ॲस्टेरिक्स-ओबेलिक्स गोतावळ्याच्या अभूतपूर्व जगात

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

ॲस्टेरिक्स-ओबेलिक्स गोतावळ्याच्या अभूतपूर्व जगात

- प्रभाकर नानावटी

The year is 50 B.C. Gaul is entirely occupied by the Romans. Well, not entirely... one small village of indomitable Gauls still holds out against the invaders. And life is not easy for the Roman legionaries who garrison the fortified camps of Totorum, Aquarium, Laudanum and Compendium...

ॲस्टेरिक्सच्या (बहुतेक) कॉमिक्सची सुरुवात

१९६०-७०च्या सुमारास आपल्या देशात तरी कॉमिक्स या चित्रकथा प्रकाराचं वेड लागलेलं नव्हतं. पण त्या काळी अमेरिकेत 'मॅड', 'आर्ची', 'बॅटमॅन' इत्यादी कॉमिक्स लहान वयोगटातील मुलं (आणि प्रौढ वाचकसुद्धा) अत्यंत आवडीने वाचत होते. त्यातही 'मॅड' हे कॉमिक्स लहान मुलांऐवजी प्रौढांच्यातच जास्त प्रमाणात वाचलं जात असावं. आपण मात्र आपला सोवळेपणा जपून ठेवणाऱ्या अनंत पै यांच्या 'अमर चित्र कथां'च्या कह्यात सापडलेलो होतो. अपवाद फक्त बिरबल वा तेनाली रामकृष्ण यांच्या कथांचा असावा. मुळात लहान मुलं वाचू शकतात, त्यांच्यासाठी पुस्तकांची सोय करणं ही पालकांची जबाबदारी असू शकते, हेच मध्यमवर्गीय पालक विसरून गेले होते. (आजसुद्धा परिस्थितीत फार बदल झालेला नाही!) मुळात पाल्यांसाठी नवी कोरी पाठ्यपुस्तकं विकत घेण्यास कुरकुर करणाऱ्या पालकांना मुलांना हसवणार्‍या, रिझवणार्‍या, कल्पनारम्य जगांत नेणार्‍या कॉमिक्सची चैन परवडणारी नव्हती. तरीसुद्धा 'चाचा चौधरी', 'लोटपोट'सारखी कॉमिक्स पुढील काळात मोठमोठ्या शहरांत मिळायला लागली.

ॲस्टेरिक्स
ॲस्टेरिक्स

कॉमिक्सच्या जगाला कलाटणी देण्याचं काम ॲस्टेरिक्स कॉमिक्सने केलं असं म्हणायला भरपूर वाव आहे. ॲस्टेरिक्स कॉमिक्सचा जन्म १९६०च्या सुमारास झाला. रने गोसिनी यांच्या डोक्यातील ही कल्पना होती. १९२६मध्ये पॅरिसमध्ये जन्मलेल्या गोसिनीचं बालपण फ्रान्स व अर्जेंटिनात विभागलं होतं. चार वर्षांचा असताना त्याची ओळख पातोरुझु या कार्टून कॅरेक्टरची झाली. हे कॅरेक्टर अर्जेंटिनामधील त्या काळी सुपरहीरोच्या दर्जाचं होतं. त्यात फॅसिस्ट प्रवृत्तीची झाक असली, तरी ते प्रामाणिक व गरीबांना मदत करणारं असल्यामुळे त्याकाळच्या अर्जेंटिनातील वृत्तपत्रांत त्याला प्रसिद्धी मिळत गेली.

ॲस्टेरिक्सच्या पुस्तकांच्या प्रसिद्धीत रेडिओ लक्सेंबर्गच्या जाहिरातीचा नक्कीच वाटा असावा. १९६१च्या सुमारास ॲस्टेरिक्स दि गॉल हे पुस्तक फ्रेंच भाषेत प्रकाशित झालं. पहिल्या वर्षी सहा हजार प्रतींची, तर पुढच्या वर्षी वीस हजार प्रतींची विक्री झाली. १९६३मध्ये चाळीस हजार, १९६४मध्ये दीड लाख, १९६५मध्ये तीन लाख, १९६६ मध्ये चार लाख, तर १९६७मध्ये बारा लाख प्रतींची विक्री झाली.

पुढच्या १६ वर्षांत या जोडीने २६ पुस्तकं हातावेगळी केली. रने गोसिनी १९७७मध्ये मरण पावला. त्यावेळी त्याच्या हातात ॲस्टेरिक्स इन बेल्जियम (Astérix chez les Belges) या पुस्तकाचं काम होतं. पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्याचा मुत्यू झाला. गोसिनीच्या मृत्युने अख्खा फ्रान्स हादरला. जणू पॅरिसमधला आयफेल टॉवरच कोसळला, असं ॲस्टेरिक्सप्रेमींना वाटत होतं. ॲस्टेरिक्स हा फ्रेंच संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. जादुई काढ्याचा घोट (magic potion) घेतल्यावर गॉलवासी त्यांना काही क्षणांपुरत्या मिळत असलेल्या अफाट शक्तीचा वापर करत रोमन सम्राट ज्यूलिअस सीझरचा धुव्वा उडवतात अशा साहसकथांच्या आहारी सगळा फ्रान्स गेला होता. गोसिनीच्या मुत्युआधीच्या पुस्तकाला बेल्जियममधल्या तलवारबाजीची पार्श्वभूमी लाभली होती. त्याचबरोबर बेल्जियमची बिअर व बेल्जियममधले ब्रुसेल स्प्राउटसुद्धा! त्याला 'टिनटिन' मधल्या काही पात्रांची जोड होती. ॲस्टेरिक्सची कदाचित ही शेवटची घटिका असावी. कारण उदेर्झोचं चित्र अजून साकार व्हायचं होतं. त्याआधीच ॲस्टेरिक्सचा निर्माता जगाआड गेला होता. उदेर्झो पुस्तक पूर्ण करण्यासाठी राजी नव्हता. पण पुस्तकाचे प्रकाशक अशा भावनांची कदर करण्यास अजिबात तयार नव्हते. त्यांनी उदेर्झोला कोर्टात खेचलं. कराराप्रमाणे पुस्तक पूर्ण करण्याचा तगादा लावला. त्याच्यावर खटले भरले. उच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं. शेवटी उदेर्झो कोर्टबाजीत हरला. नंतरच्या काळात त्याने पुस्तक पूर्ण केलं आणि ते प्रकाशित झालं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गंमत म्हणजे पुढच्या २५ वर्षांत उदेर्झोनं मागे वळून न पाहता एकट्यानेच ॲस्टेरिक्स मालिकेत आणखी ८ पुस्तकांची भर घातली. दर वेळी 'हे शेवटचंच पुस्तक' अस सांगत वाचकांना तो झुलवत होता. ॲस्टेरिक्सचं बाजारमूल्य तो जाणत होता. ॲस्टेरिक्सवर चित्रपट निघाले आणि त्यांनाही प्रेक्षकांनी गर्दी केली. २०११पर्यंत ॲस्टेरिक्सची धुरा त्याने सांभाळली. अगदी त्या क्षणापर्यंत उदेर्झो ॲस्टेरिक्सभक्तांची इच्छा पूर्ण करत होता. जाँ-यीव फेरी (कथा) व दिदिए कोन्राड (चित्र) आता ॲस्टेरिक्सचे व्यवहार सांभाळतात. या जोडीने ॲस्टेरिक्स मालिकेत आणखी चार पुस्तकांची भर घातली आहे. वयाच्या ९३व्या वर्षी, २४ मार्च २०२० रोजी उदेर्झोचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. ॲस्टेरिक्सचे दोन्ही जन्मदाते काळाच्या पडद्याआड गेले.

रने गोस्सिनी
रने गोसिनी

१९६९च्या एका सर्वेक्षणानुसार फ्रान्समधल्या ७०% लोकांनी ॲस्टेरिक्सचं किमान एक तरी पुस्तक वाचलं होतं. गोसिनीच्या मृत्युच्या वर्षी फ्रान्समधल्या ॲस्टेरिक्सच्या पुस्तक विक्रीचा खप साडेपाच कोटींच्या घरात पोचला होता. २०१७ साली जगभरात ॲस्टेरिक्स मालिकेतल्या पुस्तकविक्रीचा आकडा ३७ कोटीपर्यंत गेला होता. 'टिनटिन' या त्याच्या बेल्जियन स्पर्धकापेक्षा हा आकडा कितीतरी मोठा होता. १९६५मध्ये आकाशात झेप घेतलेल्या फ्रेंच आकाशयानाचं नाव ॲस्टेरिक्स होतं. नंतरच्या काळात हाच कित्ता गिरवत अमेरिकेने त्यांच्या आकाशयानांची नावे चार्ली ब्राउन आणि स्नूपी अशी ठेवली. या कार्टूनपात्रांची नावं अजरामर झाली. ६०-७०च्या काळातील जाहिरात होत असलेल्या कित्येक वस्तूंच्या नावांना ॲस्टेरिक्सची जोड असे. एकदा उदेर्झो प्रवास करत असताना तीन वेगवेगळ्या परस्परविरोधी वस्तूंच्या जाहिरातीत ॲस्टेरिक्स हे नाव बघून तो आश्चर्यचकित झाला. त्यानंतर यासंबंधात काही धोरणं आखून तो जाहिराती नियंत्रित करायला लागला.

फ्रेंच वाचकांच्या हाती पडलेले १९६४मधील ॲस्टेरिक्स दि ग्लेडिएटर ( Astérix Gladiateur) असो, वा ॲस्टेरिक्स अँड क्लिओपात्रा हा चित्रपट असो, किंवा ॲस्टेरिक्स इन ब्रिटन असो, फ्रेंच वाचकांनी कधीच नाकं मुरडली नाहीत. (या पुस्तकात सीझर 'गॉल आस्थानकवी' कॅकोफोनिक्सला पकडून नेतो व त्याला सोडविण्यासाठी ॲस्टेरिक्स स्वतः ग्लॅडिएटर होऊन मैदानात उतरतो. खरे पाहता कॅकोफोनिक्सच्या कविता वा त्याचे ‘किंचाळणे’ कुणालाही आवडत नाही. म्हणूनच प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी हमखासपणे येत असलेल्या पार्टीच्या चित्रात कॅकोफोनिक्सच्या मुसक्या बांधून त्याला झाडावर टांगलेले बघावयास मिळते. परंतु शेवटी तो गॉलच होता व सीझरला नामोहरम करण्याची एकही संधी ॲस्टेरिक्स व ओबेलिक्स सोडत नाहीत.)

गॉल्स
गॉल्स

नाराज होण्याइतके उदेर्झोचे लेखन काही वाईट नव्हते. काही लेखनात समकालीन राजकीय व्यवस्थेवर त्यांनी केलेली टीका गुदगुल्या केल्यासारखी हसवते. काही पुस्तकांत राजकीय व्यवस्था व फॅशनचे फॅड यांचा पुरेपूर समाचार घेतला आहे. ॲस्टेरिक्स अँड दि ब्लॅक गोल्डमध्ये गॉलमंडळी जादुई काढ्याला लागणाऱ्या सामग्रीच्या शोधात चक्क मध्यपूर्वेत जातात. कारण त्याकाळी, म्हणजे ८०-९०च्या सुमारास इंधनसमस्या प्रसिद्धीच्या टोकावर होती व इंधन-तेलाचे राजकारण तेथे तापलेले होते. इंधन-तेलाच्या राजकारणामुळे प्रदूषणात कशी भर पडणार आहे यावर त्याने या पुस्तकात चांगल्या प्रकारे भाष्य केले आहे. एका प्रसंगात ॲस्टेरिक्सचे जहाज समुद्रधुनीतून येत असताना चक्क अंगावर तेल ओथंबलेले समुद्रपक्षी त्यांना दिसतात.

आल्बेर उदेर्झो
आल्बेर उदेर्झो

खरे पाहता मुळात या दोघांनाही कुठल्याच राजकीय व्यवस्थेवर मल्लीनाथी करायची नव्हती. ते केवळ हसविण्याचा धंदा चालवत होते. काही वेळा त्यांना या भांडणतंट्याच्या आणि साहसी प्रसंगांचासुद्धा कंटाळा येत असावा. म्हणूनच ॲस्टेरिक्स अँड दि सनमध्ये ॲस्टेरिक्स जेव्हा ओबेलिक्ससमोर आपली नाराजी व्यक्त करतो, तेव्हा ओबेलिक्स या साहसाचा शेवट निरभ्र आकाशाखाली रात्रीच्या वेळी जंगी पार्टीत होणार असून काळजी करण्याचे काही कारण नाही असे आश्वासन देतो.

काहींच्या मते ॲस्टेरिक्स व रोमन साम्राज्य यांच्यातील लढ्याची 'डेव्हिड आणि गोलिएथ' या बायबलकथेतील लढ्याशी तुलना होऊ शकते. डेव्हिड हा एकटा, खंगलेला, वंचित व दुबळा. याच्या विरोधातील गोलिएथ हा प्रचंड महाकाय व महापराक्रमी. तरीसुद्धा डेव्हिड स्वतःच्या बुद्धिकौशल्याने गोलिएथशी सामना करून त्याला हरवतो. किरकोळ प्रकृतीचा व हाताशी कुठलेही प्रबळ साधन नसलेला ॲस्टेरिक्स व त्याचा गोतावळा महाशक्तीशाली रोमन साम्राज्याशी लढून आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात. गोसिनीच्या डोक्यात चिरडलेल्यांना सहानुभूती दाखविणे वा पायदळी तुडविणाऱ्यांबद्दल सूडाची भावना असणे असे कुठलेही विचार नव्हते अशी कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली होती.

ॲस्टेरिक्सच्या साहसकथांची डेव्हिड-गोलिएथ कथेशी तुलना करणे अप्रस्तुत ठरेल. कारण ॲस्टेरिक्सच्या साहसकथेत शहाणपणा वा अफलातून सुचलेल्या युक्त्या-प्रयुक्त्यांचा लवलेशही नसतो. तिथे आहे ती फक्त जादुई काढ्याचा घोट प्यायल्यामुळे मिळणारी प्रचंड क्षणिक शक्ती. या शक्तीसमोर कुठलाही शत्रू टिकूच शकणार नाही. एका पाठोपाठ एक घडत असलेल्या साहसांत या शक्तीबरोबरच गॉलवासींच्या डोक्यातून निघणाऱ्या अजब कल्पना व त्यातून होणारे घोळ यांचा मोठा वाटा आहे. त्यातून तयार होणारे हे अफलातून मिश्रण कुठल्याही मख्ख माणसाला हसवू शकेल. एखादी गोष्ट सहज शक्य होईल असे वाटत असतानाच गॉल मंडळीनी घातलेल्या घोळांतून जो काही विनोद निर्माण होतो, व ते घोळ ज्या पद्धतीने निस्तरत त्यांचा अखेरीस विजय होतो, त्याला तोड नाही. कदाचित या गुणविशेषामुळेच ॲस्टेरिक्स प्रौढ वाचकांचा लाडका झाला असावा. त्या काळच्या वाचकांच्या संगणकांसाठीचे पासवर्डसुद्धा ॲस्टेरिक्स, ओबेलिक्स इ. होते.

ओबेलिक्स
ओबेलिक्स

त्याचबरोबर फ्रेंच राजकारणाची व तथाकथित उच्च सांस्कृतिक मूल्यांची टर उडविणाऱ्या शब्दांच्या आतिषबाजीमुळेसुद्धा प्रौढ वाचकवर्ग आकर्षित झालेला असावा. ओबेलिक्स अँड कंपनी (Obélix et compagnie) या गोष्टीमध्ये रोमन साम्राज्याचा अर्थतज्ज्ञ हा फ्रान्सचे राष्ट्रपती ज्याक शिराक यांच्या आर्थिक धोरणांची सही सही नक्कल करून साम्राज्याची घडी विसकटतो.

फ्रेंच पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचा आरंभच मुळी 'गॉलवासी आपले पूर्वज आहेत' ('Nos ancêtres les Gaulois') या वाक्याने होतो व सर्व मुलं अगदी लहानपणापासून हे वाक्य घोकतच मोठे होतात. या प्राचीन इतिहासातील मध्यवर्ती विषयवस्तू असलेल्या गॉल जमातीच्या हिरोचे नाव वेरसॉन्जेटोरिक्स (Vercingetorix) होते. इ.स.पू ५०च्या सुमारास त्यांनी काही युक्त्या-प्रयुक्त्या लढवून ज्यूलिअस सीझरच्या रोमन सैन्याला हरवल्याची आख्यायिका गेली २००० वर्षे ऐकवली जात आहे. सीझरच्या इतिहासकारांच्या मते रोमनविरुद्धच्या युद्धात या गॉलिक हिरोचा पराभव होऊन तो सर्व शस्त्रे सीझरच्या चरणी अर्पण करून शरण आला. सीझरच्या विजयोल्लासात हा हिरो मारला गेला. डाव्या व उजव्या अशा दोन्ही विचारवंतांचा हा लाडका हिरो आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण करून देश बळकावला तेव्हा भूमीगत होऊन जर्मनीच्या विरोधात काम करणाऱ्यांना स्फूर्ती देण्याचे काम या वेरसॉन्जेटोरिक्सच्या आख्यायिकेने केले. जरी वेरसॉन्जेटोरिक्सने सर्व शस्त्रास्त्रे अर्पण करून हार पत्करली, तरी त्याच्या महाशक्तीशाली विरोधकांशी लढा देण्याच्या धैर्याला फ्रेंच जनता दाद देत होती. या सर्व गोष्टींचा ॲस्टेरिक्स दि गॉल्स (Astérix le Gaulois)मध्ये गोसिनी व उदेर्झो या जोडगोळीने फार छानपणे उपयोग करून घेतला आहे. या साहसी कथेत जेव्हा ॲस्टेरिक्स सर्व शस्त्रे सीझरच्या पायावर ठेवतो, तेव्हा सीझर विजयोद्गार न उच्चारता “ओय्..” असे ओरडून बोटावर पडलेल्या शस्त्रांना दूर सारतो! कदाचित याच वेरसॉन्जेटोरिक्सच्या नावातील शेवटची अक्षरेच ॲस्टेरिक्सच्या पुस्तकातील ॲस्टेरिक्स, ओबेलिक्स, गेटाफिक्स, व्हायटलस्टॅटिस्टिक्स, डॉग्मॅटिक्स इ. नावे या गोतावळ्याला ओळख देणारी आहेत.

ॲस्टेरिक्स व ओबेलिक्स (व काही वेळा पूर्ण गॉलचा गोतावळा!) यांच्या साहसीवृत्तीला फक्त गॉल प्रदेशातील लुटेशिया, कोर्सिका, रोमन साम्राज्य इत्यादींच्या सीमेचे बंधन नव्हते. बेल्जियम, स्पेन, ब्रिटन, जर्मनी या युरेपीय देशांबरोबर अमेरिका, मध्यपूर्वेतील देश व भारत इत्यादी ठिकाणीसुद्धा त्यांचा मुक्त संचार होता. ॲस्टेरिक्सच्या लेखकद्वयांनी त्यांना वैज्ञानिक कादंबरीतल्याप्रमाणे अवकाशयात्रासुद्धा करून आणले आहे.

ॲस्टेरिक्सची पुस्तकं जगभरातील १११ लिखित व बोलीभाषेत अनुवादित झाली असून अजूनही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फ्रेंच भाषेबरोबर एस्टोनियन, इंग्रजी, झेक, डच, जर्मन, गॅलिसिएन, डेनिश, आइसलँडिक, नॉर्वेजियन, स्विडिश, फिनिश, स्पॅनिश, कातलान, बास्क, पोर्तुगीज, इटॅलियन, ग्रीक, हंगेरियन, पोलिश, रुमेनियन, टर्किश, स्लोव्हन, वेल्श, लॅटिन इत्यादी भाषांतही स्थानिक संदर्भ देत अनुवाद करण्यात आले आहेत. ॲस्टेरिक्स मालिकेतील काही निवडक पुस्तकांचे अनुवाद एस्परांतो, आयरिश, इंडोनेशियन, फारसी, मॅन्डरिन, कोरियन, जपानी, बांग्ला, हिंदी, अरबी, हिब्रू, सिंहली, व्हिएतनामी भाषांतही उपलब्ध आहेत.

ॲस्टेरिक्सचे आशय व स्वरूप पूर्णपणे फ्रेंच असूनसुद्धा जगभरातल्या बहुतेक देशांनी त्याचे इतके स्वागत का केले असावे हा प्रश्न विचारावासा वाटतो. कदाचित याचे श्रेय इंग्रजी भाषेचा जगभरात असलेला प्रभाव व मुख्यत्वे फ्रेंचमधून इंग्रजीत अनुवाद करणारे यांना द्यावे लागेल. इंग्रजीत भावानुवाद करणारे ॲन्थिआ बेल व डेरेक हॉकरिज यांनी अप्रतिमरित्या ॲस्टेरिक्सला जगभर पोचविले आहे. त्यांनी कधीच शब्दशः भाषांतर केले नाही. फ्रेंच विनोद, फ्रेंचमधील शाब्दिक कसरती यांना इंग्रजीचा पेहराव चढविल्यामुळे इंग्रजीतील वाचक ॲस्टेरिक्स वाचत असताना आपण अनुवाद वाचत आहोत हे पूर्णपणे विसरून जातात. अशाच प्रकारचा अनुभव रशियातील अभिजात साहित्याचे इंग्रजी अनुवाद वाचताना येत असतो. गंमत म्हणजे या अनुवादकांनी मूळ नावातसुद्धा सुधारणा करून वाचकांची मनं जिंकली आहेत. काव्य व स्वरांचा गंध नसलेल्या या गॉल खेड्यातील एकमेव गायक/कवी मूळ फ्रेंचमध्ये अश्युरॉन्सटूरिक्स (Assurancetourix) या नावाने वावरतो. परंतु त्याचे इंग्रजीतील नामकरण कॅकोफोनिक्स (कॅकोफोनी म्हणजे कर्कश, कर्णकटू) करण्यात आले. जादुई काढा तयार करणारा फ्रेंचमधील पानोरोमिक्स इंग्रजीत गेटाफिक्स ('गेट-अ-फिक्स' (उपाय करणारा) = गेटाफिक्स) या नावाने ओळखला जातो. ओबेलिक्सच्या सावलीसारखा फिरणारा त्याचा कुत्रा मूळ फ्रेंचमध्ये इदेफिक्स (इदे (आयडिआ) + फिक्स ) म्हणून वावरतो. मात्र इंग्रजीत तो डॉग्मॅटिक्स (डोग्मा आणि डॉग ह्यांचा श्लेष) होऊन वाचकांचे मनं रिझवतो. फ्रेंच व इंग्रजांचे हाडवैर असल्यामुळे इंग्रजांची खिल्ली उडविण्याचा एकही प्रसंग फ्रेंच सोडत नाहीत. तरीसुद्धा इंग्रजीतील अनुवादात या वैरत्वाचा मागमूस कुठेही सापडत नाही. उलट शब्दांची कोलांटी उडी मारून वाचकांना हसविण्यात हे दोन्ही भावानुवादक यशस्वी झाले आहेत. काही खास फ्रेंचविशिष्ट शब्दांना व त्या शब्दाबरोबर येणाऱ्या लांबलचक वाक्यांना या अनुवादकांनी पूर्णपणे फाटा देत पुस्तकांच्या वाचनीयतेत उलट भर घातली आहे. बहुतेक अनुवादक आपापल्या भाषांतील खुबींचा व त्या त्या काळातील महत्वाच्या घटनांचा, व्यक्तींचा योग्य वापर करून विनोदनिर्मितीत यशस्वी झाले आहेत. उदा. ब्रिटनमधील साहसकथेत व्हॅल्यूॲडेडटॅक्स, सिलेक्टिव्ह-एंप्लॉयमेंटॅक्स वा डबलेक्ससारखे शब्दप्रयोग वापरून ९०च्या काळातील काही प्रसंगांवर बोचरी टीका केली आहे. रोमन सैनिकांच्या हातात चक्क 'हे रोमन्स क्रेझी आहेत' हे सुचविणारे SPQR (Sono pazzi questi romani)चे कापडी फलक सुद्धा दिले आहेत. ॲस्टेरिक्स अँड दि मॅजिक कार्पेट या ॲस्टेरिक्सच्या भारतातील साहसयात्रेत त्यांची भेट हत्तींना प्रशिक्षण देणाऱ्यांशी होते. सापाची शिडी करून वर उंचावर चढणारा गारुडी त्यांना भेटतो. एवढेच नव्हे, तर आकाशात उडणाऱ्या जादूई सतरंजीवर बसून प्रवास करून येतात.. या देशातील प्रत्येक जण गंगेत आंघोळ करतो व प्रत्येकाच्या डोक्यावर पगडी असते असे त्यांना वाटते.

मुळात ॲस्टेरिक्सच्या कथानकाला एक जागतिक आकर्षण आहे. त्यातही युरोपमधील देशांमध्ये तसूभर जास्त असेल. कारण या संपूर्ण युरोपभरातील राष्ट्रे एकेकाळी रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होती. सत्तेत असलेल्यांना विरोध हा नेहमीच सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सत्तेच्या विरोधात लढणारे बंडखोर हिरो ठरतात. फ्रेंच वाचकांना वेरसॉन्जेटोरिक्स, ब्रिटिश वाचकांना रोमन साम्राज्याच्या विरोधात बंड करणारी Boudicca राणी वा वेल्श बंडखोर Caratacus, जर्मन वाचकांना हेर्मन हे ॲस्टेरिक्समध्ये दिसत असावेत. इटलीतल्या वाचकांतील मूळ विनोदबुद्धी रोमन साम्राज्यावरील टीका-टिप्पणींना हसून दाद देते. यातील नर्मविनोद कुणाच्याही जिव्हारी लागत नाहीत, हे विशेष.

कदाचित अपवाद म्हणून अमेरिकी वाचकांकडे बघता येईल. ॲस्टेरिक्सला अमेरिकेत म्हणावा तितका प्रतिसाद कधीच मिळाला नाही. अमेरिकी वाचकांना आकर्षित करण्यासाठी लेखक गॉलवासींना अमेरिकेतही घेऊन गेले, तरी फार फायदा झाला नाही. हॉलिवूडी चित्रपट व डिज्नीवर पोसलेल्या अमेरिकी बाल वा प्रौढ वाचकांनी ॲस्टेरिक्सला जवळ केले नाही. त्यांच्या मते ॲस्टेरिक्स हा फारच साधा, सरळ व कुठल्याही तंत्रज्ञानांचा आधार न घेणारा हिरो आहे. त्यामुळे बॅटमॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅनची सर त्याला नाही. त्याचबरोबर रोमन साम्राज्यवादाचे काही अंश अमेरिकी आधुनिक संस्कृतीतही सापडत असल्यामुळे ॲस्टेरिक्सचा स्वीकार करणे त्यांना जड जात असेल.

ॲस्टेरिक्स आणि ओबेलिक्स

मुळात ॲस्टेरिक्सचा गोतावळा पूर्णपणे युरोपीय आहे. रोमन साम्राज्याचा वारसा युरोपीय राष्ट्रांत वेगवेगळ्या स्तरावर असूनसुद्धा त्या सर्वांचा इतिहास व मिथकं यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र सारखाच आहे. त्यामुळे अटलांटिकच्या पलीकडल्या अमेरिकेला तो आकर्षित करू शकला नाही.

काही तज्ज्ञांच्या मते ॲस्टेरिक्सच्या पुस्तकांनी नव्या पिढीला रोमन साम्राज्याविषयी पुनर्विचार करण्यास प्रेरणा दिली. रोमन इतिहासाला उतरती कळा लागलेली होती. परंतु या पुस्तकांनी रोमन इतिहास पुनर्जीवित केला. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या रोमनविषयक औत्सुक्याच्या संधीचा फायदा घेत प्राचीन वस्तुसंग्रहालयांची पुनर्रचना केली. 'ॲस्टेरिक्स ॲट ब्रिटिश म्यूजियम' अशी जाहिरात करून शालेय विद्यार्थ्यांचे व इतर प्रेक्षकांचे लक्ष वेधले. संग्रहालयात रोमन इतिहासाला जिवंत करणारी विशेष दालनं उघडण्यात आली. रोमन साम्राज्यवाद म्हणजे मूळ निवासी असलेली लहानमोठी राज्ये वा परगणे जिंकून त्यांचे रोमनीकरण करणे वा त्यांच्या विरोधक बंडखोरांना संपवून टाकणे. रोमनीकरण म्हणजे लॅटिन भाषेचा वापर, अंगावर रोमनसारखे टोगांचे परिधान व सामूहिक स्नानगृहांची निर्मिती. ॲस्टेरिक्सच्या खेड्याजवळील अनेक खेड्यातील जमातींचे रोमनीकरण झाले होते. त्यांच्या बायका-मुलं रोमनांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत होते. ॲस्टेरिक्स रहात असलेले खेडे मात्र रोमन साम्राज्याला विरोध करत स्वतंत्र राहू इच्छित होते. त्याचाच राग रोमन साम्राटाला होता. म्हणून तो रथ, घोडे इत्यादी लवाजम्यासकट रोमन सैनिकांची तुकडी पाठवून गॉलवासींच्या या खेड्याला संपवण्यामागे लागला होता. याचे सुंदर चित्रण ॲस्टेरिक्स अँड दि बिग फाइटमध्ये (Le Combat des chefs ) केले आहे.

ॲस्टेरिक्सच्या पुस्तकात उभे केलेले रोमन साम्राज्याचे प्रारूप तितकेसे खरे नाही. मुळात रोमन साम्राज्यात इतर राज्यांवर अंकुश ठेवू शकणाऱ्या लढवय्यांची संख्या नगण्य होती. त्या काळी एकसंध अशी रोमन संस्कृती असे काही नव्हते. रोमच्या अभिजनांना संपत्ती व शांत जीवन हवे होते. त्यासाठी मूळ निवासींनी वेळेवर कर भरावा, त्यांनी बंड पुकारू नये व शक्य होईल तितकी रोमन अभिजनांच्या कपड्यांची, वास्तूप्रकारांची, राहणीमानाची, मनोरंजनातील प्रकारांची नक्कल करावी एवढीच त्यांची अपेक्षा होती. त्यांना आयुष्य सरळ रेषेत, कुठल्याही अडीअडचणींशिवाय जगावेसे वाटत होते. परंतु ॲस्टेरिक्स कॉमिक्सनी पूर्णपणे वेगळेच चित्र उभे केले व रोमन इतिहासाला एक सुंदर कलाटणी दिली.

चित्रपटसृष्टीतील जाड्या-रड्या जोडीने चित्रपट रसिकांवर एके काळी जादू केली. त्याचप्रमाणे पुस्तकाच्या जगात ॲस्टेरिक्स - ओबेलिक्स या जोडीनेसुद्धा एक काळ गाजविला. एकदोन पिढ्यांना मिश्किलपणे हसवले. वाचकांचे आयुष्य सार्थकी लावल्याबद्दल जगभरातील वाचक गोसिनी व उदेर्झोचे कायम ऋणी राहतील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नमस्कार
मी आपल्या लिखाणाचा नियमित वाचक आहे. हा ॲस्टेरिक्स वरचा लेखही आवडला. कधीतरी वेळ काढून 'टिनटिन' कॉमिक्स वर असा लेख लिहावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा ॲस्टेरिक्स वरचा लेखही आवडला. कधीतरी वेळ काढून 'टिनटिन' कॉमिक्स वर असा लेख लिहावा.

टिनटिन ठीकठीक आहे. ॲस्टेरिक्स ॲस्टेरिक्स आहे.

- (टिनटिन नि ॲस्टेरिक्स दोहोंचाही फॅन) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आवडते कॉमिक आहे हे. आर्चीज पेक्षाही सरस. लेख रोचक आणि माहीतीपूर्ण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

ॲस्टेरिक्सच्या लेखकद्वयांनी त्यांना वैज्ञानिक कादंबरीतल्याप्रमाणे अवकाशयात्रासुद्धा करून आणले आहे.

हे कधी घडले म्हणे?

टिनटिन चंद्रावर जाऊन आल्याचे माहीत आहे. ॲस्टेरिक्सने कधी पृथ्वी सोडल्याचे आठवत नाही. (जादूच्या सतरंजीवरून भारतयात्रा ही फार फार तर विमानप्रवास या सदरात मोडावी, अवकाशयात्रा नव्हे.)

(हं, 'ॲस्टेरिक्स अँड द फॉलिंग स्काय' या नंतरनंतरच्या (माझ्या मते अतिटुकार) उदेर्झो-सोलो-कृत्यात स्पेसशिप आहे, एलियन्ससुद्धा आहेत, ते गॉलमध्ये त्यांच्या खेड्यात येतात, वगैरे; परंतु, त्यात ॲस्टेरिक्स किंवा ओबेलिक्सनी स्वत: अवकाशप्रवास करणे पुढची गोष्ट, परंतु स्पेसशिपमध्ये पाय तरी ठेवला आहे काय? नक्की आठवत नाही, तपासून पाहावे लागेल; परंतु, बहुधा नाही. (चूभूद्याघ्या.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित अपवाद म्हणून अमेरिकी वाचकांकडे बघता येईल. ॲस्टेरिक्सला अमेरिकेत म्हणावा तितका प्रतिसाद कधीच मिळाला नाही. अमेरिकी वाचकांना आकर्षित करण्यासाठी लेखक गॉलवासींना अमेरिकेतही घेऊन गेले, तरी फार फायदा झाला नाही. हॉलिवूडी चित्रपट व डिज्नीवर पोसलेल्या अमेरिकी बाल वा प्रौढ वाचकांनी ॲस्टेरिक्सला जवळ केले नाही. त्यांच्या मते ॲस्टेरिक्स हा फारच साधा, सरळ व कुठल्याही तंत्रज्ञानांचा आधार न घेणारा हिरो आहे. त्यामुळे बॅटमॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅनची सर त्याला नाही. त्याचबरोबर रोमन साम्राज्यवादाचे काही अंश अमेरिकी आधुनिक संस्कृतीतही सापडत असल्यामुळे ॲस्टेरिक्सचा स्वीकार करणे त्यांना जड जात असेल.

मुळात ॲस्टेरिक्सचा गोतावळा पूर्णपणे युरोपीय आहे. रोमन साम्राज्याचा वारसा युरोपीय राष्ट्रांत वेगवेगळ्या स्तरावर असूनसुद्धा त्या सर्वांचा इतिहास व मिथकं यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र सारखाच आहे. त्यामुळे अटलांटिकच्या पलीकडल्या अमेरिकेला तो आकर्षित करू शकला नाही.

काय कोण जाणे. परंतु ॲस्टेरिक्सचे आणि अमेरिकेचे फारसे जमले नाही खरे. कदाचित अमेरिकनांना इन जनरल चांगल्या (क्लासी) साहित्याचे (होय, ॲस्टेरिक्सला मी 'साहित्य'च मानतो!) वावडे, म्हणून असेल. किंवा, कदाचित, ॲस्टेरिक्स हा क्विंटेसेन्शियली युरोपियन/युरो-सेंट्रिक, आणि अमेरिकनांना युरोपाचे/युरो-सेंट्रिकत्वाचे वावडे, म्हणूनही असेल. पण नाही जमले खरे.

किंबहुना, ॲस्टेरिक्सची जी इंग्रजी भाषेतील भाषांतरे आहेत, त्यांपैकी काहींच्या दोन आवृत्त्या उपलब्ध आहेत. जवळपास सर्वच अंकांची ब्रिटिश भाषांतरे उपलब्ध आहेत, तर काही थोड्या अंकांची (अमेरिकन मार्केटसाठी) अमेरिकन भाषांतरेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यात (ॲस्टेरिक्स, ओबेलिक्स आणि डॉग्मॅटिक्स वगळता) सर्व पात्रांची इंग्रजी नावे वेगळी आहेत, तर काही ठिकाणी अमेरिकन संदर्भ घुसडण्याचेही प्रयत्न आहेत. अर्थात, ज्या ज्या अंकांच्या म्हणून अमेरिकन आवृत्त्या बाजारात आलेल्या आहेत, त्या त्या अंकांच्या ब्रिटिश आवृत्त्या या अधिक सरस आहेत, हे सांगणे नलगे. Anthea Bell आणि Derek Hockridge या ब्रिटिश अनुवादकांच्या जोडगोळीने घेतलेले कष्ट लक्षात येतात, तर (अमेरिकन आवृत्तीचा अनुवादक) Robert Steven Caronचा अगदीच ओढूनताणून केलेला half-hearted attempt वाटतो. फारच थोड्या अंकांच्या अमेरिकन आवृत्त्या उपलब्ध आहेत. (Asterix and the Great Crossing, Asterix the Legionary, Asterix at the Olympic Games, Asterix in Britain आणि Asterix and Cleopatra. बस्स, पाचच.) त्याही फारशा खपल्या नाहीत. एकंदरीत ॲस्टेरिक्स अमेरिकनांमध्ये फारसा खपला नाही खरा.

परंतु, थांबा! गंमत म्हणजे, इथे अमेरिकेत ॲमेझॉनवर वगैरे ॲस्टेरिक्सच्या अंकांच्या नव्याकोऱ्या कॉप्या विक्रीस सर्रास मिळतात, खपतातसुद्धा. अमेरिकन आवृत्त्याच नव्हे, ब्रिटिशसुद्धा. (तशाही अमेरिकन आवृत्त्या फारश्या नाहीतच म्हणा.) फार कशाला, इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांतल्याही (फ्रेंच, स्पॅनिश, क्वचित जर्मन) नव्याकोऱ्या कॉप्यासुद्धा मिळतात, नि खपतात. आणि, ॲस्टेरिक्सचा एखादा नवीन अंक आल्यास त्याची इंग्रजी आवृत्तीसुद्धा ॲमेझॉनवर त्वरित खपते. (त्या मानाने बार्न्स अँड नोबलसारख्या ब्रिक-अँड-मॉर्टर पुस्तकभांडारांत किंवा लायब्रऱ्यांतून वगैरे ॲस्टेरिक्सचे अंक क्वचितच आणि थोडेच सापडतात. बार्न्स अँड नोबलच्या वेबसाइटवर (ऑनलाइन विक्रीकरिता) त्यांची उपलब्धता कदाचित अधिक असावी.)

पण म्हणजे, अमेरिकेतही ॲस्टेरिक्स मालिका खपू शकते (आणि खपते) तर. फक्त, कोणत्या डेमोग्राफिक्समध्ये खपते, हे पाहाणे उद्बोधक ठरेल. मला वाटते, आमच्यासारखे अमेरिकाबाह्य Anglophone जगतातून किंवा युरोपातून आलेले first generation (आणि घरच्या exposureमुळे कदाचित काही अंशी second generationसुद्धा) immigrants हा या मालिकेचा (झालेच तर टिनटिनचासुद्धा) ग्राहकवर्ग असावा. म्हणजे, essentially foreign-born cultural minorities. नाहीतर, ज्यांना mainstream म्हणता येईल, असे पांढरे अँग्लो किंवा काळे अमेरिकन्स या मालिकांकडे ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत; किंबहुना, असे काही अस्तित्वात असते, हे त्यांच्या गावीही नसते. (मात्र, ॲस्टेरिक्सचा हा अमेरिकेतील उपरोल्लेखित ग्राहकवर्गसुद्धा बराच मोठा आहे, sustainable आहे.)

(म्हणजे, काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, क्रिकेट हा खेळसुद्धा अमेरिकेत बहुतांशी कॉमनवेल्थ राष्ट्रांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे - आणि, क्वचित इतर कॉमनवेल्थ इमिग्रंटांमुळेसुद्धा - जिवंत आहे, तद्वत.)

--

(बाकी, ॲस्टेरिक्सची तुलना आर्चीबरोबर करणे म्हणजे... हॅहॅहॅ...)

--

हॉलिवूडी चित्रपट व डिज्नीवर पोसलेल्या अमेरिकी बाल वा प्रौढ वाचकांनी ॲस्टेरिक्सला जवळ केले नाही.

डिस्नीचा प्रकार आणखीच वेगळा. वास्तविक, उदेर्झो हा वॉल्ट डिस्नीचा चाहता होता. वॉल्ट डिस्नीला तो प्रेरणास्थानी मानीत असे. किंबहुना, Asterix and the Falling Sky हा जो (माझ्या मते अत्यंत टुकार असा) latter day Uderzo solo attempt आहे, त्यात उदेर्झोने वॉल्ट डिस्नीला tribute देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्या स्पेसशिपमधून Toon नावाचा जो प्रमुख एलियन उतरतो, तो मिकी माऊससारखा दिसतो. इतकेच नव्हे, तर तो ज्या ग्रहावरून आलेला आहे, त्या ग्रहाचे नाव Tadsilweny (Walt Disneyचा anagram) आहे.

हो, पण... याच्या बदल्यात ॲस्टेरिक्सला काय मिळाले?

पॅरिसजवळ Parc Astérix नावाचा एक (ॲस्टेरिक्स-थीम्ड) थीम पार्क १९८९पासून कार्यरत आहे. चांगला आहे; एकदा तरी पाहण्यासारखा आहे. (तसे हे थीम-पार्क, ॲम्यूझमेंट पार्क वगैरे प्रकार तसेही फार फार तर एकदाच पाहण्याच्या लायकीचे असतात, हे माझे वैयक्तिक मत. डिस्नीबद्दलही हेच म्हणावेसे वाटते. किंबहुना, डिस्नीवर्ल्ड वगैरे प्रकार ओव्हरहाइप्ड, पैसे उकळण्याचे प्रकार वाटतात. सगळे जग पाहाते, म्हणून एकएक एकदा जाऊन पाहायला ठीक आहेत, झाले - तितकेही वाईट नाहीत. Parc Astérix हा प्रकार त्या मानाने बरा वाटला. But that could just be my personal bias. असो.) म्हणजे, तुम्ही पॅरिसला आयुष्यात एकदाच जाण्याची शक्यता जर असेल, आणि तुम्ही ॲस्टेरिक्सचे चाहते असाल, तर एक वेळ आयफेल टॉवरला दुरूनच नमस्कार करून टांग द्यावी, परंतु एखादा दिवस Parc Astérixमध्ये अवश्य काढावा, नि जिवंत ओबेलिक्सला मिठी मारून फोटो घ्यावा, जिवंत ॲस्टेरिक्सशी हस्तांदोलन करावे, जिवंत व्हायटलस्टॅटिस्टिक्स, इंपेडिमेंटा, पॅनेकिया, कॅकोफॉनिक्स वगैरे मंडळींना भेटावे. माणशी पंचेचाळीस युरो (२०१३मधला दर) सार्थकी लागतात.

तर, या Parc Astérixला खुन्नस म्हणून, डिस्नीने १९९२ साली पॅरिसमध्ये Disneyland Paris म्हणून थीमपार्क उघडला. झाले! Parc Astérixचा खप दाणकन आदळला. डिस्नीने असे पांग फेडले. चालायचेच.

१९६५मध्ये आकाशात झेप घेतलेल्या फ्रेंच आकाशयानाचं नाव ॲस्टेरिक्स होतं.

अवकाशयानाचे, की उपग्रहाचे? (मी वाचले त्याप्रमाणे उपग्रहाचे.)

==========

तळटीपा:

ॲस्टेरिक्सच्या दोन्हीं मूळ कर्त्यांचा आता मृत्यू झालेला आहे. मात्र, ॲस्टेरिक्स मालिका अद्याप जिवंत आहे. ती बंद अथवा स्थगित झालेली नाही. आणि, ॲस्टेरिक्सचे आणखीही काही नवीन अंक भविष्यात न निघण्याचे काहीच कारण दिसत नाही. (दर्जाचे सोडा.) याबद्दल अधिक पुन्हा कधीतरी.

माझ्या त्यावेळी लहान मुलाची ओळख कॅकोफॉनिक्सशी मी 'हा व्हायोलिन वाजवितो, बरे का! आणि तुझ्याइतकीच कर्कश वाजवितो.' अशी करून दिली होती. आणि कॅकोफॉनिक्सने त्याचे डोके थोपटले होते. त्या पॅनेकियाने मात्र, का, कोण जाणे, परंतु, माझ्याकडे पाहून नाक मुरडले होते, आणि निर्लज्जपणे (ऑफ ऑल द पीपल) त्या कॅकोफॉनिक्सबरोबर उंडारायला चालती झाली होती. (नाही म्हणजे, तिचा नवरा - काय बरे नाव त्याचे... हं, ट्रॅजिकॉमिक्स! - सीझरच्या तावडीत सापडून जबरदस्तीने सैन्यात भरती केला जाऊन दूरवर मोहिमेवर पाठविला गेला असू शकेलही; पण म्हणून काय वाटेल त्याच्याबरोबर उंडारायचे?) पण असतात एकएक लोक, म्हणून सोडून द्यायचे, झाले. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या अंकात इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर रूपांतर छापलं आहे. ती कथा ऑफिसातल्या अनेक अमेरिकी लोकांना, जे कधीमधी साहित्य, परभाषा वगैरे विषयांत रुची दाखवतात त्यांना, वाचायला दिली. ज्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांनी शेवटाबद्दल - 'तो उपाशीपोटी मेला' - ह्याबद्दल खेद व्यक्त केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचता वाचता विकी मध्ये हे मिळाले
When the Gauls see foreigners speaking their foreign languages, these have different representation in the cartoon speech bubbles:
Egyptians and Kushites: Hieroglyphs with explanatory footnotes (incomprehensible to the Gauls)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0