माध्यमांचा बदलता नकाशा

ग्युटेनबर्ग. आधुनिक छपाईचा जन्मदाता. १४३९ किंवा त्या आसपास कधीतरी, आपलेच अनेक वेगवेगळे शोध एकत्र करून मोठ्या प्रमाणावर छापील पुस्तकांचं उत्पादन करायला सुरूवात केली. आणि जगाला ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या महाप्रचंड दालनाचं दार प्रथम उघडून दिलं.

या क्रांतीच्या आधीही काहीशा कमी वेगानं ही प्रक्रिया चालू होती. चीनमध्ये जुन्या काळी कागदाचा शोध लागला, इतरही देशांत कागदसदृश काहीतरी वापरलं जात होतं. ठसे होते, अगदी जुजबी छपाई वेगवेगळ्या स्वरूपांत चालू होती. पण अगदी जुन्या काळी ते बहुधा राजांना, सरदारांनाच परवडत असावं. नाहीतर काही हजार वर्षांपूर्वी भारतासारख्या देशात मौखिक वाङमयाची परंपरा नसती. पिढ्यान्-पिढ्यांच्या मेंदूंचा वापर मंत्र-स्तोत्रं-काव्य-सूत्रं घटवून, पाठ करून, साठवून ठेवण्यासाठी झाला नसता. पण तो इतिहास तंत्रज्ञानाच्या तत्कालीन मर्यादांचं द्योतक आहे.

'मी आज वीस वर्षं जो अनुभव गाठीशी बांधला तो माझ्याबरोबर नष्ट होणार. माझ्या मुलाला त्याचा पूर्णपणे उपयोग करणं शक्य नाही.' ही भयावह कल्पना आहे. माझे अनुभव, माझं ज्ञान काही ना काही स्वरूपात माझ्या पुढच्या पिढीला मी देण्याचा प्रयत्न करावा, या विचाराला ना काळाचं बंधन, ना संस्कृतीचं. हा आदिम विचार आहे. अन्न, पाणी, श्वास या माझ्या जीवनाच्या अनिवार्य गरजा आहेत, माझी जनुकं पुढे नेण्यासाठी संतती उत्पन्न करावी, आणि आपला जीव शक्यतोवर जपावा या विचारांप्रमाणे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टच्या तत्त्वामागच्या या मूलभूत ऊर्मी आहेत.

१४३९च्या फार फार आधीचं जग कसं होतं याची आता आपल्याला कल्पनाही करता येणं शक्य नाही. 'काला अक्षर भँस बराबर' म्हणणारी माणसं कदाचित त्याकाळी अस्तित्वात असलेल्या अक्षरांपेक्षा जास्त असावीत. ही थोडी अतिशयोक्ती झाली हे मान्य केलं तरी त्या वेळचं आयुष्य हे अंधाराचं होतं. ज्ञानाचे मिणमिणते दिवे कुठेतरी दूर तेवत असायचे, बिरबल बादशहाच्या गोष्टीतल्या थंड तळ्यात उभ्या असलेल्या समाजाला आशा देत. त्या मानाने आता शहरी झगमगाट आहे. रस्त्यात, घरोघरी दिवे आहेत. पुस्तकं, टीव्ही, इंटरनेट, सेलफोन या सगळ्यांतून आपल्यावर अक्षरांचा, चित्रांचा, गाण्यांचा, व्हिडियोंचा भडिमार होत असतो. एके काळचा अंधाराचा प्रश्न जाऊन आता निऑनी झगमगाटाने दिपून न जाण्याचा नवीन प्रश्न निर्माण व्हावा, इतका बदल झालेला आहे.

गेली कित्येक शतकं चालू असलेल्या या बदलानं गेल्या काही दशकांत प्रचंड वेग घेतलेला आहे. संगीत, चित्र, ध्वनी, अक्षरं ही वेगवेगळी माध्यमं एके काळी होती. या सगळ्यांचंच आता डिजिटल क्रांतीतून एकसंधीकरण झालेलं आहे. या माध्यमांद्वारे निर्माण होणाऱ्या कला, ज्ञान, माहिती, बातम्या आणि करमणूक यांवरही या क्रांतीचा परिणाम झाला तर नवल नाही. हा बदल झालेला आपल्याला तुकड्यातुकड्यांतून दिसतोच. एके काळी बातम्यांसाठी वर्तमानपत्रं, वाचनासाठी पुस्तकं आणि करमणुकीसाठी प्रत्यक्ष सादर केलेले कार्यक्रम - नाच, गाणी, नाटकं असायची. त्यानंतर हळूहळू रेडियो, फोन, सिनेमा, टीव्ही, म्युझिक प्लेअर्स या सगळ्या गोष्टींनी या तिन्हींच्या सीमारेखा धूसर केल्या. रेडियोवर संगीत आणि बातम्या ऐकू यायला लागल्या. टीव्हीवर बातम्या आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही दिसू लागले. लिखित शब्दांची जागा मोठ्या प्रमाणावर चित्रित आणि उच्चारित शब्दांनी घेतली. इंटरनेट आल्यापासून तर या सगळ्याचंच इतकं प्रचंड मिश्रण झालेलं आहे, की विचारायची सोय नाही. या क्रांतीचं वर्णन करताना माध्यमस्फोट, विचारस्फोट, चित्रस्फोट असेच शब्द वापरावे लागतात.

१४३९पासून ते आत्तापर्यंत प्रचंड प्रवास झाला याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. पण आत्ता आपण नक्की कुठे आहोत? माहिती आणि करमणूक या दोन मुख्य बाबतींत आपली सध्याची वागणूक काय आहे? एक मनुष्य म्हणून आपण या दोन सेवांचा उपभोग कसा घेतो? या सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती व संस्था सध्याच्या उपभोक्त्याच्या गरजा पुरवायला समर्थ आहेत का? पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेल्यांनी त्या वेळचं आसपासचं जग पाहिलं तर त्या वेळी त्यांना आजच्या जगाची कल्पना आली असती का? तीस वर्षांनी काय होईल याची आत्ता कल्पना करता येईल का?

माध्यमांचं आणि त्यातून येणाऱ्या अनुभवांचं विश्व हे खरोखरच एखाद्या भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय अस्थिर प्रदेशाशी करता येईल. नवीन जमीन तयार होते, आधीची बुडून पाण्याखाली जाते. ज्वालामुखींचे स्फोट होतात आणि लाव्हा पसरून काही काळ सुकतो. तो स्थिर होतोय असं वाटतं ना वाटतं तोच एखादा भूकंप होतो, उत्पात होतात, वरची जमीन खाली जाते. डोंगर, पर्वत उभे रहातात. काही वाऱ्या-पाण्याने झिजून जातात. पुढे काय होणार याचा अंदाज ही तर दूरचीच गोष्ट झाली. आत्ताचा नकाशा नक्की काय आहे, कुठे हालचाल चालू आहे, याबाबतही आपल्याला खात्रीने सांगता येत नाही.

अशा बदलत्या नकाशाचा वेध घेण्याचा 'ऐसी अक्षरे'च्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकात आम्ही प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण चित्राचा अंदाज येणं शक्य नाही हे निश्चितच. पण तरीही थोडा अंदाज येण्यासाठी आम्ही काही लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. या बदलत्या नकाशाच्या भूप्रदेशात गेली काही वर्षं वावरलेले, नव्या जमिनींवर नव्यानं उभे राहिलेले काही लोक. त्यांच्या आपापल्या विशिष्ट परिप्रेक्ष्यातून, दृष्टिकोनातून दिसणारं चित्र मांडण्याचा इथे प्रयत्न आहे.

या संकल्पनेखाली काही लेख आम्ही या विभागात सादर करत आहोत. 'खिळे' मध्ये श्रावण मोडकांनी पत्रकाराच्या दैनंदिन जीवनात गेल्या काही वर्षांत कसे बदल झाले हे मांडलेलं आहे. कुमार केतकरांनी मांडलेले विचार त्यांच्या 'कंटेंट इझ किंग' मुलाखतीमध्ये माध्यमांच्या अस्थायीपणावर भर देत या सगळ्यातून शाश्वत टिकून राहील असा विचार मांडला आहे. अपर्णा वेलणकरांच्या 'ही पोरंच आम्हाला फरपटवत पुढे नेणार' लेखात वृत्तपत्रमाध्यमं आणि वाचक यांच्यातल्या दृष्टिकोनांतल्या दरीवर भाष्य आहे. योगेश्वर नवरेंच्या 'सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती' या लेखात या क्रांतीमुळे सिनेमा आणि संगीत व्यवसाय कसा आमूलाग्र बदलला आहे याची माहिती आहे. मराठीत नवीन येणाऱ्या ऑडिओ बुक्सची माहिती स्नॉवेल यांच्या लेखात आहे. तर आतिवास यांनी लिहिलेल्या लेखात बाह्य माध्यमं आणि आतले बदल या दोन्हींमुळे त्यांची लेखनप्रक्रिया कशी बदलली याचं वर्णन आहे. चिंतातुर जंतू यांनी भारतीय चित्रपट आणि तंत्रज्ञान यांच्या संबंधांचा आढावा घेतलेला आहे. या सतत परिवर्तनीय नकाशाची आजची स्थिती व पुढे काय होईल याचे काही अंदाज विविध दृष्टिकोनांतून मांडण्याचा अशा रीतीचा प्रयत्न वाचकांना आवडेल अशी आशा आहे.

शब्दांकनाचं काम राजेश घासकडवी, ऋषिकेश व अदिती यांनी केलेलं आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आपण ज्या संदर्भात वावरतो त्यातून आपला दृष्टिकोन मुख्यत्वे बनतो - हे होणं अपरिहार्य आहे, स्वाभाविक आहे. एका अर्थी आपण आपल्या काळाचं प्रॉडक्ट असतो. आपण मागे-पुढं पहात हा पगडा जाणीवपूर्वक कमी करु शकतो - हा प्रयत्न 'नकाशाचा वेध' घेताना पुरेसा झाला नाही की काय अशी एक शंका येते आहे. कदाचित लेख आटोपता घेतला गेला म्हणून ही शंका बळावत असावी.

उदाहरणार्थः १४३९ च्या आधीचं आयुष्य अंधाराचं होतं - हे मत जरा एकांगी वाटतं. आजही अक्षरओळख नसणा-या माणसांना 'अडाणी' समजलं जातं - त्याच धर्तीचं विधान आहे हे!!

>
मला वाटतं लेखन टिकण्याचा आणि ते टिकवण्याच्या कटकटीचा मुद्दा जास्त होता. शिवाय पाठांतर ही आज आपल्याला सवयीच्या अभावाने जितकी कठीण गोष्ट वाटते, तितकी त्या काळी नसावी.

या विषयावर अधिक चर्चा इथं झाली तर उपयोगी ठरेल. मला उपयोगी ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदाहरणार्थः १४३९ च्या आधीचं आयुष्य अंधाराचं होतं - हे मत जरा एकांगी वाटतं. आजही अक्षरओळख नसणा-या माणसांना 'अडाणी' समजलं जातं - त्याच धर्तीचं विधान आहे हे!!

अंधार हे रूपक म्ह्णून वापरलेलं आहे. जगात वागण्याची जाण-समज यापेक्षा जगाविषयीचीचं मूलभूत ज्ञान व माहितीचा अभाव या अर्थाने ते होतं. जंगलात रात्री वाट काढताना हातात दिवा असणं उपयुक्त ठरतं. त्याकाळी तसे दिवे नव्हते. म्हणून त्या समाजाची 'अडाणी' अशी अवहेलना निश्चितच करायची नाहीये. त्यांनी त्यांच्या हाती जी जुजबी अवजारं उपकरणं होती त्यांच्या सहाय्याने जमेल तशी वाट काढली. त्यापायी अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. किंबहुना त्या पिढ्यांनी आणि त्यानंतरच्या पिढ्यांनी जे कष्ट उपसले, आपलं जग थोडं थोडं उजेडात आणलं त्याची अंतिम परिणती म्हणूनच आजचा उजेड आहे, या चौकटीतून मी विचार करतो.

माहितीच्या उपलब्धतेच्या बाबतीत मानवजात कुठे होती आणि आता कुठे येऊन पोचलो आहोत हे पहा असं दाखवण्यासाठी ते रूपक आहे. यात गुणात्मक मूल्यन करण्यापेक्षा बदलाचा आढावा घेणं हा हेतू आहे.

मला वाटतं लेखन टिकण्याचा आणि ते टिकवण्याच्या कटकटीचा मुद्दा जास्त होता.

अर्थातच. ज्ञानाचं संकलन करून ग्रंथ तयार करणं, ग्रंथांच्या नकला करून त्या जपून ठेवणं हे प्रयत्न वेळोवेळी झालेच. ते अनेक वेळा फसले, कारण पुरेशा कॉप्या झाल्या नाहीत तर वाळवी, दुष्काळ, युद्धं, राज्यांतर अशा अनेक कारणांतून ते ज्ञान नष्ट झाल्याची उदाहरणं माहीत आहेत. पाठांतर हा अशा नकला करण्याच्या प्रयत्नातला एक बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न.

शिवाय पाठांतर ही आज आपल्याला सवयीच्या अभावाने जितकी कठीण गोष्ट वाटते, तितकी त्या काळी नसावी.

याबाबत असहमत आहे. काळाच्या ओघात पाठांतर करण्याची गरज नाहीशी झाल्यावर चटकन ती सोडून दिसण्याचा आजही कल दिसतो. एके काळी लोकांना फोन नंबर पाठ असत. आता कोण करतं? गेल्या वीस वर्षांतला बदल आहे हा. या काळात व्यक्ती बदलल्या नाहीत. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे फोन नंबर जायला लागल्याबरोबर वह्या जाऊन फोनमध्येच ते नंबर साठवले जाऊ लागले. पाठांतर टिकवण्यासाठीही कष्ट असतात. त्यामुळे त्यातून संपूर्ण समाजात किती ज्ञान साठवलं जाऊ शकतं यालाही मर्यादा येतात. आजच्या लायब्रऱ्यांमध्ये जे साठवून ठेवलेलं आहे ते सगळं (किंवा त्यातलं महत्त्वाचं) पाठ करायचं झालं तर काय होईल कल्पना करा. किंबहुना, मोजकंच निवडावं लागल्यामुळे विज्ञानाच्या बाबतीत इ = एम सी स्क्वेअर्ड आणि न्यूटनचे नियम लक्षात रहातील, त्यामागचं कारण/गणित विसरून जायला होईल. मग बाबा वाक्यं प्रमाणं अशी परिस्थिती येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0