एक होता परीक्षित - एक करोनाकथा

अगोदर काय झालं, हे सांगणं जरा कठीण होतं.

म्हणजे, कोणी तरी आल्याची वर्दी देणारी दारावरची बेल वाजली आणि त्याच वेळी व्हॉट्सॅपवर मेसेज आल्याची घंटीही वाजली. व्हॉट्सॅप लगेच कुठे पळून जाणार नव्हतं, म्हणून त्याने जाऊन दरवाजा उघडला.

तर मुलगी!

“काय गं! अचानक?”

मुलगी घाईघाईत आत शिरली. बेसिनवर जाऊन तिने हात धुतले आणि थेट तिच्या खोलीत गेली. (वेगळी राहायला लागली तरी तिची खोली त्यांनी अजून ‘तिची खोली’च ठेवली होती. तिचं नसलेलं असं तिथे म्हणजे फार तर पुस्तकं असतील. आणि एखादं स्टूल. पण स्टूल काय, कोणाचंही असतं.) हातातली बॅग तिथे ठेवून ती बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “मी इतकी दमलेय. मला चहा हवा. करतोस?”

तो चहा करायला वळला. तोवर त्याची बायको बाथरूममधून बाहेर आली होती. तिला बघून तो म्हणाला, “तू करतेस चहा? सगळ्यांना कर. नाही तरी आपली चहाची वेळ होत आलीच आहे.”

मुलगी नजर चुकवते आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं; पण ‘सांगेल थोड्या वेळाने,’ या विश्वासाने त्याने मुद्दाम, खोदून चौकशा केल्या नाहीत. तो मोबाइलकडे वळला.

मघाचा मेसेज एका मित्राचा होता. त्रोटक निरोप होता: chk yr mail.

मेलवर काय आलं असणार, याची अंधुक कल्पना त्याला होती, कारण थोड्या दिवसांपूर्वी तो मित्र त्याला म्हणाला होता, ‘अरे, मी एक कथा लिहितो आहे. तुला दाखवायची आहे.’ अगदी जुजबी ओळखीतले लोकही त्याला त्यांचं लिखाण दाखवत. आणि तो त्याबद्दल मत देत असे. केव्हा तरी त्याने कोणाला तरी मत कळवलं आणि ते इथून तिथे करत त्याच्या परिचयात पसरलं. त्यात लिहिणारे-वाचणारे अनेक होते. मग कोण कोण त्याला ‘हे वाच. बघ किती छान लिहिते.’ असं कळवू लागला. कोणी ‘बारोमास मला नाही आवडली. तू वाचलीस? कशी वाटली?’ अशा चौकशा करू लागला. एका बाजूने त्याचा वेळ जाऊ लागला आणि त्याच वेळी त्याला थोडं त्रासदायकही होऊ लागलं. ‘कसे लोक गृहीत धरतात!’ त्याच्या मनात येत असे. पण त्यातूनच त्याचं मित्रवर्तुळात एक स्थान ठरून गेलं, जे त्याला अगदीच आवडत नव्हतं, असं नव्हतं. शिवाय लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यासारखं वाटत असे. हा तर मित्र. तो असं म्हणाल्यावरही त्याने तसंच उत्तर दिलं होतं: ‘पाठव. बघतो.’

‘कथा म्हणजे, ... अजून तसं काही फार लिहून झालेलं नाही, पण, ...’

मित्राला तोडत तो म्हणाला होता, ‘लिही आणि पाठव. लिहिण्याअगोदर काहीही आणि कितीही म्हणालास, तरी त्याला अर्थ नसतो. लिहावंसं वाटतंय ना? मग लिही. आणि पाठव. मी नक्की वाचेन.’

मित्र लिहिणाऱ्यातला नव्हता. खरे लिहिणाऱ्यातले त्याला लिहिण्याअगोदर काही दाखवत, सांगत नसत! न लिहिणाऱ्यांपैकी बहुतेक आरंभशूर असतात; संकल्प करतात, सुरुवातही करतात; पण पुढे अडकतात आणि मग सोडून देतात, असा त्याचा अनुभव होता. दहातले पाच असं करत असल्यामुळे फुकटचा मोठेपणा घ्यायची त्यालाही सवय लागली होती. कोणी ‘वाचशील का?’ असं विचारलं, की तो ‘हो’ म्हणे आणि नंतर अधूनमधून ‘काय रे, किती झालं लिहून?’ अशी चौकशीदेखील करत असे.

पण यावेळी याने खरंच लिहून पाठवलं असावं, असं स्वत:शी म्हणत त्याने लॅपटॉप उघडला. कथाबिथा मोबाइलवर वाचणं त्याला कष्टाचं वाटे.

कथाच होती. मेलचा सब्जेक्टच मुळी ‘कथा - एक होता परीक्षित’ असा होता. कथा अटॅचमेंटमध्ये होती. मेलमध्ये मित्राने लिहिलं होतं,

Cobra silhouette

मागे पुण्याला गेलो असताना महाभारताची कथा आधुनिक भाषेत सांगण्याच्या एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आहे, हे मी तुला बोलल्याचं तुला आठवत असेल. आपल्याला आपल्याच जुन्या गोष्टी माहीत नसतात. महाभारत किती ग्रेट आहे! किती माणसं आहेत त्याच्यात आणि किती प्रसंग! मला खरंच कल्पना नव्हती की हे इतकं असेल. तो सांगणारा जरा चावट होता. एक नमुना देतो.

पराशर म्हणाला, झोपतेस का? तर ती नाही म्हणाली नाही! ती म्हणाली, लोक बघतात! मग त्याने धुकं केलं. मग ती म्हणाली, माझ्या अंगाला माशांचा वाईट वास येतोय. तर त्याने तिला एकदम कस्तुरीचा वास येणारी करून टाकलं. मग तिला कळलं, हा तर मागेल ते देतोय! इतका पेटलाय! मग तिने सरळच मुद्द्याला हात घातला – तुझ्यामुळे मला पोर झाल्यावर माझ्याशी नंतर कोण लग्न करेल का? तर तो खरंच इतका पेटलेला की म्हणाला, मी त्या पोराला घेऊन जाईन आणि तुझं कौमार्य पुन्हा रिस्टोअर होईल!

च्यायला. सगळं महाभारत हे असंच निघालं. मजा आली.

पण मला सगळ्यात आवडली ती परीक्षिताची गोष्ट. फळातून अळी आली आणि अळीचा मोठ्ठा साप होऊन तो परीक्षिताला चावला आणि परीक्षित मेला. ही गोष्ट मला खास वाटण्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी थायलंड का कुठे सुनामी आलेली तुला आठवतेय? माझ्या एका मित्राचा मित्र तेव्हा फुकेटला गेला होता, तो मेला बुडून त्या सुनामीत. त्या मरणाऱ्याला मी ओळखत होतो. त्याचंही नाव परीक्षित होतं. गंमत इतकीच नाही. जाण्यापूर्वी आम्ही एक पार्टी केली होती, तेव्हा तो भेटला होता. पिल्यावर मला म्हणाला, ‘मी बुडून मरणार आहे! मला तसा शाप आहे! लक्षात ठेव, मी बुडून मरणार आहे.’ पिल्यावर लोक काहीही बोलतात. मी दुर्लक्ष केलं पण तो खरोखरच तसा मेल्यावर मला ते आठवलं. आणि कायमचं डोक्यात राहिलं.

हे झालं आणि मध्यंतरी मी एक सिनेमा पाहिला. सायन्स फिक्शन सिनेमा होता. एका पाणबुडीतून काही शास्त्रज्ञ समुद्रात खोल खोल जातात आणि तिथे त्यांना काय काय सापडतं. पण त्या सिनेमात एका दृश्यात पाण्याचा एक लोट सापासारखा येतो आणि त्याला माणसाचं तोंडही तयार होतं! तो सीन आला आणि मला तो मेलेला परीक्षित आठवला. मला वाटलं, तोसुद्धा अशाच पाण्याने सापाचं रूप घेऊन मेला तर नसेल? या विचाराने माझ्या अंगावर काटा आला. आणि मला गोष्ट सुचली.

ती तुला पाठवतो आहे. मी फार पूर्वी काहीबाही लिहिण्याचा प्रयत्न केला होता; पण एकही गोष्ट पूर्ण केली नाही. म्हणजे ही माझी पहिलीच गोष्ट. तर तू ती सीरियसली वाचावीस आणि मला काय ते सांगावंस, अशी मनोभावे विनंती!

मुलगी बऱ्याच दिवसांनी घरी आली असताना त्याला अटॅचमेंट ओपन करून गोष्ट वाचायला घेण्याचा कंटाळा आला. शिवाय वाचून मत सांगायचंय. ‘मार्गदर्शन’ करायचंय. म्हणजे उभी वाचून संपवता येणार नाही. नीट वाचायला लागेल. मधलंमधलं लक्षात ठेवावं लागेल. किंवा नोट्स काढाव्या लागतील. त्यासाठी लक्ष द्यावं लागेल.

नंतर बघू, असं म्हणून तो मुलीच्या खोलीत गेला.

मुलगी मुसमुसत होती. बायको तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करत होती. मुलीचा, बायकोचा आणि त्याचा असे तीन चहाचे कप तिथेच गार होत बसलेले होते. त्याने ते मायक्रोवेव्हमध्ये घालून गरम केले आणि दोघींच्या हातात एकेक देऊन स्वत:चा कप घेत तो मुलीला म्हणाला, “हं, बोल. काय झालं?”

मुलीचा स्वभाव जरा जास्त उत्साही होता. फॅशन डिझाइनिंगमध्ये रमलेली होती. फॅशन शो बघायला दिल्लीला गेली असताना तिथे तिला खूप मित्र भेटले आणि कसलं तरी कामही मिळालं. त्या निमित्ताने तिच्या दिल्लीला फेऱ्या वाढल्या. घरी, म्हणजे मुंबईला असतानादेखील ती आईवडिलांबरोबर ठाण्याला न राहता मैत्रिणीबरोबर सहारला राहत होती. एक प्रदर्शन डिझाइन करण्याचं भलंमोठं काम मिळालं आहे आणि त्यासाठी आम्हाला सारखंसारखं भेटावं लागतं, रात्री काम करत बसावं लागतं आणि त्यासाठी तुमच्याबरोबर ठाण्याला न रहाता सहारला रहाणं खूप सोयीचं आहे, असं ती म्हणाली होती. त्याने आणि त्याच्या बायकोने याला विरोध केला नव्हता. कारण अत्यंत लहरी, मूडी असलेली मुलगी कामात असली की सगळं विसरते आणि आनंदी दिसते, हे त्यांनी पाहिलं होतं. त्यांना तेवढं पुरेसं होतं.

ती मुलगी आज रडत होती.

आता, तिच्या मूड स्विंग्जचा अनुभव असल्याने तिचं रडणं किती सीरियसली घ्यायचं, हा प्रश्नच होता. (म्हणूनच काळजी दाखवत तिची चौकशी करण्याआधी त्याने चहा गरम केला आणि दोघींच्या हाती दिला.) मात्र, त्याच वेळी काही न सांगता ती अचानक सहारहून उठून ठाण्याला का आली असावी, याचं उत्तर त्याला सुचत नव्हतं. तिच्या हातातल्या बॅगेवरून ती कपडे-बिपडे घेऊन राहायलाच आली आहे, असंही त्याला वाटून गेलं.

“आता आली आहेस तर राहशील ना दोन दिवस?” तो म्हणाला.

“तुला काही कळतं की नाही? उद्या जनता कर्फ्यू नाही का? गाड्याबिड्या बंद होण्याची शक्यता आहे. ही घरी, आपल्याजवळ राहिली, तर तिचं सगळं नीट होईल, तिथे राहिली तर होणार नाही, एवढं पण तुझ्या लक्षात येत नाही? म्हणून आलीय ती!” बायको डाफरली.

“नाही!” मुलीने गळा काढला. “मी राहणार आहे पण तेवढंच कारण नाही!”

झालं होतं असं की तिच्या दिल्लीच्या मित्राचा तिला फोन आला, की तो घरात अडकून पडल्यामुळे त्याला सांगितलेल्या काही गोष्टी करू शकत नाही. का अडकला, तर त्याच्या पार्टनरची एक मैत्रीण लंडनहून आली आणि कोरोना पॉझिटिव निघाली. पण टेस्टचा निकाल हाती येईपर्यंत तिने तिच्या आणखी एका मैत्रिणीकडे एक रात्र काढली होती. ‘मी कोरोना पॉझिटिव आहे,’ असं तिने त्या मैत्रिणीला कळवलं, तेव्हा ती दुसरी मैत्रीण त्या पहिल्या मित्राच्या घरी होती. दुसरी मैत्रीण फोन खाली ठेवून पहिल्या मित्राला म्हणाली, ‘आता मी घरी कशी जाऊ? मीसुद्धा पॉझिटिव निघाले तर? मला आता आयसोलेशनमध्ये रहायला पाहिजे. घरी जाऊन मी माझ्या आईवडिलांना का इन्फेक्ट करू? त्यापेक्षा इथेच राहते. तुम्ही नाहीतरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहात! आणि मी गेले तरी ते थोडंच बदलणार आहे?’

झालं. मित्र, मित्राची पार्टनर, ती मैत्रीण आणि तिच्याबरोबर असलेला तिचा पार्टनर, असे चौघे अडकले. चौघेही प्रामाणिक नागरिक असल्याने स्वत: होऊन त्यांनी घरात कोंडून घेतलं. पंधरा दिवसांसाठी.

किंवा कोणाला तरी नको ती लक्षणं दिसायची वाट पाहत. जे अगोदर होईल ते. त्यानंतर काय करायचं, हे आपोआप कळलं असतं.
गोष्ट इथे संपत नाही. लंडनहून परतलेल्या त्या मुलीने जिच्याकडे रात्र काढली, तिच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलेला आणखी एक जण मुंबईला येऊन इथल्या ग्रूपला भेटला होता! ‘हाथ लगाना नही, हां!’ असं म्हणत हसतहसत सगळ्यांनी एकमेकांना ‘हग’ केलं होतं. त्या हग करणाऱ्यांच्यात ही होती. त्यामुळे आज सकाळी दिल्लीहून मित्राने फोन करून हे कळवलं, तेव्हा ही घाबरली आणि स्वत:चा सारासारविवेक जागा होण्याअगोदर तिथून पळाली आणि घरी, आईवडिलांकडे आली.

“पण मी घरात शिरल्यावर पहिल्याप्रथम हात धुतले! चांगले वीस पंचवीस सेकंद धुतले! मी बाहेरून काहीच इन्फेक्शन आणलेलं नाही!” मुलगी निक्षून म्हणाली.

नवराबायको दोघे काही म्हणाले नाहीत.

ते गप्प राहिलेले पाहून मुलगी आणखी जोरात रडू लागली.

“आता काय?” तो म्हणाला. त्याचा आवाज शुष्क आला.

मुलीने उत्तर दिलं नाही. आईच्या गळ्यात पडून ती हुंदके देत राहिली. तिने उत्तर देण्याची गरज नव्हती. ‘आता काय’ हे सगळ्यांना कळत होतं. प्रश्न एवढाच होता, की सगळ्यांनी पंधरा दिवस घरात कोंडून घ्यायचं की देवावर हवाला ठेवून नॉर्मल जगणं चालू ठेवायचं.
पण आता तिघांचाही सारासारविवेक काम करत होता.

मुलीला खोलीत सोडून बायको बाहेर आल्यावर त्याने आवाज उतरवत तिच्याकडे चौकशा केल्या. घरात काय काय आहे? पाव, अंडी, मिरच्या कोथिंबीर, भाजी, कडधान्य, आटा, तांदूळ, ... किराणाखरेदी त्याचं डिपार्टमेंट होतं. यातलं काही नसेल, तर खाली उतरून आणावं लागेल. मजल्यावरच्या चार ब्लॉक्सपैकी शेजारचा एक ब्लॉक बंद आहे. दोन वर्मांचे आहेत. दोन्ही ब्लॉक मिळून वर्मा नवराबायको राहतात. त्यांना अचानक काही लागलं, तर आपल्याला सांगतात. त्यांना काही आणायला सांगता येणार नाही. शिवाय ते बऱ्यापैकी वयस्क आहेत. थकलेले दिसतात. वॉचमन लोकांना नेमकी आजच सुट्टी दिलीय. उद्या ते येतील पण उद्या कर्फ्यू असेल!

त्याला निर्णय घेता येईना. “बघू.” तो म्हणाला. “तू अगोदर चहा घे.”

मित्राने पाठवलेली कथा त्याने लॅपटॉपवर उघडली आणि वाचू लागला. एक होता परीक्षित.

अटॅचमेंट मध्येच कुठेतरी उघडली. त्याने तिथूनच वाचायला सुरुवात केली.

“राजा, तू एका वर्षाच्या आत सर्पदंशाने मरणार आहेस!” ऋषीची शापवाणी कडाडली.

‘मला राजा म्हणतो!’ परीक्षिताच्या मनात आलं, ‘म्हणजे मी राजा होणार!’ परीक्षित खूष झाला. त्याला ऋषीचा राग आला नाही. उलट तो आनंदाने बेहोष झाला. त्याने ऋषीला कुर्निसात केला. म्हणाला, ‘मुनिवर, नाराज होऊ नका. माझी चूक झाली, मला माफ करा!’

मग त्याने ऋषीला काय हवं नको ते बघण्याच्या सूचना दोघा सैनिकांना दिल्या आणि तो घाईघाईने निघाला.

राजा! इतके दिवस जी कटकारस्थानं करत आलो, ती फळणार! मी राजा होणार!

घोड्यावरून दौडत असताना परीक्षित पुढची मनोराज्यं रचण्यात रमून गेला.

भाषा बरी आहे याची, त्याच्या मनात आलं. अपेक्षा नसताना एकदमच चांगली भाषा समोर आल्याने त्याला बरं वाटलं. पण ‘कुर्निसात’ हा शब्द चालेल का? हा तर सरळ सरळ उर्दू शब्द वाटतो. राजाने ऋषीला नमस्कार करावा, प्रणिपात करावा, अगदी दंडवतही घालावा; पण कुर्निसात!

पानभर नाही वाचलं, तरी सांगण्यासारखं काही मिळालं. शिवाय भाषा चांगली आहे, हेसुद्धा सांगण्यासारखं आहेच की. आता गोष्ट एकूण कशीही निघो, काहीतरी सांगता येईल! त्याला त्याचा डॉक्टर भाऊ आठवला. बरा लिहायचा. कविता करायचा. भरपूर वाचायचा. पण डॉक्टर होऊन डॉक्टरकीत असा रमला की आता त्याच्या बोलण्यात दुसरा विषय येत नाही. आताही खूप वाचतो; पण फिक्शन नाही. फक्त मेडिसिन. जगभर काय चाललंय, हे. आणि आपल्याला सांगत असतो, अमुक आणि ढमुक.

भावाची भाषा चांगली होती. नेमके शब्द त्याला आठवत. या ‘कुर्निसाता’चं तसंच काही असेल की आला अपघाताने? लिहिणारा लिहून गेला आणि आपण विचार करत बसतो!

दोन पानं उगीच पुढे स्क्रोल करून तो पुढचं वाचू लागला.

वाडा बांधायचाय, वाडा! असा वाडा, ज्यातून मला बाहेर पडावं लागणार नाही. असा वाडा जिथे बाहेरून कोणाला यावं लागणार नाही. आत मी असेन, फक्त मी! परीक्षिताला राहवलं नाही. तो उठला आणि वाड्याच्या बांधकामाची प्रगती बघायला गेला.

सगळं व्यवस्थित चालू होतं. वाड्यात बसल्य बसल्या हुकूम दिला की काय हवं ते मिळेल, अशी व्यवस्था असावी म्हणून वाड्यातल्या एका विशिष्ट खोलीतून फळवाला, चमचमीत खाद्यपदार्थ बनवणारा परीक्षिताचा आवडता रसोईया, रंगीबेरंगी आणि सुवासिक आणि अर्थातच सुमधुर पेयं तयार करण्यात हातखंडा असलेला पोया (इथे लेखकाने एक * अशी खूण केली होती. पानाच्या तळाशी खुलासा होता, ‘पाणपोई वरून पाणपोया, म्हणून तत्सम काहीही पेय पाजणारा तो पोया! चालेल ना?’) अशा सर्वांशी थेट जोडलेली एक संदेशवाहिनी तयार होताना दिसत होती. परीक्षिताला वाड्यात जराही अंधार नको होता. पण तिन्हीसांजा होताना वाड्याच्या एकेका खोलीत जाऊन दिव्यांच्या वाती पेटवण्याची त्याला मुळीच इच्छा नव्हती. म्हणून त्याने वाती पेटवणाऱ्या कळा (इथे # अशी खूण होती आणि तिचा खुलासा होता, ‘चोरदरवाजा, वगैरे उघडायला दाबायची कळ असते, तिचं अनेकवचन कळा.’) भिंतींवर डकवल्या होत्या. कळ दाबली की एक चक्र फिरत असे आणि चक्राच्या हालचालीतून दिव्याच्या वातीवर ठिणगी पडेल, अशी व्यवस्था होती. ती करणाऱ्याने परीक्षिताला हमी दिली होती की किमान वर्षभर तरी कळ आणि ठिणगी नीट काम करतील! परीक्षिताच्या मनी एक गोष्ट आली होतीच; की असले शाप कधी लगेच ऑपरेटिव होत नाहीत. ‘एका वर्षात मरशील’ म्हणजे वर्ष पूर्ण होता होता मरणार. शाप दिल्याच्या एका महिन्यात मुळीच मरण ओढवणार नाही. पुराणातल्या कुठल्याच कहाणीत शाप असा ताबडतोब फळलेला नाही. फळलेला नाही म्हणजे, मुदतीचा शाप फळलेला नाही. काही शाप लगेच लागू होतात. उदाहरणार्थ, तू शिळा होशील, म्हणाल्यावर फार वेळ न जाता झाली ती शिळा!

पण तिथेच आणखी एक गोम परीक्षिताला दिसली होती. गोम म्हणजे फट. चिंचोळी मोकळी जागा. त्या जागेतून परीक्षित निसटू शकत होता. त्या चिंचोळ्या जागेचं नाव होतं, उ:शाप! अहल्येला तिचा पती गौतम यानेच उ:शाप दिला होता; पण पुराणात अशीही उदाहरणं होती, जिथे शाप देणारा एक होता आणि उ:शाप देणारा दुसरा.

पण अश्वत्थाम्याने पुराणातल्या परीक्षितावर, म्हणजे तो पुराणातला परीक्षित त्याची आई उत्तरा हिच्या गर्भात असताना त्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. त्यावर उलट उपचार कृष्णाने केला होता. ते एक सोडल्यास दुसरं असलं उदाहरण आपल्या कथेतल्या परीक्षिताला आठवत नव्हतं. आणि आठवणारं ते एकमेव उदाहरण मुळात शाप-उ:शापाचं नव्हतंच! अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्याला उत्तर म्हणून अर्जुनानेही सोडलं. दोन ब्रह्मास्त्रांची जुंपली आणि प्रचंड संहार होणार, अशी चिन्हं दिसू लागली. अशा वेळी दोघे योद्धे आपापलं ब्रह्मास्त्र परत घेतात. पण अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र परत कसं घ्यायचं हे माहीत नव्हतं. अर्जुनाने त्याचं ब्रह्मास्त्र परत घेतलं. अश्वत्थाम्याची घ्यायची वेळ आली तेव्हा परत घेता येत नसल्यामुळे त्याने ते अभिमन्यूची विधवा उत्तरा हिच्या गर्भावर सोडलं. यथावकाश उत्तरा प्रसूत झाली आणि परीक्षित जन्माला आला. पण तो मृतावस्थेत होता. मग त्या बाळाच्या मुडद्याला मांडीवर घेऊन कृष्ण गंभीरपणे काहीबाही बोलला आणि त्याचा शेवट असा होता की ‘जर अमुक अमुक असं असं असेल, तर हे बाळ जिवंत होईल!’

आणि बाळ जिवंत झालं!

म्हणून मग पुढचं घडलं.

हे जेव्हा आपला नायक असलेल्या परीक्षिताने त्याच्या मंत्र्याला सांगितलं, तेव्हा तो सचिव (हे नामकरण त्या सचिवानेच केलं होतं. ‘एकच ते. मंत्रालय म्हणजेच सचिवालय.’ तो म्हणाला होता. त्यानंतर परीक्षित त्याला मंत्री म्हणे; पण तो स्वत:ला सचिव मानत असे.) म्हणाला, ‘पण साहेब, सॉरी; पण राजे, हे उदाहरण कसं चालेल? यात शापच नाही! मग उ:शाप कसा असेल?’

तेव्हा परीक्षिताने त्यालाच हुकूम सोडला, ‘मंत्रीजी, तुम्हाला सहा महिन्यांची मुदत देतो. एकाच्या शापावर दुसऱ्याचा उ:शाप असं उदाहरण शोधून काढा. मग ते घेऊन मी आणखी एखाद्या मुनिवराकडे जाईन आणि उ:शाप मागेन! मुनिवर काय, मिळेल! आणि तो राजी काय, होईल! ते उ:शापाचं बघा.’

हे भलतंच इंटरेस्टिंग होतं. पण एक गोची होती. मेलमध्ये हा म्हणतो, आपल्याला आपल्याच जुन्या गोष्टी माहीत नसतात. महाभारत माहीत नसलेल्याला महाभारतातलं इतकं कसं माहीत झालं? याने कथा लिहिण्यासाठी अभ्यासबिभ्यास केला की काय! तो अस्वस्थ झाला. कथेबिथेत अभ्यासाचं काही आलं की तो अस्वस्थ होत असे. कारण त्याला स्वत:ला अभ्यासाचा विलक्षण तिटकारा होता. या बाबतीत तो आणि त्याचा भाऊ यांच्यातलं नातं चमत्कारिक होतं. वाचताना काही खास आलं, की भाऊ लगेच फोन करून याला सांगत असे. चर्चा करत असे. पण त्यात अभ्यासाचा लवलेश नसे. भावाची बायको त्यामुळे दोघांना ऐकवत असे. ‘एवढा वेळ अभ्यासात घातला, तर हातून काही लिहून होईल! प्रॅक्टिसमध्ये जे सापडतं, त्यावर नोट्स काढल्या तरी एक रिसर्च पेपर तयार होईल. पण तुम्हा दोघांना वायफळ विचार करण्याचीच भारी हौस, लिहायला काही नको!’

तिच्या म्हणण्यात तथ्य असलं, तरी दोघा भावांनी कधीही ते मनावर घेतलं नाही. त्यांचं आपापसात चांगलं सूत होतं. फोनवर चांगला संवाद होता. हा साहित्यातलं त्याला ऐकवत असे तर भाऊ वाचनात, क्लिनिकमध्ये समोर येणाऱ्या इंटरेस्टिंग केसेसबद्दल.

लेखकाने कोणाला तरी कन्सल्ट केलं असावं! त्याला सुटकेचा मार्ग सापडला. अशी नेमकी दिशा पकडून अभ्यास कसा करता येईल? काय शोधायचं, हे माहीत असलं तर ते शोधता येणार. इथे तर अश्वत्थामा, उत्तरा, ब्रह्मास्त्र, असं बरंच काही होतं. हे माहीत होण्यासाठी महाभारत वाचावं लागेल! जे हवं ते कुठे सापडणार, याची कल्पना नसेल, तर आख्खं महाभारत वाचावं लागेल! करेक्ट. त्याने कोणाला तरी विचारलं असणार. आणि ज्याला विचारलं, त्याचा अभ्यास तोकडा असणार. म्हणून त्याला अहल्येच्या गोष्टीला जोडून असलेला पुढचा प्रकार सुचला नाही. इंद्राच्या मनात अहल्या भरली आणि तिचा पती गौतम नसताना तो गौतमाचं रूप घेऊन आश्रमात आला. आणि त्याने अहल्येला भोगली. हे कळल्यावर ‘तूसुद्धा त्यातून सुख मिळवलंस,’ असा अत्यंत गैरलागू आरोप करत गौतमाने अहल्येला शाप दिला की तू शिळा होशील!

पण त्याने अहल्येला भोगणाऱ्या इंद्रालादेखील शाप दिला होता. की तुझ्या शरीराला हजार क्षतं पडतील. म्हणजे भोकं पडतील. ऋषीचा शाप तो. भोकं पडलीच. इंद्र कुरूप झाला. देवांचा राजा विद्रूप दिसू लागला. मग देवांनी गौतमाकडे रदबदली केली आणि इंद्राला उ:शाप मागून घेतला. गौतमाने दिलेला उ:शाप होता, ‘इंद्राला त्याची क्षतं दुसऱ्या कोणाला देता येतील. फक्त स्वेच्छेने घेणारा मिळायला पाहिजे. तसा मिळाला. आला एक पक्षी. मोर! त्याने इंद्राची क्षतं घेतली आणि इंद्र पूर्ववत होऊन मोर विद्रूप झाला. मग इंद्रानेच त्याला एक प्रकारचा उ:शाप दिला की त्याच्या शरीरावरची क्षतं सुंदर दिसतील! त्या क्षतांमुळे तो विद्रूप होण्याऐवजी त्याचं, म्हणजे मोराचं सौंदर्य खुलून उठेल!

तसंच झालं, हे खरं; पण मुळात क्षतांमुळे कुरूपता येणे, हाच मुद्दा होता. मग मोराने इंद्राची क्षतं घेतली, तर मोरही कुरूप व्हायला हवा आणि तसाच राहायला हवा. त्यात बदल करण्याचा, म्हणजे क्षतांना सुंदर करण्याचा अधिकार गौतमाचा होता. इंद्राने ते कसं काय केलं? तसं करताना इंद्राने गौतमाच्या शब्दाला सुपरसीड केलं; नाही का?

आपण लेखकाच्या शैलीत विचार करू लागलो आहोत, हे ध्यानात येऊन तो खजील झाला.

गोष्ट पुढे वाचता आली नाही. सारासारविचार बाजूला ठेवून त्याला घरातून बाहेर पडणं भाग पडलं. मुलीला पीरियड आला होता आणि घरात सॅनिटरी पॅड्स नव्हते.

मुलगी जशी मूडी आणि तऱ्हेवाईक होती, तशीच अत्यंत तरल संवेदनेची होती. म्हणजे, तिच्या मनातलं शरीरात उमटायला वेळ लागत नसे. उलटही खरं होतं. जरा पाय लचकला आणि चालायला त्रास होऊ लागला की तिचा मूड बिघडत असे आणि स्वत:चा मूड बिघडलेला असताना खिदळणारं, सुखी असलेलं जग तिला सहन होत नसे. घरी असली की आईवडिलांचा छळ, बाहेर असली की हॉर्न वाजवणारा टॅक्सी ड्रायव्हर, न संपलेला पाण्याचा ग्लास उचलणारा हॉटेलातला पोऱ्या, सिग्नल तोडणारे पादचारी, सणानिमित्त लाउडस्पीकरवर गाणी लावणारे कोणीही, सगळे तिच्या संतापाचं लक्ष्य होत. भांडण होई. तिला आवरताना त्याच्या आणि बायकोच्या नाकी नऊ येत. उलटही होत असे. मोबाइलवर कोणाशी वादावादी झाली, की तिचा पारा चढत असे. डोकं दुखायला लागत असे. आणखी गंभीर काही असलं, की जेवणावरची वासना उडत असे.

पण असं काही नसलं, की तीच मुलगी घर हसरं ठेवत असे. तिला काहीबाही सुचत असे. त्यात घरच्यांना सामील करून घेतल्याशिवाय चैन पडत नसे. एकूणच ती असल्यावर घर आनंदी, चैतन्यमय होऊन जात असे.

मनातल्याची प्रतिक्रिया शरीरात उमटण्याची सर्वात शेवटची पायरी होती, पीरियड येणे. तिच्या बाबतीत असं होण्याची त्याच्या आठवणीत ही केवळ तिसरी वेळ होती. अगोदरच्या दोन्ही वेळी मुलीच्या आयुष्यात केवढा गंभीर क्रायसिस आला होता, हे त्याला आठवलं. आणि तो आणखी अस्वस्थ झाला. आपली बोटं थरथरू लागली आहेत, हे त्याच्या लक्षात आलं. मुलीने तिची संवेदनशीलता आपल्याकडूनच उचलली आहे, हे त्याला माहीत नव्हतं, अशातली गोष्ट नव्हती; पण आपण हायपरसेन्सिटिव आहोत, हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:वर कडक लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. खोल श्वास घेणे, एका जागी स्वस्थ बसणे, अशा लहान, सोप्या कृती करून मनातली अस्वस्थता काबूत ठेवता येते, हे तो शिकला होता. अस्वस्थ होण्याच्या कारणांना लांब ठेवू लागला होता. मुलगी तरुण होती, असलं काही शिकली नव्हती. त्याने तिला सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला; पण ते शक्य झालं नव्हतं. जेव्हा ती आनंदी असे, तेव्हा ती हे हसण्यावारी नेत असे. आणि जेव्हा तिचा मूड खराब असे, तेव्हा असला काही विषय तिच्यासमोर काढला तरी तिचा पारा भलताच वर जात असे. आताही बायकोने त्याच्या जवळ येत हळूच त्याच्या कानात हे सांगितलं होतं.

बाहेर पडण्याचा हा निर्णय जरी पटला नाही तरी तो घेताना त्याला जड गेलं नाही. गुपचुप कपडे बदलून तो बाहेर पडला.

संध्याकाळची वेळ होती. बारीक झुळुका येत होत्या. अजून गरमी वाढू लागलेली नव्हती. वातावरण प्रसन्न होतं. त्याला उदास वाटत होतं. एका निसर्गरम्य बागेत आपण उंदीर आहोत आणि बिळं करून फुलझाडांची वाट लावत आहोत, अशी एक प्रतिमा त्याच्या मनी तरळून गेली. आपण मोठी पिशवी आणलेली नाही. पॅड्सबरोबर आणखी खरेदी करायची तर ते शक्य नाही, कारण इथल्या सगळ्या वाण्यांनी प्लास्टिक पिशव्या देणं बंद केलं आहे. भाजीवाले देत असलेल्या कागदी पिशव्या भाज्या वेगळ्या ठेवण्यासाठी उपयोगी असल्या तरी पाण्याचा थेंब जरी उडाला, तरी त्या कागदाचा चिखल होऊन सगळे तीन तेरा वाजत, हा त्याचा अनुभव होता. प्लास्टिकमध्ये पॅक केलेलं सोडून इतर काहीही घ्यायचं, तर घरून एक पिशवी बरोबर घ्यायला हवीच. खिशात पिशवी असली की कसं सुरक्षित वाटतं! मग त्या पिशवीचं काम होवो की न होवो. तो तर खरं म्हणजे कधीही, नुसता फिरायला बाहेर पडला, तरी एक लहान घडी होऊन खिशात मावणारी पिशवी बरोबर ठेवत असे. आज ते राहिलं होतं.

राहिलं की आपण करत असलेलं पाप अंडरलाईन करायला आपल्याच मनाने शरीराने आपल्याला धडा शिकवायला घेतला आहे? असं कसं राहिलं?

रस्त्यात फिरणाऱ्यांपैकी काही जण तोंडावर मास्क लावून होते. आपण रुमाल बांधावा का? रुमाल बांधायला कसला रेझिस्टन्स येतो आहे? ऑकवर्ड वाटतंय? घरातून बाहेर पडता आलं! पण तोंडावर रूमाल बांधला, तर काही तरी घडल्यासारखं होईल? लोकांना कळल्यासारखं होईल? फ्रेंच भाषेत एक इम्परफेक्ट टेन्स असतो, त्याचं रूपांतर प्रेझेंट टेन्समध्ये होईल, असं का होतं आहे? हे सभोवती पसरलेलं जग म्हणजे आपल्या मनातल्या बुद्धिबळाचा पट नव्हे! हे सगळे मास्क लावून फिरणारे काही ठाम स्टेटमेंट करताहेत, असंही नाही. मग आपण लावला तर मात्र बुरखा फाटल्यासारखं होईल, असं अपराधी का वाटतंय? इथे किती जणांना माहीत आहे की निरोगी व्यक्तीला तोंडावर मास्क लावण्याची गरज नाही; पण कोरोनाची लागण झालेल्याने मात्र तो लावणे अत्यावश्यक आहे?

कोरोना! हा शब्द मनात उमटला आणि त्याला सुटका झाल्यासारखं वाटलं. द कॅट इज आउट ऑफ द बॅग! आता आपण बॅटमॅनचे जोकर.
मग तो निश्चिंत मनाने केमिस्टकडे गेला आणि पॅड्स घेताना त्याच्याचकडून एक थैली मागून घेतली. एक जण काउंटरवर विचारत होता, ‘मेरी दो बेटियां है. एकको खांसी है और दूसरीको बुखार. तो मैं दोनोंका मिलके एक टेस्ट करवा सकता हूं क्या?” हे ऐकून तो हसलासुद्धा. येताना आठवून घरात काय लागेल, ते ठरवून खरेदी केलं. यात उशीर झाला आणि बायकोची बोलणी खावी लागली, पण त्याचं त्याला काही वाटलं नाही. केमिस्टकडे मिळालेली हँड सॅनिटायजरची बाटली उघडून बेसिनवर ठेवली आणि तिचं उद्घाटनही करून टाकलं.

“हे वापरा आता. बाहेरून आल्यावर आणि घरातल्या घरातसुद्धा. दिवसातून तीन चार वेळा!” दोघींना उद्देशून जोकरच्या मनाने तो मोठ्या आवाजात म्हणाला. बायको दचकेल आणि मुलीला हे बिलकुल आवडणार नाही, याची पर्वा न करता.

बॅक टू कथा.

पुढे परीक्षिताच्या वाड्याचं बरंच सविस्तर वर्णन होतं. काळ जुना, पौराणिक होता आणि वाड्यातल्या सोयी आधुनिक होत्या. लेखकाने हा बॅलन्स चांगला सांभाळला होता. परीक्षिताच्या काळी जे अस्तित्वात नव्हतं, ते वाडा तक्षकापासून सुरक्षित करण्यासाठी म्हणून वाड्यात आणलं होतं. एअर कंडिशनिंग, नळातून येणारं पाणी, बटणं ऑन ऑफ करून पेटणारे आणि विझणारे दिवे, असं सगळं. त्याने तर मोबाईलवरून खाद्यपदार्थ मागवण्याचं ॲपसुद्धा सोडलं नव्हतं! तक्षकापासून सुरक्षित होण्यासाठी परीक्षिताने घराचा किल्ला करून टाकला होता. तक्षक सहा महिने वेढा घालून बसला तरी त्याला आत प्रवेश मिळू नये आणि परीक्षिताला कशाहीसाठी बाहेर पडावं लागू नये!

आता तो फळामधून येणाऱ्या अळीचा तक्षक होण्याचं काय करतो, हे तेवढं बघायचं आहे!

तो लेखकाच्या कल्पनाचातुर्यावर खूष झाला. हे छानच आहे. च्यायला, थोडी रंगरंगोटी केली तर ही कथा सायन्स फिक्शन म्हणूनसुद्धा खपवता येईल! भूतकाळात घडणारी सायन्स फिक्शन! ही कल्पना त्याला आणखीनच आवडली आणि तो त्यात रंगून गेला. कथेला कसं वळण दिलं की नीट सायन्स फिक्शन होईल, हा खेळ मनाशी करत बसला. मनाच्या तिरीमिरीत क्षणभर जोकर होणं सोपं होतं, पण बॅटमॅनमधल्या त्या जोकरचं बेअरिंग धरून ठेवणं त्याच्या कुवतीबाहेरची गोष्ट होती. म्हणूनच त्या विरंगुळ्यात तो रमला. रमण्याला अर्थात मोठं कारण हेच होतं की त्यात रमल्यावर मुलगी आणि कोरोना, हे दोन शब्द एकत्र आणणं लांबणीवर टाकता येत होतं. मात्र घरातल्या तिघांमध्ये शब्दांविना जे नाटक चालू होतं, त्यातला ताण असह्य होईपर्यंतच हा काळ लांबवता येणार होता.

दिवस गेला. तिघांनी घरात बरीच कामं उरकली. मुलीने बॅग उघडून कपडे बाहेर काढले आणि कपाटात व्यवस्थित लावले. तिच्या त्या कामावर बायकोने देखरेख केली. तिला हँगर आणून दिले. दोघींनी रात्रीच्या जेवणाची चर्चा केली. मध्ये दोनेकदा त्या हसल्यादेखील.

त्याने कथा वाचून पूर्ण केली. त्याचा थोडा विरस झाला. आपण भलत्या अपेक्षा वाढवून बसलो आणि त्यात मित्राने सांगितलेला पाण्याच्या सापाचा प्रकार मात्र विसरलो, हे त्याला लागलं. कारण कथेत शेवटी नळातून येणाऱ्या पाण्याचाच लोंढा झाला आणि त्यात तो परीक्षित बुडून मेला. मरताना पाण्याला सापाचं मुंडकं फुटल्याचा भास त्या परीक्षिताला झाला आणि ऋषीची भविष्यवाणी खरी झाली. उ:शापाचं पुढे काय झालं, हे मात्र त्याच्या वाचनातून निसटलं. त्यासाठी कथा पुन्हा वाचावी लागणार होती. ते करण्याचा मात्र त्याला चांगलाच कंटाळा आला.

दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याचा निश्चय झाला होता. त्याने बायको, मुलीला बोलावलं आणि म्हणाला,

“आपण तिघे इथे एकत्र आहोत. एकमेकांना सोबत देत आहोत. घरात गरजेच्या सगळ्या गोष्टी आहेत. कडधान्य आहे. दूध आहे. उद्यापासून अजिबात बाहेर न पडता आपण तिघे सुखाने किमान आठवडाभर राहू शकतो. तर तसं करूया का?”

नंतर झालेल्या चर्चेला तसा अर्थ उरला नाही कारण त्या दिवशीचा कर्फ्यू आणखी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आणि सगळेच आपापल्या घरात अडकून पडले. त्याला वाटलं, सुटलो. सगळं जग बाहेर फिरतं आहे आणि आपण तिघे घरात तोंड लपवून बसलो आहोत, असं झालं असतं; तर? खरंच जगापासून तोंड लपवून फिरण्याची पाळी आली असती तर काय उत्तर दिलं असतं कोणाच्या प्रश्नाला? का बसलाहात घरात कोंडून स्वत:ला? सांगता आलं असतं, मुलीला लागण झाली असण्याची शक्यता आहे आणि उद्या तिच्यामुळे या परिसरात कोरोना पसरला, असं होऊ नये म्हणून आम्ही तिघेही घरात बसलो? आता निघालाच कोरोना घरात, तर तो आला कुठून तरी अपघाताने, असं होईल.

पण नाही निघणार. कोणालाच कसलंच लक्षण दिसत नाही. आपण तिघेही निरोगी, धडधाकट आहोत. मुलगी थोडी स्किझोफ्रेनिक आहे; पण तिचं शरीर एकच आहे. तिच्या आक्रस्ताळ्या व्यक्तिमत्वाला काही होणं कितीही बरोबर असलं तरी तसं होणार नाही. तक्षकाचा नेम चुकलाच! आताच्या लॉकडाउनमध्ये आत शिरण्याची फट राहू न देणे, ही खबरदारी तेवढी घेतली पाहिजे. अळीसुद्धा आत शिरता कामा नये!

त्याने भावाला फोन लावला. लक्षण दिसो वा ना दिसो; भावाकडे मुलीला नेऊन आणायची आणि खुंटा हलवून बळकट करायचा. भावाला काही सांगण्याची गरज नाही. ‘ही बाहेर फिरते, आम्ही तसे घरातच असतो; तर हिची तपासणी कर आणि सांग,’ एवढं भावाला पुरलं असतं. भाऊ म्हणजे कोणी परका नव्हे. त्याने क्लीन चिट दिली की तक्षक हद्दपार! अळीएवढं रूपसुद्धा हद्दपार!

भाऊ म्हणाला,

“कसा रे तू वेळेवर फोन केलास! मी इथे गुदमरतो आहे कोणाला सांगू, कसं सांगू. अरे, माझ्या क्लिनिकच्या शेजारी तो उसाचा रसवाला आहे ना, नागनाथ; तो सकाळी क्लिनिकमध्ये आला. खोकत होता. ताप होता. आणि त्याला श्वास लागला होता. असा श्वास कोणाला लागलेला मी कधी पाहिला नव्हता, ..”

त्याच्या पोटात गोळा आला. भावाचं बोलणं तोडत तो म्हणाला, “अरे, ही सगळी कोरोनाची लक्षणं आहेत! तू काय करतोयस काय!”
भाऊ पुढे बोलतच होता, “मी त्याला ताबडतोब कस्तुरबात न्यायला सांगितलं. तसा त्याला नेला, तिथे अॅडमिट केला, सगळं पार पडलं. पण आता मी काय करू? मला क्लिनिक बंद करायला हवं. मला स्वत:ला तपासून घ्यायला हवं. मी डॉक्टर आहे. मी कसा स्वत:ला फसवू?”

यावर काय बोलायचं त्याला सुचेना. ‘मग केलीस का स्वत:ची तपासणी?” त्याने भावाला विचारलं.

“तू ऐकतो आहेस का नीट? ही आज सकाळची गोष्ट आहे. मी लगेच स्वत:ला बंद करून घेतलंय. मी कुठेच जाणार नाही. माझ्या परिस्थितीत असलेल्या दुसऱ्याला मी काय सल्ला दिला असता? की तुम्ही सस्पेक्ट आहात. आयसोलेट व्हा. क्वारंटाइनमध्ये रहा. कसलंही लक्षण दिसलं तर टेस्ट करून घ्या. तेच करतो आहे. घरातच एका खोलीत बंद आहे. क्लिनिक बंद ठेवतो आहे. लोकांना बरं करता करता माझ्यामुळे त्यांना व्हायचा. नसती बिलामत.”

थोडा वेळ दोघेही गप्प होते. मग भाऊ म्हणाला,

“पेपरात वाचणं वेगळं असतं. चीन आणि इटलीबद्दल वाईट वाटणं वेगळं असतं. हा व्हायरस असा थेट समोर येऊन उभा राहील, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. डॉक्टर असलो तरी माणूस आहे. असा कितीशा लोकांना झालाय रे मुंबईत? मुंबईची लोकसंख्या काय? नेमका माझ्याच समोर का आला?”
याला उत्तर नव्हतं. त्याला एक कळलं, तक्षक यायचा तर अळी होऊन, गुपचुपच येईल असं नाही. या घरापेक्षा मोठा होऊन, आसमंत व्यापत, आकाशाएवढा होत, जगड्व्याळ आकार घेत तो आपल्यालाच अळीइतका करून टाकेल. आणि हजम करेल.

भाऊ! त्याला काय करायचं कळेना. आपल्याला चिकटून मागे कोरोना उभा आहे आणि त्याचा उष्ण श्वास आपल्या मानेवर येतो आहे, असं त्याला वाटू लागलं.

थोडा वेळ फोनकडे बघत राहिल्यावर त्याने नंबर लावला.

“तुझी कथा वाचली. चांगली आहे. लिही तू. पण मला एक सांग. कथेचं नाव ‘एक होता परीक्षित’ असं का? एक होता तक्षक, हे जास्त योग्य ठरेल, असं मला वाटतं.”

“चुकतोस तू. अरे, तक्षक कसा होता? तक्षक तर आहे अजून. परीक्षित होता. आता नाही. संपला. नावात तक्षक आणायचा तर ‘एक आहे तक्षक’ असं नाव करावं लागेल.”

त्याने फोन ठेवून दिला.

---------
हेमंत कर्णिक

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.