फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल

फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल

लेखक - अवधूत डोंगरे

एक फिल्म कॅमेरा घेतला त्यानं, व्हिव्हिटार ह्या कंपनीचा, एन ३८००. निकॉनचा एफएम १०, असा एक कॅमेरा होता, तो जास्त प्रसिद्ध होता. म्हणजे पूर्ण सेटिंगं आपली आपण करावा लागणारा प्राथमिक फिल्म कॅमेरा म्हणून प्रसिद्धीच्या अंगाने निकॉन वरचढ होता, पण तरी त्यानं व्हिव्हिटारचा घेतला, कारण पैशातल्या किंमतीत तो हजारेक रुपयांनी कमी होता आणि जरा जास्त जड, दणकट होता निकॉनच्या कॅमऱ्यापेक्षा.

कॅमेरा घेण्याचं कारण होतं, त्यानं एक फोटोग्राफीचा कोर्स लावलेला. तिथे असा प्राथमिक फिल्म कॅमेरा आवश्यक होता. मॅन्युअल कॅमेरा, काहीच ऑटोमॅटिक नाही त्यात तसं. शिकायला उत्तम, कारण प्रत्येक सेटिंग आपलं आपण करायला लागतं. अठरा–सत्तरची लेन्स होती त्याच्या कॅमेऱ्यासोबत. वाइड अँगल लेन्स अठरा एमएमपर्यंत यायची नि टेलिफोटो सत्तर एमएमपर्यंत जाऊ शकायची. म्हणजे तशी लेन्सपण काही फार भारीतली नाही. पण हे सगळंच मुळापासून शिकण्यासाठी चांगलं होतं. आणि शिकणारा शून्य एमएमवर असेल, तर हे सगळं फारच होतं.

त्यामुळे त्यानं शून्य एमएमवर फोटोग्राफीची सुरुवात केली. आणि त्याच्या शून्याचं वर्तुळ होऊन तो त्यात जबरदस्त रमला, गरगरला. साधारण दीडेक वर्षं तो त्यात कॅमेऱ्यासकट घुसळला जात होता, त्यातून साधारण दीडेक हजार फोटो बाहेर आले.

छातीच्या आतल्या भागात दलदल निर्माण होण्याचा त्याचा अनुभव त्यापूर्वीपासूनचा आहे. नक्की किती वर्षं पूर्वीपासूनचा? माहीत नाही. पूर्वापारपूर्वीचा असेल. पण त्या दलदलीतून बाहेर यायला हवं किंवा त्या दलदलीत बुडायला नको एवढं साधं कळायला त्याला खूप वेळ गेला. पण माझा अंदाज आहे की, त्या दलदलीमुळेच त्यानं फोटोग्राफीचा कोर्स लावला.

प्रत्येक फोटोगणिक त्याला आपलं तोंड दलदलीच्या वरती राहतंय ह्याचा प्रचंड आनंद व्हायचा. किती आनंद? कित्ती आनंद! त्यानं फोटोग्राफीचा कोर्स लावला तो एक वर्षाचाच होता आणि प्रत्यक्षातले वर्ग होण्याचा वगैरे काळ धरला तर नऊ महिने. संध्याकाळी दोनेक तास असायचा वर्ग. त्या नऊ महिन्यांत त्याच्या छातीतल्या दलदलीवर हा आनंद मुबलक पडत होता. शिवाय विशेष म्हणजे त्यानं हा कोर्स केला तेव्हा ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटिंगसुद्धा त्याला करायला मिळालं.

तेव्हाही अशा स्वतःच्या हातानं फोटो प्रिंट करण्याच्या गोष्टीचा शेवटच होत आलेला. पण तरी त्यानं जेव्हा कोर्स केला तेव्हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो प्रिंट करण्यासाठीची डार्क रूम सुरू होती. त्याची बॅच बहुतेक शेवटची. मुळात तेव्हा ब्लॅक अँड व्हाइट फिल्मसुद्धा विकत मिळायची. प्रिंटिंग पेपरसुद्धा, भारीतला नाही, पण मिळायचा. तो एकूणच अनुभव होता. पूर्णच डार्क असलेल्या डार्करूममध्ये रोल धुवायचा, मग लटकावून ठेवायचा. मग जी निगेटीव्ह डेव्हलप करायची असेल, ती दुसऱ्या, बारका लाल दिवा असलेल्या मोठ्या डार्करूममध्ये जाऊन प्रिंट करायची. लोखंडी एन्लार्जरमध्ये निगेटीव्ह ठेवून खाली चार बाय सहा किंवा जास्तीचा प्रिटिंगसाठीचा पेपर ठेवून त्यावर निगेटीव्हची इमेज पाडायची, तिची आपल्या ताकदीनुसार स्पष्टता दिसली की एक्स्पोज करायचं नि मग तो पेपर तीन आडव्या टबांमधल्या केमिकलांमधून डुबचकळवत पुढे न्यायचा; त्यात ती इमेज त्या कागदावर उमटत जाताना स्पष्टच दिसते. मग तो पेपर हिटरवर ठेवून सुकवायचा.

यात तांत्रिक गोष्टी होत्या, पण तरी कॅमेऱ्यातला क्षण तिकडे निगेटीव्हवरून पॉझिटीव्ह उतरताना पाहणं आणि मुळात स्वतःच्या हातानं ते करणं, हा एक अनुभव होता. तो त्यानं घेतला. कलर प्रिंटिंगची सोयही त्याच्या कोर्सच्या वेळी होती, पण निगेटीव्ह बाहेर दुकानांमधूनच डेव्हलप करून घ्यावी लागायची, फक्त पेपरवर इमेज टाकून पॉझिटीव्ह काढण्यासाठी एक छोटी डार्करूम होती, पण कलर प्रिंटिंग फार वेळा करायला मिळालं नाही. त्यामुळे ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटिंगसारखा पाझरत जाणारा अनुभव त्याला घेता आला नाही. पण मुळात छायाचित्र असं त्या रासायनिक कागदावर उमटण्याआधी त्याच्या आतमध्ये जे उमटत गेले होते, ते अनुभव अर्थातच जास्त महत्त्वाचे होते.

झालं काय की, त्यानं एकविसाव्या वर्षी जेव्हा तो कोर्स केला, त्याआधी त्याला वाटायचं, त्याला जंगलातल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडतील. असंच उगाच कायतरी वाटलं, नॅशनल जिऑग्राफिक वगैरे बघून. ती लांबच्या लांब पसरलेली गवतांची कुरणं, तो जमिनीलगत उडत असल्यासारखा वाटणारा चित्ता, तो झेब्र्यांचा कळप, तो बद्द सिंह, तो उदास वाघ, असं बरंच काही बघून त्याला वाटलेलं की, त्याला प्राण्यांचे फोटो काढायला मजा येईल. पण कोर्समधे अॅपर्चर, शटर-स्पीड ह्या गोष्टींचे वापर शिकवल्यानंतर त्यानं पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा वापरला, तेव्हा पहिला फोटो काढला गेला तो शहरातल्या माणूस नावाच्या प्राण्याचा. एका रस्त्याच्या कडेला तारेचं कुंपण घालायचं काम चाललेलं. त्या तारेला हातातल्या पकडीनं फिरवणाऱ्या माणसाचा त्यानं एक फोटो काढला. दुसराही त्याचाच फोटो काढला. आणि मग हेच जास्त सुरू झालं. त्यानं सगळे माणसांचेच फोटो काढायला सुरुवात केली.

(आता हे लिहिताना लक्षात येतंय की, गोष्टी वाक्यात येतायत तितक्या सोप्या नसतात.)

म्हणून / आणि मग त्यानं अशी माणसांच्या फोटोंची लाइनच लावली. रोलांमागून रोल. कधी कलर रोल, कधी ब्लॅक अँड व्हाइट रोल. फिल्म कॅमेऱ्यात डिजिटलसारखा लगेच फोटो तपासता येत नसल्यामुळे एकाच क्षणाचे अंदाजे आणखी फोटो काढायची धडपड.

अरेरे, ती लसूण निवडणारी बाई कधी मरणारे की नाही, नायतर तोपर्यंत तिचे फोटो काढतच बसावं लागेल. पूर्ण काळ्याठार रंगाची, हातांच्या काड्यांची, कपाळावर तिच्या नाकाच्या बोंड्यापेक्षा मोठ्या आकाराचं लालभडक कुंकू लावणारी, हिरव्या चुड्याची, ती पांढऱ्या लसणींच्या पिसाऱ्यात बसलेय. राहू दे. माझ्यापेक्षा तरी जास्त जगू दे. - अरे यार, त्या हातगाडीवाल्याचं कायतरी करा रे.. आयच्चा, हसतोय, केशरी भडक फेटा घालून, उन्हाळ घामाळ शरीरानं हसतोय. - आयल्ला, तो मुलगा खाली वाकला, त्या गर्दीच्या मागून आतलं कायतरी बघतोय, अडीच फुटी मुलगा. शाळा कुठली तुझी? मी तिकडे. - सात दिवस वेगवेगळ्या रंगाचे फेटे घालणारा चांभार. रेड, ग्रीन आणि ब्लू. यलो, मॅजेन्टा, सायान. पांढरा फटक. - चवळीचटक असलेली ही मुलगी किती सुंदर दिसतेय! अफगाण गर्लसारखे आहेत की काय डोळे, चायला, काढू काय फोटो? चालेल ना? - किती लिंबं धरल्येत राव हातावर तुम्ही? तेरा! कमाले राव. - किती वर्षं तुम्ही संन्यास घेतलाय. कसला संन्यास. बसलोय इथे फक्त. तिरपं ऊन खात. - काय सावल्या आल्यात! गोल्डन लायटात उमललेल्या सावल्या. खिडकीतून आल्या नि सावळ्या रंगाच्या सुंदर मुलीच्या चेहऱ्यावर पडल्या. तो तथदधनला. झाडांच्या पानांमधून आल्या नि म्हाताऱ्या सुरकुत्यांमधून खडबडल्या. तो तथदधनला. नदीकाठी कपडे धुणाऱ्या जख्खड प्रकांड म्हाताऱ्याच्या शरीरात घुसल्या. तो तथदधनला. अशा सावल्या पिवळ्यासोनाळ पडत गेल्या. आत आत आत. आणि त्याचं अवघड झालं.

त्याला डार्करूममधून बाहेर पडूच नये असं वाटायला लागलं. फक्त फोटो काढायला बाहेर पडावं. फोटो काढावा नि इथे आत डार्करूममध्ये येऊन बसावं. असा तो पुन्हा छातीतल्या दलदलीत जाण्याच्या मार्गावर आला. त्याला मग ते अवघड गेलं. एका मेंढपाळाचा त्यानं विचारून फोटो काढल्यावर त्या मेंढपाळानं त्याच्याकडे पैसे मागितले. 'कसले पैसे?' 'मग तुम्ही पैसे कमावणार नि आम्ही काय करायचं?' दिले त्यानं पन्नास रुपये. पण हे असं अवघड जाणार होतं त्याला. एक दाढीवाला मुसलमान म्हातारा बिडी पीत, सुकी भेळ खात त्याला म्हणाला, ‘वैसे तो मैं फोटो निकालने नही देता, पर तुम को दिया.' कशाला पण? धुरात संपलेल्या त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्याचा फोटो त्यानं काढलेला. नंतर त्याला सोलापूरचा एक असाच अती म्हातारा झालेला माणूस भेटला, त्याच्या पागोट्याचीच फ्रेम होत होती, फक्त चेहऱ्याचं चांगलं पोर्ट्रेट त्याला मिळालं, आणि मग तो मळका म्हातारा पुन्हा कुठेतरी गल्ल्यांमधल्या अंधारात मिसळून गेला. नंतर एके दिवशी काहीच झालं नाही. नुसतंच संध्याकाळी ऊन आलं नि गेलं. त्याला नुसता एक माणूस भेटला. म्हणाला, ‘ओलकलं काय. ह्म हां. भेटलेलो मागे. ह्म. दोस्ती करायला नको कोनाशी आजकाल. ह्म हां.’ मग त्या खलास माणसानं त्याला एकानं दोस्तीच्या नावाखाली कसं फसवलं ते सांगायला सुरुवात केली. दुसरा एक माणूस त्या माणसाच्या घरी आला नि दोस्तीत चौदा हजार रुपये घेऊन गेला. गेला तो गेलाच. नंतर मग पैसा ही आजकाल कशी महत्त्वाची गोष्ट झालेय त्याबद्दल सांगायला सुरुवात केली. ऊन जात आलं, तसतसा तो माणूसही शांत झाला नि चालायला लागला.

आता हा माणूस राहायचा कुठे माहीतेय काय? त्यानं फोटोग्राफीचा कोर्स ज्या कॉलेजमध्ये केला त्या कॉलेजच्या पाठी एक मैदान आहे फिकट रंगाचं, त्याच्या मागे वडारवाडी आहे, तिथे हा माणूस राहायचा नि त्याला हा आज भेटतोय, कोर्स संपल्यावर तीन वर्षांनी! त्या माणसाचा फोटो काढावासा त्याला वाटला नाही. पण मग त्याला कुणाचेच फोटो काढावेसे वाटेनासं झालं. काढले त्यानं तरीही फोटो. नाही असं नाही. पण ते इतकं कमी होत गेलं की कसं सांगणार?

(आता हे लिहिताना लक्षात येतंय की, वाक्यांमधे काहीही सांगता येत नाहीये स्पष्ट.)

फोटो काढतानाची गोष्ट वेगळी होती. त्याच्या हातात कॅमेरा. भले तो तसा आताच्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत फुटकळ कॅमेरा आहे. अठरा-सत्तरची लेन्स नि त्यात फिल्मचा कॅमेरा म्हणजे काहीच नाही. पण तो ज्या ठिकाणी फोटो काढायला जायचा, तिथे कॅमेरा बॅगेतून काढला की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जायचं. मग फोटो काढल्याकाढल्या डिजिटल कॅमेऱ्यासारखा मागे स्क्रिनवर फोटो दाखवण्याची मागणी व्हायची. 'नाय ओ, हा फिल्म कॅमेरा आहे.' पण त्याच्या आसपासाचं लक्ष त्याच्याकडे जायचं. आणि तो खलास व्हायचा. लोक आपल्याशी बोलण्याऐवजी फक्त आपल्याकडे लक्ष देतायंत हे त्याला सहन झालं नाही.

तसे त्याला खूप लोक भेटले. निर्णायक क्षणाच्या शोधात फिरणारा हेन्री कार्तिए ब्रेसाँ, गर्दीत खुललेला रघू राय, देशादेशांमधे फिरलेला स्टीव्ह मॅकरी, असे त्याचे काही फोटोग्राफर दोस्तही झाले. पण तो त्यांच्यासारखा नव्हता. म्हणजे तो बदलायला तयार होता. फिल्मचं अस्तित्व संपलं, तर आपणही डिजिटल वापरू. जरा कमीअधिक होईल, पण लावतील लोक शोध आणि आणतील तेच रंग डिजिटलमधे. पण पैसे किती वाढतील मग? पण तेही स्वस्त होत जाईल हळूहळू.

त्यामुळे तसा काही प्रश्न त्याच्यापुढे खूप होता असं नाही. पण त्याच्यात त्याच्या फोटोग्राफर दोस्तांएवढाही आत्मविश्वास नसावा का? किंवा त्यानं कधीच स्वतःचा फोटो का काढू दिला नाही? किंवा मग - मग त्याला पांढऱ्या लसणीतल्या काळ्या म्हातारीजवळून जाताना कॅमेरा उचलणंही अशक्य होण्याएवढं गळून जायला का व्हायचं? किंवा सोलापूरच्या म्हाताऱ्याच्या त्यानं काढलेल्या पोर्ट्रेटची मोठी आठ बाय बाराची प्रिंट काढल्यावर त्याचं कौतुक झालं, तेव्हा त्याला लाज का वाटली? किमान तोंड तरी काळं कर, भडव्या.

म्हणून त्यानं अक्षरशः तोंड काळं केलं. त्यानं डार्करूममधून बाहेर यायचंच नाही असं ठरवलं. किंवा खरं म्हणजे त्याला काही ठरवताच आलं नाही नि तो डार्करूममध्ये अडकला. फक्त ही डार्करूम आकारउकार नसलेली, कललेली, उदासलेली होती. चित्रासाठी आवश्यक छायेसाठी आवश्यक प्रकाशापासून तो जो पळाला, तो परत त्या प्रकाशात आलाच नाही.

गोष्टी तशा खूप घडल्या. त्यानं फोटोग्राफी सोडली, त्यानंतर त्यानं एक ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ ह्या नावाची बारकी कादंबरी लिहिली. अजून काही गोष्टीही लिहिल्या. मग अजून एक कादंबरीसुद्धा लिहिली. मग अजूनपण काय-काय लिहिलं. ते सगळं काय तुम्हांला सांगत बसून त्याची जाहिरात मी करण्याचं कारण नाहीये.

त्यानंतर अजून तीनेक वर्षांनी त्यानं कॅमेऱ्यावर एका कवीनं केलेल्या नऊ कविता वाचल्या. आणि तो पुन्हा तथदधनला. त्याचा जन्म झाला त्या आधी पंधरा वर्षं जगातल्या, आशिया असं नाव दिलेल्या, जमिनीच्या एका खंडात व्हिएतनाम असं नाव दिलेल्या एका जमिनीच्या तुकड्यावर एक युद्ध झालेलं. त्या युद्धामध्ये बॉम्बनं होरपळलेल्या एका मंदिरातून एक बारकी मुलगी स्फोटातून भाजत धावत बाहेर आली. नागडी धावली नागड्या जगात. तिला एका फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यानं टिपली. त्या मुलीच्या डोळ्यांतल्या टिपांवरसुद्धा मग ह्याच कवीनं कविता लिहिल्या. हे सगळं वाचून त्याचं डोकं जड झालं. दुखलं नाही. पण ठप्प झालं.

कॅमेऱ्याने टिपलेली टिपं नि टिपांवर कविता.

व्हिव्हिटारच्या त्या कॅमेऱ्यानं आता बोलणं थांबवलंय. तो नुसता कपाटाच्या कोपऱ्यात पडून आहे. लेन्सवर धूळ साठलेय, दोनेक चरेही गेलेत. कॅमेरा सोडलेला तो आता लिहितो. जे दिसेल ते पाहतो, किंवा मुद्दामसुद्धा कायतरी पाहायला जातो. पण त्या गोष्टींचे फोटो काढण्याचं धाडस त्याला होत नाही. नकोसं होतं. त्यामुळे तो ते टिपायचा प्रयत्न करतो, पण लिपीमध्ये. त्यामुळे आता एका अर्थी त्याला कॅमेऱ्याची लिपी नसलेली भाषा सोडावी लागलेय. आणि देवनागरी लिपीत लिहिली जाणारी नि त्याला जमणारी मराठी भाषाच त्याला वापरता येतेय. हे वाईट झालं की चांगलं, माहीत नाही. पण त्याला हेच शक्य होतं.

त्याला दुःख होतं. कळतही नाही. गोंधळही उडतो. पण त्याला फोटो काढण्याचं धाडस होत नाही. ताकदच होत नाही. आणि लिहिल्यावरही त्याच्या आतमधल्या दलदलीवर आनंद मुबलक पडत असतोच. कुठला आनंद जास्त आहे हे त्याचं त्याला माहितेय. त्यानं ते मला सांगितलंयही. पण मी ते तुम्हांला सांगणार नाही. मला ते तुम्हांला सांगायचंच नाहीये. म्हणूनच मी हे लिहिलं. त्यामुळे तसंही तुम्हांला कळलंच असेल.

अरे लिपीबहाद्दर लेखका, किती पळशील? किती लपशील? सगळीकडे लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कुठेतरी टिपला जाशीलच. २०१३ साल आहे हे. टिपला जाशीलच. नि मरून पडशील. वाट पाहा त्या दिवसाची. नायतर वाट लाव स्वतःची. किंवा चाल वाट दलदलीतली. बघ काय झेपतंय ते.

कधीकधी त्याला वाटतं की, गोष्टी वाक्यात येतायंत तितक्या सोप्या नसतात आणि वाक्यांमध्ये काही स्पष्ट सांगता येत नाही. पण हे त्याला कायमच वाटत राहील असा माझा अंदाज आहे. अंदाज बांधणारा मी कोण, तर त्याला ओळखणारा सगळ्यात पुरातन इसम. ह्यातच सगळं आलं. त्याला अक्षरं, त्यांचे शब्द, त्यांच्या ओळी रचायला मजा येतेय. किंवा नुस्त्या शब्दांच्या वस्त्यांमध्ये तो रमलाय, त्याच अँगलला मीपण थांबतो.

- अवधूत डोंगरे
(मोठ्या फोटोंसाठी फोटोवर क्लिक करावे.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

कॅमेरा, लेखणी ह्या साधनांना मात देउन, असे नवे कुठले साधन्/माध्यम असेल जे ह्या प्रवाश्याला पुढे नेईल याचा विचार करत आहे...

असो ब्लॉग वाचायला मजा येते हेही ह्या निमित्ताने सांगून घेतो. धन्यवाद.

रुक जाना नही तू कभी.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"तथदधनला " हे क्रियापद आवडलं. "झपूर्झा" सारखं अर्थवाही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तच आहे. आवडलंय. 'तथदधणे'पण आणि प्रथम+तृतीय पुरुषपण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्यामुळे ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटिंगसारखा पाझरत जाणारा अनुभव त्याला घेता आला नाही.

हा पाझरत जाणारा अनुभव प्रत्यक्षात ज्याने घेतलेला आहे त्यालाच समजतो. लिहायला तितकासा सोपा नसतो. या लेखातल्या विषयासारखाच. फोटोग्राफीत म्हणा, किंवा कुठल्याही कलेबाबत अनुभव घेणं, ते व्यक्त करणं, आणि त्या 'व्यक्ती' बद्दल होणाऱ्या प्रतिक्रिया टिपणं - या सगळ्यात पाझरत जाणंच असतं. हे पाझरणं म्हणजे काय, त्यातून तयार झालेल्या स्वप्रतिमेचं फोटो वाळल्याप्रमाणे कोरडं होणं काय... या स्वच्या 'डेव्हलपमेंट'चा उत्कृष्ट लेखाजोखा घेतलेला आहे.

पण तो त्यांच्यासारखा नव्हता. म्हणजे तो बदलायला तयार होता.

बदलायला तयार नसणारांच्या गोष्टी का कोण जाणे, पण अनेकांना अधिक भावतात. प्रवाहाबरोबर बदलणं, जुनं ते सोनं म्हणत न रहाणं म्हणजे आपल्या भूतकाळाशी केलेली प्रतारणा वाटते. लग्नाच्या बायकोला टाकून देऊन एखाद्या वेसवेला ठेवून घेतल्याप्रमाणे. पण 'बदललो नाही, बदलणार नाही' म्हणणारेही काही ध्रुवताऱ्याप्रमाणे स्थिर नसतात. कधीकधी त्यांना अॅलिसच्या भेटलेल्या राणीच्या देशातल्याप्रमाणे नुसतं एके ठिकाणी रहाण्यासाठी सतत धावावं लागतं.

त्याला अक्षरं, त्यांचे शब्द, त्यांच्या ओळी रचायला मजा येतेय. किंवा नुस्त्या शब्दांच्या वस्त्यांमध्ये तो रमलाय,...

त्याने पाहिलेल्या शब्दांच्या वस्त्यांची चित्रं अजून बघायला आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहज, मन, मेघना भुस्कुटे,
आभार.
--
राजेश घासकडवी,
आभारी आहे. प्रयत्न करेन.
--

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह! मस्तच लिहीलय _/\_
डार्करुमच्या वर्णनाने ब्लोअप आणि जाने भी दो यारो आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिवाळीअंकातल्या आतापर्यंत वाचलेल्या लेखांपैकी सर्वात अधिक भावलेला लेख.

हा पाझरत जाणारा अनुभव प्रत्यक्षात ज्याने घेतलेला आहे त्यालाच समजतो. लिहायला तितकासा सोपा नसतो.

हे अगदी खरयं. अशा एखाद्या अनुभवाबद्द्ल लिहायची उर्मी अनेकदा येते, पण (माझ्या)शब्दांमधे पुरेसं सामर्थ्य नसल्याची जाणीवही होते लगेच. त्यामुळेच असेल कदाचीत, पण या लेखाशी नाळ लगेच जुळली.
त्याच्या शब्दांच्या किंवा चित्रांच्या, ज्या त्याला योग्य वाटतील त्या वस्त्यांमधे आम्हाला जरूर सहभागी करून घ्यावे ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0