सर्पकाल - हृषीकेश गुप्ते

(राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'सर्पकाल' या आगामी कादंबरीतील संपादित अंश.)
पत्र ज्या कागदावर लिहिले गेले तो एक पिवळसर झाक असणारा जुनाट कागद होता. साधारणत: ऐंशीच्या दशकात कार्यरत असणार्या एखाद्या पेपरमिलमधून बाहेर पडलेला. ज्या दौतीत टाक बुडवून पत्र लिहिले गेले, ती दौतही अनोखी म्हणावी अशीच होती. दौत घडीव सर्पाकृती काचेपासून बनली होती. दौतीच्या बुडाला सर्पाकार वेटोळी होती. दौतीचे मुख म्हणजे एका क्रुद्ध सापाने वासलेला आ होता. आतली शाई घट्ट होती. वरकरणी निळीकाळी झाक असलेली; पण भिंगातून पाहिले, तर शाईवर आलेला एक अस्पष्टसा लालसर तवंग नजरेत भरण्याजोगा होता. तो लालसर तवंग रक्तासारखा विखारी वाटत होता. टाक साधा कडुनिंबाच्या फांदीचा बनलेला असला, तरी तळटोकाला निब म्हणून लावलेला दात हा आफ्रिकेत सापडणार्या अतिविषारी मांबा जातीच्या सापाचा होता.
ज्या खोलीत पत्र लिहिले गेले, ती शांत, थंड आणि काहीशी काळोखी खोली होती. ज्या घरात ती खोली होती ते घर गावाबाहेर, गर्द आमराईने वेढलेले असल्याने तिथे अंधार, थंडावा आणि शांतता तसे कायमच नांदत असत. ज्या मेजावर कागद ठेवून ते पत्र लिहिले गेले, तो शिसवी लाकडापासून बनलेला मजबूत असा मेज होता. ज्या हातांनी ते पत्र लिहिले गेले, ते हात गेली अनेक वर्षे अशी पत्रे लिहिण्याचे काम करत होते. पण आजवर इतके हुकमी पत्र लिहिण्याची वेळ त्या हातांवर कधीही आली नव्हती. पत्र लिहिणार्या हातांनी पत्र लिहून झाल्यावर एका जुनाट लिफाफ्यात ते पाकीटबंद केले. अत्यंत काळजीपूर्वक ते पत्र घरातच तयार केलेल्या खिमटीने चिकटवले आणि मग ते पत्र पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाले.
पत्र ज्या घरात लिहिले गेले होते, त्या घरासमोरच्या रस्त्यावरून एका हातगाडीवर भाजी विकणार्या भाजीवाल्याने 'एयऽऽ भाजीवालेऽऽ' अशी हाळ घातली, तेव्हा घरातून एक कामवालीसदृश बाई बाहेर आली. तिने भाजीवाल्याकडून निवडक भाजी विकत घेतली आणि मग नोटांच्या गड्डीसोबतच त्याच्या हातात ते पत्रही सोपवले. पत्र पाकिटबंद असले तरी ते निव्वळ एका पाकिटात बंद केलेले नव्हते. पत्राभोवती एकात एक टाकलेल्या अशा अनेक पाकिटांच्या संरक्षक भिंती होत्या. ते पत्र हाताळणे ही तशी जोखमीची बाब होती. भाजीवाल्याने ते पत्र बोटांच्या चिमटीत अत्यंत काळजीपूर्वक पकडले आणि नंतर भाजीच्या एका रिकाम्या पोतडीत हलकेच सरकवले. भाजीवाला मग काहीही न बोलता हातगाडी ढकलत तिथून पुढे सरकला. त्या घरापासून थोडे पुढे आल्यावर भाजीवाल्याने, रस्त्याला वळसा घालत वाहणार्या नदीच्या पात्राजवळच्या सखल भागात हातगाडीवरची उरलीसुरली भाजी टाकून दिली. आता भाजीच्या त्या रिकाम्या पोतड्यात फक्त ते पाकीट उरले होते. भाजीवाला पाकीट असणारे ते पोतडे घेऊन मग तसाच रिकामी हातगाडी ढकलत मुख्य गावाच्या दिशेने पुढे सरकला. त्या पत्राच्या आभेचा स्पर्श हातगाडीवरल्या भाजीला झाला होता आणि आता ती भाजी सुरक्षित राहिली नव्हती, हे अनुभवाअंती भाजीवाल्याला ठाऊक होते. ज्या खळग्यात भाजीवाल्याने भाजी टाकली होती, त्या खळग्यात कायम एखादे भटके कुत्रे वा मांजर, कधी कधी एखादे पाखरू मेलेले आढळे. दोनेक महिन्यांपूर्वी त्याच खळग्यात एक भिकारी मेलेला आढळला होता. नगरपालिकेच्या ज्या दोन माणसांनी ते प्रेत बाहेर काढले, ते दोघेही पुढचे काही दिवस उलट्या, जुलाब, बराच काळ बरा न होणारा ताप अश्या व्याधींनी आजारी पडले.
गावातल्या एसटी स्थानकासमोरच्या सिक्स सिटर स्टँडवर भाजीवाला पोहोचला, तेव्हा त्याला पाहताच अंगावर भडक कपडे आणि डोळ्यांवर लालपिवळसर काचांचा गॉगल घातलेला एक तरुण पुढे आला. त्याने भाजीवाल्याच्या हातातले ते रिकामे वाटणारे पोतडे स्वतःच्या हातात घेतले. मग भाजीवाल्याने दिलेल्या नोटा स्वतःच्या खिशात टाकून तो स्वतःच्या सिक्स सिटर रिक्षाकडे वळला. हातातले पोतडे ड्रायव्हरसीटच्या शेजारी ठेवत, गिर्हाईकाची वाट न बघता त्याने रिक्षा रांगेतून बाहेर काढली. इतर सहकारी रिक्षावाल्यांनी आता त्याच्या या अश्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करणे सोडून दिले होते. भाजीवाल्याने रिकामे पोते दिले की, हा पोरगा रांगेतून रिक्षा बाहेर काढत निघतो, हे आता सगळ्यांना ठाऊक होते.
गाव कायमच गजबजलेले होते. शहराकडे वळू लागलेले, तालुक्याचे. मुख्य गावातून बाहेरच्या महामार्गाला लागेस्तोवर रिक्षावाल्याला थोडा वेळच लागला. तोवर अनेकांनी रिकामी सिक्स-सिटर पाहून हात केले, पण रिक्षावाला थांबला नाही. महामार्गावर आठ-दहा किलोमीटर रिकामी रिक्षा हाकल्यानंतर रिक्षावाला महामार्गाच्या कडेला एका नाक्यावर थांबला. खरे तर त्या थांब्याला नाका म्हणता आले नसते. महामार्गावरच्या एका वळणाच्या ठिकाणी जिथे सहसा वाहनांचा वेग कमी होत असे, तिथे बाजूलाच शेजारच्या गावात पिकणाऱ्या भाज्या विकण्यासाठी अनेक लोक भाज्यांचे स्टॉल लावत. रिक्षावाल्याने त्याच ठिकाणी बाजूचा कोपरा पाहून रिक्षा लावली. मग शेजारच्या सीटवर ठेवलेले पोतडे हातात घेऊन तो पायी चालू लागला.
रिक्षावाल्याची चालण्याची दिशा ही वाऱ्याच्या विरोधातली असल्याने शिशिरातले पानगळीचे वारे त्याच्या अंगावर धुळीचे ढग घेऊन चाल करून येत होते. नाका-डोळ्यांत जाणारी धूळ रोखण्यासाठी त्याला सारखा डोळ्यांसमोर हात धरावा लागत होता. डोळ्यांवरचा गॉगलही ही धूळ रोखण्यास असमर्थ ठरत होता. त्याने स्वतःलाच एक शिवी हासडली. आंधळा अजून तरी दृष्टिक्षेपात नव्हता. एरवी तो इथेच कुठेतरी असतो. महामार्गाला लागून असलेल्या अनेक झाडांपैकी एखाद्या झाडाखाली तो पथारी पांघरून बसलेला असतो. समोर ठेवलेल्या वाडग्यात पाच रुपयांची दोन-चार नाणी, दहा-वीस रुपयांच्या एकदोन नोटा कायम पडलेल्या असायच्या. महामार्ग झाला म्हणून काय झाले, या अशा आडठिकाणी आंधळ्याला नेमके कोण भीक देत असेल – हा प्रश्न रिक्षावाल्याला कायम पडे. तसे इतरही अनेक प्रश्न रिक्षावाल्याला कायम पडत. जसे की, ही पत्रे कोण लिहिते? ही पत्रे नेमकी कुणाकडे जातात? पाकिटावर पोस्टाची तिकिटे लावलेली असूनही ही पत्रे आपल्या शहरातल्या पोस्टात का टाकली जात नाहीत? असे एक ना अनेक! पण आपल्याला दरमहा, दर पाकिटामागे मिळणारे नोटांचे बंडल हे सारे प्रश्न अनुत्तरित ठेवण्यासाठीच मिळते हे रिक्षावाल्याला माहीत होते.
शेवटी एकदाचा रिक्षावाल्याला आंधळा दिसला. रिक्षावाला चालत होता त्या साईडपट्टीच्या विरुद्ध दिशेला एका आंब्याच्या झाडाखाली आंधळा बसला होता. रिक्षावाल्याने समोर पाहिले. पलीकडे जाण्यासाठी त्याला महामार्ग ओलांडावा लागणार होता. रस्त्यावरून सातत्याने मोठमोठाल्या गाड्या घूऽऽऽम असा आवाज करत वेगाने निघून जात होत्या. ट्रेलर, टँकर, ट्रक, छोट्यामोठ्या कार, सिक्स सिटर एका ना अनेक. रिक्षावाला क्षणभर थांबला, त्याने दोन्ही दिशेने मान फिरवत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा अंदाज घेतला आणि मग त्याने वेगाने पावले टाकत महामार्ग ओलांडला.
आंधळा समोरच बसला होता. रिक्षावाला त्याच्यासमोर येऊन उभा राहिला, पण आंधळ्याने रिक्षावाल्याची चाहूल लागण्याची पावती देणारी एकही हालचाल केली नाही; त्याच्या नजरेवरून जणू आपल्यासमोर कुणी उभे आहे हे त्याच्या गावीही नव्हते. रिक्षावाल्याने हातातले पोतडे उलटे करत हलवले. पोतड्यातून भाजीचा उरलासुरला कचरा आणि ते पत्र बाहेर पडले आणि मग रिक्षावाला काहीही न बोलता पाठ फिरवत मागे वळला.
आंधळ्याला ते पत्र दिसले का, आपण येऊन ते पत्र तिथे टाकून गेलो आहोत हे त्याला कळले का, त्या पत्राचे आता आंधळा आता काय करणार, वगैरे कोणतेही प्रश्न स्वतःला पाडून घ्यायचे नाहीत हे एव्हाना रिक्षावाला शिकला होता. शिवाय स्वतः रिक्षावाल्यालाही आंधळा त्या पत्राचे नेमके काय करतो हे पाहण्यात अजिबातच रस नव्हता. एरवी सिक्स-सिटर स्टँडवर ज्या मित्रमंडळींत तो वावरायचा त्यांच्यापैकी त्याने कुणाला हे सांगितले असते तर त्यांनी त्याला वेड्यातच काढले असते. पण रिक्षावाल्याला आंधळ्याची तशी थोडी भीतीच वाटायची. भीती का वाटायची, कशामुळे वाटायची हे तो सांगू शकला नसता, पण भीती वाटायची हे मात्र खरे! तो इतर आंधळ्यांसारखा नव्हता. म्हणजे त्याच्यात काहीतरी खास वेगळे होते हे नक्की, आणि जे काही वेगळे होते ते भीतिदायक होते.
भीतिदायक! किती त्रोटक शब्द होता हा! तसा आंधळा दिसायला देखणा होता. गोरा रंग, सरळ नाक, डोक्यावरचे केसही कुरळे आणि थोड्या सोनसर छटेचे होते. बघणाऱ्याच्या अंगावर शहारा यायचा तो आंधळ्याचे डोळे पाहिल्यावर. आंधळ्याच्या बुब्बुळांमध्ये काळी बाहुली नव्हती. आंधळ्याची बुब्बुळे पांढरीशार होती. त्यात इतर कोणत्याही रंगाची छटा नव्हती. त्यामुळेच आंधळा जेव्हा नजर वळवून बघायचा, तेव्हा समोरच्या माणसाच्या सर्वांगाला एक सूक्ष्म कंप सुटल्याशिवाय राहत नसे.
एरवी वर्षभरात चोवीस तास रिक्षा चालवून मिळणार नाहीत एवढे पैसे या एका कामाचे मिळायचे म्हणून, अन्यथा रिक्षावाल्याने हे काम कधीही केले नसते. एकूणच या संपूर्ण प्रकरणात काहीतरी विशेष गौडबंगाल होते, हे एव्हाना त्याला कळून चुकले होते. पत्र पोहोचवण्याच्या दर फेरीनंतर भोवळ येणे, मळमळणे हे सगळे व्हायचेच; पण त्या एक-दोन दिवसात सतत आपल्या पाळतीवर कुणीतरी आहे असा भास त्याला व्हायचा. विशेषतः तिन्हीसांज उलटल्यानंतर. थोडे दिवस उलटले की, मग ही सारीच शारीरिक आणि मानसिक लक्षणे ओसरू लागत. एक वेळ भोवळ येणे, मळमळणे सारखा शारीरिक त्रास परवडला; पण ही जी भीती वाटायची, वा सतत जो मागावर कुणीतरी असण्याचा भास व्हायचा, तो मात्र आताशा त्याला नकोसा झाला होता. पण काम बंद करण्याची सोय नाही. एकतर अंगावर कर्ज होते. ते असे दिवसरात्र रिक्षा चालवून फिटणारे नव्हते. आणि कुठे तरी, कुणीही न सांगता, त्याला मनाशी ठाऊक होते की, आपल्याला हे काम आता मरेपर्यंत सोडता येणार नाही. या सगळ्याच विचारांनी मनात भयाचे भरते धरले तशी त्याने घाईघाईने पावले टाकत महामार्ग ओलांडला. तो पलीकडे आला. रिक्षात बसून त्याने मुकाट रिक्षा सुरू केली आणि तो लवकरात लवकर आंधळ्याच्या दृष्टिक्षेपातून नाहीसा झाला.
रिक्षा दृष्टीआड झाल्यानंतर काही काळ सरला आणि मग आंधळा जागेवरून उठला. त्याला दिसत नसले तरी त्याची ध्वनिक्षमता अद्वितीय होती. अजून साधारण पाच मिनिटे म्हणजेच तीनशे सेकंदांनंतर त्याला इच्छित स्थळी नेणारी एसटी येणार होती हे त्याला कळले होते. वाहणाऱ्या हवेतून त्याला लवकरच येणाऱ्या एसटीच्या इंजिनाची स्पंदने काही वेळापूर्वीच जाणवली होती. त्याने आपली पथारी उचलली, झटकली, तिची गुंडाळी करून त्याने ती काखोटीला घेतली. ज्या डब्यात लोकांनी पैसे टाकले होते, तो डबा त्याने आंब्याच्या झाडामागे ठेवलेल्या सॅकमध्ये टाकला आणि तो झपझप पावले टाकत महामार्ग ओलांडत पलीकडच्या बाजूला निघाला. एसटी थांबा पलीकडेच होता. एरवी त्याचे डोळे न बघता त्याला कुणी नुसते दुरून चालताना पाहिले असते तर हा आंधळा आहे यावर कुणाचा विश्वासही बसला नसता.
आंधळे का कधी असतात? आंधळे का कधी चालतात?
तो थांब्यावर यायला आणि एसटी तिथे पोहोचायला जवळपास एकच गाठ झाली. थांब्यावर त्याच्याशिवाय आणखी कुणीही नव्हते. तो आत चढताच कंडक्टरने निमूट पनवेलचे तिकीट कापले आणि त्याच्या हातात थोपवले. त्यानेही तिकिटाचे मोजके आणि नेमके सुटे पैसे कंडक्टरला दिले. गेले काही महिने हा आंधळा याच थांब्यावर बस थांबवून आत चढतो आणि नेमाने पनवेलचे तिकीट घेतो, हे एव्हाना कंडक्टरला माहीत झाले होते. कंडक्टरच्या शेजारच्याच तीन आसनी सीटवर खिडकीच्या बाजूला तो बसला. एसटी वारा कापत पनवेलच्या दिशेने धावू लागली.
या घटनेनंतर साधारण तासाभराने पनवेल पोस्ट ऑफिसमधून पोस्टमन सोनावणे त्या दिवशीच्या टपाल वितरणासाठी बाहेर पडत असतानाच त्याला आंधळा दिसला. आंधळा बाहेरच ठेवलेल्या भल्यामोठ्या पोस्टपेटीत पत्र टाकत होता. अलीकडे हा आंधळा सोनावणेला वारंवार पत्रपेटीत पत्रे टाकताना दिसत असे. सोनावणेला नेहमीप्रमाणेच आश्चर्य वाटले आणि नेहमीप्रमाणेच बरेचसे प्रश्नही पडले.
हा आंधळा एवढी पत्रे कुणाला लिहितो?
मुळात त्याला पत्रे लिहिता येतात का?
त्याला पत्र लिहिता येत नसतील तर तो पत्र कुणाकडून लिहून घेतो?
मुळात तो पत्र लिहायला इतर कुणाची मदत घेत असेल तर ते पत्र पोस्टात टाकायला तो कुणाची मदत का घेत नसेल? का पत्र कुणी दुसरा लिहीत असून आंधळा फक्त ती पोस्टात टाकण्याचे काम करतो आहे?
आंधळ्याकडे पाहत या सर्व प्रश्नांची गर्दी मनात घेऊन सोनावणे सायकलवर टांग मारत असतानाच नेमके आंधळ्याने गर्रकन वळून त्याच्याकडे पाहिले. सोनावणेच्या काळजातून भयाची एक थंड शिरशिरी सर्वांगभर वाहत गेली.
आंधळा मनकवडा असावा अशी शंका आजकाल सोनावणेच्या मनात घर करू लागली होती. कारण तो जेव्हा-जेव्हा आंधळ्याकडे पाहायचा त्या-त्या वेळी आंधळ्याला ते कसे कुणास ठाऊक, पण कळायचे; कारण प्रत्येक वेळी सोनावणे त्याच्याकडे पाहत असताना त्याने सोनावणेकडे वळून पाहिले होते.
त्या पाहण्याला पाहणे तरी कसे म्हणणार?
एकमेकांकडे पाहण्याचे काही रूढ आणि अव्यक्त संकेत असतात. आंधळ्याच्या पाहण्यात असे काही नसायचे. तो मान वळवून सोनावणेच्या दिशेने पाहायचा त्यावेळी त्याची ती पांढरी फटक बुब्बुळे तेवढी समोर दिसायची. त्या बुब्बुळांमध्ये बाहुल्या नव्हत्या त्यामुळे आंधळा कुठे पाहतोय हे कळणे तसे अशक्यच होते. तरीही सोनावणेला तो आपल्याकडेच पाहतोय याची खात्री असायची. आंधळ्याची ती बिनबाहुल्याची बुब्बुळे थेट काळजाशी दृष्टिभेट घडवत. प्रत्येक वेळी आंधळ्याने वळून पाहिले की, काळजातून एक सूक्ष्म जीवघेणी कळ येई.
आंधळा सर्वप्रथम दिसला तो दिवसही सोनावणेला अगदी स्पष्ट आठवत होता. ते उन्हाळी दिवस होते. पोस्टातली वीज गेली होती. पंखे फिरायचे बंद झाले होते. उकाडा आणि उष्मा दोन्ही असह्य होऊन सोनावणे थोडा वेळ मोकळी हवा घ्यायला बाहेर आला होता. पनवेल पोस्ट ऑफिसच्या बाहेर दोन चार भलीमोठी चिंचेची झाडे होती. ती सावल्यांसोबतच एक प्रकारचा थंडावाही पोस्ट ऑफिसच्या अंगणात कोरत. बरेचदा पोस्ट कर्मचारी या झाडांच्या सावल्यांमध्ये उभे राहून दिवसभराच्या कामाचा शीण घालवत असत. तो दिवस सोनावणेचा होता. सोनावणे बाहेर पडायला आणि समोरच्या रस्त्याने आंधळा पोस्ट ऑफिसच्या दिशेने पावले टाकत यायला एकच गाठ पडली.
ती चालच विचित्र होती. म्हणजे पावले टाकण्यात एक प्रकारचे अडखळलेपण होते, नाही असे नाही; पण निव्वळ त्या चालीवरून ही व्यक्ती आंधळी आहे असा ठोकताळा बिलकुलच बांधला आला नसता. त्या चालीत एक प्रकारचा पावलाखालच्या वाटेचा अंदाज घेणे होते. चार-आठ पावले पुढे टाकल्यावर तो एकदम क्षणभर थांबत होता. अगदी क्षणभर. सेकंदाच दहावा हिस्सा म्हणा ना! एवढ्या पळभर. पण तो थांबत होता हे नक्की. नंतर विचार केल्यावर सोनावणेला वाटले , की जणू चार पावले टाकल्यावर त्याचे पाय पुढच्या खाचखळग्यांचा अदमास घेत होते. जणू त्याचे पाय हीच त्याची नजर होती. पण त्या वीज गेल्या-दिवशी आतल्या उष्म्यापासून जीवाला थंडावा देण्यासाठी सोनावणे पोस्टातून बाहेर आला, त्यावेळी त्याला आंधळ्याकडे पाहून जे जाणवले ते वेगळेच काहीतरी होते. अशी जाणीव आजवर त्याच्या मनाला जणू कधी स्पर्शूनच गेली नव्हती.
ती जाणीव म्हणजे स्पर्शासारखी एखादी जाणीव होती का? एखाद्या गिळगिळीत, विसविशीत स्पर्शाची जाणीव!
ती जाणीव म्हणजे आतड्याबाहेर काढणारी, पोटाच्या तळापासून भडभडून वर आलेली एखादी उमाळ्यासारखी जाणीव होती का? का ती जाणीव म्हणजे एखादा गंध होता? घ्राणेंद्रियांनी आजवर कधीही न अनुभवलेला असा गंध? ज्या गंधाला ना सुगंध म्हणता आले असते ना दुर्गंध, असा गंध!
आंधळ्याच्या त्या विचित्र चालीकडे पाहताना सोनावणेसाठी जणू सभोवतालचे सारे ध्वनीही मूक झाले. एकच आवाज कानावर पडत राहिला. तो होता सर्रकफर्रक असा सरपटण्याचा आवाज. सोनावणे भानावर आला, त्यावेळी आंधळा त्याच्या शेजारून पोस्टाच्या दिशेने जात होता. सोनावणे मान वळवून दुसरीकडे पाहणार एवढ्यात आंधळ्याने मान गर्रकन वळवून सोनावणेकडे पाहिले. नेमक्या त्याचवेळी त्याची ती पांढरी बुब्बुळे सोनावणेच्या नजरेस पडली. विंचवाचा डंख झाल्याप्रमाणे सोनावणे दचकला.
गावाकडे, कोकणात लहानपणी सोनावणे पोहण्यासाठी जुन्या विहिरीत उडी घ्यायचा. विहीर अंधारी होती. खोल होती. आत उडी घेतल्यापासून शरीराला पाण्याचा स्पर्श होईस्तोवर काही सेकंदांचा काळ लागायचा एवढी खोल. वरून खाली नजर टाकली की डोळ्यांत घुसायची ती निबिड अंधाराची गोलाकार बांगडी. आंधळ्याचे डोळेही तसेच होते. त्या पांढऱ्याशार बुब्बुळांमध्ये जणू एक अदृश्य, काळीशार विहीर लपली होती. क्षणार्धात पाहणाऱ्याला गिळून टाकणारी विहीर. आंधळी तरीही जहरी.
तो दिवस सोनावणे कधीही विसरला नाही. सोनावणेच नव्हे तर उभे पोस्ट ऑफिस तो दिवस कधी विसरले नाही. वीज जाणे ही स्मृतीत राहण्याची खूण होतीच, नाही असे नाही; पण पनवेलमध्ये अधूनमधून वीज जातच असे. त्यामुळे त्या दिवशी वीज गेली होती ही खूण तो दिवस आठवणीत राहण्यासाठी पुरेशी नव्हती. तो दिवस सोनावणेच्या कायम स्मृतीत राहिला कारण त्या दिवशी पोस्टातल्या एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली. अन्नातून विषबाधा! डॉक्टरांनी तरी हेच निदान केले. तो उभा दिवस आणि पुढचेही एक-दोन दिवस पोस्टातल्या त्या कर्मचाऱ्यांना मळमळणे, भोवळ येणे, उलटी होणे असे त्रास झाले. एकावेळी एवढ्या जणांना ही बाधा झाली म्हणून एका स्थानिक दैनिकाने बातमीही केली. त्यावेळी सोनावणेने या घटनेवर फार विचार केला नाही, पण जसजसे दिवस गेले आणि आंधळ्याचे पोस्टात पत्र टाकायला येणे वाढले तसतशी सोनावण्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली.
पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना झालेल्या विषबाधेचा आणि आंधळ्याच्या पोस्टात येण्याचा काही थेट सबंध तर नसावा.
शंका इतकी हास्यास्पद होती की, ती सर्वप्रथम मनात डोकावताच स्वतः सोनावणेनेच मोठ्याने हसून ती मनातून बाहेर भिरकावून दिली होती. पण पुढल्या काही दिवसांतच पुन्हा पोस्टातल्या काही कर्मचाऱ्यांना अगदी तसाच त्रास झाला. या वेळची त्रासाची तीव्रता कमी होती; पण काही जणांना मळमळ, भोवळ येणे हे अनुभव आले. असे आणखी एक-दोनदा झाले. भोवळ येणे, मळमळणे याची तीव्रता कमी कमी होत गेली. पण पोस्टातल्या लोकांना तो त्रास मात्र अधूनमधून होत राहिला. सोनावणेने एव्हाना लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. त्याचे निरीक्षण एका अत्यंत धक्कादायक अनुमानाशी येऊन थांबले.
ते अनुमान होते – जेव्हा जेव्हा आंधळा पोस्टात पत्र टाकायला येतो, तेव्हा तेव्हा अल्पश्या प्रमाणात का होईना पण पोस्टातल्या कर्मचाऱ्यांना भोवळ येणे, मळमळणे हे त्रास होतात. हे अनाकलनीय होते, अतर्क्य होते; पण वारंवारिता ज्या निष्कर्षावर अंगुलिनिर्देश करते तो निष्कर्ष खरा मानून पुढे सरकायचे हे सोनावणेच्या अल्पशिक्षित बुद्धीला माहीत होते. सोनावणेला माहीत नव्हते ते हे की, आंधळ्याने ज्या दिवशी सर्वप्रथम पोस्ट ऑफिसच्या प्रांगणात पाऊल ठेवले त्या दिवसापासून परिसरातील उंदरांची संख्या रोडावलेली आहे.
गर्द आमराईने वेढलेल्या त्या घरातल्या त्या काहीश्या काळोख्या आणि थंड खोलीत शिसवी टेबलावर लिहिल्या गेलेल्या त्या पत्राचा पुढचा प्रवास तसा सहज सरळ होता.
पत्र पनवेल पोस्ट ऑफिसच्या भल्यामोठ्या पत्रपेटीत पुढील साधारण तासभर इतर निर्जीव कागदांच्या सान्निध्यात तसेच पडून राहिले. दुपारच्या दुसऱ्या प्रहरात त्या मोठ्या पत्रपेटीतील सर्वच पत्रांचे जिल्ह्यानुसार, राज्य आणि प्रांतांनुसार वर्गीकरण करण्यात आले. हे वर्गीकरण करताना पनवेल पोस्ट ऑफिसचा शिक्का त्या पत्रावर मारताना त्याच पोस्ट ऑफिसच्या एका कर्मचाऱ्याच्या अंगाला आधी कंड सुटली आणि मग ती कंड शरीराची आग होण्यात, पुढे उभ्या शरीरभर अंगठ्याच्या पेराएवढ्या मोठ्या लाल गांधी उठण्यात परिवर्तित झाली. त्याने पोस्ट ऑफिसमधल्या अस्वच्छतेला चार मोठ्या आवाजातल्या शिव्या हासडल्या आणि संध्याकाळी घरी गेल्यावर शरीरभर उठलेल्या ह्या गांधी डॉक्टरांना दाखवाव्या असे मनातल्या मनात ठरवले. त्याने थोडी चौकशी केली असती तर त्याला हे कळले असते की, शिक्के मारण्याचे काम करणारा त्याच्या आधीचा कर्मचारी सध्या अंगावर लाल गांधी उठण्याने आजारी असण्याच्या सबबीवरच सध्या रजेवर आहे. अशी रजा घेण्याची त्याची ही पहिली वेळ नव्हती. गेल्या सहा-आठ महिन्यांत अशा लाल गांधी त्याच्या शरीरावर आठ ते दहा वेळा उठल्या होत्या.
पनवेल पोस्ट ऑफिसचा शिक्का मारला गेलेले ते पत्र टपाल खात्याच्या, पुण्याकडे जाणाऱ्या भल्यामोठ्या ट्रकमध्ये इतर अनेक पत्रांसोबत पडले आणि पत्राचा पुढचा प्रवास सुरू झाला. टपाल खात्याच्या पुण्याकडे निघालेल्या ट्रकचा मागचा कंटेनर भक्कम आणि जाडसर पत्र्याच्या धातूने बनलेला होता. त्यामुळेच ट्रक चालवणारा ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतचा सहकारी या दोघांनाही भोवळ येणे वा मळमळणे असा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
पत्र लिहिले गेल्यापासून जवळपास चोवीस एक तासांनंतर पुण्यातल्या मुख्य टपाल कार्यालयात पोहोचले तेव्हा पत्राच्या सहवासात येणाऱ्या लोकांना मळमळ, भोवळ वगैरे जाणवणे बरेचसे कमी झाले होते. पुढचे दोन दिवस पत्र पुण्यातल्या संबंधित उपविभागीय टपाल कार्यालयात फिरत राहिले.
जेधे पोस्टमन लोकमान्य नगरातल्या पोस्ट ऑफिसमधून इतर पत्रांसोबत ते पत्रही घेऊन डिलिव्हरीसाठी निघाला तेव्हा दुपारचे बारा वाजले होते, हवा थंड होती आणि शिशिर ऋतू असूनही आभाळात ढग भरून आले होते. पाऊस पडेल या भीतीपोटी जेेधे पोस्टमनने पत्र टाकण्याचा वेग नेहमीपेक्षा वाढवला. त्यामुळेच तो शुक्रवार पेठेतल्या सुभाष नगर गल्ली क्रमांक तीनमध्ये नेहमीपेक्षा अंमळ लवकरच पोहोचला. ते पत्र घेऊन जेधे पोस्टमन गल्ली क्रमांक तीनच्या मुखाशीच असलेल्या, तुलनेने नवे बांधकाम असणाऱ्या वक्रतुंड सोसायटीतल्या पार्किंग लॉटमधल्या पत्रपेट्यांशी पोहोचला तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. पत्रपेटीतून ते पत्र आत टाकणार एवढ्यात ज्यांच्या नावाने पत्र होते त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईने पोस्टमनला पाहिले आणि ते पत्र पोस्टमनकडून स्वतःकडे घेतले. पोस्टमनही त्या बाईस ओळखत असल्याने त्यानेही त्या बाईकडे ते पत्र सुपुर्द करताना फारसा विचार केला नाही. ज्यांच्या नावे पत्र होते ती व्यक्ती टपालाच्या बाबतीत थोडी जास्तच काटेकोर होती, हे जेधे पोस्टमनला ठाऊक होते. शिवाय ती व्यक्ती दिवाळी, होळीसारख्या सणांदरम्यान अगदी सढळ हाताने बक्षीस देई. पत्र टाकून जेधे पोस्टमन वक्रतुंड सोसायटीच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या डाव्या हाताला क्षणभर कंड सुटली, एवढेच. पुढे सदाशिव पेठेत येईस्तोवर ती कंड हळूहळू ओसरलीही.
जेधे पोस्टमनकडून पत्र स्वतःच्या हातात घेताक्षणी त्या बाईच्या हाताला किंचित झिणझिण्या आल्या. हाताचे कोपर कधी भिंतीवर आदळले की जशा येत अगदी तशा. ती जाणीव फारशी वेदनादायक नव्हती. एरवी ह्या झिणझिण्या, हा झटका अधिक तीव्र असता हे त्या बाईला ठाऊक असण्याचा सबंधच नव्हता. ती नुकतीच ज्या फ्लॅटमधून घरकाम करून बाहेर पडली होती, त्या घरात हात धुण्यासाठी ॲसिड बेस असलेल्या साबणाचा वापर केला जात असे. त्या साबणानेच त्या झिणझिण्या कमी केल्या होत्या हे त्या कामवालीच्या गावीही नव्हते.
पत्र घेऊन ती लिफ्टमध्ये शिरली तेव्हा तिच्यासोबत अजून एक विशीतला तरुणही आत शिरला. त्याने घाईघाईने पाचव्या मजल्यावर जाणारे बटण दाबले. तिने एक हलकी नजर टाकत त्या तरुणाकडे पाहिले. तिला ज्या मजल्यावर जायचे होते त्याच मजल्यावर तो तरुण राहत असे, हे एव्हाना तिला माहीत झाले होते. तो पाचव्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वीच राहायला आलेल्या रायसोनींचा मुलगा होता. वर जाणारा बाण लाल रंगाचा झाला आणि लिफ्ट जागेवरून हालली. पाचव्या मजल्यावर लिफ्ट थांबली तेव्हा तो तरुण आधी घाईघाईने लिफ्टबाहेर पडला. तिने लिफ्टबाहेर क्षणभर त्या तरुणाकडे एक तक्रारवजा नजर टाकली, पण त्याचे लक्ष नव्हते. मग ती सरळ ज्या घरात तिला घरकाम करावयाचे होते त्या फ्लॅटपाशी आली. यावेळी मालक घरात नसतात हे एव्हाना तिला ठाऊक होते. तिच्याकडे एक जादा चावी असायची. तिने त्याच चावीने लॅच उघडले. ती आत शिरणार एवढ्यात तिच्या कानावर एक विचित्रसा आवाज पडला. तिने दचकून आवाजाच्या दिशेने पाहिले. लिफ्टमधून तिच्यासोबत बाहेर पडलेला तरुण त्याच्या फ्लॅटच्या दारात उभा राहून जोराने उलटीचे उमाळे काढत होता. पुन्हा एकदा तसाच विचित्रसा आवाज झाला आणि तो तरुण फ्लॅटच्या दारातच ओकला. कामवालीला हसू आवरेनासे झाले तेव्हा तिने घाईघाईत लॅच उघडले आणि आत शिरत दार बंद करून ती मोठमोठ्याने हसू लागली. तिने बंद केलेल्या त्या दाराच्या दर्शनी भागावर घरमालकाच्या नावाची पाटी होती.
पाटीवर नाव होते, विश्वंभर माडगूळकर.
—
पुण्यातल्या टिळक रस्त्याकडून जो रस्ता भरत नाट्य मंदिराकडे जातो, बादशाहीच्या चौकातून त्या रस्त्याला लागताच उजव्या हाताला गिरे फरसाण मार्ट नावाचे एक मोठे, नव्याने सुरू झालेले दुकान आहे. त्या दुकानाला लागूनच एक गल्ली आत जाते. गल्लीच्या टोकाला मोघे वाडा आहे.
मोघे वाडा अगदी टिपिकल जुन्या पुणेरी वाड्यांसारखा. आत प्रवेश घेताच मोठाला चौक. चौकाच्या चारही बाजूंनी चाळवजा बांधकामाची दोन-दोन खोल्यांची भाडेकरू बिऱ्हाडे तर काही स्वतःच्या मालकीच्या खोल्या असणारी बिऱ्हाडे. चौकाचा वरचा भाग मोकळा. त्यातून थेट आभाळच वाड्यात डोकावते. त्यामुळे चौकात आणि एकूणच वाड्यात नैसर्गिक प्रकाश मुबलक. चौकातले डाव्या हाताचे बांधकाम दुमजली. वरच्या मजल्यावर जायला एक जुना लाकडी जिना आहे. हा जिना जिथे संपतो, तिथूनच वरच्या मजल्याचा सज्जा सुरू होतो. वरच्या मजल्याच्या सज्ज्याच्या पहिल्याच दारावर पाटी आहे, चंद्रशेखर राजेशिर्के, खासगी गुप्तहेर. या दारावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती ही पाटी वाचून क्षणभर सज्ज्यात थबकते आणि ओठांवर एक हलके हसू आणून पुढे सरकते. खासगी गुप्तहेर नावाच्या पाट्या अशा कुठे येता जाता कधीही सापडतात!

पूर्वा वाड्यात शिरली तेव्हा एखादा आवाज वगळता वाड्यात नीरव शांतता होती. हातभर अंतरावर पहुडलेल्या टिळक रोडवरचे काही दाबले गेलेले आवाज कानावर पडत होते, नाही असे नाही; पण त्या आवाजांना जणू कुणीतरी बाहेरच रोखून धरले होते. शांततेला धरूनच वाड्यात एक अधिकचा थंडावा होता. वाड्यातून येणारा एकमेव आवाज खालच्या मजल्यावरच्या एका घरात चालू असणाऱ्या टीव्हीतल्या न्यूज चॅनलच्या वृत्तनिवेदिकेचा होता.
"प्रगती महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास तब्बल पाच तासांनी कमी होणार असला, तरी जवळपास पाच हजार करोड रुपये इतके बजेट असणारा हा प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे पश्चिम घाटातले जवळपास अडीचशे एकर जंगल धोक्यात येणार असून इथल्या जैवसंपत्तीलाही कायमची हानी पोहोचणार आहे. त्यामुळे या जंगलाला पर्यावरणवाद्यांचा विरोध असून या विरोधी चळवळीचे नेतृत्व आता अवधूतस्वामींनी आपल्या हातात घेतलेले आहे. अवधूतस्वामी हे…"
सकाळपासून प्रगती महामार्गाविरोधात पर्यावरणवाद्यांनी जो विरोध व्यक्त केलेला होता, त्याविषयक बातम्यांनी जोर धरला होता. सर्वच मराठी न्यूज चॅनलवर त्याच बातम्या वाजत होत्या. खरे तर बंगळुरुला गेल्यापासून पूर्वाचा मराठी न्यूज चॅनलशी फारसा सबंध उरलेला नव्हता. आता तर बाबाही नव्हते, त्यामुळे इथे पुण्याच्या घरातही मराठी वाहिन्या लावण्याचा प्रश्न नव्हता. पण सकाळपासून सोसायटीच्या उघड्या घराच्या दारांतून याच बातम्यांचे आवाज कानावर पडत होते.
पूर्वाने टीव्हीच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि सभोवार नजर फिरवली. गूगल सर्चने तिला जो पत्ता सांगितला होता त्यानुसार ती इथवर येऊन पोहोचली होती, पण या वाड्यात ते कार्यालय नेमके कुठे आहे, हे काही तिला उमगेना. वाड्यातली अर्धी दारे बंद होती, जी अर्धी उघडी होती तिथेही कुणी माणसे दृष्टीस पडत नव्हती. दार वाजवून आतल्या माणसांचे लक्ष वेधून पत्ता विचारावा एवढे धाडस गेल्या काही वर्षातल्या बंगळुरुमधल्या वास्तव्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वामधून कधीचेच गळून पडले होते.
गूगलने पुरवलेल्या माहितीतून तिला जो संपर्क क्रमांक मिळाला होता, त्यावर पूर्वाने सकाळपासून जवळपास डझनभर फोन केले होते. पलीकडे रिंग वाजत होती, पण कुणीही फोन उचलत नव्हते. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहावा, असे वाटून पूर्वाने पर्समधून फोन बाहेर काढला आणि तोच नंबर पुन्हा एकदा दाबला. यावेळी फोन कानाला न लावता तिने नुसताच हातात धरला. रिंग वाजण्याचा जो आवाज तिच्या कानावर पडत होता तो मोबाईलच्या स्पीकरमधून येत होता, का खरोखरीच वाड्यात कुठेतरी रिंग वाजत होती हे क्षणभर तिला कळेना. मग तिच्या लक्षात आलं. वाड्यातल्या त्या शांततेने कुठेतरी व्हायब्रेट होणाऱ्या फोनची स्पंदने पकडली होती. वाड्यातूनच कुठूनतरी 'घॉऽऽ घॉऽऽ' असा आवाज कानावर पडत होता. तो आवाज थांबला तेव्हा पूर्वाने मोबाईलवरून पुन्हा एकदा तोच नंबर दाबला. पुन्हा एकदा वाड्यातनंच कुठूनतरी तो मोबाईल व्हायब्रेट होण्याचा आवाज कानावर पडू लागला. पूर्वाने मान वर करत जिन्याच्या दिशेने पाहिले. मोबाईल वरच्या मजल्यावरून वायब्रेट होत होता. मग पुढचा कोणताही विचार न करता पूर्वाने तो जिना चढायला सुरुवात केली. जिना संपून सज्जा सुरू होत होता तिथे पहिल्या खोलीच्या दारावरच पाटी होती. चंद्रशेखर राजेशिर्के, खासगी गुप्तहेर.
पूर्वाच्या चेहऱ्यावरही एक हलके स्मित उमटलं. सकाळपासून जो संपर्क करण्यासाठी तिने एवढी यातायात केली होती तो याक्षणी तिच्या समोर होता म्हणून ओठांवर उमटलेले हसू नव्हते हे! क्षणभर आपण या अशा नावाच्या पाटीसमोर उभ्या आहोत याची तिलाच मौज वाटली. आजवर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, खासगी गुप्तहेर वगैरे शब्द तिने कथाकादंबऱ्यांमधून वाचली होती वा इंग्रजी सिनेमांमधून ऐकली होती. पण आपण प्रत्यक्षात कधी असा खासगी गुप्तहेराचा शोध घेत येऊ हे तिला महिन्याभरापूर्वी स्वप्नातही वाटले नसते. महिन्याभरापूर्वी!
महिन्याभरापूर्वी सगळे कसे नीट चालले होते. बंगळुरुमधल्या आयटी सेक्टरमधले आयुष्य सरळ आणि सुखी म्हणावे असे होते. आणि अर्थात श्रीमंतही. डेटा ॲनॅलिटिक्समधला जिम नायर अलीकडे कँटीनमध्ये आल्यावर स्माईल करू लागला होता. काही दिवसांपूर्वी ऑफिस सुटल्यावर लिफ्टमध्ये भेटला तेव्हा दोघेही कितीतरी वेळ खाली गप्पा मारत उभे होते. एकमेकांचे नंबर शेयर करून झाले होते. मेसेजची देवाणघेवाण सुरू होती. पूर्वाला खात्री होती, की लवकरच तो डेटसाठीही विचारणार याची. पण महिन्याभरापूर्वी भर कॉन्फरन्समध्येच तो फोन कॉल आला आणि सगळेच बदलले.
पायाच्या शूजची लेस बांधता बांधता सतत घॉऽऽ घॉऽऽ करत व्हायब्रेट होणाऱ्या मोबाईल फोनला शेखरने "च्यामारी तुझी गांड. गप ना!" अशी शिवी द्यायला आणि दारात उभ्या तरुणीकडे त्याचे लक्ष जायला एकच गाठ पडली. दारात उभी तरुणी दिसायला आकर्षक होती. गोऱ्या रंगाने त्या आकर्षकपणाला सौंदर्याच्या वर्गात ढकलले होते. तिचा बांधाही सडपातळ होता. त्या सडपातळ बांध्यामुळे तिची उंचीही उठून दिसत होती. दुरूनही डोळ्यांचा घारसर रंग नजरेत भरत होता.
नकळत तोंडून निघालेल्या शिवीमुळे शेखर चपापला. गोंधळला. ओशाळला. त्या मुलीच्या चेहऱ्यावर मात्र एक छान स्मित हास्य उमटले. तिच्या चेहऱ्यावर ताण होता. डोळ्यांखाली काळसर वर्तुळे उमटली होती. पण अचानक काळ्या ढगांच्या सावटातून सूर्यकिरणांचा छोटासा कवडसा बाहेर यावा तसे ते हास्य तिच्या चेहऱ्यावरच्या ताण आणि चिंतेतून बाहेर डोकावत होते.
"झिरो झिरो सेव्हन. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी? शेखर राजेशिर्के ना? मला संध्या सुरवसेनं…" तिने बोलण्यासही सुरुवात केली होती, पण ती इथे कोणत्या उद्देशाने आलीय याचा अंदाज लागताच शेखर तिचे वाक्य मध्येच तोडत उत्तरला, "जुनी माहिती आहे ही. दारावरची ती पाटीही जुनी आहे. जेव्हा बिझनेस सुरू केला होता तेव्हाची. आता मी प्रायव्हेट सिक्युरीटी पुरवतो कंपन्यांना. ती एजन्सीही बंद पडलीय."
"का?"
तिच्या या शांतपणे 'का' असे विचारण्याने शेखर एकदम गप्पच झाला. काय उतर होते या 'का'चे त्याच्याकडे?
काही वर्षांपूर्वी लहानपणीचे स्वप्न म्हणून ज्या बाळबोधपणे त्याने ही खासगी गुप्तहेर कंपनी सुरू केली होती, त्या कंपनीला कधी ग्राहकच मिळाले नाहीत. न म्हणायला नवऱ्याची लफडी पकडण्यासाठी दोन-चार बायका आल्या होत्या. एक-दोनदा त्याने लोकांच्या हरवलेल्या कुत्र्या-मांजरींचा शोध घेण्यासाठीही फी आकारली होती. पण एवढेच. बाकी काही नाही. लोक पाठीवर मोठ्याने हसायचे आणि समोर आल्यावर स्मितहास्य करायचे. पण त्याचा व्यवसाय डिटेक्टिव्हचा आहे हे कळल्यावर लोक, असे ना तसे, हमखास हसायचेच. ही एवढीच त्याची आजवरची या गुप्तहेर व्यवसायातली कमाई होती. पुढे याच व्यवसायातून त्याने खासगी कंपन्यांना, रहिवासी इमारतींना सिक्युरिटी पुरवण्याचे कंत्राट घ्यायला सुरुवात केली. त्या व्यवसायात इतर मोठमोठाल्या हस्ती असूनही त्याने बरा जम बसवला, पण कोव्हिडच्या काळात सगळीच घडी विस्कटली गेली. अनेक कंपन्यांनी वर्क-फ्रॉम-होम सुरू केल्यामुळे आपोआपच सिक्युरिटीची मागणी कमी झाली. बरेचसे कंत्राटी कामगार काम सोडून गेले. डोक्यावर कर्ज होतेच, ते या काळात दुपटीने वाढले. या कर्जाच्या चक्रातून शेखर कधीच बाहेर आला नाही. सुदैवाने अद्यापि लग्न झालेले नव्हते त्यामुळे जबाबदाऱ्या अशा नव्हत्या. वडिलांनी दोन-तीन दशकांपूर्वीच घेतलेल्या कर्वेनगरातल्या एका ऐसपैस फ्लॅटमध्ये तो सध्या आईसोबत राहत होता. आईने आत्ता पंच्याहत्तरी गाठली असली तरी ती ठणठणीत होती. मुख्य म्हणजे खमकी होती. आई आणि वडील दोघेही राष्ट्रीयीकृत बँकेत कामाला होते. आईची पेन्शन आणि वडिलांनी ठेवलेल्या जमापुंजीवर घर चालायला फारशी अडचण नव्हती. आईवडिलांच्या जमेवर त्याने बरेचसे कर्जही फेडले होते, पण मग एके क्षणी आईनेच त्याला ठणकावून सांगितले की, आता बास! आता तुझी कर्जे तू फेडायची. मग त्याने जंगली महाराज रोडवरचे त्याचे वन बी एचके ऑफिस विकून बरेचसे कर्ज चुकते केले. थोडीफार जी कंत्राटे होती त्याचे कामकाज मग त्याने मोघे वाड्यातल्या त्यांच्या या जुन्या घरातून हालवायला सुरुवात केली. तशा वाड्यात मोघे वगळता इतर लोकांच्या मालकीच्या फारश्या खोल्या नव्हत्या. पहिल्या मजल्यावरची त्यांची आणि वाड्यात शिरताच समोरच असणारी गोडांबेंची अशा दोनच खोल्या त्या काळात, मोघे आजोबांनी काही एक पैशांची गरज पडली म्हणून विकल्या होत्या. असे असले तरी वाड्यात दरारा अजूनही मोघ्यांचाच चाले.
दारातली मुलगी न हलता तशीच उभी होती. तिने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शेखर अजूनही देऊ शकला नव्हता. सुरुवातीला तर त्याला ती मुलगी म्हणजे कर्जवसुलीसाठी आलेली कुणी एक्झेक्युटिव्हच वाटली. पण कर्जवसुलीसाठी येणारी माणसे अशी नसतात हे त्याला एव्हाना कळले होते. मधल्या कोव्हिडच्या काळात त्याने अशा माणसांचा पुरेपूर अनुभव घेतला होता.
खरे तर सकाळपासूनच एका प्रायव्हेट लोन कंपनीच्या रिकव्हरी एजंटचे फोन येत होते. काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाईन ॲपवरून त्याने सहज आणि विनासायास, कोणत्याही कागदपत्रांविना मिळतेय म्हणून एक कर्ज घेतले होते. सुरुवातीचे हप्ते त्याने भरले, मात्र एक हफ्ता चुकला म्हणून त्यांनी आधी आठवणीचे आणि आता वसुलीचे फोन करायला सुरुवात केली होती. कोणत्याही क्षणी ते लोक इथे या घराच्या पत्त्यावर येण्याची शक्यता होती. आईसमोर नुसते दाखवण्यापुरते शेखर आज ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडला होता खरा, पण सकाळपासून येणाऱ्या अविश्रांत फोनमुळे त्याच्या मनात कुणीतरी वसुलीसाठी येईल ही भीती वाढीस लागली होती. त्यामुळे त्याने आज लवकर घरी जायचे ठरवले.
"का बंद पडलीये एजन्सी?" त्या मुलीने चिकाटीने पुन्हा प्रश्न केला.
"कोव्हिडनंतर काम उरलं नाही."
शेखरच्या बुटांची लेस बांधून झाली आणि फोनने पुन्हा एकदा व्हायब्रेट व्हायला सुरुवात केली. त्या मुलीने एक नजर समोरच्या टिपॉयवर ठेवलेल्या मोबाईलकडे टाकली आणि तिने शेखरला पुन्हा एक प्रश्न केला, "तुम्ही फोन का नाही उचलत आहात?"
"एक हफ्ता चुकला म्हणून बँकेचे सारखे फोन येतायत. कंटाळलो – भरतो भरतो – सांगून. पण फोन काही थांबायचं नाव नाही घेत. म्हणून सकाळपासून फोन व्हायब्रेट मोडला ठेवलाय." प्रत्युत्तरादाखल ती मुलगी नुसतीच हसली. हसताना तिच्या दोन्ही गालांवर खळ्या पडल्या. त्या मुलीच्या चेहऱ्यात आणि एकूण व्यक्तिमत्त्वात काही तरी आश्वासक आणि सकारात्मक होते.
"माझं एक काम होतं तुमच्याकडे?" तिने काहीशा अडखळत्या स्वरात विषयालाच हात घातला.
"कसलं काम?" शेखरने विचारलं.
"म्हणजे व्यावसायिक काम. माझ्याकडे एक पत्ता आहे, त्या पत्त्यावरून एका माणसाला शोधायचंय. तुम्ही अशी कामं करता ना? म्हणजे कधी काळी करायचात ना? माझ्यासाठी पुन्हा कराल? मी तुमची फी देईन." ही दोन-चार वाक्ये मात्र तिने न अडखळता एका दमात म्हटली.
शेखर क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. त्याचे आयुष्य काही फार सुरळीत वगैरे चालू नव्हते. अकाउंटमध्ये पैशांचा तसा खडखडाटच होता. येणी येत नव्हती, देणेकऱ्यांचे फोन काही वाजायचे थांबत नव्हते. अशा वेळी असे अचानक चालून आलेले काम, तेही कुणालातरी शोधण्याचे. म्हणजे आवडीचे. शेखरला एकाएकी हुरूप आला. गेले काही महिने त्याच्या मनातून गायब असणारी उत्साहाची भावना त्याच्या मनाला क्षणभर स्पर्शून गेली.
"आपली ओळख?" शेखरने काहीतरी विचारायचे म्हणून विचारले.
"ओह सॉरी! मी पूर्वा माडगूळकर." तिने खळ्या पडल्या गालांनी हसत उत्तर दिले.
—
शेखर राजेशिर्के आणि पूर्वा माडगूळकर या दोघांच्या पहिल्या भेटीच्या सुमारे महिनाभर आधी शिशिरातल्या एका संध्याकाळी विश्वंभर माडगूळकर दिवसाभराची कामे संपवून पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील सुभाष नगरातल्या आपल्या घरी परतले तेव्हा घराच्या बंद दाराआड आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे याची त्यांना सुतरामही कल्पना नव्हती.
माडगूळकर चार्टर्ड अकाउंटंट होते. स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस त्यांनी काही वर्षांपूर्वी बंद केली असली तरी ते आजही चाकण एमआयडीसीतल्या काही छोट्यामोठ्या कंपन्यांची कामे विरंगुळा म्हणून करायचे. यामुळे ते रिटायरमेंटनंतरही या वयात व्यग्र राहत हा अधिकचा फायदा होताच. या कामांसाठी त्यांना महिन्यातून एखादी फेरी चाकण एमआयडीसीत मारावी लागे. तो दिवसही अशाच एका चाकणफेरीचा होता. कंपनीची गाडी सकाळी लवकर त्यांना नेण्यासाठी आली होती. सगळी कामे आटोपल्यानंतर त्याच गाडीने त्यांना घरी सोडले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते.
माडगूळकर लिफ्टने वर गेले. पाचव्या मजल्यावरच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिरले. आत सारे काही स्वच्छ आणि आवरल्यासारखे दिसत होते. त्या स्वच्छतेवरून, गेले काही दिवस सुट्टीवर असणारी त्यांची कामवाली बाई रुक्मिणी आज येऊन गेली असावी असा अंदाज त्यांनी बांधला.
हातातली बॅग सोफ्यावर ठेवताना त्यांना ते दिसले.
पाकीट. कागदी पाकीट.
भिंतीवर लावलेल्या टीव्हीखालच्या बुककेसवर होते ते.
सकाळपर्यंत ते तिथे नव्हते; किंबहुना या आधी त्यांनी ते पाकीट कधीही पाहिलेले नव्हते.
याचाच अर्थ ते सकाळच्या टपालाने आले असावे आणि रुक्मिणीने ते खालच्या पत्रपेटीतून वर आणले होते.
टीव्हीच्या दिशेने पावले टाकत ते त्या बुककेसपाशी आले. त्यांनी दुरूनच पाकिटावर एक नजर टाकली.
पाकीट हॅन्डमेड कागदापासून बनवलेले वाटत होते. त्यांनी उजवा हात पुढे करत पाकीट हातात उचलले.
पाकिटाला स्पर्श करताच त्यांच्या बोटांना तीव्र पण सूक्ष्म झिणझिण्यांचा एक अनपेक्षित झटका बसला.
त्यांनी तात्काळ ते पाकीट हातातून खाली टाकून दिले.
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी!
त्यांनी मनाशीच अंदाज बांधला. असे अनुभव आजवर त्यांना आले नव्हते असे नाही. लहानपणापासून धातूच्या एखाद्या पृष्ठभागाला हात लावल्यावर, कधी नायलॉनच्या एखाद्या वस्त्राला स्पर्श केल्यावर अशी झिणझिणी त्यांच्या शरीराने अनुभवली होती. पण कागदाला स्पर्श केल्यानंतर असा अनुभव येण्याची ही पहिलीच वेळ होती.
ते क्षणभर त्या पाकिटाकडे पाहत तसेच थांबून राहिले.
उन्हे कलली होती, त्यामुळे खिडक्यांतून फारसा उजेड आत डोकावत नव्हता. बाहेरून येणारा नैसर्गिक प्रकाश सोडला तर घरात अधिकचा असा उजेड नव्हताच. त्यांनीही घरात शिरल्यानंतर विजेचे दिवे लावले नव्हते. सहसा त्यांना दिवसभर बाहेरून येणाऱ्या नैसर्गिक प्रकाशातच घरात वावरणे पसंत होते. त्यातून खिडक्यांवर लावलेल्या जाडसर पडद्यांनी काळोख्या सावल्यांचे एक काहीसे गर्द अस्तर घरात धरले होते.
आज घरातला प्रकाश त्यांना काहीसा वेगळा वाटत होता.
दिवे लावावे असे का कुणास ठाऊक, त्यांना प्रकर्षाने वाटले आणि त्यांनी वेगाने विजेच्या बोर्डाकडे बोट नेत खट, खट, खट आवाज करत एकावेळी बरीचशी बटणे दाबली.
हॉलमध्ये सर्वत्र दिवे पेटले, सोबत भणाणा आवाज करत सिलिंग फॅनही सुरू झाला.
रुक्मिणी फरशी पुसून झाल्यावर ती लवकर वाळावी यासाठी घरातले फॅन फुल स्पीडने सुरू करत असे. बंद करताना त्यांचा वेग कमी करायला मात्र ती विसरायची. त्यामुळे घरात कधीही पंखा सुरू केला की तो पूर्ण वेगाने भणाणा आवाज करत फिरायला सुरुवात करायचा. आजही तसेच झाले होते.
त्यांनी रेग्युलेटर फिरवत फॅनचा स्पीड कमी केला. मग त्यांचे लक्ष पुन्हा एकदा समोर ठेवलेल्या पाकिटाकडे गेले. त्यांनी हलक्या हातांनी पाकिटाला स्पर्श करत ते उचलले.
यावेळी मात्र काहीही झाले नाही. झिणझिणी नाही आणि झटका नाही.
माडगूळकरांनी खिशाला लावलेला चष्मा डोळ्यांवर चढवत पाकिटावरचा पत्ता वाचला. पत्ता अर्थात त्यांचाच होता. कुणीतरी शुद्ध मराठीत पत्ता टाईप करून तो कागद त्या पाकिटावर चिकटवला होता. पाकीट चांगले जाडजूड होते. त्यामुळे आत भरपूर कागद असावेत असा अंदाज त्यांनी बांधला. पाकिटावर पाठवणाऱ्याचा पत्ता मात्र नव्हता. विमा कंपनी, बँक, मोबाईल कंपनी अशा प्रकारचा पत्रव्यवहार असता तर पाकिटावर त्या-त्या कंपनीचा लोगो आणि पत्ता नक्कीच छापलेला असतो, पण या पाकिटावर मात्र असे काहीही नव्हते. त्यांनी ते पाकीट हातात घेतले आणि ते थेट आपल्या स्टडीमध्ये शिरले. आतल्या स्टडीटेबलावर त्यांनी ते पत्र ठेवले आणि शिरस्त्याप्रमाणे ते टॉवेल, घरात घालायचे कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरले. प्रत्येक वेळी कंपनी व्हिजिट करून आल्यावर आंघोळ करायची हा त्यांचा आजवरचा रिवाज होता.
आंघोळ करून बाहेर आल्यावर त्यांनी आधी देवाची पूजा केली. दिवसभरात सकाळ-संध्याकाळ अशी दोनदा देवपूजा हाही त्यांचा नेहमीचा नियम होता. हा नियम मुळात त्यांच्या पत्नीचा. माडगूळकरांनी पत्नीच्या मृत्यूनंतरही तो चालू ठेवला. ते आस्तिक असले तरी त्यांना देवभोळे म्हणता आले नसते. ते एक स्वतंत्र बुद्धिमत्ता असलेले अनुभवी व्यक्ती होते. त्यांचे वाचन दांडगे होते. घरात मोठी लायब्ररी होती. लायब्ररीत देशीविदेशी पुस्तकांचा मोठा संग्रह होता. त्यांचा स्वतःचा असा अभ्यास होता. जगाविषयी, जगातील अद्भुताविषयी, ज्ञानविज्ञानाविषयी त्यांची स्वतःची स्वतंत्र मते होती.
देवपूजा झाल्यानंतर ते स्वतःच्या स्टडीरूममध्ये शिरले. स्टडीरूम तशी ऐसपैस होती. त्यांनी ही इमारत बनत असतानाच खास स्वतःच्या सोयीने आतली रचना करून घेतली होती. हा मुळातला थ्री बीएचके. पण त्यांनी दोन बेडरूम एकत्र करून त्याची स्वतःसाठी स्टडी कम बेडरूम बनवून घेतली. त्यामुळे या खोलीत त्यांची दोन पुस्तकांची कपाटे, एक लिखाणाचे टेबल, शिवाय एक क्वीन बेड असे सारे काही सहजच सामावले होते.

माडगूळकर आत आले तेव्हा त्यांना घरात सर्वप्रथम काहीतरी जाणवले. हे जाणवणे नेमके काय होते हे त्यांना सांगता आले नसते. पण ती एक अस्वस्थ करणारी जाणीव होती हे नक्की. आत येताच त्यांना त्यांनीच काही वेळापूर्वी आत आणून स्टडी टेबलावर ठेवलेले ते जाडसर पाकीट दिसलं. माडगूळकरांनी ते हातात उचलून घेतले. पाकिटाला स्पर्श करताना मघा बोटांना लागलेला झटक्याचा मनात विचार होता, त्यामुळे माडगूळकरांनी उचलताना पाकिटाला अगदी हलका स्पर्श केला होता. पाकीट जाडसर हँडमेड कागदाने बनलेले वाटत असले तरी आजवरच्या आपल्या सत्तर वर्षे वयाच्या कारकीर्दीत माडगूळकरांनी हा एवढ्या जाडीचा कागद कधीही पाहिला नव्हता. कागद कसला जणू तो लाकडाच्या वखारीतून बाहेर आलेला एक पातळ लाकडी पापुद्रा होता. मग माडगूळकरांनी आपली उत्सुकता फार काळ ताणली नाही. त्यांनी पाकिटाची चिकटवलेली कडा हातानेच ओढली. कडा न फाटता उघडली गेली. माडगूळकरांनी आतला ऐवज बाहेर काढला.
पाकिटाच्या आत साधारणतः त्याच बनावटीचे अजून एक पाकीट होते.
त्या आतल्या पाकिटाची चिकटवलेली कडाही ओढताच न फाटता उघडली गेली.
त्या आतल्या पाकिटाच्या आतही अजून एक पाकीट होते.
कुणी आपली थट्टा करतेय का, असा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला, नाही असे नाही. पण अशा प्रकारे या वयात कुणी त्यांची थट्टा करावी असे त्यांच्या माहितीत कुणीही नव्हते. शिवाय दोन पाकिटांच्या आत दडलेल्या त्या पाकिटात काय आहे, याची उत्सुकताही त्यांना लागली होती.
आतमध्ये चेक असू शकत होता; कॅश असू शकत होती; किंवा एखादा महत्त्वाचा कागद असू शकत होता.
पाकिटात असा ऐवज असू शकत होता, जो पोस्टाच्या प्रवासात गहाळ किंवा खराब होऊ नये म्हणून पाठवणाऱ्याने एवढी काळजी घेतली असेल.
का या पाकिटाच्या आतही अजून एक पाकीट असेल?
माडगूळकरांच्या मनात बरेचसे विचार क्षणार्धात डोकावून गेले.
मग त्यांनी ते सारे विचार बाजूला ठेवले आणि त्या आतल्या पाकिटाची चिकटवलेली कडा हाताच्या बोटांनी हलकेच वर सरकवली. ती कडाही अगदी सहजच वर होत उघडली गेली.
आतमध्ये एक कागद होता.
जुनाट, पिवळसर आणि आजकाल आढळणाऱ्या कागदांपेक्षा थोडा जाडसर कागद.
माडगूळकरांनी तो कागद हातात घेतला.
टपोऱ्या आणि वळणदार अक्षरांत लिहिलेले ते एक पत्र होते. पत्रावरची शाईही तेलसर आणि उठावदार होती.
पत्र माडगूळकरांनाच उद्देशून होते.
पत्राच्या सुरुवातीलाच शब्द होते, प्रिय श्री. माडगूळकर यांस, अनेकोत्तम नमस्कार.
पुढील पत्र वाचण्याआधी माडगूळकरांचे लक्ष पत्राच्या वरच्या बाजूला गेले. पत्राच्या शिरोभागी मधोमध जिथे सहसा श्री किंवा ओम लिहिले जाते, तिथे काहीतरी लिहिलेले होते. काही तरी वेगळे आणि विलक्षण. माडगूळकरांनी चश्म्यातूनच डोळे बारीक करत तिथे पाहिले, पण ते काय होते हे त्यांना कळेना. मग अचानक त्यांना ते जाणवले की, मुळात ती अक्षरे नव्हतीच. ती एक हातानेच काढलेली वळणदार छोटेखानी आकृती होती.
एकमेकांना वेटोळी घातलेल्या सर्पांची आकृती!
—
"मला अजूनही कळत नाहीये, यात मी काय करू शकतो? तुम्ही पोलिसांकडे जायला हवं." बराच वेळ शांत राहिल्यानंतर शेखर म्हणाला. टिळक स्मारक आणि बादशाही रिफ्रेशमेंट्स यांच्यामधून एक बोळ नव्या पेठेत निघतो. त्या बोळातच काहीसा अलीकडेच सुरू झालेला एक कॅफे होता. त्या कॅफेत ते दोघे या क्षणी बसले होते.
शेखरला आज ऑफिसमध्ये बसायचे नव्हते. बँकेतून सारखे कर्जवसुलीचे फोन येत होते. कुणीतरी अचानक ऑफिसमध्ये येऊन धडकेल अशी त्याला सारखी भीती वाटत होती म्हणून काहीतरी कारण काढून तो ऑफिसबाहेर पडून पूर्वासोबत इथे येऊन बसला होता. पूर्वाचे वडील साधारण पंधरा दिवसांपूर्वी हार्ट अटॅक येऊन गेले होते, असे तिने त्याला नुकतेच सांगितले होते. तिला त्यांचा मृत्यू संशयास्पद वाटत होता आणि त्या मृत्यूसंबंधात थोडी अधिकची चौकशी, तपास शेखरने करावा यासाठी ती शेखरकडे आली होती.
"पोलिसांचं म्हणणं आहे की मृत्यू नैसर्गिक आहे. आम्ही काही करू शकत नाही." पूर्वा अजिजीने म्हणाली.
"तुम्हाला कळत नाहीये, पूर्वा. कथाकादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये ज्या प्रकारे डिटेक्टिव्ह असतात तसा डिटेक्टिव्ह नाहीये मी. मुळात असे डिटेक्टिव्ह प्रत्यक्ष आयुष्यात नसतातच. प्रत्यक्ष आयुष्यात गुन्हा घडलेला असेलच, तर तो डिटेक्टिव्ह नाही तर पोलिस सोडवतात."
"मला कोणताही गुन्हा सोडवण्यासाठी तुमची मदत नकोय."
"मग?" शेखरने चमकून पूर्वाकडे पाहत विचारलं.
"तुम्ही माझं आधी नीट ऐकून घ्याल का?" पूर्वाच्या स्वरात आता अगतिकता डोकावायला लागली होती. मगासपासून ती या मुलाला काही समजावू पाहत होती, पण तो काही म्हणून ऐकून घ्यायला तयार नव्हता. ती सहजच एखाद्या वेगळ्या आणि काहीश्या मोठ्या पंचतारांकित डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेऊ शकली असती. तिला ते परवडलेही असते, पण तिला ज्या गोष्टींचा शोध घ्यायचा होता त्यासाठी तिला असे कुणीतरी हवे होते ज्याला ती विश्वासात घेऊ शकणार होती. या मुलाकडे पाहिल्यावर ती विश्वासार्हता लगेचच जाणवत होती. शिवाय संध्याला ज्या प्रकारे तिच्या प्रॉब्लेममध्ये त्याने मदत केली होती त्यावरून तो आपल्यालाही मदत करू शकेल याची पूर्वाला खात्री होती.
रुक्मिणीने तिला फोन करून अर्ध्या घाबऱ्या आणि आणि अर्ध्या रडवेल्या स्वरात ती बातमी दिली आणि त्या क्षणापासून तिचे आयुष्यच पूर्णतः बदलून गेले होते. अर्ध्या रात्रीत ती पुण्याकडे जाणाऱ्या विमानात बसून तात्काळ इथे आली होती. कोव्हिडमध्ये आई गेली तो धक्का तिने सहन केला होता; पण अगदी व्यवस्थित चालतेबोलते असणारे, पंच्याहत्तरीला येऊनही एकही गोळी चालू नसणारे बाबा एकदम अचानक जाणे काही तिला झेपले नव्हते. या मधल्या पंधरा दिवसांत जी जी माणसे भेटायला आली, त्या प्रत्येकाच्याच तोंडून तिला बाबांचा पुण्यातला जो अलीकडचा दिनक्रम कळला, त्यामुळे आधी ती काहीशी कोड्यातच पडली. रुक्मिणीकडूनच तिला कळले की काही महिन्यांपूर्वी घरात चोरीचाही प्रयत्न झाला होता म्हणे! बाबांनी ही एवढी मोठी घटना तिला सांगितली नव्हतीच, उलट ती काळजी करेल म्हणून रुक्मिणीलाही तिला काही सांगण्यास मनाई केली होती. मग बाबांच्या दहाव्याच्या दिवशी तिला अचानकच बाबांच्या स्टडीत त्यांची डायरी सापडली.
आई गेल्यापासून बाबा स्वतःचा जीव रमवण्यासाठी म्हणून जे काही करत होते त्यात ते स्वतःच अडकत गेले होते का?
इतके अडकले की, त्यातच त्यांचा जीव गेला होता?
आणि मग काल सापडलेली बाबांची ती जन्मपत्रिका!
गेल्या वर्षभरात पूर्वा बंगळुरुला स्वतःच्या नोकरीत, स्वतःच्या करियरमध्ये जास्तीत जास्त व्यग्र होत गेली आणि तिला बाबांकडे लक्ष द्यायला थोडा कमी वेळच मिळाला होता, हे ती स्वतःला पटवून देण्यात जवळपास यशस्वी झाली होती. रोज सकाळ-संध्याकाळ फोन करून चौकशी करणे एवढेच तर आपण करायचो.
आणि महिन्या-दोन-महिन्याकाठी दोन-चार दिवसांची एक फेरी इकडे मारायचो.
आई गेल्यावर आपण बाबांकडे थोडे जास्त लक्ष द्यायला हवे होते; असे तिला या मधल्या पंधरा दिवसांत सतत वाटत असे. आई गेल्याचा जेवढा धक्का बाबांना बसला होता तेवढाच तो तिलाही बसला होता; नाही असे नाही; पण तिचे वेगळे होते. कंपनीच्या कामाच्या रगाड्यात तिने स्वतःला झोकून दिले आणि आई गेल्याचा धक्का, दु:ख तिच्यापुरते का होईना पण थोडे निवळले.
पण बाबांनी इथे एकटे राहून काय केले असेल?
हा प्रश्न तिला कुरतडत राहिला. त्यामुळे ती या मधल्या सांत्वनाच्या काळात भेटायला येणाऱ्या बाबांच्या मित्रांकडे त्यांच्याविषयी बोलत राहिली. या बोलण्यात एक प्रकारची अपराधभावना होती. पण त्या मित्रांकडून, परिचितांकडून तिला जे जे कळत गेले त्यातून हळूहळू ती अपराधभावना उत्सुकतेत आणि मग मनात अनेक प्रश्न निर्माण होण्यात बदलत गेली. एवढ्या दिवसांत तिला एक गोष्ट नक्की कळली होती - या मधल्या काळात तिच्या बाबांच्या खासगी आयुष्यात काहीतरी विशेष गंभीर आणि भीतिदायक घडले होते.
"मला संध्यानं तुमच्याविषयी सांगितलं म्हणून मी इथे आले. नाही तर…" पूर्वाने वाक्य अर्धवट सोडले. मघापासून तिने हे वाक्य अनेकदा उच्चारले होते; पण या समोरच्या तरुणाने काही आपली नकारघंटा थांबवली नव्हती, हे तिला एकदमच जाणवले. "संध्याचे नाव सांगतेय म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल की, मी फुकटात तुमच्या सर्व्हिसेस हायर करू पाहत्ये, तर यू आर राँग. आय कॅन पे यू. आय कॅन पे यू बिग. मे बी तुमच्या महिन्या-दोन-महिन्यांचा खर्च यातून निघू शकेल." मगासपासून तिला जे बोलायचे होते ते पूर्वाने एका दमात बोलून टाकले.
"तुम्हाला काय माहीत माझा महिन्याचा खर्च किती आहे ते?" तिने एकदम पैशांच्याच विषयाला हात घातल्याने शेखर किंचितसा चिडक्या स्वरात म्हणाला.
"इट डझन्ट मॅटर." पूर्वा शांतपणे उत्तरली. "तुम्हाला सध्या पैशांची गरज आहे, हे दिसतंच आहे. बँकेचा इ. एम. आय. थकलाय हे तुम्ही मगाशीच बोलून गेला होतात. सो, आय नो."
शेखरने क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिले. थोडेफार पैसे मिळाले असते तर दोन-चार महिने थोडे सैल जाणार होते. मुख्य म्हणजे बँकेच्या हप्त्यांमधून आणि दर महिन्याला त्यांच्या नेमाने येणाऱ्या आठवणींच्या फोन कॉलमधून थोडी सुटका झाली असती.
"सांगा मी नेमके करावं अशी तुमची अपेक्षा आहे? आणि या कामासाठी तुम्ही मला किती पैसे देऊ शकाल?" शेखरने भिडस्तपणा सोडत थेट प्रश्न केला.
"माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांत ते काय करत होते? कुणाला भेटत होते? ते नेमके कशात अडकले होते? याचा शोध आपल्याला घ्यायचाय.", असे म्हणत पूर्वाने मगमधल्या कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि मग खाली ठेवला.
"आपण?"
"होय आपण. हे काम आपण दोघेही सोबत करणार आहोत. मी कंपनीतून याच कामासाठी दोन महिन्यांची रजा घेतलेली आहे."
"आणि…" भिडस्तपणा अचानकच आड येऊन शेखर बोलता बोलता थबकला.
"… आणि या कामासाठी मी तुम्हाला ॲडव्हान्स म्हणून एक लाख रुपये देईन. बाकी खर्च वेगळा." पूर्वाने वाक्य पूर्ण करण्याआधीच पर्समधून चेकबुक काढत शेखरच्या नावाने चेक लिहायला सुरुवात केली होती.
खरे तर काम नेमके काय आहे, याचा अंदाज लागण्याआधीच ते स्वीकारण्याची ही शेखर राजेशिर्केची पहिलीच वेळ होती. वर्ष-दोन-वर्षांपूर्वी, विशेषत: कोव्हिडच्या आधी त्याने अगदी पंचवीस लाख रुपयेही कुणी देऊ केले असते तरी प्रकरण पूर्णतः समजून घेण्याआधी काम स्वीकारले नसते. पण कोव्हिडनंतर सगळेच बदलले होते. त्यामुळे पूर्वाने देऊ केलेला एक लाख रुपयांचा चेक शेखरने तात्काळ स्वीकारला. पुढच्या अर्ध्या तासात अजिबातच भीड न बाळगता तो पूर्वाच्याच समोर बँकेतही भरला.
"आपण घरी जाऊन सविस्तर बोलू. तिथंच तुम्हाला मला बाबांची डायरी आणि इतर काही गोष्टी दाखवता येतील." असा पूर्वाचा आग्रहच होता त्यामुळे शेखरने बुलेट काढली आणि तो पूर्वासोबतच माडगूळकरांच्या घरी आला. मधल्या काळात पूर्वाने तिच्या वडिलांची मूलभूत माहिती शेखरला दिलेली होती. माडगूळकर चार्टर्ड अकाउंटंट होते. पुण्यातील अनेक प्रथितयश कंपन्यांची ऑडिट ते करायचे. एके काळी त्यांना ट्रेकिंगची आवड होती. जंगलात फिरणे, वन्य पशुपक्ष्यांचा अभ्यास करणे हा त्यांचा छंद होता. यासोबतच पुस्तके हा माडगूळकरांचा वीक पॉईंट होता. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. देशोदेशीच्या लेखकांची वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके जमा करण्याचीही त्यांना हौस होती. घरात अनेक नव्याजुन्या दुर्मीळ पुस्तकांचा समावेश असणारी त्यांची स्वतःची एक छोटेखानी लायब्ररी होती.
बोलता बोलता पूर्वा त्यांच्या घरी काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीबाबतही काहीतरी बोलून गेली. त्या विषयावर शेखरने जास्त विचारताच, "आपण घरी जाऊन बोलू." या वाक्यावर ती कायम राहिली. माडगूळकरांची इमारत आजूबाजूने, मागून-पुढून इतर इमारतींनी वेढलेली होती. बांधकाम वीसेक वर्षांपूर्वीचे असावे. शुक्रवार पेठेतला सुभाष नगर हा परिसर तसा शांतच. एका बाजूला सतत वाहणारा टिळक रोड तर दुसऱ्या बाजूने सातत्याने गजबजलेला शिवाजी रोड यांच्या कात्रीत सापडूनही या परिसराने स्वतःचे असे वेगळेपण जपलेले.
लिफ्ट पाचव्या मजल्यावर थांबली आणि एका फ्लॅटपाशी जात पूर्वाने बेल वाजवली. दार साधारणत: तिशीतल्या एका कामवालीसदृश बाईने उघडले. एकूण व्यक्तिमत्त्वावरून ती घरकाम करणारी वाटत असली तरी तिचा पेहराव नेटका होता. तिने अंगावर कुर्ता आणि पायजमा घातला होता. अंगावरच्या कपड्यांचा दर्जा पाहता हे पूर्वाचेच जुने वापरलेले कपडे असावे असा अंदाज शेखरला आला.
"ही रुक्मिणी. हिचं घर इथे जवळच राष्ट्रभूषण चौकात आहे; पण सध्या मला सोबत म्हणून ही इथेच राहते. बाबांना सर्वप्रथम… हिनेच... यू नो..." पूर्वाने आधीचे वाक्य अर्धवट सोडले. मग ती लागलीच रुक्मिणीशी शेखरची ओळख करून देत म्हणाली, ''आणि रुक्मेऽ, हे शेखर. बाबांची काही अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी हे मला मदत करणार आहेत." रुक्मिणीला ही एवढी ओळख पुरेशी होती.
"मी चहा ठेवते." असे म्हणत ती शेखरला नाही म्हणायची संधीही न देता आत पळाली. तिच्या एकूण वावरावरून ही मुलगी शेखरला थोडी लाजाळू पण एव्हाना माडगूळकरांच्या घरात विश्वासू म्हणून रुळलेली वाटली. मग पूर्वाने शेखरला संपूर्ण घर दाखवले. फ्लॅट ऐसपैस होता. घरात फार माणसे राहत नसूनही नजरेला रिकामारिकामा वाटत नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे माडगूळकरांची घरभर पसरलेली पुस्तके आणि त्यांनी आयुष्यभर जमा केलेल्या देशोदेशीच्या वस्तू.
"बाबा खूप फिरायचे. खूप. दरवर्षी दोन-चारदा तरी ते भटकंतीला जायचे. कधी एकटे, कधी मित्रांच्या ग्रुपसोबत. वर्षाकाठी भटकंती म्हणून एखादी परदेशवारीही करायचे. आईला यात फार इंटरेस्ट नसायचा कारण बाबांची ठिकाणं सगळी विचित्र. नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा वेगळी अशी आयसोलेटेड, स्ट्रॅन्डेड ठिकाणं त्यांना आवडायची. जातील तिथून बाबा पुस्तकं गोळा करायचे. घरभर जरी पुस्तकं विखुरलेली असली तरी बाबांची पुस्तकांची स्पेशल रूम मी तुम्हाला दाखवते. बाबांची स्टडी." असे म्हणत पूर्वाने स्टडीचे दार उघडले आणि ती आत शिरली. तिच्या पाठोपाठ शेखरनेही आत पाऊल टाकले आणि तो पहिला तीव्र झटका त्याला बसला.
झटका! होय, त्या जाणिवेला झटकाच म्हणावे लागले असते. पोटाच्या तळापासून काहीतरी सरसरत वेगाने वर आल्याची जाणीव होती ती! उलटीच्या उमाळ्यासारखी. शिवाय त्याच वेगाने सभोवतालही त्याच्याभोवती साडेतीनशे अंशात गर्रकन फिरला होता. शेखरने आधारासाठी शेजारच्या भिंतीवर हात ठेवला आणि मग मागे वळत तो पॅसेजमधल्या बेसिनपाशी वाकून उभा राहिला.
क्षण-दोन-क्षण सरले. ज्या वेगाने ती कोरड्या वांतीसारखी जाणीव शरीरात शिरली होती त्याच वेगाने ती ओसरलीही.
"आय एम सॉरी. पण मला थोडं…" शेखर ओशाळल्या स्वरात म्हणाला.
"इट्स ओके." पूर्वा त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली. "त्या रूममध्ये बाबांनी बहुधा पेस्ट कंट्रोल करून घेतलं होतं. तो वास आणि इफेक्ट अजूनही तसाच आहे. सुरुवातीला मलाही असाच अनुभव आला होता. एकदम आत शिरलं की भोवळ येऊन उलटीसारखं होतं." मग पूर्वा रुक्मिणीकडे वळली, "त्या रुमच्या खिडक्या बंद का केल्या रुक्मे? तो पेस्टचा वास जाईस्तोवर खिडक्या उघड्याच ठेवायला सांगितल्या होत्या ना तुला?" पूर्वाच्या स्वरात एक तक्रारवजा वैताग होता.
"सकाळी पावसाची सर आली होती. पुस्तकं भिजली असती म्हणून बंद केल्या ताई.''
पूर्वा त्याच काहीशा वैतागल्या मूडमध्ये आत गेली. मग आतून आधी पडदे सारल्याचा सर्र असा आवाज आला. त्याबरोबर स्टडीच्या उंबऱ्यातला प्रकाश बदलल्याचे शेखरला जाणवले. आत चालू दिव्याच्या मंद पिवळसर प्रकाशात बाहेरचा दिवसाचा पांढरा शुभ्र उजेड मिसळला गेला. मग सरकत्या खिडक्या उघडल्याचा 'घर्रक' असा आवाज कानावर पडला. बाहेरची अगदी कणभर शुद्ध हवा आत येऊन आतली हवा थोडी जास्त ताजी झाली असावी असे शेखरला वाटले.
"बरं वाटतंय का आता?" पूर्वाने दारात येऊन बेसिनशी उभ्या शेखरला विचारले.
त्याने उत्तरादाखल नुसती होकारार्थी मान हालवली.
"मग आपण आतच बसून बोलू या का?"
त्यानंतरचा जवळपास अर्धा तास पूर्वा शेखरशी माडगूळकरांसंबंधात बोलत राहिली. मध्येच कधी तरी रुक्मिणी चहा घेऊन आली, तेव्हा पूर्वाने तिलाही तिथे बसवले. सुरुवातीला लाजाळू वाटणारी रुक्मिणी जसा संवाद वाढत गेला, तशी काहीशी धीट बनली आणि त्या दोघींनी मिळून शेखरला माडगूळकर गेले त्या दिवसाचा संपूर्ण गोषवारा दिला.
माडगूळकर गेले तो संपूर्ण दिवस पूर्वा काहीशी धावपळीतच होती. संध्याकाळी प्रोजेक्ट सबमिशन होते, त्यामुळे उभा दिवस टीमला कामाला लावून उरल्यासुरल्या छोट्यामोठ्या गोष्टी तिने आटोपून घेतल्या. दिवस कधी सरला हे पूर्वाला हे कळलेच नाही. संध्याकाळचे सहा वाजायला आले तसे तिला थोडे दडपण येऊ लागले. अमेरिकेतल्या क्लायंटसोबत टेलिकॉन्फरन्स सुरू व्हायला अवघी पाच-दहा मिनिटे उरलेली होती.
तिला या अशा ऑफिस सुटतानाच्या वेळेतल्या टेलिकॉन्फरन्स आवडत नसत. पण तिचा इलाज नव्हता. अमेरिकेतल्या क्लायंटच्या वेळेनुसार तिला स्वतःची वेळ जुळवून घ्यावी लागत असे. सकाळची वेळ ठरवायची म्हटली तर तिचे बॉस कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर दिनेश अहलावत तोवर ऑफिसमध्ये आलेले नसत.
कॉन्फरन्स रूममध्ये शिरतानाच नेमका मोबाईल वाजला. फोन बाबांचा होता. तिने उचलला नाही. खरे तर बाबा या अशा तिच्या ऑफिसच्या वेळेत कधीही फोन करत नसत. त्यामुळेच काहीतरी महत्त्वाचे तर नसेल? हा विचार तिच्या मनात क्षणभर डोकावूनही गेला. ती हातातली ढीगभर कागदपत्रे सावरत कॉन्फरन्स रूममधल्या राउंड टेबलासमोरच्या भल्यामोठ्या स्क्रीनसमोर बसली तेव्हाही मोबाईल पुन्हा एकदा वाजला. फोन बाबांचाच होता. यावेळी ती फोन उचलून त्यांना सांगणार, की बाबा मी नंतर करते – एवढ्यात अहलावत सर आत आले आणि त्यांनी आपल्या गंभीर स्वरात, "सो शाल वी स्टार्ट?" असे म्हणाले आणि पूर्वाने फोन कट केला. मग बंद करून पर्समध्ये ठेवून दिला.
कॉन्फरन्स उत्तम पार पडली. त्यामुळे रात्री नऊ वाजता घरी जाण्यासाठी कंपनीच्या कॅबमध्ये बसताना पूर्वाच्या मनात आनंदाचे उधाण आले होते. गेले सहा महिने ती या प्रोजेक्टवर काम करत होती आणि आता त्या श्रमाला फळ मिळण्याची वेळ आली होती. कॅबने हायवे क्रॉस करताच अचानकच पूर्वाला बाबांच्या फोनची आठवण झाली. तिने तात्काळ पर्समधून फोन बाहेर काढला. स्विच ऑन करत तिने बाबांचा नंबर डायल केला. पलीकडे नुसती रिंग वाजत राहिली. कुणीही फोन उचलला नाही. पूर्वाने पुन्हा एकदा रिडायल केले, पण रिंग वाजत राहिली पलीकडून कुणाचाही प्रतिसाद काही आला नाही. बाबा कधीकधी फोन सायलेंट ठेवतात; विशेषत: लिखाण करताना हे पूर्वाला माहीत होते. त्यामुळे यावेळी तिने लँडलाईनवर फोन लावला. बराच वेळ पलीकडची रिंग वाजत राहिली. फोन मात्र कुणीही उचलला नाही. या वेळी का कुणास ठाऊक पण पलीकडे वाजणाऱ्या फोनची रिंग पूर्वाला भीतिदायक वाटली.
त्या दिवशी रुक्मिणी माडगूळकरांच्या वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये पोहोचली, तेव्हा संध्याकाळ सरून सुभाषनगरातल्या रस्त्यांवर अंधार जमायला सुरुवात झाली होती. त्या दिवशी नेमके या परिसरातल्या रस्त्यांवरचे दिवे का कुणास ठाऊक पण बंद होते. त्यामुळे रस्त्यावरचे काळ्या रंगाचे अंधारे पुंजके जरा जास्तच नजरेत भरत होते. पूर्वाचा घाबरल्या स्वरातला फोन आला, आणि रुक्मिणी तत्काळ घरातून निघाली होती. ती दाराला कुलूप लावून बाहेर पडत असतानाच नेमका नवरा फॅक्टरीतून परतला. एरवी रुक्मिणी सहसा सगळीच कामे दिवसाभरात आटोपून नवरा घरात शिरायच्या वेळी मोकळीच असे. अशा वेळी ती संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे गोष्टींत अडकलेली असे. मुलीला दहावीचे खासगी क्लासेस लावले होते, ते स्वारगेटला होते. त्यामुळे यावेळी तीही घरात नसायची.
"चहा बनवून ठेवलाय. गरम करून घ्या आज. माडगूळकर काका फोन नाही उचलतायेत. पूर्वाताईंचा फोन आला होता, मी आलेच बघून. त्या थोड्या घाबरल्यासारख्या वाटत होत्या." तिने हातातले कडीला लावायला घेतलेले कुलूप काढले आणि नवऱ्याला दार उघडून देत ती म्हणाली. नवऱ्याने नुसतीच मान डोलावली आणि तो आत शिरला. माडगूळकर म्हटल्यावर त्याने काही हरकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कोव्हिडमध्ये बेरोजगार झाल्यानंतर पर्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधली ही नवी नोकरी त्याला त्यांच्याच शिफारसीवर मिळाली होती.
रुक्मिणी वक्रतुंड अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये शिरली तेव्हा तिच्या मनात एव्हाना संशयाची एक पाल चुकचुकायला लागली होती. गेल्या काही महिन्यांपासून तिला माडगूळकर एक प्रकारच्या ताणाखाली वावरतायत असे जाणवत होते. ताण आणि भीती.
मागल्याच महिन्यात त्यांच्या याच घरात चोरीही झाली होती. चोरी कसली? तर पुस्तकांची!
काही दिवसांपासून या भल्या माणसाच्या आयुष्यात काही तरी वेगळे आणि विचित्रसे घडत होते, हे नक्की. ते काय आहे हे रुक्मिणीला सांगता आले नसते. पण आजकाल ती घरकाम करताना जेव्हा माडगूळकर घरात असत, तेव्हा ते तिला कोणत्यातरी विचारात दिसत असत. बरेचदा स्वतःशीच काही तरी पुटपुटत. एक-दोनदा तर ते घाबरलेले आहेत की काय, अशीही शंका रुक्मिणीला आली होती. त्यामुळेच पूर्वाचा फोन आला आणि तिने काहीशा चिंतित स्वरांत, "बाबा फोन उचलत नाहीयेत तर घरी जाऊन जरा बघशील का?" असे विचारले तेव्हा रुक्मिणी तात्काळ घरातून निघाली.
वक्रतुंड अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर लिफ्ट थांबली, तसे रुक्मिणीच्या मनातले सारे विचारही थांबले. पाचव्या मजल्यावर शांतता होती. वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट होते. माडगूळकरांच्या लगतचा फ्लॅट जोश्यांचा होता. जोशी श्रावणात त्यांच्या ऑस्ट्रेलियातल्या मुलाकडे गेले होते ते अजूनही परतले नव्हते, त्यामुळे माडगूळकरांच्या शेजारचा फ्लॅट कायमच बंद असे.
समोरच्या दोन फ्लॅटपैकी चव्हाणांचा एक फ्लॅटही रिकामाच होता. त्या फ्लॅटलाही वर्षाभरापासून टाळे ठोकलेले होते. चव्हाण आजोबा गेल्यापासून चव्हाण आजी त्यांच्या मुलीकडे नाशिकलाच असत. त्यांच्या शेजारचा फ्लॅट नुकत्याच कुणा रायसोनी नामक अमराठी कुटुंबाने घेतला होता. त्यांना एक विशीतला तरुण मुलगा होता. नवरा-बायको दोघेही दिवसभर नोकरीनिमित्ताने बाहेरच असत. रायसोनी इथे राहायला आले त्यावेळी त्यांनी रुक्मिणीकडे घरकामासाठी विचारणा केली होती, पण रुक्मिणीकडे आधीच चार घरांची कामे होती. हे अधिकचे पाचवे काम तिला झेपले नसते म्हणून ती नाही म्हणाली. आता रायसोनींकडे गोडकर आज्जी काम करायची.
दिवसभर पाचव्या मजल्यावर तसे कुणीच नसायचे. माडगूळकर त्यांच्या कामानिमित्ताने आणि रायसोनींचा मुलगा बहुधा कॉलेजसाठी म्हणून बाहेरच असायचे. वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये फ्लॅट वीसच होते, पण इमारत बांधताना थोडी लांबरुंदच बांधली होती. कॉरिडॉर आणि पॅसेजही एरवीच्या मानाने मोठाले होते. त्यामुळे इथे ऐसपैसपणा थोडा जास्तच जाणवायचा. तिन्हीसांजेला अंधार पडला आणि बिल्डिंगचे दिवे लागायला उशीर झाला तर हा ऐसपैसपणा एकट्या जीवाला भीती वाटेल इतपत भेडसावायचा. आज पॅसेजमधले दिवे चालू होते, पण तरीही एक अनोळखी भीती रुक्मिणीच्या मनात चोरपावलांनी प्रवेश घेऊ पाहत होती.
रुक्मिणीने माडगूळकरांच्या दाराशी येत बेल वाजवली तेव्हा आत वाजलेल्या आवाजाचा अगदी स्पष्ट आणि खणखणीत ध्वनी तिच्या कानावर पडला. त्या आवाजाने तिच्या मनात शिरू पाहणारी भीती थोडी जास्तच ठळक झाली. एरवी सहसा दुपारच्या वेळी ती ही बेल वाजवत असे, त्यावेळी बाहेर ऐकू येणारा ध्वनी वेगळा असायचा. त्या आवाजाला दिवसाउजेडाची एक सोबत असायची. शिवाय आत माडगूळकर आहेत ही जाणीवही कोणतीही भय वा तत्सम भावना मनात शिरू द्यायची नाही. पण आज आत वाजलेल्या बेलच्या आवाजात बहुधा अधिकचे काही तरी मिसळले होते. काहीतरी अज्ञात आणि अगोचर!
तिने बोटावरचा दाब वाढवत अजून एक-दोनदा बेल वाजवली. आत जर कुणी असेल तर त्याला कळावे, की बाहेर थांबलेली व्यक्ती घाईत आहे म्हणून.
आत जर कुणी असेल तर!
रुक्मिणीला प्रश्न पडला पण लागलीच तिला उत्तरही मिळाले.
आत कुणीतरी नक्की होते. माडगूळकर वगळता अधिकचे असे वेगळे कुणीतरी! आजवर रुक्मिणीने न पाहिलेले, अनुभवलेले असे कुणी तरी!
बाहेर उंबऱ्यापलीकडे उभे असतानाही कसे कुणास ठाऊक, पण तिला हे जाणवले होते. रुक्मिणीने मग थरथरत्या हातांनी साडीला बांधलेली चावी काढली आणि हलकेच कीहोलमध्ये सारली.
क्लक! क्लकक!!
आतले लॅच उघडले गेल्याचा आवाज.
केवढा सूक्ष्म आणि दबका आवाज होता!
पण तोही त्या शांततेत रुक्मिणीच्या कानांनी टिपला.
लॅचचा अडथळा सरला आणि दाराच्या चौकटीत अडकलेला दरवाजा हलका झाल्याचे रुक्मिणीला जाणवले. तिने हलका दाब देत दार आत ढकलले.
आतल्या उजेडाची त्याक्षणी तिला भीती वाटली.
माडगूळकरांचा भलाथोरला हॉल रिकामाच होता. दारातून आत येताच हॉलच्या उजव्या हाताला ज्या खिडक्या होत्या, त्या खिडकीतल्या काचांतून आत आलेला बाहेरच्या चंदेरी प्रकाशाचा मोठाला पुंजका सोफ्यावर सांडला होता. त्याच पुंजक्यातला काही उजेड फरश्यांवर चमकत होता. पुढे तोच उजेडाचा पुंजका हॉलच्या दुसऱ्या टोकाला पसरत विरळ होत अंधारात रूपांतरित झाला होता. डाव्या हाताला जिथे आत जाण्याचा पॅसेज सुरू होत होता तिथून उजेडाचा एक आयताकार हॉलमध्ये येऊन पडला होता.
रुक्मिणीने डाव्या हाताची भिंत चाचपली. विजेचा बोर्ड हाताला लागताच आधी दिवे लावले. विजेच्या दिव्यांच्या पिवळसर प्रकाशाने हॉलमध्ये सांडलेला तो मायावी अंधार दूर सारला. रुक्मिणीने दारातूनच माडगूळकरांना हाक मारली, "काकाऽऽ" तिची हाक त्याच चार भिंतीत अनाथासारखी एकटीच विरून गेली.
मुळात काका घरातच नसणार. पूर्वाताई उगाच घाबरली आणि आपल्याला इकडे पाठवले. रुक्मिणीच्या मनात विचार आला.
या विचाराने तिला धीरही दिला आणि मग ती पुढे पावले टाकत हॉलच्या डाव्या टोकाशी येऊन थांबली. तिथून आत जाण्यासाठी भिंतीत एक मोठाली उभी रिकामी चौकट होती. त्या चौकटीतून आत पॅसेजमध्ये शिरल्यावर डाव्या हाताला किचन होते. उजव्या हाताला दोन बेडरूम होत्या. त्यातली एक बेडरूम माडगूळकर स्टडी म्हणून वापरत. स्टडीचे दार अर्धवट उघडे होते आणि आत चालू असलेल्या दिव्याने बाहेरच्या पॅसेजमध्ये उजेडाचा एक त्रिकोणाकार कोरला होता.
"काकाऽऽ" रुक्मिणीने पुन्हा हाक मारली.
तिची हाक त्या बंद फ्लॅटमध्ये विरून गेली, पण माडगूळकरांकडून कोणतेही प्रत्युत्तर आले नाही.
स्टडीचे अर्धउघडे दार रुक्मिणीला भेडसावू लागले.
हे दार असे अर्धे उघडे का आहे?
काकांना अशी दारे उघडी ठेवण्याची सवय नाहीये. बाहेर जातानाही ते सगळी दारे अगदी कडी लावून बंद करतात. मग आज हे स्टडीचे दार असे अर्धवट उघडे का? आणि आतला दिवा चालू कसा? काका घरात नसतील तर दिवे हमखास बंदच असतात. का काका घरात आहेत? मग ते उत्तर का देत नाहीत?
नाना प्रश्न आणि त्या प्रश्नांना धरून अनेक भलेबुरे विचार रुक्मिणीच्या मनात डोकावू लागले. मग तिने एकदमच झटका दिल्यासारखी मनाला भेडसावणारी भीती बाहेर ढकलून दिली आणि झपझप पावले टाकत ती स्टडीच्या अर्ध्याउघड्या दाराशी येऊन थांबली.
तिने अर्धाउघडा दरवाजा पूर्णतः आत ढकलला. आत विजेचा दिवा ढणढणत होता खरा, पण खोलीत कुणीच नव्हते. आतला पंखाही पूर्ण वेगाने फिरत होता. रुक्मिणीने एक मोठा निःश्वास सोडला.
काका कदाचित बाहेर गेले असावेत. काहीतरी घाई असावी म्हणून स्टडीचे दार उघडे ठेवून, आतला दिवा, पंखा बंद न करता गेले असावेत. अजून काय? रुक्मिणीने स्वतःचीच समजूत घातली.
तिने आत पाऊल टाकत आतला दिवा बंद करण्यासाठी पुढे नेलेला हात अर्धवटच थांबवला.
आतला दिवा चालू असलेला बरा नाही का? तेवढीच सोबत!
तिच्या मनात विचार आला आणि तिने आतला पंखा बंद केला, मात्र दिवा तसाच चालू ठेवत स्टडीचे दार बंद करून घेतले. स्टडीचे दार बंद करताना तिला किंचित भोवळ येऊन आणि पोटात मळमळल्यासारखे झाले होते, याकडे मात्र तिने दुर्लक्ष केले.
स्टडीचे दार बंद होताच पॅसेजमध्ये अंधार झाला. रुक्मिणीने डाव्या हाताची भिंत चाचपत तिथे असणारे एकमेव विजेच्या दिव्याचे बटण दाबले. खट असा आवाज होत पॅसेज प्रकाशमान झाला.
स्टडीच्या डाव्या हाताला जी बेडरूम होती ती पूर्वाची होती. रुक्मिणीने पाहिले, त्या बेडरूमला बाहेरून कडी होती.
म्हणजे आत कुणी असण्याची शक्यता नव्हतीच.
पूर्वा पुण्यात आल्यावरच ही बेडरूम उघडली जायची, एरवी ती बंदच असे. रोजची केर-फरशी करतानाही या खोलीतली स्वच्छता रुक्मिणी आठवड्यातून एकदा आणि पूर्वा पुण्यात येणार असेल तेव्हाच करायची. तरीही रुक्मिणीने त्या खोलीची कडी उघडली. कडी उघडताना तिला थोडा जोरच लावावा लागला. माडगूळकरांनी फ्लॅटचे नूतनीकरण करून घेतलेले असले तरी जुने दरवाजे, त्यांच्या जुन्या कड्या तश्याच ठेवल्या होत्या. थोडासा जोर लावत, प्रयत्न करत रुक्मिणीने स्टडीच्या शेजारच्या खोलीची कडी उघडण्यात यश मिळवले.
कडी उघडताच आधी आतल्या अंधाराचा भपका रुक्मिणीला जाणवला. खोलीत पूर्ण अंधार होता. अगदी काळाठिक्कर अंधार. रुक्मिणीने त्या अंधारात पाऊल ठेवले आणि हात वर करत, भिंत चाचपडत तिथल्या दिव्याचे बटनही दाबलं. आत सर्वत्र निळसर प्रकाश पसरला. पूर्वाला आधुनिक दिव्यांच्या मंद, पिवळसर प्रकाशापेक्षा ट्यूबलाईटचा निळसर, पांढरट प्रकाश आवडत असे, म्हणून तिने आपल्या बेडरूमध्ये अशा ट्यूब लावून घेतल्या होत्या.
का कुणास ठाऊक, पण त्या निळसर, पांढऱ्या प्रकाशाने रुक्मिणीला एक अधिकचा धीर मिळाला. रुक्मिणीने आत येत एकवार सभोवताली नजर फिरवली. आतले सगळे जसे होते तसेच होते. पूर्वा पुण्यात शेवटची येऊन एव्हाना महिना उलटला होता. त्यामुळे ती खोली एक-दोनदा रुक्मिणीने उघडलेली होती तेवढीच. या रूमला लागूनच एक ऐसपैस गच्ची होती. रुक्मिणीने गच्चीचे दार उघडत नजर बाहेर टाकली. दार उघडताच अंगाला स्पर्शणारा बाहेरचा ताजा वारा तिला सुखावून गेला. गच्चीत शेजारच्या इमारतीतल्या दिव्यांचा मंद प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात रिकामी गच्ची चमकत होती. सुकलेल्या झाडांची बरीचशी सांडलेली पाने वगळता गच्चीत कुणीच नव्हते. लवकरच गच्ची स्वच्छ करण्याची खूणगाठ मनाशी बांधत रुक्मिणीने गच्चीचे दार बंद करत कडी लावून घेतली. मग आतला दिवा बंद करत ती पूर्वाच्या रूममधून बाहेर पडली. तिने दाराची कडी जशी होती तशी लावून घेतली.
तिला एवढे नक्की कळले होते की, काका घरात नव्हते.
घरातून बाहेर पडण्याआधी ती एकदा किचनमध्येही डोकावली. किचनमधल्या देवघरातला दिवा जळत होता.
म्हणजे काका बाहेर पडण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावून, पूजा करून बाहेर पडले होते हे नक्की.
माडगूळकर घरात नाहीत याची खात्री झाल्यावर तिने बाहेरच्या दारातूनच पूर्वाला फोन लावला. पलीकडून पूर्वाने दुसऱ्या रिंगलाच फोन उचलला.
"हॅलो, ताई. नाहीयेत काका घरी. बघितलं मी." पूर्वाने फोन उचलताच रुक्मिणी म्हणाली.
पलीकडून क्षणभर काहीच उत्तर आले नाही.
"हॅलो ताई?"
"हं? ऐकतेय मी." पूर्वा म्हणाली.
"नाहीयेत काका घरात." रुक्मिणीने तीच माहिती पुन्हा दिली.
"कुठे गेले असतील? आणि मोबाईल का उचलत नाहीयेत?"
"घरीच विसरून गेले असतील."
"असे होत नाही कधी, पण असेल."
"जाऊ मग मी घरी?"
"ठीक आहे जा." असे म्हणत पूर्वा फोन ठेवणार एवढ्यात तिला काही तरी सुचले आणि ती घाईघाईने म्हणाली, "ए रुक्मिणी... रुक्मिणी…"
"हं ताई?"
"एक काम करते. मी तुझा फोन कट करून लगेचच बाबांच्या मोबाईलवर कॉल करते, ते मोबाईल घरी विसरले असतील तर वाजेलच. ठीके?"
रुक्मिणी हो म्हणाली. पूर्वाने पलीकडून कॉल डिसकनेक्ट केला.
काही काळ गेला. रुक्मिणी मेन डोरशी थांबून राहिली. अजून थोडा काळ गेला, पण घरात मोबाईल वाजण्याचा आवाज काही आला नाही. ना पूर्वाचा उलटा फोन रुक्मिणीला आला. एव्हाना कृती, तिची मुलगी, ट्युशनवरून घरी आलेली असणार होती. घरी जायला पाहिजे – असा विचार मनात आला आणि रुक्मिणीने आणखी दोन-चार मिनिटे वाट पाहून मेन डोर लावून घेतले आणि ती लिफ्टकडे जायला वळली. खाली जाणारा लिफ्टचा विजेचा बाण ती दाबणार एवढ्यात तिने बोट तसेच न दाबता बटणावरून बाजूला केले.
आत काही वाजले का?
'किण किण किण किण.' असे काही तरी?
मोबाईलच्या रिंगटोनसारखे काही तरी?
जे वाजले ते नक्की माडगूळकरांच्या घरात वाजले का अजून कोणाच्या?
तिने कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, पण तिच्या कानांवर कोणताही आवाज पडला नाही.
काकांच्याच मोबाईलवर फोन करायचाय ना? मग त्यासाठी पूर्वाताईंनी कशाला करायला हवा?
तो तर तीही करू शकत होतीच की!
रुक्मिणी पुन्हा एकदा फ्लॅटच्या दाराशी आली. तिने मोबाईल हातात घेत माडगूळकरांचा नंबर लावला.
'किण किण किण किण.'
आतून कुठूनतरी दबक्या स्वरातली मोबाईलची रिंग वाजली.
म्हणजे काका मोबाईल घरात विसरले होते तर!
काय करावे? आत जाऊन मोबाईल नेमका कुठे वाजतोय हे पाहावे का घरी जावं? रुक्मिणी विचारात पडली.
पण पुन्हा पूर्वाताईंचा फोन आला आणि त्यांनी विचारले की कुठे होता मोबाईल?
घरात वाजत होता तर जाऊन पाहिला का नाही?
तर?
रुक्मिणीने द्विधा मन:स्थितीतच पुन्हा एकदा चावी लॅचमध्ये सारत फ्लॅटचे दार उघडले. आत शिरत दिवे लावले आणि मोबाईल नेमका कुठे वाजतोय हे तपासण्यासाठी तिने आपल्या मोबाईलवरून पुन्हा एकदा माडगूळकरांचा नंबर दाबला.
'किण किण किण किण….किण किण किण किण.'
रिंग आतच कुठे तरी वाजत होती. पण नेमकी कुठे वाजते आहे याचा तिला अंदाज येईना तेव्हा ती आत पॅसेजच्या दिशेने पावले टाकू लागली.
ती स्टडीच्या दाराशी येईस्तोवर एव्हाना रिंग वाजायची थांबली होती म्हणून तिने पुन्हा एकदा तोच नंबर दाबला.
'किण किण किण किण….किण किण किण किण.'
यावेळी मात्र आवाज जवळून कुठून तरी येत होता.
तिने क्षणभर स्टडीच्या दाराला कान लावत आतल्या आवाजाचा अंदाज घेतला.
नाही, इथून नाही.
मग तिने मान वळवत मागच्या बाजूला किचनच्या दिशेने पाहिले. रिंग तिथूनच कुठूनतरी वाजत होती.
मग तिच्या लक्षात आलं. रिंग बाथरूममध्ये वाजते आहे. मगाशी तिने सगळे घर तपासले पण बाथरूम तपासायला मात्र विसरली होती. तिच्या नवऱ्याला बरेचदा मोबाईल न्हाणीघरात घेऊन जायची सवय होती. बरेचदा आंघोळ झाल्यावर तो तिथेच मोबाईल विसरायचाही. माडगूळकरही बहुधा आज मोबाईल न्हाणीघरातच विसरले असावेत.
किचनच्या दाराच्या अलीकडे उजव्या हातालाच बाथरूम होते.
रुक्मिणीने बाथरूमचे दार उघडले.
आत अंधार होता, पण खालच्या टाईल्सवर पडून वाजणाऱ्या माडगूळकरांच्या मोबाईल स्क्रीनचा उजेड रुक्मिणीच्या नजरेस पडला. मोबाईल खाली कसा पडला असेल? हा विचार तिच्या मनात डोकावला आणि तिने घाईघाईने बाथरूमच्या दिव्याचे बटण दाबलं.
खट असा बटणाचा आवाज करत दिवा लागला.
बाथरूममध्ये लख्ख पिवळा प्रकाश पसरला.
'किण किण किण किण….किण किण किण किण.' रुक्मिणीने आवाजाच्या दिशेने पाहिले.
माडगूळकरांचा मोबाईल खालच्या टाईल्सवर पडून वाजत होता.
बाथरुमच्या टाईल्सवर मोबाईल एकटा पडलेला नव्हता; मोबाईलशेजारी माडगूळकरही निश्चेष्ट पडले होते.
—
''रुक्मीनं फोन करून मला कळवलं. मी तिथूनच आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. ते लागलीच क्लिनिक बंद करून इथे पोहोचले. त्यांनी तपासलं आणि हार्ट अटॅकचं निदान केलं. बाबा गेले होते. मग मीही रात्रीची फ्लाईट पकडून तात्काळ पुण्यात पोहोचले. इथे येईस्तोवर सगळंच संपलं होते." पूर्वा बोलता बोलता थांबली आणि तिने एक मोठा श्वास सोडला.
शेखर, पूर्वा आणि रुक्मिणी याक्षणी माडगूळकरांच्या वक्रतुंड अपार्टमेंटमधल्या घराच्या हॉलमधल्या सोफ्यावर बसले होते. रुक्मिणीने नुकताच काय झाले, याचा तिला आलेला अनुभव अत्यंत सविस्तररीत्या शेखरला सांगितला होता. वर वर लाजाळू वाटणारी ही मुलगी थोडी खुलली की मात्र बोलघेवडी आहे, हे या मधल्या अर्ध्या तासातच शेखरच्या लक्षात आले होते. त्याच्या लक्षात अजूनही हे आले नव्हते की, आपल्याला एवढी भरघोस रक्कम देऊ करून इथे नेमके का बोलावण्यात आले आहे?
"बॉडीचे पोस्ट मॉर्टम केले?" शेखर आपल्याला देऊ केलेल्या रकमेला जागत जो त्यावेळी सुचला तो प्रश्न पूर्वाला विचारला.
"नाही केलं. म्हणजे पोस्ट मॉर्टम करावं असं वाटलंच नाही सुरुवातीला. दररोज जगभरात कोट्यवधी माणसं अचानक हार्ट अटॅक येऊन जातात. सगळेच कुठे बॉडीचे पोस्ट मॉर्टम करतात? मला जो घातपाताचा संशय आला तो नंतर."
"त्या दिवसाभरात किंवा थोडं मागे-पुढे इतर कोणत्या विशेष लक्षात राहतील अश्या गोष्टी घडल्या होत्या?" शेखरने प्रश्न विचारताच पूर्वाने रुक्मिणीकडे पाहिले. रुक्मिणीला शेखरने तिथेच बसवून ठेवले होते. पुढच्या संभाषणात त्याला ती तिथे हवी होती.
"आठ दिवसांपूर्वी चोरी झाली होती तीच." बोलता बोलता रुक्मिणी मध्येच थांबली. "आणि हां?" तिला बहुधा काही तरी आठवले होते. "काका गेले त्या दिवशी एक पत्र आलं होतं."
"कुणाचं पत्र?" शेखरने विचारलं.
"अहो, बाबांना अशी पत्रं नेहमीच येतात." रुक्मिणीने उत्तर देण्याआधीच पूर्वा सांगू लागली. "कुठल्या ना कुठल्या संस्थेची, कधी कुठल्या मॅगझिनचं सबस्क्रिप्शन संपल्याचं रिमाईंडर, कधी एल.आय.सी., तर कधी…"
"न्हाई ताई." रुक्मिणीने पूर्वाला मध्येच तोडले. "ते एक वेगळंच पत्र होतं."
"म्हणजे?"
"काका गेल्याचे कळल्यावर संध्याकाळी घरात लोकांची गर्दी जमली. मी काय बाकी लोकांना वळखत न्हवते. कुणी काय उचलून नेलं असतं तर? काकांना त्यांच्या रुममध्ये कुणी गेल्यालं आवडायचं नाय. म्हणून मी काकांची रूम बंद कराय गेले, तवा मला टेबलावर ते पत्र दिसलं. पत्र कसलं? नुसती एकात एक टाकलेली पाकिटं व्हती ती. एकापेक्षा दुसरं ल्हान. दुसऱ्यापेक्षा तिसरं ल्हान. आत काय व्हतं मी बघितलं नाय, पण कुठं हरवाय नको म्हणून मी ती टेबलाच्या खालच्या ड्रावरमध्ये सारली." रुक्मिणीने आपले वाक्य संपवण्याच्या आधीच पूर्वा वेगाने सोफ्यावरून उठून माडगूळकरांच्या स्टडीच्या दिशेने धावली होती. शेखरही तिच्यामागोमाग होता.
माडगूळकर गेल्यापासून जेवढे दिवस पूर्वा इथे राहत होती, तेवढे दिवस पूर्वाने स्टडी बंदच ठेवली होती. दाराशी पोहताच पूर्वाने दाराची कडी उघडली आणि ती आत शिरली. आत शिरल्याशिरल्याच डाव्या हाताला माडगूळकरांचे भलेमोठे स्टडी टेबल होते. शेकरच्या मागेमागेच आत शिरलेली रुक्मिणी पुढे झाली आणि तिने टेबलाच्या उजव्या हाताचा सर्वात खालचा ड्रॉव्हर उघडला.
समोरच होती ती!
पाकिटे!
पिवळसर झाक असलेली हँडमेड पेपरपासून बनवलेली पाकिटे!
रुक्मिणीने अगदी अचूक वर्णन केले होते त्यांचं. एकात एक मावतील अशी लहान लहान आकाराची एकूण चार पाकिटे होती. पूर्वा आत हात घालून ती पाकिटे काढणार एवढ्यात शेखरने तिला खांद्याला स्पर्श करत थांबवले. मग त्याने खिशातून एक हातरुमाल बाहेर काढत त्या रुमालाच्या चिमटीत ती पाकिटे धरली आणि बाहेर काढली. रुमालाच्याच चिमटीत धरत त्याने त्या चारही पाकिटांचे निरीक्षण केले. पण कोणत्याही पाकिटात पत्र वा तत्सम निरोपवजा कोणताही कागद नव्हता. त्यातली तीन पाकिटे कोरीच होती. सगळ्यांत मोठ्या पाकिटावर माडगूळकरांचा पत्ता होता. पत्ता बहुधा टंकलिखित होता. म्हणजेच तो हाताने वा पेनने लिहिलेला नव्हता. पत्ता ज्या कागदावर टाईप केला होता, तो कागद नंतर छोट्या आकारात चौकोनी कापून पाकिटावर चिकटवलेला वाटत होता. खाली पाठवणाऱ्याचे नाव नव्हते. पण पाकिटाच्या खालच्या बाजूला अजून एक कागद चिकटवलेला होता. त्या कागदावर ही काही टंकलिखित शब्द होते. ते शब्द अर्थात प्रेषक कोण म्हणजेच हे पत्र कुणी पाठवले आहे हे सांगणारे असणे अपेक्षित होते.
पण प्रेषक, खाली पाठवणाऱ्याचे नाव आणि पत्ता म्हणून जे शब्द टाईप केले होते, ते अत्यंत विलक्षण आणि रहस्यमय होते.
ते शब्द वाचल्यानंतरच मुळात शेखरच्या मनात या एकूण प्रकरणात कुठे तरी काहीतरी पाणी मुरतेय, ही शंकेची पाल सर्वप्रथम चुकचुकली. त्याच्या संपूर्ण शरीराला एक सूक्ष्म कंप सुटला.
खाली लिहिलेली ओळ त्याने पुन्हा पुन्हा वाचली.
पाठवणाऱ्याचा पत्ता म्हणून फक्त काही शब्द टाईप केलेले होते.
ते शब्द – 'तुम्हाला एव्हाना कळलंच असेल मी कोण आहे ते!' – असे होते.
—
माडगूळकरांच्या घरात शिरून एव्हाना शेखरला दोन तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेला होता. सुरुवातीला वाटत होते त्याप्रमाणे हे प्रकरण सहज आणि सरळ नाही, याची जाणीव एव्हाना त्याला हळूहळू का होईना पण झाली होती.
वेळ आहे, तोवर यातून माघार घ्यावी का?
आणखी पुढे गेल्यावर कदाचित मागचे पाऊल टाकता येणार नाही.
त्याच्या मनात कधी नव्हे ते विचार आले.
पण सकाळपासून जे घडले होते ते सगळेच कसे स्वप्नवत होते!
आजवर जिचा चेहरा कधीही पाहिला नव्हता, आजवर जिचे नावही कधी ऐकलेले नव्हते अशी एक तरुणी सकाळीच त्याच्या ऑफिसवर येते काय आणि त्याला पाच-पंचवीस हजार नव्हे, तर तब्बल लाखभर रुपये देऊ करून एका विचित्र प्रकरणाचा छडा लावायला सांगते काय! सगळेच कसे अविश्वसनीय वाटत होते.
जसजशी या माडगूळकर प्रकरणातील अधिकची माहिती त्याच्यासमोर येत गेली, तसतसे या प्रकरणात काहीतरी अधिकचे पाणी मुरते आहे यावर शेखरचा विश्वास बसत गेला.
पाकिटावर पत्र पाठवणार्याच्या पत्त्याच्या ज्या ठिकाणी जे शब्द होते ते कोड्यात टाकणारे होते.
पत्र पाठवणारा कोण होता; तर – तुम्हाला कधीही कळणार नाही कोण ते!
काय अर्थ होता त्या शब्दांचा?
पत्र कुणी पाठवलंय हे वाचणार्याला कळणारच नसेल, तर तसे आवर्जून सांगावे तरी का?
माडगूळकरांच्या ड्रॉवरमध्ये एकात एक मावतील अश्या आकाराची पाच पाकिटे सापडली, पण त्या पाकिटात पत्राचा कागद काही सापडला नव्हता. शेखरने रुक्मिणीला विचारले तेव्हा तिलाही त्याविषयी काही कल्पना नव्हती.
"मी या रुममध्ये फारशी आलेच नाही. इथे आल्यावर बाबांच्या आठवणी येतात, सो आय थॉट बेटर टू अव्हॉईड इट." त्याने विचारल्यावर पूर्वा म्हणाली होती.
आजकालच्या ईमेलच्या युगात कुणीतरी माडगूळकरांना टपालाने एक पत्र पाठवले होते. ते पाठवताना एक नव्हे तर एकात एक मावतील अश्या पाच पाकिटांचा वापर केला होता. पण एवढे करूनही आत निरोपाचा कागद पाठवला नव्हता.
कसे शक्य आहे? एवढ्या प्रयासाने पत्र पाठवलेय म्हणजे काही तरी निरोप घेऊनच ते आले असणार.
शेखरने पूर्वासह सर्व पाकिटे खालून-वरून नीट न्याहाळून पाहिली. पाकिटांच्या कडा, अंतर्भाग अगदी प्रत्येक पाकिटाचा कोपरा न कोपरा तपासून पाहिला. पण काही एक निरोप वा संदेश ध्वनित होईल असे कोणतेही लिखित वा टंकलिखित शब्द त्यांना त्या पाकिटावर सापडले नाहीत.
माडगूळकर पत्र ज्या ज्या ठिकाणी ठेवू शकतील, दडवू शकतील अश्या घरातील सर्व जागा शेखरने रुक्मिणी आणि पूर्वासह धुंडाळून पाहिल्या, पण पत्र कुठेही सापडले नाही.
"आत पत्र असणार. नक्की असणार. ज्या अर्थी पाकिटे स्टडीरुममध्ये सापडली, त्याअर्थी आतला पत्राचा कागदही इथेच कुठे तरी असणार." पूर्वाच्या स्वरात ठाम विश्वास होता.
"नीट आठव. तू या रुममध्ये आलीस तेव्हा सर्वप्रथम काय पाहिलंस?" शेखरने रुक्मिणीला विचारले.
रुक्मिणीने क्षणभर विचार केला आणि मग काही तरी आठवल्यासारखे ती म्हणाली, "रुमचं दार किलकिलं उघडं होते जी. आणि..." रुक्मिणी बोलता बोलता थांबली.
"आणि?"
"आतला दिवा चालू होता. मी तो चालूच ठेवला."
"का?"
"सोबत म्हणून. का ते म्हायीत न्हायी जी; कसली तेबी सांगता येणार न्हायी, पण मला त्या दिवशी भीती वाटत होती." रुक्मिणीच्या स्वरात बोलताना त्याक्षणीही एक सूक्ष्म कंप जाणवत होता. "आणि एक आठवलं. आतला पंखा चालू होता. फुल स्पीडनी."
"पंखा चालू होता?"
"व्हय. जी."
'पंखा फुलस्पीडने चालू होता याचा अर्थ कागद याच खोलीत कुठेतरी उडून गेला असण्याची शक्यता आहे.'
शेखरच्या मेंदूने तात्काळ आकडेमोड केली आणि सभोवताली नजर फिरवली. रुममध्ये कागद उडून खाली दडून बसेल अशा फर्निवरवजा वस्तू दोनच होत्या.
एक होते टेबल. त्याच टेबलाच्या ड्रॉवरमधून रुक्मिणीने मगाशी ती पाकिटे बाहेर काढली होती. पण टेबलाखाली पत्र उडून जाईल आणि लक्षात न येता दडून बसेल एवढी जागा नव्हती. तरीही शेखरने वाकत टेबलाखालचा भाग नजरेखालून घातला. टेबलाखाली काहीच नव्हते.
समोरचा बेड मात्र बैठा होता. चांगला लांबरुंद होता. साधारण पाच बाय सहा आकाराचा.
"आई होती तेव्हा हा बेड आईबाबांच्या बेडरुममध्ये होता. नंतर बाबांनी इथे हलवला." शेखर बेडच्या दिशेने वळलेला पाहताच पूर्वा म्हणाली.
बेडमध्ये स्टोरेज बॉक्स असल्यामुळे बेडखाली फारशी जागा नव्हती. शेखरला अगदी नाक जमिनीला टेकून आत पाहावे लागले. बेडखाली अंधार होता. काहीही नजरेस पडत नव्हते. शेखरने मोबाईलचा टॉर्च पेटवला आणि झोत बेडखाली मारला.
कागद बेडखालीच होता!
अगदी आत. भिंतीला चिकटून.
"आहे. एक कागद आहे खाली." शेखर मागेच उभ्या पूर्वाच्या दिशेने वळून पाहत म्हणाला. "बाहेर सारायला एखादी काठी किंवा लांबट वस्तू मिळेल? माझा हात पोहोचणार नाही तिथवर."
रुक्मिणी आत गेली आणि कपडे वाळत घालायची काठी घेऊन आली.
शेखरने काठी आत सारली आणि भिंतीच्या टोकाशी पडलेला कागद बाहेर काढला.
त्याचवेळी शेखरला बेडखालच्या कोपर्यात एक काळसर मुटकुळे पडलेले दिसले. तिथवर मोबाईलच्या टॉर्चचा उजेड पोहोचत नव्हता त्यामुळे ते नेमके काय आहे हे कळत नव्हते. शेखरने मोबाईल डाव्या हातात धरत तो हात बेडखाली सारला आणि उजव्या हातातल्या काठीने त्या काळसर मुटकुळ्याला तो ढोसू लागला.
'खुळ.. खुळ.. खुळ.. खुळ...' असा एक विचित्रसा आवाज कानावर पडायला आणि मोबाईलचा प्रकाशझोत आतल्या त्या काळसर मुटकुळ्यावर पडायला एकच गाठ पडली.
क्षणभर शेखरचे काळीज गोठून गेले.
भयाची अतितीव्र जाणीव शरीरभर पसरली आणि त्या जाणिवेने सारी गात्रे बधिर झाली.
आतल्या काळसर मुटकुळ्याला मण्यासारखे दोन डोळे होते. मोबाईलच्या प्रकाशझोतात ते दोन डोळे चमकत होते. शेखरने काठीने ढोसताच ते मुटकुळे वेगाने हालले. मग क्षणार्धातच 'फुस्सऽऽ' असा आवाज करत त्या मुटकुळ्याने एका कभिन्न सर्पाचा आकार धारण केला. अतीव वेगाने तो सर्प शेखरच्या दिशेने झेपावला आणि त्या सर्पाने शेखरच्या काठीधरल्या हाताला कडाडून दंश केला.
"शेखर? अहो, शेखर. काय झाले?" पूर्वाने शेखरला हलवून हलवून भानावर आणले तेव्हा भीतीने तो जवळपास थरथरत होता.
"खाली. बेडखाली." तो त्याच भयाच्या अंमलाखाली पुटपुटला.
"काही नाहीये बेडखाली. आम्ही दोघींनी सगळं नीट तपासून पाहिलं. तुम्हाला काय दिसलं नेमकं?" पूर्वाने एकामागून एक प्रश्नांचा भडिमार केल्यावर शेखरने तिला नुकत्याच आलेल्या अनुभवाविषयी सांगितले.
पूर्वा आणि रुक्मिणी दोघीही शेखरने जे सांगितले ते ऐकून क्षणभर गंभीर झाल्या.
गेल्या काही दिवसांपासून काहीसे अनाकलनीय भास त्या दोघींनाही कमी-अधिक प्रमाणात घरात झाले होते. त्यामुळे शेखरच्या अनुभवावर दोघींनीही अविश्वास असा दर्शवला नाही. रुक्मिणीने शेखरला पाणी आणून दिले. शेखरने ते एका घोटात संपवले. काही काळानंतर जेव्हा सर्वांगाची थरथर थांबली तेव्हा त्याने आपला उजवा हात निरखून पाहिला. हातावर कुठेही कोणतीही दंशाची वा तत्सम खूण नव्हती.
असा का कधी भास असतो?
एवढा प्रत्ययदर्शी?
आणि टॉर्चच्या प्रकाशझोतात चमकणारे ते मणीदार डोळे!
अजूनही शेखरच्या डोळ्यांसमोरून ती प्रतिमा हलायला तयार नव्हती.
काही काळ तसाच जमिनीवर बसून राहिल्यानंतर अंदाज घेत तो उठून उभा राहिला. किंचित भोवळ आल्यासारखी जाणीव सोडली तर बाकी सगळे ठीक होते.
शेखर उठून उभा राहताच पूर्वाने त्याच्यासमोर त्यानेच बेडखालून काठीने काढलेला कागद धरला. "कागद जवळपास कोरा आहे." पूर्वा म्हणाली.
शेखरने पूर्वाच्या हातून तो कागद स्वतःच्या हातात घेत बोटाच्या चिमटीत धरला.
तो एक साधा मध्यम आकाराचा पिवळट झाक असलेला जाडसर कागद होता. कागदावर वाचता येईल असा कोणताही मजकूर दिसत नसला तरी, पुसट झालेल्या शाईचे अवशेष कधी काळी त्या कागदावर काहीतरी लिहिले गेले होते याचा पुरावा देत होते.
शेखरने कागद दिव्यासमोर धरून पाहिला. कागदावर लिहिलेली शाई उडून गेल्यासारखी वाटत होती. जणू कुणी कागद पाण्यात बुडवून वरची शाई धुवून काढली असावी.
पत्राचा मायना तेवढा अस्पष्टसा दिसत होता. त्यावरची, प्रिय श्री, माडगूळकर यांस अनेक उत्तम नमस्कार! ही अक्षरे, पुसट का होईना, पण डोळ्यांना ओळखू येत होती.
पत्र लिहिणार्याचे अक्षर वळणदार होते. निबच्या पेनाने वा टाकाने लिहिल्याप्रमाणे टपोरे आणि मोठाले होते.
मधला संपूर्णच मजकूर शाई उडून गेल्यासारखा वाहून गेला होता. फळा पुसल्यावर खडूची पांढरट झाक जशी काळ्या पृष्ठभागावर राहते, तशी त्या पांढर्या कागदावर शाईची निळसर काळी झाक राहिली होती.
पत्राच्या अंताचा मजकूर मात्र काहीसा सुस्पष्ट होता. ती अक्षरे पत्रावरच्या इतर मजकुरापेक्षा जास्त ठळक होती.
पत्राच्या अंताला, कळावे तुमचा – असे लिहून नंतर – तुम्हाला कधीही कळणार नाही कोण ते! हीच अक्षरे पुन्हा लिहिलेली होती.
ते शब्द शेखरला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करत होते. जणू त्या शब्दांतून पत्र लिहिणार्याला माडगूळकरांना वाकुल्या दाखवायच्या होत्या. म्हणायचे होते की, मी काहीही केले तरी तू माझे किंचितही वाकडे करू शकणार नाहीस.
ही काय पद्धत झाली?
शेखर पुन्हा एकदा स्टडी टेबलाच्या दिशेने वळला आणि त्याने पत्ता लिहिलेले पाकीट ते मोठे पाकीट हातात घेतले. पाकिटावरचे अक्षर आणि कागदावरचे अक्षर सारखेच होते. मात्र एक ठळक फरक होता. पाकिटावरचे अक्षर साध्या जेल पेनने लिहिल्यासारखे वाटत होते. कागदावरचे अक्षर मात्र दौतातल्या द्रवरूप शाईत टाक बुडवून लिहिल्यासारखे पाणीदार वाटत होते.
शेखरने पाकिटावरचा शिक्का आणि तारीख पाहिली. पाकिटावर दोन शिक्के होते. एक होता सिटी पोस्ट, पुण्याचा. तारीख होती २३ नोव्हेंबर. म्हणजे माडगूळकर गेले तोच दिवस.
पाकिटावरच्या टपाल खात्याच्या दुसर्या शिक्क्याने मात्र शेखरचे लक्ष अधिक प्रमाणात वेधले. पाकिटावरच्या दुसर्या शिक्क्यावरही गावाचे नाव होते.
ते नाव होते, हमरापूर!
उगीच वाचली. निराशा जनक. ही…
उगीच वाचली. निराशा जनक. ही कथा म्हणजे एका कादंबरीचा एक अंश आहे, हे असे करण्यात काय हेतू आहे?
(राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'सर्पकाल' या आगामी कादंबरीतील संपादित अंश.) ही टिप्पणी हेडर मध्ये लिहिली असती तर वेळ वाया गेला नसता.