Skip to main content

आज मै उपर , आसमां नीचे

22 minutes

करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे. पाटील कुलकर्णी जोशी पवार कांबळे गायकवाड हे असतातच.आमच्या सातारकडे तर काही गावे च्या गावे ठरावीक आडनावांची असतात. लिंब-गोवे म्हणजे साळुंखे पाटखळ म्हणजे शिंदे , सातारा कशाला पुण्यातही हे सापडते. भोसरी गावात लांडगे आणि उंद्री गावात मांजरे आडनावाचे लोक रहातात हे समजले तेंव्हा गम्मतच वाटली होती. असो.पण आपले नावच वेगळे आख्ख्या शाळेत दोघींचेच नाव करुणा. करुणा टिपणीस आणि करुणा जाधव. करुणा जाधव युपी एस सी देऊन आय पी एस झाली. गेल्या महिन्यात भेटली होती चालणे बोलणे एकदम वेगळेच,काय रुबाबदार दिसत होती ना. तीच्या नावात फक्त करुणा. काम मात्र गुन्हेगारांना वठणीवर आणायचे. असते एखादीचे. बाकी नावाचा आणि दिसण्याचा तसा काहीच संबन्ध नसतो. बघा ना अर्थातच कसा असेल. मुलाचे किंवा मुलीचे नाव वयाच्या अवघ्या बाराव्या दिवशी ठेवले जाते. काहीवेळा तर जन्माच्या अगोदरच . त्या वेळेस मुलगा होणार की मुलगी तेही माहीत नसते. आणि ते पुढे मोठी झाल्यावर काय करतील कशी दिसतील हे तरी कसे ठरवणार. ताहीराचा भाउ शेरखान पण तो दिसायचा इतका सुकडा. त्याने नाव सांगितल्यावरच हसू यायचे. द ग्रेट असा नावाचा अर्थ होतो तो अकबर पंक्चर काढायची टपरी टाकतो.मधुरा नावाची बाई कैदाशीण बरी अशी वागते. मधुरा ऐवजी तीचे नाव मंथरा असते तर बरे झाले असते वाटते. कॉलेजमधे भद्रा शहा ला कोणीतरी एकदा विचारले होते की तुमच्यातले लोक सैन्यात का जात नाहीत. तीने न चिडता उत्तर दिले होते. म्हणाली आमच्यात रणछोड हे नाव खूप कॉमन आहे. कल्पना करा ब्रिगेडियर रणछोडदास हे ऐकायला कसे वाटेल. नावामुळे त्याला बढतीच काय पण सैन्यात नोकरीही मिळणार नाही. तीने त्या प्रश्न विचारणार्‍या अँकरला एकदम निरुत्तर करून टाकले होते. लोकानी टाळ्यांचा इतका जल्लोष केला की तो पुढे काही विचारायचेच विसरुन गेला.करुणा जाधव आणि आपण फक्त नावातच साम्य. बाकी सगळेच निराळे. बारावी पर्यंत दोघीही एकत्र शिकलो. ती पुढे बी एस सी ला गेली. युपी एस सी करायचे म्हणून. आपल्याला मेडिकलला जायचे होते. रुग्णांची सेवा करायला मिळावी म्हणून.
पीक पीक पीक. अलार्म बेल चा बझर वाजतो. भोवतालच्या मंद उजेडाला आणखीन गडद करत डॅशबोर्डवरचा लाल दिवा चमकतो. सांगतोय करुणा..... तीनशे पंधरा नंबर तीनशे पंधरा नंबरचा पेशंट... त्याला काहीतरी हवंय. त्या दिव्याच्या एका चमकण्याने माझे विचारचक्र तुटते. ड्यूटी फर्स्ट... अर्थात हे नेहमीचेच आहे. हा तीनशे पंधरा वरचा पेशंट , आज्जिबाई आहेत त्यांच्या वयात पेशंट चा नंबर मिळवला की चारशे पूर्ण होतात. त्याना बेलचे बटन दाखवले नसते तर बरे झाले असते. दोन तासात हे चौथ्यांदा होतंय. एकदा काय तर तहान लागली आहे पाणी प्यायचंय. दुसर्‍यांदा थंडी वाजते पांघरूण घाल. तिसर्‍यांदा लघवी करायची आहे बेडपॅन हवाय. आत्ता कशासाठी केलाय पहायला हवे. त्यांच्या सोबत झोपायला म्हणून एक लहान मुलगी आहे ती एकतर सतत झोपते किंवा मग फक्त रील बघत बसते. रात्रभर रील मधले ते खॅ खॅ खॅ चे आवाज ऐकत बसते. कितीदा सांगितले की हेडफोन घालून बस तर म्हणते की हेडफोन मुळे आज्जींनी बोलावले तर ऐकायला येत नाही. इतर पेशंट ना त्रास होतो ते दिसत नाही तीला. प्रत्येक जण स्वतःपुरते बघतो. ती त्या आज्जींची नात तर दिसत नाही. कामवाली असेल बहुतेक.,आपल्याला काय करायचेय. नसत्या चौकशा. आपण बरे आपले काम बरे. आज्जीना धाप लागली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाली आहे. हे काय ऑक्सिजन टँक मधली लेव्हल इतकी कमी कशी? संध्याकाळी हेब्बळ ने ऑक्सिजन सिलिंडर बदलला नाही की काय. अरे बापरे . नीड टू अ‍ॅक्ट इमिजिएटली. . हॉस्पिटल मधे या क्षणी किमान वीस पेशंट ऑक्सिजन वर असतील. पण ऑक्सिजन सिलिंडर कोण बदलणार आत्ता या वेळेस? दुर्योधन पांडे?..... तो बसला असेल बाटली पिऊन. नेहमीचे आहे त्याचे नाईट शिफ्ट म्हणजे त्याला वाटते की पिऊन यायची संधी असते. वॉर्डात तसाही औषधे डेटॉल आणि इतर केमीकल्स चा वास असतोच. अल्कोहलचा वास दबून जातो त्यात.
गणेश दुर्घाटे...तो बिचारा अभ्यास करतोय यु पी एस सी चा. बघावे तेंव्हा पुस्तकांच्या गराड्यात असतो.
त्याच्या अभ्यासामुळे आमच्यावर कामाचा लोड येतो .पण थोडे सांभाळून घेऊया. त्याच्या करीयरला मदत होत असेल तर तेवढीच.
वर्षा लिपारे .. ती बदलू शकेल सिलेंडर... पण ती तीची ड्यूटी नाहिय्ये.काही झाले तर जबाबदारी कोणाची?
प्रश्नच आहे.
रामनाथ सरांना फोन करुया. पण या वेळी? ते चिडतील . ओरडतील ,उद्या अगदी सकाळी सकाळी त्याना ओ टी आहे. पण त्या वेळेस ऑक्सिजन नसेल
हॅलो रामनाथ सर.... करुणा टिपणीस बोलते आहे. सॉरी सर. सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू अ‍ॅट धिस अवर. ऑक्सिजन सिलेंडर मधले प्रेशर कमी झालेले आहे. काहीतरी टेक्निकल फॉल्ट असावा. हो. पांडे आहे ड्यूटीवर. पण तो काम करायच्या अवस्थेत नाहिये. ओके सर मी गोन्साल्वीस ला फोन करते. येस सर रीपोर्ट करते. ओके. तीनशे पंधरा पेशंटला धाप लागली म्हणून प्रेशर चेक केले. काय नाही नाही बी पी नॉर्मल आहे. फीवर नाहिय्ये. पल्स ९७ आहे. सिस्टोलिक जरा १३३ डायस्टोलीक ९० आहे. चेक केले मी. आदर सिम्प्टोम्स नॉर्मल. माझे पूर्ण लक्ष्य आहे. ओके सर.
हॅलो…… हॅलो गोन्सालवीस इमर्जन्सी. हो. रामनाथ सरांनी सांगितलय.
रामनाथ सरांचे नाव ऐकताच तो दहा मिनीटात येतो आणि सिलेंडर चे प्रेशर चेक करतो. सिलेंडर व्हाल्व मधे काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आत्ता ठीक केलंय.
हा पेशाच असा आहे की इथे नाही म्हणायला जागाच नसते. कोणताही प्रश्न असो तुम्ही हो च म्हणायला हवे. वैद्यकीय पेशात नकार द्यायचा नसतो. नर्स ने तर कधीच नाही. लोक डॉक्टराना देव मानतात. नर्स ना देवाईतकेच पूजनीय मानतात. देवाने कोणाच्या विनंतीला नकार दिल्याचे ऐकलेय का कधी?
निदान सकाळपर्यंत तरी पहावे लागणार नाही. जनरल वॉर्ड मधे कितीही नर्सेस ठेवा इमर्जन्सी कायमची असतेच. या पेक्षा ओटी ची ड्यूटी बरी. दोन एक तास टेन्शन चे असतात. त्या नंतर सुटका तरी होते. अर्थात ते कुठले आपल्या नशीबात. आपल्या नशीबात एकतर जनरल वॉर्ड नाहीतर मॅटरनिटी. मॅटरनिटी मधे लहान बाळे असतात. लोकाना वाटते की तिथे मज्जा असेल म्हणून. असते देखील थोडीशी. तिथे जरा आनंदी चेहरे तरी पहायला मिळतात. प्रसुतीच्या वेदनानी शिणलेली आई बाळाला जेंव्हा बघते तेंव्हा खूप बरे वाटते तीच्या श्रमलेल्या चेहेर्‍यावर आनंद थुईथुई नाचत असतो.
आपल्याही आईला असाच आनंद झाला असेल ना मला पहिल्यांदा पाहिल्यावर. काय वाटले असेल ना तीला. काय माहीत. आई असती तर विचारता आले असते. त्या न आठवणार्‍या आईच्या उल्लेखानेही मनात एका जुन्या जखमेची खपली उखडली जाते.इतक्या वर्षांनंतरही. जन्मानंतर थोड्याच दिवसात आई गेली. पुढचे सगळे बाबांनीच केले. बाबा दवाखान्यात वॉर्डबॉय होते. त्याना खूप वाटायचे की मी डॉक्टर व्हावे म्हणून. पण नाहीच जमले ते.
आपण नर्स झालो तेंव्हा बाबाला खूप आनंद झाला होता. आख्ख्या दवाखान्यात त्याने पेढे वाटले होते. सगळ्या डॉक्टराना नर्सेस ना सगळ्या मावशीनाही. त्याचे स्वप्न अर्धे का होईना पूर्ण झाले होते.
नर्स झालो ते आपण स्वतःची इच्छा म्हणून की बाबाची इच्छा म्हणून? माहीत नाही. पण त्याचे आणि माझे असे काही वेगळे नाहीच मुळी. जे त्याला वाटते तेच मलाही वाटते. बाबाच म्हणतो तसा. मी अगदी लहान असल्यापासून.
नर्स बनले ते रुग्णांची सेवा करायची म्हणून. एक नोबल पेशा म्हणून. समाजात मान मिळतो नर्सला म्हणून. तीच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकत नाही. बाबाने मला माझ्या नावाचा अर्थ सांगितला तेंव्हापासून . असे काहितरी करावेसे वाटायचे.
ख्बॉक ख्बॉक ख्बॉक...... कोणाच्या तरी खोकल्यानी पुन्हा विचारांची माळ तुटते. मी आवाजाच्या दिशेने पहाते. तीनशे नऊ नंबरचा पेशंट
अरे बापरे. याला न्यूमोनिया चा पेशंट.... सिव्हीयर लेजीऑनेर्स... लंग्ज पाण्याने भरली आहेत. ऑपरेट करायला हवे पण वय आणि तब्येत साथ देत नाहीये.
समोरचा पेशंट दगावणार आहे हे समजतय. तरीही मला त्याला ट्रीटमेंट द्यायलाच हवी. त्याच्या बेडशेजारचे औषधाचा बॉक्स पहाते. अरे बापरे पेन रीलीव्हर म्हणून चक्क नायट्रो ग्लिसरीन२०० लिहीलय. हे औषध तर अंजायना साठी असते ना? दोनच गोळ्या शिल्लक आहेत.म्हणजे या अगोदर दोन डोस झालेत? पण हे औषध म्हणजे? विचारयला हवे सकाळी.आत्ता तरी औषध देणे इतकेच काय ते करू शकते. त्या आजोबानी औषध घेतले. औषधाने किंवा त्या सोबत प्यालेल्या गरम पाण्यामुळे असेल पेशंट ची ढास कमी झालीये. झोप बाबा आता शांतपणे निदान सकाळ होई पर्यंत तरी.
अगोदरच आज स्टाफ कमी आहे.तुला काही झाले तर आमचा वर्कलोड कमी होण्यापेक्षा त्यात वाढच होईल.
रात्र म्हंटली की शांतता असते असे म्हणणाराना एक दिवस जनरल वॉर्ड मधे आणून बसवायला हवे. सगळ्या व्याधी अंधार पडायची वाटच पहात असतात जणू.कुणाची खोकल्याची उबळ वाढते. कोणाच्या अंगाला खाज सुटते , कोणाचा दिवसभर बेपत्ता असलेला ताप बटन चालू करावे तसा सुरू होतो. कोण डोळे फिरवायला सुरवात करते.
ती पलीकडची ३२२ वरची बाई वेदनेने किंचाळत असते. तीच्या पोटात ट्यूमर आहे. चांगला नारळा एवढा. दोन वेळा ऑपरेशन टेबलवरून परत आणले आहे. ऑपरेशनच्या वेळेस नेमकी तीची पल्स लागत नाही. त्या ३१८ वरचा पेशंट एकसारखा असंबद्ध बोलतोय. सोडीयम कमी झाले आहे.सोडीयम इंजेक्ट करायची वेळ झाली. गेल्या वेळेस उशीर झाला होता . केस हायपो नेटर्मिया मधे जाताजाता राहिली. त्या तीनशे सात चे टाके उद्या काढणार आहेत. बॅन्डेज बदलायचे राहिले आहे. रात्रभर नुसती चाकावर असल्या सारखी अवस्था आहे. थोडे कुठे बसायला जावे तर डेस्क वरची बेल पुन्हा वाजते कोणाचे तरी आय व्ही संपायला आलेय म्हणून. जर्रा म्हणून सवड नाहिय्ये आज.
ओ ओ ओ ओ ओ, आह आह ,अरे देवा, सोडव रे मला आता नाही नाही सहन होत नाहिये...... या शिवाय दुसरे काही ऐकू येत नाही. तरी बरे तीनशे चार चे सकाळी ऑपरेशन झाले. साधे ब्लड सँपल घ्यायला सुई टोचली तीने ए भाड्या अगायायाया , ए सटवे . पटकी येवू दे तुला...म्हणत अक्षरशः बोंब ठोकली होती म्हणे. कोणीतरी सांगत होते.
कधीकधी इथेही येतात असले प्रसंग. तरी बरंय. इथे इमर्जन्सी नसते रात्री मॅटरनिटी वॉर्ड सारखी . तिथे बाळे जन्माला येतात तीच वेळ न पहाता. नातेवाईक विचारत असतात बाळाची जन्मवेळ सांगा म्हणून. डिलीव्हरी करताना बाहेर येणार्‍या बाळाकडे बघायचे की घड्याळाकडे? हे लोक ना काहिही विचारतात. बसा तुम्हीच घड्याळ घेऊन डिलीव्हरीच्या वेळेस. आणि वेळ तरी नक्की कोणती धरायची. बाळाचे डोके बाहेर आली ते की मग नाळ कापली ती? ती बिचारी बाळाची आई अक्षरशः मरणाच्या दारातून परत येत असते त्या वेळेस. आणि नातेवाईक सांगतात घड्याळ बघा.
करीयरच्या सुरवातीला पहिले सहा महिने मॅटरनिटी वॉर्डच दिला होता आपल्याला.नुकतीच जन्माला आलेली लालचुटूक चेहेर्‍याची ती इवलीशी बाळे पाहून सुरवातीला जरा भितीच वाटायची. शिणलेल्या अवस्थेत असलेल्या त्याच्या आईला त्याही अवस्थेत बाळाला पाहिले की भरून पावल्याचे भाव चेहेर्‍यावर पसरायचे. माअ वाटायची. लहान बाळे हाताळायला जमलेच नाही नीट आपल्याला सुरवातीला. मोमीन मावशी नी साम्भाळून घेतले आपल्याला म्हणून बरे. नर्सिंग च्या अभ्यासक्रमात बाळाला मायेचा स्पर्ष देवून कसे शांत करायचे हे कधी शिकवलेच नाही.
आपण नर्सिंग ला अ‍ॅडमिशन घेतली याचा बाबाला खूप अभिमान. आपल्यालाही किती छान वाटले होते.
आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो. पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो. रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा. रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. कोणी रस्त्यातजरी भेटले ओळखेचे तरी बोलायचे विषय तेच. आजारपणाचे, हॉस्पिटलचे नाही तर कोणीतरी कशाने तरी सिरीयस आहे याचेच.
बायका भेटल्या तर विचारायला नको. दुखणी खुपणी यात महिन्याच्या पाळीबद्दलही बोलायला सुरवात करतात अगदी भर रस्त्यातही. गेल्या महिन्यात सिनेमा पहायला गेले होते. चांगली प्रेम कहाणी होती शाहीद कपुरची. पण मध्यंतरात वीणा ताई भेटल्या. त्यानी पुढचा सिनेमा बघूच दिला नाही. आपल्यापेक्षा हलवाइ बरा. सातारला गेलो होतो तेंव्हा वर्गातला विजा लाटकर म्हणत होता. माझ्या दुकानात दु:खी माणूस येतच नाही. सगळे येतात ते खुशखबर घेऊन. पास झाल्याची , नोकरी लागल्याची , लग्न ठरल्याची बाप झाल्याची , घर खरेदी केल्याची. पेढेवाला ना तो. हेवा वाटला त्याचा.
नाही म्हणायला कधीतरी मजेदार घटनाही घडतात. गेल्या महिन्यात ते पंडीत रत्नप्रभाकर आले होते. तबलावादक. सगळे बोलणे व्हायचे ते सगळे संगीताच्या नाहीतर तालाच्या भाषेतच. त्यांचे हार्ट बीट्स काय तर म्हणे द्रुत लयीत चालत होते. खोकला कसा आहे विचारले तर त्यात सुधारणा आहे सांगताना म्हणाले की परवा झपताल ….पाच मात्रांचा होता. काल त्रिताल … चार मात्रांचा होता आज तीन मात्रांचा दादरा चालू आहे. आख्खे हॉस्पिटल स्टाफच काय, पेशंट सुद्धा हसत होते दिवसभर. पण असे प्रसंग अगदीच अपवाद म्हणून. एरवी सतत रडके चेहरे आणि वेदनाच समोर असतात.
स्वतः होऊन दुखणी पहात बसायची. कंटाळा आलाय आता. किती दिवस हेच करायचे . डॉक्टर झाले असते तर निदान नवीन काही शिकले असते. तेवढाच फरक पडतो. आर्थीक आणि मानसीक स्थितीत. आपल्याला कितीही सिनीयर व्हा. तीच आणि तीच कामे करायची. बदल तो कसला म्हणूण नाहीच.
हे हल्ली असं खूप व्हायला लागलंय ना? पण कशामुळे?
हा प्रश्न आला. इतका वेळ मनात स्वतःशीच संवाद करत असलेली नर्स करुणा स्वतःशीच चमकते.
का बरे असे वाटावे?जाऊ दे. नकोच हा विचार करायला.
हाताने माशी हाकलून लावावी तसा तो प्रश्न करुणा उडवून लावते. पण तो प्रश्न तीचा पिच्छा सोडत नाही.
दिवसभर किंवा मग रात्रभर हॉस्पिटल मधे पेशंट ची सेवा शुश्रुषा. पार थकून जायला होते. घरी गेल्यावर बाबा ची सेवा. पॅरालिसी झाल्यामुळे त्याला बिचार्‍याला काहीच करता येत नाही. त्याच्याकडे पाहिले की भरून येते. अगदी आतून हलून जायला होते. इतकी वर्षे भक्कम दिसणारा अगदी सह्याद्रीच्या खड्या बुरुजासारखा असणारा आपला बाबा. अचानक ट्रेनमधे त्याला पॅरालिसीसचा अ‍ॅटॅक काय येतो. त्याचे शरीर लुळेपांगळे करून टाकतो.आयुष्यभर ताठ कण्याने जगलेला तो, साध्या चहा पिण्यासाठीही दुसर्‍यावर अवलंबून रहायला लागतेय.त्याची ओठांमधून गळणारी लाळ देखील स्वतःला पुसता येत नाही.आपण त्याला घास भरवतो त्या वेळेस त्याची नजर आपल्याला खूप काही सांगत असते. नको असलेलेही.आता बास हे परोपजीवी जगणे. असे काहिसे भाव असतात त्याच्या नजरेत. लाचारीचे अजीजीचे. नको वाटते त्याच्या डोळ्यात बघायला. इतका मस्त माणूस आपला हीरो माणूस असा अगतीक झालेला पहाण्यापेक्षा ....... त्याला हारलेला पहावत नाही. त्यापेक्षा शरीराचे आणखी धिंढवडे होण्यापेक्षा त्याचा शेवट व्हावा. आपल्या डोळ्यादेखत. हे आपलेविचार आहेत की बाबाचे. माणूस स्वतःच्या भावभानांसह रुबाबात जगणे जगत असतो तोवर तो माणूस असतो. ते संपले की उरते ते नुसते फर्निचर शरीर नावाचे. फर्निचरवर ओल्या फडक्याने पुसतो. शरीराला स्पंजिंग करतो. फर्निचरवर आपण कव्हर घालतो शरीरावर कपडे घालायचे. सोफ्यावरच्या उशांना रंगीत कव्हर घालावे तसे शरीराला, डोक्याला टोपी शाल घालून आणखी सजवायचे. फर्निचरला त्याचे काहीच नसते. त्याचे सजवणे हवे असते ते फर्निचरचे प्रदर्शन घरात मांडणाराला.
शी:...... लाज वाटते आपल्या स्वतःच्याच विचारांची. घरी कोणी येईल आणि काय म्हणेल म्हणून बाबाचे आंघोळ कपडे वगैरे करायचे. बाबालाही हेच म्हणायचे असेल कदाचित. म्हणूनच तो म्हणायचा माझे फर्निचर व्हायच्या आत उचल मला देवा. देवाने त्याची प्रार्थना ऐकली.
बाबा गेला तेंव्हा आतून खूप मोकळे मोकळे वाटले. रडणे वगैरे न येता बंद दाराआड कोंदट हवेमुळे अंधारामुळे घुसमट होत असावी आणि एकदम दार उघडले गेल्यामुळे आलेला प्रकाश आणि मोकळी स्वच्छ हवा अनुभवायला मिळावी तसे काहिसे. आभाळ मोकळे झाल्यासारखे. त्याचवेळेस मनातुन कुठेतरी खूप अपराधी वाटले होते.
जन्माला आला तो जातोच हे म्हणायला खूप सोप्पे आहे. पण जन्म आणि मरण या मधल्या काळात तयार झालेले एक विश्व मोडून जातो.
बाबा गेल्या नंतर आता रुग्ण हेच आयुष्य झालंय.त्या शिवाय दुसरे जगच नाहिय्ये.नर्सेस ना दुसरे आयुष्य असते हेच माहीत नाहिय्ये मला.एखादा ओझ्याचा बैल फक्त ओझी वहाण्यासाठीच जन्माला आलेला असतो ना तसे. त्या बैलाला मोकळी हवा माहीत नसते , शेतात हुंदणे माहीत नसते . आहार निद्रा भय मैथून हेच त्याच्यासाठी सगळे. या पैकी मैथूनाचा प्रश्न तर निकालातच निघालेला असतो ज्यावेळेस तो बडवला जातो त्या वेळेस.
आपलेही असेच झालेय. नर्सेस च्या आयुष्यात रोमँटीक हळवे क्षण येतच नाहीत का? फक्त रुग्ण , जखमा , रोग आणि शुश्रुषा इतकेच. आहार निद्रा भय हेच सगळे आयुष्य. रोगी बरा झाला की आनंद मानायचा. आनंदाचे दुसरे क्षण नाहीतच जणू. कंटाळा आलाय या असल्या जगण्याचा. आपला स्वतःचा विचारच नाही यात. हा पेशाच असा आहे की इथे नाही म्हणायला जागाच नसते. कोणताही प्रश्न असो तुम्ही हो च म्हणायला हवे. देवाने कधी कोणाला नाही म्हंटल्याचे ऐकलंय?
कर्र कर्र कर्र.... मोबाईल व्हायब्रेटिंगवर आहे. त्याची थरथर मेसेज आलाय. रुपा मावशी. बाबा गेल्या नंतर भेटायला आली होती त्या नंतर आज तीचा मेसेज.
दुपारी भेटायला येतेय.
माझा उलट मेसेज. जेवायलाच ये. मजा येईल.
बरे झाले कोणीतरी कितीतरी दिवसानी दवाखान्याबाहेरच्या जगातलं भेटतंय. कुणाच्या तरी कुशीत शिरून खूप रडावेसे वाटतंय. बाबा कधीतरी त्याचा हात डोक्यावरून फिरवायचा. आपल्यालाच वेळ नसायचा त्याच्याशी बोलायला. कामावर असताना हॉस्पिटल औषधे रुग्ण आजार याने वैतागलेले असायचो. घरी आल्यावरही तेच.
येताना रस्त्यात दिसेल तेवढेच बाहेरचे जग. बाकी सगळे चोवीस तास डेटॉलच्या वासाने भरलेले क्षण. कोणी विचारले ना की आयुष्यातले सर्वात सुगंधी क्षण कोणते. तर उत्तर आठवताना मला फक्त डेटॉल चा च वास येईल . रुपा मावशी नेहमी येताना चाफ्याची फुले आणते. ती गेली तरी तो चाफ्याचा दरवळ घरात रेंगाळत रहातो. तीच्या सोबतीत घालवलेले क्षण जागवत रहातो. सकाळ व्हायला शिफ्ट चेंज व्हायला एक तास उरला. पण मावशीच्या मेसेज ने कंटाळा पळून गेलाय.
करुणा शिफ्ट चेंज रजिस्टर चेक करते. त्यातल्या रुग्णांच्या नोंदी तीनेच केल्या आहेत तरी पुन्हा एकवार तपासते. आता तीला घरी जायची घाई आहे. एरवी घरी वाट पहाणारे कोणी नाही म्हणून रेंगाळत जाणारी करुणा . आज घरी केंव्हा एकदा पोहोचते असे झालेय . हॉस्पिटलच्या बाहेरून नेहमीची बस न पकडता सरळ रिक्षाने घरी येते.
आयडीया घरी गेल्यावर छान आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यात गुलाबाचा सेंट टाकायचा. दिवसभर घरभर सुगंध दरवळत रहायला हवा. करुणा वाटेतच घरी गेल्यावर काय करायचे ते ठरवते.
घरी आल्यावर थेट अंघोळ करून तीचा आवडता पिस्ता कलरचा सैलसर ड्रेस घालते. या ड्रेस मधे तीला मोकळे मोकळे वाटते. नेहमी.केसांना नुसता एक रबरबँड लावते. आणि नकळत गाणी गुणगुणायला लागते. जिया बेकरार है छाई बहार है.....बाबाला खूप आवडायचे हे गाणे.
चहा घेताना सहज म्हणून बटन चालू केलं. रेडीओवरही चक्क तेच गाणे. आजचा दिवस मस्त जाणार वाटतेय. रोज एकटीलाच ब्रेकफास्ट करायचा कंटाळा येतो.पण आज रूपा मावशी येणार म्हंटल्यावर मस्त मुगाच्या डाळीची खिचडी टाकूया. कितीतरी दिवसात खाल्ली नाहिय्ये . खिचडी तेरे चार यार, कढी दही पापड आचार. कुठेतरी ऐकलेले वाक्य पायात लहान मूल अडखळावे तसे अडखळू लागले. जेवायच्या वेळेस भाजूयात पापड.
रोज या वेळेस नाईट ड्यूटी असली की अगदी कंटाळा आलेला असतो. डोळ्यावर कितीही नाही म्हंटले तरी झोप अनावर झालेली असते. आज तसे काहिही होत नाहिय्ये.रूपा मावशी येणार म्हंटल्यावर झोप कुठच्या कुठे पळाली.
ती आहेच तशी. ती आली की उत्साहाचा झरा नाही धबधबा सोबत घेऊन येते. काय एकसे एक किस्से सांगत असते. तीच्या कॉलेजचे , शाळेचे, आई बरोबरच्या भांडणांचे, तीच्या बिल्डिंग मधल्या शेजार्‍यांचे. बोलायला थकत नाही. ती असते तेवढा वेळ पूर्ण तीच बागडत असते सभोवती. तीचे किस्से तरी एकदम अचाट असतात. काय तर म्हणे कॉलेजच्या एन सी सी कँपच्या वेळेस तीने आणि तीच्या मैत्रीणीनी सगळ्या टीमचे चेहरे रात्री झोपल्या नंतर काजळाने काळे करून टाकले होते. कसे विचारले तर म्हणाली की साबणालाच काजळात माखून ठेवले होते. भरीत भर म्हणून बाथरूम मधल्या आरशावरही काजळ लावले होते. बाहेर येणारी प्रत्येक मुलगी कालीचा अवतार दिसत होती. कमांडिंग ऑफिसरला संशय येवू नये म्हणून तीने स्वतःच्या चेहेर्‍यालाही काजळाने माखून टाकले होते.
नक्की सांगते की तीने कॉलेज गाजवले असणार प्रत्येक वर्षी.
तीचे प्रश्नही भन्नाट असतात. मागे आली होती तेंव्हा विचारत होती की शुशृषा करणारी बाई असेल तर तीला नर्स म्हणतात , मग पुरूष असेल तर त्याला नरसोबा का नाही म्हणायचे. अर्धा तास हसत बसलो होतो तीच्या त्या प्रश्नावर. प्रत्येक भेटीचा वेगळा किस्सा असतो. आठवणीत रहाण्यासारखा.आज काय गम्मत करतेय काय माहीत.
डिंग डाँग...डिंग डाँग.... दारावरची बेल वाजते. अरेच्चा इतक्यात दीड वाजलापण. दार उघडते. रूपा मावशीला एकदम गळामिठी मारते. अगं हो हो. आत तर येवू देशील ना.
रूपा मावशीला मी गळामिठी घालुनच घरात आत घेते. तीने वर छताकडे पहायच्या आत पंखा फुल्ल स्पीड मधे चालू करते. टीपॉयवर ठेवलेली थंड पाण्याची बाटली आणि ग्लास तीच्या पुढे करते. तीच्या सवयी माहीत आहेत मला. आणि माझा तीला.
येताना मावशी काहीतरी आणतेच. तीच्या पिशवीतला खाऊ हा अजूनही माझ्यासाठी मोठा भाग असतो. लहानपणापासून यात कधी खंड नाही.
आत्ता तीने नाशपती आणलेत. जेवल्यावर नाशपतीच्या फोडी करून त्यावर थोडी जलजिरा पावडर हा आमच्या दोघींचा आवडता मेन्यू. नाशपती नसतील तर आम्ही ती किक येण्यासाठी चिंचेच्या गोळ्यावर ही जलजीराचा प्रयोग करतो.
आज रूपामावशी जरा कमी बोलतेय. माझ्या हे लक्षात येण्याचे कारण म्हणजे मीच कमी बोलतेय. जेवताना काहीही न बोलणे हे यापुर्वी कधीच घडले नाहिय्ये.
काय ग आज गप्प गप्प का आहेस. बोल की काहीतरी. तीला बोलते करायचा माझा प्रयत्न
काय बोलू. तु ऐकले तर बोलेन ना.
म्हणजे तू बोलत असताना मी ऐकत नसते? धिस इज नॉट फेअर मावशी.
तसे नाही ग. पण मी पडले म्हातारी आणि तू तरुण.... माझे विषय तुला आवडतील असे नसतात माझ्याकडे.
तू म्हातारी?.... कोण म्हणेल तुला म्हातारी.... बोलायला गेलीस तर मस्त गप्पा हाणतेस की . झक्कास विनोद करत पी जे मारत बोलत असतेस की. शाळकरी मुलींसारखे फिदीफिदी हसत नाहीस प्रत्येक गोष्टींवर. इतकेच. आणि किती वय असेल ग.. तुझे.... माझ्या मते मी जन्मले तेंव्हा तू पंधरा वर्षांची होतीस बरोबर.
बरोबर. आज मी पंचेचाळीसची आहे.
हो पंचेचाळीस म्हणजे काही म्हातारी नाही काही, तसे पहायला गेले तर माधुरी दिक्षीत आज साठीला आली आहे. तीला नाही म्हणत म्हातारी कोणी.
नाहीना. तेच म्हणते आहे मी. माझे वय पंचेचाळीस म्हणजे तुझे वय किती असेल याचा विचार कर.
तुला माहीत आहेच की. माझे बारसे जेवली आहेस तू.
तेच तर. तू आता तीशीला येशील.
मग.
मग काय काही पुढचा विचार केला आहेस का?
पुढचा कसला.
कसला म्हणजे. जोडीदाराचा. लग्नाचा.
आलीस का तु पुन्हा मुद्द्यावर.
का नाही यायचं? तुझे बाबा आजारी असायचे. त्यांची आबाळ व्हायला नको म्हणून आत्ता पर्यंत लग्नं नाही केलंस. आता करायला काय हरकत आहे.
काय म्हणायचे आहे तुला
ते तुला माहीत आहे. मी तुझ्या लग्नाबद्दल विचारतेय.काय हरकत आहे विचार करायला. तुझ्या वयाची होते तेंव्हा माझी मुले दहा वर्षाची होती.
रुपा मावशी बोलत होती. मी नेहमीप्रमाणे अर्थात काहीच प्रतिक्रीया न देता ऐकत होते.
काय हरकत आहे विचार करायला?
रूपा मावशीचे नेहमीचेच वाक्य पण का कोण जाणे या वेळेस ती गेल्या नंतरही मनात वाजत रहाते . कधीकधी सकाळी उठल्याउठल्या ऐकलेले पहिले गाणे नाही म्हंटले तरी दिवसभर गुणगूणत असतो ना तसे काहीसे.
काय हरकत आहे विचार करायला ? कधीतरी लग्न करायचेच आहे ना. का नाही करत आपण लग्नाचा विचार .हा विचार करायला या अगोदर वेळच मिळाला नाही.
लग्न म्हणजे कोणाच्या तरी तालावर नाचणे, लग्न म्हणजे सहजीवन , लग्न म्हणजे आयुष्याला अर्थ येणे. लग्न म्हणजे रांधा वाढा उष्टी काढा..... माझ्या मनात वॉशिंग मशीन मधे फिरावे तसे विचारांचे प्रवाह उलट सुलट चाललेय. अगदी त्या व्हर्लपूल च्या जहीरातीत दाखवतात ना तसे. वॉशिंग मशीन मधे पाण्याच्या तशा फिरण्याने कपडे स्वच्छ होतात. विचारांच्या त्या तसल्या उलटसुलट फिरण्याने डोके स्वच्छ होत नाही हा फरक आहे.
कधीतरी माझ्यातल्या सूप्त “चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी” ने एक निर्णय घेतला असावा. मी चक्क रूपामावशीला हो म्हणाले.
रूपामावशीच्या मैत्रीणीचा भाचा. द्वारकानाथ सोमपूरकर. चेंबूरला घर आहे.शेअरबाजाराचे काम करतो.वय बत्तीस. म्हणजे घोडनवरा पण मी हे म्हणायचे टाळते कारण मग त्या अर्थाने मी घोडनवरी ठरते.
मान्य आहे की एखादा काय करतो त्या वरून त्याची ओळख ठरते. पण नुसत्या नाव ,आडनाव ,गाव ,काम याने माणूस संपूर्ण समजत नाही.
मग भेटा दोघे एकमेकाना . नीट ओळख करून घ्या. मोकळेपणाने बोला. आवडेल तुला तो .चांगला संस्कारी आहे मुलगा. मी ओळखते त्याला. रूपा मावशी कडे प्रत्येक समस्येचे समाधान असते असे मी म्हणते ना ते या साठीच.
एक बरे आहे दोघेही मुंबईतच आहोत. आम्हा दोघानाही भेटता येईल असे कॉमन ठिकाण म्हणजे दादरचे वीर कोतवाल उद्यान अगदी स्टेशन पासून मोजून एक मिनीटाच्या अंतरावर....... माझ्या डोळ्यासमोर ते दृष्य तरळून जाते. आम्ही दोघेही कोतवाल उद्यानात बसलोय पण ट्राफिकच्या गोंधळात काय बोलतोय तेच एकमेकाना ऐकू येत नाहिय्ये... शिवाजी पार्क... नको . त्याचे काही मित्र तेथे फिरत असतात. ... जिप्सी... नको.. तेथे माझ्या कॉलेजची नाटकाची गँग उभी असते.
हे नको ते नको करता करता फाईव्ह गार्डन फायनल होते. चला निदान एका बाबतीत तरी एकमत झाले.
व्हॅट्सॅप प्रोफाईल वरच्या फोटोवरुन तरी चांगला वाटतोय. पण चेहेर्‍या वरून एकूण शरीराची ठेवण कशी असेल याचा अंदाज येत नाही. टोकदार नाकाचा माणूस जाड असू शकतो आणि बसक्या नाकाचा माणुस अगदी सुकडा निघतो कधी कधी.
थेट भेट होतेय तेच बरे. पूर्वी म्हणे नवरी नवरा एकमेकाना जे काय बघायचे ते अंतरपाट बाजूला झाल्यावरच. काय हॉरीबल असेल ना. ते. स्वप्नातला राजपूत्र म्हणून कल्पना करायची आणि समोर दिसणार काळा ढोम्या . मुलांचेही तसेच होत असेल की.. स्वप्नातली परी दिसायला शूर्पणखा दिसल्यावर तो तरी काय करणार.
आपल्या बाबतीत असे नाही होणार. कारण चेहेरा तरी पाहिलाय. रवीवारी प्रत्यक्ष भेटतोय. आज गुरुवार. शुक्रवार , शनीवार सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सॅपवर गुड मॉर्निंग आणि सोबत पिवळ्या गुलाबाची दोन फुले असलेले चित्र. गुड मॉर्निंग इतकेच रीप्लाय करते. एक हात जोडल्याची स्मायली. स्मायली पाठवायचा एक फायदा असतो. लिहायचे काही नाही. काय वाटायचे ते तूझे तूच घे वाटून. नमस्कार केल्याची खूण तर आणखीन भारी.
शनिवारी दुपारी व्हॉट्सॅपवर मेसेज उद्या दुपारी चार वाजता भेटतोय फाईव्ह गार्डन, मन्चेरजी जोशी मार्गावरचा बसस्टॉप.
उत्तरादाखल मी एक अंगठा वर केल्याची स्मायली पाठवते. त्याने स्मायली पाहिल्याची निशाणी दाखावणार्‍या
आज रविवार . रूपा मावशीने मी दुपारी भेटायला जाणार आहे याची खात्री दोनतीन वेळा फोनवर विचारून करुन घेतली आहे. भेटायला जाताना तो निळा फुलाफुलांचा ड्रेस घालून जा . केस मस्त शांपू कंडीशनर वगैरे लावून पार्लरमधून स्ट्रेट करून घे. आयब्रो वगैरे करून मगच जा. अशा सूचनाही देऊन झाल्या आहेत माझे स्पष्ट मत आहे. खरं म्हणजे हे मुलगा मुलगी दाखवण्याचे पहाण्याचे कार्यक्रम असतात ना त्यात मुलीने अजिब्बत नटू नये.मेकप करू नये. शक्य असेल तर सकाळी उठल्यावर जसे दिसतो ना तसेच रहावे. आणि मुलाने चट्ट्यापट्ट्याची बर्मुडा आणि वर विटका टी शर्ट हाच पोषाख करावा. आयुष्यभर तसेच पहाणार असतो ना एकमेकाना लग्न झाल्यानंतर. नाहीतर कारे भुललासी वरलीया रंगा म्हणायची वेळ येते..तरी बरं आहे. परस्पर भेटायचे आहे. मुलगी बघण्यासारखा सिनेमात दाखवतात पारंपारीक तमाशा नाहिय्ये. चहा पोहे वगैरेचं फाइव्ह गार्डनजवळचा उडपी हॉटेलचा शेट्टी आण्णा बघेल. मला फक्त मुलाशी बोलायचंय कोणाही वडीलधार्‍या माणसा शिवाय. मध्यस्था शिवाय.
घरातून निघताना मी अगदी सकाळी उठल्यावर असते तशी नाही पण हलका मेक अप करते. केसांची पोनी. चेहेर्‍यावर हलका पावडरचा पफ. मावशीने सांगितला तसा तो निळा फुलाफुलांचा ड्रेस. मलाही आवडतो तो. पार्ल्याहून माटुंग्याला पोहोचायला फारतर अर्धा तास. ट्रेनचे मेगाब्लॉक वगैरे नाहिय्ये. रवीवार मुळे गर्दी तसी कमीच आहे. मी मुद्दामच अगदी मोजून वेळेवर निघते. कोणाची वाट पहाण्यापेक्षा त्याला आपली वाट पहायला लावणे बरे असते. निदान त्यामुळे आपण उतावळे आहोत असे तरी दिसत नाही.
ट्रेन वेळेत पोहोचते. बरोबर चार वाजून पाच मिनीटानी फाईव्ह गार्डन मधे दाखल होते. अपेक्षेप्रमाणे द्वारकानाथ सोमपुरकर बसस्टेशनवर फिक्की जीन्स आणि त्यावर गडद निळा टी शर्ट. डोळ्यावर गॉगल. व्हॉट्सॅप वरच्या प्रोफाईल फोटोत दिसतो तितका तरूण दिसत नाहिय्ये. पण ठीक आहे. तीन एक वर्षांपूर्वीचा असेल तो फोटो.
एकेमेकाना पाहिल्यावर आम्ही दोघेही एकेमेकाना हात उंचावून हाय करतो.
अगदी जुना परिचय असल्यासारखे हसून भेटतो. नमस्कार चमत्कार झाल्यावर येतो तो एक अनामीक संकोच.थोडावेळ कोणीच बोलत नाही. एक चमत्कारीक ताण. आणखी काही वेळ असाच गेला तर मला मी बहुधा शोक सभेत दोन मिनीटे मौन राखतात तसेच वाटेल. तो बहुतेक मी सुरवात करेन या विचारात असावा. आणि मी, आपण पहिल्यांदा बोललो तर आगावू दिसणार नाही ना या विचारात.
जाऊ देत. होऊ दे, काय होईल ते. आपण बोलुयात. नुसते शांत बसायचे होते तर घरी काय वाईट होते मी. त्या साठी थोडेच आलेय इथे?
मी काय म्हणते....
मी काय म्हणतो.
दोघानाही एकदमच वाचा फुटते. आम्ही दोघेही हसतो. त्या मुळे असेल कदाचित वातावरणातला ताण ओसरतो.
दोघेही अगोदर इकडचे तिकडचे विषय सुरू करतो. दोन वाक्या नंतर विषय बदलतो. परवाची क्रिकेटची मॅच, पेट्रोल चे दर , युक्रेन रशिया युद्ध , शिवसेनेतली फूट , जरांगेंचे आंदोलन , मुंबई गोवा हायवे वर वडखळ नाक्या वरचे ट्राफिक जाम , वडाळा मोनोरेल चे एक्स्टेन्शन , डोंबिवली फास्ट विक्रोळीला थाम्बते का असे एकमेकांशी संबन्ध नसलेले असलेले सगळे. त्यात वाशी मार्केट मधले आंब्याचे भाव किंवा विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे विषय तेवढे यायचे बाकी उरलेत.
“मी, माझे, माझ्या बद्दल” हा एक स्वतंत्र मुद्दा असतो. क्रिकेट मधे जोरदार बॅटिंग करण्यासाठी स्लॉग ओव्हर्स की काय ते म्हणतात ना तसा. पण त्याला हात घालण्यापूर्वी थोडा जम बसवण्यासाठी पहिले काही चेंडू शांतपणे खेळावे लागतात तसे हे सगळे बोलावे लागते.
“मी, माझे, माझ्या बद्दल” आमचे दोघांचेबोलून होते. या नंतर येणारा गुगली .... अपेक्षेप्रमाणे तो आलाच.
तुम्ही आत्तापर्यंत लग्न का नाही केलेत.
मी, त्याला बाबा चे आजारपण, त्याचा पॅरालिसीस, त्याची शुशृषा या बद्दल थोडक्यात सांगते.त्यालाही ते कारण पटले असावे.
आणि तुम्ही हीआत्तापर्यंत लग्न केलेले नाहिय्ये. वेळ मिळाला नाही की कोणी मिळाली नाही?
माझ्या प्रश्नातच मी त्याला उत्तराचे ऑप्शनही देते.
खरे सांगू? तो माझ्याकडे डोळे बारीक करून पहातो.
माझी काहीच प्रतिक्रीया नाही.
माझ्या घरात आई अल्झाईमर ने आजारी होती. वडीलाना फ्लुरसी आहे. आई वर्षापूर्वी गेली. वडील आजारपणामुळे अंथरुणातच असतात. त्यांचे करायला कोणी नाही.. आई होती तोपर्यंत ती थोडे थोडे करत होते जमेल तसे. आईला सांभाळायला म्हणून नेहमी सोबत रहायला लागायचे त्या मुळे लग्नासाठी वेळच मिळाला नाही. पण आता वडिलांचे आजारपण औषधे त्यांच्याकडे पहायला वेळ मिळत नाही. त्यांचेही वय झालेले आहे.
तो बोलत राहिला. माझ्या मनात श्रावण बाळाची कथा सुरू होती. म्हातार्‍या अंध आई वडीलांना सांभाळणार्‍या श्रावण बाळाने स्वतःचे आस्तित्वच बंद करून ठेवले होते. हा दुसरा श्रावण बाळ.
माझ्या आजारी वडीलांना, स्वतःचे वडील समजून, माझ्या बायकोने प्रेम द्यावे इतकीच अपेक्षा आहे माझी. योगायोगाने आणि सुदैवाने एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही नर्स आहात. त्या मुळे त्यांची शुशृषा चांगली होईल.माझा पूर्ण होकार समजा. आणि हो तुम्हाला नोकरी सोडायची गरज नाही. नर्सची ड्युटी म्हणजे तुमची आयडेन्टिटी आहे हे माहीत आहे. तुमच्यासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे हे सांगितलंय मला आत्याने. काळजी करू नका . पूर्ण मोकळीक असेल असेल तुम्हाला. तेवढा मोकळ्या विचारांचा आहे मी.
तो बोलतो आहे .खरे आहे. त्या अपेक्षा चूक नाहीतच. याला बायको हवी आहे. पण सोबत एकावर एक फ्री अशी नर्स ही हवी आहे. आणि मला काय हवे आहे?
मी विचार करते. याच्या सोबत लग्न झाले तर आपले स्वतःचे घर असेल. आयुष्यात स्थैर्य असेल. दिसायला ही अगदी राजकुमार नसला तरी चांगला आहे. आपल्याला शोभेल. पण आपले काय? सगळे मुद्दे बरोबर आहेत पण काहितरी खटंकतय. नक्की काय ते समजत नाही.
मी काहितरी एका ठाम निर्णयावर येते. थोडे धैर्य एकवटते आणि बोलायला तोंड उघडते. कृपया गैरसमज करून घेऊ नका . एक व्यक्ती म्हणून खूप छान आहात तुम्ही. मोकळ्या स्वभावाचे आहात. पण मी नाही करू शकत हे लग्न.
का? .....
त्याच्या विचारण्यावर मी काहीच स्पष्टीकरण देत नाही. खुर्ची वरून उठते. होटेलच्या काऊंटरवरच्या शेट्टी आण्णाला मी चहा पोह्याचे बील पे करून टाकते.
काही बोलण्याच्या मनस्थितीतच नाहिय्ये. डोक्यात काहीतरी प्रचंड खदखदतेय. कुकर मधे एकत्र भाज्या शिजवाव्यात तसे.दिसेल त्या टॅक्सी ला हात करून मी घरी येते. आल्यावर थेट बाथरूम गाठते. मला भाडदिशी उलटी होते. तशीच डोक्यावर शॉवर सोडते. शॉवर घेताना मला रडावेसे वाटतेय. पाण्याच्या धारा डोक्यावर पडताहेत. मी रडतेय. थंड पाण्याच्या धारानी थोडे बरे वाटते. शॉवर बंद केल्यावरही कितीतरी वेळ मी तशीच उभी रहाते.
मला खूप मोकळे मोकळे वाटतं. कितीवर्षे काहीतरी ज्याने मला खूप आतून घट्ट बांधून ठेवले होते ते जोखड सुटलंय. मी मुक्त झालेय.इतके मोकळे असण्याची मला सवय नाहिय्ये म्हणून थोडीशी बावचळले आहे. पण खूप मोकळे वाटतंय. आकाशात तरंगल्यासारखे वाटतंय.
माझ्या मनस्थितीचं विश्लेषण करायचं नाहिय्ये. मी द्वारकानाथला नकार का दिला याचं उत्तर सापडत नव्हते ते आत्ता सापडले. दिवसभर हॉस्पिटल मधे रुग्णांची सेवा करणार. घरी आल्यानंतर त्याचे वडील आजारी त्यांची सेवा करणार. नर्स हा पेशाच असा आहे की इथे नाही म्हणायला जागाच नसते. कोणतीही हाक असो तुम्ही हो च म्हणायला हवे. देवाने कधी कोणाला नाही म्हंटल्याचे ऐकलंय. म्हणजे आपण चोवीस तास नर्सच रहाणार.
मला देव व्हायचं नाहिय्ये. नाव करुणा असले म्हणून काय झाले? कारुण्य सिंधु भवदु:खारी व्हायलाच हवे असे नाही. ओझे वाटणारे ते माझे देवपण ,मी नाकारलंय. मला, दिवसाचे ड्यूटी अवर्स वगळता मि़ळाणारे ते काही तास तरी, स्वतः म्हणून जगायचंय.
हे लक्षात आल्यावर मी स्वतःशीच हसते. छान चहा पिउया आता म्हणत दूध काढायला म्हणून फ्रीज उघडते. दार उघडताच सोनचाफ्याचा दरवळ येतो. रुपामावशीने फ्रीज मधे ठेवली आहेत सोनचाफ्याची फुले. मी तो दरवळ श्वासात भरून घेते. शुद्ध सोनचाफ्याचा सुगंध. या गंधात तो नेहमी जाणवारा डेटॉलचा वास कुठेच नाहिय्ये.
मावशीला सांगत होते ते आठवले. मला आता माझे मी स्वतः म्हणून जगायचंय माझ्या "स्वत:” म्हणून जगण्याची सुरवात झाली आहे. सोनचाफ्याचा तो शुद्ध गंध श्वासात भरून घेत मी चक्क गाणे गुणगुणतेय ' आज मै उपर , आसमां नीचे......

Node read time
22 minutes