गोलागमध्ये गोडबोले - एक । जनमताचे दूध काढणे

ललित

गोलागमध्ये गोडबोले

- आदूबाळ

सेन्सॉर सर्टीफिकेट

एक । जनमताचे दूध काढणे

पडदा उघडतो. धूसर प्रकाशात खालील चित्र दिसतं.

स्टेज डूडल

(खाली, रंगमंचाच्या पातळीवर काही सपाट करडे मुखवटे घातलेल्या लोकांच्या हालचाली सुरू आहेत. एकमेकांशी बोलताना, वाद घालताना, भांडताना ते दिसताहेत, पण आवाज ऐकू येत नाही. या सोंगट्या.

वर ठोकळ्यांवर लेखकाची (डावी) बाजू मोकळी आहे. उजव्या ठोकळ्यावर गोडबोले अस्वस्थपणे फेऱ्या घालताहेत. इकडेतिकडे बघताहेत. अचानक त्यांना खाली सोंगट्या दिसतात. त्यांना ते हाक मारताहेत, त्यांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करताहेत. पण सोंगट्या काही त्यांच्याकडे बघत नाहीयेत. किंबहुना वर दोन ठोकळे आहेत, आणि त्यावरून कोणी आपल्याशी बोलतं आहे याचंच भान त्यांना नाही.

गोडबोले हताशपणे ठोकळ्यावरच्या खुर्चीत जाऊन बसतात. तिकडे सोंगट्यांचे आवाज हळुहळू वाढत जातात…)

मिशीवाली सोंगटी : (या सोंगटीच्या मुखवट्यावर भरदार मिश्या रंगवल्या आहेत) उद्योजिका म्हणून प्रसिद्धी मिळवणं हल्ली लय सोपं असतं रे. भातुकलीच्या भांड्याकुंड्यांचा, नाहीतर कचऱ्यापासून खत बनवायचा, नाहीतर कागदी पिशव्यांचा झ्याटभर धंदा करायचा. फेसबुकवर गाव नाचवायचं. कोणत्यातरी मासिकवाल्याला पकडून मुलाखत छापवून घ्यायची. निवड समितीला क्लिव्हेज दाखवायचं, एखादा पुरस्कार मिळवायचा. चिंधुकनंदन बंधाजी यंदे स्मृती उद्योजिका पुरस्कार. मग ती लाकडी बाहुली दिवाणखान्यात ठेवायची आणि आत जायचं नवऱ्याची शेज गरम करायला...

(टिंग, टिंग असे फेसबुकच्या लाईक्सचे आवाज यायला लागतात. ठोकळ्यावरच्या स्क्रीनवर लाईक्सचे उभे आंगठे नाचायला लागतात. आसपासच्या काही सोंगट्या "तूच रे भावा", “मस्त तोडलंय”, “एकदा ऐकवायलाच पाहिजे होतं कोणीतरी” वगैरे म्हणतात. एक उंच किनरा स्त्रीच्या आवाज “हे अपमानास्पद आहे! तुमच्यासारख्या स्वत:ला साहित्यिक म्हणवणाऱ्याकडून ही अपेक्षा…” असं काहीसं म्हणतो. हळुहळू तो कोलाहल शांत होत जातो.

(वेगळाच आवाज यायला लागतो.)

गंधवाली सोंगटी : (या सोंगटीच्या कपाळावर ठळकसं लाल गंध आहे) आपल्या वेदकालीन ऋषींचं गणित काळापेक्षा खूप प्रगत होतं. नासाच्या सुपरकॉम्प्युटरला करायला आठवडा लागतो ती गणितं ते आपल्या डोक्यात एका क्षणात करत. सगळं वेदांमध्ये लिहून ठेवलं आहे. एक पुस्तकही आहे - लेखक आहेत स्वामी...

(लाईक्सचे टिंग टिंग आवाज. रीट्विटचा आवाज. आंगठे नाचतात.)

खवचट सोंगटी : आयला काय सांगतांय काय! माहीतच नव्हतं ब्वॉ मला! पण काय हो, कुठल्या वेदांत आणि नक्की कुठे लिहिलांय जरा सांगा ना गडे...

पुस्तकवाली सोंगटी : (या सोंगटीच्या काखोटीला एक जाडं पुस्तक आहे) अरे असलं काहीही वेदांबिदांत नाही लिहिलं. ते वैदिक गणित म्हणतात ते पाचवीसहावीच्या लेव्हलचं...

(चिडका कोलाहल. “तुमच्यासारखे सुशिक्षित म्हणवणारे लोक…”, “...मेकॉलेचे कुत्रे साले…”, “गोऱ्यांची चाटण्यातच…” वगैरे शब्द ऐकू येतात.)

(ठोकळ्याच्या रेलिंगवर ओठंगून गोडबोले या सगळ्याकडे बघण्यात गढून गेले आहेत. इतके गर्क झाले आहेत की शेजारच्या ठोकळ्यावर लेखक आल्याचं त्यांच्या लक्षातही येत नाही. लेखकही त्यांना साद घालत नाही, नुसता सस्मितपणे बघत राहतो. शेवटी आपल्याकडे कोणाचं तरी लक्ष असल्याचं गोडबोल्यांना जाणवतं आणि ते वर बघतात. खालच्या सोंगट्यांचा आवाजी कोलाहल शांत होत जातो. हालचाली मात्र चालूच राहतात.)

गोडबोले : आं! तुम्ही कोण? कधी आलात? हे काय आहे सगळं? (हवेत हात हलवतात) हॅलो! हॅलो! ऐकू येतंय का मी काय बोलतोय? हॅलो? (स्वगत) च्यायला ह्यालाही ऐकू जात नाहीये वाटतं...

लेखक : मला ऐकू येतंय सगळं. नमस्कार, गोडबोले!

(गोडबोले चपापतो. मुखस्तंभ होऊन बघत राहतो. लेखक गालातल्या गालात हसतो आहे.)

गोडबोले : (संशयाने) न..नमस्कार. तुम्हाला माझं नाव कसं माहीत?

लेखक : गोडबोले, तुम्ही फॅमिलीतले थोर नेते. आप को कौन नहीं जानता? (उपरोधाने) शिवाय नाटक माझं. लिहितोय मी. तुम्ही त्यातलं पात्र. मला नाव माहीत नसेल का?

गोडबोले : मी समजलो नाही.

लेखक : द्या सोडून मग.

गोडबोले : नाही, ते असू दे. “मी इथे कसा आलो?” हा प्रश्न पडलाय मला.

लेखक : तुम्हाला नेमका कोणता प्रश्न पडलाय? “मी इथे कसा आलो” हा, की “मी इथे कसा आलो” हा की “मीच इथे कसा आलो” हा? शिवाय आणखी एक प्रश्न आहे - तुम्ही इथून कुठे जाणार. या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे सगळं नाटक आहे, गोडबोले, त्यामुळे विचार करून प्रश्न विचारा.

गोडबोले : अरे काय खेळ लावलाय! तुम्ही कोण आहात? तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कोण उत्तरं देणारे?

लेखक : ओके - असं खेळायचंय का. बाऽऽरं. (पॉज घेऊन) माझं नाव -

(टूंऽऽ असा तीव्र आवाज येतो. एक लाल झोत रंगमंचावर चमकून जातो. (दर वेळेला टूंऽऽ हा आवाज आल्यावर लाल झोत चमकतो.) गोडबोले चपापतात.)

गोडबोले : हे काय होतं? तुमचं नाव काय म्हणालात?

लेखक : ते सेन्सॉर झालं. त्याचा आवाज होता. बरं, तसं खेळायचंय तर तसं. (क्षणभर विचार करून) असं करा, गोडबोले, तुम्ही मला ‘लेखक’ म्हणा. नाहीतर 'इतिहासकार' म्हणा. पण मला नाही आवडत - इतिहासकार. चर्मकार म्हणजे चामड्याच्या वस्तू बनवणारा. सुवर्णकार म्हणजे सोन्याच्या वस्तू बनवणारा. मालाकार चिपळूणकरांनी निबंधमाला लिहिली आणि भालाकार भोपटकरांनी ‘भाला’ नावाचं वर्तमानपत्र चालवलं. तसं इतिहासकाराने इतिहास घडवायला पाहिजे खरं तर, पण...

गोडबोले : (मध्येच तोडत) अहो काय बडबडताय… तुमच्या नावाशी मला काही देणंघेणं नाही. लेखक तर लेखक. पण माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ना.

लेखक : हो! तर सांगा गोडबोले - इथे तुम्ही जागे झालात. त्यापूर्वी तुमची शेवटची स्मृती काय होती?

गोडबोले : (आठवणीला ताण देत) मी लखनौला रेल्वेत बसलो, पाटण्याला जायचं होतं. एकटाच होतो. आमचे कार्यकर्ते निरोप द्यायला आले होते स्टेशनवर. हारबीर घातला. नेहेमी तसा मी सेकंड क्लासने जातो, शेवटी मी कार्यकर्ता माणूस हो. पण त्या दिवशी कोणीतरी टू-एसीचं तिकीट काढलं होतं. मी बसलो, वाचत, लिहीत, पुढचा दौरा आखत. थोड्या वेळाने चहाची तलफ आली, पण रात्र झाली होती, कोणी चहावाला येईना. पण इतक्यात वेग मंदावला. पाहतो तर मुगलसराई स्टेशन आलं होतं. म्हटलं इथे चहा मिळेल. पाच रुपये काढले खिशातून, आणि उतरलो…

लेखक : आणि?

गोडबोले : आणि काही नाही. पुढचं काहीच आठवत नाही.

लेखक : अस्सं! मुगलसराई स्टेशन काय! काहो - हल्ली पाच रुपयांत चहा मिळतो? रिमिक्स करताय तुम्ही गोड-

(टर्रर्रर्र असा मोठा आवाज येतो. रंगमंच लालसर प्रकाशात न्हाऊन निघतो. एक आवाज बोलायला लागतो. कुठून ते काळात नाही. पण लेखक वरच्या बाजूला बघतो. त्याच्या दृष्टीने तो आवाज आकाशातून येत असावा.)

आवाज : लेखक!

लेखक : सॉरी सॉरी ! तेवढं कट करा नंतर, काय?

आवाज : जरा जपून. (लाल प्रकाश जातो.)

लेखक : हं... (गोडबोलेला उद्देशून) आणि लखनौमध्ये काय करत होतात तुम्ही?

गोडबोले : (एकदम प्रफुल्लित होऊन, सभेत भाषण दिल्याच्या आवेशात) ब्याण्णव साली एक स्वप्न पाहिलं होतं. लाखो-करोडो लोकांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची आम्ही हिंमत दाखवली आणि नव्या युगाची पायाभरणी केली. शेकडो वर्षांपासून आमच्यावर, आमच्या दैवतांवर झालेला अन्याय आम्ही मिटवायला सुरुवात केली. परकीय आक्रमकांपासून त्या मर्यादापुरुषोत्तमाची सुटका होण्यासाठी तो शतकानुशतकं वाट बघत होता. शेवटी तो दिवस उजाडला.

आरम्भ है प्रचंड । बोले मस्तकों के झुंड ।
आज ज़ंग की घडी की तुम गुहार दो ॥

आन बान शान । याकि जान का हो दान ।
आज एक धनुष के बाण पे उतार दो ॥

(सोंगट्या ‘ठाक ठाक’ असा सैनिकी ताल देतात)

(पण खालचे आवाज वाढताहेत. दोघांचंही लक्ष तिथे वेधलं जातं.)

टोपीवाली सोंगटी : मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, भाई, पण फोटोत तुमच्या बायकोचा चेहरा उघडा आहे, आणि नखांना नेलपेंट… (इतर सोंगट्यांच्या कोलाहलात तो आवाज लुप्त होतो.)

लेखक : पेटलं रे पेटलं! थांबा हां जरा, गोडबोले. ड्युटी कॉल्स.

(घाईघाईने टेबलाशी जाऊन लॅपटॉप उघडतो, आणि टाईप करायला लागतो. इकडे गोडबोले खालच्या घटना पाहतो आहे.)

स्त्रीसोंगटी : (मघांच्याच उंच किनऱ्या आवाजात) हे अनैसर्गिक, घृणास्पद आहे. कोणते प्राणीही असे वागत नाहीत. असं वागणारी माणसं म्हणजे मानवजातीला असलेला विकृत कलंक आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या अभिव्यक्तीचा हक्क आहे. त्यात धर्माचा, जातीचा, संबंध नाही. घोटुलमधल्या आदिवासी स्त्रिया पाहिल्यात, तर -

वेगळीच सोंगटी : ए… जातीवर जायचं नाय हां! तुझ्या जातीतल्या बायका फिरत असतील अशा -

मिशीवाली सोंगटी : शांत हो, भावा. बाईच ती, तिला अक्कल किती असणार?

(गोडबोले अवाक होऊन याकडे पाहतो आहे.)

लेखक : (काम करता करता, लॅपटॉपमधून डोकं न काढता) च्यायला चांगली धर्माची लाईन धरली होती, मध्येच हे स्त्रीबी कुठून आलं? तुम्हाला सांगतो गोडबोले, एक लाईन धरली की एकावरच राहायचं. घोडा तरी बोलायचं किंवा चतुर तरी बोलायचं.

(खाली गडबड चालू आहेच. अस्फुट वाक्यं ऐकू येतात.)

लेखक : से-न्ड-झा-लं! (वर बघतो तर गोडबोले त्याच्याकडेच बघतो आहे.) सॉरी हां गोडबोले. या आठवड्याची पाटी टाकून झाली. काये – आठवड्याला टार्गेट असतं मला, नाहीतर (डोळे वरच्या बाजूला फिरवत) ‘ते’ कावतात. आता आठवडाभर बघायला नको मला. इतिहास डिपार्टमेंटचा सगळा कारभार एकहाती पाहतो हो मी. सायन्स डिपार्टमेंटात चांगले पाचसहा लोक आहेत. एक : कॉम्प्युटरवाले. एक : रसायनवाले. एक : अवकाशवाले. आणखी असे कोणकोण. मी इथे एकटाच. तसे (डोळे वरच्या बाजूला फिरवत) ‘ते’ म्हणत होते, की संस्कृती डिपार्टमेंट इतिहासातच घ्या म्हणून, पण मी साफ नाही म्हटलं – संस्कृतीचं आपलं सारखं काही ना काही असतंच. आला व्हॅलेंटाईन्स डे – बुडाली संस्कृती बॉ बॉ बॉ. आली नागपंचमी, तरंगली संस्कृती वॉ वॉ वॉ. गणपती आणि दिवाळीचं तर विचारूच नका. आपलं इतिहासाचं बरं – आठवड्याला एक जिलबी टाकायची. तसे जयंत्यामयंत्या, दिनफिन असतात, पण नव्या सोऱ्यात जुनंच सारण भरायचं आणि... (जिलबी सोडायचा अभिनय करतो.) आता मजा बघा...

गंधवाली सोंगटी : हा लेख वाचलात का? मस्त लिहिलंय. लेखक म्हणतो या टोपड्यांच्या धर्मात ही असहिष्णुता -

टोपीवाली सोंगटी : तुमच्या धर्मातही काही वेगळं नाही.

गंधवाली सोंगटी : नाही कसं? इतिहास पहा. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, झालंच तर ताराराणी. हिंदू संस्कृतीची ही नारीरत्नं पहा.

(स्त्रीसोंगटी, शेंडीवाली सोंगटी, निळी सोंगटी, जिरेटोपवाली सोंगटी होकारदर्शक गिल्ला करतात. त्यात टोपीवाल्या सोंगटीचा आवाज नाहीसा होतो.)

गोडबोले : अहो हे काय आहे सगळं? आं? तुम्ही कोण आहात? (खाली बोट दाखवत) हे कोण आहेत?

लेखक : मी लेखक आहे. इतिहास डिपार्टमेंटमधला.

गोडबोले : (हताश होत) लेखक, सांगा ना नीट. हात जोडून विनंती करतो तुम्हाला.

लेखक : (किंचित हसत) बरं, बरं. पण मी तुम्हाला सगळं बयाजवार सांगत बसलो तर तुम्ही बोअर व्हाल, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळं खोटं वाटेल. स्वत:च्या मानसिक स्थितीविषयी शंका यायला लागेल तुम्हांला. त्यापेक्षा - ते कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये म्हणतात ना - तसं, लेट अस कीप धिस इंटरॅक्टिव्ह. तर सांगा - तुमच्या आसपास तुम्हांला काय दिसतंय?

गोडबोले : दोन उंच ठोकळे आहेत. एकावर तुम्ही आहात, एकावर मी आहे.

लेखक : मी डाव्या ठोकळ्यावर आहे, आणि तुम्ही उजव्या ठोकळ्यावर आहात. हे महत्त्वाचं आहे. बरं पुढे?

गोडबोले : आपल्या खाली काही मानवी आकृती आहेत. त्यांचे चेहरे मला काही नीट दिसले नाहीत.

लेखक : कारण त्यांना चेहरे नाहीत. चेहरे महत्त्वाचे नाहीत. प्रवृत्ती महत्त्वाची आहे. ती प्रवृत्ती त्यांच्याकडच्या प्रतीकातून दिसते.

गोडबोले : (मान हलवत) नाही समजलं.

लेखक : नाही? बरं हे बघा (एक विचित्र शीळ घालतात. मिशीवाली सोंगटी दोन ठोकळ्यांच्या मधोमध येते. फॅशन शोच्या रॅम्पवर आल्यासारखी.) हा ‘पुरुष’ आहे. अल्फा मेल म्हणा वाटलं तर. आसपास घडणाऱ्या घटनांकडे फक्त ‘पुरुष’ या भूमिकेतूनच तो बघतो. एखाद्या विदुषीने विद्वत्तापूर्ण भाषण दिलं तरी याची नजर तिच्या छातीपोटाचा वेध घेत असते. या विदुषीने मिळवलेलं यश हे लोकांच्या खाली झोपूनच मिळवलं असणार याची त्याला पूर्ण खात्री असते. मुळात ही विद्वत्ता या विदुषीकडे असावी हेच त्याला पटत नाही, ‘पायातली वहाण पायात बरी’ असं त्याला वाटत असतं.

(मिशीवाली सोंगटी निघून जाते.)

लेखक : याच्या उलट म्हणजे स्त्री सोंगटी कर्कशा. तिला वाटतं सगळे पुरुष तिचा गैरफायदाच घ्यायला टपलेत. (उंच किनऱ्या आवाजाची सोंगटी पोडियमकडे यायला लागते, पण लेखक हातानेच तिला थांबवतो.) तुम्हांला वेगळी सोंगटी दाखवतो (शीळ घालतो. पुस्तकवाली सोंगटी पोडियमवर येते.)

हे विद्वान! दहा पुस्तकं वाचून यांना वाटतं आपल्याला सगळ्यातलं सगळं येतं. विषय कोणताही असो, हे लगेच संदर्भ शोधून सांगणार. पण हे त्यातल्या त्यात बरे - किमान काहीतरी श्रमतरी करतात. (पुस्तकवाली सोंगटी निघून जाते.)

लेखक : आणखी दाखवू? हे हिंदुत्ववाले (गंधाची खूण करतो), ते शरियावाले (गोल टोपीची खूण करतो). पलिकडे ते बॉम येशूवाले (क्रॉसची खूण करतो). तिकडे ते शेंडीवाले, शेजारी जिरेटोपवाले, त्यांच्या शेजारी निळी टोपी. हे मराठीवाले, ते गुजरातीवाले, ते हिंदीवाले...

गोडबोले : बस्स बस्स, समजलं. समाज.

लेखक : बरोब्बर! स्मार्ट आहात, गोडबोले.

गोडबोले : आणि तुम्ही वेडझवे आहात. हे सगळं खोटं आहे, लटकं आहे. गेली वीस वर्षं मी समाजकार्यात आहे. देश फिरलोय मी. जमिनीशी जुडलोय. माणूस पाहिलाय, माणूस. आतल्यासहित माणूस. असे टोकाचे नमुने नसतात.

लेखक : (माठ विद्यार्थ्याला समजावण्याच्या सुरात) असतात हो! जरा खिशातला मोबाईल काढून पहा - त्या निळ्या ठिकाणी जा. माणसं दिसणार नाहीत कुठे. अस्मिता दिसतील. धगधगत्या. पण इथेच तर खरी मजा आहे. माणसाचं शेवाळं बाजूला सारायचं आणि अस्मितांचं डबकं उघडं पाडायचं. चला, एक उदाहरण घेऊ. सोमाजी गोमाजी कापसे. कोणकोणत्या अस्मिता असतील त्याच्याकडे? करा पाहू यादी?

गोडबोले : अंऽऽ… सोमाजी पुरुष आहे, त्यामुळे पुरुषी अस्मिता तर बाळगणारच. कापसे म्हणजे हिंदू. त्यामुळे ती आली. त्यातही देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण, त्यामुळे ब्राह्मणी अस्मिता.

लेखक : (गालांतल्या गालांत हसत) आडनावांवरून जात ओळखायला बरोबर जमतंय हां. जमिनीशी जुडल्यामुळे होत असावं…

गोडबोले : (दुर्लक्ष करत) मराठी अस्मिता तर असणारच. काही ॲझम्प्शन्स केली तर चालतील का हो? (लेखक कौतुकाने मान डोलावतो.) आता हा सोमाजी उच्चशिक्षित आहे असं समजू. मग त्या उच्चशिक्षणातून उद्भवणारी अशी एक स्वत:ची अस्मिता. मुंबईत राहतो असं समजू. म्हणजे मुंबईची अस्मिता, आणि भय्यांच्या आक्रमणाचा तिटकारा.

लेखक : कर्रेक्ट! म्हणजे मराठी भाषेची सोंगटी आणि मुंबईची सोंगटी कशी एकत्र आली पाहिलंत ना!

गोडबोले : पण या अस्मिता एकमेकांना छेद देणाऱ्याही असू शकतात.

लेखक : अर्थात! आता सोमाजी शास्त्रज्ञ आहे. त्याच्या बॉसचं नाव शमीमबानो शेख आहे. शमीमबानो या क्षेत्रातली आंतरराष्ट्रीय कीर्तीची शास्त्रज्ञ आहे. शमीमबानोबरोबर काम करून सोमाजीला अमूल्य अनुभव मिळणार आहे. आता सांगा: कोणत्या अस्मितांनी एकमेकांना छेद दिला?

गोडबोले : (विचार करत) शास्त्रज्ञ सोमाजीला या बॉसबरोबर काम करायचा अनुभव तर घ्यायचाय, पण स्त्री-बॉसच्या हाताखाली काम करणंही नकोसं वाटतंय. म्हणजे शिक्षण विरुद्ध स्त्री.

लेखक : बास?

गोडबोले : आंऽऽ - आपल्यासारख्या व्युत्पन्न ब्राह्मणाला एका म्लेंच्छ स्त्रीच्या हाताखाली काम करावं लागतंय याचा विषादही. म्हणजे शिक्षण विरुद्ध स्त्री विरुद्ध धर्म.

लेखक : बरोबर! तर सामान्य माणूस अशा अनेक परस्परविरोधी अस्मितांचा बनलेला असतो. पण आपल्याला हे नको. दोन अस्मिता असल्या की त्यांचे कोपरे कुठेतरी एकमेकांना घासतात. विरोधाभास तयार होतात. आपल्या वागण्यात विरोधाभास आला की माणसं विचार करायला लागतात. व्हेरी डेंजरस थिंग टू हॅपन...

गोडबोले : (मध्येच तोडत) हॅ! मला नाही पटलं! कदाचित सोमाजी गोमाजी कापसेची एक अस्मिता दुसरीपेक्षा जास्त तीव्र असेल. ख्यातनाम शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करायला मिळतंय म्हणून तो अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करेल. 'शिक्षण विरुद्ध स्त्री विरुद्ध धर्म' यात कोण जिंकेल?

लेखक : आपल्याला कोणाला जिंकवायचंय?

गोडबोले : आपल्याला म्हणजे?

लेखक : अजून नाही कळलं गोडबोले?

गोडबोले : नाही.

लेखक : (हळुहळू आवाज चढत जातो)

समाज नि माणसं. अस्मितांची कणसं.
डुलतात शेतात. काम कर बेतात.
नाचव, खेळव. उठव, बसव.
टोकाला ने, मध्यावर आण.
पेटव, विझव. गाजव खाजव.
मतमतांचा गलबला.
जनमताचा कारखाना.

हे सगळं कशासाठी?
‘त्यां’च्यासाठी हो ‘त्यां’च्यासाठी.
डोक्यावर बसलेले ‘ते’.
मराठीत नाही कॅपिटल लेटर.
बट अ क्वोट मार्क (हाताने हवेत अवतरण चिह्नाची खूण करत)
इज सो मच बेटर.

‘ते’ सांगतात, आपण करायचं.
‘त्यांना’ काय हवंय?

दे वॉंट टु मिल्क द पॉप्युलिस्ट काऊ.
म्हणून पाठी जनमत पाहिजे रे, भाऊ.
मिळवायला. मिळवलेलं साठवायला.
साठवलेलं विकायला. विकलेलं मिळवायला.

(टर्रर्रर्र. लाल प्रकाश.)

आवाज : लेखक, बिहेव युवरसेल्फ….

(लेखक शांत होतो. लाल प्रकाश जातो.)

गोडबोले : (हळूच शांततेचा भंग करत) गोलाग आहे ना हे?

लेखक : होय!

गोडबोले : (अडखळत) खात्री नव्हती… (अस्वस्थ होऊन तशाच फेऱ्या घालतात.) पण काय हो? हे गोलागबिलाग सगळं खरं आहे?

लेखक : म्हणजे? खरंच तर आहे.

गोडबोले: तसं नव्हे हो. म्हणजे हे सगळं वास्तवात घडतं आहे का? की माझ्या डोक्यात घडतं आहे? भास?

लेखक : सगळंच तुमच्या डोक्यात आहे, गोडबोले. पण याचा अर्थ हे सगळं वास्तव नाही असा नव्हे...

(टर्रर्रर्र. लाल प्रकाश.)

आवाज : लेखक, प्लीज बी ओरिजिनल. सगळ्यांनी हॅरी पॉटर वाचलंय.

(पहिला प्रवेश समाप्त. रंगमंचावर अंधार.)

दोन । हळदीचा चंद्र

तीन । नाख्त द लांगेन मेसं

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

जबरदस्त.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण वाचले नाही अद्याप. (त्याला वेळ लागेल. सवडीने वाचेन म्हणतो.) पण भट्टी जमलीये. उत्कंठावर्धक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मकरंद साठे यांच्या "सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण " या अप्रतिम आवडत्या निबंधातील मांडणीशी याचे साम्य आढळले.
अर्थात तुमचा प्रयत्न आवडला हे देखील आवर्जुन नमुद करावेसे वाटते.
मकरंद साठे यांच्या निबंधातील काही परीच्छेद्

ओळख (identity) हा विषय मुळातच गहन क्लिष्ट व्यामिश्र (complex) इत्यादी त्यातुनच आजच्या घटकेला त्याला इतक्या मिती जोडल्या गेल्या आहेत की त्याचा वेध घेणे दुरापास्त होउ लागले आहे. या विषयाची मुळातच असणारी गहनता व आजमितीला त्यात निर्माण झालेली व्यामिश्रता व विखंडीतता हे दोन्ही प्रकार मला कसे जाणवतात ते आधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो ( येथे मी सामाजिक ओळख या अर्थी बोलत आहे) इंग्रजी Identity या शब्दासाठी आज मराठीत अस्मिता हा शब्द वापरला जातो. परंतु अस्मिता या शब्दाला जोडुन उगाचच एक अभिनिवेशी भाव असतो असे मला वाटते त्यापेक्षा ओळख हा रोजच्या संभाषणात वापरला जाणारा शब्द जसे की मी अमुक म्हणुन ओळखला जातो किंवा ओळखपत्र (identity card) इत्यादी मला जास्त सोयीचा वाटतो परंतु या ओळखीचा इंग्रजी recognition या शब्दाशी संबंध जोडला जाउ नये म्हणुन हा खुलासा.

एका व्यक्तीच्या अनेक व्यामिश्र ओळखी निर्माण करतो. ती व्यक्ती एकाच वेळी भारतीय ,(पण) लंडननिवासी, स्त्रीवादी, वित्तीय धोपटमार्गी( fiscal conservative), मॆक्डोनाल्ड बर्गर आवडणारी, लोककलांचा अभ्यास करणारी, सॅक्सोफ़ोन वाजविण्यात निष्णात असणारी इत्यादी अनेक ओळखी प्राप्त करुन घेउ शकते. एकापेक्षा जास्त ओळखी पुर्वीही होत्याच परंतु त्यांची संख्या सामान्यत: इतकी नव्हती (इतकीच्या जवळपासही नव्हती) आणि दुसरे म्हणजे त्या ओळखीतही एकात्मता असे. याचा अर्थ असा की पुर्वीही निवडीच्या शक्यता (अगदी एकमेकींशी विसंगत अशा शक्यताही) अस्तित्वात होत्या. पण या सगळ्या शक्यता एकाच चौकटीतुन (frame) उदभवलेल्या असत. एकाच एकात्म विचारसंचाचा भाग असत. आज या ओळखी अनेकदा एकमेकींशी विसंगतच नव्हे तर असंगत ही असतात. दोन ओळखींमध्ये किंवा त्याच्यामागील जाणिवांमध्ये काही संबंधच नसतो. म्हणजे त्याचा उदभव वेगवेगळ्या असंगत चौकटींमधुन, प्रणाली – पद्धतीमधुन (system) झालेला असतो.

एकाच व्यक्तीच्या अनेक ओळखी असतात हे आपण पाहीले ( जशा की भारतीय , लंडनवासी, वित्तीय धोपटमार्गी,(fiscal conservative) स्त्रीवादी इत्यादी ) त्या कधी कधी द्वंद्वात्मक असतात. म्हणजे त्यांच्यात झगडा असु शकतो. उदा. लंडनवासी वा सोइसाठी रेठरेवासी (बुद्रुक) ही ओळख आणि त्याच व्यक्तीची वित्तीय धोपटमार्गी ही ओळख . वित्तीय धोपटमार्गी म्हणुन त्या व्यक्तीला सरकारने वित्तीय (fiscal)शिस्त पाळणे , खर्च कमी करणे हे मान्य असेल परंतु त्याच वेळेस एक रेठरेवासी (बुद्रुक) म्हणुन सरकारने रेठरे या गावी जा-ये करणारया बसची संख्या परवडत नसतानाही वाढवावी वा रेठरे गावात नवे कारखाने काढण्यासाठी अनुदाने( subsidy) द्यावीत असे ही वाटेल. या ओळखीप्रमाणेच ओळखी या एकमेकींशी असंगत असतात, त्यांची सुरुवात कशी वेगवेगळ्या गृहीतकांपासुन होते हेही आपण पाहीले.

प्रत्येक पावलावर निवड करणे हे मनुष्याला ओझे वाटते. त्यातुन ही निवड असंगत गोष्टींमधुन करायची वा दोन विसंगत गोष्टी एकत्र मान्य करुन करायची , थोड हे थोड ते अशी ही करायची , ती ज्यावर अवलंबुन अशा ज्ञानापासुन वंचित असतांना करायची, त्यापासुन सहेतुकपणे वंचित ठेवले गेलो असता करायची , अनेकदा तर ते ज्ञान ही संदिग्ध ( आजच्या काही वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे) असता करायची, ते ज्ञानच गहनतेचे( theory of complexity) किंवा गोंधळाचे(chaos) सिद्दांत मांडत असता करायची. या प्रकारातुन व्याकुळता तरी येते, किंवा ही सर्व व्यामिश्रता अमान्य करत सर्वसमावेशक निरपेक्ष एकात्मतेच्या मृगजळाला चिकटुन राहण्याचा प्रयत्न करीत राहायचे , यासारख्या गोष्टी उदभवतात.

यातुन एकतर भावनिक अवस्था नाजुक, पटकन भडका उडेल अशी तरी होते, किवा दुसरया बाजुला माणुस पुर्णपणे कोडगा,स्वार्थी ,संवेदनाशुन्य संधीसाधु पद्धतीन जगणारा, समाजात बेटासारखा जगणारा असा तरी होतो. यातील पहील्या भुमिकेतुन मुलतत्ववादी , अतिरेकी देशीवादी (nativist)जाती/गट/धर्मवादी इत्यादी भुमिका उभरतात.
तर दुसरयामुळे सार्वत्रिकीकरण, लघुत्तम साधारण विभाजकावर विसंबणे, सांस्कृतिक जागतिकीकरण, साचेबंदपणा(standardization globalization of culture) , सपाटीकरण, समोर अन्याय ,बलात्कार ,खुन होत असता थंड राहणे इत्यादी मनोभुमिका त यार होतात. या दोन्ही विरोधी वाटणारया मनोवस्था या प्रकारे एकाच कारणातुन उदभवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा !! खजिनाच सापडला. आता एकदम सगळं वाचून संपवत नाही. चवीचवीने थोडंथोडं रोज वाचावं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा !! खजिनाच सापडला. आता एकदम सगळं वाचून संपवत नाही. चवीचवीने थोडंथोडं रोज वाचावं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0