आशियाई दर्याचे डोलकर राजे

#संकीर्ण #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

आशियाई दर्याचे डोलकर राजे

- शेखरमोघे

हल्लीच भारतीय नौदलाचा झेंडा आपल्या नवीन रूपात फडफडू लागला आहे - शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची आठवण करून देणाऱ्या अष्टकोनी आकारात ठसवलेला जहाजाचा नांगर आता या चिन्हात दिसतो, आणि इंग्रजी राजवटीची आठवण देणारा क्रॉस काढून टाकला गेला आहे. बऱ्याच काळापासून भारतीय नौदलाचे बोधवाक्य मात्र "शं नो वरुणः" (संस्कृत वचनाचे स्वैर भाषान्तर - हे जलाधिराज वरुण देवा, आमचे रक्षण कर) हेच राहिलेले आहे.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे दर्यावर्दी लोक - प्रामुख्याने कलिंग (बहुशः सध्याचा ओदिशा) आणि चोला (बहुशः सध्याचा तामिळनाडू आणि सध्याच्या आंध्र आणि केरळाचे काही भाग) येथील लोक - इसवी सनापूर्वीपासून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून निघून आग्नेय आशियाच्या अनेक भागांत समुद्र सफरी करत, तेथे स्थायिक होत, आपला व्यापार वाढवत, आणि त्याकरता जरूर लागल्यास लढायाही करत. पूर्ण आग्नेय आशियात समुद्रमार्गे फिरणारे हे डोलकर - शिडांच्या जहाजातून समुद्रप्रवास करणारे, आद्य, अनिवासी भारतीयदेखील - "शं नो वरुणः" हाच जप करत आपली गलबते हाकारत असतील.

हे भारतीय डोलकर एकेकाळी भारताच्या आजूबाजूच्या बऱ्याच मोठ्या दर्याचे राजे होते आणि त्यांची जहाजे मुख्यतः व्यापाराकरता सगळ्या आग्नेय आशियात फिरत असल्याने त्यांचा प्रभाव पार सध्याच्या व्हिएतनामपर्यंत पसरला होता. त्यातून निर्माण होणाऱ्या आदानप्रदानामुळे प्रथम हिंदू धर्म आणि त्यानंतर बौद्ध धर्म आग्नेय आशियात पसरला. तेथील राज्यांचे राजे (आणि बरेच प्रजाजनदेखील) बरीच शतके हिंदू आणि त्यानंतर बौद्ध धर्म पाळणारे होते (तेच भारतातही झाले). भारतात अनेक ठिकाणी उत्तम शिल्पकला आणि स्थापत्यकला यांचा आदर्श ठरलेली भव्य हिंदू आणि बौद्ध मंदिरे बांधली गेली, तशीच मंदिरे भव्य हिंदू आणि बौद्ध मंदिरे आग्नेय आशियातील बऱ्याच देशांत बांधली गेली. सुमारे इ. स. सोळाव्या शतकानंतर अनेक कारणांमुळे आग्नेय आशियात हिंदू आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास होऊ लागला. या दर्यावर्दी लोकांच्या व्यापारी (चोला राजांच्या बाबतीत लष्करीसुद्धा) प्रभावाखालील एकूण समुद्र आणि भूभाग यांचे क्षेत्रफळ सुमारे २० लाख चौ. कि. मी. (सुमारे ७.८ लाख चौ. मैल) होते, तसेच पूर्व भारतापासून या भागांचे अंतर (२,४०० कि.मी. / १,५०० मैलांपेक्षा अधिक) हे लक्षात घेतल्यास या कामगिरीचा आवाका आणि महत्त्व जास्तच पटेल. या डोलकरांच्या (तसेच इतरही आद्य अनिवासी भारतीयांच्या) या एकेकाळच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या यशाचा फार थोडा मागमूस भारतातल्या शालेय इतिहासात शिल्लक ठेवला गेला आहे.

आग्नेय आशियाच्या अनेक भागांत वेगवेगळ्या वेळी सुमारे इ. स. सोळाव्या शतकापर्यंत स्थिरावलेल्या या हिंदू (आणि नंतर भारतातूनच उगम पावलेल्या बौद्ध) धर्मीय विचारांच्या राज्यांच्या कालखंडांत अनेक विश्वविख्यात हिंदू मंदिरांची रचना झाली. त्यामधील अनेक मंदिरे (उदाहरणार्थ, अंकोर वाट, प्रम्बानन) युनेस्कोच्या जागातिक सांस्कृतिक मानांकनास पात्र ठरलेली आहेत. त्यातून या सगळ्याच भागावर एके काळी असलेल्या जोरदार हिंदू (आणि नंतर भारतातूनच उगम पावलेल्या बौद्ध) ठशाचे आणि तेथे अजूनही न पुसल्या गेलेल्या या सगळ्यांच भारतीय प्रभावाचे त्रोटकसुद्धा वर्णन एकाच लेखात करणे हे कठीणच आहे. त्यामुळे या काळातील आणि भूभागांतील वेचक आणि महत्त्वाच्या राज्यांचा तसेच घटनांचा विचार या लेखात केला आहे.

एकेकाळचे कलिंग म्हणजे आजकालचे ओदिया लोक पूर्व सागरातील वारे, प्रवाह आणि बंदरे यांचे चांगलेच जाणकार होते. अश्विन ते मार्गशीर्ष या काळात ४-५ महिन्यांच्या समुद्रप्रवासाकरता ते बाहेर पडत; नंतरच्या काळात वाहणारे परतीचे वारे वापरून आपली जहाजे परत आणत. त्यांच्या जहाजांचा ताफा कधी राजाश्रयाने, तो नसेल तर श्रीमंत व्यापाऱ्यांनी जमवलेला असा असे. ते मजल दर मजल करत भारताच्या पूर्वेच्या वेगवेगळ्या देशात जाऊन येत. ते कधी काही वर्षांच्या सफरी करत. फुनान नावाचे इ. स. पहिल्या ते सहाव्या शतकातील एक राज्य कौंडिण्य नावाच्या कलिंग वंशाच्या राजाने स्थापल्याचा समज आहे; पण याबद्दल इतरही अनेक विचार आणि शक्यता बरेच तज्ज्ञ मांडतात. सहाव्या शतकापर्यंत सध्याच्या बंगालच्या उपसागराला कलिंग सागर असे म्हणत. अजूनही ओदिशात, कटकसारख्या मोठ्या शहरात कार्तिक महिन्यात पूर्वजांनी केलेल्या आग्नेय आशियाच्या (आणि इतरही, जसे श्रीलंका) समुद्रसफरींच्या स्मरणार्थ 'बोईता (शिडाचे मोठे जहाज) बंदन' सण साजरा करतात.

चोला राजांच्या काळांत (सुमारे इ. स. २०० ते १२८०) वारे, प्रवाह, बंदरे यांबद्दलचे ज्ञान तसेच जहाजबांधणी आणि नौकानयन यांत प्रगती होत गेली. त्यातून चोला राजांचा श्रीलंका आणि आग्नेय आशियात दरारा इतका वाढला की त्यांनी अकराव्या शतकात श्रीविजया या आग्नेय आशियातील सगळ्यात बलाढ्य राज्यावर छापे मारून तेथून प्रचंड लूट मिळवली होती. या कालखंडातील काही भागांत चोला, पल्लव, पांड्य आणि चालुक्य या सगळ्यांच साम्राज्याची एकमेकांत युद्धे, चढाओढ आणि देशी-विदेशी व्यापारासाठी स्पर्धा चालू होती. या कालखंडातल्या समुद्रप्रवासांत जरी या इतर राजवटींचा सहभाग असणे शक्य असले तरी चोला हे त्यांतील सगळ्यात मोठे, यशस्वी आणि प्रभावी असल्यामुळे इतर नावे निदान या लेखापुरती तरी विचारात घेतलेली नाहीत.

कलिंग आणि चोला यांसारख्या भारतीय डोलकरांचा आग्नेय आशियातील देशांशी असलेल्या दळणवळणाचा परिणाम म्हणून हिंदू देवदेवता, विशेषतः शिव आणि विष्णू, तिथल्या संस्कृतींत पोहोचले. भारतातील राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांबद्दलची विचारसरणी या सगळ्यांचाच आग्नेय आशियातील अनेक देशांवर आणि तिथल्या राजांवर खूप प्रभाव होता. त्याचे अधिक विस्तृत वर्णन आपण पुढे पाहूच. ही सगळीच राज्ये साधारण इ. स. १५००पर्यंतच्या १०००-१२०० वर्षांत झाल्याने त्याबद्दलची विवक्षित आणि विस्तृत लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी तर्क, उत्खनन, शिलालेखांवरून केलेले अंदाज, प्रवासवर्णने, इतर प्रदेशात (जसे चीन) उपलब्ध असलेली त्या काळातील माहिती अशा अनेक विविध साधनांतून मिळवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भारतीय आचारविचारांची आणि जीवनपद्धतीची आग्नेय आशियातील देशांमधील अनेक राज्ये नक्की कुणी स्थापली आणि त्यांचा उगम भारतातील एखाद्या प्रदेशात किंवा वंशात होता का हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे.

इ. स. ७८८ ते ८५० या काळात जावा बेटाच्या (सध्या इंडोनेशियात, एकेकाळचे संस्कृत नाव यवद्वीप) मध्यभागी बांधलेल्या बोरोबुदूर या जागतिक ख्यातीच्या बौद्धमंदिराच्या भिंतीवर असलेल्या जहाजांच्या अनेक चित्रांपैकी एक चित्र पुढे दिलेले आहे (आकृती १). या चित्रावरून त्या काळात सागरी वाहतुकीकरता वापरल्या जाणाऱ्या जहाजांची कल्पना यावी.


(आकृती १)

अशाच तऱ्हेच्या शिडाच्या आणि जोडीला वल्ही देखील असलेल्या भारतीय गलबतांची करामत समजायची असेल तर सध्याच्या मलेशियातील केदा राज्याचे उदाहरण घेता येईल. हे सध्याच्या मलेशियातील (थायलंडच्या सीमेलगत) सुमारे ९,५०० चौ. कि. मी. (३,७०० चौ. मैल) क्षेत्रफळाचे राज्य चोला राजांच्या पूर्व भारतातील बंदरांपासून सुमारे २,४०० कि.मी (१,५०० मैल) दूर होते. तरीही मधला बंगालचा उपसागर पार करून चोला राजांनी आणि त्यांच्या आधीच्या राज्यकर्त्यांनी सुमारे इ. स. दुसऱ्या शतकापासून त्यांच्याशी व्यापारी संबंध ठेवले होते. इ. स. अकराव्या शतकाच्या काही भागांत हा भाग आलटूनपालटून श्रीविजया (यांचे वर्णन पुढे दिले आहे) आणि चोला राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजेच सुमारे २,४०० कि.मी (१,५०० मैल) दूर असलेल्या, आणि तिथे पोचण्याकरता बंगालचा उपसागर पार करणे जरूर असलेल्या या प्रदेशावर राज्य करणे चोला राजांना सुमारे हजार वर्षांपूर्वी शक्य झाले होते.

सागरी वाहतुकीची सुरुवात जरी किनाऱ्याकिनाऱ्याने वल्हवत नेल्या जाणाऱ्या लहान होड्यांनी झाली असली तरी पुढे नवीन कल्पनांतून आयुधे आणि जहाजबांधणीच्या तंत्रात प्रगती होत गेली. त्याबरोबर जहाज बांधणीकरता अनेक तऱ्हांचे लाकूड,अनेक तऱ्हांची, आकारांची आणि विणीची शिडे, आणि त्यांच्या दुरुस्तीची सामग्री, शिडाचा आकार बदलण्याकरता अनेक तऱ्हेच्या दोरांचा वापर, एकाच वेळी अनेक शिडांचा वापर; जहाजात पाणी शिरू नये या करता वापरायची अनेक प्रकारची रोगणे आणि लेप, होकायंत्र किंवा नौकानयनाला मदत करणारी इतर अनेक साधने अशा अनेक सुधारणा जहाजे बांधण्यात आणि वापरण्यात होत गेल्या. त्यामुळे जहाजांचा आकार, त्यांची वजन वाहण्याची आणि ठराीक मार्ग राखण्याची क्षमता या सगळ्यांतच प्रगती होत गेली.

वल्ही वापरणाऱ्या होड्यांच्या जागी शिडांचा वापर सुरू झाल्यावर माल वाहण्याची क्षमता वाढत गेल्याने समुद्री वाहतुकीच्या अर्थकारणात झपाट्याने बदल होऊ लागला. इसवी सनाच्या सुरुवातीपासूनच्या पहिल्या हजार वर्षांत एक ते तीन डोलकाठयांचा / शिडांचा वापर होत होत त्यानंतर एकेका डोलकाठीवर एकापेक्षा जास्त शिडे वापरली जाऊ लागली. तरीदेखील इ. स. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला ३०० टन मालवाहतुकीची क्षमता असलेली जहाजे मोठी समजली जात. हाच आकडा त्यापुढील ५० वर्षांत सुमारे दुप्पट झाला. सध्या सुमारे ५०,००० टन माल वाहतुकीची क्षमता असलेली जहाजे साधारण समजली जातात, यावरून त्यापुढच्या ७०० वर्षांतील प्रगतीची कल्पना यावी.

चोला राजांचे कौशल्य म्हणजे अशा ३०० टन क्षमतेच्या शिडांच्या जहाजातसुद्धा लढाईकरता तयार सैनिक, काही घोडदळ आणि या सगळ्यांकरता लागणारे अन्न आणि युद्ध सामग्री भरून, आणि अशा जहाजांचा पुरेसा मोठा काफिला करून ते भारताच्या पूर्व किनाऱ्याहून निघून सुमारे २४४० कि.मी. (१५०० मैल) दूर असलेल्या सध्याच्या मलेशिया आणि सुमात्रा या प्रदेशांतील बऱ्याच मोठ्या भागावर सुमारे हजार वर्षांपूर्वी काही काळाकरता आपली सत्ता प्रस्थापित करू शकले.

इ. स. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सगळ्याच व्यापारी जहाजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असे. प्रत्येक जहाजाची माल वाहण्याची क्षमता मर्यादित होती; नौकानयनासाठी मुख्यतः सूर्य आणि ताऱ्यांची स्थिती वापरली जात असे; शिडांवर/वाऱ्यावर अवलंबून असण्यामुळे वेग मर्यादित असे; अनपेक्षित वादळे आणि वाऱ्यातील इतर तऱ्हेच्या बदलांना तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे काफिल्याने प्रवास करणे जास्त सुरक्षित होते. तरीही काफिल्यातील साधारण एक चतुर्थांश ते एक तृतीयांश जहाजे हरवणे, बुडणे, निकामी होणे अशा अनेक शक्यता असत. तरीही भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील दर्यावर्दी लोकांनी आग्नेय आशियावरील आपला पगडा जोरदार राखला असावा. जरी आग्नेय आशियामधल्या देशांशी चीनचे व्यापारी संबंध होते तरी इ. स. पंधराव्या शतकांपर्यंत तरी तेथील राज्ये हिंदू (आणि बौद्ध) धर्माचा निःसंशय प्रभाव दाखवत होती.

आग्नेय आशियामधल्या वेगवेगळ्या भागांत आणि वेगवेगळ्या काळांत प्रस्थापित झालेल्या आणि एकूणच जीवनपद्धतीत भारतीय हिंदू वा बौद्ध ठसा मिरवणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांचा एक प्रतीकात्मक नकाशा आकृती २मध्ये दाखवला आहे. या नकाशात सुमारे १०००-१२०० वर्षांच्या कालखंडात वेगवेगळ्या वेळी अस्तित्वात असलेली अनेक राज्ये (ज्यांची व्याप्ती देखील या काळात बदलत होती) एकाच वेळी दाखवणे कठीण आहे. तसेच यातील काही भूभागांवर वेगवेगळ्या वेळी त्या त्या काळांत अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या राजांची सत्ता होती. आकृती २मधल्या नकाशात दाखवलेली प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची सगळी राज्ये (आणि माजापाहित) यांचे जास्त विस्तृत वर्णन पुढे दिले आहे.


(आकृती २)

श्रीविजया (श्रीविजय?) साम्राज्य

आग्नेय आशियातील सागरी वाहतुकीच्या दृष्टीने आजही अतिशय महत्त्वाची मानली जाणारी मलाक्काची सामुद्रधुनी (सध्याच्या मलेशियाचा मुख्य भूभाग आणि सुमात्रा बेटाचे उत्तर टोक यामधील समुद्र) तसेच किंचितच कमी महत्त्वाची सुंदा सामुद्रधुनी (जावा आणि सुमात्रा या दोन्ही बेटांमधील समुद्र) आणि या दोन्हींमधून होणारी वाहतूक आपल्या कब्जात ठेवणारे हे साम्राज्य इ. स. सहाव्या ते बाराव्या शतकात भरभराटीला आले होते. त्यानंतर या साम्राज्याचा ऱ्हास होऊन विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्याबद्दल काहीच माहिती मिळवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. त्यांच्या उत्कर्षाच्या काळात सध्याचे सुमात्रा बेट, सध्याच्या मलेशियाचा मुख्य भूभाग आणि सध्याच्या जावा बेटाचा पश्चिम भाग हा यांच्या अंमलाखाली होता. मुख्यतः बौद्ध धर्म पाळणाऱ्या या साम्राज्यात तामिळ आणि कालिंगांचा सहभाग असावा. या राजांनी चोला अंमलाखालील नागपट्टण या (भारतातील) बंदरात बौद्ध भिख्खुंसाठी विहार बांधले होते. श्रीविजया साम्राज्यातील जहाजे, खलाशी आणि व्यापारी त्यांच्या साम्राज्याबाहेरच्या अनेक प्रदेशांतदेखील - जसे बोर्निओ (सध्याचे कालीमंतान / साबा / सारावाक), सध्याचे फिलिपाइन्स, पूर्व इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, पूर्व भारत आणि पूर्व आफ्रिकेतील मादागास्करसारखी बेटे आणि बंदरे तसेच चीन - नियमित जातयेत असत. त्यांच्या तेराव्या शतकापासूनच्या उतरत्या काळाची महत्त्वाची कारणे म्हणजे इ. स. १०२५ साली राजेंद्र पहिला या चोला राजाने श्रीविजया साम्राज्यावर केलेला प्रचंड हल्ला आणि त्यानंतरची लुटालूट; जावा बेटांवरील राजांकडून त्यानंतर होत राहिलेले हल्ले; आणि माजापाहित साम्राज्याचा वाढता प्रभाव आणि विस्तार. एकेकाळच्या श्रीविजया साम्राज्यातील संस्कृतच्या ज्ञानामुळे चीनहून अभ्यासासाठी भारतात जाणारे बुद्ध भिख्खु श्रीविजया साम्राज्याची राजधानी पालेम्बांग येथे काही काळ संस्कृतचा अभ्यास करून मग पुढे भारतात बौद्ध धर्माच्या शिक्षणाकरता जात.

माजापाहित साम्राज्य

हे साम्राज्य श्रीविजया आणि माताराम या आकृती २मध्ये दाखवलेल्या दोन राज्यांपेक्षा बरेच मोठे होते. त्यांच्याबद्दलच्या इ. स. १३६५मध्ये लिहिलेल्या ग्रंथानुसार त्यांचा राज्यविस्तार (९८ मांडलिक राज्यांसकट) पश्चिमेला सुमात्रा बेटापासून पूर्वेला सध्याच्या न्यू गिनीपर्यंत होता. म्हणजेच त्यात सध्याचा पूर्ण इंडोनेशिया, सिंगापूर, तिमोर लेस्ते, तसेच सध्याच्या थायलंड, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई या देशांचे बरेच भाग समाविष्ट होते. सध्याच्या इंडोनेशियामध्ये हे साम्राज्य अनेक तऱ्हांनी आदर्श मानले जाते आणि या साम्राज्यातील अनेक राजे आणि उच्चपदस्थ व्यक्ती अजूनही आदरणीय गणल्या जातात. या साम्राज्याच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना म्हणजे तेराव्या शतकाच्या शेवटी किंवा चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला मंगोल सम्राट कुब्लाईखानाकडून झालेला (अयशस्वी) हल्ला आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला जावा बेटात आलेला चेंग हे (Zheng He) या चिनी दर्यासारंगाच्या नेतृत्वाखाली प्रवास करणारा चिनी जहाजांचा काफिला. ऐतिहासिकदृष्ट्या हे आग्नेय आशियातील जवळजवळ शेवटचे महत्त्वाचे हिंदू/बौद्ध साम्राज्य होते.

माताराम साम्राज्य

सध्याच्या इंडोनेशियातील जावा बेटाच्या मध्य आणि पूर्व भागावरील इ. स. आठव्या ते अकराव्या शतकातील हे साम्राज्य त्यातील दोन फळ्यांच्या (संजयवंशीय शिवभक्त आणि शैलेंद्रवंशीय बौद्ध) आपापसातल्या कुरबुरी चालू असतानाही दोन जगप्रसिद्ध मंदिरसमूह बांधू शकले - बोरोबुदूर आणि प्रम्बानन.

बोरोबुदूर हे (आकाराने आणि कलाकौशल्याच्या दृष्टीने) जगातले सगळ्यात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. सुमारे २५ हेक्टर (६२ एकर) क्षेत्रात पसरलेले हे मंदिर ९ पातळ्यांवर दगडात बांधलेले आहे. त्या सगळ्यांवर एक विस्तीर्ण घुमट आहे. मंदिराच्या भिंतीवर २,६७२ कोरीव कामांतून गौतम बुद्धाचे जीवन आणि त्या काळातील (इ. स. नववे शतक) जीवन दाखवले गेले आहे. (आकृती १ ही त्यांपैकीच एक कोरीव भित्तीशिल्प आहे). माताराम साम्राज्याच्या ऱ्हासानंतर इ. स. चौदाव्या शतकापासून हे अतिभव्य मंदिर दुर्लक्षित राहिल्याने त्याची झालेली पडझड इ. स. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश आणि डच अंमलाखाली दुरुस्त झाली. या समूहाला युनेस्कोचे जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक वारसा असल्याचे मानांकन मिळालेले आहे.

इ. स. नवव्या शतकाच्या मध्यावर हिंदू संजय पाती जोरात असताना प्रम्बानन या हिंदू मंदिर समूहाच्या बांधणीची सुरुवात झाली. येथील मुख्य देवता त्रिमूर्ती (ब्रम्हा, विष्णू, महेश) शिवस्वरूपातली होती. २४० मंदिरांचा हा समूह (अंकोर वाटच्या खालोखाल) आकाराच्या दृष्टीने जगातील दुसरा हिंदू मंदिर समूह मानला जातो. इ. स. दहाव्या शतकाच्या शेवटापासून अज्ञात कारणांमुळे हा समूह दुर्लक्षिला गेला. जवळच्या मेरापि या ज्वालामुखीच्या उद्रेकाची भीती; संजय पाती दुर्बल होणे; किंवा त्या परिसरात वारंवार होणारे भूकंप अशा अनेक शक्यता तज्ज्ञ मंडळी मांडतात. इ. स. सोळाव्या शतकात भूकंपामुळे या समूहाची पडझड झाली. इ. स. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश आणि डच अंमलाखाली हा समूह जवळजवळ पूर्णतः दुरुस्त झाला. यातील सौंदर्याची आणि उच्च दर्जाच्या हिंदू कलाकुसरीची कल्पना आकृती ३मधील एका दुय्यम दर्जाच्या देवळातील कोरीव मूर्तीतून येईल. हा समूह पुन्हा इ. स. २००६ साली भूकंपामुळे काही प्रमाणात उध्वस्त झाला. त्यानंतरचे पुनर्वसन बरेच रेंगाळले. या समूहाला युनेस्कोचे जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक वारसा असल्याचे मानांकन मिळालेले आहे.


(आकृती ३)

ख्मेर/अंकोर साम्राज्य

या इ. स. नवव्या ते तेराव्या शतकातल्या हिंदू/बौद्ध साम्राज्यात सध्याच्या थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम आणि लाओस या प्रदेशाचा बराच मोठा भाग तसेच दक्षिण चीनचा काही भाग असा बराच मोठा प्रदेश होता. त्यानंतरच्या दोन शतकांत या साम्राज्याला शेजारील राज्यांकडून (सध्याचे थायलंड आणि व्हिएतनाम यामधील सुखोथाई आणि दाई व्हिएत) होणारे हल्ले आणि इतर अनेक कारणांनी उतरती कळा लागली. या साम्राज्याबद्दलची उपलब्ध लिखित माहिती फारशी नसल्याने त्याचा सध्या माहीत असलेला इतिहास बराचसा उत्खनन, शिलालेख आणि पडझड झालेल्या अंकोर वाट या अनेक भव्य मंदिरे असलेल्या मंदिरसमूहाच्या पुनर्रबांधणीत हाती लागलेली माहिती अशा अनेक तुटक माहितीवर आधारित आहे. अंकोर वाट मंदिरसमूह जगातील सर्वात मोठा अशा तऱ्हेचा सांस्कृतिक ठेवा मानला जातो. या समूहाला युनेस्कोचे जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक वारसा असल्याचे मानांकन मिळालेले आहे. हा समूह १६२.६ हेक्टर (४०२ एकर) जागा व्यापतो. त्याच्या बाहेरची भिंत सुमारे ३.६ किलोमीटर (२.२ मैल) लांबीची आहे तर या सगळ्या मंदिरसमूहाबाहेर सुमारे ५ कि. मी. (३ मैल) लांबीचा खंदक आहे. इ. स. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला यातील देवळांच्या बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा बांधलेली मंदिरे मुख्यतः विष्णुमंदिरे होती. त्याकाळात हे साम्राज्य त्याच्या परम वैभवात असल्यामुळे ही सगळीच मंदिरे उत्कृष्ट दर्जाची शिल्पकला, भिंतीवरील कोरीव प्रसंग आणि एकूणच भव्य तऱ्हेचे बांधकाम दाखवतात. सुमारे ५० वर्षांच्या नंतरच्या काळात झालेले शत्रूंचे हल्ले, त्यांनी केलेली लूटमार अशा सगळ्यांतून वाचलेल्या परंतु दुर्बल झालेल्या या राज्यांत नंतर जरी पुन्हा मंदिरांचे बांधकाम सुरू झाले. ही बौद्ध मंदिरे होती आणि त्यांचे कामही कमी दर्जाचे होते. इ. स. सोळाव्या शतकानंतर हे राज्य संपले आणि त्यातून मंदिरांची देखभाल होणे थांबले. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच अंमलाखाली आलेल्या कंबोडियात पडझड झालेल्या मंदिरांचा अभ्यास आणि पुनर्वसन सुरू झाल्यावर या साम्राज्याचा आवाका, एकेकाळचे वैभव आणि त्याचे साक्ष देणारे मंदिरांचे बांधकाम यांबद्दलची माहिती हळूहळू संकलित होऊ लागली. या मंदिरांच्या पुनर्वसनासाठी भारतासकट अनेक देशांनी अनेक तऱ्हांनी मदत केली असली तरी त्याचे मुख्य श्रेय फ्रान्सला दिले जाते. अजूनही या मंदिरसमूहाचे कंबोडियाला एवढे महत्त्व वाटते की या मंदिरांची बाह्याकृती कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर साकारण्यात आलेली आहे.

चंपा साम्राज्य: इ. स. दुसऱ्या शतकात हे हिंदू साम्राज्य सध्याच्या व्हिएतनामच्या मध्य आणि दक्षिण भागात सुरू झाले. काही काळातच जवळच्या फुनान साम्राज्यातील काही भाग, सध्याच्या कंबोडिया आणि मलेशिया यातील काही भाग जिंकून घेत इ. स. नवव्या आणि दहाव्या शतकात हे राज्य बरेच विस्तारले. यांची लेखनपद्धती भारतातील पल्लव राज्यातल्या लेखनपद्धतीवर आधारित होती. या हिंदू राज्याचा समुद्रमार्गाने आशियाच्या इतर भागाचा चीनशी होणार व्यापार यावर बराच मोठा पगडा होता. आग्नेय आशियातील माजापाहीत, अंकोर यांसारखी इतर समर्थ राज्ये आणि सध्याच्या उत्तर व्हिएतनाममधील दाई व्हिएत साम्राज्याचे हल्ले यामुळे इ. स. दहाव्या शतकानंतर दुर्बळ होत गेलेले हे राज्य इ. स. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला दाई व्हिएतच्या ताब्यात गेले.

एकूणच आग्नेय आशियामधल्या वेगवेगळ्या काळांतल्या अनेक राज्यांत वर म्हटल्याप्रमाणे सुमारे १,००० वर्षांच्या काळात भारतीय - हिंदू, बौद्ध - जीवनपद्धती वा धर्म यांचा पगडा होता आणि त्याकाळातील दळणवळण, विचारांची देवाणघेवाण करण्याकरता असलेल्या सोयी अशा सगळ्यांचा विचार करता समुद्रप्रवासाच्या माध्यमातून भारत (मुख्यतः पूर्व किनारा) आणि आग्नेय आशिया यातील दीर्घकाळ टिकलेले संबंध प्रस्थापित करणारे आणि वाढवणारे असे हे दर्यावर्दी भारतीय खरेच आदरणीय आहेत.

एके काळी भारतांत उगम पावलेले भारतीय/हिंदू/बौद्ध विचार आणि जीवनपद्धती अवलंबिलेल्या अनेक आग्नेय आशियाई प्रदेशात अजूनही हा भारतीय ठसा पूर्णपणे पुसला गेलेला नाही याची बरीच उदाहरणे देता येतील,

फार जुना नाही पण २००६ साली बांधलेला बँकॉकचा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुशोभित करण्याकरता इतर अनेक पुतळे, चित्रे इत्यादींबरोबरच समुद्रमंथनचे दृश्य निवडले गेले होते. आकृती ४मध्ये त्याचे चित्र पाहताना (गुचीचे दुकान पार्श्वभूमीला!) ते आपल्या पौराणिक गोष्टीपेक्षा फारसे वेगळे नाही हे लक्षात येईल. या विमानतळाला नावही चक्क सुवर्णभूमी दिले गेले. थायलंडचे राजे आपली वंशावळ "रामा (राम?) १, रामा (राम?) २" अशी लावतात आणि त्याबद्दल त्या देशात कुणालाच काही वावगे वाटत नाही.


(आकृती ४)

१९२० साली स्थापन झालेल्या भारतातील आय. आय. टी. सारख्याच Institut Teknologi Bandung (ITB) या इंडोनेशियामधील सगळ्यात उच्च दर्जाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयीच्या विद्यापीठाचे बोधचिन्ह गणपती आहे (आकृती ५); भारताप्रमाणेच इंडोनेशियात देखील गणपतीला विद्येची देवता मानण्यात येते. या विद्यापीठाच्या एका संकुलाचे नावदेखील गणेशा (गणेश) आहे आणि पत्ता तर "गणेश रस्ता" असा आहे.


(आकृती ५)

याच धर्तीचे मला सगळ्यात भावलेले उदाहरण म्हणजे एक प्रत्यक्ष घडलेला किस्सा. जकार्ता या इंडोनेशियाच्या राजधानीचे सुमारे १९८७मध्ये सुशोभीकरण करताना एका मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या चौकात एक पुतळा बसवला गेला तो होता - कृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करतो तो प्रसंग. हा पुतळा सुमारे २३ मीटर लांब, ५ मीटर उंच आहे. त्यात रथात उभ्या असलेल्या अर्जुनाला सारथ्य करणारा कृष्ण आणि रथ वाहणारे घोडे हा सगळाच प्रसंग अगदी जिवंत वाटेल असा बनवला आहे (आकृती ६). त्याखालील माहिती असलेली पाटी जरी तिथून जाणाऱ्या वाहनातून दिसणे कठीण असली तरी पूर्ण आकाराची रथात असलेली दोन माणसे आणि घोडे जरूर दिसतात. मुंबईहून काही कामानिमित्त जकार्ताला आलेल्या काही दूरदर्शनसंबंधित लोकांना माझा एक मित्र टॅक्सीतून घेऊन जात असताना या पाहुण्या लोकांनी चौकातून पुढे जातांना हा पुतळा पाहिला. पुतळ्यातील व्यक्ती कृष्ण आणि अर्जुन असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते "कृष्ण आणि अर्जुन" यांच्याबद्दल आपापसांत इंग्रजीत बोलू लागले. हे पाहिल्यावर टॅक्सी चालकाला अचंबा वाटून त्याने माझ्या मित्राला स्थानिक भाषेत विचारले की "या विदेशी माणसांना इंडोनेशियातल्या लोकांच्याबद्दल इतकी विस्तृत माहिती कशी काय?"


(आकृती ६)

असेच आणखी एक उदाहरण म्हणजे इंडोनेशियाच्या नौदलाचे सध्याचे (सरकारी) ब्रीदवाक्य जे आहे ते स्थानिक, अधिकृत भाषेत (रोमन लिपीत लिहिली जाणारी Bahasa Indonesia) असे आहे : "Jalesveva Jayamahe" म्हणजेच "जलेश्वेव (किंवा जलेषु एव) जयामहे". हा आहे माजापाहित राज्याच्या नौसेनेचा जयघोष की जो संस्कृतमध्ये होता. त्याचा मराठीतला अर्थ आहे "आम्ही जलात (म्हणजे जलयुद्धात) विजयी राहू".

आपण अनेक वेळा "अखंड भारत" ही संज्ञा ऐकतो; सध्याचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश (कधी कधी अफगाणिस्तानही) यांचा सामूहिक निर्देश करण्याकरता ही संज्ञा वापरली जाते. साधारणतः इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. पंधरावे शतक या काळातील भारत हा वस्तुतः इतका पसरलेला होता की "विस्तृत भारत" अशी संज्ञा निर्माण न होणे हे आश्चर्यजनकच आहे. भारताच्या पूर्व-आग्नेय भागांतील दर्यावर्दी लोकांनी त्या काळातील भारतीय विचार, जीवन पद्धती, धर्म (बौद्ध आणि हिंदू) आणि इतर अनेक गोष्टी अतिशय प्रभावीपणे आग्नेय आशियात पोहोचवल्या, रुजवल्या आणि वाढवल्या. जर मंदिरे हे लोकाश्रय आणि राजाश्रयाचे प्रतीक मानले तर आग्नेय आशियातील अंकोर वाट, प्रम्बानन, बोरोबुदूर यांसारखे मंदिरसमूह भारतातील कैलास (वेरूळ, इ. स. आठव्या शतकात सुरुवात), बदामी (चालुक्य, इ. स. सहाव्या शतकात सुरुवात), हळेबीडु (होयसळा, सुमारे इ. स. बारावे शतक) इत्यादी नामांकित मंदिरसमूहांपेक्षा यत्किंचितही कमी नाहीत. म्हणजेच इ. स. पंधराव्या शतकापर्यंत सुमारे १,००० वर्षे हिंदू/बौद्ध धर्म भारताइतकाच आग्नेय आशियात रुजला होता आणि याचे बरेच श्रेय जाते भारताच्या पूर्व/आग्नेय भागांतील दर्यावर्दी लोकांना! मी स्वतः गेल्या चाळीसएक वर्षांत भारतातील अनेक नामांकित मंदिरसमूहांशिवाय आग्नेय आशियातील अंकोर वाट, प्रम्बानन, बोरोबुदूर अशी मोठी ठिकाणे तर प्रत्यक्ष पाहिली आहेतच पण त्याखेरीजही अनेक दुर्लक्षित/खंडप्राय स्थळेदेखील (जसे Dieng Plateu जिथे चक्क पांडवांची मंदिरे, अंशतः भग्नावस्थेत आहेत) मला पाहता आलेली आहेत. अशा या अवाढव्य भौगोलिक (विस्तार २० लाख चौ. कि.मी. /७.८ लाख चौ. मैल) आणि कालखंडाच्या (सुमारे १,००० वर्षे) पार्श्वभूमीवर भारतांतल्या डोलकरांचा "विस्तृत भारत" तयार होण्यात असलेला संबंध प्रस्थापित करणे हे जगड्व्याळ काम असेल. तूर्त हे तरी नक्की म्हणता येईल की जर भारताच्या पूर्व/आग्नेय भागांतील दर्यावर्दी लोकांना भारतीय धर्म, विचार आणि जीवनपद्धती समुद्रमार्गे पसरवणे जमले नसते तर असा "विस्तीर्ण भारत" होऊच शकला नसता.

सध्या आग्नेय आशियात प्रभावी ठरण्याकरता भारत आणि चीन या दोघांतही चुरस आहे. भारतीय नौसेनेला त्यात यशस्वी व्हायचे असेल तर पूर्व/आग्नेय भारतातील डोलकरांनी सुमारे सध्याच्या ७००-८०० वर्षांपूर्वीपर्यंत सुमारे १,००० वर्षे भारतीय हिंदू/बौद्ध धार्मिक आणि जीवनपद्धतीचा सगळ्याच आग्नेय आशियावर छाप उमटवण्याकरता जे काही गारुड केले असेल त्याचा खोलवर अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नवीन बऱ्याच गोष्टी माहीत पडल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेखरमोघे