वरात

जणू एखादा शिकारी दबा धरून असावा तसे शंकर्या आणि राजा रात्रीच्या गुडूप अंधारात उभे होते. “आईघाले किती वेळ लावत्यात बघ…दोन तास झालं उभारलोय पाय दुखाल्यात माझं” चौदा वर्षाचा राजा वैतागून बोलला.चौदा चा असल्यान त्याला उगीचच मोठा झाल्याचा फील यायचा त्या मूळं प्रत्येक वाक्यात शिवी असलीच पाहिजे याची तो काळजी घ्यायचा.छोट्या शंकर्या च्या ते सवयीच झाल होत.

“आरं चल कि मग म्होरच्या गल्लीत.. इथं का वाट बगतूयास वरातीची”असं म्हणून शंकर्या चौगुल्या च्या गल्लीकडं जाऊ लागला… आपल्या हून चार वर्षानं लहान असलेल्या बारक्याश्या शंकर्याला राजानं माग खेचलं

“आरं मरशील कि.. चौगुल्याची गल्ली काळ्याची हाय..मागच्या वरातीत गेल्तो तिकडं तवा मारून मारून माजा गुन्ना फोडला लेका त्यानं.. पैसं कमी मिळू देत खरं तिकडं जायचं नाय.”

त्याच अस झालं होत की गावातले बडे आसामी तात्यासाहेब काही महिन्यापूर्वी बिहारला गेले होते. एका जुन्या कुळाच्या लग्नात.तिथली बेभान नाचणारी वरात पाहताना तात्यासाहेबांना नवीनच दृश्य बघायला मिळालं.वरातीत नाचणारे लोक थोड्या थोड्या वेळानं वरातीवर नोटा उधळायचे.‘आयला कामाधंद्याला महाग झालेले भैय्ये लोग पैसंं उधळत्यात आणि आमच्या वराती बिन पैश्याच्या’ तात्यांच्या मानी स्वभावाला ते लागलं आणि ती रुखरुख आपल्या धाकट्या पोराच्या वरातीत बेफाम नोटा उधळून संपवली. शेकडो रुपयांची उधळण एखाद्या वरातीवर झालेली पहिल्यांदा गावाने पहिली.

मग त्यानंतर सुरु झाली श्रीमंती, रुबाब आणि पावर दाखवणारी अप्रत्यक्ष स्पर्धा… गाव तसं श्रीमंत….नदी काठी बसलेलं.. हाकेच्या अंतरावर असलेली औद्योगिक वसाहत आणि गावच्या जागृत देवस्थानाचा नावलौकिक या मुळ गावाला अच्छे दिन आलेले. आणि त्यामुळच वरातीत नोटा उधळ्नार्यांची गावाला कमतरता नव्हती.

याचा फायदा घेतला शाळेत शिकणाऱ्या राजा आणि काळ्या सारक्या गरीब पोरांनी.. बेधडक नाचणाऱ्या वरातीत घुसायचं गावल ते पावल या न्यायानं नोटा उचलायच्या.. कोण गोट्या खेळायसाठी.. तर कुणाला क्रिकेट ब्याट घ्यायची होती… काही पोरांनी तर काळ्याला बिड्या वडताना बघितल होतं..

आज चौथीत शिकणारा शंकर्या आणि त्याच्या पेक्षा चार वर्षानं मोठा असून पण पाचवी मध्ये शिकणारा राजा वराती ची वाट पुष्पीला पटवण्यासाठी त्याला एक गॉगल घ्यायचा होता, जत्रेत शंभरला मिळंलच..या साठीच आज शंकर्या मदतनीस होता.राजाला वरात नाही तर पुष्पी त्याच्याकडे येताना दिसत होती म्हणून तो इतका अधीर झाला होता.

तेवड्यात चौगुल्याच्या गल्लीतून वरात मुख्य बाजाराच्या रस्त्यावर आली.. आता ते दोघे इतर पोरांसोबत वरातीला समांतर चालू लागले सगळे जन तयारीतच होते.. नाचणारे झिन्गाट पणे सैराट होऊन नाचंतच होते.. तेवड्यात नवरदेवाच्या बापाने खिशातून नोटा काढून उधळल्या.. सगळी पोरं तराट आत घुसली.. शंकर्या गर्दीत आत घुसणार तेवड्यात त्याला कुणीतरी माग खेचलं..कोण खेचलंय म्हणून मागं बघायला आणि त्याचं मुस्काट लाल व्हायला एकच गाठ पडली. ती त्याची आई होती.

वराती पासून आपल्या खोपटा वजा घरापर्यंत छाया शंकर्याला मारत सुटली होती..आणि मारता मारता “मुडद्या ..गीळतूयास नव्हं का तीन येळंला..मला मसणात जाळाय पैसा पायजे हुता कायरं तुला” असं बोलून त्याचा उद्धारपण करत होती..शंकर्या जीवाच्या आकांताने ओरडून तिचा मार वाचवायचा प्रयत्न करत होता.घरात आल्यावर पण छाया गप्प बसली नाही, चुलीच्या लाकडातून एक पातळ असा फोक काढून तिनं तो शंकर्यावर बरसवायला सुरु केला. “आये.. नाय जाणार मी वरातीत पैसं येचायला” अस शंकर्या कळवळून सांगत होता पण छाया थांबत नव्हती.. शेवटी शेजारची शांताक्का मध्ये पडली म्हणून शंकर्या वाचला. छायानं उरलेली घरातली कामं आवरली.. शंकर्या साठी ठेवलेलं ताट अजून तसंच होतं.. तो रडत मुसमुसत झोपून गेला… त्याला जाग येणार नाही अशा पद्धतीनं ती त्याच्या वळांवर हात फिरवू लागली.. तसे तसे तिचे जुने वळ जागे होऊ लागले.

सतरा वर्षांची होती छाया तेव्हा ती लग्न होऊन रामासोबत गावी आली.. रामा अंगठेबहाद्दर पण सुरेख ढोल वाजवायचा..त्याच्या ढोलाच्या कौशल्याने त्याचा ब्यांड टिकवून ठेवला होता.. कोणताही कार्यक्रम असो रामाचा ढोल त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायचा,बर्याच वेळा लोक वरातीत नाचायचं सोडून त्याच्या ढोलाचा नाद व आवेशात वाजवणारया रामाकडेच बघत बसत… खोताच्या धाकट्या पोराचं लग्न होतं त्या साठी रामा गेलेला… ढोल वाजवता वाजवता अचानक रामाच्या छातीत कळ मारली.. वरातीत अशुभ नको म्हणून रामानं थांबून वरात पुढे जाऊ दिली.. तिथेच रस्त्यावर बसलेला रामा पुन्हा उठलाच नाही.. गावातली चार माणसं त्याचा निर्जीव देह घेऊन घरी आलीत.. शून्य नजरेनं छाया त्याच्या प्रेताकडं.. पाळण्यातल्या शंकर्या.. आणि कोपर्यात टांगलेल्या ढोलाकडं बघत बसली.. तिला जगण्याची इच्छा उरली नव्हतीच पण आपण पण मेलो तर या पोराकडं कोण बघणार..म्हणून ती जगू लागली.. राबू लागली सगळं विसरून.. पण वरात म्हटलं कि तीचं ते दुखनं उफाळून यायचं..आतून धडका द्यायचं.. दार बंद करून ती वरातीतील गाणी ऐकू येऊ नये म्हणून कान गच्च्च दाबून धरायची.. मग हळू हळू ती गाणी जाऊन रामाच्या ढोलाचा आवाज तिला येऊ लागायचा… मग कानावरचे हात आणि गळ्यातला हुंदका एकदमच सुटायचा.. वरात नसून आपल्या नशिबाची धिंड काढल्या असं तिला वाटत राहायचं.. पण हे शंकर्याच्या बाल मनाला कसं सांगणार……………………………………..

“बघू कि रंं पेन” शंकर्यानं प्रीत्याला विनवलं.

“ नाहीरं तू तुझा तुझा विकत घी कि… मला माझ्या मावशीनं दिलाय” प्रीत्या फुशारकीनं बोलला. प्रीत्या चा आज वाढदिवस होता म्हणून त्याच्या मावशीनं कार्ट बोंबलत फिरायचं सोडून जरा तरी अभ्यास करल म्हणून त्याला एक शाई चा कसला तरी हिरो पेन दिला होता.. तो प्रीत्या वर्ग भर मिरवत होता.. चंदेरी कलरचा रंग.. सुबक आकार.. बारीक नक्षी.. जणू चाकूचं टोक असावी असी निब.. बघून शंकर्या ला तो पेन घ्यायची भयंकर् इच्छा झाली.. शंकर्या आपल्या हातातल्या दोन रुपयच्या पेनाकडं बघत होता आज त्या निरागस जीवाला पहिल्यांदा आपल्या गरिबीची जाणीव झाली होती…

शाळेतून राजा बरोबर येताना पण त्याच्या डोक्यात त्या पेनाचेच विचार घुमत होते.एव्ढ्यात राजानं विचारलं “शंकर्या, आज सावकाराची वरात हाय.. येतो का?”

शंकर्याला महिन्यापूर्वीचा आईचा बेदम मार आठवला. त्या मूळं तो नाही म्हणणार तोच त्याला आठवलं की आई आज बाजारासाठी तालुक्याला गेल्या..मनात कायतरी ठरवून त्यानं राजाला विचारलं

“राजा.. शाईचा पेन कितीला मिळंल?”

“मिळंल कि चाळीस –पन्नासला पण का?”

“काय नाय… आज वरातीला कितीला जायचं?”

शंकर्याच्या चेहऱ्यावर विजयी समाधान आलं.मार्ग सापडला होता.शाई चा पेन आता त्याच्यापण खिशात असणार होता.. आणि प्रीत्या सकट सगळा वर्ग जबडा पसरून बघणार होता…. या कल्पनेनंच त्याला गुदगुल्या झाल्या.

चौगुल्याच्या गल्लीसमोर गेल्या वेळ सारखे राजा आणि शंकर्या आले.. आज शंकर्या ला पण स्वतःसाठी कायतरी हवं होतं.. गोट्या नाही…गॉगल नाही.. बिडी तर नाहीच नाही… त्याला स्वप्नांचा पेन हवा होता म्हणून आज राजा पेक्षा अधिरतेने तो वरातीची वाट बघत होता.

सावकाराला नवसानं झालेल्या पोराची वरात गल्लीतून बाहेर पडली.. तसे राजा आणि शंकर्या वरातीत बरोबर चालू लागले.. राजा तर घरची वरात असल्या सारखा अधून मधून नाचत होता..एव्द्यात सावकारानं दहाच्या नोटांची चळत गर्दी वर फेकली.. आणि पाण्यात सूर मारावा तसा शंकर्या गर्दीत घुसला.. तेवड्यात उधळलं… उधळलं. असा गलका झाला..

आणि एकच पळापळ सुरु झाली…………….

शेवटच्या एस.टी. तून उतरलेल्या छायाला गाव एकदम सुनसान दिसलं.. जणू एखादी शांततेची गूढ चादर पांघरून गाव डाराडूर झोपलं होतं… बरोबर असलेल्या अक्काला तिनं विचारलपण “धाड भरल्या वाणी काय झालं गावाला आज तर लगीन हुतं नव्हं का सावकाराच्या पोराचं” तीचंं बोलनं संपायच्या आत शेजारच्या झाडावरून टिटवी ओरडल्याचा भास झाला…अचानक तिची धडधड वाढली आणि नेहमी पेक्षा वेगानं ती चालू लागली…..घराच्या कोपर्यावर आल्यावर तिनं पाहिली घरासमोर जमलेली मुकी गर्दी.. छाया ला बघताच तिला वाट करून देऊ लागली.. काय होतंय ते तिला कळंना.. गर्दी तून पुढं झाली आणि तिला समोरचं दृश्य दिसलं

शंकर्या लहान पोरासारखा झोपला होता पण बापासारखाच कधी पण न उठण्यासाठी… छाया मटकन खाली बसली…वेड्यासारखी..लोक कुजबुजत होते.. अचनक घोडी उधळली आणि वरातीत घुसली.. पोरगं सापडलं मध्ये.. हकनाक मेलं..चुकचुकत होते… शोक करत होते..छाया दगडा सारखीच बसून होती.. रडंल तरी का?… रडून शंकर्या परत येणार असता तर…एका वरातीनं तिचा नवरा नेला तर दुसर्या वरातीनं तीचं पोरगं..

लोक पुढच्या तयारी ला लागले.. शंकर्या ची गच्च मुठ उघडली गेली तेव्हा मुठीत पकडून ठेवलेल्या चुरगळलेल्या नोटा दिसल्या.नोटेवरचा गांधी कुश्चितपणे हसत होता… थोड्याच वेळानं शंकर्या ची अंतयात्रा निघाली.. ती ही एक वरातच होती.. वरात एका आईच्या असाह्यतेची.. दारिद्र्याची…मुठीत चुरडल्या गेलेल्या छोट्याश्या स्वप्नाची…

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

भारी लिहिलंय. ये बात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय चांगलं लिहिलंय, चित्रदर्शी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती ही एक वरातच होती.. वरात एका आईच्या असाह्यतेची.. दारिद्र्याची…मुठीत चुरडल्या गेलेल्या छोट्याश्या स्वप्नाची…

खरंय, गरिबीसारखा शाप नाही दुसरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी लिहीले आहे! शेवटही जबरदस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान लिहिलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकदम सही लिहिलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच की.
अशा कथा ऐसीवर येत असतील तर भारीच.
.
(आम्हाला बी वाव हाय म्हना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही है! कालच ही वाचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दमदार लिहिलंय. शब्दचित्र. पण गांधींवरचा उल्लेख आवडला नाही. असाच एक उल्लेख काल व्हाट्स अ‍ॅप वर वाचला.
' तो नथुराम खिशांत बसलाय का कोण जाणे! खिशांत गांधी टिकतच नाहीये.'
चेष्टेतही गांधींचा असा अनादर मनाला खटकतो. कदाचित जुन्या पिढीचे आहोत, म्हणून असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0