मनात रेंगाळत राहणारा कलाप्रवास

cover

सई परांजपे या हरहुन्नरी व मनस्वी कलाकाराने शब्दातून चित्रित केलेले ‘सय - माझा कलाप्रवास’ हे पुस्तक 2016 साली प्रकाशित झालेला असला तरी आजही ते पुस्तक तितकेच वाचनीय व उत्कंठावर्धक आहे. कारण मागील 2-3 पिढ्यांना कलास्वाद म्हणजे नेमके काय काय असू शकते याची प्रचीती देणाऱ्या काही मोजक्या आर्टिस्ट्सपैकी सई परांजपे हे एक नाव, विशेष करून मराठी कलाविश्वात, नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहे. सईची सर्जनशीलता, रसिकता, मनमोकळेपणा, विनोदबुद्धी इत्यादी सर्व गोष्टींची गोळाबेरीज म्हणून हे पुस्तक मराठी वाचकांना स्मृतीरंजनाचा अनोखा आनंद देते.

रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट यासारख्या नवीन तंत्रज्ञानाला आपलेसे करत सर्जनशीलतेची उंची गाठलेल्या लेखिकेच्या बरोबरच्या या कलाप्रवासाला निघाल्यानंतर गेली 60-70 वर्षाचा काळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कलाक्षेत्रातील स्थित्यंतरांची, सादरीकरणातील नावीन्यतेची, तंत्रज्ञानातून कला सादर करण्याच्या परिश्रमांची, वर्णनं वाचत असताना वाचक भूतकाळात जातो व त्याकाळी अनुभवलेल्या कलास्वादाची आठवण ताजी करतो. आयुष्यात घडत असलेल्या प्रसंगांकडे पहात असताना, त्यातील बारकावे समजून घेत प्रेक्षकांच्या रसिकतेला, त्यांच्यातील संवेदनशीलतेला एक वेगळी उंची देण्याचे कार्य सई परांजपेसकट त्या काळातील अनेक कलाकारांनी केले व त्यांचे हे ऋण आपण सहजासहजी विसरू शकत नाही. हे पुस्तक वाचून संपल्यानंतर आपण या प्रसंगांचे साक्षीदार होतो याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

पुणे आकाशवाणीवरील बालोद्यान या कार्यक्रमापासून सुरुवात झालेल्या सई परांजपेच्या या कलाप्रवासात आपण तिने दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांचा, चित्रपटांचा रसास्वाद घेत घेत समारोपापर्यंत केव्हा पोचतो हे लक्षात येत नाही. पुस्तकाची भाषा ओघवती ठेवण्यात व एखाद्या कसलेल्या सिनेएडिटरप्रमाणे पुस्तकातसुद्धा अनावश्यक गोष्टींचा तपशील गाळत एक सुंदर दृश्यात्मक पुस्तक लेखिकेने लिहिले आहे. यासाठी पूर्ण वर्षभर ‘सय’ हे साप्ताहिक सदर लिहिण्यास प्रोत्साहन देणाऱ्या लोकसत्ता या दैनिकाचे व तत्परतेने ते पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून देणाऱ्या राजहंस प्रकाशनाचे कितीही आभार मानले तरी ते कमीच ठरतील.

समारोपात उल्लेख केल्याप्रमाणे "वयाचा एक टप्पा गाठला, की काढता पाय घेण्याआधी आपण होतो याची कुठे तरी सुसूत्र नोंद करून ठेवावी, असं वाटू लागतं. स्वतःच आत्मचरित्र लिहायचं हा एक सर्वमान्य सरधोपट मार्ग आहे. पण या लेखनप्रकाराबद्दल मी नेहमीच साशंक राहिले आहे. प्रांजल आत्मकथा ही हातचं काही राखून ठेवत नाही. आयुष्यातली प्रत्येक नाट्यपूर्ण घटना, गौरव, मानहानीचे प्रसंग, प्रणयगाथा, प्रेमभंग, कलह, ठाऊक असलेली इतरांची लफडी-कुलंगडी – अशा कितीतरी गोष्टी उजेडात आणाव्या लागतात. कोणत्याही आत्मकथेमधला समरप्रसंगाचा वृत्तांत चवीनं वाचताना एक विचार नेहमीच माझ्या मनात डोकावतो – “ही झाली तुमची बाजू. पण विरुद्ध पार्टीच काय?” अर्थात या एकतर्फी कथनातून ते आपल्याला कधीच समजू शकत नाही. म्हणून मला आत्मचरित्र हा लेखनप्रकार हा नेहमी दीड दांडीनं चोरट माप देणारा तराजू वाटतो.” असे जरी लेखिकेला वाटत असले तरी तिच्या आयुष्यातील ‘कलापूर्ण धाडसाच्या प्रयोगा’बद्दल वाचत असताना वाचक पूर्णपणे हरवून जातो, हेही तितकेच खरे.

तिच्या या लेखनात वर्णन केलेल्या आकाशवाणी, बालरंगभूमी, दूरदर्शन, हिंदी आणि मराठी रंगभूमी, चित्रपट- लघुपट-बालचित्रपट- दिग्दर्शन, नाट्यदिग्दर्शन इत्यादी माध्यमामधील तिचा सहज वावर व त्यातील थरारक नाट्य वाचकांना मंत्रमुग्ध केल्यावाचून राहणार नाही. महत्वाचे म्हणजे या 60 – 70 वर्षाच्या कालावधीत तिला अनेक वेळा कटु प्रसंगाना सामोरे जावे लागले. कित्येक व्यक्तींनी कळत न कळत तिला नामोहरम केले. परंतु हा कला प्रवास लिहित असताना या सर्व जणांना तिने माफ केले आहे व मनात कुठलेही किल्मिश न ठेवता प्रांजळपणे सर्व घटनांचा आढावा घेतला आहे, हे जाणवते. सईच्या आयुष्यात अनेक चढ-उतार असूनसुद्धा या कलाप्रवासाचा आलेख सादर करत असताना भावनेच्या भरात काही तरी लिहिले आहे असेही जाणवत नाही. सर्व घटनांकडे तिऱ्हाइत नजरेने पाहण्याच्या तिच्या हतोटीमुळे अपल्यासारखे सर्वसामान्य वाचकही तिच्या दृष्टिकोनातूनच त्या प्रसंगांकडे पाहू लागतो.

तरुणपणी अकस्मातपणे पुणे आकाशवाणीवर निवेदिका म्हणून नोकरीला लागल्यानंतर लहान मुलांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचीसुद्धा जबाबदारी तिने स्वतःहून पत्करली. रविवारच्या बालोद्यान कार्यक्रम म्हणजे नाना (गोपीनाथ तळवलकर), हरबा (नेमीनाथ उपाध्ये) व ताई (खुद्द सई परांजपे) यांची ती जणू मैफलच होती. आपल्यातील अनेकांना त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची वा प्रत्यक्षपणे केंद्रावर जाऊन (मूकपणे) बघण्याची वा रेडिओवर ऐकण्याची आठवण नक्कीच असेल. पुणे आकाशवाणी केंद्राने सईला लहान मुलांसाठी काही नवीन उपक्रम करण्याची संधी दिली व तिने बालनाटिका लिहून व/वा दिग्दर्शित करून बालरंगभूमी समृद्ध केली.

सईच्या सर्जनशीलतेला दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतर चांगल्यापैकी वाव मिळाला. हिंदी – इंग्रजी नाटकात सहभाग घेतल्यामुळे तिला तिच्या पुढील आयुष्यात या अनुभवाचा चांगला फायदा झाला. या संस्थेचे प्रमुख, अब्राहम अल्काझी हे नाव दिल्लीच्या कलाविश्वात फार मोठ्या आदराने घेतले जात होते. सईच्या शब्दातच सांगायचे तर ‘अल्काझी एक चैतन्यमूर्ती’ होते. एकापाठोपाठ एक अशा इंग्रजीतील विस्मयकारक नाट्यनिर्मिती सादर करून त्यांनी त्याकाळच्या कलावंताना घडवले. शेक्सपियर, इब्सेन, चेकॉव्ह, आयनेस्को अशा महान नाटककारांच्या श्रेष्ठ नाट्यकृतीमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे वाव देत दिल्लीकरासमोर त्या नाट्यकृतींना सादर करून त्यांच्या कडून वाहव्वा मिळवत होते. प्रेक्षकासमोर विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रयोग सादर करण्याचा नवीन पायंडा त्यांनी पाडला.

राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचा कोर्स पूर्ण करून परत पुण्याला आल्यानंतर येथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना अभिनय तंत्रज्ञान व प्रात्यक्षिके आणि आवाज व शब्दोच्चारण शिकवण्यासाठी तिला बोलावण्यात आले. अनेक होनहार विद्यार्थ्यांना या विषयावर तयार करून तिने हिंदी चित्रपट सृष्टीसाठी काही उत्तम कलाकारांना घडवले. तेथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील मास्टरपीस असे गणले गेलेले चित्रपटांचा अभ्यास करण्याची व तेथील समृद्ध वाचनालयातील चित्रपटाविषयीची पुस्तक वाचण्याची अपूर्व संधी तिला मिळाली. त्या संधीचे तिने सोने केले. चित्रपटाविषयीचा अनुभव व पुस्तकी ज्ञान व तेथील वातावरण यातून बाहेर पडताना चित्रपट क्षेत्रात आपणही काही तरी करावे ही अदम्य इच्छा ती बाळगून होती. काही वर्षानंतर तीन उनाड मित्रांची व ‘चमको’ विक्रेती दीप्ती नवल यांच्यातील खेळकर ‘चष्मेबद्दूर’, अस्सल हलके फुलके भोळ्या खुळ्या चाळीतील मराठी कुटुंबावरील हिंदी चित्रपट ‘कथा’, अंध व्यक्तीचे आयुष्य उलगडून सांगणारा ‘स्पर्श’, चिपको चळवळीचा ‘पपीहा’, बारा वर्षे हाताने विहिर खोदणाऱ्या सोमावरील ‘दिशा’, संगीत क्षेत्रातील बाजारू स्पर्धेच्या भोवती चित्रित झालेला ‘साज’ इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपट निर्मितीबद्दलच्या कथा मुळातूनच वाचायला हवेत. तिच्या कित्येक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पारितोषकं मिळाली. व तिच्यातील कलागुणांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या मधल्या काळात सईने दूरदर्शन व चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यासारख्या सरकारी संस्थांच्या चौकटीत राहूनसुद्धा आपला ठसा उमटवला. याच कालखंडात तिने पॅरिस व लंडनमध्ये राहून त्या देशातील कलाप्रकारांचा अभ्यास केला. त्या देशातील कलेबद्दलची आस्था व प्रेम याचा वेगळा अनुभव तिला आला.

मुळात कुठल्या ना कुठल्या गोष्टीत स्वतःला अडकवून घेण्याशिवाय चैन न पडण्याच्या सवयीमुळे या बहुआयामी व्यक्तित्वाने नाट्यक्षेत्रात काहीतरी करून दाखवावे म्हणून उडी घेतली. त्यकाळात तिने काही उत्कृष्ट नाटकं दिग्दर्शित करून यशस्वी करूनही दाखवले. तिच्याच ‘नाट्यद्वयी’ संस्थेतर्फे हिंदी व मराठी नाटकं ती सादर करू लागली. नाटक अगदी वेगळ्या प्रकारे उभे करण्याचा तिचा मानस होता. ‘नाटकाच्या अंग-प्रत्यंगातून वेगळी अनुभूती जाणवली पाहिजे. मराठी रंगभूमीवर सांघिक रचना, हालचाली, पात्रांची देवाणघेवाण, नेपथ्याचा नेमका वापर, पोशाखाची रंगसंगती, इ. गोष्टीकडे फारसं लक्ष पुरवल जातं नाही. आपलं नाटक दृश्य झालं पाहिजे.’ या अट्टाहासापायी तिने घेतलेले कष्ट, केलेल्या उचापती, (व काही वेळा तडजोड!) इत्यादी गोष्टी तिच्या रिव्ह्यू टाइप नाटकांच्या सादरीकरणातून दिसून येत होत्या. ‘नांदा सौख्य भरे’, हे त्याच मुशीतून तयार झालेले नाटक होते व ते भरपूर गाजले. मराठी ‘अंमलदार’चा हिंदीतील ‘जी हुजूर’ हे नाटक तिच्याच संस्थेतर्फे सादर केलेले नाटकही हिंदी भाषिकात भरपूर प्रसिद्धी मिळवू शकली. मराठीतील काही गाजलेल्या नाटकांचे हिंदीत रूपांतर करून उत्तर भारतातील हिंदी प्रेक्षकासमोर यशस्वीरित्या सादर करून तिने वाहव्वा मिळवले. हिंदीत मराठी टाइप तमाशा, ‘एक तमाशा अच्छा खासा’, हा प्रयोग सादर करून सईने सर्व नाट्यरसिकांना सुखद धक्का दिला. जास्वंदी, बिकट वाट वहिवाट, सख्खे शेजारी, सोयरीक, माझा खेळ मांडू दे इत्यादी नाटकाबद्दलचे सईचे अनुभव मुळातूनच वाचायला हवे.

सई परांजपेचा असा हा दीर्घकाळ मनात रेंगाळत राहणारा कलाप्रवास या पुस्तकाचे कुठलेही पान उघडून वाचायला सुरुवात केल्यास दरवेळी नवीन काही तरी वाचत आहोत असे वाटू लागते. इतरांच्या आत्मचरित्रातील तारीख, भेटी दिलेली ठिकाणं वा आवडलेल्या (वा न आवडलेल्या!) माणसांच्या बद्दलच्या आठवणींची यादी व त्याचे वर्णन वाचण्यापेक्षा हा कलाप्रवास नक्की वाचकांना भावेल.
(मागच्या महिन्यात महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकास्थित संस्थेने सई परांजपे यांच्या ‘सय’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार देवून गौरव केला. )

सय - माझा कलाप्रवास
लेः सई परांजपे,
राजहंस प्रकाशन, पुणे,
किंमत 300 रु, पा. 358

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे पुस्तक लोकसत्तेच्या सदराचंच एकत्रीकरण आहे की आणखीही काही आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुस्तकाच्या समारोपात उल्लेख केल्याप्रमाणे लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात लोकरंग या पुरवणीमधील 'सय' या लेखमालेला कल्पनेबाहेर जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे राजहंससारख्या अनेक प्रकाशकांनी 'सय' हे पुस्तक छापण्याबद्दल तिच्याकडे विचारणा केली. त्यातून तिने राजहंसला संमती दिली.

तिच्या मते सदर लिहित असताना काही महत्वाचे उल्लेख राहून गेले होते. राजहंस प्रकाशनाने तुटलेला धागा पुन्हा जोडून उरलेला मजकूर शब्दांकित करावा असे सांगितल्यामुळे सई लिहित गेली व तो मजकूर 400 पानापेक्षा भरपूर जास्त झाला. तेव्हा तिने लेखनास ब्रेक लावले. व मजकूर संपादित होऊन पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित झाले. याशिवाय पुस्तकात भरपूर प्रमाणात रंगीत छायाचित्रं जोडल्यामुळे लोकसत्तेतील सदरापेक्षा पुस्तक फारच वेगळे आहे असे म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्ती काही असलं तरी ते सदर अजिबात उत्कंठावर्धक नव्हतं. पूर्ण वाचावंसंही वाटायचं नाही. प्रभावळकरांच्या त्या आत्मचरित्रासारखंच वाटतं. मीमीमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

वाचलं आहे. आवडलं होतं आत्मचरित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

++आयुष्यातली प्रत्येक नाट्यपूर्ण घटना, गौरव, मानहानीचे प्रसंग, प्रणयगाथा, प्रेमभंग, कलह, ठाऊक असलेली इतरांची लफडी-कुलंगडी – अशा कितीतरी गोष्टी उजेडात आणाव्या लागतात.++
सई यांनी हे वाक्य फार प्रामाणिकपणे लिहिलंय ( संदर्भ : दिल्लीतल्या त्यांच्या शेजारी काही काळ राहणाऱ्या एका जुन्या मित्राने एकच वाक्य सांगितलं होतं त्यावरून ... )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

++आयुष्यातली प्रत्येक नाट्यपूर्ण घटना, गौरव, मानहानीचे प्रसंग, प्रणयगाथा, प्रेमभंग, कलह, ठाऊक असलेली इतरांची लफडी-कुलंगडी – अशा कितीतरी गोष्टी उजेडात आणाव्या लागतात.++

लोकांना आत्मचरित्र का लिहावेसे वाटते, कळत नाही. I mean, why do people feel that they owe the world an explanation?

(भल्याभल्यांनाही हे सुटले नाही. And that includes Mahatma Gandhi.)

( संदर्भ : दिल्लीतल्या त्यांच्या शेजारी काही काळ राहणाऱ्या एका जुन्या मित्राने एकच वाक्य सांगितलं होतं त्यावरून ... )

?

ही काय भानगड आहे ब्वॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सई परांजपे स्वतः ला कलावंत म्हणवून घेतात यातच कला धन्य झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला