एका प्रेमाची जुनी गोष्ट

#संकल्पनाविषयक #ललित #समाजमाध्यम #ललित #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

एका प्रेमाची जुनी गोष्ट
- माधवी भट

"नवव्या वर्गातल्या मुली इतक्या मूर्ख नसतात. सगळं समजतं त्यांना. मला शिकवू नकोस." असं झलक रुपालीसमोर हात हलवत तावातावात म्हणत होती. मी त्यांच्या शेजारीच कमरेवर हात ठेवून उभी राहून ते सगळं ऐकत होती. झलक हे काही झलकचं खरं नाव नव्हतं. पण तिला आमचा सगळा वेटाळ झलकच म्हणायचा. त्यामुळे तिचं खरं नाव मला खूप दिवस माहीतच नव्हतं. त्या वेळी झी टीव्हीवर नव्या सिनेमांची जाहिरात दाखवली जायची त्या कार्यक्रमाचं नाव झलक होतं. सिनेमाची जशी झलक असते तशी ती आमची मूर्तिमंत झलक होती. आमच्या चाळीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या एका मोठ्या मुलानं – त्याला आम्ही सगळे भाऊ म्हणायचो – सांगितलं होतं की ती "दारातून, खिडकीतून, अधूनमधून आपली झलक देत असते म्हणून सगळे तिला झलक म्हणतात." तर झलक म्हणजे मूर्तिमंत आगाऊ आहे असं सगळे म्हणत. रूपाली म्हणायची की ती स्वत:ला रवीना टंडन समजते. ते तसं खरंच होतं. झलक रूपालीवर चिडली कारण की तिने रूपाला काहीतरी गोपनीय काम सांगितलं होतं आणि तिने ते गोपनीय ठेवलं नव्हतं इतकंच मला समजलं होतं. मी तिथे उभी असल्याने त्या दोघी पुढचं काही बोलल्या नाही.

एक दिवस मी रविवारी सकाळी चंद्रकांता बघत असताना एकदम झलक आमच्या घरी आली. साक्षात झलक घरी आली हे पाहून मला इतकं आश्चर्य वाटलं की दोन मिनिटं मला विजयगढची राजकुमारी चंद्रकांताच आली असं वाटलं. मी ओरडून "झलक आली..." म्हणाले. ते तिचं खरं नाव नाही याचंही भान मला उरलं नव्हतं. तिने दारातून मला हाक मारली आणि विचारलं, "तुझ्या वर्गात धनश्री आहे नं?" मी नुसती मान हलवली. "उद्या शाळेत जाताना मला भेटशील?" असं विचारून माझा गालगुच्चा घेऊन ती निघून गेली. मी जादू झाल्यासारखी तिथेच उभी होती. तर आजी मला म्हणाली की भूत पाहिल्यासारखी का उभी आहेस?

मी आजीकडे खूपच करुणेनं पाहिलं. कुठे झलक? कुठे भूत? ह्या, तिला काय कळणार म्हणा? मला अचानक मोठं झाल्यासारखं वाटू लागलं. आजवर तिच्या खिजगणतीतही मी नव्हते. आज अचानक ती दारात? मी दारात उभी असतानाच आमच्या शेजारचा बिट्टू आला, "झलक आई थी बोलते?" मी त्याला ऐटीत म्हटलं, "माझी मैत्रीण आहे ती, गालगुच्चा घेतला तिनी माझा." तर बिट्टू माझ्याकडे अचानक आदराने पाहू लागला. झलकमध्ये नक्कीच दैवी शक्ती आहे याची मला खात्री पटली.

रविवार कधी संपतो, असं मला त्या दिवशी पहिल्यांदाच वाटलं. एकदाचा तो संपला. मी शाळेची तयारी केली. अर्चुताईचं विको टरमरिक लावलं. मग त्यावर पावडर फासली. तर बिट्टू म्हणला की "कूच भी कर तेरे को कोई नही देखेंगा!" मी बिट्टूचा हात मुरगळला. तो रडत गेला. मी दप्तर घेऊन निघाली. वळणापाशी झलक उभी होती. तिने मला अख्खी राजमलाई दिली. जाताना खांद्यावर हात ठेवला. मी रोज संध्याकाळी शुभंकरोती म्हणत असल्यानंच देवानं मला हा प्रसाद दिला आहे असं वाटून आजपासून रोज मारुतिस्तोत्र देखील म्हणायचं म्हणजे आणखी कृपा होईल असं मनातच ठरवलं. वाटेत पानाची टपरी लागली. तिथं नेहमी रिकामटेकडे मुलगे उभे असत. आजीच्या भाषेत ‘गावावरून ओवाळून टाकलेले’. तिथं नेहमी ‘ढलता सुरज धीरे धीरे...’ गाणं सुरू असे. ‘आजी जवानी...ईईई. ..." अशी काहीतरी ओळ होती त्यात. मला काही केला तेव्हा ते कळलं नव्हतं. आजी जवानी काय? तर झलक मला म्हणाली की आजी जवानी नाही, आज जवानी असं आहे.

झलक नुसतीच मला पहा फुलं वाहा नसून तिला बुद्धीही आहे हे मला कळलं. तर पान टपरीवरची ती ओवाळून टाकलेली मुलं तिथं होती. त्यातला एक मोठ्यांदा ‘कहां से है आया, कहां जाएगा तू?’ असं गाऊ लागला. ते झलकसाठीच होतं हे कोणीही सांगेल.

पुढे गेल्यावर झलक मला शाळा, वर्ग, मैत्रिणी वगैरे विचारू लागली. मीही तिच्याशी बोलत होते. तर ती म्हणाली, "तुला काही अडचण असेल अभ्यासाची वगैरे तर माझ्याकडे येत जा, बिनधास्त!" ते ऐकून सिनेमातली बाई "क्या तुम सच कह रहे हो? म्हणत आनंदाने जिन्यावरून पदर भिरभिरवत बागडत उतरते तसं वाटलं किंवा एकदा आम्ही सगळे एका ओळखीच्यांकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी मला छोट्या बशीत पोहे न देता थोरल्या लोकांप्रमाणे मोठ्या बशीत देऊन पुन्हा वरून दुसऱ्यांदा वाढले होते तेव्हा जितका आनंद झाला होता तसं वाटलं. तेव्हा तर गहिवरून पोह्यांचा घास घश्यात अडकला आणि आजी म्हणाली, "शोभा करून घ्या, कुठं नेण्याच्या लायकीची नाहीस." किंवा जाऊ दे, मला खूप आनंद झाला आणि मी तिचा हातच धरला. तिचा हात शालीसारखा उबदार आणि मऊ होता. तेवढ्यात शाळा आली.

धनश्री पटांगणात होती. तिला मी बोलावलं. तर झलक तिला विचारू लागली, "रवी तुझा कोण आहे? काकाचा मुलगा नं?" धनश्री हो म्हणाली. मग झलक निघून गेली. दिवसभर मला हवेत तरंगल्यासारखं वाटलं.

संध्याकाळी आठाणे देऊन मी अर्ध्या तासासाठी सायकल भाड्याने घेत असे. दुकानात गेल्यावर मला पाहिजे ती सायकल लगेच मिळाली. अजिबात न पडता, कैची सायकल चालवत माझा सराव झाला. घरी आल्यावरही मला अभ्यासाला कुणी ओरडलं नाही. गृहपाठ लवकरच झाला. जेवताना आमटीतला कढीलिंब माझ्या पानात अजिबात आला नाही. रात्री झोपताना माझ्या मनात विचार आलाच की हा सगळा झलकचाच महिमा आहे.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना झलक पुन्हा भेटली. तिने मला इंग्रजी नावाचं एक पुस्तक दिलं; आणि म्हणाली, ‘धनश्रीला सांग रवीला दे. अभ्यासाचं आहे.’ मी धनश्रीला ते पुस्तक दिलं. तर त्यात लिफाफ्यात एक कागद होता. असा कोणता अभ्यास असेल? हे लौ लेटर असेल. धनु म्हणाली. आम्ही चोरून ते उघडून पाहिलं. तर ओम फस! त्यात पाढे लिहायचे तसले चौकोन आणि शब्दकोडे सोडवताना लिहितात तशी चौकोनात अक्षरं होती.

पहिलं पत्र

असा तो कागद होता. आम्हाला वाटलं होतं की ते प्रेमपत्र असेल पण तो खरंच अभ्यासाचा कागद निघाला. त्यावर काय लिहिलं होतं ते आम्हाला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी धनुने त्याच पुस्तकात अभ्यासाचा दुसरा कागद आणला. तो मला झलकला द्यायचा होता. कागदापेक्षाही मला आज झलकच्या घरी जायला मिळेल याचा जास्त आनंद झाला होता.

पीटीच्या तासाला आम्ही तो अभ्यासाचा कागद उघडून पाहिला तर त्यातही तसेच रकाने होते.

दुसरं पत्र

मी शाळेतून परस्पर झलककडे गेली. तिला पुस्तक दिलं. तिनं मला काचेच्या पेल्यात रसना दिलं. वरून बर्फाचा खडा घातला. तिच्याकडच्या टीव्हीतले रंगही इतके चमकदार का वाटले कोणास ठाऊक. तिचे ते बाबा, वार्डातले मुलं त्यांना केष्टो मुखर्जी म्हणायचे, तर ते एवढ्या रंगीत टीव्हीवर साप्ताहिकी बघत होते. सगळ्या मोठ्या लोकांना इतकं रटाळ बघायची इच्छा का असते कोण जाणे. झलक मला आतल्या खोलीत घेऊन गेली. झलकच्या घरातल्या आतल्या खोलीत जाणारी मी वार्डातली एकमेव व्यक्ती होती. ती जिथे अभ्यास करत असे त्या टेबलवर खूप पुस्तकं, एक नेलपॉलिशची बाटली होती. फिलिप्स कंपनीचा काळा टेपरेकॉर्डर होता. आणि भिंतीतल्या उघड्या कपाटात खूप कॅसेट्स! तिने टेबलाच्या ड्रॉवरमधून वॉकमन काढला. त्याला हेअरबँडसारखे इअर स्पीकर्स होते. मी खूप चकित झाले. तिने माझ्या डोक्यावर तो बँड घातला आणि वॉकमन सुरू केला. आपल्या मेंदूतच वाद्ये वाजत आहेत असं मला एक क्षण वाटलं. ‘रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है...’ गाणं सुरू होतं. "बाजारात एक दुकान आहे, मी तिथून आवडती गाणी कॅसेटमध्ये भरून घेते नेहमी. ही आत्ता परवाच आणली. " झलक मला म्हणाली.

मग मी निघाली. "पुन्हा काही निरोप असेल तर देशील मला..." असं प्यायल्या रसनेला आणि ऐकल्या गाण्याला जागून मी म्हटलं. तर ती हसून हो म्हणाली.

टेपरेकॉर्डर आमच्याही घरी होता. पण त्यावर मोठ्या आवाजात ‘चुरा के दिल मेरा...’ आणि ‘रूप सुहाना लागता है...’ ऐकायचं माझं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. येऊन जाऊन आपलं, ‘शुक्रतारा मंदवारा’, ते ‘स्वरगंगेचे काठ’, ‘शतदा प्रेम...’ वगैरे लागे. आपल्या आवडीची गाणी ऐकायला मिळत नसताना कोण शतदा प्रेम करणार आहे असल्या फालतू जगण्यावर? तुम्हीच सांगा. नंतर एकदा ती सुप्रसिद्ध कॅसेट टेपरेकॉर्डरमध्ये अडकून रीळ तुटली; मला खूप आनंद झाला. त्यापेक्षा विविधभारती तरी बेस्ट होतं. तिथं तरी नवीन गाणी लागत. सकाळी नळ यायचा आणि त्याचवेळी चित्रलोक सुरू होई. टिप्स, टी-सिरीज आणि व्हीनस कंपनीच्या कॅसेट्स ऐकल्यासारखं वाटे. ‘गुलशन कुमार पेश करते है, एक सजीला नौ जवान..." असं लांबलचक वर्णन झाल्यावर ‘इश्क में हम तुम्हे क्या बताए, किस कदर चोट खाये हुए है...’ गाणं लागे. सजीला नौजवान रडकी गाणी का गात असेल? असं मी बिट्टूला एकदा म्हणाले होते, तर तो म्हणाला की कारण तो खूप दिवस अंघोळ करत नसतो. त्याला आवडत नसतं. म्हणून तो म्हणतो की ‘आज ही हमने बदले है कपडे, आज ही हम नहाए हुए है‘. खरं तर मला त्यात काही तथ्य वाटत नव्हतं. एकूण काय तर ‘इश्क में हम’ गाणं हे ‘अच्छा सिला दिया...’पेक्षा चांगलं होतं इतकंच.

तर नंतर हे अभ्यासाचे कागद पोचवणे प्रकरण सुरळीत सुरू झालं हे सांगायलाच नको. एकदा झलक मला म्हणाली की सिनेमाला चलशील का? कढईतल्या लाहीसारखी मी उडाले. मी सिनेमे पाहिले नाहीत असं नव्हतं. पण सगळं घरच्या लोकांसोबत. माहेरची साडी बघायला गेले तेव्हा मी चौथीत होते. गेल्यागेल्याच मला झोप आली. सिनेमा संपल्यावरच मी उठले. नंतर सगळे सिनेमे घरच्यांसोबत. घरूनच पराठे, चकल्या, कच्चा चिवडा न्यायचा. मिल्टनची मोठी पाण्याची बाटली न्यायाची. आजी तिला ‘छागल’ म्हणे. आणि घरी यायचं. कधीच सामोसा, पॉपकॉर्न, गोल्डस्पॉट, फ्रुटी वगैरे मिळायचं नाही.

"मी विचारते तुझ्या घरी. धनश्रीलापण घे." तिच्या या वाक्याने मी भानावर आले. त्यानुसार आमचं सिनेमाचं ठरलं. नाव होतं ‘रंगीला’. आमच्या शाळेच्या रस्त्यावर एका मोकळ्या जागी रंगीलाचं कापडी, पेंट केलेलं पोस्टर उंचावर होतं. मी आणि धनश्री तिथं उभ्या राहून बघायचो. त्यातला अमीर खान बस कंडक्टरसारखा दिसत होता आणि जॅकी श्रॉफ लांब काळ्या उघड्या कफनीसारख्या वेशात मुलांना गोणीत घालून पळवून नेणाऱ्या माणसासारखा, फक्त उर्मिलाच पांढऱ्या बॉडीफ्रॉकमध्ये हिरोईन सारखी वाटत होती. धनश्री म्हणाली की निदान उर्मिलातरी उर्मिलासारखी दिसत आहे. फिलिप्स टॉप टेन, गाने अनजाने, चित्रहार, छायागीत आणि रंगोलीत फक्त ‘यायरे, यायरे, जोर लगाके नाचो रे...’ हे ऐकूनऐकून मला पाठ झालं होतं. तर शेवटी आम्ही शनिवारी दुपारी सिनेमाला गेलो. अंधारात आपल्या जागेवर जाऊन बसताना आधी आम्हांला भीती वाटली पण झलक एकदम शांत होती. सवय असल्यासारखी. दिवे विझल्यावर अचानक तिच्या शेजारच्या खुर्चीत एक मुलगा आला. धनु म्हणाली हा रवी दादा आहे. मला अचानक लक्षात आलं रवीला भेटायला आपलं निमित्त आहे. तर धनु म्हणाली की, तुला किती उशिरा समजतात गोष्टी.

अर्धा सिनेमा झाल्यावर रवीनं सामोसे, पॉपकॉर्न, खारे दाणे आणि मग गोल्डस्पॉट आणलं. सगळं खाऊनपिऊन झाल्यावर मी धनुला म्हटलं की निमित्त असलो तरी आपल्याला योग्य तो सन्मान देत आहेत ती दोघं. शेवटी मिली त्या कमलजीसोबत मुन्नाला शोधत निघते तेव्हा रवी उठून निघून गेला. आम्ही दिवे लागल्यावर निघालो.

एक दिवस झलकसोबत पाणीपुरी खायला गेले तेव्हा तिथल्या एका एसटीडी बूथच्या काचेच्या बंद खोलीत झलक गेली आणि पंचवीस मिनिटं बोलत होती. बोलताना एकदा रडली. मी काचेबाहेरून बघत होती. त्या काचेच्या खोलीत वर एका डबीत लाल रंगाची अक्षरं वेळ आणि पैसे दाखवत असते. आम्हीपण बूथवरूनच फोन करायचो. कारण आमच्याकडे फोन नव्हता. झलककडे होता. पण ती घरून फोन करत नव्हती म्हणजे रवीशी बोलत आहे हे मला लगेच समजलं.

मी तिला विचारलं तर ती म्हणाली की "हो, रवीलाच फोन केला होता. माझं प्रेम आहे त्याच्यावर. आम्हांला लग्न करायचं आहे. पण घरचे लोक आतेभावाशी सोयरिक करायचा विचार करताहेत. मला रवीच आवडतो... आता त्याला नोकरीही लागली आहे. बाहेरगावी. तो अधूनमधून इथे येतो तेव्हाच भेट होते." आपलं कोणावर तरी प्रेम आहे असं सांगणारी मुलगी तोवर फक्त सिनेमातच पाहिली होती. नाही म्हणायला माझी एक लांबची चुलतबहीण कोणत्यातरी मुलाचा हात धरून पळून गेली होती. तेव्हा तिच्याबद्दल घरात जे बोलणं सुरू होतं तेव्हा तर मला खात्रीच पटली की ती शूरवीर मुलगी होती.

झलकपण अशीच शूर मुलगी होती. त्या दिवशी आम्ही झलकच्या घरच्या गच्चीत जाऊन बोलू लागलो. कोजागिरी पौर्णिमा होती म्हणून तयारी करायची होती. तयारी म्हणजे काय? तर कुठल्यातरी दुकानातून व्हीसीआर आणि रंगीत टीव्ही भाड्यानं आणायचा; एखाद्या सिनेमाची व्हिडिओ कॅसेट आणायची आणि सगळ्यांनी मिळून सिनेमा बघायचा. बायका दूध आटवत राहणार; खायचे पदार्थ करत राहणार; मोठी मुलं गाण्याच्या भेंड्या खेळणार; पुरुष मंडळी आलीच तर राजकारणावर गप्पा किंवा बिगफुल खेळणार; आणि उरलेली मंडळी पिच्चर पाहणार.

मी तिला विचारलं, तुझं नाव काय? मिनी? तर ती हसून म्हणाली, "मीनाक्षी, मला सगळे झलक म्हणतात, तूही. माहितेय मला." मग ती खूप हसली. "रूपालीला तू त्या दिवशी का ओरडत होतीस?"

"मी तिला एक निरोप दिला होता. तुला दिला तसाच. तर तिने ते सगळ्यांसमोर बोलून विचारलं. तिच्या मावशीचं घर रवीच्या घरापाशी आहे म्हणून. तुलाही मी निरोप दिलाच होता. पण तू गप्प राहिलीस की!"

"खरं तर आम्ही तो कागद उघडून पहिला होता. पण आम्हाला काहीच कळलं नाही." मी कबुली दिली.

"सोपं आहे. मलाही रवीनेच शिकवलं. चल घरात."

आम्ही तिच्या अभ्यासाच्या टेबलापाशी आलो. तिने एका कागदावर तसेच चौकोन आखले आणि लिहायला सुरुवात केली. आठ आडवे रकाने आणि उभे आपल्याला पाहिजे तितके. मजकुरानुसार.

जे सांगायचं ते तुकड्यात लिहायचं. वाचताना १-८, २-७, ३-६, ४-५ असे रकाने वाचले की आपल्याला अर्थ कळत जातो.

आणि तेव्हा मला मोठ्ठ्या खजिन्याचा पत्ताच लागला जसा, असं वाटलं. शिवाय आकडा लिहायचा असेल तर इंग्रजी अल्फाबेट्स वापरायची आणि इंग्रजीत काही लिहायचं असेल तर त्याजागी अंक लिहायचे. उदाहरणार्थ फोन नंबर. तो अल्फाबेट वापरून लिहिला की समजणाऱ्या व्यक्तीला समजतो.

त्यानंतर एसटीडी बूथ, पाणीपुरी आणि मग गच्चीत जाऊन गप्पा असा कार्यक्रमच सुरू झाला.

"तुला मोठ्या मैत्रिणी नाहीत का?" एकदा मी तिला विचारलं.

"तू आहेस की, आठवीत असलीस म्हणून काय झालं? " तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मग मी म्हणाले, "गोष्टीतल्या राजकन्येकडे असा आरसा असतो बघ, ज्यातून तिला आपल्या प्रिय व्यक्तींचा चेहरा कधीही बघता येतो, बोलता येतं. तसं काहीतरी पाहिजे. म्हणजे तुला पाहिजे तेव्हा रवीदादाशी बोलता आलं असतं."

ती म्हणाली, "कोणास ठाऊक. कदाचित तसं असतं तर अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. कधीही बघता, बोलता येतं म्हणून फार हुरहूर वाटली नसती. तुला सांगू, मला हुरहूर वाटते, दु:ख होतं पण मला त्यात सुखही वाटतं. मला नक्की नाही सांगता येत. तुला कळलं नसेल तर तू जास्त विचार करू नकोस."

तिच्याकडे रंगतरंग पुरवण्या आणि मायापुरीचे अंक खूप होते. मी पुष्कळदा त्यातून आवडतं गाणं, किंवा नटनट्यांची चित्रं कापून घेऊन जात असे. ती म्हणाली "मी आवरणार आहे घर, तुला देईन सगळे अंक."

दिवाळी झाली. माझा गृहपाठ करायचा होता म्हणून मी त्यात खूप गर्क झाले. काही उत्तरं तिनंच मला पुस्तकातून शोधून दिली. "माझ्याकडे गुरुकिल्ली नाही. बरं झालं तू उत्तरं काढून दिलीस." मी तिला म्हणाले.

ती म्हणाली, "गुरुकिल्लीची गरज काय? धडा वाचायचा. पुस्तक वाचत जा, सोपं जाईल. आणि आपली उत्तरं आपण शोधायची सवय लाव. लक्षात ठेव नेहमीच."

एक दिवस तिनं मला घरी बोलावलं. मायापुरी आणि रंगतरंग पुरवण्या, चांदोबा एका गठ्ठ्यात बांधून होत्या. एका पिशवीत काही कॅसेट्स होत्या. "हे तुझ्यासाठी आहे. घेऊन जा." मी आनंदानं सगळं घरी आणलं.

एक दिवस मी शाळेतून घरी आली तर मला समजलं की झलक घरातून निघून गेली आहे. तिने घरी चिठ्ठी लिहून ठेवली की ती रवीकडे जात आहे. सगळ्यांनी मला खूप प्रश्न विचारले पण मी कोणालाच काही सांगितलं नाही. मग आजी म्हणाली, "तिज काय विचारता. लहान पोरीला काय समजते त्यातलं?" मग सगळे गप्प झाले.

आठवडाभरानं मी तिच्या आठवणीत मायापुरीचा एक अंक हातात घेतला तर त्यात तसाच कागद होता.

उत्सुकतेने मी उघडून पाहिला –

तिसरं पत्र

मला आता ते नीटच वाचता आलं.

तुला मी अडचणीत टाकतेय. माफ कर. रवी आणि माझी तू लाडकी मैत्रीण आहेस. नेहमी लक्षात ठेव. आपली उत्तरं आपणच शोधायची.
I LOVE YOU, 54755 (तिचा फोन नंबर)

झलकची गोष्ट मी कधीही विसरले नाही. तीही मला कधीच विसराली नाही. राजकन्येकडे असतो तसा जादूचा आरसा आता सगळ्यांकडे आहे. तरीही झलकनं केलं तसं दुखून सुख देणारं प्रेम मी नंतर कधी पाहिलंही नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

…वाटली. बोले तो, धड शैशवातून बाहेर न पडलेल्या, परंतु पौगंडाची आगाऊ (येथे ‘आगाऊ’वर श्लेष.) चाहूल लागलेल्या वयोगटातील (बहुधा पाचवीसहावीतल्या वगैरे?) पोरापोरींच्या हातात जर दिली, तर त्यांना आवडू शकेलही कदाचित. (‘रंगीला’सुद्धा त्याच लायकीचा होता, म्हणा.) परंतु, प्रौढांकरिताच्या दिवाळी अंकात ती छापून आणण्यामागचा chutzpah निव्वळ वाखाणण्याजोगा आहे.

नाही म्हणजे, लेखिकेने कसली काऊचिऊची (वयात येऊ घातलेल्या काऊचिऊची, कदाचित; परंतु, nevertheless, काऊचिऊची) गोष्ट लिहावी, हा लेखिकेचा प्रश्न आहे. ते तिचे स्वातंत्र्यही आहे. परंतु, दिवाळी अंकात अंतर्भूत करण्याकरिता लेखांची निवड करणाऱ्यांनी थोडे तरी तारतम्य दाखवावयास नको काय?

(ते cipher तरी कसले पोरकट नि उगाच किचकट आहे! प्रेमाकरिता झाले म्हणून काय झाले, एकेका चिठ्ठीकरिता इतकी फाईट कोण मारेल! त्यापेक्षा चची भाषा, अप्मागप्माची भाषा, झालेच तर मोर्सकोड… केळी खायला गेले होते काय? असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

>>प्रेमाकरिता झाले म्हणून काय झाले, एकेका चिठ्ठीकरिता इतकी फाईट कोण मारेल!

नबा नक्कीच मारणार नाहीत हे उघड आहे.

आणि किचकट म्हणताहेत म्हणजे सुरुवातीला जिथे ती चिठ्ठी दिसली तिथे त्यांना ती सोडवता आली नाही हेही उघड. आम्हाला (म्हणजे पाचवी सहावीच्या वर्गातली पोरकट अभिरुची असलेल्या वाचकांना) सोडवता आली!

कालच आमची पैज लागली होती. या कथेवर नबांच्या विषग्रंथीतून एक दमदार प्रोजेक्टाइल येणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कथेवर नबांच्या विषग्रंथीतून एक दमदार प्रोजेक्टाइल येणार का?

अय्यो रामा.. काय हो हे..!!?? Biggrin

पिचकारी हा शब्द बदलून थोडा सौम्य म्हणून प्रोजेक्टाइल केला का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे एक गोष्ट जाहीर करावीशी वाटते की सदर कथेतला निरागसपणा मला आवडला.

(अवांतर - निरागसपणा आणि स्त्रीनं लिहिलेली कथा असल्यामुळे नबा कथेचा ट्यार्पी वाढवणार अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेस्ट लिहीलंय. तुमच्या या शाळेतल्या पोरींच्या गोष्टींची एक धमाल मालिका होऊ शकते! पूर्वी एक The Wonder Years नावाची सिरियल दिसत असे, आजही कदाचित कुठल्यातरी ओटीटीवर असेल, त्या धर्तीवर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही गोष्ट या विशेषांकात का आहे, ते लक्षात आले.

एन्क्रिप्शन!!!

(विषयास धरूनच आहे. My bad!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले मेसेज वाचण्याचा आम्ही कधी प्रयत्नच करत नाही. म्हातारपणी आता डोक्याला कसलाही त्रास नको. नातवंडांनी कोडी घातली तर विचार न करताच , येत नाही हे लगेच मान्य करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसऱ्यांच्या भानगडींसाठी स्वतःच्या डोक्याला इतका त्रास कशासाठी द्यायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0