बेरंग - भाग १

एक कथा लिहितो आहे, कशी वाटते सांगा :
--

बेरंग

( भाग १)
--
आता हा नवा अधिकारी आल्यापासून सगळ्यांची हालत खराब झाली आहे, तो पैसे खाऊ देत नाही, स्वतः ही खात नाही. सुरुवातीला आपण याच्याशी मैत्री करून पाहिली. आपल्या लायनीत घ्यायचा प्रयत्न केला, पण काही फायदा नाही. तसा वागायला बोलायला बरा आहे. भरपूर शिकलेला आहे. तालेवार घरातला आहे. ह्याचे वडील देखील अधिकारीच होते, थेट कॅबिनेट सेक्रेटरीच. चिक्कार पैसा धरून आहेत. शिवाय दिसतातही नीटनेटके, श्रीमंत. काही लोक दिसतातच पैसेवाले, चकचकीत. हा त्यातलाच आहे. हे असं इतरानाही दिसतं का हे तपासून पहायला पाहिजे. एकदा चंद्याला विचारू. भडवा आपल्यासारखाच आहे. यथातथा परिस्थितीतून आलेला. पण बिनधास्त असतो. मौजमजा करतो. जोक सांगतो सगळ्याना. जिथे जाईल तिथे पॉप्युलर होतो. शिवाय बायाना घुलवण्यात तर एक नंबर आहे. चंद्या वागायला फारच नैसर्गिक आहे. आपल्यासारखा नाही. आपण मनमोकळे बोलत नाही अशी तक्रार सगळ्यांचीच असते. साली सवयच नाही . आपण फक्त प्यायल्यावर मोकळ ढाकळं बोलू शकतो. हा कदाचित आपला न्यूनगंड असावा.आपल्या डोक्यात काही खेळ सुरू असतो, आणि आपण त्या खेळात गळ्यापर्यंत बुडलेले. मध्येच कुणीतरी काही विचारतो आणि आपल्या खेळात खंड पडतो. मग आपण काहीतरी बोलून वेळ मारून नेतो.चंद्या आपल्याहून खूपच बरा आणि चतुर.आपण आणि चंद्या दोघानी मिळून या नव्या साहेबाला समजावयाचा बराच प्रयत्न केला. आपण जे करतो ते करप्शन नाही, तर कट प्रॅक्टीस आहे. डॉक्टर लोक करतात तशी. आपण फक्त कमीशन घेतो, पण काम चोख होईल याची खातरजमा करतोच. आपल्या नियंत्रणाखाली बनलेल्या सुरगाव रस्त्याचा दाखला दिला. म्हटलो गाडीत बसून चहा पीत जा. बशीतून एक थेंब सांडायचा नाही एवढा मुलायम रस्ता आहे. एक खड्डा नाही त्यावर. गालाशेठ आपला दोस्त कंत्राटदार आहे. पैसा भरवतो इथून तिथून सगळ्याना पण काम साला चोख बजावतो. पण साहेब बधला नाही, म्हटला भ्रष्टाचार देशाला संपवून टाकेल एक दिवस. या विधानावर चंद्या बावळटासारखा फिदी फिदी हसला होता. आपण नंतर झापला त्याला. म्हटलो तू साला चुतिया आहेस. कुणासमोर काय बोलायचं ते कळत नाही तुला. आपलीच गल्ली असल्यासारखा बरळत सुटतो. तर म्हटला झिगझिग करू नकोस जास्ती. तो साहेब बधेना झाला म्हणून तू वैतागला आहेस. त्याच्या बोलण्यात तसं तथ्य होतं. गेले दोनेक महिने झालेत कंत्राटदार घाबरून फिरकतच नाहीत ऑफिसकडे. संध्याकाळी भेटतात, दारू बिरू पाजतात. सोबती कोंबडी, मटण. दारूही स्कॉच. म्हणतात या साहेबाचं करा काही तरी. आपण म्हणतो तो आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्यावर आहे. शिवाय त्याच्या बापाची सर्वत्र ओळख. भडवा कॅबिनेट सेक्रेटरी होता. त्याने खा खा खाल्लं त्याच्या काळात पण पोराला वाटतं आपला बाप भली इमानदार. आपण काय झाट वाकडं करू शकत नाही त्याचं. आता तो आहे तोवर बसा उगी शांत. पण कंत्राटदाराची जात मोठी चिकट.कामाच्या माणसाला पटवण्यासाठी वाटेल ते करतात. पार्ट्या, बाया न वाट्टेल ते. एवढी सरबराई करतात की डोक्यात हवा जाते. आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायला लागतं. गेल्या वर्षी आपण एक मोठं टेंडर काढल. त्यात गाडी आली. इथल घर झालं. पुढच्या दोनतीन टेंडरात पुण्यात फ्लॅट झाला. अजून आपलं लग्न व्हायचं न त्या आधीच आपली तीन तीन घरं. लोकांचं एकही होत नाही. साला एके काळी आपली ऐपत नव्हती कोल्ड्रिंक प्यायची. न आता हे थाट. हालत बदलत जाते माणसाची. मागच्या लोकांचं पुण्य म्हणा की आणखी काही. पण दिवस बदलत जातात. पण अनेकाना हे समजत नाही आणि मग ते तिथेच अडकून पडतात. आपल्या सदाकाकासारखे. दरवेळी भेटला की लेक्चर देतो. सचोटीने राहा. पैसा खाणे बरे नाही. करप्शन फार दिवस चालत नाही.भले भले डुबले तिथं तुझं काय? तुझा बाप देवमाणूस होता. कधी कुणाचा एक पैसा शिवला नाही त्यानं. आपण सदाकाकाचं मन राखायला ऐकून घेतो. सदाकाका इमानदार माणूस आहे. आयुष्यभर बँकेत प्यून म्हणून राबला पण पोराना व्यवस्थित शिकवलं. आमचीही वेळोवेळी मदत करायचा. आईला याचा आणि काकूचा मोठा आधार वाटायचा. आता काकाची पोरं आपल्याकडून अडल्यानडल्याला पैसे नेतात.त्याला हे माहितच नसतं.आपण सढळ हाताने देतो. कधी विचारीत नाही कशासाठी पण ते सांगतात. मागे लहान्याच्या घराची सुरुवातीची रक्कम कमी पडत होती म्हणून तो आला. आपण चार लाख असे दिले. येतील तेंव्हा दे म्हटलो. पण तोही इमानदार. हातउसण्याची नोटरी घेऊन आला आणि सही करून देऊन गेला, सहा महिन्यात बिनव्याजी देतो म्हणून. आपण हसलो.तो म्हणाला तुझं हसणं कशासाठी आहे - मी पैसे देणार नाही असं वाटतंय म्हणून का? आपण म्हटलो नाही रे. सध्या वरकमाई बंद आहे, तुझ्याकडं वापस मागायची वेळ येते की काय असं वाटलं म्हणून हसलो. पण खरंच का हसलो आपण. साला हा काळ आणि तो काळ असलं काही स्वतःची पाठ थोपटण्याचा काहीतरी प्रकार होता तो. पैशाची खुमखुमी असतेच माणसाला. काही मान्य करतात काही करीत नाहीत.

यावेळी सदाकाका, त्याची पोरे, काकू आणि सगळा भूतकाळ तेंव्हा डोळ्यांपुढून वाहता झाला. माणसं म्हणजे पाऊलखुणा किंवा वर्षांची चिन्हे बनून राहतात. प्रत्येकाची एक खूण, एक चिन्ह. वडील गेल्यानंतरची भकासी आठवली. घरात आपण आणि आई दोघेच. अधून मधून एखादा दूरचा नातेवाईक भेटायला यायचा. एरवी सदाकाका आणि त्याचं कुटुंब हेच आमचे साथीदार. ते शेजारीच राह्यचे. सणासुदील घरी वगैरे बोलवायचे. आपण तेंव्हाही तिथे तटस्थासारखे वावरायचो. क्वचित बोलायचो. पोर्या लैच कमी बोलतो असं काकी म्हणायची. साधू बोवा बनतो क्काय अशी गंमत करायची. पण आपण निव्वळ वडील गेले म्हणून गप्प झालो होतो का. की ती निव्वळ एक घटना होती आपली सत्वपरीक्षा पाहणारी. हा माणूस तुटतो की तुटत नाही हे बघण्यापुरती तात्कालिक आपदा. एरवी मरणारा सुटतो असे घरीदारी सर्रास बोलतात लोक. मागे उरणार्‍यांचीच अवस्था होते. पण ही दुर्गत सगळ्यांचीच होत असावी. एरवीही या समाजात आपण एकटेच नसतो. आपल्या सभोती माणसांचा अफाट गराडा असतो, त्या गराड्यातल्या प्रत्येकाची एक कथा असते. थोड्या बहुत फरकाने बहुतांची पांगाडीच होते. निदान आपल्या दुनियेतल्या माणसांची तरी. ही दुनिया मध्य शहरी लोकांची होती. वीसेक वर्षांपुर्वी लहान खेडेगावांतून लहान शहरांमध्ये आलेले लोक. या शहरांमधून असणार्‍या गावासारख्या भागांमधून एकत्रित राहणारे लोक. शहरात आले तरी आपली भाषा न आपला चेहेरा जपून राहिलेले लोक. त्यामुळे समुहाच्या सुरक्षिततेत असणारी आपलेपणाची भावना तिथे होतीच. पण आपण या सगळ्यामध्ये राहूनही तुटकच होतो, आहोत. आता तर त्या जीवनाचा मागमूसही राहिलेला नाही आणि आपण खूप लांबवर निघून आलो आहोत. पण आई अजूनही तिथेच राहते. आपण अनेकदा मागे लागूनही तीने ते घर सोडलेलं नाही. म्हणाते तुझ्या वडीलांच्या आठवणी आहेत या घरात. आपण एवढा पैसा कमावला पण तीने कधी काही मागितलं नाही. वडलानी मागे सोडलेलं घर आणि पोस्टातले तीन लाख रुपए, एवढी बेगमी तिला आयुष्यभरासाठी पुरेशी आहे. वडील गेले त्यानंतर त्या पोस्टातल्या पैशावर मिळणारं व्याज हीच आमची एकमेव कमाई होती. तिच्यावर आईने घर चालवलं. आपलं शिक्षण पूर्ण झालं ते इबीस्या लाऊन लाऊन कसंबसं. आधी पदवी मिळवली आणि मग पदव्युत्तर शिक्षण. तोवर वय वाढून गेलं होतं, सोबतचे गडी करते सवरते झाले होते. कमी शिक्षणामुळे त्यांची गत यथातथाच होती पण निदान कमावते झाले होते. त्यातले एखाद दोन अधून मधून भेटायचे, बियर पाजायचे. आपल्याला ही छानछौक शोभत नाही असं वाटूनही आपण नैराश्य घालवण्यासाठी म्हणून थोडीफार घ्यायचोच. आता गंंमत म्हणून दिवसाआड महागडी पितो तेंव्हा जुने दिवस आठवतात. शिक्षण होऊनही सुरुवातीला हातात काहीच नव्हतं. मग आपण एका विना अनुदानित शाळेवर क्लर्कची नौकरी धरली. आठशे रुपए महिना ठरलेला पण दरमहा मिळेलच असा नेम नव्हता. बघता बघता तिथं साताठ महिने गेले. पैकी चारच महिन्यांचा पगार झाला, बाकी डुबले, पण या पैशाचाही केवढा आधार झाला होता.आपण आईसाठी एक साडी घेतली , घरात काही वस्तु घेतल्या.मग एक दिवस सरकारी परिक्षेची जाहिरात पाहिली आणि अर्ज भरला. अक्कल हुशारीने आधी प्रवेश परिक्षा आणि नंतरची मुलाखत काढते झालो न ह्या नौकरीचा धडा सुरू झाला. पहिल्या वर्षभरात नुसतीच हौसमौज केली. कपडे घेतले.मग एक मोटारसायकल. नातेवाईकानाही काहीबाही भेटी दिल्या. लेकरू लईच गुनाचं हाय ओ माय. काकी कौतुकानं हेल काढून बोलायची. मग बदली झाली. जालन्यातल्या राहत्या घराची डागडुजी करून आपण इथे आलो. इथे येऊन गेल्या काही वर्षांत आपला डील डौल पारच बदलून गेलायं.आई मात्र तिथेच थांबली. कधी मधी येते आपल्यासोबत राहायला. म्हणते भौ लग्न कर. मला मरण्याआधी नातवंडांची तोंडे बघू दे. आपण नुसतीच मान हलवतो. एकतर आपले नातेसंबंध साधारण त्यामुळे चांगल्या शिकलेल्या पोरी सांगून येत नाहीत. त्यात तशी गरजही नाही आणि आपल्याला बंधनात अडकायची इच्छाही नाही अजून. आलेल्या पैशावर अजून हौसमौज करायचीय अजून. एवढ्यात लग्नाची कटकट नको.सोबतच्या रुईकराचे हाल बघतोच आहे की.जरा निवांत बसला की आलाच बायकोचा फोन. पक्का घरघुशा झाला आहे. नाहीतर कसला मुजोर होता. भडवा पुर्णविरामाच्या जागी शिव्या द्यायचा. आजकाल होरे नाहीरे असं काहीसं बोलत असतो. आपण असेच होऊ याची गॅरंटी नाही पण काय सांगा ?

(क्रमशः/ संपूर्णतः काल्पनिक; प्रुफरिडिंग झालेले नाही)

अनंत ढवळे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

व्यक्तीचित्रण आवडते आहे. अर्थातच हे जग एलियन आहे, आयडेंटिफाय करता येत नाहीये. पण हळूहळू मजा येइलसे वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, शुची. बघुया कुठवर जमते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येऊद्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनट्रेस्टींग वाटत आहे, पु.ले.शु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढच्या भागाची वाट बघत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखन संज्ञाप्रवाहासारखं झालेलं आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे हा प्रवाह तुटक वाटत नाही. विचारांची गाडी रूळ बदलते तेव्हा खडखडत नाही. संज्ञाप्रवाही लेखनापोटी परिच्छेदही किंचित मोठे झालेले आहेत, पण तेही खुपत नाही.

चांगल्या दर्जाचं लेखन. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. एक भाग लिहून झाला आहे, लवकरच करतो पोस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0