"अविश्वास हीच पहिली प्रतिक्रिया असेल" - विजय घासकडवी
- ऐसी अक्षरे संपादक मंडळ
विजय घासकडवी गेली २५ वर्षं तंत्रज्ञानात काम करत आहेत. 'आयडेंटिटी मॅनेजमेंट' किंवा आपली जालावरची ओळख तपासणं हा त्यांच्या कामाचा विषय आहे. दिवाळी अंकासाठी नंदन, राजन बापट, चिंतातुर जंतू आणि अदिती यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या.
ऐसी अक्षरे – तुम्ही गेली अनेक वर्षं या क्षेत्रात काम करत आहात. गेल्या काही वर्षांत ह्या क्षेत्रातले बदल सामान्य लोकांनाही दिसायला लागले. उदाहरणार्थ, आपण नेहमीचं डिव्हाईस सोडून समजा नव्या लॅपटॉप किंवा फोनवरून फेसबुकवर लॉगिन करायला लागलो तर आपल्या नेहमीच्या डिव्हाईसवर त्याचा अलर्ट येतो. आपणच ते नवं यंत्र, डिव्हाईस वापरत आहोत का, याची शहानिशा करून घेतली जाते. मग आपल्याला नव्या यंत्रावर लॉगिन करता येतं. तंत्रज्ञानात काम करणाऱ्यांना हे multi factor authentication - MFA आधीपासूनच परिचयाचं आहे. हे बदल तुम्ही कितपत बघितलेत? हे बदल लोकांपर्यंत पोहोचवणं कितपत सोपं होतं?
विजय – बदल मी सुरुवातीपासूनच बघितले. आयडेंटिटीशी संबंधित काम मी २०००च्या दशकाच्या सुरुवातीपासून करत आहे. हे बदल सुरुवातीला तंत्रज्ञानात काम करणाऱ्यांपुरतेच मर्यादित होते. सर्वसामान्य माणसांसाठी होतं ते अगदी ढोबळ काही होतं – लॉगिन करताना पासवर्ड वापरा आणि पासवर्ड विसरलात तर तो रिसेट करा. यापेक्षा जास्त गुंतागुंत नव्हती. त्या काळात वेबसाईट साध्या होत्या; ॲप्लिकेशनांमध्ये गुंतागुंत नव्हती. त्यात वापरला जाणारा, गोळा केला जाणारा डेटाही फार नव्हता. त्यामुळे फार काही जपून ठेवावं असं काही नव्हतं.
२०००च्या दशकाच्या उत्तरार्धात यात थोडी गुंतागुंत यायला सुरुवात झाली. बॅकिंग आणि आर्थिक व्यवहार जेव्हा ऑनलाईन व्हायला लागले तेव्हा अचानक डेटा प्रायव्हसी महत्त्वाची ठरली. जी व्यक्ती सांगत्ये की मी लॉगिन करत आहे, ती तीच आहे का, हे तपासणं गरजेचं झालं. अकाऊंट हॅक झालेलं नाही ना याची शहानिशा महत्त्वाची ठरली.
इंटरनेटवर जाऊन पत्तेच खेळायचे तर त्यात हॅकिंगमुळे फार नुकसान होणार नाही अशी परिस्थिती होती. आता पासवर्डशिवाय लॉगिन वगैरे गोष्टीसुद्धा आल्या आहेत. आता सर्वसामान्य माणसांना भिडणारा प्रश्न आहे, आपलं खातं सुरक्षित कसं ठेवायचं?
फेसबुकसारख्या सोशल मिडिया खात्यावरही आपला खूप डेटा असतो; फोटो असतात, संभाषणं असतात. ही ठेव, हिस्टरीसुद्धा लोकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. एखाद्या ॲप्लिकेशनवर आपला ५-१० वर्षांचा डेटा असला तर तो सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं असतं. लोकांना हे समजावून सांगणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या गुंतागुंती आहेत पण पण त्यांतल्या मूलभूत गोष्टी लोकांना समजणं गरजेचं वाटतं.
ऐसी अक्षरे – तुम्ही या मूलभूत गोष्टी म्हणतात त्या काय आहेत? पैसे आणि बॅकेची, ट्रेडिंगची खाती अशा गोष्टी सुरक्षित ठेवाव्यात हे सगळ्यांना लक्षात येतं. पण त्यापेक्षा जास्त काही यात आहे का?
विजय – मूलभूत गोष्टी म्हणजे असं बघा. इंटरनेटवर वेगवेगळे सेवादाते असतात; त्या सेवा आपण आपापल्या गरजेनुसार वापरतो. कधी फोनवरून, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून आपण या सेवा वापरतो. कधी या सेवा पडद्याआड असतात. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही, पण आपण ज्या सेवा वापरतो त्यांपैकी काही इतर काही सेवा-सुविधांचा वापर करत असतील. उदाहरणार्थ, पेमेंट गेटवे. हे वापरणाऱ्या लोकांना यांतले तपशील बहुतेकदा माहीत नसतातच. पण कुठलीही वस्तू ऑनलाईन विकत घेताना किंवा कार्डानं विकत घेताना पेमेंट गेटवे वापरला जातो. हे व्यवहार कसे चालतात याची ढोबळ माहिती असणं गरजेचं आहे.
आपण कुठल्याही वेबसाईटवर वावरत असताना, तिथे आपली काही एक आयडेंटिटी असते. डिजिटल जगात आयडेंटिटी संकल्पना महत्त्वाची आहे. आयडेंटिटीची खातरजमा करावी लागते – म्हणजे काय तर वेबसाईटवर ज्या नावानं आपण आलो आहोत, ते आपणच आहोत ना ते तपासणं. ते का गरजेचं आहे? मला तिथे काय-काय करता येणं शक्य आहे? या गोष्टी ऑथोरायझेशनशी संबंधित आहेत. आपली आयडेंटिटी कुणी चोरली तर आपलं काय नुकसान होईल आणि त्यापासून आपण स्वतःचं रक्षण कसं करावं, या ढोबळ गोष्टी माहीत असणं सर्वसामान्य ग्राहकांना असणं आवश्यक आहे.
त्यातल्या तांत्रिक बाबी, उदाहरणार्थ, MFA (multi factor authentication) सांभाळणारे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत; आणि सामान्य माणसाला त्यात पडण्याची गरज नाही.
ऐसी अक्षरे – जेव्हा फेसबुक रुळायला लागलं होतं, ४जी आणि ५जी अमेरिकेतच नाही तर जगभरातच यायला सुरुवात झाली होती. इंटरनेटचा वापर फक्त इमेल किंवा लिखित मजकुराकडून मल्टिमिडीया म्हणजे संवाद, व्हिडिओ यांच्याकडे झुकायला लागला होता. यूट्यूब, स्नॅपचॉट, इन्स्टाग्राम, टिकटॉक वगैरे. माहितीच्या महापुरामुळे आयडेंटिटी मॅनेजमेंट बदलायला सुरुवात झाली का? ही एक बाब.
२०१६ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्लिंटनच्या कँपेनमध्ये गैरप्रकार झाले. त्यामुळे त्याला अधिक प्रसिद्ध मिळाली. या बदलांची पार्श्वभूमी, आढावा घ्याल का?
विजय – ढोबळमानानं लोक जास्तजास्त ऑनलाईन राहायला लागले, जगण्याचा जास्त भाग, दैनंदिन कामं इंटरनेटवर यायला लागली तसं या आयडेंटिटी प्रोटेक्शनला महत्त्व येत गेलं. बॅकिंग आणि आर्थिक व्यवहारांबद्दल सुरुवातीला बोललोच मी. मल्टिमिडियाचा वापर ऑनलाईन होत गेला; सर्वसामान्य माणसं बिलं ऑनलाईन भरायला लागली; ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण सुरू झाली; इ-कॉमर्सचा, ॲमेझनचा विस्फोट झाला. पाश्चात्य जगात सुरुवात झाली आणि जगभर हे पसरत गेलं. साधारणपणे जगभरात हे एकाच काळ होत गेलं असंही म्हणता येईल. More was on stake. ही एक बाजू.
दुसरी बाजू अशी की सोशल मिडिया जसा विस्तारत गेला तसं आपण सामाजिक जीवन जास्तजास्त ऑनलाईन जगायला लागलो. यात आर्थिक व्यवहार नसले तरीही आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल खूप माहिती ऑनलाईन मिळत होती. ती फेसबुक, गूगल वगैरेंनी जमा केली. कालांतरानं अब्जावधी लोकांची माहिती या सेवादात्यांकडे गेली. या लोकांचा डेटा सुरक्षित ठेवणंही महत्त्वाचं झालं. उदाहरणार्थ, बँकेत जास्तजास्त पैसे ठेवले तर जास्त कडीकुलपांमध्ये पैसा ठेवला जातो, तसंच इथेही. ह्या डेटाचं मूल्यही वाढायला लागलं. डेटानुसार जाहिराती दाखवण्याचा व्यवसाय तयार झाला. हा प्रकार २०००च्या दशकाच्या सुरुवातीला नव्हता. तेव्हा हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं.
तोवर जाहिराती असायच्या त्या टीव्हीवर. त्या अजूनही असतातच. टीव्हीवरच्या जाहिरातींना फीडबॅक नसतो. ही जाहिरात किती लोकांनी बघितली हे मोजण्याची पद्धत अगदी बाल्यावस्थेतली आहे. अमेरिकेत नील्सन नावाची कंपनी काही लोकांच्या घरी खोके द्यायची. अमेरिकेत ३५० दशलक्ष लोक राहतात. १५०-१७५ दशलक्ष घरं. यांपैकी काही हजार घरांत हे खोके यायचे. एवढ्या डेटावरून ते ठोकताळे काढायचे कुठल्या जाहिराती कधी दाखवायच्या याचे. गूगल आणि फेसबुककडे जितका डेटा असतो त्याच्याशी तुलना करता हे तंत्रज्ञान ब्राँझ युगातलं म्हणावं असं आहे. ऑनलाईन जाहिराती जशा वाढत गेल्या, तसा लोकांच्या डेटाला महत्त्व येत गेलं.
या दोन्ही बाजूंमुळे व्यक्तिगत डेटा सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं होत गेलं. आजच्या घडीला संपूर्ण जगातले बहुतेकसे महत्त्वाचे व्यवहार ऑनलाईन आहेत. आपली आयडेंटिटी चोरली तर होणारं नुकसान प्रचंड आहे. ते सगळ्या प्रकारचं नुकसान असू शकतं. फेसबुकचं अकाऊंट हॅक झालं तर सामाजिक नुकसान होईल; टेड्रिंग किंवा बॅकेचं खातं हॅक होऊ शकतं; आपल्या नावानं कुणा भलत्याच माणसाला कर्ज मिळू शकतं.
ऐसी अक्षरे – सोशल मिडीया मध्यवर्ती ठेवून बोलायचं तर लोक आपला डेटा तिकडे ठेवतात. फोटो, व्यक्तिगत मेसेजेस वगैरे. त्यावरून सोशल मिडीया कंपन्यांना आपल्याबद्दल काय ठोकताळे बांधता येतात याबद्दल काही सांगाल का? अनेकदा लोकांना ते कळत नाही.
याला जोडून उपप्रश्न 'मी काही वेडंवाकडं वागतच नाही तर मला कशाला याची काळजी' असं म्हणणारे लोक असतात. किंवा 'मी सोशल मिडिया वापरतच नाही तर मी कशाला याची काळजी करू' असं म्हणणारेही लोक असतात. त्यांना तुम्ही काय सांगाल?
विजय – या कंपन्यांना आपल्याबद्दल काय माहिती आहे, याचे दोन भाग आहेत. कंपन्यांना काय माहीत आहे, आणि कुठली माहिती वापरण्याचा कायदेशीर हक्क आहे. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. या कंपन्यांकडची आपल्याबद्दलची बरीचशी माहिती वापरता येत नाही; आणि याची खातरजमा करण्याचे मार्गही आहेत. त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हरकत नाही.
आपण स्वेच्छेनं जी माहिती देतो, ती अर्थातच या कंपन्यांकडे आहे. आपल्या पोस्टी, कुणाला/कशाला लाईक केलं आहे; आपण तिथे टाकत असलेले फोटो, व्हिडिओ असतात; आपण फेसबुक मेसेंजरवर लोकांना निरोप ठेवतो; या प्राथमिक गोष्टी झाल्या. या शिवाय आपण न्यूज फीड बघतो. तिथे आता दिसणाऱ्या गोष्टी फक्त आपल्या मित्रमैत्रिणींचाच असेल असं नाही. त्यातला कुठलं कंटेंट आपण किती काळ बघितलं, कधी सुरू केलं, कधी सोडलं, त्याच्यासारखाच आणखी कुठलं कंटेंट बघितलं, ही माहिती फेसबुककडे आहे. फेसबुकच नाही, तर स्नॅपचॅट, यू ट्यूब, इन्स्टाग्राम या सगळ्यांकडे आहे. एक व्हिडिओ बघितला तर पुढचा कुठला बघायचा, हे गणित त्या माहितीतून येतं. तर यांतली काही माहिती आपण स्वेच्छेनं दिलेली आहे. काही आपला वापर बघून तयार होते.
दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे फेसबुकचा सोशल ग्राफ. सगळे वापरकर्ते आणि कोण-कुणाचे 'फ्रेंड्स' आहेत, आणि त्यांच्याशी जोडलेले लोक आहेत, असं. तर फेसबुकवर २ अब्ज लोक आहेत. हे सगळे लोक कोण कोणाशी जोडलेले आहेत यांचा आलेख फेसबुकसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यातून कुणी कुणाशी 'मैत्री' करावी याची रेकमेंडेशन त्यांना तयार करता येतात. आपण आणि ती व्यक्ती यांच्यात किती समान दुवे आहेत, कॉमन कनेक्शन आहेत हे दिसतं. या आलेखातले तपशील मग वाढत जातात. त्या आलेखातूनच बरीच माहिती मिळते.
नेटवर्क-ग्राफची संकल्पना
आपल्याला आपल्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत असतात त्यामुळे त्यात आपल्याला फार नवल वाटत नाही. पण जेव्हा अब्जावधी लोक फेसबुक वापरतात, तेव्हा त्यांच्याबद्दल अशी माहिती असणं विशेष आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कुठे राहते, हे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे बघून सांगता येतं. कारण बहुतेक कनेक्शन स्थानिक असतात. कुठल्या फेसबुक ग्रूपमध्ये हे लोक असतात, यावरून त्यांच्या सांस्कृतिक, राजकीय, धारणा, affiliations काय आहेत, कुठल्या खेळांत कुणाला रस आहे ही माहिती त्यातून शोधता येते. हा माहितीचा तिसरा भाग. ही बाब आपल्या वर्तनातून शोधता येते. ही माहिती १००% विश्वासार्ह असेल असं नाही. पण ती खरी असण्याची शक्यता बरीच जास्त असते. कुणी अझरबैजानमध्ये राहत आहेत पण त्यांचे सगळे मित्रमैत्रिणी सॅन डिएगोमध्ये आहेत, हे शक्य आहेच, पण असे लोक फार कमी असणार!
ऐसी अक्षरे – यातल्या non-intuitive, अनपेक्षित गोष्टी कुठल्या असतील? आपण कुठे राहतो, याचा अंदाज अल्गोरिदम असणार हे अपेक्षित आहे.
विजय – आपल्या राजकीय धारणा काय आहेत? अमेरिकी संदर्भात व्यक्ती डेमोक्रॅट आहे का रिपब्लिकन आहे, किंवा भारतासंदर्भात मोदींच्या बाजूचे आहात का विरोधक आहात, हे बऱ्यापैकी निश्चितपणे सांगता येतं. आपण कुठली पानं वाचतो, आपलं मित्रमंडळ काय कसं आहे यावरून. कुठले खेळ तुम्हांला आवडतात, यांतली तुमची आवडती टीम कुठली, हे सांगता येईल. साधारणपणे, रोजचे व्यवहार काही अंशी सांगता येतात. वेगवेगळ्या ॲप्लिकेशनची उदाहरणं घेऊ. फेसबुक आपली लोकेशन ट्रॅक करत नाही, पण गूगलला माहीत असतं. आपण रोज कुठे जातो, हे गूगलला साधारणपणे माहीत असतं. मी सकाळी गाडीत बसलो की गूगल मॅप मला सांगतं की इथे जाण्यासाठी १७ मिनिटं लागतील. मी सोमवार ते शुक्रवार कुठे जातो हे त्यांना व्यवस्थित माहीत आहे. शिवाय मी जातो त्या ठिकाणी नक्की काय आहे, हेही त्यांना माहीत आहे; ठरवलं तर कुठे काम करतो याची माहिती त्यांना शोधता येईल. किमान काही लोकांच्या बाबतीत अशी माहिती शोधता येईल.
आपण कुणाशी मेसेजिंग करतो ही माहितीही असते. व्हॉट्सॅपचं उदाहरण पाहू. ते तसं निराळं आहे, कारण त्यातले निरोप एनक्रिप्टेड असल्यामुळे त्यांना वाचता येत नाहीत. पण कोण, कुणाशी, किती, कधी बोलतात, ही माहिती, हा मेटाडेटा त्यांना उपलब्ध असतो. आपल्याला लिंक आली तर ती आपण लगेच क्लिक करतो का, हे समजतं; कुठली लिंक हे समजलं नाही तरीही.
ऐसी अक्षरे – Not only sexual inclination and preferences based on your behaviour.
विजय – नक्कीच.
ऐसी अक्षरे – थोडं वेगळं उदाहरण बघू. मुंबई हे मोठं शहर आहे. तिथे फक्त खूप माणसं आहेत असं नाही. ती माणसं वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरांमधली असतात. एखादा व्यावसायिक आणि बँक-कर्मचारी यांचा आर्थिक स्तर एकसमान असेल, पण त्यांच्या सोशल मिडीया वापरांत, वर्तनांत खूप फरक असू शकतात. आणि त्यांचा सामाजिक स्तर निराळा असल्यामुळे त्यांचे पैसा खर्चण्याचे पॅटर्नही निराळे असू शकतात, ते वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा विकत घेत असतील. त्यामुळे त्यांना दिसणाऱ्या जाहिरातीही निराळ्या असण्याची अपेक्षा असते. अशा पद्धतीच्या गोष्टी कळतात का, त्याचं काही केलं जातं का?
विजय – ॲड टार्गेटिंगमध्ये दोन-तीन पद्धती आहेत. यात आपण मघाच्या एका प्रश्नाकडेही येऊ कारण ते संबंधित आहेत.
ॲड टार्गेटिंगचा एक भाग जो प्रश्नातच आहे. लोकांचं वर्तन, इतर मेटाडेटा, हे वापरून ॲड टार्गेट करणं. दुसरा भाग, जाहिरातींचा काही भाग ट्यून करणं. अगदी रँडमपणे काही सुरुवात केली, तरीही फिडबॅक वापरत राहिल्यावर एका ठिकाणी पोहोचू. प्रत्यक्षात या दोन्हींचा वापर केला जातो. गूगलचा जाहिरातीचा व्यवसाय हा जगातला सगळ्यात fine-tuned व्यवसाय म्हणता येईल. जाहिराती गूगलकडे दिल्या ते खूप बारीक बारीक गोष्टी मोजतात. शिवाय गूगल वापरणाऱ्या लोकांची संख्या एवढी महाप्रचंड आहे की अगदी बारकेबारके बदलही त्यांना दिसतात, मोजता येतात.
उदाहरणार्थ, मला बरेचदा लोक विचारतात. गूगलवर शोधल्यावर बाजूला ज्या जाहिराती दिसतात त्यांचा काय उपयोग आहे? मी ते एकदाही वापरलेलं नाही. माझ्या माहितीतल्या कुणीही त्या जाहिरातींवर क्लिक केलेलं नाही. हे खरंच आहे. कारण हजारोंमधलं एक कुणी त्यावर क्लिक करतात. आणि आपल्याला हजारो लोक माहीत नसतातच. हजार हा आकडा गूगलसाठी मोठा नाहीये, कारण अब्जावधी लोक गूगल वापरतात. The human capability to compute differential between small probabilities isn't good. आपण ते शून्यच समजतो.
यंत्रांचं तसं नाही. दहा हजारांत दोन लोकांनी क्लिक केली एखाद्या अल्गोरिदमनं दाखवलेली जाहिरात, का अडीच लोकांनी, यात गूगलला मिळणारा पैसा खूप बदलतो. हे आकडेमोड करून आकळणं कठीण आहे; प्रत्यक्ष प्रयोग केल्यावरच ही माहिती मिळू शकते.
ऐसी अक्षरे – थोडं अवांतर आहे हे, पण तुम्ही म्हणालात आपल्याला हजारो लोक माहीत नसतात, त्यावरून डनबार्स नंबर आठवला. मानववंशशास्त्रात (anthropology) म्हणतात, आपल्या पहिल्या कक्षेत अगदी जवळचे लोक मित्र, नातेवाईक मिळून फार तर शंभर-दीडशे लोक असतात. त्या पलीकडे आपल्या मेंदूच्या neocortexमध्ये माहिती जमा करण्याची क्षमता नसते. माणसांवर असणारी ही मर्यादा आणि त्या उलट गूगल आणि फेसबुककडे असणारी अब्जावधी लोकांची माहिती जमवण्याची, आणि त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता यांची जाहिराती दाखवताना काही सांगड घातली जाते का?
विजय – मघाच्या दोन उपप्रश्नांशीही याचा संबंध आहे. 'मला काही लपवायचं नसेल तर माझी माहिती असू देत की' किंवा 'मी सोशल मिडियावरच नाही तर मला काय त्याचं!' हे दोन प्रश्न. पहिली भूमिका आहे ती व्यक्तिगत पातळीवरची आहे. वस्तुनिष्ठपणे हेच योग्य किंवा अयोग्य असं म्हणता येत नाही. तसं ठरवण्याआधी हे लक्षात घ्यावं की लपवायचं नसलं तरीही डेटा गैरवापरामुळे आपल्या व्यक्तिगत गोष्टी उघड होणं एवढाच तोटा यात नाही. व्यवहाराचा विचार करता, फसवाफसवीची शक्यता वाढते. Phishing, स्कॅम करणाऱ्यांना याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. आपली आयडेंटिटी चोरली जाऊ शकते, आणि ही काही बरी गोष्ट नाही, अगदी आपल्याकडे लपवण्यासारखं काही नसेलही! त्यातून नुकसान होणारच. आपल्या नावानं कुणी कर्ज घेतलं, आणि त्यांनी त्याची परतफेड केली नाही तर त्याचा आपल्याला त्रासच होणार. शिवाय हे लगेच समजणारही नाही. असं बरंच नुकसान त्यात आहे.
दुसरा भाग, जर सोशल मिडियावर नसाल. तर सोशल मिडिया हा एक महत्त्वाचा भाग झाला. आपण मघापासून आपला डेटा सुरक्षित ठेवणं आणि आयडेंटिटी सुरक्षित ठेवणं या दोन विषयांबद्दल बोलत आहोत. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. आयडेंटिटी चोरली तर डेटा चोरणं सोपं होईल, पण आपलं नुकसान फक्त तेवढंच होईल असं नाही.
समजा जरी कुणी सोशल मिडियावर नाहीत, आणि त्यांची आयडेंटिटी चोरली गेली तरीही नुकसान होणारच. त्यांच्या वर्तनाचा डेटा किंवा अपलोड केलेल्या गोष्टी चोरता येणार नाहीत. हे फक्त सोशल मिडियाचं झालं. तिथे नसणारे लोक समजा नेटफ्लिक्स वापरत असतील, तर त्या वापराचा डेटा असतोच. कुठला सिनेमा, किंवा मालिका कधी सुरू केली; काय आवडलं; किती वेळा बघितलं; हा खूप डेटा त्यांच्याकडे आहे.
हे आकलन महत्त्वाचं आहे. आपण काय वापरतो यावरून काय प्रकारचा डेटा आपण जाणूनबुजून किंवा न समजता देत आहोत, हे आकलन.
ऐसी अक्षरे – घरचे लोक ज्या वस्तू विकत घेण्यासाठी सर्च करतो; त्यांच्या जाहिराती आपल्याला फेसबुकवर दिसतात.
विजय – ॲड टार्गेटिंगमध्ये डनबार नंबरचा उल्लेख झाला, ते थेट तिथे वापरत असतील असं वाटत नाही. तो आकडा आपल्या मेंदूच्या क्षमतेबद्दल आहे. यात डेटा मायनिंगची अल्गोरिदम वापरली जातात; त्यात मानवी मर्यादा येत नाहीत.
ऐसी अक्षरे – डनबार नंबरचा संदर्भ ग्राफमध्ये वापरला जातो का? किती फ्रेंड सजेशन किंवा आपल्याला काय, किती गोष्टी आवडतील यात मानवी मेंदूच्या मर्यादेचा विचार केला जातो का?
विजय – फेसबुक, गूगल वगैरेंचं बरंचसं काम चालतं ते मूलभूत संकल्पनांपासून सुरू होत नाही. First principles do not matter. म्हणजे काय, फेसबुक जे काही करतं ते सगळे सामाजिक प्रयोग समजा. उदाहरणार्थ, डनबार नंबर विचारात घ्यावा का नाही? यात सुरुवातीला काय गृहीतक होतं यामुळे फार फरक पडत नाही. ते प्रयोग सुरू करतात आणि त्यात कुठली बाजू जिंकली हे कसं मोजायचं हे त्यांना माहीत असतं. त्यानुसार ते बदल करत जातात. हे काहीसं उत्क्रांतीमधल्या नैसर्गिक निवडीसारखं आहे, अर्थात यात नैसर्गिक म्हणावं असं काहीही नाही.
पण नैसर्गिक निवडीमध्ये सुरुवातीला चांगलं डिझाईन म्हणजे काय हे माहीत असण्याची गरज नसते. प्रयोगाची निवड योग्य केली तर आपण चांगल्या डिझाईनकडे जरा लवकर पोहोचू. या प्रयोगांमधून जे निर्णय घेतले जातात, त्यांचं वर्णन शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे. हे गुंतागुंतीचं आणि प्रचंड मोठं न्यूरल नेटवर्क आहे; यात कुठल्या तरी नोडचं वजन ०.३७ आहे आणि आणखी कुणाचं वजन ०.४२ आहे. असे हजार नोड्स आहे या निर्णयात. हा निर्णय का घेतला या कारणात आपल्याला मनुष्य म्हणून काही एक अपेक्षा असते. पण तशी रचना या बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत नाही. प्रयोग केला, त्यातून जे निकाल आले, त्यातून पुढची रचना बदलली; मग आणखी प्रयोग केले, रचना बदलली, असं करत गेले. त्यामुळे 'का' याचं समाधानकारक उत्तर देता येणार नाही.
हे मानवी मेंदूसारखंच काहीसं आहे. आम्ही असे काही प्रयोग कधीकधी माणसांवर करतो. चॉकलेट आईस्क्रीम का व्हनिला, असा प्रश्न असेल. लोक काही उत्तरं देतात, चॉकलेट आवडतं किंवा काही. शेवटी अनेक कारणांमुळे हा निर्णय घेतलेला असतो.
ऐसी अक्षरे – ॲड टार्गेटिंगबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात की अनेक लोक अभिमानानं सांगतात, मी कधी जाहिरात उघडून बघितलीच नाही. पण आता लक्षात येतं की जाहिरात हा एक भाग झाला. गृहीतकं आणि प्रयोगांच्या निष्कर्षांवरून ते ठरवत असतील की आपल्याला कुठली रील दिसतील, लिंक्स दिसतील, जे फीडमध्ये दिसतं ते फक्त फ्रेंड्स किंवा आपल्या लाईक्स-वर्तनातून जे ठरवता येणार नाही, अशाही अनेक गोष्टी दिसायला लागल्या आहेत. हे नवीनच सुरू झालेलं आहे. अंदाज असा की आपल्याला काय आवडतं, आपण काय बघतो, ते हे अल्गोरिदम शोधत राहतं. त्याबद्दल काही सांगाल का?
विजय – फेसबुक ही 'सोशल नेटवर्किंग' साईट होती. याच नावाचा सिनेमाही आला होता. आता त्याला 'सोशल मिडिया' म्हणतात, नेटवर्किंग हा शब्द मागे पडला. हा बदल त्या प्रॉडक्टमध्ये काय बदल होत गेले याच्याशी समांतर आहे. पहिला न्यूजफीड आला तो आपल्या फ्रेंड्सनी केलेले अपडेट, आणि सगळ्यात नवा अपडेट सगळ्यात वर असा तो सुरू झाला.
नंतर कधी तरी टिकटॉक आलं. टिकटॉकवर ग्राफ/आलेख हा प्रकारच नाही. काही व्हिडिओ दाखवले, त्यांतल्या काहींवर आपण क्लिक केलं आणि तेच आपलं फीड. कुणी मित्रमैत्रिणी आहेत, किंवा फॉलो करणं अशी मॉडेलं नाहीत, किमान महत्त्वाची नाहीत. त्यांचं यश प्रचंड आहे. मग ते मॉडेल सगळ्यांनीच स्वीकारलं. यूट्यूबनं 'शॉर्ट्स' सुरू केले' 'इनस्टाग्राम'वर रील्स आली. आलेखाच्या बाहेरून काही कंटेंट दाखवणं आणि लोकांना गुंतवून ठेवणं ही पद्धत तिथे सुरू झाली. न्यूज फिडमधला बदल टिकटॉकमुळे सुरू झाला. आलेख/ग्राफ ही एकच मौल्यवान चीज नाही. लोकांना काय बघायला आवडतं हे आलेखातून आलं काय किंवा आणखी कुठून आलं हे महत्त्वाचं नाही. लोकांनी त्याकडे लक्ष दिलं का, ही एंगेजमेंट महत्त्वाची.
ही सगळी यंत्रणा कशी चालते तर कुणी तरी, कुठे तरी आलेखाबाहेरचं काही दाखवेल आणि या प्रयोगाला दहा फाटे फुटतील. सुरुवातीला साधं गृहीतक असेल. लोक काय बघतात यावरून फिडबॅक आला की मग अल्गोरिदम सुधारायला लागतं. आकड्यांचा अंदाज येण्यासाठी फेसबुकवर साधारण २ अब्ज सक्रिय वापरकर्ते दर दिवशी असतात. एखादा प्रयोग करून बघायचा तर समजा १% लोकांवर केला तर ९९% लोकांना अजून हे दिसलेलंच नाही. हा ०.१% म्हणजे २ दशलक्ष झाले. हा खूप मोठा आकडा आहे. समजा या प्रयोगाला पाच फाटे फोडले, २ दशलक्ष लोकांचे पाच गट करतात. प्रत्येक गटाला एकेका पद्धतीनं निराळं काही कंटेंट दाखवतात. न्यूज फीडच्या बाहेरचं काही कसं दाखवायचं, यासाठी ५ निरनिराळे अल्गोरिदम लावून प्रयोग करता येतील. निवडणुकांसाठी जे अंदाज घेतात त्यात साधारण हजारांवर माणसं असतात. पण फेसबुकच्या प्रयोगांमध्ये खूप चांगला डेटा गोळा केला जातो.
मग पाचांपैकी एक प्रयोग सफल होतो; मग पुढच्या पातळीवरचा प्रयोग सुरू होतो. आणखी काही नवीन तत्त्वं वापरून त्या अल्गोरिदममधून आलेला कंटेंट दाखवला जातो. असे समजा पाच पातळ्यांवर प्रयोग केले तर पाचाचा पाचवा घात, म्हणजे ३१२५ प्रयोग केले असं म्हणता येतं. फेसबुक वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे हे प्रयोग खूप पटापट करता येतात. पण समजा तो एकशे सदतिसावा पर्याय का निवडला नाही, याचं कारण सोप्या शब्दांत सांगता येणार नाही. त्यात empirical data तसा आहे, हेच उत्तर आहे.
ऐसी अक्षरे – मग असं म्हणता येईल की यंत्रणा जशी मोठी होत जाते तशी ती न-नैतिक, apersonal होत जाते? आकारमानामुळे नैतिकता आणि व्यक्तिगत निर्णय यांच्यात फारकत निर्माण होते? जसा उत्क्रांतीला काही हेतू नाही, 'निसर्ग असं असं करतो' हे बारक्या गटाबद्दल म्हणता येईल. पण असंच का झालं, असं सांगता येत नाही.
विजय – हो; पण त्यात एक खूपच मोठा फरक आहे. नैसर्गिक निवडीच्या खेळाचे नियम आणि त्यांत काय चालतं हे आपसूक ठरतं. ते कुणी व्यक्ती ठरवत नाही. सोशल मिडियामध्ये ऑप्टिमायझेशन केलं जातं. कुठल्याही प्रयोगाचं फलित म्हणजे अधिक एंगेजमेट हे कुणी व्यक्तींनी ठरवलं आहे. यात हेतू येतो. उत्क्रांती आणि नैसर्गिक निवडीमागे असा हेतू नाही; फक्त टिकून राहणं, survival हेच महत्त्वाचं आहे. पण ते कुणी सांगितलेलं नाही; हा निसर्गनियम आहे. त्यात कुणाला श्रेय किंवा दोष देता येत नाही. पण सोशल मिडियाबद्दल असं म्हणता येत नाही.
ऐसी अक्षरे – शिवाय उत्क्रांतीमध्ये म्यूटेशन होतात, ती इथे नाहीत. मात्र लोक म्हणतात की फेसबुक माझं मोबाईलवरचं बोलणं ऐकतंय आणि त्यानुसार काही बदल करत आहेत. तर कुणी ते असं ऐकत नाहीये आणि एका माणसाच्या आवडीनिवडीपेक्षा हे बरंच मोठं, व्यापक आहे.
विजय – एका अर्थानं हे खरं आहे. कुणी माणसं तिथे कान देऊन ऐकत नाहीयेत. यातून आपल्याला जरा हायसं वाटावं का? बहुतेक नाहीच. माणसानं ऐकण्यापेक्षा अल्गोरिदमनं ऐकणं बरं, पण ते तेवढंच. एका मोठ्या डेटाबेसमध्ये आपलं वर्तन साठवून ठेवलं; मग त्यात कुणी माणसानं डोकावायचं नाही असे नियम आहेत, ते पाळले जातात, वगैरे.
यंत्रणेला स्वतःचंच एक आयुष्य असतं. ती जिवंत नसली तरी ती तशी वागते.
ऐसी अक्षरे – एक जरा वेगळ्या दिशेचा प्रश्न आहे. निवडणुकांपासून स्कँडलं सुरू झाली, यात एक मोठा भाग होता की कुणी तरी आपल्याला एका दिशेनं मॅनिप्युलेट करत आहेत. रशिया असेल, ट्रंपच्या बाजूनं असेल किंवा भारतात आणखी निराळा संदर्भ असेल. लोकांना आपल्या राजकीय धारणा बदलण्यासाठी काही केलं जातं, असं वाटतं. याबद्दल काय म्हणाल?
जोडून एक प्रश्न आहे. लोकांनी फेक आयडी तयार करून अमक्या नेत्याला इतके लाईक्स, फॉलोअर्स किंवा कॉमेंट्स मिळाल्या असं भासवलं. पण ते वापरणारे लोक फारच मर्यादित होते. यात राजकीय हेतू होते. याबद्दलही काही?
विजय – यात वेगवेगळे अक्ष आहेत. यात एक जेन्युइन आणि नियमांना धरून एक बाब आहे. लोकांची असणारी मतं अधिक दृढ करणं. किंवा लोकांना मत बदलायला लावून आपल्या सारखा विचार करायला लावणं. दोन्ही कायदेशीर आहे. हे बऱ्याच काळापासून सुरू आहे, लोकशाही पद्धतीत हे चालतं. दुसरा अक्ष असा की गोंधळ निर्माण करायचा. याला काहीही अंतिम ध्येय नाही. रशियाच्या ढवळाढवळीचा आरोप होतो, तो हा गोंधळ निर्माण करण्याचा आणि बाहेरून मुद्दाम एका उमेदवारासाठी सहानुभूती तयार करण्याचाही. तिसरी गोष्ट, यात किती कायदेशीरपणा आहे. शेकडो फेक आयडी वापरून लोकांची मतं बदलणं; मतं बदलणं ग्राह्य असलं तरी फेक आयडी वापरून करणं कायदेशीर नाही.
फेसबुकच्या फीडवर काही लिहिणं किंवा यूट्यूबवर व्हिडिओ चढवणं हे कायदेशीर आहे. यातही यंत्रणा निर्माण होत आहे. राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचं सोशल मिडीया मॅनेज करायला लागले आहेत. भारतात व्हॉट्सॅप ग्रूप मोठ्या प्रमाणावर चालतात; हे मेसेजेस कुठल्या एका मुद्द्यापाठी जनमत उभं करू पाहतात. ते मेसेजेस पसरतात.
पूर्णतः कायदेशीर ते पूर्णतः बेकायदेशीर असा मोठा पट आहे; त्यात अधल्यामधल्या गोष्टी चालतात. यात इनफ्लुअन्सिंग असतं. त्यात बेकायदेशीरपणा येतो तेव्हा तो इंटरफिअरन्स होतो. व्हॉट्सॅपवर याचा माग ठेवणं कठीण आहे; कारण एक मेसेज किती लोकांना गेलं हे व्हॉट्सॅपच्या बाहेर कुणालाच माहीत नाही.
ऐसी अक्षरे – कुठल्या गोष्टी बेकायदेशीर होत्या; आणि त्या लोकांच्या लक्षात आल्या नाहीत. लक्षात आल्यावर त्याबद्दल फेसबुकनं कारवाई करावी, अशी मागणी झाली, याची काही उदाहरणं द्याल का?
विजय – यात फेसबुकसमोर यक्षप्रश्न आहे. त्याची मुख्य बाजू, कुणी तरी खोटं बोललं तर त्यावर फेसबुकनं काही कारवाई करावी का? या मागचा मुख्य प्रश्न आहे की misinformationचं काय करावं. मी फेसबुक म्हणालो तरी ते सगळ्याच सोशल मिडियाला लागू आहे – ट्विटर, स्नॅपचॅट, वगैरे.
खोटं बोलू नये, पण खोटं बोलणं हा गुन्हा नाही; तो अधिकार सगळ्यांना आहे. फक्त शपथेवर खोटं बोलणं हा गुन्हा आहे. बहुतेकदा खोटं बोलणाऱ्यांना असं वाटतं असतं की ते बोलतात ते खरं आहे. त्यांनी बोलावं का, हे फेसबुकनं ठरवावं का?
एकदा ठरवलं की खोट्याच्या जवळ जाणारं सगळं बंद करा तर असं पाहा की आतापर्यंतचे सगळे जग बदलून टाकणाऱ्या बदलांच्या विरोधात अख्खं जग होतं. गॅलिलिओला तुरुंगवास झाला आणि त्याला त्याचे शब्द मागे घ्यावे लागले. हा कठीण प्रश्न आहे.
ऐसी अक्षरे – कोव्हिडची साथ सुरू होती तेव्हा वैद्यकीय misinformation सोशल मिडियातून प्रसारित होत होती. जर जीवनमरणाचा प्रश्न आला तर फेसबुकनं त्याबद्दल काही करावं का?
विजय – प्रश्न असा असतो की खरंखोटं ठरवण्यासाठी काही वस्तुनिष्ठता आहे का, त्यातली वस्तुनिष्ठता किती आहे? वैद्यकशास्त्र अनेकदा चुकीचं ठरलेलं आहे.
ऐसी अक्षरे – भारतात बसून गमतीशीर प्रकार दिसायला लागला. कोव्हिडची साथ सुरू झाल्यापासून मास्क घालायला लेजिटिमसी आली. बाहेर जाताना मास्क वापरणं सक्तीचं झालं. भारतात लोकांना तो कॉमन सेन्स होता. श्वसनमार्गाचा रोग असेल तर मास्क घालणं योग्य आहे हे लोकांना समजत होतं. मग तो मास्क किती जाड वगैरे तपशील सध्या सोडून देऊ. पण मास्क घालणारच नाही, असं म्हणणाऱ्या माणसांना काही लेजिटिमसी द्यावी, यात व्यक्तिगत निवड आहे हे मान्य करूनही, मास्क घालून रिस्क कमी होती ही गोष्ट लक्षात आली, समजली आणि भारतात याबद्दल काहीच वाद झाले नाहीत. अमेरिकेत कुणी हे म्हणायला तयार नव्हतं.
एका प्रगत देशात मोठ्या प्रमाणावर अज्ञान वाढलं, आणि त्याला सोशल मिडिया कारणीभूत होतं, ही गोष्ट धक्कादायक होती.
विजय – यातल्या दोन गृहीतकांबद्दल, माझी व्यक्तिगत मतं बाजूला ठेवून मी दोन आक्षेप मांडतो.
पहिलं, 'हे अज्ञान होतं' हे गृहीतक. मास्कनं सरसकट आणि सर्वांना फायदाच होतो हे तितकंसं खरं नाही. दुसरं, व्यक्तिगत निर्णयस्वातंत्र्य आणि मास्कसक्ती यांचा तोल साधणं.
मास्क घालण्याचे तपशील बघू. काय वयाच्या मुलांनी मास्क घालावा? मास्कचे अभावितपणे जे दुष्परिणाम होतात त्यांचं निवारण कसं करावं? उदाहरणार्थ, २-५ वर्षं या वयोगटातली अनेक मुलं दोनेक वर्षं मास्कसह शाळेत गेली. मुलांच्या मानसिक वाढीसाठी या वयात चेहऱ्यावरचे हावभाव पाहणे, समजून घेणे हे महत्त्वाचं असतं. त्याशिवाय मुलांचं जे नुकसान झालं त्याची तुलना कोव्हिड टळण्याशी कशी करायची? How to balance the risk and rewards? पंचवीस वर्षांच्या ॲथलीटला कोव्हिडचा धोका फारसा नव्हताच, हेही उशिराने का होईना पण आता पक्कं समजलं. हे तपशील ध्यानात घेता सरसकट सर्वांना मास्कच्या फायद्यातोट्याचं गणित सारखंच लागू पडेल ही आशा फोल दिसू लागते.
तर मास्क या विषयाचा आवाका मोठा आहे. अमेरिकेत लोकांची प्रतिक्रिया कशाला आली तर सगळ्यांना एकच उत्तर आणि सरकारी सक्ती यांवर. अमेरिकेत व्यक्तिगत स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणावर जपलं जातं. मला जे पर्याय आहेत, त्यात सरकारनं लुडबूड करू नये असा भाव त्यामागे असतो. या पार्श्वभूमीवर मास्कचा विचार करावा लागेल.
थोडं टोकाचं उदाहरण घ्यायचं तर असं पाहा, की फ्रेंच फ्राईज रोज खाणं वाईटच आहे; याबद्दल कुणी आक्षेप घेणार नाही. पण त्याकरता सरकारनं जर नियम केला की आठवड्यातून दोनदाच फ्रेंच फ्राईज खाता येतील, तर त्याला विरोध होईल. अर्थात याविरुद्ध विचार होता की फक्त तुम्हाला कोव्हिड होऊन फक्त तुमचंच नुकसान होईल असं नाही. तुम्हाला कोव्हिड झाला तर तुमच्यामुळे इतरांनाही तो होऊ शकतो, आणि त्याचा public health crisis होऊ शकतं.
हाच तर्क लशींबद्दलही होता. नंतर लक्षात आलं की काही strainsनंतर लशींचा प्रभाव कमी व्हायला लागला.
एकंदरीत मुद्दा इथे असा आहे की हे सर्व बाजूंचे विचार मांडू देणं हे गरजेचं आहे. त्यावरूनच सारासार चर्चा होऊन नक्की योग्य पावलं काय ते समाज ठरवू शकतो. सोशल मीडिआ कंपन्यानी वरकरणी चुकीचे वाटणारे विचार पटकन misinformation म्हणून दाबून टाकले तर त्यात समाजाचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.
ऐसी अक्षरे – हे मान्य आहे. पण जिथे धडधडीत खोटं बोललं जातंय याबद्दल सोशल मिडियानं काही करावं का?
विजय – खोटं आहे हे ठरवण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रमाण, स्टँडर्ड काय? सध्या आपण ठामपणे कशाबद्दल असं म्हणू शकतो की कुठली बातमी खोटी आहे?
ऐसी अक्षरे – ट्रंपचा दावा, ओहायोमधल्या स्प्रिंगफील्डमधले आयतीचे इमिग्रंट पाळीव प्राणी खातात, ते काही खरं नाहीये! (सगळेच हसले.)
किंवा पृथ्वी सपाट नाहीये.
आणि यात एक वाढीव मुद्दा आहे तो जनरेटिव्ह एआय वापरून लिहिलेल्या गोष्टी.
चक्षुर्वे सत्यम्!!!
विजय – हा तर फँटास्टिक मुद्दा आहे. सपाट पृथ्वी किंवा माणसं पाळीव प्राणी खात आहेत या कॅरिकॅचर छापाच्या गोष्टी चूक आहेत हे सहज सांगता येईल. ज्यांबद्दल वाद झाला त्या गोष्टी एवढ्या सोप्या नव्हत्या.
ऐसी अक्षरे – तपशील सोडून देऊ. जर हे स्पष्टपणे माहीत असेल की अमुक एखादी गोष्टी चुकीची माहिती आहे, तर सोशल मिडियानं काय करावं? ज्या लोकांना ही चुकीची माहिती दिसत आहे, त्यांना त्याबद्दल काही वॉर्निंग मिळावी का?
कुठल्या देशात काय कायदेशीर आहे, हे त्या-त्या विधीमंडळानं ठरवावं का? किंवा दुसऱ्या शब्दांत सोशल मिडिया हे public goods आहे का, जर पब्लिक गुड्स असेल तर सरकार त्याबद्दल कायदे बनवणार. जर खूप लोक एखादी गोष्ट वापरत आहेत, उदाहरणार्थ शाळा, शिक्षण. प्राथमिक शिक्षण सगळ्यांसाठीच असतं. तर त्यावर सरकारचं नियंत्रण असतं. सोशल मिडिया बहुतेकसे लोक वापरतात, आणि सगळ्यांच्या आयुष्यांवर त्यांचा परिणाम होतो हे आपण मगाशी बोललो. तर ते पूर्णतः खाजगी अधिकारक्षेत्रातच असावं का?
विजय – हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. समजा आपण पाच लोक मिळून एका कॉलवर जमलो आहोत. हे आपलं खाजगी संभाषण आहे. समजा हे वाढवून याची पॉडकास्ट सुरू केली, त्यावर काही प्रतिक्रिया आल्या त्यात काही चुकीची माहिती आहे. तर आपण त्याबद्दल काय करावं, हे कोण ठरवणार? आपण पाच लोक का सरकार?
सोशल मिडियानं काय करावं हे कोण ठरवणार, सोशल मिडिया का सरकार?
ऐसी अक्षरे – आणखी एक कल्पित प्रश्न आहे. यूट्यूबवर काही प्रमाणात नियमन आहे. समजा ते नियमन बंदच केलं आणि तिथे गुन्ह्यांचे, कायदा मोडण्याचे व्हिडिओ यायला लागले, आणि ते चूक आहे हे मान्य केलं तर हा प्रॉब्लेम यूट्यूबचा आहे का नाही, कारण त्यांनी पुरेसं नियमन केलं नाही.
विजय – समजा १९६० साली डायलअप फोनवर कुणाला गुन्हा केल्याचं ऐकू आलं तर तो MTNLचा प्रॉब्लेम आहे का?
ऐसी अक्षरे – MTNL आणि यूट्यूबमध्ये मोठा फरक आहे. किती लोक आपलं बोलणं ऐकत आहेत. MTNLवर एका वेळेस फार तर एक-दोन लोक असतील. यूट्यूबवर ते कंटेंट खूप जास्त लोक ऐकतात. हा प्रमाणाचा फरक आहे.
विजय – या प्रश्नांचं मूळ अमेरिकेत आहे ते सेक्शन २३०. भारत आणि युरोपात याबद्दल निराळे कायदे असतील. तर अमेरिकेत या कायद्यानुसार माहितीचे प्रकाशक आणि वितरक असा फरक केला आहे. उदाहरणार्थ, पेपरात काही छापलं तर ती प्रकाशकांची जबाबदारी. पण वर्तमानपत्रं विकणारे स्टॉल हे फक्त वितरक. अमेरिकी विधिमंडळानुसार पेपरात काही चुकीचं छापलं असेल तर ती स्टॉलवाल्यांची जबाबदारी नाही. सोशल मिडिया कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त वाटप करणारे लोक आहोत, आम्ही प्रकाशक नाही. हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे खरा.
त्यांचं म्हणणं, आम्ही काही कंटेंट तयार करत नाही. लोक कंटेंट तयार करतात, आम्ही तो फक्त दाखवतो. आम्ही प्रकाशक नाही. या तर्कावर येणारे आक्षेप वाढते आहेत. त्यातले काही प्रश्नात आलेच. पेपरच्या स्टॉलशी तुलना आणखी एका प्रकारे चुकीची ठरते. कारण यूट्यूबवर आपल्याला काय दिसतं, हे ठरावीक अल्गोरिदम ठरवतं. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे व्हिडिओ तिथे दिसतात. प्रकाशक आणि वाटप करणारे यांतला मुख्य फरक असा की संपादक/प्रकाशक निर्णय घेतात की कुठल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. वाटप करणाऱ्यांना हा पर्याय नसतो; ते सगळी वर्तमानपत्रं विकणार.
अल्गोरिदम वापरून ठरावीक कंटेंट दाखवायचं का नाही, हा संपादकीय निर्णय समजायचा का नाही, ही त्यातली मेख आहे. हे पुढे न्यायालयात जाईल आणि तिथे निर्णय होईल. अजून ते नीटसं ठरलेलं नाही. यावरून बऱ्याच गोष्टी ठरतील. सोशल मिडियाची जबाबदारी काय? 'मास्क घालून काही उपयोग होत नाही', असं म्हणणारं लेखन त्यांनी पुढेपुढे ठेवलं आणि त्यातून लोक दगावले, तर सोशल मिडीयावर त्याची जबाबदारी आहे का नाही, हे मुद्दे त्या चर्चेत सुटतील. सध्या आपापली मतं.
अल्गोरिदम गुंतागुंतीची आहेत; कुणी माणूस बसून बटणं दाबत नाहीये, पण जे सुरू आहे ते संपादकीय निर्णयापेक्षा खूप निराळं नाही. दुसऱ्या बाजूनं आपल्याला जे बघायला आवडतं, पाहिजे तेच अल्गोरिदम दाखवत आहे; अल्गोदरिदम आपल्या समोर आरसा दाखवत आहे.
ऐसी अक्षरे – पुन्हा सुरुवातीच्या आयडेंटिटीच्या मुद्द्याकडे येऊ. ॲशली मॅडिसनबद्दल माहितीपट आला. त्यांचं सुरुवातीला म्हणणं होतं की तिथे स्त्री-पुरुषांचं तिथलं प्रमाण बऱ्यापैकी समसमान आहे. त्यातले स्त्रियांचे बरेच आयडी डुप्लिकेट होते आणि प्रत्यक्षात स्त्रिया खूपच कमी होत्या. ते प्रमाण कमी आहे, असं खरं सांगितलं असतं तर पुरुष आले नसते आणि नफा फारच कमी झाला असता. खोटं सांगितल्यामुळे पुरुषांना येणारा अनुभव कमअस्सल झाला, त्यामुळे ते पैसे खर्च करणार नाहीत.
मगाशी आपण मास्कबद्दल बोललो त्याबद्दल लोकांची टोकाची मतं आहेत. पण अनेक गोष्टींबद्दल नसतात. निवडणुकांमधली लुडबूडही सोडून देऊ. पण डुप्लिकेट आयडींमुळे वापरकर्त्यांना येणारा कमअस्सल अनुभव याबद्दल या कंपन्या कसा विचार करतात?
त्यांना फेक आयडी शोधता येतात का? त्यावर काही प्रयोग करतात का?
विजय – फेक आयडी या विषयाबद्दल बऱ्याच वेळा “धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय” असं थोडंसं होतं.
बहुतेक कंपन्यांचे वॉल स्ट्रीटवर रिपोर्ट जातात ते आठवड्याला किती यूजर होते, किती एंगेजमेंट होती असे असतात. अचानक मोठ्या प्रमाणात फेक आयडी उडवले तर हे सगळे आकडे कमी होतील. पण त्यामुळे प्लॅटफॉर्मची क्वालिटी सुधारेल. याचा तोल कसा साधायचा हा प्रश्न कठीण आहे. किती फेक आयडी आहेत यावर अवलंबून आहे.
ट्विटर विकत घ्यायच्या आधी इलॉन मस्कनं अशा चौकशा केल्या होत्या, किती फेक आयडीज आहेत.
फेक आयडीबद्दल माझं असं मत आहे – गेम थिअरीनुसार फेक आयडी कोण ते शोधणंच कठीण आहे.
एकदा ती माहिती मिळाली की ती लपवता येत नाही. जर माहिती असेल तर ती जाहीर करावी लागेल; subpoena येतील. ही माहिती जाहीर झाली तर व्यवसायावर विपरीत परिणाम होतील. हे नाकारता येण्याची सोय म्हणून मुळातच फेक आयडी शोधलेच जात नाहीत. अनेक कंपन्यांसाठी फेक आयडी किती, कोण हे माहीत असणं liability ठरते.
ऐसी अक्षरे – इन्स्टाग्रामनं मध्यंतरी असं काही सुरू केलं होतं. किती लोकांना एका वेळेस फॉलो करता येईल, असं काही.
विजय – हे लोक काही करत नाहीत असं नाही, अजिबातच नाही. या बहुतेकशा कंपन्यांमध्ये Trust and Safety teams आहेत. नवे फेक आयडी येऊ नयेत यासाठी त्या काम करत असतात. त्यांनी फेक आयडीसाठी पायघड्या अजिबात घातलेल्या नाहीत. तरीही कुंपणाच्या आजूबाजूनं फेक आयडी येतातच. प्रश्न असा आहे की ते शोधायला जावं का? ते अगदीच हा प्रश्न ऑप्शनला सोडत नाहीत, पण त्यासाठी किती पाठिंबा मिळतो, त्याला किती वेग असतो, असे प्रश्न असतात. जितके प्रयत्न करता येणं शक्य आहे, तितकं करत नाहीत, असं माझं मत आहे.
ऐसी अक्षरे – आता भविष्याबद्दल काही प्रश्न आहे. डिस्टिंक्ट आयडी किंवा अवतार ही संकल्पना आहे, virtual realityच्या जगात. या दृष्टीनं आयडेंटिटी सुरक्षितता या संदर्भात तुम्हाला काय दिसतं? वापरणाऱ्यांवर त्याची काय जबाबदारी असेल? अवतार हे एक उदाहरण घेतलं. सुरुवातीला जसं आपण बोललो की २००४ ते २०१४ या काळात गुंतागुंत वाढली आणि सुरक्षितता या विषयाचे आयाम बदलले.
पुढची पायरी म्हणून virtual realityकडे बघितलं तर त्यात काय बदल होतील असं तुम्हाला वाटतं?
विजय – दोन मोठे ट्रेंड सध्या दिसत आहेत. एक तर जनरेटिव्ह एआय. दुसरं मेटाव्हर्स – virtual reality, augmented reality and anything in between. जेन एआयमध्ये चोरलेल्या आयडीचा दुरुपयोग सहज शक्य होतं. पूर्वी जे बनावट आहे असं सहज समजायचं ते आता तितक्या चटकन आणि सहज समजत नाही. मेटाव्हर्समध्ये दुरुपयोग सध्या तरी फार दिसत नाही, पण अनुभवांची चोरी होऊ शकते.
जेनएआयमध्ये आता व्हिडिओ तयार करता येतात. त्यांतली गडबड सध्या सहज दिसते; पण विचार करा, सध्या व्हॉद्सॅपवरून चुकीची माहिती पसरवणं किती सोपं आहे. उद्याला प्रत्यक्ष व्हिडिओमधून काही बनावट गोष्टी आल्या तर लोकांना बनावट काही पटवणं किती सोपं होईल.
यात एक शक्यता अशी आहे की एवढी खोटी माहिती पसरेल की लोकांची पहिली प्रतिक्रिया विश्वास न ठेवण्याचीच असेल. सध्या लोक सहज विश्वास ठेवतात आणि फसवणूक होतं. काही लोक आधीच विश्वास न ठेवण्याच्या पायरीला पोहोचलो आहे; पण तशी मंडळी सध्या खूप नाहीत.
खूप खोटी माहिती यायला लागली तर सगळ्यांचंच सेटिंग असं होईल. मग फार फरक पडू नये. पण कुणाला माहीत!
ऐसी अक्षरे – यातलं सिनिसिझम समजण्यासारखं आहे. पण २०१६मध्ये निवडणुकांमध्ये जे झालं की 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'च्या नावाखाली खोटी माहिती पसरवली; आणि लोक मतदानापासून लांब राहिले. कदाचित त्यामुळे हिलरी क्लिंटन निवडणूक हरली, असंही समजलं जातं. हे उदाहरण टोकाचं आहे खरं. पण जर कशावरच विश्वास नाही ठेवायचं तर आपण भविष्य म्हणून नक्की कशाकडे बघत आहोत?
विजय – विश्वासच ठेवायचा नाही असं नाही. मी एक कल्पना सुचवतो. उदाहरणार्थ, जेनएआयला काही गोष्ट सांगून व्हिडिओ तयार करता येतो. हे खूप वाढलं तर त्याला उत्तर काय? कॅननसारख्या कॅमेरा तयार करणाऱ्या कंपन्या बघू. त्यांनी जर या व्हिडिओंमध्ये त्यांच्या सत्यतेबद्दलचं सर्टिफिकेट टाकलं, तर त्यावरून हा व्हिडिओ खरा की ए. आय.नं बनवलेला हे समजू शकेल.
ऐसी अक्षरे – मगाशी आपण misinformation tagging बद्दल बोलत होतो. त्याच्या बरोबर उलट?
विजय – अगदी. सर्टिफिकेट नसलेलं सगळं खोटं आहे असंच मानायचं, पण जर ते असेल तर ते खरं. आत्ताही अतिमौल्यवान वस्तूंबाबत आपण हीच भूमिका घेतो. हिरे विकत घेताना त्याबरोबर ते खरे असल्याचं प्रमाणपत्र येतं. आपल्यापैकी बहुतेकांना खरा-खोटा हिरा कुठला ते सांगता येत नाही. आपण त्या बाबतीत फसत नाही, कारण आपण सर्टिफिकेटशिवाय खरा हिरा आहे हे मानत नाही. हेच माहितीबद्दल होईल.
जेव्हा जास्त कंटेंट जेनएआयनं तयार केलेलं असेल तेव्हा ते खऱ्या-खोट्याचं प्रमाणपत्र लावता येईल. सध्या बहुतेकसं खरंच असतं. हे होईलच असं नाही. पण त्यामुळे सगळीकडे गोंधळच माजेल असं मला वाटत नाही. खोटी माहिती हा तसा नवा प्रकार आहे, १० वर्षं जुना. अशा गोंधळामधून स्थैर्य यायला वेळ लागतो. अमेरिकेत २३०चा मामला – वर ज्याचा उल्लेख आला आहे, समाजमाध्यमं चालवणाऱ्या कंपन्यांना प्रकाशक समजावं का वितरक – सेटल झालेला नाही.
सध्या आपण बदलाच्या स्थितीतून जात आहोत. त्यामुळे आपल्याला धास्ती वाटते.
ऐसी अक्षरे – सारांश म्हणून, आपल्या आईवडलांची पिढी प्रामुख्यानं छापील माहिती वाचायची. त्यामुळे ते छापलेलं सगळंच खरं आहे, असं ते मानतात. आपल्याकडे तसा निरागसपणा नाही राहिला; आपण दृश्य गोष्टी, फोटो, व्हिडिओ खऱ्या आहेत, असं मानायला लागलो. आता यातही बदल होत चालला आहे कारण डीप फेक, आणि जेन-एआयमधून आलेले फोटो आणि व्हिडिओ, त्यांत होणारे बदल आपण बघत आहोत. शिवाय वाईट गोष्टींबद्दल जास्त बोलणं चालणं, सगळंच वाईट होत चाललं आहे, असं. पण तसं होईलच असं नाही.
भारतासारख्या देशात वेगवेगळी शतकं एकत्र नांदतात तिथे टेक-सॅव्ही लोक आहेत, आणि शोधाच्या हिशोबात एकोणिसाव्या शतकातले लोकही आहेत. तरीही लोक जितक्या हौशीनं व्हॉट्सॅप फॉरवर्डवर विश्वास ठेवायचे, ते थोडं कमी होत आहे, असं आल्ट-न्यूजचं म्हणणं आहे.
विजय – मला खरंच असं वाटतं, आणि आशाही आहे. या तंत्रज्ञानाची दिशा बदलणं शक्य नाही. व्हिडिओ सध्या फार बरे नसले तरी तेही सुधारत जातील. नव्या पिढ्या हे बदल चांगले हाताळतील. एक मनुष्य हे सगळे बदल नीट पचवेल असं नाही; पण मानवजात म्हणून आपल्याला हे जमेल. आजपासून २० वर्षांनी जन्माला येणारी मुलं व्हिडिओबद्दल आपल्यासारख्या धारणा बाळगणार नाही. आपण हिऱ्यांसाठी सर्टिफिकेट मानतो; ती मुलं व्हिडिओसाठी ते सर्टिफिकेट बघण्यापासून सुरुवात करतील. ती मुलं हे प्रश्न आणखी चांगले हाताळतील.
लोक येत्या पाच वर्षांत काय होईल याबद्दल भरमसाट कल्पना असतात; पण १०-१५ वर्षांत काय होईल यात निराशा जास्त असते. पण याबद्दल मी आशावादी आहे. आयडेंटिटीची सुरक्षितता सगळ्यांच्या पचनी पडेल. यासाठी तंत्रज्ञान मदत करेल.
एकंदरीत जालीय ओळखीच्या बाबतीत
एकंदरीत जालीय ओळखीच्या बाबतीत जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सोपी नाहीत हे वेगवेगळ्या उदाहरणांनी छान समजावून सांगितलेलं आहे.
यावरून आयझॅक असिमॉव्हची एक कथा आठवली. तीत गृहितक असं असतं आख्ख्या समाजाचं प्रतिबिंब प्रत्येक माणसाच्या ओळखीत पडलेलं असतं. हीच कल्पना ताणून त्यात निवडणुकीऐवजी एकाच रँडम माणसाला निवडून त्याला प्रश्न विचारून, ब्रेन स्कॅन्स करून, वेगवेगळ्या टेस्ट करून त्यावरून राष्ट्रपतीची निवड केली जाते. त्यांचे अल्गोरिथम या अर्थाने खूप पॉवरफुल असतात! अर्थातच ही कथा त्या काळातही होणाऱ्या सर्व्हेंवर टंग इन चीक टीका करणारी होती हे उघड आहे. पण आजच्या काळालाही आपल्या ओळखीसंदर्भात लागू पडते हे गमतीदार वाटलं.