कचरा vs उच्चभ्रू : केस नं. ९२११
कचरा vs उच्चभ्रू : केस नं. ९२११
- अस्वल
[पडदा वर जातो तेव्हा कोर्टाचे दृश्य. एक बाजूला आरोपी पक्ष म्हणून मातब्बर उच्चभ्रू लोक दाटीवाटीने एका बेंचवर बसलेले दिसतात.]
दुसर्या बाजूला फिर्यादी म्हणून 'रक्तपिपासू मांजरी' ह्या पुस्तकाची एक प्रत टेबलावर ठेवलेली दिसते. त्यासोबत एक आळसावलेला मनुष्य बसलेला दिसतो.]
जजसाहेब - फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सुरुवात करा.
[आळसावलेला मनुष्य उभा रहातो. तो म्हणजे मी.]
अस्वल - मिलॉर्ड, माझा आशील म्हणजे 'कचऱ्या'च्या वतीने मी आज इथे उभा आहे. उच्चभ्रू लोकांनी कचऱ्याची बदनामी करण्याचं जे कारस्थान रचलं आहे त्याचा पूर्ण प्रतिवाद करण्यासाठी मी आपल्यापुढे काही मुद्दे मांडू इच्छितो.
जजसाहेब - बोला. तुमची फिर्याद काय आहे?
अस्वल - [एका हातात 'रक्तपिपासू मांजर' हे पुस्तक नाचवत] जजसाहेब, रक्तपिपासू मांजर ही कथा जर जीए, पुल, खांडेकर, नेमाडे ह्यांपैकी कुणी लिहिली तर तुम्ही क्षणभर थांबून विचार कराल की काय आहे बघू तरी. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ कसंही असलं तरी निव्वळ लेखकाच्या नावानेच तुम्ही दबून जाल.
पण जर ह्या पुस्तकाचे लेखक कुणी बिभीषण सातपुते असतील तर मात्र तुमचं मत आपोआपच ठरलं असेल - काय बकवास पुस्तक आहे! कचरा!
तर मिलॉर्ड, मला इथे समस्त अशा कलाकारांच्या वतीने फिर्याद करायची आहे की निव्वळ एखाद्या प्रकारचं पुस्तक लिहिल्याने त्या कलाकाराची आणि कलाकृतीची हेटाळणी केली जाते . आम्हाला हे मंजूर नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे 'कचरा' ही संज्ञा फारच ढिलीढाली आहे, त्यामुळे खऱ्या कचऱ्याचा अवमान झाला आहे.
ही आमची फिर्याद आहे.
[कोर्टात शांतता पसरते. अनेक उच्चभ्रू तुच्छतेने स्मित करतात. काही उच्चभ्रू नुसत्याच भिवया आणि नाकाचा शेंडा उडवतात. एक उच्चभ्रू मनुष्य केवळ पापण्या मिटून तुच्छता दाखवतो. लोक कुजबुजायला लागतात.]
जजसाहेब - ऑर्डर! ऑर्डर. वकीलसाहेब, तुमची बाजू पुढे मांडा. ओपनिंग स्टेटमेंट?
अस्वल - थेंकू जजसाहेब.
साहेब, खोलात शिरण्यापूर्वी एक स्पष्ट करायला हवं की मी उल्लेखलेले सर्व काही अस्सल भारतीय आहे. Trash culture, kitsch वगैरे पाश्चिमात्य संकल्पना इथे सन्मानपूर्वक बाजूला काढून टाकल्या आहेत. "वापरा आणि टाकून द्या"चा पुरस्कार करणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीय दृष्टिकोन उमजणे केवळ अशक्य आहे.
पाश्चिमात्य जनता काल विकत घेतलेला कपडा आज फेकून देते तर इथे ५० वर्षांपूर्वी लग्नात नेसलेली साडीसुद्धा नंतर घरगुती वापर-बाळासाठी दुपटी-घरकामाचा फडका-चिंध्या-पायपुसणे अशी शरीरं बदलून निरनिराळ्या योनींमध्ये पुनर्जन्म घेते. जी गत भौतिकाची तीच गत अधिभौतिकाची! त्यामुळे पाश्चात्य लोक सहज एखाद्या कलाकृतीला बिन्धास्त कचरा ठरवून मोकळे होतात; पण भारतीय वृत्ती ही जन्मजात recycle करणारी असल्याने इतक्या सहज आपण कलाकृतींना कचरा ठरवायला धजवत नाही.
तेव्हा पाश्चात्य लोकांनी trash वर कितीही प्रबंध लिहिले तरी ते भारतीय दृष्टिकोनातून trash बघू शकणार नाहीत, ते अवलोकन आम्हांसारख्या एतद्देशीय कचरावेचकालाच करावं लागणार आहे.
ही बैठक मान्य करून मी पुढील विवेचन करणार आहे. त्यातले मुद्दे काहीसे विस्कळीत वाटू शकतील, पण आमच्या भावना फार दुखावल्याने काही वेळा नाईलाज म्हणून थोडी सवलत द्यावी जजसाहेब.
बबनचा दृष्टांत
"तुम्हारा इश्क इश्क और हमारा इश्क सेक्स?"
- बब्बन
तद्वतच आमची ती उच्च अभिरुची आणि तुमचा तो कचरा असं समस्त उच्चभ्रूंचं मत दिसतं. पण ह्यात दोष उच्चभ्रूंचा नाही; त्यांची ही एक मर्यादा आहे. एका ठरावीक पातळीच्या खाली ते जाऊच शकत नाहीत!
फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज मधल्या एका मुलीला म्हणे गरीबाचं वर्णन करायला सांगितलं तर तिने असं वर्णन केलं --
"त्याच्याकडे फक्त चारच खोल्यांचे घर, एकच जुनीपुराणी गाडी, नेसूला दहाबारा कपडे एवढंच होतं आणि झोपायला बेडसुद्धा नव्हता!"
कारण तिच्या दृष्टीने हीच गरिबीची नीचतम पातळी आहे. त्यापेक्षा गरीब कुणी असू शकेल हे तिच्या कल्पनेत सुद्धा येऊ शकलं नाही.
उच्चभ्रूंची देखील थोडीफार अशीच परिस्थिती आहे.
त्यांच्या मते वाईटात वाईट सिनेमे पुस्तक किंवा कलाकृती या एका ठरावीक पातळीच्या खाली असूच शकत नाहीत. यामुळे होतं काय की सर्वसामान्य सुमार दर्जाच्या कलाकृतींना त्यांच्याकडून कचरा किंवा trash म्हटलं जातं. पण वस्तुस्थिती ह्यापेक्षा वेगळी आहे.
सादर आहे एक्झिबिट १.१ - उच्चभ्रूंच्या मते कलाकृतींचा आलेख.
ह्यात एका मर्यादेखालील कलाकृती नीच(कचरा) तर मर्यादेवरच्या सर्व कलाकृती उच्च दर्जाच्या असतात.
हे खरं तर उच्चभ्रूकडून किंवा समीक्षकांकडून अपेक्षित नाही. दुनिया फक्त गोरी आणि काळी नसते हे आम्ही उच्चभ्रूंकडूनच शिकलो. तेव्हा कुठलीही कलाकृती ही फक्त उच्च अभिरुची आणि हीन अभिरुची अशा दोन वर्गांत विभागता येत नाही याची शिकवण आम्हाला उच्चभ्रूंना द्यावी लागावी यापरीस दुर्दैव ते काय?
खरं तर, उत्कृष्ट > चांगलं> साधारण > सुमार > खराब > टाकाऊ असं कलाकृतीचे किमान वर्गीकरण अपेक्षित असताना त्यांना उत्तम आणि टाकाऊ ह्या टोकांत बसवणं वाईट! पण ह्याचं कारण आहे (निदान) महाराष्ट्रातली शब्द स्वस्त करण्याची वृत्ती.
इथे मला शब्दस्वस्ताईबद्दल थोडं बोलावं लागेल मिलॉर्ड.
शब्दस्वस्ताई
शब्द स्वस्त करण्याचा रोग मराठी माणसाला फार पूर्वीपासून जडलेला आहे. सुमारांची सद्दी या लेखात विनय हर्डीकर यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्रात एखादा मनुष्य आधी नुसताच पत्रकार असतो नंतर तो ज्येष्ठ पत्रकार, मग लेखक आणि मग डायरेक्ट विचारवंत होऊन जातो. म्हणजे एकीकडे बर्ट्रान्ड रसेल हा विचारवंत आणि त्या जोडीला महाराष्ट्रातले हजार एक लोक हेही विचारवंतच असे एका तागडीत तोलायचं झाल्यास अनावस्था प्रसंग यावयाचा.
ज्याप्रमाणे आपण विचारवंत किंवा स्थितप्रज्ञ किंवा स्थितप्रज्ञता उच्च अभिरुची ह्या शब्दांना जसं स्वस्त केलं आहे तसंच आपण दुसऱ्या टोकाच्या कचरा, हीन अभिरुची आणि टाकाऊ या शब्दांनाही स्वस्तच केलेलं आहे.
उठसूठ कशालाही क्लासिक म्हटल्याने क्लासिक शब्दाला अर्थच उरत नाही तद्वत सगळ्या फापटपासर्याला कचरा म्हटलं तर दुनियाच डंपिंग ग्राउंडात टाकावी लागेल. तेव्हा शब्दस्वस्ताई ही दोन्ही टोकांना मारक ठरते.
अमोल पालेकर यांनी BMM22मध्ये केलेल्या सर्व कलाकृतींचा परीघ आक्रसून तो सुमारतेकडे झुकल्याचं म्हटलं होतं त्याचा इथे प्रत्यय यावा.
तेव्हा आपण शब्द स्वस्त न करता खरोखरची उच्च कलाकृती आणि खरोखरचा कचरा या दोघांमधला सुमारतेचा समुद्र दुर्लक्षून चालणार नाही कारण या अथांग सुमार सागरातच बऱ्याचशा कलाकृती गटांगळ्या खात असतात. चंद्राप्रमाणे सुमारतेच्याही कला आहेत. त्याची प्रतवारी करणे हा वेगळ्या लेखाचा विषय, तेव्हा ते बाजूला ठेवून संप्रतकाली बोकाळलेल्या सुमारतेला एकसंध मानून चालू.
ह्या सुमारतेच्या टोकांना जसजसे आपण जाऊ तसतसे आपल्याला एका बाजूला निखळ सत्त्व आणि दुसऱ्या बाजूला केवळ कचरा मिळत जाईल.
समाजधुरीण हमखास उच्च दर्जाच्या सत्त्वाच्या मागे असतात आणि मग फोलपट निवडायला कुणी येरु मिळत नाहीत ही एक शोकांतिका आहे.
गणिती भाषेत सांगायचे तर as limit tends to extremes, the probability of finding purity increases. At the same time, the data set decreases drastically thereby making the search extremely difficult.
तेव्हा कलाकृती ह्या अशा विभागलेल्या असतात असा आमचा प्रस्ताव आहे. अर्थात ह्यात सोशल मिडिया वगळला आहे आणि काही किमान संपादकीय संस्करण झालेल्या कलाकृतीच गृहीत धरल्या आहेत.
आमची भूमिका - विरोधाभक्ती
अध्यात्मात एक संकल्पना आहे- प्रमेश्वराची प्राप्ती केवळ त्याला भजून नाही तर त्याची निंदा करूनही केली जाते.
तसंच, कलाकृतींचा अभ्यास हा केवळ परिपूर्ण, उच्च दर्जाच्या कलाकृती अभ्यासून होत नसतो, परिपूर्ण कचऱ्याचा शोध हे देखील कलेच्या अभ्यासाचे दुर्लक्षित पण वैध अंग आहे. आम्ही हे असेच कलेचे विरोधभक्त आहोत. अर्थात आम्हाला भल्या भल्या समीक्षक, लेखक, (मराठी!) विचारवंतांनी वाळीत टाकले आहे. पण जोवर आमच्याकडे ब्रॉडब्यांड इंटरनेट, मुबलक कॉफी आणि पुस्तकं विकत घ्यायची क्षमता आहे तोवर आम्हाला ह्याची अजिबात पर्वा नाही.
आम्ही हा कलाभ्यासाचा दुर्लक्षित खडतर मार्ग सोडणार नाही ह्याची खात्री असावी.
निव्वळ गंमत म्हणून लिहिलेलं काही उत्कृष्ट साहित्य नाहीच हे काहीतरी विचित्र भूत आपल्या पाठुंगळीला बसलं आहे का? पण असं मनात आणलं तरी मराठी माणसाला पाप वाटतं. त्यामुळे गंभीर, सामाजिक, वैचारिक म्हणजेच ग्रेट लेखन असला काहीतरी अगम्य समज मराठीत दिसतो. कुठल्याही अबक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण पाहा : त्यात ही भरताड असतेच. मला फार इच्छा आहे की ह्या संमेलनात कुणीतरी अध्यक्ष एकदा फक्त आणि फक्त लिखाणाबद्दलच बोलतील. असो. हे भलतंच काहीतरी मध्ये आलं.
साहित्यातली जातीव्यवस्था
ह्या साहित्यिक प्रतवारीत वैचारिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयांना उच्च श्रेणी तर रोमान्स, रहस्य, नवल, विज्ञान इत्यादी सर्वांना नीच श्रेणी मिळालेली दिसते.
म्हणजे कलाकृतीचा विषय महत्त्वाचा होऊन बसतो, कलाकृतीचा पोत, बाज, हाताळणी हे दूर राहिलं! मग बाकी अशा विषयांवर काही आणखी लिखाण असणं दूरची गोष्ट.
ह्यामुळे अशा विषयाकडे वळणारे वाचक बिचकतात.
किती लोक एखादं कामुक (erotica) कथांचा संग्रह राजरोसपणे आपल्या कॉफी टेबलावर ठेवतील?
शिवाय त्या विषयात सुमार साहित्य असणारच - तेव्हा कुठे जाऊन एखादा हिरा मिळणार.
इथे मला science fictionचं उदाहरण द्यावसं वाटतं. १९६० सालापर्यंत science fictionमधलं सुवर्णयुग संपून गेलं म्हणतात. मग ह्याचा अर्थ असा होतो का की ह्या काळात निव्वळ चांगलं, उच्च दर्जाचंच साहित्य लिहिलं गेलं? अजिबात नाही. चार आणे मालिकेतली लाखो सुमार पुस्तकं ह्या काळात छापली गेली. अतिशय सामान्य कथानक, नग्नता इत्यादींची भरताड असलेल्या कथा अनेक मासिकांतून सर्रास लिहिल्या जात. हे एखाद्या पिरॅमिडसारखं आहे.
त्याच्या तळाशी सुमार, साधारण दर्जाच्या कलाकृती असतील पण संख्येने चिकार. जसजसा आपण पिरामिड चढत जाऊ तशी दर्जात्मक वाढ आणि संख्यात्मक घट होईल.
पण मुद्दा असा आहे की ह्यासाठी science fictionमध्ये चिकार लिखाण होऊ देणं गरजेचं आहे.
पण असं काही लिहिलं तर त्याला लगेच पलायनवादी वगैरे लेबल लावून तर निकालात काढलं जातं.
वास्तववादी साहित्य हेच सर्वश्रेष्ठ साहित्य असा समज आहे. कदाचित तो खरा असेलही. (निदान मराठीत तरी हा एक विनोद आहे. विलास सारंगांनी त्यांच्या टीकात्मक पुस्तकात ही बाब सोदाहरण स्पष्ट केलीये. जातींची उतरंड असलेल्या भारतीय समाजात उत्तम वास्तववादी लिखाण होणं फार कठीण. अलीकडे परिस्थिती बदलते आहे हे सुखावह.)
पण त्याचा व्यत्यास खरा मानला जातो की वास्तववादी नसलेलं लिखाण म्हणजे टाकाऊ. हे पुन्हा binary विभाजन झालं.
ह्याचा परिणाम असा की मग कुणी fantasy लिहिली की त्याला पलायनवादी म्हण; वैज्ञानिक लिहिलं की त्याला असाहित्यिक म्हण; erotic लिखाण असलं की अश्लील म्हण असे लेबलवादी संप्रदाय तयार होतात. त्यात बिचारे असं काही लिहू जाणारे पिचत असतील की झक मारली आणि लिहायला गेलो.
महाराष्ट्रात किती अद्भुत कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात? Reynolds वगैरे लेखकांच्या कादंबऱ्यांचे अनुवादच प्रसिद्ध.
किती सैनिककथा प्रसिद्ध आहेत? साहसकथा, नवलकथा, विज्ञानकथा, भय, गूढ, ग्राफिक काहीही, कॉमिकबुकं, भटक्यांची दास्तान - लाखो-हजारो तऱ्हेचे अनुभव घेतात मराठीतले कोट्यवधी लोक. पण लिखाण मात्र एकाच परीघातलं असतं. आणि त्या परिघालाच श्रेष्ठ, महान वगैरे लेबलं लावली जातात. हे इतकं आतवर मनात बिंबलंय की त्यात काही चूक आहे असं कुणालाच वाटत नाही.
निव्वळ मनाचे पापुद्रे सोलणारे, वैचारिक, सामाजिक असलं लिखाण श्रेष्ठ मानलं जातं. जी.एंनी आपल्या "माणूस नावाचा बेटा" ह्या कथेत महाराष्ट्राच्या ह्या कोरड्या स्वभावावर जबरदस्त निरूपण केलं आहे.
एखाद्यालाच हे वास्तववादी लिखाण आणि उच्च साहित्यिक मूल्य वगैरे झेपतं. बाकीच्यावर का उगाच ही न पेलणारी ओझी टाकायची? लिहू द्या की लोकांना काय हवं ते. सगळेच दसतोयवस्की थोडेच होतात?
सोप्पं ते सगळंच टाकाऊ हा घाऊक समज फार वाईट आहे. उदाहरणार्थ, जॅकी श्रॉफ बरेचदा आपल्या 'भिडू' स्टायलीत काहीही बोलतो. पण त्यातला बराचसा भाग खरा आहे - तरीही त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून, पोशाखावरून आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? काय टपोरी आहे!!
उदाहरणार्थ, "मस्त मे रेहने का भिडू! दुनिया को मदद कर और बाकी फिक्र मत कर".
ह्याउलट निव्वळ अर्थहीन असं काही जर एखाद्याने जड भाषेत लिहिलं तर आणि त्याला एखाद्या ismचं नाव दिलं तर आपण त्याला सौंशयचा फायदा देतो - की बाबा काहीतरी मोठ्ठ्ठं आहे तत्वज्ञान.
उदाहरणार्थ, "माणसाने आपल्या इतरत्र असलेल्या भवतालाच्या उर्जेसाठी यत्न करायला हवेत. त्यातली सेंद्रिय आणि ऐन्द्रिय जाणीव बाजूला सारून अर्थात उरलेलं अध्यात्मिक विवचन स्वत्वाच्या अंगी बाणवंणं म्हणजेच लौकिकार्थाने गीतेची शिकवण पाळणं होय".
ह्याला झाटा अर्थ नाही - पण तो असू शकेल इतपत बतावणी केली आहे. पण अशी बतावणी लोकांना समजत नाही.
हा प्रकार वाईट. त्यामुळे कचराकुंडीतले हिरेही दिसेनासे होतात आणि खजिन्यातला कचराही रत्नच वाटू लागतो.
आता भय/कामुककथा वगैरेंना सरसकट हिणवणं सोप्पं आहे, पण तितक्याच सुमार कलाकृती ह्या समीक्षा, निबंध इत्यादी विषयांतही लिहिल्या जातात. पण ह्यांची भाषा चिरेबंदी आणि plausible असल्याने त्यात काही दर्जा आहे असा भास निर्माण होतो.
तेव्हा सरसकट एखाद्या विषयाला टाकाऊ म्हणून हिणवू नये ही आमची दुसरी विनंती आहे.
जजसाहेब - तुम्ही सुमार आणि कचरा ह्यातला फरक एखाद्या उदाहरणाने स्पष्ट कराल का?
अस्वल - नक्कीच मिलॉर्ड.
उदाहरणार्थ, व. पु काळे हे लेखक घ्या. ह्यांना सध्या तुच्छतेने बघितलं जातं. "अरे काय, वपु वाचताय?" पण त्यांच्या पुस्तकांना एक मोठा वाचकवर्ग आहे. त्यांची पुस्तकं ही "वाचनीय" आहेत. त्यात एक कथानक असतं, पात्रं असतात, त्यात काहीतरी घडतं जे अनेक लोकांना वाचनीय वाटतं.
ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? की वपु काळे ह्यांनी लिहिलेली पुस्तकं टाकाऊ नक्कीच नाहीत.
आता त्यातून नवीन काही समाजाला मिळतं का, त्यात प्रयोगशीलता आहे का? आणि समीक्षकांचं आवडतं म्हणजे हे लिखाण कालजयी (दीर्घ काळ टिकेल असं) आहे का? तर नक्कीच नाही.
मग हे लिखाण काय आहे? "साधारण/सामान्य" ह्या वर्गात बसेल असं हे लिखाण आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी- की साधारण किंवा सुमार लिहिणं हे काही कमीपणाचं नाही! कोट्यवधीतला एक कुणीतरी असामान्य काही लिहून जातो. तेव्हा इतरांनी सामान्य-चांगलं-वगैरे वर्गात घुटमळणं साहजिकच आहे.
तेव्हा कचऱ्याचे काही निकष पुढीलप्रमाणे आहेत -
१. अशा कलाकृतीची वाचनीयता/प्रेक्षणीयता फार कमी असते.
२. कलाकृतीला ठोस काही कथानक असेलच असं नाही.
३. कलाकृती वाचकाला/प्रेक्षकाला समजत नाही.
४. कलाकृतीबद्दल समीक्षकांची (असलीच तर!) अतिशय वाईट मतं असतात.
५. अशी कलाकृती कित्येकदा जे काही मांडते त्याला अर्थ असतोच असं नाही.
आता ह्या मुद्द्यांचा विचार केला, तर काही असामान्य उच्च दर्जाच्या कलाकृतीही ह्यात मोडतात!
इथेच गोम आहे. अशा असामान्य कलाकृती ज्या एक तर कचरा किंवा अत्युत्तम दर्जा ह्या टोकांना असतात आणि त्यांचं वर्गीकरण करताना उलटपालट होऊ शकते. मग काही काळानंतर ह्या "कल्ट" कलाकृती "असामान्य" वर्गात टाकल्या जातात. फार कमी वेळा प्रवास उलट दिशेने होतो!
हॉरर आणि सेक्स ही दोन अशी जॉनर आहेत की ज्यात सर्वाधिक सिनेमे बनवले जातात - पॉर्न वगळून.
त्यामुळे जर normal distribution विचारात घेतलं तर परिपूर्ण कचरा मिळण्याची शक्यता इथे जास्त आहे.
हॉरर हे जॉनर पकडून आपण आता उत्कृष्ट ते निकृष्ट अशा दर्जाच्या चित्रपटांची उदाहरणं पाहू. त्यानंतर आपण कचऱ्याकडे वळू.
(इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात घेणं गरजेचं आहे - सामान्य वकुबाची कलाकृती म्हणजे कचरा नव्हे. सामान्य, सुमार दर्जाची कलाकृती आपल्याला पैशाला पासरी दिसतील. त्यांची पैदास फार मोठ्या प्रमाणात होते. कचरा हा प्रकार त्याहून खालच्या दर्जाचा आहे.)
अर्थात समीक्षकांना हे मान्य होणार नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की समीक्षक मुळात वरच्या दर्जाचेच चित्रपट पहातात - तेव्हा त्यांना एकूण सिनेमाच्या दर्जाची जाण नसते. त्यांच्या परीघात केवळ ५०% वरचेच चित्रपट येत असल्याने ते सामान्य/अतिसामान्य चित्रपटांना कचरा म्हणतात. ही त्यांची चूक नाही- त्यांच्या मर्यादीत परीघाची आहे. चालायचंच!
मिलॉर्ड, भयपट ह्या प्रकारात मी तुम्हाला असामान्य ते कचरा ह्या वर्गातल्या काही कलाकृती (हिंदी) दाखवू इच्छितो -
उत्कृष्ट भयपट | राम गोपाल वर्माचा कौन. |
चांगला भयपट | गेहराई, रात, भूत वगैरे |
सामान्य भयपट | रामसे बंधूंचे सुरुवातीचे सिनेमे (२ गज जमीन के नीचे), राम गोपाल वर्माचे नंतरचे सिनेमे |
सुमार भयपट | रामसे बंधूंचे नंतरचे सिनेमे (पुराना मंदिर, पुरानी हवेली, तेहखाना , बंद दरवाजा इ.) |
वाईट भयपट (कचऱ्याची सुरुवात) | कुठलाही भयपट "बी दर्जाचा" (उदा. खूनी रात, शैतानी साया) |
अतिवाईट भयपट | निवडक ग्यानेंद्र चौधरी. किंवा सो ब्याड इट्स गुड |
परिपूर्ण कचरा (Z दर्जाचे चित्रपट ) | संपूर्ण हरिनाम सिंग. |
ह्या सगळ्याच्या शेवटी आपण परिपूर्ण कचऱ्याकडे आलो आहोत मिलॉर्ड.
हरिनाम सिंग हे नाव तुम्ही ऐकलं आहे का?
[जज्जसाहेब नाही - अशा अर्थी मान डोलावतात]
अस्वल - मी ह्या कोर्टात जाहीर पैज लावतो. जर इथे कुणी हरिनाम सिंगचे चित्रपट पहिले असतील तर मी माझी करंगळी कापून स्वखर्चाने पार्सल करायला तयार आहे. ह्या माणसाचे सिनेमे हा जागतिक पातळीवरचा अत्युच्च कचरा आहे मिलॉर्ड. एड वूड, टॉमी विसू वगैरे मंडळी हरिनामसिंगपुढं झक मारतात.
Plan 9 from outer space, Manos hands of fate, The room हे चित्रपट हरिनाम सिंगच्या 'शैतानी ड्रॅक्युला' पुढं काहीच नाहीत.
मी ह्याबद्दल जास्त बोलून वेळ घेऊ इच्छित नाही मिलॉर्ड, हा एक स्वतंत्र खटल्याचा विषय आहे - पण तुम्ही जर का ''शैतानी ड्रॅक्युला'' विचारात घेतला, तर त्याबद्दल आमच्यासारख्याच एका कचरावेचकाचं मत पाहा -
Watching Shaitani Dracula is an experience that can’t be described to anyone who hasn’t done it themselves. And once you have done it, you don’t need to have it described to you. In the hands of someone who knew what the hell they were doing, Shaitani Dracula would never achieve the air of unsettling strangeness that makes it so entrancing. The out-of-focus camera work, the terrible editing, the silent scenes of people standing around waiting for their queues…these things never would have happened with a real editor on the crew, and Shaitani Dracula would have been worse off because of it.
But it’s not enough to be incompetent. Anyone can be incompetent. Incompetence on its own usually translates into tedium. What Harinam Singh had, and what Hal Warren and Ed Wood, Jr. had, was a perfect storm of incompetence, crackpot vision, and steadfast inability to recognize one’s limits, combining to create something so daft yet so earnest that it becomes something truly special. By lucky happenstance, incompetence elevates the films to a transcendental plane of existence, a sort of out-of-its-mind experience jaded filmgoers spend years looking for.
And like the mole, when we finally see it, we are blinded by its brilliance.
तेव्हा काही वेळा परिपूर्ण कचरा हा एखाद्या असामान्य कलाकृतीसारखाच असतो - दुर्मीळ आणि स्वयंपूर्ण.
जज्जसाहेब - तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
अस्वल - (this is sparta च्या चालीवर ओरडून) कचऱ्याची बदनामी थांबवा !!!!!!!
(टीप : वकील नेटफलिक्स, अमेझॉन प्राईमवर पडीक असले तरी स्वतःला माध्यमांचे विश्लेषक म्हणवून घेणं पसंत करतात.)
प्रतिक्रिया
शै ड्रॅ त्वरित पाहण्यात येईल.
शै ड्रॅ त्वरित पाहण्यात येईल.
निकाल काय लागला खटल्याचा?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
केस pending आहे कोडतात.
(शै. ड्रॅ. पाहणारच असाल तर अफाट मनोनिग्रह आणि तितकाच वेळ हवा.
मला हा चित्रपट पूर्ण बघायला कैक तास लागले. )
==================
भूतकाळातील आस्वल्य.
All the best
> शै ड्रॅ त्वरित पाहण्यात येईल.
शुभास्ते पंथान: सन्तु । यू ट्यूबवर आहे. मी प्रयत्न केला पण दहा मिनिटांत हार खाल्ली.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
काचर्य,
सौमार्य व औच्चभ्य्र यांची रोचक चिरफाड
(अवांतर.)
मस्तच लिहिलंय अस्वलभाऊ.
तुम्हाला वाईजक्रॅकचे थग नोट्स माहितीयेत काय हो? तो थग "अवजड बोजड भाषेत असलेले लिखाण म्हणजेच खरीखुरी वाङमय टीका" ह्याच्याशी लढत आला आहे. त्याचा थग नोट्स म्हणून पुस्तक परिक्षणांचा संग्रह आहे. (म्हणजे युट्युब व्हिडीओ पण असतात, पण पुस्तक जास्त भारीये.) त्यात एकदम सरळ सोप्या भाषेत डिटेलवार रसग्रहण असतंय पुस्तकांचं.
त्याचे "क्लासिक वाक्यांचे" थग मध्ये ट्रान्सलेशन असा गंमत म्हणून शेवटी सेक्शन असतो. उदा- रोमिओ ज्युलिएट
क्लासिक:
थग-
क्लासिक:
थग-
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
भारी
हे भारी वाटतंय, ऐकतो!
(मुन्नाभाईच्या पुढल्या पिच्चरची आयडिया म्हणून वाईट नाही)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अस्वलराव !!!!! मस्त जमलंय
अस्वलराव !!!!! मस्त जमलंय
बेश!
झकास लेख - अगदी एखाद्या विचारवंतानं (म्हणजे बर्टान्ड रसेल पातळीच्या, आपल्या स्थानिक न्हवं) लिहिल्यासारखा.
शैतानी ड्राकुला बघावाच लागतोय आता.
मस्त
धन्यवाद!
अबापट/बं. भा. कटकोळ/ मारवा - प्र्तिक्रियेबद्दल धन्यवाद!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
लेख प्रचंड म्हणजे प्रचंड
लेख प्रचंड म्हणजे प्रचंड आवडलेला आहे . -आपलाच शैतानी ड्रॅक्युला फॅन .
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
भारी आवडलाय लेख
भारी आवडलाय लेख
इथे दिलेली कमेंट रिट्रॅक्ट करावी लागून हा माझा विषयावरील सर्वात आवडता लेख झालाय!
मर्यादीत वेळ
असामान्य कलाकृतीप्रमाणे परिपूर्ण कचरा दूर्मिळ आणि स्वयंपूर्ण, लेखातल्या या मुद्द्याशी सहमत.
आपल्या सगळ्यांकडे एक मर्यादीत वेळ आहे. या मर्यादीत वेळेत वाचण्यासारखे, पाहण्यासारखे भरपूर, म्हणजे अगदी न संपणारे आहे. त्यामुळे काय वाचण्यात / पाहण्यात कुणी कसा, किती वेळ घालवावा हे नाही म्हणायला प्रत्येकजण ठरवत असतो. चित्रपटांची समिक्षा करणार्याला जवळ जवळ सगळेच (सुमार) चित्रपट पाहणे हा करिअरचा भाग झाला. त्यामुळे माझ्या लेखी कचरा, सुमार, सकस असे वर्गीकरण जसे व्यक्तिसापेक्ष असते त्याचप्रमाणे वाचण्या/पाहण्याजोगे वि. न वाचण्या/ न पाहण्याजोगे अशी वर्गवारी होतच असते. कधी कधी ऐसी वा इतर ठिकाणचे अगदी सकस लेख केवळ माझी रुची त्या विषयात नसल्याने वा माझ्या त्या लेखातल्या विषयातल्या मूलभूत ज्ञानाच्या कमतरतेमुळे मी वाचायचे टाळले आहेत वा वरवर नजरेखाली घातले आहे. उदा. नंदांचा "होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा" वरवर नजरेखाली घातला. माझी गाडी शेरलॉक होम्स नंतर कधीच पुढे गेली नाही. मला आठवत पण नाही की शेवटचा भयपट वा रहस्यमय चित्रपट मी कधी कुठे पाहिला वा तशी शेवटची कादंबरी कधी वाचली. "खूपसारा पसारा" यात म्हटल्याप्रमाणे जेव्हा नवीन नवीन खुर्दा खिशात खुळखुळायला सुरुवात झाली तेव्हा मित्रांबरोबर दर विकांताला एकेकाळी मीही बारीवर लागलेले जमेल तेवढे चित्रपट पाहिलेत. पण आतासे चित्रपट पाहणे फारच कमी झाले आहे. यू-ट्यूबवरचा / मोबाईलचा स्क्रीन टाईम पण खूप कमी केला आहे. "RRR च्या निमित्ताने : टेस्ट आणि ट्रॅश" मधला RRR हा तेलगू चित्रपट आहे हे पण गुगल केल्यावर समजले.
सात-आठ वर्षापूर्वी "बेस्ट प्रॅक्टीस फॉर इक्विटी रिसर्च एनालिस्ट" हे पुस्तक वाचले होते. त्यात लेखकाने होतकरू एनालिस्टला मार्गदर्शन करताना दिलेला सल्ला असा की, बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न्स (अल्फा) मिळविण्यासाठी तुम्ही वाचत असेलेल्या/पाहत असलेल्या माध्यमातला -खास करून बातम्या (केवळ ऑनलाइनच नाही तर प्रिंट मिडिया सुद्धा), ओपिनिअनन्स आणि रिसर्च सुद्धा ("भूतकाळाची भुते .." या लेखात म्हटल्याप्रमाणे आमच्या प्रोफेशन मध्ये सुद्धा कन्फर्मेशन बायस ने भरलेले सुमार रिसर्च भरपूर असतात) - ९८% कचरा ओळखायला शिका कारण केवळ २% माहिती ही अल्फा जनरेट करण्यासाठी उपयोगी पडते.
व्यक्तीसापेक्ष आणि निरपेक्ष
व्यक्तीसापेक्ष तर आहेच.
काही थोर कलाकृती मला वाचवत नाहीत, अनेक क्लासिक्स कधी उघडावीशी वाटली नाहीत, काही विषयच माझ्याकडून हक्काने टाळले जातात. आणि हे अर्थात अपेक्षित आहेच.
पण मला असं वाटतं की काही विषय हे जणीवपूर्वक "कचरा" समजले जातात.
भयकथांशी संबधित एक किस्सा आहे- की म्हणे नारायण धारपांनी जीए कुलकर्णींना कुठल्याशा भयकथा अंकासाठी त्यांची कथा विचारली तर जीए उखडले होते.
आता मोठ्या लोकांची ही तऱ्हा, तर त्यांना अनुकरण करून आपली कलेची आवड जोपासणाऱ्या लोकांच्या मनातही त्यामुळे आपोआप "भयकथा = फालतू लिखाण" असं बसणारच ना?
असे अनेक फॅक्टर असतील जे आपल्याला एखादा कलाविषय/कलाकृती फालतू म्हणायला जबाबदार असतील- आणि आपल्या नकळत आपण तो शेरा मारून, नाक मुरडून ते पुस्तक बाजूला ठेऊन देऊ.म्हणजे नेणिवेतच आपल्याला एक बायस भरून राहिला.
तुम्ही दिलेलं उदाहरण ह्याच्या उलट वाटतंय मला- पण निदान तिथे तुम्ही जाणीवपूर्वक असं काही वाचायचं/ बघायचं टाळलं आहे.
९८% गोष्टी टाळून २% बघता येणं हे माणसाला जमतं, ज्यादिवशी AI ला जमेल तेव्हा लोकांचा नेटफलिक्स/टीव्हीवर चॅनेल बदलायचा खेळ संपून जाईल
==================
भूतकाळातील आस्वल्य.
.
कारण माझं तसही वाचन कमी आहे. जी बहुसंख्यांच्या दृष्टीने आणि तज्ञांच्या दृष्टीने (व्यक्तीनिरपेक्ष किंवा बहुमान्य) उकृष्ट आहे "त्यातले निवडक" वाचण्याचा / पाहण्याचा माझा कल असतो.
मागच्या आठवड्यात सुटीतल्या प्रवासात मी ग्रेट एक्सपेक्टेशन हा १९४६ चा चित्रपट पाहिला. ब्रिटनचा हा जो घडामोडीचा काळ आहे - जॉर्जियन ते एलिझाबेथ - त्याचा जुजबी इतिहास माहित नसला तरी या कथेत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. तरीही हा चित्रपट (आणि कादंबरी सुद्धा) ना उत्कृष्ट कलाकृती मध्ये मोडत ना सुमार मध्ये. तो कुठेतरी मधल्या-मध्ये असावा असे मला वाटले. (कलाकृती आणि सुमार मधली लाईन धूसर आहे. जसे तुम्ही भयपटांची वर्गवारी केली आहे वा खाली घासकडवींनी सांगितलेला ग्रे च्या शेडचा मुद्दा ). कुणास ठावूक काही काळ गेला तर त्याचा आता असलेला प्रभावही ओसरून जाईल. पण हे माझे मत झाले. ब्रिटिश इतिहासाची खोलात माहिती असलेल्या, चित्रपटांचे परीक्षण करणार्याला त्यातले अजून बारीकसारीक कांगोरे लक्षात येतील, आणि ही कथा त्याला उत्कृष्ट कलाकृती वाटेलही. हाच मुद्दा/शंका तुम्ही दुसर्या एका प्रतिसादात मांडलाय.
.
कळत-नकळत होणारी शेरेबाजी - नाक मुरडणे टाळायला हवे याबाबत सहमत.
नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनं पाहूनच
नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनं पाहूनच खूष झालो. जग काळंपांढरं नाही, त्या दोन टोकांत अनेक राखाडी छटा असतात हेखूप लोक विसरतात.
मनोरंजक
लेख सुप्पर मनोरंजक आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
वा!! बहोत खुब!!
वा!! बहोत खुब!!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
चित्रकला
कथा-कादंबरी-चित्रपट एकवेळ ठिक आहे. अगदीच कलाकृती (शुद्ध कचरा) ओळखता नाही आली तरी काहीतरी चांगले (बर्यापैकी वाईट) आहे इतके कळेल. मतभेदातला फरक फारसा रुंद नसेल.
पण एखादे चित्र कलाकृती आहे की कचरा हे मला तरी बिलकूल ओळखता यायचे नाही. ज्याला (काय नुसत्या रेघोट्या ओढल्यात असं समजून) कचरा समजायचो ते कदाचित मल्टीमिलिअन डॉलर्सचे चित्र निघेल. चुकून रद्दीत द्यायचो आणि आमचा रद्दीवाला एका रात्रीत करोडपती व्हायचा.
वा कुणीतरी टोपी घालणारा भेटला तर एखादे पोर्ट्रेट लाखात गळ्यात मारेल (आर्टीस्टने नाव कमविले पुढे तर त्याची उमेदीच्या काळातली चित्रे कैक पटीने विकली जातील) आणि प्रत्यक्ष लिलावात त्याची बोली काही हजारात पण व्हायची नाही.
चित्रकला!
मलाही चित्रकलेत रूची नाही, त्यामुळे चित्रकलेतलं नवंजुनं काही मुद्दामून धुंडाळायला जाईन असं होतच नाही.
मला वाटतं चि.जंनी मागे ह्याबद्दल इथेच लिहिलं होतं की भारतीयांची दृश्यकलांची जाणीव मर्यादित झाली आहे. आपला सिनेमाही खूप "बोलतो" वगैरे.
त्यामुळे खाली लिहितो आहे तो माझा अनभ्यस्त कयास आहे.
------------
चित्रकला ही पुस्तक/फिल्मपेक्षा वेगळी वाटते - निदान प्रेक्षक ह्या भूमिकेतून तरी. म्हणजे पुस्तकांच्या पेपरबॅक आवृत्त्या निघतात, सिनेमे तर लोकांनी पैसे खर्च करून पहावेत ह्याच कारणासाठी सर्वाधिक संख्येने बनवले जातात. तेव्हा इथे नॉर्मल डिस्त्रिब्युशन अपेक्षित असतं.
पण चित्रकला हा प्रकार वेगळा आहे - तिथे "लोकांनी पहावीत" म्हणून भारंभार चित्रं काढली जात नाहीत - निदान ज्या चित्रांबद्दल आपण एक "कला" म्हणून चर्चा करतो. तिथे बहुधा क्युरेटर्स अतिशय काळजीपूर्वक निवडून मगच चित्रांचं प्रदर्शन भरवतात(चू.भू.द्या.)
मग अशा ठिकाणी - चित्र ही बहुतेक वेळा 'सिलेक्शन बायस' च्या चष्म्यातून बघावी का?
सुमार अशी चित्रं कुणी गॅलर्यांमधे मुळात लावू देतील का?
कचरा की क्लासिक - हा गोंधळ इथे होणं फारच सहाजिक आहे - निदान सामान्य माणसाला. बँक्सीचे काही प्रयोग आठवले!
वर मारवांनी दिलेलं व्यंगचित्रंही पुरेसं बोलकं आहे
==================
भूतकाळातील आस्वल्य.