आर डी बर्मन - अशीही एक श्रध्दांजली!

अशीही एक श्रद्धांजली

R D Burman

‘‘खरं सांगू का? ते बंगाल्यांचं हा दा आणि तो दा मला जितकं बेकार वाटतं ना, तितकंच बेकार संगीतातल्या माणसाला ‘पंचम’ नाव देऊन त्याला मोठं करणं वाटतं. जयकिशनने त्याच्या मुलीचं नाव भैरवी ठेवलं. शंकर-जयकिशनला भैरवी जरा जास्तच प्यारी होती. मला राग कळत नाहीत पण राजू भारतनने लिहून ठेवलंय की पूनम नावाच्या सिनेमात बारा गाणी आहेत, बाराच्या बारा लताने गायलेली आहेत आणि सगळी भैरवीत आहेत!’’

‘‘तू भरकटलास नेहमीप्रमाणे. मी विचारलं होतं –’’

‘‘आठवलं. थांब. मला भरकटायचं नाही, बोलायचं आहे. पण अगोदर जे म्हणतो आहे, ते पुरं होऊ दे.

‘‘तर काय म्हणत होतो? हां, भैरवी. सचिन देव बर्मनने मुलाचं नाव पंचम का ठेवलं नाही? नंतर त्याला पंचम हाक मारण्याची कौतुकं कशाला? पण ते असो. १९७५-८० नंतरच्या गाण्यांबद्दल मला जनरल तिरस्कार आहे. इकडून तिकडून चार बरी गाणी जरी काढता येत असली तरी त्या काळात हिंदी गाण्यांचं कल्चर – कळतंय ना मी काय म्हणतोय ते? कल्चर. एकेक गाणं नव्हे – अगदी खालचं होतं. त्या काळातला एक संगीतकार म्हणून राहुल देव बर्मनकडेसुद्धा मी कधी लक्ष दिलं नाही. पण झालं काय की कुठेतरी वाचनात ओ पी नय्यरचा उद्गार आला. त्याला विचारलं, आशाच्या बाबतीत तुमचा वारसा आरडीने चालवला, असं म्हणणं बरोबर होईल ना? तर तो हलकट म्हणाला, आरडी? त्याची सगळ्यात चांगली गाणी तर त्याने लताला दिलीत!

‘‘हा शुद्ध हलकटपणा आहे. पण ते असो. हे वाचल्यामुळे मला चाळवल्यासारखं झालं. हलकट झाला आणि आशावरचा खुन्नस काढत असला, तरी ओपी धडधडीत खोटं बोलणार नाही. मग मी स्वत:शी मोजू लागलो. गाणी माहीत नव्हती, असं नाही; पण अशी एकापुढे एक ओळीने कधी लावली नव्हती. च्यायला! ‘नाम भूल जाएगा’! काय अप्रतिम गाणं आहे. त्याला चाल आहे आणि शब्दांमधला आशय पकडणारा परफेक्ट मूड आहे. हिंदी सिनेमाच्या कल्चरनुसार अगोदर चाल आणि मग शब्द असं असू शकतं; पण गाण्याचा प्रसंग आणि मूड हे तर अगोदरच ठरलं असणार. काय पकडलंय मस्त.

‘‘तीच गोष्ट ‘दो नैनोंमे’ची. हे गाणं तर मला नुसती आलापी असलेलं कितीतरी जास्त आवडतं. कुठे हस्की आवाज काढलेला नाही. कुठे उसासे नाहीत; उलट खणखणीत वरच्या पट्टीत जाऊन येणं आहे. पण काय आर्तता आहे. हॅट्स ऑफ! थोडं मागे गेलं तर ‘वादियाँ मेरा दामन’ आठवतं. ही सरळ सरळ मेलडी. टिपिकल लता. म्हणजे, गाताना लताला सुख मिळालं असेल, इतकं लता. ‘भई बत्तूर’ पुन्हा ऐक. ‘अब जैंगे कितनी दूर’ कसं म्हणते लता! जैंगे, बरं का; जाएंगे नाही. वारेवा. जैंगे. ऐक ग. अहाहा. पण एक नक्की. ते ‘जैंगे’ लताचं नाही. ते आरडीचंच. ‘नी सुलताना रे’मधे कशी लता शिरते, --

R D Burman with Lata Mangeshkar

नाही! नाही! हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सगळ्या गाण्यांमध्ये जेव्हा जेव्हा शिरणं असतं ना, ते लताच करते. ‘प्यार हुवा इकरार हुवा’ घे, ‘दिल तडप तडपके’ घे, ‘ये रात भीगी भीगी’ घे, ‘दिले बेकरार सोजा’ घे; म्हणून इथेही पटकन म्हणून गेलो.

‘‘... ‘कहां हो तुम आवाज दो’ मध्येसुद्धा मुकेश गाताना लता घुसते ना? च्यायला, रोशनलापण जरा लक्ष देऊन ऐकायला पाहिजे! एवढ्यात दोन गाणी आली त्याची लताचा आवाज घुसवण्याची!’’

‘‘प्लीज!’’

सॉरी. आरडी. तर हा आरडी साला लता गात असताना रफीला शिरवतो! ऐक पुन्हा एकदा. ती गात असते. ‘साआवन आआया आया. साआवन आआया आया, साआवन आआया आया; गाणं असं सावकाश निवत जातं आणि रफी शिरतो! ‘नी सुलताना रे’ म्हणत. च्यायला काहीतरी गंमत आहे या आरडीत. खूप गंमती आहेत.

‘‘तुला ‘छोटे नवाब’मधली गाणी आवडत नाहीत? त्याचं नाव घेत नाहीस तू.’’

‘‘कुठल्याही संगीतकाराचा पहिला सिनेमा मोजूच नये त्याचं मोठेपण ठरवताना.
मतवाली आंखोवाले’ हे गाणं सुंदरच आहे. इतकंच नाही, लताच्या सौंदर्यावर स्वार होऊन आपलं घोडं दामटण्याचा सोपा प्रयत्न नाही तिथे. ‘मतवाली आंखोवाले’ जेवढं लताचं आहे, तेवढंच आरडीचंदेखील आहे.

‘‘त्यापेक्षा मी ‘बहारोंके सपने’ मोजीन. ‘आजा पिया’ हे गाणंसुद्धा बघ, लता आणि आरडी, दोघांचं आहे. पण हे गाणं आणि त्याच सिनेमातल्या ‘चुनरी संभाल गोरी’ या गाण्यात लताचं ‘हाआ’ – यात अला अ जोडलेला आहे चक्क, ऐक! अ हे जोडाक्षर! – तर हे गाताना लताला हळूच जाणवलं असेल की हा संगीतवाला अगोदरच्या सी रामचंद्र-नौशाद-शंकरजयकिशन यांच्यासारखा आपल्यात विलीन होणारा नाही. हा त्याचा तो रहाणार! जसा त्याचा बाप राहिला. लताचं काय आहे –’’

‘‘अरे, तू नेहमीप्रमाणे लताच्या भोवऱ्यात गडप होऊ लागलास. कधीतरी –’’

‘‘पुन्हा सॉरी. तर आपण मुळाकडे येऊया. आरडी आणि आशा. द ब्लडी ‘तीसरी मंजिल’! ‘वो अंजाना ढूंढती हूँ!’ ही केवळ आशा. कारवाँ. ‘पिया तू अब तो आजा!’ यात आशा सोडून दुसरा कुठला आवाज मेंदूला ऐकू येऊच शकत नाही. तुला एक गंमत सांगतो. मदन मोहनने आशाला ‘झुमका गिरा रे’ दिलं. तिचं गाणं. आशाचंच गाणं. पण त्याच मदन मोहनने ‘देख कबीरा रोया’मध्ये वेगळी बाई गाते म्हणून ‘अशकोंसे तेरी हमने’ हे गाणं दिलं. हे गाणं लताचं. दिलं आशाला. उद्या मला कोणी आशाची चांगली गाणी निवडायला सांगितली, तर हजार आकडा येईपर्यंत या गाण्याचा नंबर लागणार नाही. तर आशाने अशी लताची गाणी गायल्याची आणखीही उदाहरणं आहेत. ‘दिल लगाकर हम ये समझे’सारखी. पण उलट उदाहरण? ते आरडीचं आहे. कारवाँ मधलं ‘दिलबर ओओ दिलबर’ हे आशाचं गाणं आरडीने लताला का दिलं कळत नाही. ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’. हे गाणं कोणाचं? या गाण्याला झीनत अमनचा चेहरा आहे! पण तसं झालं याचं क्रेडिट नि:संशय आरडीचं आहे. ‘लेकर हम दीवाना दिल’, ‘खुल्लमखुल्ला प्यार करेंगे’...

R D Burman with Asha Bhosale

मला ना आरडीची काही वेगळीच गाणी कधी कधी जास्त आठवतात. ‘जीनेका दिन मर जानेका मौसम’ हे गाणं, ‘भली भली सी एक सूरत’ हे, ‘ओ साथी चल’, ‘यारी हो गई यारसे लक तुनु तुनु’ ... हे ‘यारी हो गई’ ऐक. आरडीचं कल्चर लता नाहीच. हे गाणं लताचं अजिबातच नाही. याला संगीताबाहेरचं पण एक कारण आहे म्हणा. हे गाणं तनुजा घेऊन निघून जाते, असं माझं मत आहे.

ओपी अंतर्बाह्य नॉनलता. त्याच्यासाठी आशाने गायलेली गाणी त्याच्यानंतर तिचीच. तसं आरडीच्या बाबतीत कधी होतं? ‘देखिये साहिबो’मध्ये आशा ज्या ॲपरंटली वेड्यावाकड्या ताना मारते, ते लताला जमेल काय? ‘जानेजा ढूंढता फिर रहा’मध्ये जे आवाज ती काढते – ‘हरे रामा हरे कृष्णा’मध्ये उषा अय्यरच्या स्टाईलवरून तिला हे सुचलं असावं यात शंका नाही; पण ती कॉपी करत नाही! ‘दुनियामे’ हे ‘अपना देश’मधलं गाणं. निव्वळ आशा. ते बघताना मात्र त्रास होतो. मुमताज नको हेलन हवी, असं होत रहातं. ते जाऊ दे. पण आशा आशा आशा. राहुल देव बर्मनने आशाला दिलेली गाणी ऐकली की असं वाटतं, त्याने चाल लावावी आणि आशाने गावी. लताला चांगली आणि चुंगली गाणी देणारे खूप आहेत. हे असं अद्वैत दुर्मिळ.

‘‘म्हणजे कसं बघ. हिंदी सिनेमाच्या इतिहासात असे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सिनेमे आहेत, ज्यांची गाणी त्या त्या सिनेमाच्या आशयाशी एकरूप आहेत. इतकी, की ते गाणं त्या संगीतकाराच्या दुसऱ्या कुठल्याच सिनेमात असू शकणार नाही. उदाहरणार्थ, आपला तीसरी मंजिल. पण मला सांगायचंय की आरडी-आशा हे असं कॉम्बिनेशन आहे. अद्वैत. आरडीने लताला कितीही चांगली गाणी दिली असोत; ती बाय डिफॉल्ट चांगली ठरतात.’’

‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे लताकडून गाऊन घ्यायचंय म्हटल्यावर आरडीसारखा ऑनेस्ट संगीतकार तिच्या आवाजावर गाणं उभं करणार नाही; तर तिला साजेशी चाल बांधणार! दॅट इज लता कल्चर!’’

‘‘झालं! शेवटी लताला कुठेतरी उंचावर नेऊन बसवल्याशिवाय तुला चैन पडणार नाही!’’

‘‘त्या कल्चरचा तो शेवटचा संगीतकार, लक्षात ठेव. त्याने परवीन सुलतानाकडून ‘हमे तुमसे प्यार कितना’ गाऊन घेतलं. ते ऐक. तिचंच गाणं वाटतं. नाहीतर ज्याची चलती तो आवाज घ्यायचा आणि स्वत:चं कल्याण साधायचं.’’

‘‘एवढं पुराण सांगितलंस. यात एकही किशोरकुमार नाही. आंधी नाही. अमर प्रेम नाही. शोले नाही.’’

‘‘शोले आणि सागरची गाणी फालतू आहेत. आरडी-किशोर ही एक कादंबरी भरेल एवढं मोठं प्रकरण आहे. आंधी, येस. मी आत्ताच वर्णन केलेल्यापैकी एक. आंधीची गाणी आंधीचीच गाणी. आरडीच्याच दुसऱ्या कुठल्या सिनेमात न जाणारी गाणी. ‘अमर प्रेम’ची गाणी मला तितकीशी प्रिय नाहीत. चांगली आहेत का? तर हो. आहेत. पण –

‘‘कसं आहे, आरडीसारख्या ‘खऱ्या’ संगीतकाराची गाणी मोजताना नुसती चांगलीवाईट नाही मोजता येत. त्यांचं कल्चर जाणवत रहातं. ‘अमर प्रेम’च्या गाण्याचं कल्चरसुद्धा त्या सिनेमाचं कल्चर आहे. ते आरडीचं नाही, किशोरकुमारचं नाही. लताचं तर नाहीच नाही. अगदी ‘रैना बीती जाय’ धरूनसुद्धा. ते फार तर राजेश खन्नाचं कल्चर म्हणता येईल. म्हणजे फार नाही ना. चांगली आहेत गाणी. पण, ... काय माहीत, कदाचित मला ते धोतर आणि बंगाली बंगालीच खटकत असेल! बघायला पाहिजे.’’

एक डिस्क्लेमर. हे एक काल्पनिक संभाषण असून त्यातील पात्रांच्या मताबाबत मी जबाबदार नाही!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ओपी असं खरंच बोलला असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे.
'दिलवर दिलसे प्यारे, हे गाणं लताला देऊन आरडीने रसिकांवर उपकार केले आहेत.
लता आणि आशा यांच्या आवाजाची, गाण्याच्या स्टाईलची तुलना होऊ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर 90 वर्षांचा ब्रॅड पिट समोर तरळला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

शोलेची गाणी ठीकठाक आहेत याच्याशी सहमत. खरं सांगायचं तर शोलेचं पार्श्वसंगीत गाण्यांपेक्षा चांगलं आहे (त्यात ती प्रसिद्ध 'शोले थीम'ही आली).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीकठाक कशाला, सरळच सुमार आहेत असं म्हणा की.
आणि पार्श्वसंगीत हे (गाण्यांपेक्षा) बरे आहे असं म्हणालात तर ठीक.
पण त्यात तरी काय विशेष आहे हो ? एक ते गब्बर बॅकग्राउंड ला दिलेला वेगळा आवाज.
टायटल म्युझिक उत्तम वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक लोकांना हेसुध्दा आवडत असावं, कारण रिंग टोन, कॉलर ट्यून वगैरे म्हणून ते असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लता आवडणाऱ्यांना ओपी आणि आर. डी. फारसे आवडत नाहीत हे जगजाहीर आहे. त्यासाठी एवढी आडवाट कशाला?

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आवडलं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.