म्हणजे कोण?
म्हणजे कोण?
"भल्या पहाटे दारं लोटून अंगणात सडासारव करायची. तुळशीसमोर रांगोळी काढायची. सकाळी मुलांचे डबे भरायचे. पैपाहुण्यांची उठबस, अनि-जाईचा अभ्यास. त्यात आमचा अनिकेत म्हणजे मुलखाचा खोडकर. अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच कुरापती करण्यात… "
दिवाळीचा फराळ बनवताना अनिकेतची आई वाड्यातल्या आठवणी रमाला सांगत होती. अनिकेतचं बालपण, शाळेतले किस्से, भावंडांच्या गमतीजमती त्याच्या आईच्या तोंडून ऐकताना फोटोंमध्ये पाहिलेलं त्याचं लहानपण जिवंत होऊन इकडे तिकडे बागडतंय असाच भास तिला होत होता.
अनिकेतची आई त्याला भेटायला अमेरीकेला यायचं ठरल्यापासून रमाच्या मनात नाना प्रश्न येत होते. कशा असतील त्या? कशी वाटेनं मी त्यांना? आवडेना का? 'आई' म्हणण्याइतपत ओळख तर अनिकेत पहिल्याच भेटीत करुन द्यायचा नाही. पण आमच्याबद्दल सांगितल्यावर त्यांच्या मुलाची गर्लफ्रेंड किंवा भावी सून म्हणून आवडेना का? असं काही नातं प्रस्थापित होईपर्यंत आपण कसं संबोधावं त्यांना? इतर अमेरीकन विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयांना 'मिसेस गोल्डमन', 'मिसेस स्मिथ' म्हणत तसं आपणही त्यांना 'मिसेस कुलकर्णी' म्हणावं का? छे छे खूप फॉर्मल वाटतं! 'अनिकेतची आई'? अम्म, नाही असंही नकोच. माझं नातं थेट त्यांच्याशी जुळावं. त्यामध्ये अनिकेतचा उसना धागा कशासाठी! मग कुलकर्णी काकू?
त्याच्या आईशी आपलं नातं जवळून विणलं जावं ही सुप्त इच्छा मात्र सतत रमाच्या मनात होती. त्या समोर आल्या तसे आपोआप शब्द निघाले, "नमस्ते मावशी". काकू आणि मावशीमध्ये मावशी नाळेच्या जास्त जवळची. काकूपेक्षा कमी उपरी.
"यावेळी नेमकी दिवाळीला इथं अमेरीकेला आले आहे तर अनिसाठी आणि त्याच्या मित्रमैत्रिणींसाठी सगळा फराळ करावा म्हटलं. मी फराळाचं काढलं म्हणल्यावर अनिकेत बरोब्बर लॅबमध्ये पळाला; पण तू आलीस ते बरं झालं. "
शेजारी बसलेल्या रमानं केव्हापासून हातात घेतलेल्या बेसनाच्या गोळ्याचा लाडू वळायचा एक फोल प्रयत्न केला. लाडू वळणं तसंही निमित्तमात्रच होतं म्हणा. त्यांच्या बाजूला बसून गप्पा मारणं हा मुख्य उद्देश. दर शनिवार-रविवार युनिव्हर्सिटीच्या लॅबमध्ये पडीक असणाऱ्या रमाला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच कोडींग, पीएचडीचा डिफेन्स, ऍडवायझर या सगळ्यापासून दूर, अनिकेतच्या आईजवळ बसून त्यांच्या गोष्टी ऐकत ही अशी फराळाची तयारी करताना मुलखावेगळा आनंद मिळत होता. अधून मधून फोनवर अनिकेतचे मेसेजेस चालूच होते. लॅबमध्ये नेहमी बरोबर असणाऱ्या रमाशिवाय त्याचंही लक्ष लागत नसावं. अनिकेतने आईला अजून त्यांच्या नात्याचा थांगपत्ताही लागू दिला नसला तरी कुणा मुलीचा त्याच्या घरातला असा सहज वावर त्यांच्या नजरेतून चुकला नसावा हे ही तिला ठाऊक होतं. अनिकेतच्या घरच्या, लहानपणीच्या गोष्टी ऐकताना एक स्त्रीसुलभ गोड थरथरही तिला खोलवर जाणवत होती.
"भरल्या घरात एकत्र कुटुंबात मला नि जाऊबाईंना तेव्हा सगळं करायला लागायचं. थोरल्या वन्सपण घरातच होत्या. त्यामुळं सासूबाईंची कमी कधी जाणवली नाही. सणासुदीची कार्यं, पूजापाठ, सोयर-सुतक, केळवणं, बारसं-मुंजी, कुळधर्म-कुळाचार सगळं सगळं करायचो. लेकीसुना करतीलच असं नाही. माझा हट्टही नाही तसा..."
यातले कितीतरी शब्द रमासाठी नवखे होते. कुळधर्म-कुळाचार म्हणजे काय नेमकं! अनिकेतला भेटले तेव्हा तो जानवं घालायचा. त्याच्यावर ते छानही दिसायचं. नंतर नंतर त्यानंच सोडून दिलं. जानव्याचा हा एवढा संदर्भ सोडला तर कधी कोणत्या मुंजीलाही जाणं झालं नव्हतं. अनिकेतच्या मुंजीचे फोटो पाहिले होते तेवढेच. त्याच्या आईच्या तोंडून आता हे सगळं ऐकताना मनातल्या मनात थोडीशी धास्तीही वाटत होती. या घरात आपण अगदीच वेगळे पडलो तर! आपल्याला या म्हणताहेत त्यातलं काहीच जमलं नाही तर! अनिकेत एकदा म्हणाला होता की घरात मराठमोळे संस्कार जपले जावेत अशी त्याच्या आईची खूप इच्छा आहे; पण म्हणून त्याची बायको मराठीच हवी असा हट्ट अजिबात नाही. अगदी अमेरीकन मुलगी असली तरीही तिला मराठमोळे पदार्थ शिकवायला, साडी नेसायला शिकवायला तिला आवडेल असं ती त्याला म्हणाली होती म्हणे. मी तर अस्खलित मराठी बोलणारी महाराष्ट्रातली मुलगी! माझा लर्निंग कर्व्ह कितीतरी पटीनं जलद असेल काही नवं शिकायचं असेल तर! आणि तसंही रॉबर्टसारख्या ऍडवायझरच्या हाताखाली चार वर्षं काढल्यानंतर जगात कोणतीच गोष्ट आता अशक्य नाही म्हणा. डॉक्टर रॉबर्टचा सदा कडू किराईत प्याल्यासारखा चेहरा आठवून तिला मनातल्या मनात हसू आलं. हातातला पहिला लाडू अजून वळलाच जात होता.
"... आणि आमचा शेजारपाजारसुद्धा अगदी कर्मठ गं. अक्खी आळी सोवळ्यात स्वैपाक करणारी. घरातल्या माणसांचा एवढा पसारा म्हणून आम्ही घरात मदतीला म्हणून बाई लावायला सुरुवात केली. पण नेहमी आमच्यातली मिळेलच असं नाही. मग वेळ सरावी म्हणून कधी समाजाबाहेरची बाई कामाला लावली तर शेजारणी लगेच विचारायला येत. 'हीला स्वयंपाकाचं करु देता का तुम्ही? पाण्याला शिवते का?'... मग गुपचूप मागल्या दारानं ये म्हणून सांगायला लागायचं"
अनिकेतची आई सहजपणे बोलून गेली. रमानं मान उचलली नाही पण काळजात मात्र चर्रर्र झालं एकदम.
"म्हणजे आम्ही तसं काही मानलं नाही गं कधी.. स्वैपाक छान करायच्या त्या बायका. त्यांच्या हातच्या पोळ्या तर मुलांना खूप आवडायच्या. अनिच्या आजोबांना मात्र त्यांचं देवघराकडे फिरकणं खपायचं नाही. वन्संचंही तेच. मग तेवढं त्या बायकांना बजावून ठेवत असू. काही झालं तरी देवघराची चौकट ओलांडायची नाही. पण फार कठीण जायचं ते सगळं. त्यापेक्षा आपलं आपण केलेलं बरं असं वाटायचं. घरची सून मी. जबाबदारीनं वागायला नको का!"
रमा अजूनही खाली मान घालून परातीतल्या बेसनाच्या ढिगाकडे एकटक पाहतच होती.
***
शिल्पा. शाळेत असतानाची रमाची खास मैत्रीण. अभ्यासात थोडीशी डावीच पण तिचे वडील गावातले सावकार. मोठ्ठा वाडा. शिल्पा मोठ्या दिमाखानं सांगत असे की तिच्या आजोबांचे आजोबा त्यांच्या संस्थानाच्या महाराजांच्या सैन्यात सेनापती होते म्हणे. खरंय.अभिमान वाटण्यासारखंच आहे. एवढा शूर पराक्रमी राजा. त्याच्या सैन्याचा सेनापती म्हणजे काय दरारा असेल!
रमाने कुतूहलानं रात्री झोपताना एकदा आईला विचारलं, "आपले पूर्वज कोण होते गं आई?"
"आपले पूर्वज? का गं?" आई जरा भांबावलीच
"माझी मैत्रीण आहे नं शिल्पा, तिचे पणजोबा आपल्या संस्थानाच्या महाराजांच्या सैन्यात सेनापती होते म्हणे. माझे पणजोबा पण असे प्रधान मंत्री नाहीतर अमात्य असले असते तर किती गम्मत आली असती ना? नाहीतर त्यांचं लग्न लावून देणारे भटजीबुआ?" नऊ वर्षांच्या रमाच्या डोळ्यांत कुतूहलाची तकाकी होती.
आईला प्रश्न पडला. काय सांगावं पोरीला? कोण आपले पूर्वज? ज्या वाटेवरून चालत गेलो त्या खुणा पुसल्या जाव्यात म्हणून पाठीला शेपटासारखी झाडू लावून फिरणारे नि तोंडातली थुंकी वाटेवर सांडू नये म्हणून गळ्यात मडकं लटकवून फिरणारे?
"शिल्पा सारखी म्हणत असते, त्यांच्याकडे शाह्यांणव का अशीच काहीतरी घरं आहेत म्हणून. म्हणजे नेमकं काय गं?"
"शिल्पाने गणितात किती दिवे लावले ते सांग मला आधी."
"दिवे? अंधारच आहे सगळा आई! मोठ्ठा भोपळा मिळाला तिला कालच्या परीक्षेत" असं म्हणत रमा खुदुखुदू हसू लागली.
"असं हसू नये कुणावर बाळा. तुला एवढं गणित जमतं तर शिकव ना तिला. दिल्यानं ज्ञान वाढतं. आणि शिकवल्यानं पक्कं होतं."
आईने सांगितलेला शब्दन् शब्द ऐकायचा असा रमाचा स्वतःचाच नियम होता. मग एकदा स्वतःहून तिनं शिल्पाला गणित शिकवू का असं विचारलं. शिल्पानंही थोडा अभ्यास केल्यानंतर खेळायला मिळेल म्हणून शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा सुटल्यावर रमाला घरी बोलवायचा बेत आखला. वाड्यातल्या ओसरीवर अर्धा पाऊणतास अभ्यास झाल्यावर दोघीजणी वाड्यामध्ये भटकायला गेल्या. हसत बागडत लपाछपीचा खेळ सुरु झाला. शिल्पावर राज्य होतं. तिनं डोळे मिटताच रमा लपायला गेली. कुठे लपावं बरं.. त्या धान्याच्या गोणीमागे.. की पलीकडच्या हौदापाठी? मांजरीच्या पावलांनी लपायची जागा हुडकत हुडकत रमा माजघराच्या दिशेनं जात्यावर गोड आवाजात ओव्या गायला जात होत्या त्या आवाजाकडे गेली. किती मोठ्ठा नि आलिशान होता शिल्पाचा वाडा. कुणीही हरखून जावं असा.
पाच..चार..तीन.. दोन.. अरे बापरे अजून लपलोच नाही आपण! शिल्पाच्या पैंजणांचा आवाज येतो तशी रमा सट्कन डावीकडे वळली नि देवघरातल्या खांबामागे दबा धरुन बसून राहिली. काय मोक्याची जागा शोधली आपण. पुढचा अर्धा तास तरी शिल्पाला सापडायचो नाही आपण. छे! एखादं पुस्तक का नाही आणलं बरोबर वाचायला! बावळट बसली असती शोधत आणि आपली वीसएक पानं तरी वाचून झाली असती.
"शिव शिव शिव… विटाळ झालो रे मंगेशा… ही वेशीभायेरची पोरगी हैसर कशी इली!! ऐकलंस काय गो ss शिल्पाची आवशी..."
देवघरातल्या नंदादीपात तेल टाकायला आलेल्या शिल्पाच्या आजीनं रमाला पाहताच जोरजोरात आरोळी ठोकायला सुरुवात केली.
"विटाळ झाला गोऽऽ .. कसा फेडतलंस ह्या पाप. कालच शेणान सारवून घेतलेलंय देवघर. आता सगळ्या वाड्यार गोमूत्र शिंपडाक व्हया.. ओसरीवरची भूतूर ईलीच कशी मेली ही इडापीडा.. आधी त्या शिल्पाक कान पिळून इचारुक व्हया.."
काय झालंय हे विशेष समजायच्या आतच भांबावलेली, घाबरलेली रमा तिथून पळून बाहेर गेली. आतमधून आजीची बोंब चालूच होती.
"शाळेत जातंत.. एकत्र बसतंत.. हातात हात धरुन फिरतंत मी कायो बोलूक नाय. पुढारलेली लोका असाव आमीपण. नसत्या लोकांका वाड्यार आणायचा असतला तर भायेरच्या भायेर काय ते आणा.. खायाला प्यायाला द्या.. पण माझ्या मंगेशाच्या सावलीक तरी नको रे मेल्यांनो .."
लगबगीनं आपलं दप्तर आवरुन वाड्यातून बाहेर सुसाट पळ काढेपर्यंत रमाला शिल्पाच्या आजीचं ओरडणं ऐकू येत होतं. निव्वळ आपल्या स्पर्शानं, सावलीनं, अस्तित्वानं त्या वास्तूचा इतका विटाळ का व्हावा हे रमाच्या आकलनापलीकडचं होतं.
रात्री आईच्या कुशीत हमसून हमसून रडणाऱ्या रमापेक्षाही आपल्या निष्पाप पिल्लावर झालेल्या घावाची वेदना तिच्या आईला जास्त जाणवत होती. पण तिनं रमाला तसं दाखवून दिलं नाही.
"आई, आपल्याला हे असं काहीही म्हणतात ते आपण मान्यच केलं नाही तर?"
"तू लाख नाही म्हणशील गं, पण आपल्या म्हणण्याने काय होतंय! आपल्याला विचारत नाहीत कुणी आणि आपल्याला ते अधिकारही नाहीत. या सगळ्याच्या खूप खाली आहोत आपण."
"म्हणजे? आणि हे सगळं कुणी ठरवलं? आपण खालचे आणि ते वरचे हे कुणी ठरवलं? मी वर्गात नेहमी पहिली येते. तरीही मी खालची कशी काय?"
"वेदांमध्ये लिहीलं आहे ते सगळं."
"वेद म्हणजे काय?"
"पूर्वीच्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत ती. खूप वर्षांपूर्वी. तेव्हापासून सगळे तेच खरं मानत आले आहेत."
"माणसांनीच लिहीलेली पुस्तकं ना? तसं आपण एक वेगळं पुस्तक का लिहीत नाही मग?"
"आणि कोण वाचणार ते पुस्तक? इतकं सोपं नाही ते बाळा. पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी बदलायला वेळ लागतो."
"पण जात हवीच कशाला आई? आणि मला माझी जात कुणाला सांगायचीच नाही मुळी. मी सांगितलीच नाही तर कुणाला कशी कळणार?"
काय देणार याचं उत्तर? काय समजणार त्या भाबड्या जीवाला? काहीतरी गुंडाळून सांगावं तर भेदाभेदाच्या पहिल्या अनुभवाला सामोरं गेलेल्या त्या चिमुकल्या मुलीला किती दिवस आपण असं पदराखाली लपवत राहणार?
रमाच्या प्रश्नांची स्वतःला माहीत असलेली सगळी उत्तरं ओठांपाशी मुडपून तिला घट्ट कवटाळत नि तिच्या घामेजलेल्या कपाळाचा अलवार मुका घेत आई म्हणाली,
"रमे, बाळा, तू अजून लहान आहेस हे सगळं समजण्यासाठी. खूप शिक. मोठी हो. अशा ठिकाणी जा, जिथे या सगळ्याला काही अर्थ नाही. जिथे जातपात कुणी जाणत नाही. आपलं आडनाव सांगितल्यावर 'म्हणजे कोण' असे प्रश्नच येणार नाहीत..."
*****
"'ब्राऊन' म्हणजे कोण गं?
"म्हणजे? मला कळला नाही तुमचा प्रश्न मावशी. भारतीय वंशाच्या लोकांना इथं 'ब्राऊन' म्हणतात ते माहीत असेलच ना तुम्हाला?"
"नाही तसं नाही गं. म्हणजे काळा की गोरा? अनिकेत हल्ली कॅनडाला कॉन्फरन्सला गेला होता तेव्हा येताना एअरपोर्टवर एका ऑफिसरने त्याला दहा तास चौकशीसाठी बसवून ठेवलं होतं बघ..."
"हो माहितेय."
"त्या ऑफिसरचं नाव डेविड ब्राऊन होतं असं म्हणाला होता अनि. मी त्याला विचारलं की तो ऑफिसर स्वतः काळा होता की गोरा. पण तसं काही सांगितलं नाही अनिने."
"इथे असं आडनावावरुन काही कळत नाही. पण तो ऑफिसर आफ्रिकन-अमेरीकन, म्हणजे… काळा होता." निर्विकार चेहऱ्यानं रमानं उत्तर दिलं.
"म्हणजे क्लिंटन आडनावाचा माणूस काळा आणि ओबामा आडनावाचा माणूस गोरा असू शकतो?"
"अगदी असंच काही नाही. काही आडनावं फक्त आफ्रिकन-अमेरीकन लोकांमध्येच आढळतात. गुलामगिरीच्या दिवसांपासून चालत आलेली. कधी नावाचा अपभ्रंश होऊन तशीच पुढे आलेली. त्यातही कुणाचा उगम फ्रेंच असतो, कुणाचा आयरिश तर कुणाचं अजून काही. खूप गुंतागुंतीचं आहे हे सगळं." कुणी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर माहीत असेल, तर ते उत्तर देणं हे जणू तिच्या उपजत बुद्धिमान रक्तातच भिनलेलं होतं. त्या ज्ञानाला हळूहळू सामंजस्याची, मोठेपणाची, शांतपणाची लकेर येत गेली होती. तरीही आज अनाहुतपणे बसलेला घाव तिच्या ओलसर आवाजातून लपत नव्हता.
"म्हणजे स्वतः काळा आणि तरी एवढा जोर! काय म्हणावं आता! स्वतः गुलाम म्हणून या देशात आले आणि आता अधिकार मिळाले तर दुसऱ्यांना अशी वागणूक. एवढे अन्याय झाले म्हणतात त्यांच्यावर तर या लोकांना उलट जास्त जाण असायला हवी ना."
"अनिकेतच्या वीजावर चुकीची तारीख होती म्हणून तो गोंधळ झाला होता. त्या ऑफिसरच्या काळा किंवा गोरा असण्यानं जे नियम असतील ते बदलणार नाहीत. अर्थात कुणी गोरा ऑफिसर असता तरीही त्यानं अनिकेतला असं दहा तास थांबवून ठेवणं चुकीचंच. तिथे त्याला मिळालेली वागणूक तर पूर्णच चुकीची!" विषय वाढवायची इच्छा नसली तरीही रमाला हे सांगितल्याशिवाय राहावलं नाही.
"वागणूक तर शंभर टक्के चुकीचीच गं!! ते सगळं प्रकरण ऐकून आमच्या जिवाचं काय पाणी पाणी झालं सांगू तुला! डोळ्याला डोळा लागला नाही पुढचे कित्येक दिवस. आपल्या मुलांना अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं तेव्हा आईबापाचं काळीज कसं तुटतं हे त्यांचं त्यानंच माहीत." रमाला आईची प्रचंड आठवण आली. आत्ताच्या आत्ता इथून निघावं आणि जाऊन तिला एक घट्ट मिठी मारावी असं वाटू लागलं.
अनिकेतला म्हटलं, एवढी काय रे तुला दाढी ठेवायची हौस! आधीच हल्ली सगळीकडे वातावरण कसं आहे पाहतोय आपण. त्यात हा असा गोरापान, उंचापुरा, देखणा, घाऱ्या डोळ्यांचा. वरुन दाढी ठेवली तर बघायलाच नको. लगेच गैरसमज होतात गं लोकांचे." अनिकेतच्या आईचा आवाज तिच्याही नकळत हलकासा दबका झाला.
"हूं. मला आता निघायला हवं. उशीर झाला. अनिकेत येईलच इतक्यात."
"हो हो निघ. आणि तू सुद्धा त्या 'ब्लॅक लाईव्हज मॅटर'च्या मोर्चात जातेस म्हणे. अनिकेत सांगत होता. असं आता 'ब्राऊन लाईव्हज मॅटर' वगैरे सुद्धा सुरु करा तुम्ही." रमानं वळलेल्या लाडवांचं ताट उचलत अनिकेतची आई खुर्चीवरुन उठत हसत हसत म्हणाली.
"आणि उद्या अनिकेतच्या लॅबमधली तुम्ही सगळी मंडळी फराळाला या हो. तुमची ती मारीया आणि ख्रिस का फीस कोण तो, सगळे या. लक्ष्मीपूजन पण आहे. लॅबमधून सरळ इथे आलात तरी चालेल. देवाधर्माचं सोवळं ओवळं सगळं तिकडे भारतात. इथे अमेरीकेत येते तेव्हा मी काही मानत नाही."
"येते मी… अनिकेतची आई." रमानं फराळाचा पसारा आवरुन स्वयंपाकघरात ठेवला आणि लगबगीनं आपली बॅग आवरुन तिथून सुसाट बाहेर पडली. शिल्पाच्या वाड्यातून कोणे एके काळी निघाली होती तशीच.
घरी येऊन चार-पाच तास उलटून गेले तरी आईला मेसेज करताना रमाचा हात अजूनही थरथरत होता.
"आपल्या छोट्याशा गावातून एवढ्या दूर एका जगप्रसिद्ध महाविद्यालयात आले खरी. पण शिल्पाच्या देवघरानं नाकारलेलं माझं अस्तित्व अनिकेतच्या आईनं इथं फक्त अमेरीकेत आहे म्हणून तिच्या लक्ष्मीपूजनासाठी मान्य करावं हा इतकाच माझा प्रवास. आपल्या सगळ्यांचाच प्रवास. हे वास्तव जिथं कुणालाही मान्य नाही, जिथं 'म्हणजे कोण' या प्रश्नाचं उत्तर काय अपेक्षित असावं हे अभिप्रेतच नाही अशी जागा या जगात अजून तरी कुठे नाही गं आई..."
आपण वळलेल्या लाडवांची अक्खी परात अनिकेतच्या आईनं उद्याच्या नैवेद्यापासून बाजूला सरकवलेली अजूनही तिला स्पष्ट दिसत होती.
प्रतिक्रिया
सट्ल बट् शार्प!
हा लेख पहिल्यांदा वाचला तेव्हाच मनात घर करून गेला. इथे एकही प्रतिसाद नसला तरी आख्ख्या दिवाळी अंकातल्या सर्व लेखांमध्ये हा सर्वाधिक भावला. (इतरही लेख अर्थातच आवडले, पण याचं विशेष कौतुक!)
लिहीलेलं आवडलं आहे. अनेक
लिहीलेलं आवडलं आहे. अनेक लोकांना असे अनुभव येतात; पण कोणी फारसे बोलत / लिहीत नाही. शाळेपासून अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत असे लोक बघितलेले, अनुभवलेले आहेत व आई-वडिलांकडूनही असे किस्से ऐकलेले आहेत. कमाल म्हणजे उघडपणे आपलं काही चुकतंय असं मनातही न येता हे लोक असे वागत असतात आणि ज्यांना अशा वागण्यामुळे अपमानित झाल्यासारखं वाटतं ते मात्र तिथल्यातिथे विरोध करू शकत नाहीत. ह्याचं काय कारण असावं यावर मी खूप विचार करत असतो.
कोणत्याही काल्पनिक कारणाने आपल्याला हीन लेखलं जातंय हे अनुभवल्यावर माणसाच्या आत्मविश्वासाला थोडी का होईना ठेच लागतेच. त्याला काहीतरी मानसशास्त्रीय कारण असावे. "A Class Divided" नावाचा एक माहितीपट पाहिला होता काही काळापूर्वी. त्यात लहान मुलांच्या वर्गात एका शिक्षिकेने प्रयोग केले होते की वर्गातल्या निम्म्या मुलांनी काहीही कारणाने उरलेल्या निम्म्या मुलांना हीन लेखायचं, अपमान करायचा वगैरे. आणि असे केल्यावर ज्यांचा अपमान केला जात होता त्या मुलामुलींच्या आत्मविश्वासावर, कार्यक्षमतेवर, कल्पनाशक्तीवर विपरीत परिणाम होत आहे हे शिक्षिका व मुलांनाही आढळून आले.
चार लोकांनी मिळून एखाद्याला हीन समजलं की तो माणूस स्वत:वर शंका घेऊ लागतो या मानसशास्त्रीय परिणामाचा ह्या असल्या लोकांनी हजारो वर्षे फायदा उपटला. गंमत म्हणजे असं काही हे ठरवून किंवा अभ्यास करून वागत नसतात; तितकी हुशारी या सुमार लोकांमध्ये नसते. केवळ दुसरा नामोहरम होतो म्हणून ह्यांचे असले प्रकार चालू राहतात.
त्यामुळे नुसतं ह्याबद्दल बोलणे पुरेसं नाही तर अशी सुप्रिमसिस्ट सुमार व्यक्ती जिथे जिथे असं वागताना दिसेल तिथे तिथे त्या व्यक्तीची लाज काढून हा डाव त्यांच्यावरच उलटवला गेला पाहिजे म्हणजेच मग ही वृत्ती कमीकमी होत जाईल.