Skip to main content

छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे (२/३)

या आधीच्या भागातः बोरकरांच्या शब्दातच सांगायचे तर

धुंद सजल हसीत दिशा, तृणपणी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवले
गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले

पहिल्या पावसाची जादू यानंतर अधिक कळत्या वयातही अनुभवली आहे. मात्र त्या शृंखलेतलं या आठवणीचे स्थान पक्के झाले आहे.

सात आठ वर्षांपूर्वी पनवेलला सुट्ट्या साजऱ्या करायला आम्ही भावंडे जमलो होतो. गेले काही दिवस तापलेले होते मात्र त्या दिवशी सकाळपासूनच आज पाऊस पडेल असे वाटत होते. संध्याकाळी बाहेर चक्कर टाकायला बाहेर पडलो. वार सुटला होता, उन्हाळ्यात गळलेली पाने आपले मरण साजरे करत वाऱ्यासोबत भिरभिरत होती. सगळीकडे दमट वास भरला होता. आज पाऊस येणार हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नव्हती. आम्ही मग आपला मोर्चा खाडीकडे वळवला. पनवेलची खाडीवर पोचलो. एरवी एकीकडे उरणचे दिवे तर दुसरीकडे नव्यामुंबईची रोषणाई अन पलीकडे क्षितिजावर मुंबईच्या लखलखाटातून निसटलेले प्रकाशाचे तुकडे इथपर्यंत पोहचताना अनेकदा पाहिले होते. मात्र त्यादिवशीचा नजारा वेगळाच होता. मुंबईच काय नव्या-मुंबईचे दिवेही दिसेनासे झाले होते. ढगांची फौज उभी वाटावी अशी काळी-कभिन्न भिंत समोर उभी होती. सूर्य मागे अस्तास आल्याने त्या काळ्या पहाडामागून त्याची किरणे बाणांसारखी फैलावली होती. तो काळा पुंजका येताना वाटेतल्या प्रत्येकाला सचैल स्नान घडवत आमच्यावर चाल करून येत होता. आकाश चंदेरी कडा असूनही काळेभोर झाले होते. काही क्षणातच या मूकनाट्याला प्रकाश आणि ध्वनींची साथ मिळाली. लखलखीत विजा चमकू लागल्या अन त्यापाठोपाठ प्रचंड आवाजात गडगडाटही. समोर खाडीचं पाणी, त्यापल्याड ही गगनभेदी गर्जना देत चाल करून येणारी फौज आमच्या रोखाने येत होती आणि आम्ही भयचकित होऊन येणाऱ्या पावसाकडे बघत होतो. पनवेलला वायरींग जमिनीच्यावर आहे. त्यातील तारा घासून ठिणग्या पडायला सुरवात झाली. अन लवकरच विजेचे दिवे गेले. आता केवळ काळोख होता अन आमच्या सारखी काही (अती)उत्साही टोळकी ते निसर्गाचे रौद्ररूप बघत थिजली होती. काही क्षणातच आमच्या डोईवरचे आभाळ काळवंडले. पाऊस सुरू झाला नव्हता मात्र प्रचंड विजा चमकत होत्या. इतका वेळ आ वासून ते दृश्य बघत होतो, आता मात्र एकाच्या तोंडून "चल रे परत जाऊया" निसटले. आम्ही मागे वळलो तोच आमच्या समोर विजेचा लोळ पन्नास-साठ फुटांवरच्या एका झाडावर कोसळला. त्याच बरोबर कानाचे पडदे फाटतील असा भयंकर आवाज झाला. डोळे दिपणे म्हणजे काय हे आम्ही शब्दशः अनुभवत होतो. एखादं मिनिट काहीही दिसत नव्हते ऐकू येत नव्हते. जरा दिसू लागते तेव्हा बघितले की इतके मोठे झाड डोळ्यादेखत दुभंगले होते! आम्ही तिथल्यातिथे रुतल्यासारखे थिजलो होतो. जराही पाऊल निघेना. मात्र आता निसर्गाला आमची दया आली असावी, काही सेकंदात त्या मोसमाच्या पहिल्या सरींनी आम्हाला चिंब तर केलेच पण मनातील भीतीलाही पातळ केले. निसर्गापुढे माणसाची लायकी त्या पहिल्या पावसाने काही क्षणात दाखवून दिली होती. आमच्या हातात असलेला क्षण साजरा करणे शिल्लक ठेवले होते. परत येताना वाळलेली पाने भिजलेली दिसत होती. एकेकाळी हिरवी असलेली ती पाने आता कितीही भिजली तरी पुन्हा जगणार नव्हती. आम्ही आला क्षण हिरवा समजून जागावं इतकेच ती सांगत होती!

बिजली कोंद गयी आखों के आगे तो क्या
बात करते के मै लब तश्न-ए-तकरीर* भी था

पहिला पाऊस असा वेगवेगळ्या रूपात भेट आला आहे. मात्र तो भेटण्यापूर्वी दरवेळी एक नव्याने हुरहुर दाटते. सारी स्थिरचर सृष्टी चातक झाली असते. असाच एक पहिला पाऊस माझ्या आठवणींच्या आकाशात स्थिरावला आहे. आम्रिकेत आलो होतो तो उन्हाळा बाहेर पडत होता. नंतर फॉल कलर्सची मोहिनी टिकली होती. तशातच एके दिवशी रविवारी आमचा सिक्स फ्लॅग्सना जायचा बेत ठरला. आम्ही सकाळी तयार होऊन गाडी बाहेर काढली. एक्प्रेसवे सारख्या 'फ्रीवे' ला लागलो. तसाही न्यूयॉर्क जवळ बारा महिने कधीही पाऊस भुरभुरतो. वेगळा पावसाळा असा नाही. मात्र या काळात तो थोडा वेळ येऊन बंद होत होता. त्यामुळे रस्त्यावर असताना सूर्य दर्शन अचानक बंद झाल्याने आम्हाला काही वाटले नाही. आपण तिकिटे काढेपर्यंत थांबेल पाऊस असा अंदाज केला. इच्छित स्थळी पोचलो. भल्या मोठ्ठ्या पार्किंग लॉटमध्ये गाड्या लावल्या आणि गाडीबाहेर पडलो तो खांद्यावर काहीतरी पडल्यासारखे वाटले. प्रतिक्षिप्त क्रियेने ते झटकले तर हाताला ओले लागले. म्हणून आजूबाजूला पाहिले तर तो बर्फ होता. माझ्या आयुष्यातला पहिला 'हिमसेक'. मी डोळे विस्फारून तो बघत होतो. शुभ्र, स्वच्छ हिमाचे कण सर्वत्र कोसळत होते. काही मिनिटातच तो पार्किंग लॉट ओळखू येणार नाही असा बदलला. सर्वत्र हिमाची शुभ्र चादर पसरली. वर्षभरातला कचरा, घाणच नाही तर परिसरातील नैसर्गिक-कृत्रिम असे सारे रंग लोप पावले आणि या साऱ्यांतून घडलेला 'अंतिम सत्य' दर्शवणाऱ्या शुभ्रतेचे साम्राज्य पसरले. एखाद्या मुलानं साबणाचा फेस मनसोक्त उधळून द्यावा तसा काहीसा प्रकार. तितकाच रम्य, आनंददायी अन निरागस! खवलेल्या खोबऱ्यासारख्या स्थायुरूपातील पहिल्या पावसाच्या वर्षावात न्हातानाच्या त्या अतिसौम्य शुभ्रतेचे पहिले दर्शन अजूनही मनात थिजले आहे; अन् ते कधी वितळेल असे वाटत नाही. पु. शि रेगेंना हिमसेक 'वेगळाच' दिसला त्यात काय ते नवल?

सतेज तुझे बोलणे-चालणे
सुकुमार खेळे अंगी नव्हाळी....
क्षणभर वाटे
अपूर्व जणू हिमसेक हा
स्वच्छ, निरागस, तेजाळ, विश्रब्ध...

काय मजा असते नाही. एखादी ओळ, एखादी कविता, एखादा प्रसंग आपल्याला किती मागे घेऊन जातो. पहिल्या पावसाला यायला अजून कितीतरी वेळ आहे आणि मी मात्र काही ओळींमुळे पार कुठल्याकुठे पोचलो आहे. रोजच्या आयुष्यात माझ्यापासून वर गेलेल्या आठवणींच्या आकाशातून अश्या सरी कोसळतच राहतात, काही क्षण त्यात भिजावेसे वाटतेच पण ....

(क्रमशः... भाग ३)

*तश्न-ए-तकरीर : तहानलेल्या ओठांचा आवाज
या व्यतिरिक्त दोनेक वर्षांपूर्वी कुर्डुगडावर रात्रीच्या ट्रेकमध्ये गाठलेला पहिला पाऊसही नेहमी लक्षात राहील. मात्र त्यावर आधीच लिहिले असल्याने फक्त दुवा देतो.

Node read time
4 minutes
4 minutes

अदिति Tue, 10/04/2012 - 13:53

दुसरा भाग अपेक्षेप्रमाणे उत्तम. विशेषत। वीज पडण्याचे वर्णन तर अंगावर काटा उभा करणारे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

आतिवास Tue, 10/04/2012 - 15:34

पनवेलच्या पावसाचा अनुभव एकदम आवडला. आणि त्यावरून आला क्षण हिरवा समजून जगावं इतकेच ती सांगत होती! >> हे तुम्हाला जाणवलेलं सत्य पण!

Dr. Medini Dingre Tue, 10/04/2012 - 22:58

किती मस्त लिहिलाय लेख...पावसासारखाच धुवांधार आणि भिजवून टाकणारा. सुंदर वर्णन केले आहे. आत्ताच्या उन्हाळ्यात वाचायला अधिक मजा आली.

नंदन Tue, 10/04/2012 - 23:29

हाही भाग आवडला. 'गाणी, पुस्तकं आणि पावसाळ्यांच्या सोबत असलेल्या आठवणी न विसरता येण्यासारख्या असतात', या आशयाचं वाक्य कुठेतरी वाचलं होतं त्याची हा लेख वाचून आठवण झाली.

राजेश घासकडवी Thu, 12/04/2012 - 21:49

अनेक पावसाळे कोरडेपणाने बघणारे असतात. पण इथे पावसाच्या अपेक्षेतच आठवणींनी, चित्रांनी तुम्ही न्हाऊन निघाला आहात. त्यातला थोडा ओलावा वाचकांपर्यंतही पोचतो.