(कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी

photo 1 आपण आपल्या भोवताली थोडे लक्षपूर्वक पाहत असल्यास बाटलींची संगत जन्मल्यापासून मृत्युच्या दारापर्यंत आहे की काय असे वाटू लागते. बाळ जन्मल्यानंतरचे काही महिने (की दिवस!) वगळता स्तनपानाऐवजी दुधाची बाटली बाळाच्या तोंडात कोंबून आई कामाला जाते. नंतर वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी आपलं हे बाळ पूर्व (वा पूर्व-पूर्व!) माँटेसरीला प्रवेश घेतल्यापासून चक्क कॉलेजला जाईपर्यंत या ‘बाळा’च्या दप्र्तर वजा सॅकमध्ये, एक वेळ पुस्तकं, खाण्याचा डबा नसले तरी चालतील, परंतु पाण्याची बाटली हवीच. कॉलेज शिक्षणाच्या ऐन उमेदीच्या काळात पाण्याच्या बाटल्याबरोबरच काही इतर ‘बाटल्यां’ची भर पडत असावी. नंतरच्या 60-65 वयापर्यंत नोकरीच्या वा व्यवसायाच्या ठिकाणी तर सॅकमधील पाण्याच्या बरोबर टेबलावरसुद्धा पाण्याची बाटली हवीच. (व या पाण्याच्या बाटल्याबरोबरच इतर प्रकारच्या ‘बाटल्या’ही रिचवल्या जात असावेत.) नंतर दवाखान्यात मृत्युच्या जबड्याच्या आत जाताना सलाइनच्या वा रक्ताच्या बाटल्यामुळे आपल्याला जिवंत असल्याचा भास होत राहतो. अशा प्रकारे दूध, पाणी, दारू, सलाइनच्या बाटल्यांच्या संगतीतला जीवनाचा हा प्रवास आपल्या आयुष्याशी निगडित झालेला असतो. त्यातल्या त्यात पाण्याच्या बाटल्या मात्र दीर्घ काळ आपल्या सोबतीला असतात.

यापूर्वी पाण्याचे इतके चोचले पुरवले जात नव्हते. जेवण, नाष्टा यावेळी पीत असलेल्या पाण्याव्यतिरिक्त अधेमधे केव्हा तरी घरोघरी साठवून ठेवलेल्या माठ वा घागरीतील पाणी ग्लासमध्ये ओतून (उभ्या उभ्या!) गटागटा आवाज करत पिले जात होते. फार फार तर सहकुटुंब सहपरिवार प्रवासात जात असताना फिरकीच्या तांब्यात पाणी घेतले जायचे. सार्वजनिक ठिकाणी मायबाप सरकार वा कुठल्या तरी दानशूर व्यक्तीच्या कृपेने प्यायच्या पाण्याची सोय होत असे. धर्मार्थ कार्य म्हणून उन्हाळ्यात ठिकठिकाणी माठांना साखळीने बांधलेल्या अल्युमिनम वा प्लॅस्टिकच्या ग्लासमधून अगदीच तहान लागलेली असल्यास कष्टकरी, गरीब मजूर पाणी पीत होते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी आली रे आली की बाटल्या वा तांब्यांध्ये पाणी भरून घेण्यासाठी नळाच्या कोंडीपाशी गर्दी होत असे.

परंतु आता हे सगळे पूर्णपणे थांबलेले असून बाटलीबंद पाण्याला पर्याय नाही अशा स्थितीत आपण वावरत आहोत. कुठलाही समारंभ असो वा सार्वजनिक कार्यक्रम, पाण्याच्या बाटल्या ओळीने मांडलेल्या असतात. व्याख्यानाच्या स्टेजवरील टेबलावर पाण्याच्या बाटल्यांची आरास असते. ऑफीसमधील मीटींग्सची सुरुवातच सर्व जण आपापल्या समोरील पाण्याची बाटली उघडून एक घोट पाणी पिऊनच करत असतात. खरे पाहता येथे तहान लागली व घसा कोरडा आहे म्हणून पाणी पिले जात नसून एक फॅड म्हणून बाटली उघडली जात असावे.

तहान भागविण्यासाठी दिवसभरात पाणी किती प्यावे या संदर्भात पूर्वीच्या काळी “8x8” असा एक अलिखित नियम होता. सामान्यपणे एका ग्लासमध्ये 250 मिली लिटर या प्रमाणे रोज 8 ग्लास पाणी प्यावे हा हिशोब या नियमामागे असावा. म्हणजे इतर आहार पदार्थांच्या खाण्यातून पोटात जाणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त रोज 2 लिटर पाणी पिल्यास आपले आरोग्य व्यवस्थित राहील असे त्याकाळी वाटत असावे. आणि या नियमाला तसा कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. परंतु 1945च्या सुमारास अमेरिकेतील एका आहारविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेने एक कॅलरी आहारसेवनामागे एक मिलीलिटर पाणी पिणे आरोग्यास हितकारक असे सुचविले. यानुसार स्त्रिया 2000 कॅलरी व पुरुष 2500 कॅलरी एवढे आहार रोज घेत असल्यास अनुक्रमे रोज 2 व 2.5 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु या पाण्याच्या प्रमाणात वरून घेतलेल्या पाण्याबरोबर फळं-भाज्यांमधील पाण्याचा अंशसुद्धा समाविष्ट केलेला होता. फळं व भाज्यामध्ये सुमारे 70 ते 95 टक्के पाण्याचा अंश असतो. नंतरच्या 1974च्या अभ्यासातसुद्धा रोज 6 ते 8 ग्लास पाणी पिणे शरीरास हितकारक आहे असा निष्कर्ष काढण्यात आला होता. व या पाण्याच्या प्रमाणात फळं, भाज्या एवढेच नव्हे तर शीत पेय व बीअर यांचाही हिशोब धरणे अपेक्षित होते.

xxx पाणी हे सजीवांच्या शरीराला अत्यावश्यक घटक आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. काही सजीवांच्या शरीराच्या वजनात 90 टक्के पाण्याचेच वजन असू शकते. मानवी शरीरात 50 ते 60 टक्क्यापर्यंत द्रव पदार्थाचे वजन असते. मेंदू व हृदय 73 टक्के तर फक्त पुफ्फुस 83 टक्के द्रवयुक्त असते. ही टक्केवारी वय व लिंग यानुसार कमी जास्त होऊ शकते. सामान्यपणे तुलनेने स्त्रियामधील देहजलाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असते. प्रौढ स्त्रियांच्यातील देहजलाचे प्रमाण 45 ते 60 टक्के व प्रौढ पुरुषामधील हे प्रमाण 50-65 टक्के असणे अपेक्षित आहे. व्यायाम वा क्रीडा यातून कमावलेले शरीर असल्यास हे प्रमाण आणखी 5 टक्के जास्त असावे.
शरीरातील पाण्याच्या प्रमाणावरून शरीर आरोग्यदायक आहे की नाही हे ठरवले जाते. माणसाच्या शरीरातील सर्व क्रिया-प्रक्रिया सुरळितपणे चालण्यासाठी पाणी हे अत्यावश्यक घटक आहे. शरीराचे जलतोल राखणारा हा एक घटक आहे. बाहेरून घेत असलेले पाणी घाम, लघवी वा श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची भरपाई करण्याइतपत हवी. जर हे समतोल योग्य असल्यास आपण तरतरीत आहोत याची जाणीव होते.

देहजल (body water) म्हणजे मानवी शरीरातील एकूण द्रव पदार्थ होय. देहजल आपल्या शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठीचे एक अवश्यक घटक आहे. आपल्या शरीराचे योग्य तापमान राखणे, स्नायूंना मजबूत करणे व त्वचेची आर्द्रता इत्यादी क्रिया देहजलामुळे साध्य होतात. म्हणूनच देहजल व प्यायचे पाणी यांना जास्त महत्व आहे. देहजलाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक उपाय आहेत. रोज दोन लिटर पाणी पिणे ही त्याची सुरुवात असू शकते. शक्य असल्यास एक ग्लास पाण्यापासून दिवसाची सुरुवात करणे नेहमीच हितकर ठरू शकेल. शरीरातील कचरासदृश गोष्टी व जंतुविष बाहेर काढण्यास हे उपयोगी ठरू शकेल. नियमितपणे कच्ची फळं व भाज्या खात असल्यास देहजल वाढू शकते. या फळांमध्ये व भाज्यात पाण्याचा अंश मोठ्या प्रमाणात असतो. सतत पाणी पिण्याला हा एक नामी पर्याय आहे. शरीरात साठलेले अतिरिक्त द्रव पदार्थ अगदी पातळ रंगाच्या लघवीद्वारे दिवसातून अनेक वेळा बाहेर पडत आहेत इतपतच प्यायचे पाणी व फळं-भाज्या घेतल्या जावेत.

photo 3“8x8” च्या मानसिक दबावामुळे तहान लागली म्हणजे डीहायड्रेशनच्या (निर्जलीकरणाच्या) धोकादायक पातळीला पोचलो की काय असा समज करून घेतला जात असावा. परंतु तज्ञांच्या मते आपल्या शरीराला जितके पाणी हवे त्यापेक्षा जास्त पाणी शरीर साठवूच शकत नाही. व जेव्हा पाणी कमी पडते तेव्हा शरीर त्याची पूर्वसूचना नक्कीच देते. माणूस उत्क्रांत होत असताना हायड्रेशनसंबंधीची प्रभावी यंत्रणा विकसित झालेली आहे. शरीरातील पाणी थोडे तरी कमी झाल्यास त्याबद्दलची सूचना मेंदूला पोचते. मेंदू ताबडतोब तहान लागल्याची सूचना देऊन पाणी पिण्यास भाग पाडते. त्याचवेळी काही हार्मोन्सद्वारे मूत्राशयाला पाण्याचे नियंत्रण करण्याची सूचना पाठवली जाते. ही सक्षम यंत्रणा कित्येक हजारो वर्षे प्रभावीपणे कार्य करत आहे. त्यामुळे सर्वसाधारण आरोग्य असलेल्यानी शरीराची ही हाक ऐकली तरी पुरेसे ठरते. तहान लागणे हे जरी निर्जलीकरणाचे लक्षण म्हणून पूर्णपणे योग्य नसले वा शंभर टक्के खात्रीलायक नसली तरी गेली हजारो वर्षे ही सूचना काम करत असल्यामुळे त्याला नाकारण्याची गरज नाही. एकही कॅलरी पाण्यात नसल्यामुळे पाणी हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम पेय आहे. चहा-कॉफीसुद्धा आपल्या शरीरातील देहजल वृद्धींगत करू शकतात. त्याचप्रमाणे अल्कोहॉलिक पेयसुद्धा!

शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे निर्जलीकरणाच्या धोक्यापासून दूर राहण्याच्या व्यतिरिक्त विशेष असे काही लाभ मिळत नाही. परंतु एका अभ्यासानुसार निर्जलीकरणाची अगदी सौम्य पातळीचा धोका टाळण्यासाठी जास्त पाणी पिणे हे चांगले ठरू शकते. कारण सौम्य निर्जलीकरण टाळल्यास आपला मेंदू व्यवस्थिपणे कार्य करू शकतो. पाणी आपले वजनही नियंत्रित करू शकतो असे एका अभ्यास-प्रयोगाचा निष्कर्ष आहे. प्रयोगाचे निकष पूर्ण करून सामील झालेल्यांचे दोन गटात विभागणी केली. प्रयोगात सहभागी झालेल्यांना तीन महिने पोषण मूल्य असलेले आहार देण्यात आले. मात्र त्यातील एका गटाला रोज जेवणाआधी अर्धातास अगोदर 500 मिलीलीटर पाणी पिण्यास सांगितले. प्रयोगाच्या शेवटी दोन्ही गटात सहभागी झालेल्यापैकी जेवणाअगोदर पाणी पिणाऱ्यांचे वजन तुलनेने कमी होते. प्रत्येकाला रोज 10000 पावलं चालण्यास सांगितले होते, पाणी पिणाऱ्यांना ते सहज शक्य झाले. परीक्षकांच्या मते 1-2 टक्के देहजल कमी असलेले सौम्य डीहायड्रेशन प्रत्येकात होत असतो, व हे सहजपणे लक्षात येत नाही. आणि इतका सौम्य डीहायड्रेशनसुद्धा आपल्या मनस्थितीत व ऊर्जेत बदल करू शकतो. यात सहभागी झालेल्या एका तज्ञाच्या मते आहारापूर्वी घेतलेले पाणी तितक्याच तीव्रतेने पोट रिकामे करू शकते. परंतु आहारातून घेतलेले सूप, ज्युस मधून पोटात घेतलेले पाणी वजन कमी करण्यास निश्चितच मदत करते. पाणी आपल्या त्वचेची कांती राखण्यास मदत करते. परंतु हे कितपत शक्य आहे याबद्दल तज्ञांच्यात मतभेद आहेत.

रोज आठ ग्लास पाणी पिण्यामुळे शरीराला धोका नाही हे जरी खरे असले तरी आपल्या शरीराच्या सूचनेला दाद न देता जास्त प्रमाणात पाणी पीत राहिल्यास काही वेळा ते धोकादायक ठरू शकते. शरीरातील द्रवाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तातील सोडियम आणखी पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोडियमची पातळी नीट राखण्यासाठी मेंदू व पुप्फुसांना सूज येऊ शकते. कित्येक क्रीडापटू आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पीत असतात. पाण्याच्या अतीसेवनामुळे काही क्रीडापडूंच्यावर मृत्युच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची पाळी आली. दवाखान्यात शरीरातील पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे तातडीच्या उपचारासाठी डॉक्टर्स व नर्सेसची धावपळ आपण बघितली असेल. परंतु मॅराथॉन सारख्या खेळात भाग घेतलेल्या क्रीडापटूंचे डीहायड्रेशनचा प्रकार वेगळा आहे.

photo 2 तज्ञांच्या मते आपण आपल्या शरीराच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ही स्थिती येऊ शकते. व आपण डीहायड्रेशन टाळण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिण्याचा अट्टाहास धरतो. पाण्याच्या अती सेवनामुळे 2018च्या लंडन मॅराथॉनमध्ये भाग घेतलेल्या योहाना पॅकन्हॅमला आपल्याला काय झाले हेही आठवत नव्हते. तिला अती पाणी पिल्यामुळे हायपोनेट्रेमिया झाला होता. तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅड्मिट करण्याची वेळ आली. “माझ्या मित्र-मैत्रिणींना मला डीहायड्रेशन होत असावे म्हणून मला भरपूर पाणी पाजत होते. मला फिट्स आले व माझी हृदयक्रिया बंद पडली. मला ताबडतोब उपचार करावे लागले. व पुढील दोन दिवस मी कोमात होते.” हा तिचा अनुभव बोलका आहे. कारण मॅराथॉनच्या वेळी भरपूर पाणी प्यावे असे ठिकठिकाणी लावलेले पोस्टर्स व इतरांचा सल्ला त्यामुळे ती पाणी पीत गेली व अशी दुरवस्था स्वतःवर ओढवून घेतली. इलेक्ट्रोलाइटचे दोन-चार टॅब्लेट्सनी तिच्या शरीरातील सोडियम पातळी व्यवस्थित राहिली असती. परंतु हा इतका साधा उपाय तिला त्यावेळी सुचला नाही.

आपल्या शरीरातील पाणी कुठल्याही क्षणी कमी होऊ नये म्हणून बहुतेक जण जाईल तेथे कायमचे पाणी घेऊन जातात व शरीराला अवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वरचेवर पीत राहतात. वाळवंटी प्रदेशाच्या अगदी मध्यावर पण असलो तरी आपल्या शरीरातून घामाच्या वाटे जास्तीत जास्त प्रती ताशी दोन लीटर पाणी आपल्या शरीराबाहेर जाऊ शकते. त्यामुळे शहरातल्या शहरात जास्तीत जास्त अर्धा-एक तास फिरत असताना तेवढा घामही येणार नाही व 500 मिलीलिटरची बाटली संपवण्याचा प्रश्नही उद्भवणार नाही. जर तसे असेल तर बाटली घेऊन फिरण्याची कधीच गरज भासणार नाही. त्यामुळे दिवसभरात दूध, चहा-कॉफी वा कमी साखर असलेले पेय व पाणी धरून 6 - 8 ग्लास द्रव पोटात गेल्यास आरोग्याला पुरेसे ठरेल.

एक मात्र खरे की वयाच्या 60 वर्षानंतर आपली तहान यंत्रणा तेवढीशी कार्यक्षम नसते. त्यामुळे या वयात तरुणांपेक्षा डीहायड्रेशनची शक्यता जास्त असते. म्हणूनच पाणी पिण्याच्या सवयीत काळजीपूर्वक बदल केल्यास आपल्या हिताचे ते ठरू शकेल. शरीराला लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण वय, लिंग, वजन, हवामान, वातावरण व शारीरिक श्रम इत्यादीवर अवलंबून आहे. त्यामुळे सुलभीकरण करणाऱ्या 8x8च्या नियमाचे तंतोतंत पालन करत राहण्यापेक्षा भूक वा थकणे या क्रियांसाठी जसे शरीर पूर्व सूचना देत असते त्याच प्रमाणे तहानाच्या बाबतीतही सजग राहणे हे आरोग्याचे लक्षण ठरू शकेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तहान लागण्याची वाट बघू नये. तरीसुद्धा येता-जाता, उठता-बसता, वेळी-अवेळी गरजेपेक्षा जास्त पाणी पीत राहिल्यास अनेक वेळा वॉशरूमला जाण्या-येण्यासाठी जितक्या कॅलरी जाळता येतील तेवढाच लाभ आपल्या पदरी पडू शकेल

संदर्भ

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet