. नाय समजला फिच्चर..." असे प्रामाणिकपणे कोण म्हणणार आणि "न समजणार्‍या सिनेमांनाच ऑस्कर मिळतं" किंवा "ऑस्करला काय सोनं लागून गेलं आहे" किंवा "भारतातल्या वैट वैट गोष्टी दाखवणारे सिनेमेच गोर्‍यांना आवडतात" वगैरे मखलाशी कोण करणार याची एक उत्सुकता आहे.

खी खी खी, अगदी अगदी. =))

चिंतातुर जंतू Tue, 29/09/2015 - 10:38

In reply to by आदूबाळ

>> कोर्ट बहुतांचे अंदाज चुकवणार हे दिसायला लागलं आहे. अशा वेळी "हो भौ, चुकला अंदाज. नाय समजला फिच्चर..." असे प्रामाणिकपणे कोण म्हणणार आणि "न समजणार्‍या सिनेमांनाच ऑस्कर मिळतं" किंवा "ऑस्करला काय सोनं लागून गेलं आहे" किंवा "भारतातल्या वैट वैट गोष्टी दाखवणारे सिनेमेच गोर्‍यांना आवडतात" वगैरे मखलाशी कोण करणार याची एक उत्सुकता आहे.

नाव चुकवल्याबद्दल सॉरी. मला वाटतं की आपल्याकडे जो अ‍ॅन्टि-इन्टेलेक्चुअलिझम आहे त्याचंच एक प्रतिबिंब 'कोर्ट'वरच्या प्रतिक्रियांमध्ये सापडावं. म्हणजे, एखादा सिनेमा मला कळला नाही, तर माझ्या आकलनाला मर्यादा असू शकतात अशी शक्यता लक्षात घेण्याचा नम्रपणा दाखवण्याऐवजी दिग्दर्शकाची अक्कल काढणं किंवा तुम्ही म्हणता तश्या प्रतिक्रिया देणं असले खेळ आपल्याकडे लोकांना अधिक आवडतात असं दिसतं. काही दिवसांपूर्वी एका चित्रपट रसास्वाद शिबिरात 'कोर्ट' दाखवला तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रिया तशाच होत्या. नंतर जेव्हा तपशीलात सोदाहरण चर्चा झाली, तेव्हा अनेकांनी मान्य केलं की त्यांना चित्रपट कळलाच नव्हता आणि आता ते पुन्हा नीट लक्ष देऊन पाहतील. मुळात हे लोक रसास्वाद शिकण्यासाठीच आलेले होते त्यामुळे त्यांची तशी तयारी तरी होती. शिवाय, प्रत्यक्ष संवादात हे अधिक शक्य होतं. जालावर मात्र पुष्कळ लोक आपलीच लाल करण्याच्या इतके मोहात असतात, की त्या स्व-प्रेमामुळे संवादाच्या सघनतेलाच अनेकदा मर्यादा पडतात.

गवि Tue, 29/09/2015 - 11:23

In reply to by चिंतातुर जंतू

नंतर जेव्हा तपशीलात सोदाहरण चर्चा झाली, तेव्हा अनेकांनी मान्य केलं की त्यांना चित्रपट कळलाच नव्हता आणि आता ते पुन्हा नीट लक्ष देऊन पाहतील.

उत्सुकतेपोटी प्रश्नः

नंतर नीट लक्ष देऊन पाहिला का त्यांनी? जास्त मजा आली?

रुची Tue, 29/09/2015 - 20:42

In reply to by गवि

नंतर नीट लक्ष देऊन पाहिला का त्यांनी? जास्त मजा आली?

हा चित्रपट कोणाला मजा यावी या प्रेरणेतून बनवला गेला नसावा असा अंदाज आहे :-) बाकी शिबिरासाठी आलेल्या इतरांनी चित्रपट नंतर नीट लक्ष देऊन पाहिला की नाही याची माहिती जंतूंना असेल असे का बरे वाटते? पण माझा अंदाज असा, की अशी नम्रता आणि मोकळा दृष्टीकोन असलेल्यांनी नक्की परत पाहिला असावा आणि त्यांना नंतर तो अधिक आवडला असावा.

या चित्रपटाबाबत नव्हे पण इतर अनेक चित्रपटांबाबत अशा "इतरांमधे" माझाही समावेश असल्याने स्वानुभवाने सांगते की चित्रपटच नव्हे तर कोणत्याही वरून अ‍ॅबस्ट्रॅक्ट वाटणार्या कलाकृतीकडे सजगपणे आणि त्याबद्दल माहिती मिळवून पाहिल्यास दृष्टीकोन हमखास बदलतो आणि त्याचा रसास्वाद घेता येतो. दरवेळेस आपले मत बदलेलंलच असे नाही पण मग ती कलाकृती फारशी भावली नाही तरीही ती का भावली नाही याची कारणे मात्र हमखास बदलतात.
अलिकडेच अशा कलाकृतींकडे (चित्रपटांसंदर्भात नव्हे पण इतर कलामाध्यमांसंदर्भात) पहाण्याच्या संदर्भात एक व्हिडिओ पहाण्यात आला, इथे डकवतेय पहा पटतंय का,
आय कॅन पेंट दॅट

रुची Fri, 25/09/2015 - 22:01

एकंदरीत बर्याच जणांना 'ढिम्म कॅमेरा' तंत्राचं वावडं असावं असं दिसतंय. ज्यांना 'कोर्ट'चं चित्रिकरण या वर्गात मोडतं असं वाटतं त्यांना सेटनटँगोची पंधरा मिनिटे दररोज पहाण्याचा गृहपाठ दिला पाहिजे :-) मी याचे सातही तास पाहिले आहेत...त्यातून शिकलेली स्थितप्रज्ञता मुलांना वाढवताना उपयोगी येते असा अनुभव आहे.
मला नेमकी हीच काहींना पाल्हाळीक वाटलेली चित्रभाषा आवडली, त्यातूनच तर बारीक-सारीक कांगोरे लक्षात येतात आणि मुख्य म्हणजे सिनेमा चालू असताना केवळ घटना आणि नाट्यमयता यात अडकून न जाता त्यावर विचार करण्याची प्रक्रिया चालू राहते. जिथे शक्य आहे तिथे सिनेमाकर्त्यांनी नाट्यमयता टाळण्याचा प्रयत्न केला आहे, मला हे चित्रिकरण आजिबात रटाळ वाटलं नाही.

अनु राव Mon, 28/09/2015 - 10:01

इथले कौतुक वाचुन विकांताला बघितला.
सिनेमाचे मुळच कॅमेरा मधे आहे आणि त्याचा च वापर करायचा नाही ही कल्पना कळली नाही.
बाल्कनी मधे बसुन एखादे नाटक ( किंवा पथनाट्य )बघते आहे असे फीलींग आले.

ह्याच अगदी एक ओळ सुद्धा न बदलता, ह्या पटकथेवर १ तासाचा ह्यापेक्षा बराच चांगला "सिनेमा" काढता आला असता.

बिपिन कार्यकर्ते Tue, 29/09/2015 - 23:03

In reply to by अनु राव

"सिनेमाचे मुळच कॅमेरा मधे आहे आणि त्याचा च वापर करायचा नाही ही कल्पना कळली नाही."

माणसाला बोलता येते. भाषा हा प्रकार अत्यंत सामर्थ्यवान आहे. भाषा म्हणजे बोलणे. ध्वनी. मात्र, अनेकदा मौनाद्वारे जे बोलता येते ते जास्त सामर्थ्यवान असते हे अनुभवाचे आहे.

असो.

Nile Fri, 23/10/2015 - 05:08

सिनेमा आवडला. वरती अनेक मुद्दे येऊन गेले आहेत. त्यात थोडी भर. (स्पॉयलर्स)

वाईड अँगल स्थिर कॅमेर्‍याचे शॉट्स आवडले. अगदी सुरवातीचा जिथे नारायण कांबळे घराबाहेर पडतो तिथपासून, त्याला पोलिस कचेरीत आणतात, नंतर कोर्टात वगैरे. क्लोझअप कॅमेरा घेऊन हे 'हिरो' असं दाखवण्यापेक्षा. 'हे गर्दीचलेच एक. इथल्या गर्दीतील अनेकांची आयुष्य अशीच पिचलेली' वगैरे दाखवायचं आहे असं वाटतं.

कोर्ट संपल्यानंतर घेतलेला पॉज विशेष आवडला. तसाच, वकिल जेव्हा पवारच्या बायकोला सोडायला जातो तेव्हा मधोमध मागच्या ट्रॅफिकमध्ये ठेवलेला कॅमेरा. मस्तच!

एनजीओत वकील महत्त्वाच्या केसबद्दल सांगत असतानाचा सिनही साधारण हेच सांगतो आहे असं वाटतं. त्याला बोलावलं आहे पण त्याच्या संस्थेचं नावही निवेदिकेला माहित नाही. त्यांनतर शुल्लक कारणाकरता त्याच्या बोलण्यात व्यत्यत आणून एक प्रकारे लोकांना याविषयी खरंच किती आत्मियता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं.

कांबळे यांना मिळणारी शिक्षा आणि लगेच सरकारी वकिलाचं आयुष्य, साड्यांवरची चर्चा पण पुढे आपल्या कोणीतरी मैत्रिणीच्या घटस्फोटाविषयी फोनवर बोलताना दाखविलेली आत्मियता (कन्सर्न) यावरून ही व्यक्ती खरंच संवेदनाशून्य आहे का नाही. तसंच सदावर्ते जेव्हा शेवटी महिनाभर ज्युडिशीयल कष्टडी देतात तेव्हा "सेशन कोर्टाला सुटी असली तरी हायकोर्टाला नाहीए" अशा प्रकारे एखाद्याच्या आयुष्याशी अगदी सहज खेळताहेत असं दाखवलंय. आणि पुढे सुटीतली चैन. जज असताना दाखवलेला तार्किकपणा, पुढे सुटीत दाखवलेला अंधश्रद्धाळूपणा. वगैरे विरोधाभास चांगले दाखवले आहेत असं वाटलं.

पन्नास साठ लोकांचं थेटर भरलेलं होतं. बहुतेक सगळे स्थानिक लोक होते. कॅप्शन वाचून ठराविक ठिकाणी मिळणारी दाद गमतीदार वाटली (जिथे एखाद्या 'पिचलेल्या'भारतीयला 'हे नेहमीचंच' असं वाटावं). वगैरे.