प्रश्नोत्तरांच्या खाणीतला खजिना

फेसबुकवर , वोट्सएपवर त्याच त्याच पोस्ट्स पाहून, पुन्हा पुन्हा तेच जोक्स आणि hoax वाचून वैताग आलाय ? कोण कुठल्या फ्लाईटने कोणत्या देशात गेला,कोण कोठे जेवला ,अमुक एखाद्याने चित्रपट पाहायला गेला असता थेटरात किती सेल्फी काढले , कोणाच्या लग्नात कोण कोण नाचले किंवा अमुक अमुक मित्राच्या मित्राच्या मित्राने आज जेवणात कोणती डिश स्वत:च्या हाताने बनवली हे पाहत बसण्यात अजिबात रस नाही ? सतत विनाकारण तुम्हाला tag करणाऱ्या लोकांनी वीट आणलाय? किंवा फेसबुक तुमची ज्ञानाची भूक भागवत नाही असं तुम्हाला वाटतंय का? किंवा त्यापेक्षा काहीतरी वेगळं असं ट्राय करायचंय ? मग एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला खरोखर ज्ञानाचा खजिना पाहायला-वाचायला मिळेलच पण तुम्हाला असलेली माहिती अथवा ज्ञान इतरांसोबत शेअरदेखील करता येईल. अर्थात याबरोबर करमणूकपण होईलच. आणि त्यासाठी तुम्हाला जास्ती कष्टपण नाही करायला लागणार कारण हा खजिना online उपलब्ध आहे. वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी तर ही जागा म्हणजे पर्वणीच.

तर अशा या जागेचं नाव आहे क्वोरा (Quora). जुन २००९ मध्ये एडम डी’अन्जेलो आणि चार्ली शीवर या दोन माजी फेसबुक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ही वेबसाईट सुरु केली. क्वोरा हा प्रश्नोत्तरांचा एक अड्डा आहे(Question-Answer Forum). जिथे हजारो प्रश्न रोज विचारले जातात आणि त्याची उत्तरेही दिली जातात. आपणदेखील आपले खाते काढल्यानंतर हवा तो प्रश्न विचारू शकतो किंवा आपल्याला माहित असल्यास एखाद्या प्रश्नाचे उत्तरदेखील देऊ शकतो. प्रश्नोत्तरांसाठी याआधी याहू अन्सर्स प्रसिध्द होते पण आता ते कालबाह्य ठरले आहे. अल्पावधीतच क्वोराने याबाबतीत सर्वांनाच मागे टाकून गेल्या काही वर्षांत जी प्रगती केलीये ती नक्कीच कौतुकास्पद आहे.
इथे आहेत असंख्य प्रश्न. कोणत्याही विषयावरचे असोत. म्हणजे विज्ञान, भूगोल, इतिहास, धर्म, तत्वज्ञान, मनोरंजन, चित्रपट, साहित्य, अन्न, देश, राज्य , संस्कृती, कला, भाषा, युद्ध, आणि इतर बरेच विषय आणि त्यावरचे अगणित प्रश्न इथे सामावले गेलेत. या प्रश्नांची उत्तरे लोकांनी दिलेली आहेत. आपणही देऊ शकतो.

काही प्रश्नांमध्ये लोकांना आपापले वैयक्तिक मत विचारले गेलेले आहे तर काही ठिकाणी अनुभव. काही उत्तरांत फक्त माहिती देणे अपेक्षित आहे. अर्थात प्रत्येकाने उत्तरे ही विचार करून आणि भान ठेऊनच द्यावीत असा इथला अलिखित नियमच आहे.
साधारणपणे तीन प्रकारांत या प्रश्नांची विभागणी करता येईल.
पहिला म्हणजे माहितीचा. यात लोकांनी वस्तुनिष्ठ माहिती देणे अपेक्षित आहे. म्हणजे समजा कोणी असा प्रश्न विचारला असेल की –
“मुंबईमध्ये फिरण्याची मुख्य ठिकाणे कोणती?” किंवा “भारतात मराठीभाषिक किती टक्के आहेत?” तर यावर जी माहिती आपल्याला माहिती असेल ती आपण शेअर करू शकतो.

दुसरा प्रकार म्हणजे मतांचा. समजा एकाने असा प्रश्न विचारलाय की, “भारताने पाकिस्तानशी युध्द करावे की नको” किंवा “आयसीसला कसे थांबवता येईल ?” तर आपणही आपापली प्रामाणिक मते मांडू शकतो. अर्थात इथे चांगली गोष्ट म्हणजे समजा तुमचे उत्तर वादग्रस्त असेल आणि कुणाला पटले नाही तर समोरच्याकडून शिवीगाळ , फालतू कोमेंट्स, भांडाभांडी असले प्रकार होत नाहीत. जर एखादी व्यक्ती सहमत नसेल तर ती नम्रपणे तसे सांगून मोकळी होते. जरी वाद झाला तरी तो सभ्य भाषेतच होतो. आणि ताणला जात नाही. एकमेकांच्या आयाबहिणी काढून इथे कोणी भांडत बसत नाही. (फेसबुकवर असले प्रकार सर्रास चालतात हे आपल्याला माहीतच आहे)

तिसरा म्हणजे अनुभवांचा. आपल्याला आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी आलेले अनुभव आपण लोकांसोबत शेअर करू शकतो. म्हणजे बघा , “ एक भारतीय म्हणून तुम्हाला लंडनमध्ये कसा अनुभव आला ?” किंवा “ तुमच्या आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंग कोणता होता? ” असा प्रश्न जर विचारला गेलेला असेल तर आपण बिनधास्त आपले अनुभव लिहू शकतो. भले तो गोड असो वा कटू. गंमत म्हणजे उदाहरणार्थ समजा जर तुम्ही साहेबाच्या देशात तुम्हाला वाईट अनुभव आला असे लिहिलेत तर एखादा गोरा साहेब हळूच तुमच्या उत्तराखाली चक्क “मी आमच्या देशातर्फे माफी मागतो” असे लिहून जातो. किंवा अनेक भारतीयपण परदेशी पाहुण्यांची चौकशी करताना (“आमचा देश कसा वाटला?”) दिसून येतात. जर कोणाचा अनुभव चांगला नसेल तर खेदही व्यक्त करतात. माफी मागतात. पुन्हा येण्याचे आमंत्रण देतात. एकंदरीत सर्वजण एकमेकांच्या विचारांची शांतपणे देवाणघेवाण व्हावी याच हेतूने इथे आल्याचे कळून येते.

पण याचा अर्थ क्वोरा कंटाळवाणे आहे अथवा निरस आहे असा मुळीच नाही. इथला अनुभव खरोखर वेगळा आहे. अनोखा आहे. काही काही प्रश्न खरोखर भन्नाट असे असतात आणि त्यांची उत्तरेदेखील तशीच अफलातून. एकदा तुम्ही क्वोरावर लॉगइन केलेत तर तुम्ही तासंतास या प्रश्नोत्तरांच्या सहवासात वेळ घालवू शकता.अनेकांचे विचार जाणून घेऊ शकता. आपले विचार मांडू शकता. इतरांना आलेले चांगले, वाईट, भयंकर, मजेदार, अनुभव वाचू शकता. आपले सांगू शकता. हळूहळू एक क्षण असा येतो की सकाळी उठल्या उठल्या फेसबुक पोस्ट्स किंवा वाटसएप ऐवजी तुम्ही पहिली टिचकी क्वोरावरच वाजते. नवनवीन प्रश्न पाहून तुम्हालाही अनेक प्रश्न सुचू लागतात. प्रश्नांची उत्तरे सुचू लागतात. किंवा कोणी काय उत्तरे लिहिलीत हे वाचायचीही सवय लागते. उत्सुकता लागते. मग एखाद्या दिवशी असा एक प्रश्न तुमच्यासमोर येतो ज्यावेळी तुम्हाला वाटते की हाच तो प्रश्न जो माझ्यासाठीच बनलाय. किंवा काही प्रश्न पाहिल्यानंतर असंदेखील वाटून जातं की याच प्रश्नाची आपण इतके दिवस वाट पाहत होतो. आणि असे भरपूर प्रश्न नंतर पुन्हा पुन्हा आपल्यासाठी येत राहतात.

इथे आपल्याला आवडलेल्या उत्तरांना ‘upvote’ करण्याचा पर्याय आहेच पण त्याचबरोबर ‘downvote’ चाही पर्याय दिलेला आहे. अर्थात शक्यतो काही ठोस कारण असल्याशिवाय कोणाचे उत्तर downvote करायचे नाही असा अलिखित शिरस्ता आहेच. जर उत्तरांवर प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तोही पर्याय आहे.

सध्या क्वोराचे जगभरात ५ लाखापेक्षा जास्त युजर्स आहेत. दिवसागणिक त्यात अधिकच भर पडत आहे. त्यात सर्वांत जास्त अमेरिकन्स आहेत आणि त्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो भारतीयांचा. होय. क्वोरा वापरत असलेल्यांमध्ये तब्बल ३९ टक्के लोक हे भारतीय आहेत. ३ वर्षांपूर्वी भारतातल्या सर्वात पहिल्या जाणाऱ्या वेबसाईटसमध्ये क्वोरा पहिल्या दोनशेमध्येही नव्हता. पण आता तो ८८व्या क्रमांकावर येऊन पोहोचलाय. तो काही वर्षांत अजून वरती जाण्याची शक्यता आहे. अनेक जगप्रसिध्द शास्त्रज्ञ , उद्योजक, विचारवंत इथे येऊन लिहिण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. युवावर्गही आता इकडे आकर्षित होत चाललाय.

तर असा हा प्रश्नोत्तरांच्या खाणीतील खजिना सर्वांनाच मिळावा आणि वाटून घेता यावा अशीच आमची प्रामाणिक इच्छा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लोकांच्या आयाबहिणी काढल्या जात नाहीत ही चांगली गोष्ट आहे. पण हे कसं जमवतात बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जमुन जात असच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे
कोणत्याही सोशल नेटवर्किंगच नव्हे तर माणसाच्या कोणत्याही सायझेबल गॅदरिंगच्या टिकाणी काही ट्रोल तरी असतातच. मग कोरावर ट्रोलिंगच चालत नाही?
कि तिथे "बिग ब्रदर" असतो प्रत्येक गोष्ट वाचायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

trolls चालतातच. त्यात काही वावगे नाही. पण समजा एकाने लिहिलेले उत्तर काहींना पटले नाही तर लगेच शिवीगाळ भांडणे कोणी करत बसत नाही. तुमचा मुद्दा पटला नाही तसे सरळ सांगतात. आपला मुद्दा व्यवस्थित पटवून द्यायचा प्रयत्न करतात. अर्थात वाद-विवाद इथे देखील होतात पण सभ्यपणे. काही दिवस वापरून पाहिल्यावर आपोआपच फरक लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही शोधताना या क्वोराच्या लिंक्स येऊ लागल्या आहेत. मराठी आहेत का प्रश्न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. फक्त इन्ग्रजीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मराठी संस्थळांप्रमाणेच कोरावरही चिक्कार वेळ घालवतो. एकुण इंटरेस्टिंग साईट आहे. बरेच प्रसिद्ध लोक आहेत. वेळ लावून प्रश्नांची खोलवर उत्तरे देतात. उदा. रॉबर्ट फ्रॉस्ट ह्या नासात काम करणाऱ्या माणसाने नासाविषयक आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन विषयक भरपूर माहितीपूर्ण उत्तरे दिली आहेत. असेच भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणकशास्त्र अशा अनेक विषयांत उत्तम उत्तरे लिहिणारे लोक आहेत.
इथं आपण आपल्या आवडीचे विषय फॉलो करू शकतो, लेखकांना फॉलो करू शकतो, नावडते विषय म्यूट करू शकतो. हे नीटपणे करणं महत्त्वाचं आहे. नाही तर बऱ्याचदा तोचतोचपणा येतो. सुरुवातीला माझ्या फीडमध्ये आयायट्यांबद्दलचे प्रश्न फार यायचे. कोणती आयायटी भारी, आयायटीचे भारी जुने फोटो टाका, आयायटीतली पोरं खरंच इतकी शहाणी असतात का (:ड), आयायटीली पोरं साध्या इंजिनिअरिंगवाल्यांशी मैत्री करतात का, त्यांना पोरी मिळतात का असले काय काय प्रश्न यायचे. आता तसे यायचे कमी झाले की मीच वैतागून आयायटीच्या टॉपिकला म्यूट केलं ते नक्की आठवत नाही, पण दिसायचे कमी झाले हे खरं. आधी उत्साहाने संस्कृत आणि भाषाविज्ञान हे विषय फॉलो केले होते. नंतर त्यात संस्कृत-तमिळ भांडण, नाही तर संस्कृतच कशी श्रेष्ठ छाप कचरा येऊ लागल्यावर दोन्ही अनफॉलो केले.

ट्रोल अगदीच नसतात असे काही नाही. अनेकदा प्रश्न उचकवण्याच्या हेतूने विचारलेलं कळत असतं आणि तरीही लोक ढीगभर उत्तरे लिहितात आणि ढिगभर अपव्होट्स करत बसतात. मागे एकदा भारताला युद्धात पूर्णपणे हरवण्यासाठी पाकिस्तानने कशा प्रकारे हल्ला केला पाहिजे असा काहीसा प्रश्न होता. त्यावर कोणीतरी 'करून तर बघा, मग दाखवतो' टाईप उत्तर दिलं होतं आणि ते बरंच पापिलवार झालं होतं. कोरा फेसबुकपेक्षा कसे भारी आहे असले प्रश्न आणि उत्तरे पण बरीच असतात. उत्तरे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रियांना अपव्होट किंवा डाऊनव्होट करता येते. फार डाऊनव्होट मिळाले की उत्तर कोलॅप्स होतं असा काहीतरी प्रकार आहे. काही मॉडरेटर्स पण असतात. एकुणात कमी ट्रोलिंग दिसण्याचं हे कारण असावं.

साईटचा युजर इंटरफेस फार काही सुखद आहे असं नाही. त्यात अनेकदा बदल न सांगता केले जातात, केलेल्या सूचनांकडे फार लक्ष दिले जात नाही म्हणून सोडून जाणारे पण दिसतात.

आपला बॅटमॅन अधूनमधून मराठी काव्य वगैरे विषयांवर इंग्रजीतून बॅटिंग करतो तिथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ मिहीर सहमत आहे. अनेक प्रश्न हे अगदीच टुकार असतात. काही hypothetical असतात. काहीजण तर पुराणातील गोष्टी कशा खऱ्या होत्या हे उत्तरांत सिध्द करण्याच्या खटाटोपात असलेले मी वाचले आहेत. आणि trolling तर सर्वच ठिकाणी चालत त्याला क्वोरा अपवाद नाही. पण एकंदरीत ते प्रमाण बरेच कमी आहे. आणि trolling ला मर्यादा आहेत. अनेक विषयावर खूप चांगली माहिती उपलब्ध आहे. आणि एका प्रश्नाची अनेक उत्तरे असल्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टीकोन वाचायला मिळतात. अर्थात क्वोरा हे प्रश्नोत्तरांसाठीचे व्यासपीठ असल्यामुळे त्याला पूर्णपणे सोशल नेट्वर्किंग साईट म्हणता येत नाही.
युजर इंटरफेसबद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. क्वोरा तितकेसे युजर फ्रेंडली नाही हेही खरेच आहे. आणि मोबाईल एप तर एकदमच बकवास आणि असंख्य बग्सनी भरलेले आहे.
तरीही सर्वांनी आवर्जून वापरावी अशी ही वेबसाईट आहे असे वाटते. आणि ब्याटम्यानची मराठी साहित्याविषयीची इंग्रजी batting आपण पण पहिली आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>उत्तरे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रियांना अपव्होट किंवा डाऊनव्होट करता येते. फार डाऊनव्होट मिळाले की उत्तर कोलॅप्स होतं असा काहीतरी प्रकार आहे. काही मॉडरेटर्स पण असतात. एकुणात कमी ट्रोलिंग दिसण्याचं हे कारण असावं.<<

पटणेबल कारण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही काहीतरी पाकिस्तानी फिशिंग साईट वाटली नावावरून म्हणून मोबाईलात उघडायचे टाळायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0