चौदाव्या शतकातील प्लेग

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

चौदाव्या शतकातील प्लेग

- उज्ज्वला

इ.स. १३४७मध्ये फ्रान्सच्या मार्सेय बंदरात प्रथम प्लेगचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता तो युरोपभर सर्वदूर पसरला. या साथीच्या रोगाने युरोपची कमीत कमी एक तृतीयांश ते निम्मी एवढी लोकसंख्या मृत्यू पावली. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या काळच्या दस्तऐवजांना उजाळा देणाऱ्या काही लेखांच्या आधारे घेतलेला हा आढावा.

इ.स. १३४७मध्ये फ्रान्सच्या मार्सेय बंदरात इटलीतील जिनोआ प्रांताच्या अंमलाखालील काळ्या समुद्रातल्या काफा या बंदरातून आलेल्या बोटीतून प्लेगची लागण झाली. त्याचा झपाट्याने प्रसार झाला. त्याचे प्रमुख कारण उंदीर हेही होते. सहाव्या शतकात येऊन गेलेल्या साथीच्या मानाने उंदरांची संख्याही चौदाव्या शतकात वाढलेली होती. - अगदी सुबत्ता नाही तरी धान्योत्पादनातील मुबलकता – त्याचे व्यापारी दळणवळण आणि मर्यादित स्वच्छता यांतून उंदीर फार वाढले. उंदरांच्या अंगावरील पिसवांमार्फत त्याचा प्रसार सर्वात जास्त झाला. फ्रान्स, जर्मनी, नेदरलंडस् आणि मग इंग्लंड. वर्षभरात तो सबंध पश्चिम युरोपात पसरला - अपवाद अगदीच डोंगरकपारीतल्या फार कोणाच्या संपर्कात नसलेल्या गावांचा. वाहतुकीची साधने मर्यादित असतानाही तो इतका कसा पसरला? तर मुळात तो बंदरांच्या गावांत पसरला. कॉन्स्टँटिनोपल ते इटलीतील सिसिली, अलेक्झांड्रिया ते फ्रान्समधील मार्सेय. पुढे फ्रान्सच्या अटलांटिक किनाऱ्यावरील बॉर्दो बंदर असलेला आकितेन हा प्रांत तेव्हा इंग्लंडच्या अधिपत्याखाली होता. तिथून त्याचा प्रसार इंग्लंडमध्ये, मग फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रांतात आणि मग पॅरीस व लंडन या शहरांतही साथ पसरली. रस्तेमार्ग होतेच. शिवाय गावांचे आठवडी बाजार, जत्रा यांतून पुष्कळ उलाढाल तेव्हाही होत असे. तसेच कुटुंबातील सदस्यसंख्या जास्त असे. नात्यांची वीण अधिक घट्ट होती. आजारी नातेवाईकांच्या मदतीला जाणे हा सहजभाव होता. मी आता मरणार, तर मला माझ्या माणसांत जाऊ दे, ते माझा अंत्यविधी नीट पार पाडतील या विचाराने एकटी म्हातारी माणसे दुसऱ्या गावी जात. त्यातून साथ आणखी पसरे.

ब्लॅक डेथचा प्लेग कसा पसरला
ब्लॅक डेथ हा प्लेग कसा पसरला; विकिपिडीयावरून.

गाठीच्या प्लेगने मरणाऱ्यांची संख्या कमी होती, पण तोच जर फुप्फुसांचा प्लेग असेल तर रोग्याची लाळ, थुंकी इतरांच्या जिवावर उठल्याशिवाय राहात नसे. ती साथ आटोक्यात यायला १३५२ साल उजाडले, त्या पाच वर्षांत एक तृतीयांश युरोपीय लोक मेले. त्यात शहरी भागातील निम्मी लोकसंख्या गारद झाली. पण नंतरही अधूनमधून अशा साथी येतच राहिल्या, अगदी १७२० पर्यंत. चौदाव्या शतकातील अरबी हकीमांच्या मते हा रोग चीनमधून सगळीकडे पसरला. नंतर झालेल्या सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यासानुसार त्याचे मूळ तिबेटमधील रानउंदरांच्याद्वारे पसरलेल्या साथीत निघाले. तेव्हा मोंगोल लोक सर्वदूर चढाया करत व त्यातून याचा प्रसार झाला असे आढळले. चौदाव्या शतकात, तसेच सध्याच्या काळात जागतिक अर्थकारणात चीनचा मध्यवर्ती सहभाग असल्याने कोरोनाचा प्रसार तेथून सर्वत्र व्हायला वेळ लागला नाही.
चौदाव्या शतकातल्या साथीच्या मागे 'येरसिनिया पेस्तिस' नावाचा विषाणू होता हा शोध लागून फक्त दहाएक वर्षे झाली आहेत. या विषाणुचा शोध १८९४ साली लागला, पण म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्रामुळे मिळाले. उंदराच्या अंगावरील ज्या पिसवेमुळे हा रोग पसरे, तिच्या शरीरात शोषलेले रक्त गाळून घेण्याची सोय आहे. तर उंदरांचे दूषित रक्त तिच्या चाळणीत अडके, साठून राही व मग तिने शोषलेले दुसरे रक्त पुढे जायला वाव उरला नाही तर ती ते पुन्हा उलटे त्याच शोषिताच्या अंगात सोडे व त्याबरोबर दूषित रक्तही अशा उंदराच्या शरीरात गेले की त्याला लागण होई. सर्व उंदीर मेल्यावर किंवा उंदरांच्या खुडबुडीत पिसवा त्यांच्या अंगावरून उडत व त्यांचा मोर्चा माणसांकडे वळे. जंतुसंसर्ग, त्यातही उंदराच्या अंगावरील पिसवा वाहक असणे हे काही कोणाला आकळले नव्हते पण रोग्याच्या संपर्कात आल्याने आजारपण येते याची नोंद होऊ लागली. सुरुवातीला या संकटातून वाचवावे अशी देवाला प्रार्थना करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र जमत. पण त्यामुळे आजार जास्त पसरतो हे जाणवल्यावर त्याला हवेतून पसरणारा रोग असे मानू लागले. नेमके वैज्ञानिक कारण ज्ञात नसल्याने कोणाच्या ना कोणाच्या माथी हे 'पाप' मारणे हीच वृत्ती होती. साथीच्या आजारांनाही भूकंप किंवा उल्कापातासारखा देवाचा कोप मानत. त्यामुळेच हे कोणाचे तरी महत्पाप न आवडून देवाने सगळ्या मानवांना शिक्षा केली अशी धारणा होई. मग अफवांच्या आधारे कोणालातरी लक्ष्य केले जाई. ज्यू लोकांना प्लेगची लागण होत नाही; त्यांनीच इतरांवर घाला घालण्यासाठी प्लेग पसरवला; ते पाणवठ्यांच्या विषप्रयोगातून हा आजार पसरवतात; अशा एकेक अफवांमुळे ज्यूंना ठार मारू लागले. एकेका दिवसात हजारो ज्यूंचे शिरकाण तेव्हाही झाल्याचे इतिहासात नमूद आहे.

स्ट्रासबूर्गमधला ज्यूसंहाराचा पोग्रोम
एमिल श्वाईट्झरचं चित्र स्ट्रासबूर्गमधला ज्यूसंहाराचा १४ फेब्रुवारी १३४९चा पोग्रोम; (१८९४); विकिपिडीयावरून

आरोग्ययंत्रणा तेवढी सक्षम नव्हती. चर्चने चालवलेले धर्मादाय दवाखाने किंवा पांथस्थांसाठीच्या धर्मशाळा संख्येने कमी होत्या आणि त्यांत बरीच गर्दी होई. हे दवाखाने, प्रेतांचे दफन करणारे यांच्यावर बराच भार आला होता. प्लेगने मेलेल्यांचे दफन स्मशानभूमी बाहेर, एकेका शवपेटीत अनेक मृतदेह, जिकडेतिकडे खड्डे खणून करत होते.

मृत्युचा विजय
थोरल्या पीटर ब्रॉयगलचं चित्र मृत्यूचा विजय; (साधारण १५६२); विकिपिडीयावरून

त्या काळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी काही ऐतिहासिक साधने आहेत. शहरी भागांत ज्या प्रशासकीय नोंदी आढळतात त्यात एक तर मृतांची संख्या अचानक पुष्कळ वाढणे, मेणाचे भाव वाढणे – चर्चमध्ये प्रियजनांना बरे वाटावे म्हणून किंवा त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मेणबत्त्या जाळणे मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याचे ते लक्षण होते – हे होतेच. प्रशासकीय दस्तऐवजीकरण, तसेच इच्छापत्र लिहिण्याचे प्रमाण बरेच वाढल्याने ते ज्या चर्मपत्रांवर लिहीत त्याच्या किंमती गगनाला भिडल्या. वारस म्हणून अनेकविध नावे घालून ठेवण्याकडे लोकांचा कल होऊ लागला. नोटरींची मागणी वाढली. त्यांच्यातले लोकही मरत होते त्यामुळे असलेल्या नोटरींवरचा कामाचा ताण वाढला. १३४९मध्ये तरुण वयात विधवा वा विधुर झालेल्यांच्या पुनर्विवाहांची संख्या लक्षणीय होती. चर्चचा दफनविधींवरचा खर्च काही महिन्यांत लक्षणीय रीत्या वाढल्याच्या नोंदी आढळतात. प्रशासकीय नोंदींत मध्ये बराच खंड पडणे हेही आजाराच्या सर्वदूर प्रसाराचे मोठे कारण मानले जाते. मात्र नोंदींमध्ये एक-एक दोन-दोन वर्षांचा खंड का पडला याचे कोणतेही स्पष्टीकरण नमूद केलेले आढळत नाही. या आपत्तीनंतर मध्ययुगातील लोकांनी इतिहासापासून काही धडा घेतला असे झाले नाही. समाजाचा ढाचा बदलला नाही, विचार करण्याची, वागण्याची पद्धत बदलली नाही, श्रद्धांमध्ये बदल झाला नाही.

मृतदेह हलवणे
लुई दुव्हंचं चित्र, मृतदेह हलवणे; (१८४९); विकिपिडीयावरून

साहित्यात या घटनेचे प्रतिबिंब उमटले, पण आडवळणाने. १३५२मधील "देकामेरॉन" हे बोकाचिओ यांचे मूळ इटालिअन पुस्तक म्हटले तर प्लेगसंदर्भानेच आहे. पण ते प्लेगबद्दल बोलत नाही, तर त्याच्यापासून बचाव करण्याबद्दल बोलते. इटलीतील सात तरुणी आणि तीन तरुण अशी दहा धनिक बाळे फ्लॉरेन्स शहरापासून दूर असलेल्या एका बंगल्यात राहायला जातात आणि एकमेकांना गोष्टी सांगतात असे त्याचे स्वरूप आहे. दहा दिवस दहाही जणांनी सांगितलेली प्रत्येकी एक अशा एकूण शंभर गोष्टी त्यात आहेत. पहिल्या दिवशी मात्र प्लेगने होणारे आकस्मिक मृत्यू - सकाळी प्रियजनांसोबत हसतखेळत केलेले भोजन आणि रात्रीचे भोजन मात्र आपल्या स्वर्गस्थ पितरांसोबत - मरणाऱ्यांची संख्या वाढल्याने एकेका शवपेटीत चारसहा प्रेते दफन करावी लागत असे उल्लेख आहेत. पण पुरातत्व तज्ज्ञांना उत्खननात एका शवपेटीत दोनपेक्षा जास्त सांगाडे आढळले नाहीत, क्वचित एखाद्या लहान मुलाचा तिसरा सांगाडाही आढळला. एकंदर चर्चने त्याही परिस्थितीत अंत्यविधींबाबत आपले कर्तव्य आटोकाट बजावले असेच दिसते.

बळींचं दफन
द क्रॉनिकल्स ऑफ गियेस लि मुइसिस; प्लेगच्या बळींचं दफन; रॉयल लायब्ररी ऑफ बेल्जियम; विकिपिडीयावरून

मध्ययुगात आयुर्मान तसे कमीच होते; दुष्काळ, लढाया, रोगराई यांतून चाळिशी गाठली तर मोठीच मजल. पण या साथीच्या रोगांमुळे कित्येक बापांना मुलांचे अंत्यसंस्कार करावे लागले. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, लहान, थोर कसलाच भेदभाव न करता या आजाराने सर्वांना गारद केले. अचानक गाठणारा हा अपमृत्यू आल्यावर पाद्रयाकडून मृत्यूपूर्व पवित्र संस्कार न झाल्याने परलोकातील मुक्तीही मिळत नव्हती. त्याची दहशत होती. या संकटाला कसे सामोरे जायचे ते लोकांना कळत नव्हते कारण त्यापूर्वीची अशी साथ सहाव्या शतकात येऊन गेली होती. आपली झाली तशीच अवस्था. यातून तरलेले अनुभवी कोणीच आसपास नाही आणि अचानक दैवाचा जोरदार तडाखा म्हणावा अशी रोगाची साथ. हवेतून पसरणारा रोग इतपत आकलन झालेले असल्याने हवेचे शुद्धीकरण हा उपाय करण्याचा प्रयत्न असे. त्यासाठी कसले कसले तीव्र वासाचे गवत, वनस्पती जाळून धुरी करत. त्याने कुबट वास मरे. पण खराखुरा उपयोग होत नसे. "अक्सीर इलाजाचा" दावा करणारे कुडमुडे डॉक्टरही वाढले. ते एखादी नस कापून दूषित रक्त काढून टाकणे, गाठीचा प्लेग असेल तर गाठ फोडून त्यातील दूषित रक्त काढून टाकणे, कबुतराचे रक्त रोग्याच्या अंगाला लावणे, असे काहीबाही उपाय करत. लवंग, कापूर, गवती चहा अशा पदार्थांचे काढेही देत.

देवाचा कोप, धर्माचरणात आलेली शिथिलता अशी कारणे शोधत आणि साधी राहणी, खाण्यापिण्यातला अतिरेक टाळण्याचे धोरण स्वीकारत आल्या परिस्थितीला लोक तोंड देत होते. श्रद्धाळू लोक आत्मक्लेशातून सामूहिक पापांचे क्षालन करण्याचा प्रयत्न करू लागले. पूर्वी असे करण्याचा अधिकार किंवा मान हा फक्त चर्चच्या धर्मधुरीणांना होता, सर्वसामान्यांना नव्हता. सार्वजनिकरीत्या स्वतःला फटके मारून घेणे व सर्वांच्या वतीने देवाकडे क्षमायाचना करणे असेही उपाय होऊ लागले. देवाचा कोप ही एक धारणा होती, पण त्याचबरोबर निसर्गाची हेळसांड हेही कारण असावे का असा विचार थोडा थोडा रुजत होता. "मानवाने निसर्गाला ओरबाडले म्हणून निसर्गाने शिक्षा केली", अशीही मांडणी होऊ लागली. लोकसंख्यावाढीमुळे दुष्काळ आणि रोगराई वाढली असा एक विचार असला तरी प्रत्यक्षात अनेक मुलं असतील तर त्यातली थोडीतरी वाचतील, वंश बुडणार नाही या भावनेतून बहुसंख्य लोक अधिकाधिक मुलांना जन्माला घालू लागले. जेव्हा साथ उलटली, तेव्हा स्थानिकांपेक्षा बाहेरून आलेले पोटार्थी त्याला अधिक बळी पडले. अमीर-उमराव प्रकारच्या लोकांतही कमी प्रतिकारशक्ती होती पण त्यांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळू शकत होती. शहरांतली गर्दी टाळायची म्हणून "खेड्यांकडे चला" असाही एक प्रवाह होऊ लागला.

तीन शतके अधूनमधून डोके वर काढणाऱ्या या रोगाच्या प्रादुर्भावाचा ठसा चित्रकला आणि शिल्पकलेतही उमटला. १४०३ सालचे एक मृत्यूचा चेहरा नावाचे शिल्प आव्हिन्यो शहरातील जॉं द लाग्रांज या धर्मगुरुचे आहे. सडलेले, विद्रुप झालेले असे ते प्रेतशिल्प अजिबात अमरत्वाच्या आश्वासनपूर्तीमुळे लकाकणारे डोळे अशा कविकल्पनेतील नाही. ते मृत्यूचे हिडीस दर्शन घडवते. 'मृत्यूचे नृत्य' या नावाची भित्तीचित्रे मृत्यूसमोर सारे सारखे याचे दर्शन घडवते. हे मध्ययुगीन काळी अप्रिय आणि कटू सत्य म्हणून समोर आले. तेव्हा सामाजिक विषमता ही मृत्यूबाबतीतही होती. सामान्य गरीब रयतेचे आयुर्मान फार कमी होते. पण या रोगाच्या साथीच्या फटक्यातून कोणीच वाचत नव्हते – ना राजा, ना धर्मगुरू, ना अमीर उमराव, ना सुंदर ललना. अशी मृत्यूनृत्य भित्तीचित्रे १५व्या, १६व्या आणि १७व्या शतकात अनेक ठिकाणी काढली गेली. त्यात असे विविध प्रकारचे लोक त्यांच्या पोशाखामुळे वेगळे, पण मृत्यूसमोर समान हे चित्रण पाहायला मिळते.
या रोगाच्या प्रसाराचा सामना करण्यासाठी सुरुवातीला प्रशासकीय प्रयत्न असे झाले नाहीत. श्रीमंत लोक तेवढे बाहेर न पडता नोकरांकरवी सर्व कामे करवून घेत आणि त्यामुळे ते निरोगी राहत. पुढे पंधराव्या शतकात अनेक गैरसमजांच्या आधारे ज्यू लोकांवर बहिष्कार, कुष्ठरोग्यांवर बहिष्कार, बाहेरच्या कोणाला आपल्या प्रांतात येऊ न देणे – युरोपचा तेव्हाचा राजकीय नकाशा सध्याच्यापेक्षा खूप वेगळा होता हे लक्षात घेतले पाहिजे – असे उपाय कमीअधिक प्रमाणात होऊ लागले. इटलीमध्ये सक्तीचे विलगीकरण हा उपाय गांभीर्याने राबवण्यात आला. अधिक माणसे एकत्र येण्यावर बंदी आली. मिरवणुकांवर बंदी आली. कित्येक गावे आपल्या खर्चाने प्लेगचा डॉक्टर नेमू लागले. त्यांचे काम रोग्यांची शुश्रुषा करणे, मृतदेहांचे दफन करणे, क्वचित शवविच्छेदन करणे हे असे. त्याचबरोबर ते मृत्यू पावलेल्यांची नोंद करत आणि मरणाऱ्यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संदेश धाडत. ते घालत तो मुखवटा कावळ्याच्या चोचीसारखा होता. सुरुवातीला त्यांनी कोणते कपडे घालावेत याचे काही नियम नव्हते. तो मुखवटा मात्र असे. १६१९मध्ये तेराव्या लुईच्या पदरी असलेल्या शार्ल दलॉर्म या डॉक्टरांनी प्रथम अशा प्लेगच्या डॉक्टरांसाठी विशिष्ट पोशाख ठरवला. संपूर्ण अंग झाकून घेणारे घट्ट कपडे, हातमोजे, घोट्यापर्यंतचे बूट यांमुळे त्यांचे स्वतःचे रोगापासून अधिक रक्षण होऊ लागले. त्या चोचीमध्ये कापूर, लवंग, लसूण, काही औषधी वनस्पती, गुलाबपाकळ्या वगैरे ठेवून मृतदेहांजवळ वावरताना येणारी दुर्गंधी कमी करत. कपड्यांवर, हातमोजे-बूट यांवरही सुगंध शिंपडून दुर्गंधीपासून बचाव करू लागले.

चौदाव्या शतकातला डॉक्टर
पॉल फुर्स्टचं एनग्रे‌व्हिंग; प्लेगकाळातला डॉक्टरांचा पोशाख; १७२१; विकिपिडीयावरून

साथीच्या रोगांचा युरोपच्या अर्थकारणावरही जाणवण्याइतका परिणाम झाला. उद्योगधंदे बंद पडले. सामाजिक विषमता वाढीस लागली. तसाही शेती हाच मुख्य व्यवसाय होता. त्यात गावेच्या गावे रोगाला बळी पडली. पण शेती नव्याने करणे नव्याने उद्योग उभारणी करण्यापेक्षा बरेच सोपे होते. तसेच पशुपालन, निदान कुक्कुटपालन, काही डुकरे पाळणे इतपत निमशहरी लोकही करत. प्रशासकीय पातळीवरील अव्यवस्थापनाने राजकीयदृष्ट्या पुढे होऊ घातलेल्या उलथापालथीची बीजे पेरली गेली असे मानतात. मृतांचे प्रमाण जसे वाढत गेले तसे उरलेल्यांवर व्यवस्थेचा भारही वाढत गेला. हळूहळू माणसं एकटं मरून जायला शिकली. व्यक्तीमाहात्म्य वाढले, ते चित्रकलेत व्यक्तीचित्रणाच्या रूपाने अधोरेखित झाले. साथ अखेरीस जेव्हा संपली तेव्हाही तिचे कवित्व मागे उरले. अशी धडकी भरवणारी साथ पूर्वी कधी आल्याचे ऐकीवात नव्हते त्यामुळे त्याचे भय संपले नाही. व्यक्तीवाद वाढत गेला, परक्यांचा दुस्वास आणि स्वतःपुरते पाहणे वाढले.

अशा मध्ययुगीन लोकांपेक्षा आपली मानसिकता कितपत वेगळी आहे हा प्रश्नच आहे.

संदर्भ :
१. Claude Gauvard Interview https://www.20minutes.fr/societe/2748675-20200327-coronavirus-apres-pest...
२. Documentary by ARTE
Quand l'histoire fait dates - 1347 : la peste noire, Dir: Pascal Goblot (2017)
३. Julien Loiseau Interview
https://www.parismatch.com/Actu/Societe/La-peste-noire-de-1348-quelles-l...
४. 1347, La peste atteint la France, - Julien Loiseau
https://www.t-n-b.fr/une-date-par-jour-1347

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अतिशय रोचक लेख. खूप आवडला.

या आपत्तीनंतर मध्ययुगातील लोकांनी इतिहासापासून काही धडा घेतला असे झाले नाही. समाजाचा ढाचा बदलला नाही, विचार करण्याची, वागण्याची पद्धत बदलली नाही, श्रद्धांमध्ये बदल झाला नाही.

हे रोचक आहे. ह्याच्या तुलनेत १७५५च्या लिस्बनच्या भूकंपाचा युरोपीय प्रबोधनविचारांवर बराच प्रभाव पडला असे वाचले आहे. उदा. व्हॉल्तेअरने त्याच्या 'कँडिड'मध्ये "best of all possible worlds" अशा परोपकारी दयाळू देव असणाऱ्या जगाच्या चित्राची खिल्ली उडवताना हे उदाहरण वापरले. चौदाव्या शतकाच्या तुलनेत अठराव्या शतकात प्रबोधनयुग सुरू झाले होते हा मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण तरीही दोन्ही उदाहरणांमधला फरक लक्ष देण्याजोगा वाटतो. २०२०च्या करोनामुळे लोकांच्या श्रद्धांमध्ये काही थेट प्रभाव पडेल असे मला वाटत नाही. ह्या उदाहरणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांबद्दल विचार वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0