वैद्यकीय क्षेत्रातील माध्यमकल्लोळ
वैद्यकीय क्षेत्रातील माध्यमकल्लोळ
- डॉ. अमेया कुलकर्णी-कनाकिया
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओपीडीमध्ये एक पेशंट फॉलोअपसाठी आली होती. तिच्या गर्भाशयात एक फायब्रॉईड (मासपेशींचा गोळा) होता ज्यात कर्करोगाच्या पेशी आढळून आल्या होत्या. साधारण एक लाख फायब्रॉइडच्या केसेसपैकी एखाद्या केसमध्येच कर्करोग निघतो, पण जर निघाला तर मात्र तो पटकन वाढणारा असा ‘आक्रमक’ कर्करोग असतो. त्यामुळे ऑपरेशननंतर या कर्करोगाला कीमोथेरपी निश्चितच लागते. पण माझ्यासमोर बसलेली पेशंट मला खात्रीशीर सांगत होती की डॉक्टर आता पुढे काहीही करायची गरज नाही कारण माझा उरलेला कर्करोग बरा होण्यासाठी आता मी रोज गाजराचा रस पिते. कॅन्सरसाठी गाजराचा रस? मी थक्कच झाले! मी पुढे काही समजवायच्या आत मला तिनं, "डॉक्टर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत नाही का? व्हॉट्सॲपमधे एक फॉरवर्ड आला होता त्यात असं लिहिलेलं होतं. तुम्हाला नाही आला का मेसेज? मी पाठवू का तुम्हाला?", असं विचारलं. मी कपाळावर हात मारून घेतला. पुढे काही महिन्यांनी तिचा कर्करोग वाढला आणि ती दगावली. ‘व्हॉट्सॲप फॉरवर्ड'नं एका डॉक्टरच्या डोळ्यांदेखत एक बळी घेतला. असे कित्येक जीव त्या आणि त्यांसारख्या अनेक 'फॉरवर्डांनी' घेतले असतील. गणना अशक्य आहे!
काही दिवसांपूर्वी मलादेखील व्हॉट्सॲपवर निसर्गोपचार करणाऱ्या एका बाईंचा व्हिडिओ आला. गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोगाची लस कशी चुकीची आहे; हा कर्करोग कसा अत्यंत दुर्मीळ आहे; आणि कसा हा सगळा ऊहापोह चुकीचा आहे याबद्दल बाई बोलत होत्या. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग दुर्मीळ असणे तर सोडाच, पण गर्भाशयाच्या-मुखाच्या कर्करोगाच्या जगभरात आढळणाऱ्या केसेसपैकी एक चतुर्थांश केसेस भारतातच आढळतात. आपलं सरकार, आरोग्यसेवेसाठी जो काही तुटपुंजा निधी देत असेल त्यातही ‘सर्व्हायकल कॅन्सरमुक्त भारत’ (सर्व्हायकल कॅन्सर – गर्भाशयमुखाचा कर्करोग) असं अभियान राबवतंय. या अभियानाअंतर्गत गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची चाचणी एका साध्या ओपीडीमध्ये होऊ शकणाऱ्या 'पॅप स्मिअर टेस्ट'नं केली जाते आणि कर्करोगावरच्या लशीबद्दल माहिती दिली जाते. आता तुम्ही म्हणाल, कर्करोगासाठी लस कशी काय? तर हा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा’ या संसर्गजन्य व्हायरसमुळे होतो. त्यामुळे या व्हायरसवर लस घेतल्यानं आजार होण्याची शक्यता कितीतरी पटींनी कमी होते. जिथे सरकार आणि डॉक्टर ही गोष्ट लोकांपर्यंत पोचवण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत, तिथे सोशल मिडियावरून पसरणाऱ्या या माहितीमुळे नुसतं नुकसानच होत नाही तर डॉक्टरकी करणं म्हणजे पैसे उकळण्याचे धंदे आहेत असा गैरसमजही समाजात पसरतो.
आता लशींच्या मुद्द्यावर आलोच आहोत तर लहान मुलांना जन्मापासून काही ठरावीक अंतरानं देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक लशींविरुद्धदेखील सोशल मिडियावर अनेक गट सक्रिय आहेत. पाश्चात्त्य देशांतल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तीदेखील अशा 'अँटी व्हॅक्सिन’ गटांमध्ये सक्रिय आहेत. विशेषतः अमेरिकेत अशी एक मोठी लॉबीच आहे जिनं वैद्यकीय व्यवस्थेच्याच नाकी नऊ आणले आहेत. भांडवलशाही स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या तान्ह्या बाळांच्या शरीरात विष टोचते आहे, असा जहाल आणि कोणत्याही निरागस व्यक्तीला भीती वाटावी असा प्रचार केला जातो. परिणामी अनेक पालक मुलांना लशी टोचत नाहीत. आता यावर, "त्यांचं मूल, त्यांचा निर्णय!" असं म्हणता येईलच. पण संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी असा व्यक्तिकेंद्री बाणा उपयोगाचा नाही. समाजात (शाळेत, खेळाच्या मैदानावर, बागेत) एकत्र खेळणाऱ्या, वावरणाऱ्या जास्तीत जास्त मुलांनी लस घेतली असेल तरच त्या रोगाचा अटकाव आणि निर्मूलन होऊ शकतं. आपल्या देशात गेली अनेक दशकं पोलिओ निर्मूलनाची अशी मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. खेड्यापाड्यांतल्या घरांच्या, गोठ्यांच्या भिंतींवर आजही, पोलिओ लशीची माहिती पांढऱ्या रंगानं रंगवलेली दिसते. गरीब, अशिक्षित लोकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजवर आलेल्या प्रत्येक सरकारनं पैसा आणि साधनं खर्ची घातली आहेत. खरं तर, लसीकरणाचा असा एक स्वतंत्र इतिहासच आहे. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी आपल्या जिवाची परवा न करता हे शोध लावले आहेत. आज एका रीलसरशी आपण अनेक शतकांच्या अथक प्रयत्नांवर पाणी ओततो आहोत. याचा परिणाम असा की ज्या संसर्गजन्य आजारांचं काही दशकांपूर्वीच निर्मूलन झालं होतं, (उदाहरणार्थ: गालगुंड, गोवर), ते आता अमेरिकेसारख्या प्रगत देशांतही पुन्हा आढळू लागले आहेत.
प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मत असण्याची मुभा आहेच. पण विज्ञानानं, संख्याशास्त्रानं आधीच सिद्ध केलेल्या गोष्टींबद्दल चुकीची मतं असणारे लोक समाजमाध्यमांच्या आधारे ती झटकन पसरवू शकतात. त्यात 'निसर्ग' विरुद्ध 'रसायनं'; 'भांडवलशाही' विरुद्ध 'सामान्य माणूस'; 'पारंपरिक' विरुद्ध 'आधुनिक' अशी मांडणी असते तेव्हा तर ती वाऱ्यासारखी पसरतात. आमच्या क्षेत्रात ही मोठ्या चिंतेची बाब होत चालली आहे. कारण, या माध्यमांवर असलेल्या प्रत्येक स्वयंघोषित 'तज्ज्ञा'ला विरोध करायची क्षमता वैद्यकीय व्यवस्थेत नाही. आणि अशा माहितीमुळे होणारी उपचारांची धरसोड, एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणूनदेखील पाहवत नाही.
अर्थात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तशा यालादेखील आहेतच. प्रसूतितज्ज्ञ म्हणून मी जेव्हा काही गोष्टी बघते तेव्हा सोशल मिडियाचं एक महत्त्वाचं सत्कार्य पटकन डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे माध्यमांवरचे 'माता गट' (mommy groups). फेसबुकवर खास नवमातांसाठी म्हणून तयार झालेले हे गट बाईच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या काळात तिला आधार देताना मी बघितलेलं आहे. शहरी, सधन आणि विभक्त कुटुंबपद्धतीतल्या मातृत्वात इतका एकटेपणा असेल अशी कल्पनादेखील आधी डोक्यात येत नाही. घरात बाळ येणार म्हणजे सगळ्यांना, विशेषतः आईला आनंदच होणार हे गृहीत धरलेलं असतं. पण तसं खरंच असतं का? आपण बाळाला जन्म देतो तेव्हा आपण आयुष्यभराच्या एका काळजीलाही जन्म देत असतो. ही चिंता पहिल्या स्तनपानापासूनच सुरू होते. बाळाचं पोट भरतंय ना? त्याला पुरेसं दूध मिळतंय ना? त्याचं वजन योग्य गतीनं वाढतंय ना? या सगळ्या चिंता तर असतातच, पण आपलं बदललेलं शरीर; नऊ महिने स्रवलेल्या संप्रेरकांमध्ये अचानक झालेले बदल – या सगळ्यांमुळे कधीकधी नैराश्यदेखील येतं. कितीही सुखवस्तू घरात बाळंतपण झालं असलं तरी बाळ झाल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये आई आणि मूल हे संयुग एकाकीच असतं. अशा वेळी आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्या आपल्या परिघातल्या, देशातल्याच नव्हे तर अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या बायका आपल्या हातातल्या फोनमध्ये असण्याचा एक वेगळाच आधार असतो. या बायका क्लिनिकमध्ये येतात तेव्हा त्यांच्या बारीकबारीक चिंतांना उत्तरं द्यायला आम्हाला वेळ नसतो. आणि आमच्या दृष्टीनं त्या चिंता महत्त्वाच्याही नसतात. कामाच्या रेट्यात प्रत्येक पेशंटकडे सहानुभूतीनं बघणं शक्य होत नाही. मी स्वतः आई झाल्यावर, क्लिनिकमधली असलेली डॉक्टर 'मी' आणि माझ्या मुलीची आई असलेली 'मी' या दोन जगांमधला फरक मला प्रकर्षानं जाणवला. मीदेखील त्या काळात सोशल मिडियाकडेच वळले. समाजमाध्यमांमुळे स्तनपानाबद्दल भरपूर जनगागृती झाली. आणि अनेक देशांमध्ये मातृत्वासाठी म्हणून देण्यात येणाऱ्या पगारी रजेचा कालावधीदेखील अलीकडे वाढवण्यात आला आहे.
पण यातही बुचकळ्यात टाकणारी गोष्ट म्हणजे बाळानं जास्तीत जास्त स्तनपान करावं असा टोकाचा आग्रह धरणारी एखादी आईच लसीकरणाला विरोध करत असते. आणि हे वाचणारी एखादी रजा न मिळालेली बाई, आपल्या बाळाला आपण स्तनपान देऊ शकत नाही म्हणून जगाच्या एखाद्या कोपऱ्यात खंतावत असते. आपल्यासमोर येणारी ही महासागरासारखी माहिती आपण आपल्या कुवतीप्रमाणे आणि मानसिक स्थितीनुसार पचवत असतो. माहिती देणाऱ्या व्यक्तींचे पूर्वग्रहदेखील त्या माहितीला आकार देत असतात. त्यामुळे, मुद्देसूद आणि पूर्वग्रहविरहित माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे.
अलीकडेच आपण कोव्हिडच्या रूपात एक जागतिक संकट अनुभवलं. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणं हेच आजाराला निमंत्रण देणं ठरू लागलं त्या काळात आपल्याला सोशल मिडियानं तारून नेलं. या काळात सोशल मिडियामुळे, कोणत्या इस्पितळात जागा आहे, प्राणवायू कुठे उपलब्ध आहे अशा मोठ्यामोठ्या गोष्टींपासून, भाजी, वाणसामान अशा लहानलहान गोष्टींसाठीदेखील आपण सर्रास सोशल मिडिया वापरायला शिकलो. पण या अवलंबित्वाची पुढची पायरी, आज चार-पाच वर्षांनी आपण बघत आहोत. नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकणाऱ्या लहान मुलांपासून ते अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच सोशल मिडियाचं व्यसन लागलेलं बघायला मिळतं. आपल्या एका बोटाच्या टोकावर माहितीचा महासागर असला तरी त्यातलं काय खरं काय खोटं हे ठरवण्याचा विवेक आपल्याजवळ नाही. माणूस असण्याचा कितीही अभिमान बाळगला तरी शेवटी मानवाचा मेंदू ठरावीक प्रकारचं उत्तेजन मिळाल्यावर ठरावीक संप्रेरक सोडणारं एक यंत्रच आहे. त्या क्षमतेचा अतिवापर केला तर ते यंत्रही कोलमडून पडणार. आपले सतत किणकिणणारे फोन आपल्या मेंदूत डोपामिन या संप्रेरकाची निर्मिती करत असतात. डोपामिनमुळे आपल्याला क्षणिक आनंद अनुभवायला मिळतो. त्या संप्रेरकाचा परिणाम कमी झाल्यावर खिन्नताही तितक्याच तीव्रतेने जाणवते. आणि दिवसभरात सारखंच आपल्याला असं आनंदी वाटावं यासाठी मेंदू पुन्हापुन्हा फोनकडे वाळू लागतो. पण मेंदूत सतत चाललेल्या या चढाओढीमुळे 'कॉर्टिसॉल' हे चिंता आणि तणाव उत्पन्न करणारं संप्रेरकही अधिक प्रमाणात स्रवू लागतं. त्यामुळे घालमेल, चिंता, अवास्तव भीती अशा भावनादेखील वाढीस लागतात. कोचावर किंवा पलंगावर पडून आपण एक एक धावती चित्रफीत पुढे ढकलत असतो तेव्हा आपल्या मेंदूत एवढी उलाढाल होते आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.
PCOS (polycystic ovarian syndrome) हे स्त्रियांच्या अंडाशयाशी संबंधित असलेल्या अनेक व्याधींना एकत्रितपणे दिलेलं एक नाव आहे. वजनवाढ, अनियमित मासिक पाळी आणि गर्भ राहण्यास विलंब ही या व्याधीची उघडपणे दिसणारी/लक्षात येणारी काही लक्षणं. माझ्या क्लिनिकमध्ये येणारी PCOSची प्रत्येक पेशंट, रात्री उशिरापर्यंत फोनवर काही तरी बघत जागत बसते अशी कबुली पहिल्याच भेटीत देते. झोप नीट न झाल्यामुळे संप्रेरकांचं संतुलन बिघडतं. ते बिघडल्यामुळे वजन वाढतं. रात्री उशिरापर्यंत जागण्यानं पुरेसा व्यायाम मिळत नाही. आणि शारीरिक हालचाल आणि आहार यांतलं संतुलन बिघडल्यानं इन्सुलिन या संप्रेरकाच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड होतो. तरुणपणी या गोष्टी दुरुस्त केल्या नाहीत, तर चाळिशीनंतर मधुमेह, रक्तदाब अशा व्याधी हमखास जडतात. गंमत म्हणजे ज्या क्षणिक आनंदासाठी आपण तासंतास समाजमाध्यमांवर वेळ घालवतो, तसाच आनंद आपल्याला व्यायामातूनही मिळू शकतो. पण माणसाचा कल नेहमी कमीतकमी कष्टांत जास्तीत जास्त फायदा मिळवण्याकडे असतो. लहान वयातच अशा दुष्टचक्रात अडकलेल्या पेशंटना औषधांपेक्षा योग्य माहितीची गरज जास्त असते.
या सगळ्यावर उपाय काय? आपण याकडे नुसतं बघत बसावं आणि हळहळावं का? एखाद्या डॉक्टरनं आपल्या कामाची जाहिरात करायला समाजमाध्यमांचा आधार घ्यावा हे थोडं विचित्रच वाटतं. समाजमाध्यमं हा कलाकारांचा आणि अलीकडे ज्यांना 'इन्फ्लुएन्सर' म्हणतात त्यांचा प्रांत! डॉक्टरनं धीरगंभीर असावं. आपला चष्मा नाकावरून वर सरकवून विशेष न बोलता चिठ्ठी लिहून द्यावी. तरच औषधाला गुण येतो! पण मी आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींनी या साच्यातून बाहेर पडायचं ठरवलं. लोकांना योग्य माहिती देण्यापेक्षा अधिक प्रभावी कोणती जाहिरात असू शकेल? म्हणून आम्हीदेखील 'रील' करू लागलो.
चाळीशी आली!
अनेक डॉक्टर आहेत ज्यांच्या इन्स्टा प्रोफाइलवर योग्य माहिती मिळू शकते. व्हॉटसॅप किंवा फेसबुकवर ज्यांच्याकडे त्या विषयातलं शिक्षण किंवा पदवी नाही अशा लोकांचं ऐकण्यापेक्षा थेट डॉक्टरांचं ऐकावं! अर्थात, आम्हीदेखील माणसंच आहोत. त्यामुळे प्रसिद्धीच्या आहारी जाण्याचा धोका आम्हालाही असतोच. तरीही, काही आवर्जून बघण्यासारख्या इन्स्टा प्रोफाइल आहेत, ज्या जरूर बघाव्या.
आणि यापेक्षा सुरक्षित मार्ग म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल असलेले प्रश्न थेट क्लिनिकमध्ये जाऊन एखाद्या डॉक्टरलाच विचारावेत. वर्षातून एकदा आरोग्यचाचण्या कराव्यात. विशेषतः स्त्रियांनी आवर्जून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ आणि पैसा ठेवावा. नियमित व्यायाम करावा आणि सकस आहार घ्यावा. या गोष्टींना समाजमाध्यमांवर कोणतेही झटपट पर्याय नाहीत. हे मान्य केलं की चुकीच्या माहितीचा कोणताच धोका उद्भवणार नाही.
प्रतिक्रिया
फक्त समाज माध्यमच गैर समज पसरवत नाहीत.
१) कॅन्सर हा कधीच बरा होत नाही फक्त कॅन्सर ची लक्षण नष्ट होतात.
आणि त्या लक्षण सह कॅन्सर कधीही परत त्या व्यक्ती ल होवू शकतो.
हे डॉक्टर च लपवतात.
२) fb,व्हॉट्स ॲप सारख्या समाज मध्यामवर विश्वास ठेवणारे लोक एक वेळ परवडले पण.
टेस्ट रिपोर्ट सर्व प्रकारचे अगदी cbc पासून सर्व.
काही लोक गूगल वर त्याचा अर्थ चेक करतात .
अशी लोक.
आजारी पडल्यावर,शरीरात काही बदल झाल्यावर .
ही लक्षणं कोणत्या रोगाची आहेत हे गूगल वर सर्च करणारे.
हे महा अडाणी असतात.
आणि अशा गोष्टी सर्च केल्या की .
गूगल वरील वेब पेजेस अशी काही माहिती देतात .
ती सर्वसामान्य लोकांसाठी देने च चूक असते.
कारण त्या माहितीचा योग्य अर्थ त्यांना समजत नाही.
.
मग साधा ताप आला तरी मला कॅन्सर झाला असेल,tb झाली असेल अशा शंका त्यांच्या मनात निर्माण होतात.
अनेक लक्षणं पैकी ताप येणे हे लक्षण कॅन्सर सारख्या महाभयंकर शारीरिक बिघाड च पण आहे .
पण तापाच्या जोडीला अजून बाकी लक्षण पण लागतात.
ते सामान्य लोकांच्या डोक्याच्या बाहेर च असते.
वैधकिय व्यावसायिक डॉक्टर,आहार तज्ञ
ह्यांचे अनेक मुलाखती, व्हिडिओ .
यू ट्यूब ,fb वर आहेत.
वजन कमी करायचे असेल तर .
तुम्ही आहारातून घेतलेल्या कॅलरीज आणि तुम्ही शारीरिक हालचाली मधून खर्च केलेल्या कॅलरीज .
ह्याचे गणित सांगतात.
पण वजन वाढणे हे फक्त ह्या एकाच गोष्टी वर अवलंबून नाही.
आणि त्यांनी दिलेली माहिती साफ चुकीची असते,पण त्यांची काय मजबुरी असते arthvat माहिती देण्यात ते त्यांनाच माहीत.
आणि असे व्हिडिओ बघून सामान्य लोक मग .
उपास,हा पदार्थ खाणे सोड, हा ज्यूस पी .अशा चुकीच्या चक्रात अडकतो.
मस्त योग्य पारंपरिक आहार घेणाऱ्या व्यक्ती कडून
हानिकारक आहार पद्धत अवलंबली जाते.
चुकीचा आहार घेतला जातो.
शरीर नाही म्हणत असते तरी हा ट्रेडमिल वर धावायचे थांबत नाही .
कारण कॅलरीज जास्त खर्च करायच्या आहेत आपण सकाळी दोन समोसे खाल्ले आहेत असा चुकीचा गैरसमज त्याचा करून दिलेला असतो.
आणि मग जातो .
टाटा ,by by करत.
पण अशा विषयावर मते चर्चा टाळली जाते.
पळवाट काढून मूळ कारणानं लपवले जाते.
मानवी शरीर हे अति अती उत्तम दर्जा च जैविक मशीन आहे.
मानवी शरीराकडे प्रत्येक गोष्टी चे उत्तर आहे.
काय घ्यायचे ,किती वापरायचे किती कचऱ्यात टाकायचे .
ही सर्व काम ते उत्तम रित्या करते.
जो पर्यंत मानवी शरीरात कोणताच बिघाड नसतो तो पर्यंत.
कोणत्या व्हिटॅमिन ची कमी आहे कोणते जास्त आहे.
प्रोटीन च खरेच गरज आहे का?
सर्व सर्व काही निरोगी शरीर योग्य रीत्या ठरवते.
माणसाने त्या मध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही
राजेशभाऊ
राजेशभाऊ
" १) कॅन्सर हा कधीच बरा होत नाही फक्त कॅन्सर ची लक्षण नष्ट होतात.
आणि त्या लक्षण सह कॅन्सर कधीही परत त्या व्यक्ती ल होवू शकतो.
हे डॉक्टर च लपवतात.
२) fb,व्हॉट्स ॲप सारख्या समाज मध्यामवर विश्वास ठेवणारे लोक एक वेळ परवडले पण.
टेस्ट रिपोर्ट सर्व प्रकारचे अगदी cbc पासून सर्व.
काही लोक गूगल वर त्याचा अर्थ चेक करतात ."
यात तुम्हाला नक्की काय म्हणायच आहे ?
सर्व स्तरातील लोक माहिती कशी लपवतात
पूर्ण सत्य माहिती लपवून ठराविक माहिती देने .ही वृत्ती.
ही ठराविक दिलेली माहिती शास्त्रीय दृष्टी ने योग्य च असते कायद्यात पण बसते .
पण ती माहिती म्हणजे पूर्ण सत्य नसते.
स्वार्थ,बचाव सर्व गोष्टी च विचार करून व्यवसायिक विचार व्यक्त करतात .
हे मला म्हणायचे आहे
हे मला सांगायचंय होत
मी शाळेत होतो तेव्हा .
अगदी नक्की आठवत नाही पण पहिली ते पाचवी सहावी पर्यंत च्या मुलांना शाळेत इंजेक्शन दिली जात.
मी ग्रामीण भागात राहत होतो शाळा zp ची ग्रामीण भागातील.
अचानक डॉक्टर यायचे आणि मुलांना इंजेक्शन दिली जायची .
अगोदर सांगितले जायचे नाही.
कारण अगोदर सांगितले तर पोर शाळेत च येणार नाहीत.
ती इंजेक्शन म्हणजे लस होती की आणि काय मला माहीत नाही ,पालकांना माहीत असणे शक्य च नाही.
पण लस च असावी.
तेव्हाचे भारत सरकार किती विज्ञान वादी होते हे मात्र आता जाणवत आहे.
१९८० च्या आसपास च काळ
देवी?
देवी?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नक्की सांगता येणार नाही
रेबीज,टायफाईड, धनुर्वात ह्यांच्या लसी तेव्हाचे सरकार शाळेत च मुलांना देत असावे.
कारण पहिली ते सहावी पर्यंत तीनचार वेळा तरी इंजेक्शन दिली जायची असे अंधुक आठवत आहे.
अतिशय महत्वाचा आणि चांगला लेख
अतिशय महत्वाचा आणि चांगला लेख.
लेख आवडला.
हे खूप महत्वाचे आहे. यावर काहीतरी कायदेशीर केले पाहिजे. युट्युबर भोंदू लोकं भरपूर आहेत (बाकी ठिकाणीही असतील) जे "आयुर्वेद", "प्राचीन", "निसर्गोपचार", "आजीचा बटवा' या नावाखाली काही बाही माहिती देत असतात. पण ती कितपत खरी असेल याची खात्री देता येत नाही. तंज्ञांमधले मतभेद एकवेळ स्विकारार्ह असतील पण इतरांचे दावे कोण तपासणार.
मी एक्स, इन्स्टा आणि फेसबूकवर नाही वापरत पण यूट्युब पहातो. खास करून वैद्यकीय क्षेत्रातल्या माहितीसाठी.
The Anatomy Lab हे माझे आवडते चॅनल आहे.
मागे टेनीस एल्बो सारखी दुखापत झाली तेव्हा माझ्या बहिणीने रिहॅब साठी तिच्या क्षेत्रातल्या तज्ञांचे हे दोन चॅनल सुचविले होते. Rehab Science
आणि Squat University (हा मीराबाई चानूचा फिजिओ ट्रेनर होता. तो खूप चांगल्या टिप्स देतो खास करून व्यायाम करताना दुखापत टाळण्यासाठी.)
आउट लिव्ह वाचून झाल्यावर आजकाल अधनं मधनं पीटर आटीयाचा चॅनल पहातो. पण या चॅनलवर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांच्या खूप मोठमोठ्या मुलाखती असतात. तेवढा वेळ तर नसतो पहायला वा ऐकायला. पण २-३ मिनिटांच्या क्लिप्स आवर्जून पहातो. अलिकडेच पादत्राणांविषयीच्या "झीरो ड्रॉप", "वाईड टो बॉक्स" या नवीन संज्ञा याच चॅनलवरून कळल्या.
.
पीटर आटियामुळे आठवण झाली. काही वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ७-८ - बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करत असताना मी या 'लो कार्बीन्ग' कळपातल्या बऱ्याच डॉक्टरांची पुस्तकं वाचली होती आणि त्यांचे युट्यूब चॅनेल बघितले होते. त्यापैकी एक रॉबर्ट लस्टिग, जे लो कार्बर नाहीत पण त्यांचा साखरेवर बराच अभ्यास आहे. त्यांची व्याख्यानं खूप चांगली आहेत. त्यांचं एक फॅट चान्स नावाचं पुस्तक आहे तेही सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या (पण सुलभीकरण न करता लिहिलेल्या) भाषेत आहेत. या माहितीचा गेली दहा एक वर्षं डायबेटीस न होऊ देण्यासाठी फार उपयोग झाला. नाहीतर कुटुंबातली अनुवंशिकता बघता एव्हाना मला नक्कीच झाला असता.
फॅट चान्स
फॅट चान्स सुचविल्याबद्धल धन्यवाद!
पेशीचे चयापचय (माइटोकॉन्ड्रियाची हेल्थ), इन्शुलिन रेझिस्टन्स आणि लिपिड प्रोफाईल अॅग्रेसिव्हली रेंज मध्ये ठेवायचा उद्देश आहे.
दोन वर्षापूर्वी मी प्री डायाबिटीक नव्हतो. सणासुदीचे दिवस वगळता मी अॅडेड शुगर, अल्ट्रा प्रोसेस्ड फुडही शक्यततो टाळले. कार्डीओ आणि रेझिस्टन्स एक्सरसाईज पण नियमत करत होतो. तरीही मागच्या महिन्यात माझं एचबी१एसी ५.५ वरून वाढून ५.८ वर गेले. पण बाकी सगळे नॉर्मल आहे.
माझं कदाचित इतकेच चुकले असेल की, मी गेली दोन वर्ष सणासुदीचा काळ वगळता, भले अॅडेड शुगर खाल्ली नसेल पण बर्याच वेळा (विकडेज मध्ये) ओव्हरनाईट ओट्स सकाळच्या नाश्तासाठी खाल्ले (कारण ही डीश मी स्वत: बनवायला शिकलो ) आणि त्यात खजूर, मनुके, इतर फळं आणि नट्स टाकून ती अक्षरश: स्वीट डिश बनवली. ओट्स मुळे साखर वाढते हे माहीत होते. पण नक्कीच तेच कारण असेल का ते माहीत नाही. सीजीएम उपकरण बाजारात मिळते. अर्थात त्या ग्लुकोज स्पाईकचे इंटरप्रिटेशनची चुकण्याचीही शक्यता असते. तरीही मला ते वापरून बघायचे आहे. आईस्क्रीम, स्वीट डीश खाण्याची क्रेव्हींग झाली तर कुठल्यावेळेला, कशाच्या नंतर खाल्ली तर साखरेची पातळी फारशी वाढणार नाही हे जाणून घ्यायला आवडेल. इथे कुणी सीजीएम वापरले असेल तर अनुभव वाचायला आवडतील.
कुतूहल
असे आकडे वाढलेले दिसले की माझी पहिली प्रतिक्रिया 'आता आपलं वय झालं' अशी असते. मला म्हातारपण, वय होणं याबद्दल फार काही भीती (अजून तरी) वाटत नाही. पण हे नॉर्मल नाही, हे आजवरच्या दोन-तीन अनुभवांतून कळलं तरी वळत नाहीये.
तुमच्या प्रतिक्रियेचा हाही एक फायदा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
तशी वाढत्या वयाची भीती मलाही आताशी वाटत नाही. साठ सत्तरी नंतर कधीतरी आयुष्य संपून जाईल. हीच माझी कालपर्यंत "बेस केस" होती. त्याच्यापुढचे आयुष्य हे बोनस, अशीच माझी धारणा होती. त्यामुळे वयाच्या सत्तरीत वॉशरूमचा दरवाजा उघडता येत नाही (उसंतसखू यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे) म्हणून वयाच्या सत्तरीत पर्यटनाला मर्यादा आली तर त्याचे मला आश्चर्य वाटले नसते. पण आउटलीव्ह या पुस्तकाने दृष्टीकोन बदलला. त्याने तर नव्वदीत काय करता येईल याची यादी दिली आहे. आणि तेवढे दीर्घ आयुष्य (लाइफस्पॅन) अगदी मनमुरादपणे आनंदाने (हेल्थस्पॅन) जगायचे असेल तर काही गोष्टी या आजपासूनच करायला हव्यात. उत्तम खाणं, व्यायाम आणि चांगली झोप हे तर झालेच पण त्याने त्याने जे ट्रायग्लिसराईड, एलडीएल, एपोबी, एचबीएवनसी, व्हीओटू मॅक्स याचीची रेंज दिली आहे ती फारच अॅग्रेसीव्ह आहे. हे ही आहेच म्हणा, येवढे सगळे करून लाइफस्पॅन आणि हेल्थस्पॅन उत्तमच राहील याची खात्री नाही पण निदान शक्यता मात्र वाढतील.
उत्तम लेख
असा अतिशय समयोचित लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन. व्हॉट्सऍप विद्यापीठाची या विषयातली डॉक्टरेट मिळालेले अनेक जण माझ्याही नात्यात-परिचयात आहेत. त्या सर्वांना हा लेख पाठवत आहे. या विषयावर लिहीत रहा. काही जीव तरी वाचतील.
डॉक्टरांचं आणि वकिलांचं किती
डॉक्टरांचं आणि वकिलांचं किती ऐकायचं हे आपणच ठरवायचं असतं अगोदर.
नाहीतर पैसेही जातात आणि परिणाम काहीच दिसत नाही. उलट आणखी बिघडवून ठेवतात. मीही कोरोना लसी विरुध्द होतो आणि ऐसीचा जोकोविच हे नावही तेव्हा घेतलं होतं. जे काही ठरवलं असेल त्याशी ठाम राहावं. पण इतरांनी तसंच करावं असा धोशा नाही लावत. आपले अनुभव आपल्यापाशी.