Skip to main content

छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे (३/३)

या आधीच्या भागातः काय मजा असते नाही. एखादी ओळ, एखादी कविता, एखादा प्रसंग आपल्याला किती मागे घेऊन जातो. पहिल्या पावसाला यायला अजून कितीतरी वेळ आहे आणि मी मात्र काही ओळींमुळे पार कुठल्याकुठे पोचलो आहे. रोजच्या आयुष्यात माझ्यापासून वर गेलेल्या आठवणींच्या आकाशातून अश्या सरी कोसळतच राहतात, काही क्षण त्यात भिजावेसे वाटतेच पण ....

आठवणींच्या आकाशाच्या अन्
माझ्यामध्ये मी एक छत्री धरून बसतो

अलीकडे आजचा मी अन्
पलीकडे आधीचा
आठवणींच्या ताब्यातला

आज सरला अन्
आजचा मी कालचा होऊन छत्री पलीकडे गेलो
वाट पाहत उद्याच्या माझी.. कसा असेन उद्या मी?

उत्सुकतेच्या फटीतून डोकावलो अन्
आज माझ्यावर कालचे मी पडू लागले
फट विस्तारली.. छत्री फाटली..
आठवांच्या रुपात कोसळत राहिलो
पार पार मागे वाह(व)त गेलो...

छ्या! ही छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे!

अदिति Wed, 11/04/2012 - 11:12

फारच छान! फाटलेल्या छत्रीसकट सगळे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले.
लेख मनापासून आवडला. कसं काय सुचलं तुला? असं सुचूच कसं शकतं? असे प्रश्न विचारावेसे वाटले.
:) लिहीत रहा...

श्रावण मोडक Wed, 11/04/2012 - 11:28

वा!!! पहिले दोन भाग वेगळे टाकलेस हे उत्तम केलेस. कारण या रचनेला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. ते इथं ती वेगळी असल्यानं नीट भिडलं. :)

नंदन Wed, 11/04/2012 - 12:00

वरील तिन्ही प्रतिक्रियांशी सहमत!

मंदार Wed, 11/04/2012 - 15:27

आहाहाहा! ऋष्या, लेका तू ग्रेट आहेस! पाऊस, पाणी, बर्फ वगैरे गोष्टींबद्दल मला आत्यंतिक जिव्हाळा आहे
पण कधी असं मांडू शकलो नाही. सुरेख मांडलंयस.

नगरीनिरंजन Thu, 12/04/2012 - 13:17

सुरेख लेखमालेचा सुंदर शेवट!

तिरशिंगराव Thu, 12/04/2012 - 15:21

तीनही भाग वाचले. पहिले दोन भाग वाचत असताना माझे पावसातले कळसुबाई, लोहगड, माथेरानचे अनुभव आठवले आणि माझीही छत्री फाटली.
तिसरा भाग काव्यरुपाने पेश करण्याची कल्पना आवडली.
सुंदर लेखन!

सानिया Thu, 12/04/2012 - 20:25

तीनही भाग एकापाठोपाठ वाचले. मजा आली. पावसाची चाहूल लागली असता जाणवणारी हुरहूर, या भजनाच्या सुरुवातीच्या तुकड्यात पंडितजींनी नेमकी पकडली आहे.

माझ्या एका मैत्रिणीची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया कितपत यशस्वी झाली आहे, याचा अंदाज काही दिवसांनी यायचा होता. ती हॉस्पिटलमधून घरी निघत असतानाच अचानक पाऊस पडायला लागला, म्हणून मी चिंतेत पडले. मात्र तिच्या नवर्‍याचा चेहरा आनंदाने फुलून निघाला. त्या आगंतूक पाहुण्याने त्याला सर्व काही ठिक होणार असे आश्वासन दिले होते! तो पाऊस आणि त्याचा चेहरा माझ्या कायम लक्षात राहील.

राजेश घासकडवी Thu, 12/04/2012 - 21:53

छत्रीखाली जाणं हे मला गाडी बोगद्यात शिरण्यासारखं वाटलं. पण फटींमधून आठवणींचे स्वर दिडदा दिडदा करत रहातात...

मस्त लेखमाला.

अनामिक Thu, 12/04/2012 - 22:50

तिनही भाग एका दमात वाचून काढलेत. खूप छान!
तूझी छत्री अशीच कायम फाटलेली असावी आणि तू ह्या आठवणींचा ओलावा असाच आमच्यापर्यंत सतत पुरवत रहावा असे वाटले.

रुपाली जगदाळे Thu, 12/04/2012 - 23:55

वा! छत्री तुमची फाटलीय आणि पावसात भिजवून टाकलंत आम्हाला! पाउस हा माझा जिव्हाळ्याचा विषय, कितीक आठवणी जाग्या झाल्या. सुंदर लेखन! धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 16/04/2012 - 22:41

उन्हाळा संपताना पावसाची वाट बघताना आलेला पाऊस, चिखलात उड्या मारण्यासाठी लागणारा मुळातला द्वाडपणा जागा करणारा पाऊस, कुंद वातावरणातला डोंगराच्या टोकावरचा निवांत पाऊस, "बरं आहे इथे मुंबईसारखा बदाबदा पाऊस कोसळत नाही" असं म्हटल्यावर पाच मिनीटांत ओलंचिंब भिजवणारा पाऊस ... सगळ्याची आठवण झाली.

ऋ, लिहीत रहा.

मेघना भुस्कुटे Fri, 29/11/2013 - 15:54

पाऊस नि पावसाशी संबंधित घासून गुळगुळीत झालेल्या असोसिएशन्समुळे हा लेख वाचला नव्हता. आज वाचला. काहीच्या काही 'लागली' आहे तुमची लेखणी. नि एखाद्या हायकूसारखा फॉर्म. फार फार फार आवडला.

'न'वी बाजू Fri, 29/11/2013 - 17:31

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रतिसाद वाचून, का कोण जाणे, पण 'स्वाती ठकार'ची आठवण झाली.

फक्त तेवढा एक लसणीचा भपकारा हवा होता. नि एखादा हुंकार.

बॅटमॅन Fri, 29/11/2013 - 17:52

In reply to by 'न'वी बाजू

टुकार बाईंपेक्षा हा प्रतिसाद जेन्युइन आहे बराच. पूर्वेतिहास न पाहता तुलू गेलो तर अर्थातच तसे वाटण्याची काहीएक शक्यता आहे हे मान्य ;)

मेघना भुस्कुटे Fri, 29/11/2013 - 18:12

In reply to by बॅटमॅन

मलाही कर. भिकार कविता करणार्‍या कुणा एका बाईंसारखं काहीतरी मी बरळलेय (असं 'न'वी बाजूंना वाटतंय) याहून जास्त काही तपशील असले, तर मलाही जाणून घ्यायचे आहेत.

'न'वी बाजू Fri, 29/11/2013 - 20:32

In reply to by बॅटमॅन

प्रतिसादाच्या निव्वळ ष्टाइलबद्दल (कोणी लिहिला, कशासाठी लिहिला वगैरेंकडे पूर्ण दुर्लक्ष करून) निरीक्षण नोंदवले. अधिक काही नाही.