जागोजाग टिचलेला आरसा
सतीश लोथेंच्या कविता
जागोजाग टिचलेला आरसा
मला मुळीच हिंमत होत नाहीये
या आरशाकडे बघण्याची
जागोजाग टिचलेला झालाय् तो..
मला नीट आठवत नाहीये
कोण कोण येऊन थबकले होते
माझ्या मनाच्या साध्या-भोळ्या वास्तूत
किती काळ मुक्काम ठोकला होता त्यांनी
आणि चेहरा निरखून गेले होते कोऱ्या आरशात..
माझ्या आरशाला धूर्तपणे टीच पाडण्याचे त्यांचे ईप्सित
माझ्या नजरेच्या टप्प्यात कधीच कसे आले नाही
आणि मलाही दाखवता आला नाही त्यांना कधीच मनाचा कोडगेपणा
चारचौघांसारखे सरळ दूर लोटून..
त्यांनी वेळोवेळी सलगीने विचारपूस केली माझ्या आकांताची
त्याच वेळी माझ्या अस्तित्वाला पोकळ करण्याचा मला का उमगला नाही
त्यांचा अंतर्गत कट...
त्यांचे प्रतिबिंब माझ्या आरशाला मुक्तहस्ते बहाल करत
माझी जखम भरून येण्यासाठी त्यांनी शब्दांचे मलम हळूवार लावले
ते व्यक्त होत राहिले
खरेतर निव्वळ देखाव्यासारखे
हे उद्विग्न असलेल्या माझ्या श्वासांना कळलेच नाही उशिरापर्यंत..
टिचलेल्या या वस्तूला काय म्हणतात? हा भ्रम सजीव होतोय्
आता आरशाला मीच ओळखू येईना झालोय् वाटते ही एक गंमतच...
मी इतकं उध्वस्त होवू दिलय् स्वतःला
जागोजाग टिचलेल्या ह्या आरशालाही विचारण्याची होत नाहीये हिंमत
आता मी वेगळा उरलेलो कुठेय् तसाही
आतून माझेही जागोजाग टिचून झालेय्
ते एकएक हुषार तर वेळेत पांगलेय् मुद्देमालासह
सारे काही टिचवून..
***
ते पांढऱ्या शुभ्र घोड्यावर
ते पांढऱ्या शुभ्र घोड्यावर आसन्न
तोंडावळा प्रसन्न
मी स्तिमीत
इतका शुभ प्रसंग अवचित!
दोन्ही भेटलो
त्यांनी पट्टी बांधली डोळ्यांवर
आणि निघालो
ह्या सरोवराजवळ
सारे हरखून टाकणारे
पाणी पिण्याला हिंसक आणि अहिंसक
एकाच वेळी येणारे
ह्या युगातले
हे चित्र अविश्वसनीय
स्वतःशी पुटपुटलो
हे मृगजळातले आश्चर्यकारक दिव्य
त्यांनी पट्टी काढली तर...
अरे, हा प्रदेश वेगळा,
जगण्याची तऱ्हा वेगळी
तसंच उलटी माझी सावली
मी शोधू लागलो इकडेतिकडे
तो मघाचा पांढरा शुभ्र घोडा कुठाय्
आणि ते टोळीवाले गेलेत कुणीकडे
सध्या नेहमी होते असे
छान स्वप्न, अर्धवट स्वप्न, निरस स्वप्न
नंतर ते अख्खे विरलेले अगदी अकस्मात
हे ओंजळभर जीणे तरी खरे का बरेचसे...
स्वप्नं असावीत,
ती नजरेत पालवावीत
नि यावीत काळजाच्या भेटीला
अन्य कुणीही भेटो, न भेटो;
मग त्यांच्या मीलनासाठी
एकट्याने भिडत जावे यथाशक्ती
पुढल्या प्रश्नांच्या कोणत्याही वळचणीला..!