एक भाकीत
एक भाकीत
========
-राजीव उपाध्ये
...तर मंडळी आज एक भाकीत करायची अनावर इच्छा होत आहे. हे भाकीत ज्योतिषावर म्हणजे ग्रहगोलांवर आधारित नाहीये. मी ज्योतिषाचा अभ्यास थांबवून आता १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
हे भाकीत माझ्या मानवी मेंदूच्या अभ्यासावर आणि तत्संबंधी निरीक्षणांवर आधारित आहे. माझ्या निरीक्षणांधून मला जे बिंदू ठळकपणे दिसले त्यांना जोडून तयार झालेले चित्र सर्व संबंधिताना सावध करण्यासाठी शब्दबद्ध करत आहे.
आपल्याकडे व्हिसलब्लोअरना कुणी कधीच गंभीरपणे घेत नाही, त्यामुळे हे देखिल हसण्यावारी नेले जाईल. कुणाला वाटेल की हे मी प्रसिद्धीसाठी करतोय. तरी पण देशाप्रती एक कर्तव्य या भावनेतून हे लोकांपुढे मांडणे आवश्यक वाटते. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार अर्थ लावण्यास मोकळा असतो,
मग माझ्या भाकीताला आधार कसला? तर तो आहे मानवीवर्तन विज्ञानाचा...
वातावरण जेव्हा आल्हाददायक असते (आणि जेव्हा महत्त्वाच्या गरजा भागत असतात) तेव्हा माणूस तुलनेने स्वस्थ असतो. तो साधकबाधक, विवेकी विचार करायची शक्यता जास्त असते.
पण माणूस जेव्हा एखाद्या कारणाने चिडचिडा बनला (इरिटेट झाला) तर तो अधिकाधिक अविवेकी बनतो आणि चुकीचे निर्णय घ्यायची, आक्षेपार्ह वर्तन करायची शक्यता वाढते.
२०२७ मध्ये एल निनोमुळे उन्हाळा, दुष्काळ इ० या विषयी भरपूर बोलले जात आहे. पण यात होरपळले जाऊन विवेक हरवल्यामुळे सामान्य जनता अधिक अस्वस्थ होऊन सध्याचे राजकीय प्रश्न अधिक गंभीर बनायची शक्यता मला वाटते.
महत्त्वाचे म्हणजे हवामानबदलाचा मुख्य परिणाम सरकार आणि जनता दोन्ही वर सारखाच होणार असल्याने चुकीचे निर्णय आणि चुकीचे वर्तन जनता आणि सरकार दोघांकडून होऊन सध्याचे प्रश्न अधिक गंभीर बनू शकतात. जनतेचा रोष चिरडणे हे सरकारसाठी आत्मघातकी ठरू शकते. धार्मिक उन्मादावर नियंत्रण ठेवणे हे खरे आह्वान ठरेल.
माझ्या अंदाजानुसार भविष्यात जर मोठ्या उलथापालथी झाल्या तर त्याचे कारण परकीय शक्ती नसून आपण सतत दूर्लक्ष करून उपहास केलेला हवामान बदल हे असेल.
मग पुढे काय?
एक शक्यता - कदाचित मध्यावधी निवडणूका? किंवा कदाचित आणखी काही जे सरकारच्या सारासार बुद्धीवर अवलंबून असेल... मोघम लिहीण्याचे कारण मला उगाच चिथावल्याचे, प्रक्षोभक लिखाणाच्या आरोपांना आमंत्रण द्यायची इच्छा नाही. कारण माझा तो इथे उद्देश नाही.
उष्णतेच्या लाटांचे मानवी…
उष्णतेच्या लाटांचे मानवी मेंदू आणि शरीरावर होणारे परिणाम
भारतात उष्णतेच्या लाटा ही केवळ हवामानाची समस्या राहिलेली नाही; ती सार्वजनिक आरोग्यापुढील एक गंभीर आव्हान बनली आहे. वाढते तापमान, दमट हवामान, रात्रीही कमी न होणारी उष्णता आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांचे वाढते शारीरिक कष्ट यांचा मानवी शरीरावर खोलवर परिणाम होतो. या परिणामांचा विचार करताना निर्जलीकरण आणि शरीरातील सोडियम व पोटॅशियम या महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन समजून घेणे आवश्यक आहे.
मेंदू आणि उष्णतेचा संबंध
मानवी मेंदूचे कार्य शरीराचे तापमान, रक्ताभिसरण आणि पाण्याचे संतुलन यांच्याशी निगडित आहे. अतिउष्णतेमुळे शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. घामाद्वारे पाणी आणि क्षार बाहेर पडतात. त्यांची योग्य भरपाई झाली नाही, तर निर्जलीकरण होऊ शकते. परिणामी थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, एकाग्रता कमी होणे आणि प्रतिक्रिया देण्याचा वेग मंदावणे असे परिणाम दिसू शकतात.
अत्यंत उष्णतेचा झोपेवरही परिणाम होतो. अपुरी झोप, शारीरिक थकवा आणि उष्णतेचा थेट ताण यांमुळे चिडचिड, अस्वस्थता आणि निर्णयक्षमता कमी होऊ शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीमध्ये हे परिणाम सारख्याच प्रमाणात दिसतात असे नाही.
सोडियम आणि पोटॅशियमचे महत्त्व
सोडियम आणि पोटॅशियम हे मज्जापेशींच्या विद्युत संदेशवहनासाठी आवश्यक घटक आहेत. सोडियमची रक्तातील पातळी कमी झाल्यास डोकेदुखी, मळमळ, गोंधळ आणि गंभीर परिस्थितीत आकडी येऊ शकते. पोटॅशियमची कमतरता प्रामुख्याने स्नायूंची कमजोरी, थकवा आणि हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमिततेशी संबंधित असते.
मात्र, उष्णतेमुळे प्रत्येक व्यक्तीच्या रक्तातील सोडियम किंवा पोटॅशियम कमी होतेच असे नाही. घामामुळे होणारे क्षारांचे नुकसान, पाण्याचे सेवन, आहार, औषधे आणि मूत्रपिंडांचे कार्य यांवर इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन अवलंबून असते. विशेषतः अतिप्रमाणात साधे पाणी पिणे आणि त्याच वेळी शरीरातील क्षारांची भरपाई न होणे यामुळे काही परिस्थितींमध्ये रक्तातील सोडियम धोकादायकरीत्या कमी होऊ शकते.
भारतीय लोकसंख्येसाठी धोका
वृद्ध व्यक्ती, बांधकाम मजूर, शेतमजूर, रस्त्यावरील विक्रेते, बाहेर काम करणारे कर्मचारी आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना विशेष धोका असतो. गरिबी, गर्दीची घरे, अपुरी वायुवीजनव्यवस्था, पाण्याची अनुपलब्धता आणि थंड जागेचा अभाव यांमुळे हा धोका आणखी वाढतो.
प्रतिबंध आणि सार्वजनिक आरोग्य
उष्णतेच्या काळात पुरेसे पाणी पिणे, सावलीत विश्रांती घेणे, शक्य असल्यास दुपारच्या तीव्र उन्हातील काम कमी करणे आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणात घाम गाळणाऱ्या व्यक्तींना परिस्थितीनुसार ओआरएस किंवा इतर योग्य द्रवांची आवश्यकता असू शकते; मात्र सर्वांनी अतिरिक्त मीठ किंवा पोटॅशियम पूरक घ्यावेत असे नाही.
उष्णतेच्या लाटांकडे केवळ तापमानवाढ म्हणून न पाहता, मानवी मेंदू, शरीर आणि सामाजिक असमानता यांच्यावर परिणाम करणारे सार्वजनिक आरोग्याचे संकट म्हणून पाहणे आवश्यक आहे. उष्णतेचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी हवामानविषयक माहितीबरोबरच निर्जलीकरण (Dehydration), इलेक्ट्रोलाइट्स, संज्ञानात्मक कार्यक्षमता आणि आरोग्यसेवांवरील परिणाम यांचाही अभ्यास केला पाहिजे.
१. अन्नधान्य न पिकणे.२…
१. अन्नधान्य न पिकणे.
२. लोकसंख्या आणि तरुणवर्ग वाढतो आहे त्यामानाने नोकऱ्या वाढू शकत नाहीत.
३. देशात इंधन स्रोत नसणे.
हे तिन्ही मुद्दे बऱ्याच देशांना सतावत आहेत.
आंदोलनं होतील, होत आहेत. सत्ताबदल होत राहतील पण प्रश्न सुटणार नाहीत.