यवन असलेला काफ़िर - हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत

संकल्पना

यवन असलेला काफ़िर -
हमीद दलवाईंची दिलीप चित्रेंनी घेतलेली मुलाखत

- ऐसीअक्षरे

एका मराठी साहित्यविषयक नियतकालिकाच्या भरलेल्या आणि कोंदट कार्यालयात दिलीप चित्र्यांनी हमीद दलवाईंची मुलाखत घेतली आणि त्याबद्दल एक लेख लिहिला, ‘एक तरुण आणि संतप्त सेक्युलर’. दलवाईंची कथा ‘कफनचोर’ नुकतीच प्रकाशित झाली होती आणि तिचं स्वागत "या यवन" असं झालं होतं. यवन म्हणजे फार आगापिछा नसणारा बाहेरचा; हा शब्द मुळात ग्रीकांसाठी वापरला गेला, पण हिंदूंच्या उत्थानानंतर मराठीत हा शब्द मुसलमानांसाठी म्हणून राखीव ठेवला गेला.

चित्र्यांच्या मते, दलवाईंनी स्वतःला धोक्याच्या तरीही निकडीच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्यात झोकून दिलेलं होतं. आधुनिक, सेक्युलर आणि लोकशाही तत्त्व मानणारं भारतीय-मुस्लिम मन तयार करण्याचा कार्यक्रम त्यांनी एकहाती चालवला होता. ते फक्त हिंदूंसाठी ‘यवन’ होते असं नव्हे, तर सनातनी मुस्लिमांच्या दृष्टीकोनात ‘काफ़िर’ ठरण्याचा पराक्रमही त्यांनी केला होता.

मुलाखतीचा काही भाग -
चित्रे - तुम्ही राजकारणात खूपच लवकर आलात, नाही का?
दलवाई - हो. काँग्रेेस सोशलिस्ट पक्ष - समाजवादी पक्ष - प्रजा समाजवादी पक्ष - (लोहियावादी गट) समाजवादी पक्ष - संयुक्त समाजवादी, असा माझा प्रवास झाला.

चित्रे - तुम्ही अजूनही संयुक्त समाजवादी पक्षात आहात?
दलवाई - होय आणि नाही. त्यांच्या धर्माग्रहाला माझा अजिबात पाठिंबा नाही. खरं तर, ही मोठी दरीच आहे. पण मुद्दा असा आहे, संयुक्त समाजवादी पक्षाचे लोक मुस्लिम धर्मांधतेला विरोध करण्यात सपशेल नापास झाले आहेत.

चित्रे - इतर कोणता पक्ष हे काम करतोय, असं तुम्हाला दिसतंय का?
दलवाई - नाही! खरा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी हे सगळे अनुत्सुक आहेत; हे समस्येचं मूळ आहे.

चित्रे - या कामात कसली गरज आहे असं तुम्हाला वाटतं?
दलवाई - सर्वप्रथम, मूलभूत मानवी मूल्यं अशी काही चीज आहे, याची लोकांना जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि ही मूल्यं धर्मापासून निराळी काढली पाहिजेत. मुस्लिम ही गोष्ट कधीही मान्य करणार नाहीत कारण कुराणातली मानवी मूल्यंच सर्वांत मूलभूत असल्याचा दावा आहे.

इथे चित्रे लिहितात, “हमीद थांबला, त्यानं डोळा मारला आणि मग पुढे म्हणाला…
"या बाबतीत ते कम्युनिस्टांसारखेच सनातनी आणि आधुनिकतेचे विरोधक आहेत. ही त्यांची हवाबंद व्यवस्था आहे."

चित्रे - भारतीय मुस्लिमांध्ये उदारमतवादाची परंपरा नाही का?
दलवाई - (हसत) भारतीय मुस्लिमांमध्ये प्रघात असा की धर्मांधळ्या हिंदूंना इतर हिंदू नावं ठेवतात तेव्हाच मुस्लिम उदारमतवाद दाखवतात. सर सय्यद अहमद खान उदारमतवादी होते. आज त्यांची गणती हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. प्रा. महम्मद हबीब, उपराष्ट्रपतीपदाच्या गेल्या निवडणुकांमधले उमेदवार, एम. सी. छागला उदारमतवादी आहेत, उस्मानिया विद्यापीठातले डॉ. राशिदुद्दीन खान हे आणखी एक उदारमतवादी मला माहीत आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे, इथल्या हिंदूंमध्ये, अगदी राजा राममोहन रॉय यांच्यापासून उदारमतवादी परंपरा आहे. नेहरू, माझ्या आकलनानुसार, आधुनिक, सेक्युलर भारतीय उदारमतवादी होते. पण त्यांच्या मागे परंपरा होती. याला कोणतीही समांतर परंपरा भारतीय मुस्लिमांकडे नाही.

चित्रे - का?
दलवाई - हं … याचं सगळं मूळ त्यांच्या इतिहासात आहे. मुसलमान ८०० वर्षं भारतातले राज्यकर्ते होते. आणि तरीही ते नेहमीच अल्पसंख्य राहिले. त्यांना या गोष्टीचा मनापासून तिटकारा आहे. तुम्हाला असं दिसेल की मुसलमान जेव्हा अल्पसंख्य असतात तेव्हा कायमच सेक्युलर समाजापासून वेगळे, आपलाच गट बनवून राहतात. भारतात हे चित्र आणखी वाईट आहे. उलेमा अजूनही भारतीय उपखंडाला ‘दार-उल-इस्लाम’ बनवण्याची स्वप्न बघतात. त्यांचा भारताच्या फाळणीला विरोध यासाठी होता, त्यांना भारताच्या सेक्यूलर एकात्मिक राष्ट्रीयतेला पाठिंबा वगैरे काही नव्हतं. भारतीय उपखंडात मुसलमान कायमच अल्पसंख्य असतील हे ज्यांनी मान्य केलं त्यांनी पाकिस्तानची मागणी केली आणि त्यांना पाकिस्तान मिळाला. अजूनही कर्ताधर्ता असण्याची स्वप्नरंजनं करत राहणारे लोक आहेत; हा रोग म्हणावा लागेल. हे जे उलेमा काँग्रेसच्या बाजूनं फाळणीचा विरोध करत होते, ते आता फाळणीनंतर मुसलमानांची स्वतंत्र अस्मिता बनवण्याच्या प्रयत्नात आहेत - भारतात राहूनच मुसलमानेतर समाजापासून फटकून राहणारा समाज बनवणं. मानसिकदृष्ट्या ते अजूनही मध्ययुगात आहेत. त्यांना हे समजत नाही की ते 'आधुनिक जगा'त योग्य ठरत नाहीत.

चित्रे - भारतीय मुसलमान तुमच्यासारख्या 'मुसलमानां'बद्दल काय म्हणतात?
दलवाई - हं, त्यांच्यापैकी बहुतेकांना मी 'काफ़िर', म्हणजे धर्मबुडवा वाटतो.

चित्रे - मग तुमचा त्यांच्यावर प्रभाव पडेल अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगता?
दलवाई - मला आशा आहे. उदाहरणार्थ, भारतातल्या मुसलमान मुली आणि स्त्रियांना मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातल्या असमानतेबद्दल जाणीव आहे. पण हे काम कठीण आहे, म्हणजे सेक्यूलर एकात्मतेचं काम कठीण आहे. धर्मांधळेपणा हद्दपार करण्याचं काम करायची तयारी भारतातला कोणताही राजकीय पक्ष दाखवत नाही. ते मुसलमानांचं तुष्टीकरण करतात. माझा स्वतःचाच पक्षही - संयुक्त समाजवादी पक्ष - अजिबात अपवाद नाही. राजकीय पक्षांपलीकडे एखादं संघटन असावं आणि त्यांनी या प्रश्नाची तड लावण्याचं काम करावं. आम्ही त्या दृष्टीनं एक छोटी सुरुवात केली आहे - भारतीय सेक्युलर फोरम.

सध्या मला सर्वाधिक त्रास होतो तो या गोष्टीचा की कोणताही राजकीय पक्षाला हा प्रश्न सोडवण्यात रस नाही. राष्ट्रीय इंटिग्रेशन कन्व्हेंशन हा विनोद होता. लोक आपापलं घिसंपिटंच काय ते उगाळत होते. कोणीही प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही.

चित्रे - हिंदू उदारमतवाद्यांबद्दल तुम्ही काय म्हणाल?
दलवाई - हिंदुत्ववादी त्यांचाही घास गिळतील आणि गंमतीची गोष्ट अशी की यात कडव्या मुसलमान धर्माचं पुनरुज्जीवन करू पाहणारे त्यांना (स्वतःच्या नकळत) साथ देतील. जर सेक्युलर लोकशाही मूल्यं टिकवून ठेवायची असतील तर संपूर्ण देशानंच राजकीय पक्ष आणि राजकीय बांधिलकी सोडून एकत्र काम करण्याची गरज आहे. हातपाय गाळून फक्त तमाशा बघू नये. या खेळाचे आपण नियम बदलले पाहिजेत.

-- वाचकांना एक आठवण करून देणं गरजेचं आहे की ही मुलाखत १९७०च्या दशकातली आहे. हमीद दलवाईंची निरीक्षणं आणि दिलीप चित्र्यांसमोर केलेलं विवेचन आजही, २०१७मध्येही भारतीय उपखंडाला लागू पडतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय बोलावं ! द्रष्टा माणूस होता हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0