सेक्स, ड्रग्ज आणि हॉर्मोन्स

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ललित #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

सेक्स, ड्रग्ज आणि हॉर्मोन्स
- रुची

तीन दरवाजे धाडधाड आपटून तीन माणसं तीन दिशांनी गेली. रियाच्या खोलीचा दरवाजा क्रमांक एक "तू जगातली सगळ्यात क्रूर आई आहेस" अशा टिप्पणीसह त्वेषाने आदळला गेला. रेवाच्या खोलीचा दरवाजा क्रमांक दोन "माझ्याशी या आवाजात बोललीस तर खबरदार, माझा क्रूरपणा तू अजून पाहिलेला नाहीयेस" अशा ताकीदीसोबत क्रोधाने आपटला गेला. बाहेरचा दरवाजा क्रमांक तीन जोराने ओढल्याखेरीज बंद होत नसल्याने "मी जरा हार्डवेअर स्टोअरला जाऊन येतो" अशा सर्वसाधारण माहितीसह रियाच्या बाबाने नाईलाजाने दरवाजा जोरात ओढून घेतला. अशा शाब्दिक चकमकींनंतर रियाच्या बाबाला त्याच्या मानसिक शांततेसाठी हार्डवेअर स्टोअरना भेट देणं अत्यावश्यक असतं; त्यामुळे गेल्या महिन्याभरात त्या स्टोअरमध्ये काम करणाऱ्या लोकांना हा आपलाच सहकर्मचारी आहे असं वाटायला लागलं होतं.

या चकमकीचं तात्कालिक होतं कारण रियाला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेरगावी जायची परवानगी रेवाने नाकारणं. वास्तविक रियाने सावधगिरीने पावलं उचलून आधीच बाबाला विश्वासात घेतलं होतं; सगळे खेळीमेळीत असताना आणि रेवाच्या हातात बोर्दोचा दुसरा ग्लास आल्यावर मगच अगदी गोड आवाजात रेवाला तिने या ट्रिपबद्दल सांगितलं. त्यावर रेवाचं उत्तर रुक्षपणे 'मी विचार करून सांगते' असं होतं.

"पण आई प्लीज, मला आजच रॉबिनला सांगायला लागेल. ते आज बुकिंग करणार आहे."
"हे 'ते' म्हणजे आदरार्थी एकवचनी की अनेकवचनी आहे? आयदर वे, वाक्य चुकीचं आहे. 'बुकिंग करणार आहेत' असं असायला हवं."
"आई, प्लीज आता परत ते सुरू करू नकोस, तुला माहिती आहे रॉबिन नॉन-बायनरी आहे म्हणून 'ते बुकिंग करणार आहे' हेच बरोबर आहे."
"हे साफ चुकीचं वाक्य आहे, उगीच तुमच्या थेरांपायी भाषेशी खेळ करू नका."
"थेरं? जेंडर आयडेंटिटी म्हणजे थेरं?"
"नव्हे, भाषेची वाट लावणं म्हणजे थेरं"
"तू किती ट्रान्सफोबिक आहेस आई! मला लाज वाटते तुझी!"
"चुकलीस, तू बायफोबिक म्हणायला हवं होतंस, निदान स्वतःतरी योग्य संज्ञा वापर."
"योग्य संज्ञा आहे 'स्वार्थी'! आपल्या संकुचित जगाबाहेर कुणाचं काय जळतंय याच्याशी तुला देणंघेणंच नाही."
"आणि आपल्या सुरक्षित बेटापलीकडं काय चाललंय याची फिकीर तरी आहे का तुला? इथे स्त्रियांचे गर्भपाताचे हक्क जायची वेळ आलीय आणि तुम्ही ते-त्या-ती करत बसलाय."
"पण तुला तर मी जन्मभर कुमारिकाच राहायला हवीय; मग कशाला पाहिजेत गर्भपाताचे हक्क? ढोंगी!"
"मला स्वार्थी, ढोंगी म्हण.. आणि वर माझी परवानगीही माग! आणि परवानगी तरी कशाला.. तर तिथे जाऊन गांजा ओढत बसायला? विसर ती ट्रिप आणि मुकाट घरी बैस."

दरवाजा आपटून खोलीत आल्यावर लगेचच भावनेच्या भरात आपण केलेली घोडचूक रेवाच्या लक्ष्यात आली. गांजाचा उल्लेख केल्याने हेरगिरीचा एक सामान्य नियम तिने मूर्खासारखा मोडला होता. आता रियाला आपण तिच्यावर पाळत ठेवतोय हे समजणार आणि मग ती सावध होणारच.

साधारण एक वर्षापूर्वी रियावर कडक जालीय पाळत ठेवणं रेवाला गरजेचं वाटायला लागलं होतं. त्याआधी कधी रियाचा लॅपटॉप वापरायची वेळ आली तर ती फार आढेवेढे न घेता देत असे; त्यावर तिची ब्राउजिंग हिस्टरी शाबूत असे. गूगल सर्चवर आधीचे सर्चेस पाहिले तर त्यात काही लपवालपवी नसे. वय वर्षं चारपासून वेडीवाकडी, मिळतील ती, पुस्तकं, मासिकं किंवा कोणत्याही प्रकारचं छापील वाचन करण्याची आणि शंकानिरसनासाठी जालाचा उपयोग करण्याची घरात मुभा असल्याने रियाला बरेच प्रश्न पडत.

"स्नॉग म्हणजे काय?"
"Alkaptonuria आजार कशामुळे होतो?"
"69 म्हणजे काय?
"LSD म्हणजे काय?"
"Synecdoche चा उच्चार कसा करायचा?"
"शॅग म्हणजे काय?
'Opprobrious' म्हणजे काय?
'Rannygazoo' म्हणजे काय?

वगैरे शोध पाहिले की रेवाला खरं तर जरा दिलासा मिळायचा. यातल्या अनेक शब्दांचे अर्थ पोरीला अजून माहीत नाहीत म्हणून दिलासा आणि काही शब्दांचे अर्थ ती शोधते आहे म्हणजे काहीतरी महत्त्वाचं किंवा काहीतरी ब्रिटिश वाचते आहे याचा खुलासा. हे सगळं रियाच्या वयाला साजेसंही होतं.

मग अचानक ब्राउजिंग हिस्टरी गायब झाली. आई खोलीत आल्याआल्या फोन लपवणं किंवा उघडलेली विंडो तातडीने बंद करणं वगैरे प्रकार सुरू झाले. तिने कुठं तरी ठेवलेला फोन रेवाने उचलून आणून दिला तरी रियाच्या चेहेऱ्यावर त्रस्त भाव दिसायला लागले. रेवाने असली सोंगं स्वतःच्या लहानपणी खूप केलेली असल्याने या सगळ्याचा गूढार्थ 'आता मुलीकडे आपल्यापासून लपवण्यासारख्या गोष्टी आहेत' असा तिला कळला. तशातच एकदा रिया फोन सोडून गेली असता तिच्या मैत्रिणीचा मेसेज फोनवर झळकला.

"मला प्लॅन 'बी'ची तातडीने गरज आहे, मला भीती वाटतेय".

प्लॅन 'बी'? रेवा चांगलीच सटपटली आणि तिने तातडीने नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातली. त्याचं पितृहृदय मात्र फारच निरागस निघालं. "त्या काहीतरी वेगळ्याच प्लॅन 'ए' आणि 'बी' बद्दल बोलत असतील, आपली मुलगी शहाणी आहे. तू उगीच संशयी आहेस, तिचे मेसेजेस काय चोरून वाचतेस?" असं बोलून त्वरित तो 'तिला जरा मोकळीक दे' या ध्रुवपद क्रमांक ५वर आला.

रेवाच्या तिच्या नवऱ्याशी होणाऱ्या सर्व चर्चा त्याच्या ध्रुवपदावर येऊन थांबत असत किंवा तो ध्रुवपदावर येताक्षणी आता त्याही चर्चा करण्याची मर्यादित क्षमता संपली आहे, असं तिच्या लक्ष्यात येई. तिने या विस्तारित ध्रुवपदांची एक सविस्तर यादी तयार केली होती -

विषय बदलायचा असल्यास ।।ध्रु १।। लाईट बंद कर.
विषय टाळायचा असल्यास ।।ध्रु २।। माझा फोन कुठे आहे?
विषय संपवायचा असल्यास ।।ध्रु ३।। रिमोट कुठे आहे?
शाब्दिक चकमकी टाळायच्या असल्यास ।।ध्रु ४।। मी बोलतो तिच्याशी.
पितृहृदय द्रवले असल्यास ।।ध्रु५।। तिला जरा मोकळीक दे.
झोपायची वेळ झाली असल्यास ।।ध्रु६।। कायम चूर्ण कुठे आहे?

त्याने त्यांपैकी कोणतंही वाक्य उच्चारलं की तिचा फ्यूज उडत असे आणि त्यानंतरच्या एकतर्फी आरडाओरड्यानंतर नवरा मुकाट्याने हार्डवेअर स्टोअरची वाट धरत असे.

नवरा ही बाब सिरियसली घेणार नाही याची खात्री पटल्यावर रेवाने स्वतःच यावर तोडगा शोधायचं ठरवलं. 'हाऊ टू स्पाय ऑन योर किड्स ऑनलाईन' असे सर्चेस वगैरे केल्यावर तिच्या लक्ष्यात आलं, की या समस्येसाठी बरंच मोठं मार्केट असल्याने त्यासाठी अनेक प्रकारचे तोडगे बाजारात उपलब्ध आहेत. तिने त्यातलं एक स्पायवेअर ऑफिसातल्या पोरसवद्या आयटी मॅनेजरच्या सल्ल्याने रियाच्या लॅपटॉपवर चढवलं. आठ-पंधरा दिवसांतच तिला रियाच्या सर्व ऑनलाईन वावराची कल्पना आली. तरीही आपण तिच्यावर पाळत ठेवतो आहोत याचा रियाला संशय येऊ नये याची तिने काळजी घेतली होती; पण आज मात्र तिचा तोल सुटला आणि आता आपल्याला आपली स्पायिंग स्ट्रॅटेजी बदलावी लागणार हे तिच्या लक्ष्यात आलं.

दरवाजे आपटाआपटीनंतर थोडा विचार करता रिया आईच्या शेवटच्या वाक्याने जरा बुचकळ्यात पडली. 'गांजा ओढत बसायला' म्हणजे? रिया तशी बऱ्यापैकी शहाण्यासारखी वागायची आणि तिच्या मैत्रिणी तर तिला 'गुणी बाळ' म्हणायच्या. गांजा तर दूरच पण क्वचित वाईनचा एखादा घोट वगळता ती कधी तोल सोडून वागली नव्हती. हे मात्र खरं होतं की या येऊ घातलेल्या ट्रिपमध्ये रॉबिन 'ग्रास' आणणार असल्याची चर्चा त्यांच्या ग्रूपवर होती. पण आईला याचा सुगावा कसा लागला? ती फोनवर तर कोणाशी काही बोलली नव्हती आणि तिचा चॅटग्रूप वगळता कोणाला काही खबरबात नव्हती. बरं... काही संबंध नसताना आईनं इतका नेमका आरोप कसा केला? मग काय आई आता तिचे मेसेजेस चोरून वाचायला लागली? रियाने आधी तातडीने आपले सगळे पासवर्ड्स बदलून टाकले पण तरी तिला स्वस्थ बसवेना. तिने बाबाच्या लॅपटॉपवरून 'Am I being monitored by my parents online?' असा सर्च केला आणि थोडी खोदाखोदी केल्यावर तिला तिच्या लॅपटॉपवर असलेल्या स्पायवेयरचा छडा लागला. रिया आता चांगलीच संतापली; तिचा बाबा असल्या काही अनैतिक चाली वापरणार नाही याची तिला खात्री असल्याने साहजिकच तिच्या तिरस्काराचा केंद्रबिंदू रेवा होती.

आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आईची चाल तिच्यावरच उलटवून तिला धडा शिकवायची रियाला सुरसुरी आली. खून का बदला खून से! माझ्यावर पाळत ठेवते काय! आता तिला कळणारच नाही की तिच्या ईमेल्स कोण चोरून वाचतंय आणि तिच्यावर कोण पाळत ठेवतंय! मग रियाने आपल्या बदल्यासाठी आईच्या ऑनलाईन सर्चेसवर पाळत ठेवायची, तिच्या कॅलेंडरवरच्या अपॉइंटमेंट्स बदलून टाकायच्या आणि महत्त्वाच्या ईमेल्स डिलीट करायच्या असा तपशीलवार, कावेबाज प्लॅन बनवला. हे सगळं करायला तिला आईसारखी काही विशेष धडपडही करावी लागणार नव्हती. आई कावेबाज असली, तरी तिच्या पिढीप्रमाणे टेक्नोमंद असल्याची तिला खात्री होती. त्यामुळे आईचा फोन अनलॉक असताना ताब्यात घ्यायचा आणि त्यावर फेशियल रेकग्निशन सेटिंगमध्ये जाऊन अल्टर्नेट अपियरन्स बनवायचा एवढंच तिला करायला लागणार होतं! रियाला आपल्याच हुशारीचं कौतुक वाटलं. खरं तर अशी चतुराई तिच्याकडे आहे हे आईला कळलं असतं, तर तिलाही आपल्या हुशारीचं कौतुक वाटलं असतं अशी शक्यता रियाच्या मनाला चाटून गेली. आईकडून पाठीवर थाप मिळणं हे तिच्यावर कुरघोडी केल्याशिवाय 'मुश्किलही नही.. बल्कि नामुमकीन है!' हे तिला माहीत होतं.

आईच्या ईमेल्सतर रियासाठी अपेक्षितपणे अतिशय बोरिंग होत्या. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट्स वगैरे कागदपत्रं, डॉक्टरच्या अपॉइंटमेंट्स, गाडीचं सर्व्हिसिंग, कोणा नातेवाईकाने पाठवलेला मुलाचा सीव्ही वगैरे, वगैरे... या बाईला काही आयुष्य आहे की नाही असा प्रश्न पडावा इतक्या बोरिंग ईमेल्स! आता यातलं डिलिट काय करायचं? अपॉइंटमेंट्स म्हणायच्या तर डॉक्टरच्या नाही तर कार सर्विसिंगच्या! त्या विसरल्या, तर ते लोक टेक्स्ट, फोन नाना प्रकारांनी आठवण करून देतात हे तिला ठाऊक होतं. खरं तर अशी वारंवार आठवण करून दिल्याशिवाय आई कोणत्याच अपॉइंटमेंटला वेळेवर जात नाही हेही तिला आई-बाबाच्या वेळोवेळी पेटणाऱ्या भडक्यातून कळलं होतं. तिला आता आपल्या कावेबाज प्लॅनमधल्या त्रुटी दिसायला लागल्या.

रियाने सहज एका पेमेंट रिसीटवर माउस क्लिक केला, ३७८ डॉलरचा स्पीडिंग फाईन भरल्याची रिसीट होती ती! रिया चांगलीच बुचकळ्यात पडली; आईला स्पीडींग फाईन? आणि तो देखील इतका भरभक्कम? मी गाडी चालवताना सिग्नल करायला जऽऽरासा उशीर झाला तरी जी किंचाळते, आणि जी स्वत: गाडी चालवत असताना सायकलीसुद्धा ओव्हरटेक करून पुढे जातात, तिला ८० किमीच्या रस्त्यावर १६५ किमीने जातानाचा दंड? रियाचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपली आई काय स्वतःला जेम्स बॉण्ड समजते की काय किंवा एखाद्या हेरासारखं दुहेरी आयुष्य जगते की काय असं तिला वाटायला लागलं आणि जरा मजा यायला लागली. तेवढ्यात तिचं लक्ष्य एका रिकव्हरी ईमेलकडे गेलं.

"We have received a request to reset the password to the account associated with MonaDarling4U@gmail.com.
मोना डार्लिंग फॉर यू? सिरियसली? आईचा फेक ईमेल अकाउंट आहे? तोही असल्या स्लटी नावाचा? रिया चांगलीच बुचकळ्यात पडली आणि या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे हे तिच्या लक्ष्यात आलं.

पासवर्ड रिसेट केला आहे म्हणजे नेहमीप्रमाणे आई तो विसरली आहे, आणि विसरली आहे म्हणजे तिने तो कुठेतरी लिहून ठेवला आहे याची तिला खात्री पटली. आईच्या वारंवार बिघडणाऱ्या मनःस्थितीला 'अपर केस', 'लोअर केस', 'एकतरी अंक', 'एक स्पेशल कॅरॅक्टर', 'किमान १२ अद्याक्षरं' असले येडझवे पासवर्ड्सच जबाबदार आहेत असं ती स्वतःच ओरडून सांगत असे. "साले हरामखोर लोक! हे पासवर्ड्स बनवायला आणि लक्ष्यात ठेवायला एक माणूस कामावर ठेवला पाहिजे!" हे तिचं आवडतं ध्रुवपद होतं. तिची 'फ'ची बाराखडी सुरू झाली, की बिचारा बाबा "मग लिहून का ठेवत नाहीस कुठेतरी?" अशी मुळमुळीत सूचना करायचा. मग ते कुठे लिहून ठेवलंय ते कसं लक्ष्यात ठेवायचं यावरून आईची शाब्दिक मारामारी सुरू व्हायची. अनेकदा तिने फोनवर पाहून भरलेले पासवर्डही काम करत नसत. "हे शून्य आहे की 'ओ' हे कसं समजायचं हरामखोरांनो..." वगैरे हाणामाऱ्या मग सुरू होत आणि मग अपरिहार्यपणे पासवर्ड रिसेट! साहजिकच तिने पासवर्ड शोधायची सुरुवात आईच्या फोनवरून केली. MonaDarling असा सर्च केल्यावर काही आलं नाही म्हणून मग तिने Mon असा सर्च केला तर Monica Darlington नावाची नोंद तिला आईच्या अ‍ॅड्रेस लिस्टमध्ये सापडली. क्लेव्हर... व्हेरी क्लेव्हर! पण तरी मला सापडलीसच आई!

रियाने आईचा गुप्त ईमेल उघडताना सर्व प्रकारची दक्षता घेतली. आईच्या मुख्य ईमेलवर आलेली 'sign in from a new device' ईमेल उडवून टाकली आणि 'Remember this device'साठी स्वतःचा लॅपटॉप घालून टाकला. आई आपल्यासाठीच्या स्पायवेअरवर डोळा ठेवते म्हणजे असल्या ईमेल्सही वाचत असणार. संशयी स्वभाव आहे तिचा; त्यामुळे काळजी घेतलेली बरी.

रियाला आता या सगळ्या प्रकाराबद्दल अतिशय कुतूहल वाटायला लागलं होतं आणि आपल्या महाबोरिंग आईकडेही लपवण्यासारख्या काही काही गोष्टी आहेत हे समजल्याने धक्काही बसला होता. इनबॉक्स उघडल्यावर तिच्या लक्ष्यात आलं, की अनेक ईमेल्स आईला कोणत्या ना कोणत्या फोरमवरून बॅन करणाऱ्या किंवा काही चेतावणी किंवा नोटीस देणाऱ्या होत्या. म्हणजे आई इंटरनेट ट्रोल आहे? आई मध्यमवर्गीय साळसूद असल्याचं ढोंग वठवत असली तरी तिला ट्रोल म्हणून पाहणं रियासाठी फार अवघड नव्हतं. खरं तर बरेचदा आपल्याशी तिचं वागणं हेदेखील ट्रोलिंगच असावं अशी तिला शंका येत असे. पण तरी असं फेक अकाउंट काढून सरळसरळ कुठेही ट्रोलिंग करणं म्हणजे फारच होतं.

मग रियाला 'स्ट्रिंगर बेल' नावाकडून आलेल्या अनेक ईमेल्स दिसायला लागल्या. बाकी सगळं ठीक आहे म्हटलं तरी बाबाला फसवून आई कोण्या परपुरुषाशी मेलामेली करते आहे हे रियाच्या पचनी पडणं अवघड होतं. रियाचं डोकं आता गरगरायला लागलं, स्ट्रिंगरची पहिली ईमेल उघडताना तिला जरा धडधडायलाही लागलं पण तिने हिय्या करून ईमेल उघडली.

स्ट्रिंगर –
'मला विनासायास खात्रीचा माल घरपोच आणून देणारा डीलर शोधायाचा आहे पण अशा चवकश्या कोणाकडे करायच्या याची मला आता प्रॅक्टिस राहिली नाहीय. अवास्तव जगाचं म्हणशील तर जे चाललंय ते अवास्तव आणि चमत्कृतिपूर्ण आहे हे समजायलाच एवढा वेळ लागतो आपल्याला आणि अशा आलेल्या भानालाच आपण विज्डम म्हणतो. But I certainly didn't know that wisdom hurts!'

त्याच्याखाली आईची मेल.

मोना डार्लिंग –
'मॅजिक मश्रूममुळे मेंदूतल्या न्यूरॉन्सचं जाळं पुन्हा बांधलं जातं आणि मनःशांती मिळते म्हणे! आता मी तीन महिन्यांपासून मायक्रोडोसिंग करते आहे, तर आतापर्यंत माझा मेंदू नीट रीवायर व्हायला हवा होता ना? माझ्या सर्व तत्कालीन मानसिक समस्या गायब व्हायला हव्या होत्या ना? पण नाही. काल डोस घेतल्यावर टीव्ही चालू केला तर एकदम साक्षात्कार झाला की सालं सध्याचं वास्तवच इतकं भयंकर चमत्कृतिपूर्ण आहे, की मायक्रोडोसिंग केल्यावरही जे दिसतं तेही अवास्तव वाटेनासं होतं. मग कसा मिळणार उतारा? उतारा म्हणून आता मला पूर्ण मश्रूमचाच चहा करून प्यायला लागणार आहे. त्यानेही शांत नाही वाटलं तर मग शुद्ध एल.एस.डी.! होऊ दे खर्च! आता मी काय वाट्टेल ते बोडक्यात घालून मनःशांती मिळवल्याशिवाय राहणार नाहीय. स्ट्रिंगर, आपण तरुण असताना तुला वाटलं होतं का, की आपण अशा अवास्तव जगात राहू?'


Stringer Bell, Bindu & ...

गुड गॉड! हा काय प्रकार आहे? आई मायक्रोडोसिंग करते? आधी स्पीडींग तिकिटं काय, ट्रोलिंग काय, हा स्ट्रिंगर काय, आणि आता थेट ड्रग्ज? रियाच्या हाताला कंप सुटला. अशा अधल्यामधल्या ईमेल्स उघडून चालणार नव्हतं आता. आईने स्ट्रिंगरला पूर्वीपासून पाठवलेल्या ईमेल्स तिला पाहाव्या लागणार होत्या. तेवढ्यात बाबाचा जिन्यावरून चढून आल्याचा आवाज आला. रियाने घाईघाईने आईचा मेल अकाउंट बंद केला पण तिच्या डोक्यातली चक्रं चालूच राहिली. आईला पासवर्ड्सपायी असा काय मनस्ताप होतोय की तिने थेट ड्रग्जच्या आहारी जावं? तिच्या मुख्य इमेलवर अनेक मेडिकल अपॉइंटमेंट असलेल्या रियाला दिसल्या होत्या पण तिने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष्य केलं होतं पण आता मात्र तिच्या डोक्यात शंकेचा किडा वळवळायला लागला. आई आजारी तर नाही ना? एका आठवड्यापूर्वी आई कोणत्यातरी तपासणीसाठी जाणार असल्याचं म्हणाली होती त्यादरम्यानच्या काही ईमेल्स तिने तपासायच्या ठरवल्या. दुसऱ्या दिवशी आईबाबा आजूबाजूला नाहीत याची खात्री केल्यावर तिनं आईची मेल पुन्हा उघडून आठवड्यापूर्वी पाठवलेल्या मेल्स तपासायला सुरुवात केली.

मोना डार्लिंग –
'मला भयाण वैताग आला आहे आता या चाचण्यांवर चाचण्यांचा! हे झालं, की आता ते तपासा आणि तिकडे ते सँपल्स पाठवा. तुला सांगते, काही दुखलं म्हणून सांगायची सोय राहिली नाहीय. गेलं, की आधी तुमचं वय काय, मग तुम्ही काय खाता, किती पिता, आठवड्यातून किती व्यायाम करता, तुमची कोलेस्ट्रॉल पातळी काय यावरून कुंडली मांडायला सुरुवात होते. आम्ही तिथेच मार खातो. मग करा चाचण्यांवर चाचण्या! चाचण्यांसाठी इतकं रक्त दिलंय, की दर काही दिवसांनी रक्तदान केलं असं समजायचं. ही मॅमोग्राम चाचणी तर ज्याला कधी स्तन कुस्करायला मिळाले नाहीत अशा एखाद्या सेडिस्ट पुरुषाने शोधली असावी. छळ चाललाय झालं! मन:स्थिती तर अशी, की काही म्हणता काही सोसत नाही. वेड्यासारखं कशाचंही रडू येतं. मिसरूडही न फुटलेली पोरं वैफल्यातून जातात, म्हातारी माणसं निवृत्त व्हायच्या वयात राबतात, पोरंबाळं नसलेली श्रीमंत माणसं कुत्र्यामांजरांत प्रेम शोधतात आणि पोरंबाळंवाले गरीब लॉटरीची तिकीटं काढून दिवस ढकलतात. युद्धं, बेकारी, पर्यावरणाचा नास, फोफावलेले फॅशिष्ट, बोकाळलेले हिपस्टर्स, जगाच्या न संपणाऱ्या करुण कहाण्या! काय म्हणता कायकाय सहन करायचं? मानवजातीबद्दल अपार करुणा दाटून येते मनात! बरं कामात मन रमवावं, तर आम्ही पत्करला डिजास्टर मॅनेजमेंटचा व्यवसाय.. कोणीकडे काही पेटलं की आमच्या धंद्याला चलती! जाऊ दे झालं, तुझ्यासमोर हे रडगाणं गाऊन माझं सेक्स अपील उगीचच खराब करतेय मी!

रियाने स्ट्रिंगरचं उत्तर किंवा इतर काही ईमेल्स उघडायच्या आतच आईची जरबेची हाक आली, "क्लासला वेळेवर आणि माझ्याबरोबर यायचं असेल तर तीन मिनिटांत गाडीत बैस नाही तर पायी चालत जायला तयार राहा. तुझ्यामुळे मला परत उशीर झालेला खपणार नाही." यावर रियाने नेहमीसारखे चिडक्या आवाजात 'I said I'm coming!' हे ध्रुवपद फेकणं टाळलं आणि घाईघाईने ईमेल्स बंद करून ती मुकाट्याने गाडीत जाऊन बसली.

मुलगी इतक्या साळसूदपणे गाडीत येऊन बसल्यानं रेवाला जरा आश्चर्यच वाटलं आणि तिचा एरवीचा ड्रायव्हिंग वैताग जरा कमी झाला. गाडी हमरस्त्याला लागल्यावर रियाने एक खडा टाकला, "आई, तू मागच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस? सगळं ठीक आहे ना?" रेवा आता चांगलीच बुचकळ्यात पडली. पोरगी चक्क आपल्याला प्रकृतीची हालहवाल विचारतेय? आपण उगीचच म्हणतो की तिला तिच्या पलीकडे काहीच जग दिसत नाही. तिला अचानक गहिवरून आलं, अभावितपणे डोळे डबडबले आणि उत्तर देताना आवाज भरून आला. "काही नाही गं, रुटीन टेस्ट करायला पाठवलं होतं माझ्या डॉक्टरने, ठीक आहे सगळं."

रियाला आईच्या उत्तराने दिलासा मिळाला खरा; पण तिच्या भरून आलेल्या डोळ्यांनी आणि आवाजातल्या अनपेक्षित नरमाईने जरा काळजीही वाटली. त्यांच्यातले हे अनपेक्षित प्रेममय क्षण भंग व्हायला एका अचानक आडव्या आलेल्या सायकलीचं निमित्त झालं. आईने जोरदार ब्रेक मारला आणि त्याबरोबर त्या टाइट सायकलशॉर्टवाल्याला लाखोली वाहिली. "रस्त्याचे नियम काय फक्त मोटारींनीच पाळायचे का रे, नालायका? इतरांच्या नाही तर स्वतःच्या जिवाची तरी काळजी कर, मूर्खा! आणि ती स्पॅन्डेक्स घालून सायकल कसली चालवतोस? स्वतःला काय पियर्स ब्रॉसनन समजतोस की इद्रिस अल्बा, मेल्या? आम्ही काय हेच बघायचं होतं का भर रस्त्यावर?" काचेआडचा आईचा आरडाओरडा त्याला अर्थातच ऐकू आला नाही पण तो बिचारा एक हात दिलगिरीने उचलून वाटेला लागला. पण त्यानंतर आईच्या शिव्यांनी खचाखच भरलेल्या प्रक्षोभातून एकही वाहनचालक सुटला नाही.

"फॉर फक सेक, आजोबा, सिग्नल पडला... आता हाला जमलं तर! जमत नसेल तर ऊबर वापरा पण आम्हांला छळू नका या वयात!"
"अरे बाजीरावा, पोर्शा विकत घेतलीस म्हणजे रस्ता तुझ्या अण्णांचा झाला काय रे? हरामखोरा, आपल्या लायनीत राहा ना. काय बेवडा ढोसून आलायस का, गेंड्या?"
"ए हिरो, आधी ड्रायव्हिंग स्कूलमघ्ये जा आणि मिसरूड फुटल्याखेरीज रस्त्यावर पाय टाकू नकोस, नरसाळ्या."
"एकदा कोणीकडं जायचं ते ठरव आणि मग सिग्नल कर ना, टवळे!"
"ए बये, एवढा मोठा ट्र्क विकत घेतलास तेव्हा आधी धड पार्किंग करायला शिकावं हे कळलं नाही का, म्हशी?"

करुणा! रियाच्या मनात आईच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक मानवजातीबद्दल प्रचंड करुणा भरून आली. आईच्या शिवराळपणाची आता तिला सवय झाली होती. खरं तर ती लहान असताना त्यांतल्या अनेक मराठी शब्दांचे अर्थ तिला माहीत नसत. एकदा बाबाच्या आईशी बोलताना तिने फार निरागसपणे "आजी, तो माझा रांडीचा मित्र आहे ना" अशी सुरुवात केली, तर आजीला एकदम ठणकन ठसका लागला होता. बाबाने घाईघाईने 'कुठे शिकलीस हे असले अपशब्द वापरायला?' असं विचारून तिला उत्तर द्यायची संधीही ना देता खूप खडसावलं होतं आणि आईकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला होता. त्यानंतर मात्र तिने आईचे मराठी शब्द कोणासमोर वापरण्याआधी थोडी खबरदारी घ्यायला सुरुवात केली. पण एकदा रियाने आईसमोर अनवधानाने 'फ'कारी भाषा वापरली तर आईने "How dare you fucking swear in front of your mother?" अशी उलट कानउघाडणी केली होती. तेव्हा तिला हा ढोंगीपणाचा कळस वाटला होता पण आता आपल्या आईच्या संपूर्ण जगाबद्दलच्या या चमत्कारिक प्रतिक्रियांबद्दल तिला कुतूहल वाटायला लागलं. एका क्षणी कमालीची संवेदनशीलता आणि दुसऱ्याच क्षणी प्रक्षोभक, शिवराळ भडका!

आपली आई बायपोलर आहे अशी शंका रियाला गेल्या दोन वर्षांपासून येत होती. त्यांच्या शाळेत झालेल्या एका मुलांच्या मानसिक आरोग्यासाठीच्या चर्चासत्रानंतर तिने आईला आपल्या कुटुंबाच्या इतिहासात कोणी काही मानसिक आजाराने ग्रस्त होतं किंवा आहे का याची चौकशी केली होती. उत्तरादाखल आई खूप जोरात हसली होती आणि मग तिने 'तुला आजपर्यंत त्याची खात्री पटली नाही का?' असं खूप गंभीरपणे उत्तर दिलं होत. तिने बाबाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो म्हणाला, "तुझी आई इतका वेळ फोनवर तुझ्या आजीशी बोलत होती, त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं टायमिंग जरा चुकलं. मला विचारशील तर मी 'नाही' असं उत्तर देईन." मग आई पुरेशी लांबवर आहे याची खात्री पटल्यावर '... पण फार छातीठोकपणे नाही' अशी पुस्ती जोडली.

रियाला आता एक निर्णय घ्यावा लागणार होता. आई हा प्रकार नक्की काय आहे हे कळायचं, तर तिला आईच्या ईमेल्स वाचत राहणं गरजेचं वाटलं. पण ते केल्याने आपल्याला कोणत्यातरी कटू माहितीला सामोरं जावं लागेल, नाही तर त्यातलं काही बाबाच्या कानावर घालायला लागेल याची भीतीही तिला वाटायला लागली. आई प्रतारणा करते आहे हे सिद्ध झालं तर त्यांच्या नात्याचं पुढे काय होईल? आणि आई खूप आजारी असेल तर आपलं काय होईल? आई खरोखरीच बायपोलर असेल तर आपल्या कुटुंबाला पुढे कशाकशातून जावं लागलं? तिला एकाएकी अज्ञानातच सुख आहे असं वाटायला लागलं; पण तरी स्वतःला थांबवता येईना. संध्याकाळी आईबाबा कामात असतानाची सोईची वेळ हेरून ती रेवाच्या ईमेल्स पुढे वाचतच राहिली.

स्ट्रिंगर –
'काल अचानक विमानतळावर एक पोट सुटलेला खप्पड, टकलू माणूस माझ्याकडे पाहून जोरजोरात हात हलवायला लागला. आधी मी ओळखलं नाही पण मग साक्षात्कार झाला, की अरेच्चा हेच ते टाइम्स नाऊवर कार्यरत असलेले सन्माननीय सोकॉल्ड राइटविंग थिंक टँक 'विवेक महोदय!' या माणसाचं नाव 'विवेक' ठेवणाऱ्या त्याच्या आत्याच्या विनोदबुद्धीबद्दल मला फार आदर आहे. हे साहेब उण्यापुऱ्या तीन मिनिटांत मुद्द्यावर आले, काही माणसं कशी वाळूत तोंड घुसवून बसली आहेत, कोणाची आर्थिक धोरणं कशी बरोबर आहेत, स्वातंत्र्याच्या लढ्यात कोणाचं योगदान कसं जाणीवपूर्वक विसरलं जातं, माध्यमांनी भारताविरुद्ध कसा सापळा उभा केला आहे, माओ, नक्षल, ट्रंम्प, पुतीन, नाटो.. नुसती तलवारबाजी चालली होती. शेजारचे एक आजोबा डोकं हलवून हलवून दुजोरा देत होते. मी चतुरपणे आजोबा आणि राविंथिंकटँकरचं संभाषण चालू करून दिलं आणि चपळाईने तिथून काढता पाय घेतला. What the fuck? How were you with this moron for one whole year? Does he have any anatomical advantages that you never mentioned?'

मोना डार्लिंग –

'दुसरों के घरोंपर पत्थर फेकनेवाले, आधी तू 'टाइम्स नाऊ' केव्हा पाहायला सुरुवात केलीस ते सांग. पण सिरियसली, माझ्या आयुष्यातल्या सर्वांत ओशाळवाण्या आणि लाजिरवाण्या काळाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! तारुण्यात हॉर्मोन्स उसळले, थोडी दारू प्यायली, की कोणीही आकर्षक वाटू शकतं. त्यात हा गडी संभाषणचतुर होता, इतरांचं तेच ते उगाळून झालं, की हा काहीतरी वेगळं विनोदी बोलायचा जे चटपटीत आणि मजेशीर वाटायचं त्या वेळी. तेव्हा तोही सावधपणे पावलं टाकायचा, मित्रांना विनोदी किंवा निरुपद्रवी वाटेल इतकंच बोलायचा. त्याला वाटायचं की माझ्यामार्गे त्याला आपल्या मित्रकंपूत मिसळता येईल; म्हणून मग मला खूश ठेवायचा प्रयत्न करायचा! त्या सगळ्यात गाफील राहतो आपण; इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायच्या नादात समोर असलेले ढळढळीत पुरावेही कधीकधी आपल्याला दिसत नाहीत! आता गलिच्छ वाटतं ते सगळं आठवलं की.. काय माठ होते आणि माणसाची पारख करण्यात एवढी घोडचूक कारण्याएवढीही लहान नव्हते मी! एखादा भयंकर टॅटू नाही तर विचित्र ठिकाणी पियर्सिंग पुरलं असतं की बंडखोरी म्हणून, हे असलं अक्षम्य काहीतरी करून आयुष्यावर घाणेरडा डाग पाडून घेतला कायमचा. And no, he doesn't have any anatomical advantages. Had that been the case, it would have been easier to forgive myself! माझ्या लेकीला वाटतं की मी तिला योनीशुचिता पाळायला लावतेय पण तिला कसं सांगू, की बाई या वयात काही पाचपोच येण्याआधी काहीतरी भयंकर करू नकोस तुझ्या आईसारखं! बये, या वयात all sex feels like good sex and any sexual partner seems like a good one!'

स्ट्रिंगर –
'उगी उगी.. त्रास करून घेऊ नको एवढा! तारुण्याच्या नशेत होतात अशा घोडचुका. पण पोरीला तुझं पियर्सिंग दाखवलंस की नाही तू? मला वाटतं, की सांगायला हव्यास तू तिला काही गोष्टी बिनधास्त! एकदा आईनं असलं काही केलंय हे तिला कळलं, की इच्छाच मरेल तिची त्यावरची. ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी! पण मला सांग नक्की कोणत्या वयात all sex doesn't feel like good sex?'

मोना डार्लिंग –
'या वयात आयुष्यातले सगळे आनंद रिपीटेटिव्ह आणि अपेक्षित स्टेशनांवरून जायला लागतात. 'बिफोर मिडनाईट'मधला सेलीन आणि जेसीचा अजरामर डायलॉग आठवतो मला -

Celine : You like to have sex, the exact same way, evvvvvvery time.
Jesse : When you got it, you got it.
Celine : Kissy kissy, titty titty, pussy [snore]
Jesse : I'm a man of simple pleasures.

स्त्रियांसाठी फार गुंतागुंतीचा असतो लैंगिक आनंद! मुळात जोडीदार चांगला असावा लागतो; आणि हे चांगलं असणंही खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरच असावं लागतं. बौद्धिक, शारीरिक, भावनिक इत्यादी इत्यादी. जोडीदार सवयीचा असावा लागतो पण इतकाही सवयीचा नाही की त्याच्या सगळ्या चाली आपल्याला अगदी तोंडपाठ असाव्यात. स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल आत्मविश्वास असावा लागतो, सगळे सुखद गंध, स्पर्श योग्य वेळी अनुभवाला यावे लागतात. तो म्हणतो, "तू गोल्डीलॉक्स आहेस." He is a man of simple pleasures.

पण माझ्या तारुण्यातले आणि लैंगिक जीवनातले सगळे कांगोरे मुलीला दाखवायची कल्पना चांगली आहे, ती लगेच ध्रुवपद क्रमांक एकवर येईल आणि कदाचित आजन्म कुमारिका राहील. दाखवायचे दात काहीही असले तरी पापभीरू आहे ती.'

स्ट्रिंगर –
'तू अगदी दुष्ट आहेस पण तुझ्या लेकीची ध्रुवपदं क्रमांकासहित आठवेनात मला. पुन्हा सांग बरं.'

मोना डार्लिंग –

'।।ध्रु १।। दॅट इज सो ग्रोस!
।।ध्रु २।। लीव्ह मी अलोन!
।।ध्रु ३।। सो अनफेअर!
।।ध्रु ४।। आय सेड आय एम कमिंग!
आणि हो, ही सगळी ध्रुवपदं अनुनासिक स्वरात आणि काळी पाचच्या पट्टीत चित्कारायची असतात, तिला मराठीत चित्कारता येत नाही.'

एकाच वेळी रिया ओशाळूनही गेली आणि तिच्या तळपायाची आग मस्तकातही गेली! म्हणजे आजारी-बिजारी काही नाही; नुस्तीच थेरं आहेत हिची. परपुरुषासमोर असल्या खासगी गोष्टी लिहायला लाज कशी वाटत नाही? आणि हिच्या ढोंगीपणाला काही मर्यादा? त्या साराची आई नियमित चर्चला जाते आणि फॉक्स न्यूज पाहते म्हणून ही तिचा सारखा उद्धार करते आणि स्वतःचा राविंथिंकटँकर प्रेमी? श्शी! पण जरा शांत झाल्यावर तिला थोडं सुटल्यासारखंही वाटलं, स्ट्रिंगर बेलबरोबर आईचं अफेअर असलंच तर ते प्लॅटाॅनिक असलं पाहिजे; म्हणजे आशेला जागा आहे. शिवाय हेही सिद्ध झालंय की ही कोणी इंटरनेटवर भेटलेली रॅन्डम व्यक्ती नाही, त्यांची मैत्री खूप पूर्वीची असावी.

शांत झाली, तरी रिया धक्क्यातून सावरलेली नव्हती. आपली आई तिच्या सिक्रेट आयुष्यात अगदी डेंजर म्हणावी अशी बिनधास्त आहे, परिणामांची फारशी चिंता न करणार्‍यांतली आहे, आणि तिच्या पूर्वायुष्यातही तिने अनेक प्रकारच्या भानगडी आणि आक्षेपार्ह गोष्टी केलेल्या आहेत. मग ती बाबासारख्या भल्या माणसाबरोबर संसार का करते? आणि आपण कडक आई असल्याचं सोंग रचून आपल्यावर असा सूड का उगवते आहे? आपल्याला 'पापभीरू' म्हणलं गेल्याचा तिला अतिशय संताप आला होता. आपण नक्की काय केलं तर आईला आपण पापभीरू नाही असं वाटेल यावर ती विचार करायला लागली; पण मग तिनं तो विचार सोडून दिला. पापभीरू तर पापभीरू! पण तिच्यासारखी ढोंगीतरी नव्हती ती! आईवर चिडलेली असली, तरी तिचा राग आता नेहमीसारखा एकसुरी नव्हता.

एकीकडे तिला आईबद्दल किंचित आदर आणि तिच्या गुप्त व्यक्तिमत्त्वाबद्दल सुप्त आकर्षणही वाटायला लागलं. ती समजायची त्याप्रमाणे मुळमुळीत मध्यमवर्गीय-कौटुंबिक-बोरिंग तरी नव्हती आई! गुप्ततेत तरी तिला काहीतरी इंटरेस्टिंग म्हणायचं आहे. आई हे सगळं आपल्यासमोर उघड बोलली असती तर आपण काय केलं असतं? तिला लगेचच लक्ष्यात आलं, की आईनं ओळखलेली तिची प्रतिक्रिया मुळीच चुकीची नव्हती... ग्रोसच वाटलं असतं तिला ते! आता असं चोरून वाचताना धक्कादायक वाटलं तरी ग्रोस नक्कीच वाटलं नाही. तिनं लगेच 'बिफोर मिडनाईट' सिनेमा गूगल केला आणि बघायच्या लिस्टमध्ये घालून टाकला. तिच्या आता लक्ष्यात आलं होतं की आई अनेकदा प्रक्षोभक वागण्याचा बागलबुवा उभा करून तिच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करते आणि आपण अपेक्षितपणे तिच्या चालीला प्रतिसाद देतो. त्याऐवजी आपण समजूतदारपणा दाखवून आपला मतलब साधला तर? तिच्या इमेल्समुळे आपल्याला तिची बाजू समजते आहे तर त्याचा फायदा करून घ्यायला काय हरकत आहे?

पुढचे चार दिवस सगळेजण एकत्र छोट्या सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याने रियाला आईच्या ईमेल्स वाचणं शक्य झालं नाही. एरवी अशा सुट्टया असल्या आणि सगळ्यांना एकत्र वेळ घालवायला लागला की कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात येत असे. काय करायचं, कुठे जायचं, काय खायचं, जितके अधिक निर्णय एकत्र घ्यावे लागतील तितक्या चकमकीच्या शक्यता अधिक! या वेळेस मात्र रेवाच्या लक्ष्यात आलं की, रिया जरा अनपेक्षितरित्या समजूतदारपणे वागते आहे. गेल्या चोवीस तासांत तिने एकही ध्रुवपद फेकून मारलं नव्हतं आणि रेवाने एक दिवस काही न करता लोळून काढायचा ठरवल्यावरदेखील ती काहीही विरोध न दर्शवता शांतपणे बाबाबरोबर फिरायला गेली होती. ते परत आल्यावरही रेवा अजून आळसावून पुस्तक वाचत बसलेली दिसली तर रियाने डोळे कपाळात न घुसवता चक्क तिला ती कोणतं पुस्तक वाचते आहे याची चौकशी केली. जेवायची वेळ झाल्यावर रेवाला या सहृदयतेची परतफेड करणं भाग पडलं आणि रियाने निवडलेल्या रेस्तराँत जायला तिने फार झिगझिग न करता मान्यता दिली. कौटुंबिक कलहाच्या अभावामुळे बाबाला नवीन गावातली हार्डवेअर स्टोअर्स धुंडाळायची संधी मात्र मिळाली नाही.

चार दिवसांच्या अवधींनंतर आईची ईमेल उघडताना रिया थोडी बावचळली. आपण जे करतोय त्यात आता आईवर सूड घेण्याऐवजी आईविषयी वाटणारं कुतूहल आहे आणि असं करणं चुकीचं आहे याची एक बोचरी जाणीव तिला व्हायला लागली. पण तरी तिने ईमेल उघडलीच.

स्ट्रिंगर –

'आपण मोठे झालो की जग बदलेल, अधिक सामाजिक समता नांदेल, भेदभाव कमी होतील वगैरे स्वप्नं आपण पाहिली होती. पण आपण मोठे झालो की कार्पोरेट कल्चर स्वीकारू, कंपनीच्या वकिलांच्या सल्ल्याने वागू, कोण कोणाशी भेदभाव करतंय यापेक्षा कोण कंपनीला त्रासदायक होईलसं वागतंय का याकडे काटेकोरपणे लक्ष्य देऊ असं मात्र कधी वाटलं नव्हतं. काल आमच्याकडे 'सेन्सिटीव्हिटी ट्रेनिंग' होतं. मी जरा कामात असल्याने मला जायला थोडा उशीर झाला होता. तेवढ्यात आमचा पोरसवदा ह्यूमन रिसोर्सेसवाला मुलगा घामाघूम होत मला शोधत आला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सिनियर मॅनेजमेंटवाल्या लोकांनी हजर राहणं किती महत्त्वाचं आहे वगैरे सांगायला लागला; हे सगळं माझ्या आणि माझ्याबरोबर असलेल्या एका सहकाऱ्याच्या लिंगांचा स्पष्ट उल्लेख करून. मग मला खोडी काढावीच लागली, म्हटलं, "You seem to be quite quick to assume our pronouns and gender, I haven't identified myself yet!" मी असं म्हटल्यावर तो चांगलाच गांगरला म्हणून मग मी हसून त्याच्या पाठीवर थाप मारली. या मुलांना चिडवणं फार सोपं झालंय आजकाल!'

मोना डार्लिंग –

'मला मांजरी त्यांच्या पिल्लांना कसं शिकवतात ते पाहायला फार आवडतं. फार आदर्श शिक्षिका असतात त्या! त्यांचं एकच उद्दिष्ट असतं ते त्यांच्या पिल्लांना वेळेत सक्षम करणं. बिनधास्त नखं काढतात, लोळवतात त्या पिल्लांना आणि आयुष्यातल्या पुढच्या सगळ्या लढायांसाठी तयार करतात पुढच्या पिढीला. फार लाड नाहीत, मातृत्वाच्या वात्सल्याचा मोठा सोहळा नाही पण थेट आव्हान देणं आणि त्यांचं लढण्याचं कसब वाढवणं! हेच मी पोरीच्या बाबतीत करतेय हे लक्ष्यातही येणार नाही तिच्या. ती एक म्हटली की आपण दुसरं म्हणायचं, तिने एक मुद्दा मांडला की आपण लगेच विरोधी मत मांडायचं. तिने एकांगी विचार करू नये, वाद घालण्याआधी आपलीच मतं जोखून घ्यावीत, विचार करावा आणि करत राहावा म्हणून लढत बसायचं. अलीकडे मात्र आपण हे फारच करतो आहोत आणि वादासाठी वाद घालतो आहोत असं वाटायला लागलंय मला. आणि खरं सांगायचं तर असं करताना अनेकदा पूर्वी आपण काय म्हटलो होतो हेच नीट आठवत नाही मला. या लुटुपुटुच्या लढाया खेळताखेळता तिचा विश्वासच गमावून बसले नाही म्हणजे झालं. मी विसरूनच जाते की तिला फक्त सक्षम बनवणं इतकीच माझी इतिकर्तव्यता नाही; तिला आयुष्यातल्या कटुतेपासून जपणारी प्रेमळ आईही हवी आहे. मी हेदेखील विसरून जाते की आपणही त्या वयाचे होतो कधीतरी.'

स्ट्रिंगर –

'काल मला आपला एक जुना फोटो सापडला, साधारण पंचवीस वर्षांपूर्वीचा असावा, अगदी जगावर विजय मिळवल्यासारखे हसतो आहोत आपण त्यात. काय झालं असेल त्या दिवशी नेमकं काही आठवत नाही पण त्या फोटोतली तरुण शरीरं आपलीच आहेत यावर विश्वासच बसत नाही. फार निरागस आनंदात होतो आणि तेव्हा वाटायचं आपल्याला चिरतरुण असल्याचं वरदान मिळालेलं आहे, जगाच्या सर्व समस्यांची उत्तरं आपल्यापाशी आहेत, आपल्याकडे सगळं बदलून टाकण्याइतका अमर्यादित वेळ आहे, आपण समर्थ आहोत आणि आपण अमर्त्य आहोत. मजा वाटते साल्या आपल्याच भाबडेपणाची!'

मोना डार्लिंग –

'हे सगळं इतक्या अवचित बदलतं, की त्याचीही मजा वाटते. आपण आपल्या कामांत गुंतलेले असतो, अनुभवाच्या कक्षा रुंदावलेल्या असतात, कामात तरबेज झालेले असतो, आर्थिक स्थैर्य आलेलं असतं आणि आपण बेफिकीर असतो. अचानक एके दिवशी अगदी अवेळी आणि अन्यायकारक वाटेल अशाप्रकारे आपलं शरीर आपलाच घात करायला लागतं. अनेक रात्री झोप नाही, एखाद दिवशी झोप लागलीच तर मध्येच घामाने डबडबून जाग आणि कपडे पिळून काढावे अशी अवस्था. सांधेदुखी, थकवा; कंटाळवाणी, असह्य, किरकिरी, सततची अंगदुखी. मनःस्थिती अशी की जणू तलवारीच्या धारेवर जगतो आहोत, कधी कशानं कापलं जाईल आणि आधी रक्तबंबाळ होऊ याची ग्वाही नाही. कोणी किंचित तारस्वरांत बोललं तरी सोसत नाही किंवा हातातून काही पडलं तरी सगळं संपल्याप्रमाणे धाय मोकलून रडावसं वाटतं. निराशा अशी की मानवजातीची सगळी दुःखं आपल्याला एकाच वेळी भोगायला लागावीत.

अखेरीस माझ्या सन्माननीय डॉक्टरला माझं निदान झालं किंवा मला त्याच्याकडून वदवून घ्यावं लागलं. नाही, मला सांधेदुखी नाही, कोणता असाध्य रोगही नाही, क्लिनिकल डिप्रेशन नाही, स्वयंप्रतिकारक रोगही नाही. तरीही मी रोज झिजते आहे, शारीरिक आणि मानसिक यातना भोगते आहे. का? तर माझ्या बीजग्रंथींचं काम मंदावलंय! मुलं जन्माला घालण्याचं माझं पवित्र आणि एकमेव जीवशास्त्रीय कार्य संपल्याने आता निसर्गाला मी अडगळ वाटते आहे आणि माझा घात करण्याचा कट माझ्याविरुद्ध रचला गेलाय. हे अन्यायकारक आहे, माझ्या मनात मी अजूनही तरुणच आहे, माझ्या आकांक्षा अजूनही जिवंत आहेत, मला जीवनाविषयी लालसा आहे, माझं जीवितकार्य आणि माझं अस्तित्व जीवशास्त्रापलीकडे आणि शरीरापलीकडे आहे. माझ्या समस्यांचं मूळ जर घटलेलं एस्ट्रोजन असेल तर मला थेट आणि पहिल्या धारेचं एस्ट्रोजन द्या की लेको! पण असं सांगू नका की आपल्या प्राक्तनाला सामोरं जा आणि निमूटपणे सोस पदरात पडेल ते!

डॉक्टरने अर्थात ते काही दिलं नाही पण मग तो मला अल्टर्नेटीव्ह ट्रीटमेंट्सबद्दल सांगायला लागला. मी आतल्या आत हसत होते आणि वाट पाहत होते तो 'medical cannabis (MC) may be a non hormone treatment option with the potential to alleviate symptoms' म्हणेल म्हणून. पण शेवटी तो पुरुषच मेला, रिकाम्या हाती परत पाठवायला लागला. मनातल्या मनात त्याला मी चिक्कार शिव्याशाप दिले. "मेल्या तुला बाळंतकळा फिक्या पडतील अशी दातदुखी होईल आणि पेनकिलर्स वापरता येणार नाहीत. तुझी चाळीशी उलटण्याआधीच तुला डोक्यावर गुळगुळीत टक्कल पडेल आणि कानातून दाट केस वाढतील, तुला खा-खा सुटेल आणि तुझं पोट दरदिवशी इंचभर सुटेल!"

रियाला अचानक हसूही आलं आणि रडूही. अगदी बेक्कार मॅड आहे आई! तिला त्रास होतोय हे सरळच आहे पण तिच्या त्रास होण्यालाही किती अनेकपदरी अर्थ आहेत. असेच आपल्या वागण्याचे कॉम्प्लेक्स अर्थ तिला आपल्यावर पाळत ठेऊन कळले असतील का? तिच्या एकदम लक्ष्यात आलं की आपल्याला स्ट्रिंगर स्त्री आहे की पुरुष हेदेखील माहीत नाही, आपल्याला फक्त इतकंच कळलंय की आईची कोणाशीतरी घट्ट मैत्री आहे आणि तिचं एक आपल्या कुटुंबांपलीकडे वेगळं अस्तित्व आहे जे तिला तरुण ठेवतंय, स्वतंत्र ठेवतंय. ती बाबाशी प्रतारणा करत असल्याचं कुठेच काही दिसत नाही. रियाला एकदम जाणवलं, की हे आईवर पाळत ठेवणं आता थांबायला हवं. तिला एकदम रिकामं वाटलं आणि सुटल्यासारखंही.

---

शिशिरातली पानगळ सुरू झाली तरी दुपारच्या वेळेस सूर्य तळपत असला की हवेत अजून ऊब असते, अशा दिवसांत मागच्या परसदारी हातात पुस्तक घेऊन तिथल्या खुर्चीवर लोळत पडायचं, मध्येच थांबून समोरच्या झाडांचे बदलते रंग निरखायचे, थंडीची चाहूल लागताच हिवाळ्याच्या तयारीसाठी लगबग करणाऱ्या खारींची गंमत पाहायची हा रेवाचा आवडता उद्योग होता. आज आकाश अगदी निरभ्र होतं, रेवा डेकवरच आडवी होऊन समोरच्या बर्चकडे निरखून पाहत होती. तितक्यात रियाही परसदारात आली. रेवाने किंचित कुतूहलाने तिच्याकडे पाहिलं तर रियाने 'आई, मी चहा करतेय, हवाय?' असा प्रश्न केला. नेकी और पूछपूछ? रिया मस्त चहा करायची पण तिने चहा करायचा, तर एरवी रेवाला हजार विनवण्या करायला लागायच्या. आज अचानक काय चमत्कार झाला ते रेवाला कळेना पण असला प्रतिप्रश्न करून चालत आलेल्या नशीबाला ठोकरण्याइतकी ती वेडी नव्हती. रिया चहाबरोबर पोर्टेबल स्पीकर घेऊन आली तेव्हा वाफाळत्या चहाची किंमत काहीतरी त्रासिक गाणी ऐकून फेडावी लागणार या कल्पनेनं रेवा किंचित कोमेजली पण आज दिवस काही खास होता बहुतेक. रियाने चक्क जोनी निवडली आणि ती आपला कप घेऊन आईशेजारी येऊन बसली.

I get the urge for going
When the meadow grass is turning brown
And summertime is falling down and winter is closing in...

रेवाने आपल्या लेकीकडे निरखून पाहिलं. साधारण आपलाच तोंडवळा पण किती रेखीव आहे आपली लेक! बेपर्वाईनं बांधलेले दाट कुरळे केस, भरगच्च रेखीव भुवया, लांब पापण्या, चमकणारी तारुण्यसुलभ रसरशीत कांती! बाळ राहिली नाही आता, आपल्याकडे हात पसरून 'कडेवर घे' म्हणून फुरंगटणारी, एवढंसं लागलं की भोकाड पसरणारी, निरागस प्रश्न विचारणारी, आपल्याभोवतीच लुडबुडणारी; पण अजूनही आपल्याकडे पहाताना आपल्या कौतुकाच्या प्रतीक्षेत असते, तिला निर्णय स्वतःच घ्यायचे असतात पण तरी आपण त्यावर शिक्कामोर्तब करू म्हणून अपेक्षा करते, क्वचित कधीतरी आपल्याकडून अप्रत्यक्षपणे सल्लेही मागते. रेवाला तो क्षण घट्ट हातात पकडून ठेवावासा वाटला, लेकीला जवळ ओढून लहानपणी घ्यायची तश्या तिच्या चेहऱ्याच्या मानमोकळ्या पाप्या घ्याव्याश्या वाटल्या. पण असलं काहीतरी करून तिला रियाला तिथून हुसकावून लावायचं नव्हतं आणि रिया वयात आल्यापासून त्यांच्यात तयार झालेली ती अदृश्य भिंत अचानक नाहीशीही झाली नाही. आई आपल्याकडे निरखून पहाते आहे हे रियाला डोळ्याच्या कोपऱ्यातून जाणवलं आणि ती किंचित अवघडली. पण आईचं लक्ष्य आता समोरच्या बर्चकडे वळलं होतं.

"अर्धवट पानगळ झाली असताना झाडं काय बावळट दिसतात नाही? एकीकडे छिछोर गडद रंग उधळतात आणि दुसरीकडे वेडीवाकडी बोडकी झालेली असतात." रेवा काहीशी गंभीरपणे म्हणाली.

"हं. मला वसंतातली नुकती उमलायला लागलेली झाडंही अशीच बावळट वाटतात. नुस्ताच फुलोरा पण अजून पानांचा पत्ताही नाही. तीही वेडगळच वाटतात."

रियाच्या उत्तरानं रेवा किंचित चमकली. त्यांच्यातला तो कोमल क्षण त्यानंतर अडीच मिनिटांत जोनीच्या गाण्याबरोबर विरला. 'आईची आवडती' या रियाच्या प्लेलिस्टमधलं पुढचं गाणं सुरू झालं आणि क्षणार्धात त्या दोघी एकत्र तालात माना वेंगाडून घसा फाडायला लागल्या.

Caviar and cigarettes
Well versed in etiquette
Extraordinarily nice

She's a Killer Queen
Gunpowder, gelatine
Dynamite with a laser beam
Guaranteed to blow your mind. Anytime ...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Joni Mitchel चं गाणं कर्णमधुर आहे. लेख आवडायला लागला होता तेव्हढ्यात अचानक संपला. शिशिराच्या सुरुवातीच्या त्या अर्धवट झाडोऱ्यासारखा. एनिवे. छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा वाचली. तिच्यातली गंमत अनुभवली. ती अशी की एकविसाव्या शतकातल्या जगण्यातली गुंतागुंत म्हणा, त्यातली सरमिसळ म्हणा, ती आली आहे.

लेखिकेच्या कुटुंबाची रचना माहिती असल्याने त्यातला आत्मचरित्राचे चॅप्टर्स स्मगल करण्याचा प्रकार मला किंचित हसूं आणणारा होता.

आई-मुलीच्या नात्यातले पदर गेल्या पन्नास साठ वर्षांमधे मराठी कथांमधून आलेले आहेतच - कदाचित अधिक. पण प्रस्तुत कथेतलं डायनॅमिक गमतीशीर, विनोदी आणि सुखावणारं आहे.

मोना डार्लिंग आणि स्ट्रिंगर बेल ह्यांच्यातला संवाद तरल, विनोदी, मजेशीर, काव्यात्म आणि विचारांची दालनं धुंडाळणारा झालेला आहे. तो भाग परत परत मुरवून वाचावा आणि अधिक प्रतिक्रिया द्याव्यात - ज्या मी कदाचित देईन - असा झाला आहे. हा भाग मला कथेतला सेंट्रल वाटला.

कथेमधला फ्लॅशपॉईंट फार जीवघेणा वगैरे नाहीये. पण तरी त्यात तगमग आलेली आहे. नात्यांमधली आणि २१व्या शतकातल्या जगण्यातली.

तूर्तास इतकंच. वर म्हण्टल्याप्रमाणे किंचित अधिक डिटेल्मधला फीडबॅक देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कथेच्या शीर्षकाची प्रेरणा स्टीव्हन सोडरबर्गच्या एका सिनेमावरनं घेतली आहे हे उघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.