बदलासाठी आम्ही तयारच होतो! - इंद्रनील चितळे
बदलासाठी आम्ही तयारच होतो!
- ऐसी अक्षरे संपादक मंडळ
नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडे मराठी मध्यमवर्गातील घरांत आंतरजालाचा वापर सुरू झाला. त्या काळी, अमेरिकेत कुणीतरी ॲमेझन नावाच्या कंपनीतून जालावरून पुस्तकं विकत आहे इतकंच जालीय खरेदी-विक्रीचं ज्ञान मराठी माणसाला होतं. अजून वीस वर्षांनी घरातले कांदे संपले तर घराखालच्या वाण्याकडे न जाता आपण पटकन एखाद्या ऑनलाईन ॲपवरून मागवू असं कुणी सांगितलं असतं तर तेव्हा खरं वाटलं नसतं. पण त्या नंतरच्या वीस-बावीस वर्षांत आपण सगळेच जालावरच्या खरेदी-विक्रीला सरावलो आहोत. विशेषतः कोव्हिड काळात हा बदल झपाट्यानं झाला. उद्योजक याकडे कसं बघतात? विशेषतः ज्या उद्योगांच्या अनेक पिढ्या मराठी माणसांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत असे उद्योग या स्थित्यंतराकडे कसे बघतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही चितळे उद्योग समूहाच्या इंद्रनील चितळे यांच्याशी गप्पा मारल्या. चितळे समूहानं अलीकडच्या काळात समाजमाध्यमांवरील जाहिरातींत अनेक अभिनव प्रयोग केले आहेत. त्याबद्दल आणि त्यांच्या इतर काही उपक्रमांबद्दलही आम्ही त्यांना प्रश्न विचारले. त्या गप्पा इथे देत आहोत.
ऐसी अक्षरे – 'चितळे बंधू' समूहाची धुरा सांभाळणारी तुझी चौथी पिढी. पण या पिढीनं जागतिकीकरण बघितलं आहे, टेलिव्हिजनसारख्या माध्यमांमधून आता समाजमाध्यमांपर्यंत बहरलेली माध्यमं बघितली आहेत. 'कॅडबरी'सारखा विदेशी ब्रँड आपल्या सणांसाठी स्पर्धा करू लागला तेव्हा चितळेंसारख्या अस्सल मराठी ब्रँडला काळजी वाटली होती का?
इंद्रनील – काळजी नक्कीच वाटली होती. ती भीती नाकारता येणार नाही. अजूनही बरेच स्थानिक उत्पादक याबद्दल आकस बाळगून आहेत. पण आपणही यातून काही शिकायला हवं. सणासुदीला गोडधोड खाण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. तरीही आपल्याकडे ठरावीक अंतरापलीकडे अन्न खराब न होता जाऊ शकणारी पॅकिंग यंत्रणा नव्हती. लोकांनी प्रत्यक्ष दुकानांत येऊनच खरेदी करावी अशीच व्यवस्था आपण पिढ्यानुपिढ्या बघत आलो आहोत. त्या व्यवस्थेला या मोठ्या कंपन्यांनी धक्का लावला. आम्ही वेळीच शिकलो त्यामुळे पॅकिंग आणि वितरण हा आमच्या व्यवसायाचा कणा झाला आहे. अर्थात, दुकानं अजूनही महत्त्वाची आहेतच. दुकानांतच आमची ओळख होते आणि ग्राहक दुकानांमुळेच बांधले जातात. पण लांबच्या पल्ल्यावर जास्तीत जास्त उत्पादनं पोहोचवता येणं यावर आता सगळ्याच खाद्य उद्योगांचा भर असतो.
ऐसी अक्षरे – असं म्हणतात की मराठी माणूस 'जाहिरातबाजी'मध्ये मागे पडतो. इतर सगळे खर्च भागवून जे काही उरेल त्यातून जाहिरातींसाठी तजवीज केली जाते. आम्ही लहानपणी कधीच चितळे बंधूंना टीव्हीवर किंवा रेडिओवर सतत जाहिराती करताना बघितलं नाही. पण असं काही न करतादेखील सणासुदीला चितळ्यांच्या दुकानांबाहेर सापासारख्या रांगाही बघितल्या. आता आम्ही 'चितळे बंधूं'चं नवीन रूप बघतो आहोत. समाजमाध्यमांवर सध्या मराठी लोकांनी एक जाहिरात व्हायरल केली आहे. ती चितळेंची आहे. आणि मराठी जनतेचा लाडका सचिनही त्या जाहिरातीत आहे. हा बदल कसा घडला?
इंद्रनील – थोडं बुजरं, काटकसरी असणं हा मराठी संस्कृतीचाच भाग आहे. आणि ते कौतुकास्पदच आहे. पण आता सगळं जगच जोडलं गेलं आहे. आणि आमच्या ब्रँडची ओळख आता नवनवीन ठिकाणी जाऊन पोहोचते आहे जिथे वर्षानुवर्षं, पिढ्यानुपिढ्या आमच्याकडे येणारा ग्राहक नाही. आज सत्तर वर्षं मराठी माणसानं आम्हाला प्रेम दिलं आहे. तसं नातं इतर भौगोलिक क्षेत्रांमध्ये तयार करायला अजून वेळ लागेल. अशा ग्राहकांशी आमची ओळख करून देण्यासाठी या माध्यमांचा उपयोग होतो. शिवाय आता आपला ग्राहक आपल्याच दुकानात येऊनच आपलं उत्पादन घेईल असं नाही. एखाद्या किराणा दुकानातून, एखाद्या मॉलमधून किंवा आंतरजालावर उपलब्ध असलेल्या बाजारपेठांतून अशा अनेक ठिकाणांहून आमची उत्पादनं विकत घेतली जातात. त्यामुळे नेहमीच, आम्ही कोण, हे ग्राहकांना कळत नाही. त्यामुळे आमची ओळख ग्राहकांच्या मनावर ठसत राहावी यासाठी जाहिरातींचा उपयोग होतो.
ऐसी अक्षरे – आपल्या पिढीनं बघितलेलं एक मोठं संकट म्हणजे कोव्हिड काळात ठप्प झालेलं जग. हा काळ बऱ्याच उद्योगांसाठी त्यांच्या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोणच बदलून टाकणारा काळ होता. चितळे बंधूंसारख्या जुन्या व्यवसायासाठी हा काळ कसा होता?
इंद्रनील – आमच्यासाठी हा काळ अगदी दृष्टिकोण बदलणारा होता असं म्हणता येणार नाही. उलट, आम्हांला ज्या गोष्टी आधीच स्पष्टपणे दिसू लागल्या होत्या, उदाहरणार्थ, ग्राहकांची मागणी आता एकाच मार्गानं येणार नाही. आमच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग त्यांना हवे आहेत. आणि त्यांचे आवडते विश्वसनीय ब्रँड त्यांना हव्या त्या माध्यमांतून निवडायची मुभा हवी आहे यावर शिक्कामोर्तब झालं. या आधीच आम्ही 'स्वतःची दुकानं' कमी करून वेगवेगळ्या ठिकाणी वितरण वाढवायला सुरुवात केली होतीच. त्याचा आम्हांला या काळात फायदाच झाला.
ऐसी अक्षरे – तुमची काही आधुनिक म्हणता येतील अशी उत्पादनं आहेत. उदाहरणार्थ भेळ-बार; बाजरी, ज्वारी अशा धान्यांची उत्पादनं; साखर नसलेले पदार्थ – या प्रकारचे पदार्थ करायचा निर्णय घेताना काय काय लक्षात घेतलं जातं? त्यांचं मार्केटिंग कसं केलं जातं? असे पदार्थ तरुण लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत का? प्रत्येक पिढीच्या आवडी-निवडी बदलत असतील. त्याबद्दल तुमची काय निरीक्षणं आहेत?
इंद्रनील – आमच्या समोर सतत असणारं एक मोठं आव्हान म्हणजे पंचाहत्तर वर्षांपासून कार्यरत असलेला हा ब्रँड आहे. तो आजच्या पिढीला आपला वाटेल यासाठी काय काय करता येईल. अर्थात, प्रत्येक पिढीच्या आवडीनिवडी बदलतात. अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोणही बदलतो. त्यामुळे चितळे बंधूंना आता नेहमीच्या पदार्थांबरोबरच रोजचं पोषण मिळेल असंही काही लोकांना द्यायचं आहे.
ऐसी अक्षरे – तुमच्यासारख्या मोठ्या ब्रँडच्या मार्केटिंगसाठी समाजमाध्यमं उपयुक्त आहेत असं तुम्हाला वाटतं का?
इंद्रनील – समाजमाध्यमांना मी 'नेसेसरी इव्हिल' म्हणेन. समाजमाध्यमांत केलेल्या जाहिरातींमुळे आमचं नाव चर्चेत राहतं, लोकांपर्यंत पोहोचतं. पण समाजमाध्यमांतून ग्राहक खेचून आणणं खूप खर्चिक आहे. त्यामुळे वितरकांवर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या, ज्यांना 'डी टू सी' (direct to customer) म्हणतात, ब्रँडना आजही भरपूर संघर्ष करावा लागतो. कधीकधी तुमचं उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहोचवायचा खर्च त्या उत्पादनापेक्षाही जास्त असतो. त्यामुळे समाजमाध्यमं अजूनही केवळ आपण सतत चर्चेत आणि झोतात राहावं एवढ्यासाठीच उपयुक्त आहेत. प्रत्यक्ष व्यापारात त्यांचा अजून मोठ्या प्रमाणावर उपयोग होत नाही.
ऐसी अक्षरे – सध्या व्हायरल होणाऱ्या ज्या 'शॉर्ट स्टोरी' रूपातल्या जाहिराती आहेत, त्यांची कल्पना कशी सुचली? त्या जाहिराती इतक्या प्रसिद्ध होतील असं तुम्हाला वाटलं होतं का?
इंद्रनील – आता सत्तर वर्षांनी पहिल्यांदा जाहिराती करायला सुरुवात करायची तर थेट देवाण-घेवाण अशी भाषा आम्हांला नको होती. पण अन्नाशी माणसाच्या अनेक आठवणी आणि भावना जोडलेल्या असतात. आम्ही त्यांच्याच गोष्टी सांगायचा निर्णय घेतला. आणि खरंच, या निर्णयामुळे आम्ही आमच्या चाहत्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकलो.
ऐसी अक्षरे – जाहिरात किती परिणामकारक ठरली याचं काही मोजमाप असतं का? एखाद्या जाहिरातीमुळे उत्पादनाच्या खपात किती फरक पडला हे शोधून काढणं सोपं आहे का?
इंद्रनील – जाहिरात किती परिणामकारक ठरली याविषयी खूप डेटा उपलब्ध असतो, त्यामुळे तसं म्हटलं तर ते खूप सोपं आहे. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाहिरातीला काही मूल्य असतं; उदाहरणार्थ, काही जाहिराती खूप शेअर केल्या जातात आणि व्हायरल होतात. किंवा जाहिरातीची रीकॉल व्हॅल्यू, म्हणजे काही जाहिराती लोकांच्या आठवणीत राहतात आणि कँपेन संपून बराच काळ लोटल्यानंतरही लोकांना त्या पुन्हापुन्हा आठवत राहतात. अशा गोष्टींवरून ब्रँडच्या प्रतिमेवर किती परिणाम होतो हे सहज मोजण्यासारखं नसतं, पण ते खूप महत्त्वाचं असतं.
ऐसी अक्षरे – व्यवसायात कार्यरत असलेल्या आधीच्या पिढीला समाजमाध्यमांचं महत्त्व सहज पटवून देता आलं का? त्यात काही अडचणी आल्या का?
इंद्रनील – सगळ्या मोठ्यांना बरोबर घेऊनच हा प्रवास करायचा आहे. पण आमचं कुटुंब अनेक वर्षं या व्यवसायात असल्यानं कुणालाच कशाचं महत्त्व पटवून द्यावं लागलं नाही. आम्ही २०१४ सालापासूनच काही प्रमाणात समाजमाध्यमांचा वापर करत होतो. बदलत्या कालानुरूप आपणही बदलायचं हे सगळ्यांनाच मान्य असल्यानं तशी काही अडचण आली नाही.
ऐसी अक्षरे – जाहिरात तयार करणाऱ्यांबरोबर तुमचा संवाद कसा असतो? एखादी जाहिरात तयार होत असताना तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल आग्रही असता?
इंद्रनील – चर्चा बरीच होते. कल्पनाही बऱ्याच सुचतात. शक्यतो आमच्या ब्रॅण्डचा पुढचा प्रवास, आमची उद्दिष्टं समोर यावीत हा विचार असतो. पण आम्ही फिल्म तयार करणाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवतो. त्यांना त्यांचं काम चांगलं जमतं याची आम्हाला खात्री असते. असा विश्वास ठेवला की यश नक्कीच मिळतं हा आमचा अनुभव आहे.
ऐसी अक्षरे – सोशल मिडियाची टेलिव्हिजनसारख्या माध्यमांशी तुलना केली तर समाजमाध्यमं प्रयोगशाळेचं काम करतात असं वाटतं का?
इंद्रनील – नक्कीच. सोशल मिडियावरून तात्काळ मिळणार प्रतिसाद विशेष करून उपयोगी असतो. त्याचा योग्य वापर केला तर तो लोकांपर्यंत पोहोचायचा अतिशय स्वस्त मार्ग आहे.
प्रतिक्रिया
जाहिरातीबद्दल…
जाहिरात नॉस्टाल्जिया-मूल्य म्हणून आपल्या जागी ठीकच आहे, परंतु, त्यात अनेक विसंगती (तर्कविसंगती तथा कालविसंगती) आहेत, असे वाटले. अर्थात, बहुतांश प्रेक्षकांच्या त्या एक तर लक्षात तरी येत नसाव्यात, किंवा त्यांकडे काणाडोळा केला जात असावा; त्यामुळे ठीकच आहे.
(काणाडोळा केला जात असल्यास कदाचित ती चितळ्यांच्या ‘प्रॉडक्ट’विषयीच्या ग्राहकांच्या प्रेमाची पावती मानता येईलही. (चितळ्यांच्या ‘प्रॉडक्ट’च्या पूर्वापार दर्जाविषयी आणि त्या दर्जाच्या सातत्याविषयी यत्किंचितही शंका नाही.) मात्र, त्या परिस्थितीत, चितळ्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीच्या दृष्टीने अशा जाहिरातींचे योगदान तथा उपयुक्ततामूल्य कितपत असावे, असा प्रश्न उद्भवू शकतो. तर तूर्तास ते एक असो.)
तर, जाहिरातीतील तर्कविसंगती तथा कालविसंगती:
१. प्रस्तुत जाहिरातीतील ‘सर’ हे हॉस्टेलचे रेक्टर असावेत, की मेस मॅनेजर, हे समजत नाही. महाराष्ट्रातील महाविद्यालयांत नक्की कसे असते, याबद्दल कल्पना नाही (मी स्वतः वसतिगृहांत अनेक वर्षे राहिलेलो असलो, तरी ते महाराष्ट्रात नव्हे.); परंतु, माझ्या कल्पनेप्रमाणे, हे दोन पदभार सांभाळणारे पदाधिकारी वेगवेगळे असावेत. (वसतिगृहाचे रेक्टर हे बहुधा प्राध्यापकांपैकीच कोणी असावेत, तर मेस मॅनेजर ही व्यक्ती बहुधा व्यावसायिक अन्नसेवाव्यवस्थापक असावी.) आता, वसतिगृहाच्या रेक्टरला विद्यार्थ्यांनी (आदराने) ‘सर’ म्हणून संबोधणे हे समजण्यासारखे आहे, किंबहुना, अपेक्षित असावे. मात्र, मेस मॅनेजरला कोणी ‘सर’ म्हणून संबोधेल, अशी कल्पना करवत नाही. (आमच्या येथील मेस मॅनेजरांस मंडळी नावाने संबोधीत असत, तथा बरोबरीच्या नात्याने वागवीत असत. परंतु ते एक असो.)
सांगण्याचा मतलब, प्रस्तुत ‘सर’महोदय हे वसतिगृहाचे रेक्टर असावेत, असा अंदाज बांधता येतो. त्या परिस्थितीत, ते रात्री मेसमध्ये जाऊन पातेल्यात चहा ढवळीत का बसलेत (मुळात त्यांना कोणी तसे बसू कसे दिले), हा प्रश्न सर्वप्रथम उद्भवतो.
२. ठीक आहे, काहीतरी जुगाड़ करून तसे ते तेथे बसले, असे (वादाच्या सोयीकरिता) समजू.
आता, वसतिगृहाचा रेक्टर हा सामान्यतः ‘निवासी’ असावा, नव्हे काय? बोले तो, अगदी वसतिगृहात नव्हे कदाचित, तरी फार फार तर वसतिगृहाच्या जवळपासच बांधून दिलेल्या क्वार्टर्समध्ये राहत असणार.
आणि, निवासी असो, वा अनिवासी, जेव्हा केव्हा तो वसतिगृहाचे फेरे मारायला जात असेल, तेव्हा, हा वसतिगृहाचे फेरे मारायला गेलेला आहे (किंवा, गेला बाजार घराबाहेर पडलेला आहे), हे (घरात कोणी असेल, तर) घरातल्यांना समजणारच. त्याव्यतिरिक्त, विद्यार्थीही अगदी रोज नाही तरी कधी ना कधी काही कामानिमित्त घरी येतजात असणे (आणि त्यायोगे (घरी कोणी असल्यास) घरच्यांशी ते परिचित होणे) हेदेखील असंभव नसावे.
आता, हा जो कोणी ‘सर’ गृहस्थ आहे, तो अनेक वर्षे रेक्टर राहिला असावा, असे वाटते. (विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेस पाहिलेला, वगैरे.) कोणास ठाऊक, कदाचित रेक्टर म्हणून निवृत्तही झाला असू शकेल.
आता, या सद्गृहस्थाने म्हातारपणी/निवृत्तीनंतर वगैरे लग्न केलेले असल्याखेरीज, तो रात्री परातभर बाकरवडी घेऊन मेसमध्ये जायचा, नि तेथे पातेलेभर चहा ढवळीत बसायचा, या त्याच्या (विद्यार्थ्यांप्रीत्यर्थच्या) उद्योगांबद्दल त्याची बायको इतकी अनभिज्ञ कशी? (‘मॅम’ना सांगावे का लागते? त्यांना डोळे नाहीत काय? परातभर बाकरवडी कोटाखाली दडवून नेता येत नाही, नि चितळे परातभर बाकरवडी थेट मेसमध्ये (निदान त्या काळी तरी) डेलिव्हर करीत नसावेत.)
(शिवाय, घरचा व्हीसीआर उचलून मेसमध्ये नेऊन ठेवला, नि घरच्यांना पत्ता नाही, हे शक्य वाटत नाही.)
शिवाय, एकंदरीतच हा गृहस्थ आपल्या पत्नीशी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांविषयी बोलताना जे तिऱ्हाइतास माहिती दिल्यासारखे बोलतोय, त्यावरून नक्कीच त्याने म्हातारपणी निवृत्तीनंतर लग्न केले असले पाहिजे, याबद्दल खात्री बळावू लागते. (अन्यथा, त्याच्या पत्नीस त्याच्या हाताखालून गेलेल्या जुन्या विद्यार्थ्यांची किमान जुजबी/वरवरची/सांगोवांगीची माहिती तरी कशी काय नाही?)
३. जाहिरातीचा जमाना व्हीसीआरचा, सचिनचा आहे. त्या काळात याला मुळात परातभर बाकरवडी एका वेळेस गावलीच कशी?
पाव किलो बाकरवडीसाठी उन्हांतान्हांत तासन्-तास रांग लावल्यानंतर ‘बाकरवडी संपली’ ही पाटी पाहण्याचे दिवस ते! मुळात हे शक्यच कसे झाले?
बरे, एखादे दिवशी he was exceptionally lucky, असे समजू. रोजरोज असे थोडेच होईल? मुळात, रोजरोज इतकी फाइट मारण्याइतका त्याचा उत्साह टिकेल? (परीक्षा काही एका दिवसात संपत नाहीत. काही दिवस तरी चालतात.) आणि समजा टिकलाच, तरी इतके दिवस त्याचे नशीब सतत बलवत्तर राहील?
हे काही पचत नाही बुवा. नाही म्हणजे, ते तुमचे suspension of disbelief वगैरे ते सगळे ठीकच आहे, परंतु इथे अविश्वास थोडा अतीच टांगला जात आहे.
(कदाचित, २००१चा जमाना दाखवलेला आहे, तोवर ‘बाकरवडी संपली’वाली परिस्थिती राहिली नसेलही कदाचित. कोणास ठाऊक. परंतु, त्याबद्दल मी साशंक आहे.)
असो चालायचेच.
——————————
ते सर्व एक वेळ सोडून देऊ. लोक जाहिराती (आणि हिंदी सिनेमे) पाहताना तसेही डोके बाजूला ठेवून बसतात. त्यामुळे, ठीक आहे.
शिवाय, चितळ्यांनी जाहिरातींवर पैसे खर्च करावेत, की न करावेत, याबद्दल त्यांना काही सांगणारा मी कोण? पैसे त्यांचे आहेत; त्यांनी ते कसे खर्च करावेत, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
मात्र, त्यांच्या व्यवसायवृद्धीकरिता या जाहिरातींचा कितपत उपयोग होतो, हा प्रश्न विचारण्याजोगा आहे. (कदाचित चितळ्यांनी तो स्वतःस विचारला असेलही.)
असे पाहा. जाहिरातीत जो जमाना दाखविलेला आहे, त्या काळात बाहेरगावी तर सोडाच, परंतु खुद्द पुण्यात चितळ्यांची बाकरवडी हवी तेव्हा नि हवी तितकी मिळणे दुरापास्त असे. (तुरळक अपवाद वगळल्यास, अशी काही चीज विश्वात अस्तित्वात आहे, हेदेखील बाहेरगावी फारसे कोणाला ठाऊक नसे, हा दुसरा भाग.)
फार कशाला, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत, अमेरिकेत राहणाऱ्या आमच्यासारख्या नॉष्टाल्जिक एक्स-पुणेकरांना कधी बाकरवडी खाण्याचे फारच डोहाळे लागले, तर त्यांना दोनच मार्ग उपलब्ध असत: एक तर स्वतः पुढील पुणेभेटीत चितळ्यांसमोर रांग लावून बॅगेत भरून आणणे (नि तोवर कळ काढणे), किंवा पुण्याहून कोण कधी येत आहे यावर डोळा ठेवून त्यास आणण्यास सांगणे (नि तोवर कळ काढणे). (पुण्यातल्या नातेवाईकांना सांगून पार्सलने मागवून घेणे, हाही एक मार्ग उपलब्ध झाला, परंतु तो बऱ्याच नंतर. शिवाय, स्वतःच्या खिशातून खर्च करून पार्सल पाठवायला पुणेरी नातेवाईकही तितकेच जवळचे पाहिजेत.)
आज तशी परिस्थिती नाही. आजमितीस आमच्या येथील ‘पटेल ब्रदर्स’मध्ये, झालेच तर इतरही संकीर्ण भारतीय किराणामालाच्या दुकानांत, जर चक्कर टाकली, तर चितळ्यांची बाकरवडी वाटेल तितकी नि वाटेल तेव्हा विकत मिळू शकते. झालेच तर, चितळ्यांचा चिवडा, चितळ्यांचे फरसाण, चितळ्यांचे गुलाबजाम मिक्स, असे इतरही अनेक पदार्थ सर्रास मिळतात. (चितळ्यांची मिठाई अद्याप मिळत असल्याचे पाहिलेले नाही, परंतु त्याला कदाचित वितरणाशी संबंधित अन्य मर्यादा कारणीभूत असाव्यात. शिवाय, मिठाईकरिता स्थानिक बाजारात स्पर्धाही पुष्कळ आहे. परंतु, तो मुद्दा तूर्तास बाजूस ठेवू.)
अमेरिकेतील इतरही मोठ्या शहरांतून माझ्या अंदाजाप्रमाणे थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती असावी.
याचा अर्थ, आजमितीस अमेरिकेत चितळ्यांच्या मालास पुष्कळ खप आहे, पुष्कळ उठाव आहे. (त्याशिवाय ‘पटेल ब्रदर्स’ने आपल्या दुकानी माल नसता ठेवला!)
(हे ‘पटेल ब्रदर्स’ हे एक अजब रसायन आहे. ‘आमची इतरत्र कोठेही शाखा नाही’च्या बरोबर विरुद्ध त्याची फिलॉसफी असावी. शिकागोत मुख्यालय तथा अनेक शाखा आहेत, तथा शिकागोबाहेरही अमेरिकेत इतर अनेक मोठ्या शहरांतून शाखा आहेत. खुद्द आमच्या अटलांटात तूर्तास दोन शाखा असून आणखी तिसरी येऊ घातलेली आहे. बडे (आणि प्रचंड यशस्वी) प्रस्थ आहे!)
तर सांगण्याचा मतलब, आजमितीस अमेरिकेत चितळ्यांचा माल मजबूत खपतो.
मात्र, अमेरिकेत चितळ्यांच्या मालाची जाहिरात होत नाही. (‘पटेल ब्रदर्स’चीही फारशी होत नसावी, परंतु, समजा झालीच, तरी त्यात ते आपल्या दुकानीच्या चितळ्यांच्या मालाचा विशेषेकरून उल्लेख करतील, याबद्दल साशंक आहे.)
आता, जाहिरात तर होत नाही, परंतु, माल तर भरपूर खपतो, हे कसे? तर, (माझ्या अंदाजाप्रमाणे) मूळचा पुणेरी ग्राहकवर्ग हळूहळू जगभर पसरत आहे. आणि, या पसरणाऱ्या पुणेरी ग्राहकवर्गाच्या ठायी (पूर्वीच्या ‘बाकरवडी संपली’च्या तथा एकंदरीत कदाचित ‘अॅटिट्यूड’ म्हणता येईल तत्संबंधीच्या जुन्या आठवणींच्या तथा इंप्रेशनांच्या बावजूद — आणि, हा केवळ चितळ्यांचा दोष खासा नव्हे!) चितळ्यांच्या मालाच्या निव्वळ दर्जापोटी प्रचंड आदर तथा प्रचंड गुडविल आहे. इतके, की कोठेही गेला, तरी चितळ्यांचा माल मिळाल्यास तो त्यावर झडप घालेल. आणि, त्याचे पाहून इतर लोकही हळूहळू तो माल घेऊ लागत असावेत.
मला वाटते, जगभर पसरत जाणाऱ्या पुणेरी ग्राहकाच्या या प्रचंड गुडविलचा फायदा घेऊन चितळ्यांनी आपला माल अधिकाधिक जागतिक पुणेरी ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल, या दृष्टीने उत्पादनावर तथा दूरवर वितरणावर जरी लक्ष केंद्रित केले, तरी पुरेसे व्हावे. (‘आमची कोठेही शाखा नाही’ धोरणात बदल करण्याची गरज नाही. किंबहुना, दूरवर वितरणासाठी स्वतःच्या शाखा काढण्याचे ओव्हरहेड्ज़ घेऊन फायदाही नाही; बाजारात अस्तित्वात असलेले वितरणाचे पर्याय लेव्हरेज केले, तरी पुष्कळ व्हावे.) जाहिराती वाटले तर अवश्य कराव्यात, परंतु त्याचे ROI कितपत मिळत असावे, याबद्दल मी साशंक आहे.
अर्थात, हे झाले एक ग्राहक म्हणून माझे अनभ्यस्त मत, ‘फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ’ तत्त्वावर. प्रत्यक्ष काय ते चितळ्यांना ठाऊक असेलच; त्यांना मी शिकवूही नये नि तो माझा उद्देशही नाही.
असो.
.
आम्ही वेळीच शिकलो त्यामुळे पॅकिंग आणि वितरण हा आमच्या व्यवसायाचा कणा झाला आहे. अर्थात, दुकानं अजूनही महत्त्वाची आहेतच. दुकानांतच आमची ओळख होते आणि ग्राहक दुकानांमुळेच बांधले जातात. पण लांबच्या पल्ल्यावर जास्तीत जास्त उत्पादनं पोहोचवता येणं यावर आता सगळ्याच खाद्य उद्योगांचा भर असतो.
चितळे मोजून मापून बोलतात त्यामुळे तुम्ही त्यांनी जे करावं असं सुचवलं आहे ते त्यांनी या उत्तरात आधीच सांगितलं आहे.
"दुकानं" महत्त्वाची आहेत पण सध्या त्यांचा सगळं फोकस प्रत्येक उत्पादनाचं लांब पल्ल्याचा प्रवास करूनही व्यवस्थित वितरण कसं होईल यावर भर असतो.
या जाहिरातींवर पैसे का वाया घालवावे? याचं उत्तर नार्वेकरांच्या मुलाखतीत मिळेल. अशी जाहिरात करायला १०-१२ लाख खर्च येतो. (अर्थात, या जाहिरातीला जास्त आला असणार कारण यात तेंडुलकर आहे). ती माध्यमांवर पुन्हा पुन्हा दाखवता येते. त्यामुळे टिव्हीपेक्षा बरीच स्वस्त पडते.
बाकी १९९० च्या दशकात परातभर बाकरवडी कशी काय मिळाली का प्रश्न मात्र खरंच निरुत्तर करणारा आहे.
.
ते मीही वाचले होते; त्याला मी दुजोरा दिला, इतकेच. (‘उसे मैं ने दोहराया’ हे मराठीत नेमके कसे म्हणावे, ते ऐन वेळेस सुचले नाही. Shame on me.)
नार्वेकरांची मुलाखत तूर्तास पाहिलेली नाही; सवडीने पाहतो.
जाहिरातीबद्दल माझा मुद्दा असा आहे, की येथे (अमेरिकेत) जाहिरात केली जात नाहीये, तरीही माल मजबूत खपत आहे, याचा अर्थ याचे उत्तर जाहिरातीत नसून अन्यत्र आहे. जाहिरात अजिबात करू नये असे माझे म्हणणे नाही; मात्र, त्याचा उपयोग वा फायदा मर्यादित आहे (कारण, जाहिरातींतून जे साध्य करायचे, ते चितळ्यांनी बहुधा अगोदरच साध्य केले असावे) इतकाच माझ्या म्हणण्याचा रोख आहे.
असो.
—————
बाकी,
हे तितकेसे पटले नाही.
चितळ्यांची ओळख त्यांच्या दुकानांतून नाही, तथा त्यांचे ग्राहक त्यांच्या दुकानांमुळे बांधले गेलेले नाहीत. चितळ्यांची ओळख तथा त्यांच्या ग्राहकांची बांधिलकी ही निव्वळ त्यांच्या मालाच्या दर्जामुळे तथा तज्जन्य पूर्वापारच्या गुडविलमुळे आहे.
.
चितळ्यांची ओळख त्यांच्या दुकानांतून नाही, तथा त्यांचे ग्राहक त्यांच्या दुकानांमुळे बांधले गेलेले नाहीत. चितळ्यांची ओळख तथा त्यांच्या ग्राहकांची बांधिलकी ही निव्वळ त्यांच्या मालाच्या दर्जामुळे तथा तज्जन्य पूर्वापारच्या गुडविलमुळे आहे.
शेवटी "नबा"ही चितळेंबद्दल आदर असलेले "चोखंदळ" पुणेकर निघाले!
How conformist!!
.
‘चितळें’बद्दल नव्हे. त्यांच्या प्रॉडक्टबद्दल. फरक आहे.
(आणि, हो, आहे ते आहे.)
(अतिअवांतर: समजा, चितळे (किंवा वाटले तर त्यांचा प्रॉडक्ट म्हणा) त्या आदरास पात्र नाहीत. तर मग तुम्ही त्यांची मुलाखत बरी घेतलीत?)
.
चितळे जाहिरात करण्यासाठी समाजमाध्यमं वापरू लागले ही एक विलक्षण गोष्ट वाटली. म्हणून मुलाखत घेतली. आणि आम्हाला चितळेंबद्दल आदर असण्यात काही विशेष नाही. पण नबांसारख्या थोर्थोर, उच्च अभिरुची असलेल्या व्यक्तीला पुण्यातले कोथरूड कर्वेनगरचे लोक ज्यांच्या दुकानाबाहेर रांगा लावतात त्या ब्रँडबद्दल आदर असणं हीदेखील एक विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे तुमचीही एक मुलाखत घ्यायला हवी.
पण नबांसारख्या थोर्थोर, उच्च
तुम्ही नबांना ओळखले नाही. त्यांचा काहीच भरवसा नसतो. म्हणजे कोणत्याही साच्यात बसवता येत नाही. (हा सदरा त्या सदरात पडला.. असे काहीसे.)
त्यामुळेच तर ते ऐसी किंवा अन्य कोणत्याही संस्थळाच्या जनरल छापांपेक्षा वेगळे ठरतात.
.
ओह, एवढेच? (ठीकच आहे, म्हणा; अंकाच्या विषयाशी सुसंगतच आहे ते.)
परंतु तरीही, चितळे (एक उद्योग म्हणून, एक प्रॉडक्ट म्हणून) समजा जर त्या आदरास पात्र नसते, तर केवळ ते जाहिरातीसाठी समाजमाध्यमे वापरू लागले, एवढ्या(च) कारणासाठी तुम्ही त्यांची मुलाखत घेतली असतीत काय?
कोण म्हणतो असे? असा कोणताही दावा निदान मी तरी केलेला नाही. माझी अभिरुची ही आहे ही अशी आहे. ती माझी आहे, हे (आणि एवढेच) माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, इतकेच.
मला चितळ्यांचा प्रॉडक्ट आवडतो. नि म्हणून त्या प्रॉडक्टबद्दल आदर आहे. आता, कोथरूड तथा कर्वेनगरच्या लोकांनाही चितळ्यांचा प्रॉडक्ट जर आवडत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, नव्हे काय? केवळ त्यांना तो आवडतो, या कारणास्तव मी माझ्या आवडीनिवडींवर बंधने काय म्हणून घालून घेऊ? फार फार तर, ज्याअर्थी त्या प्रॉडक्टबद्दल मलाही आदर आहे नि इतक्या साऱ्या कोथरूड-कर्वेनगरवासीयांनासुद्धा आदर आहे, त्याअर्थी, कदाचित त्या प्रॉडक्टमध्ये दम असू शकेल, असा तर्क मांडू शकतो. (अर्थात, याचा अर्थ, माझी तथा तमाम कोथरूड-कर्वेनगरवासीयांची अभिरुची दळभद्री असून चितळ्यांचा प्रॉडक्ट भिकार असू शकेल, असाही तर्क लढविता येईलच. मात्र, का कोण जाणे, परंतु, मला तसे वाटत नाही. असो.)
का बुवा? I don’t owe the world an explanation!
——————————
असो. प्रस्तुत धाग्याचा विषय चितळे आहेत, मी नव्हे. शिवाय, (तुमच्याच) या धाग्याचा विषय, त्याची मांडणी, तथा कंटेंट (फॉरअचेंज) खरोखरच चांगले आहेत. सबब, इथे अधिक विषयांतर करण्यात मला स्वारस्य नाही. त्यामुळे, मी इथेच थांबतो.
फारच तोकडे कपडे घातलेल्या सारखा,अपूर्ण,तुटक संवाद
या वर्षानुवर्षे क्वालिटी integrity जपणाऱ्या मराठी उद्योजकांचे कौतुक वाटते.यांचे इतर सखोल interview बघितले आहेत. या तोकड्या आणि बहुधा थीम चे बंधन असल्याने लेखात नवीन रोचक काही आढळले नाही.
शिवाय चितळे अंबानी सारखे "प्रकाशित" आहेत. त्यामुळे फारसे चित्ताकर्षक नाहीत. नाहीतर हल्दीराम बघा किती गूढता आहे मालकाचा चेहरा,त्यांची मुलं मुली घर काहीच माहीत नाही,सुरुवात पहिला झारा काहीच माहिती कुठेच उपलब्ध नाही absolute mystery! माय मराठीतले उदाहरण parle पण बऱ्यापैकी गूढ फॅमिली आहे.
हल्दीराम याविषयी पुस्तक
हल्दीराम याविषयी पुस्तक निघाले आहे आणि ते मी वाचले आहे.
ही छोटीशी जाहिरातवजा मुलाखत
ही छोटीशी जाहिरातवजा मुलाखत आवडली.