भारत आणि ए०आय०
भारत आणि ए०आय०
===========
--राजीव उपाध्ये
आय०आय०टी० मुंबई चे सध्याचे संचालक प्रा० शिरीष केदारे आणि मी आय० आय० आय० टी० त असताना चांगले "अरे-तुरे"तील मित्र होतो. आम्ही एकाच वयाचे, पण वेगवेगळ्या शाखा आणि हॉस्टेल. संस्कृतप्रेम आणि गिर्यारोहण हा तेव्हा आमच्या मधला समान दुवा होता. आमचे कधी वाद आणि भांडणे झाली नाहीत, तसेच त्यांच्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान पण झालेले नाही. त्यामुळे माझा त्यांच्यावर वैयक्तीक राग पण अजिबात नाही. उलट आपला मित्र आय०आय०टी० सारख्या जगप्रसिद्ध संस्थेचाचा संचालक झाला हे कळले तेव्हा अंगावर मूठभर मांसच चढले होते.
आज अचानक माझ्या या मित्राची एक मुलाखत [१] युट्युबवर बघितली आणि बरीच चिंता, अस्वस्थतता निर्माण झाली. त्यांच्या मुलाखतीमध्ये प्रा० केदारे यांना ए०आय०बद्दल काही प्रश्न विचारले गेले त्यासाठी मुलाखतीचा 25:30 मि० ते 28:00 मि० हा बघावा.
ते म्हणतात -
25:57The real things of AI yet to arrive according to me.
26:47 AI can only tell you about what
26:55 is known in a very systematic, comprehensive way. But it can't tell you
27:01 what the humankind doesn't know. And that is what innovation is, right?
हे ऐकल्यावर मनात प्रश्नांचे आणि विचारांचे मोहोळ उठले आहे. real things of AI म्हणजे प्रा० केदारे यांना काय अपेक्षित आहे? सध्याचा ए०आय० "पुरेसा रिअल" नाही असे सुचवायचे आहे काय?
पुढे ते म्हणतात, "ए०आय० फक्त जे अगोदरच माहित असलेले पद्धतशीर पणे सांगतो. पण तो मानवजातीला माहित नसलेल्या गोष्टी सांगू शकत नाही." पुढे ते आणखी एक धक्कादायक विधान करतात - "हीच कल्पकता (नवनिर्मिती) नव्हे काय?"
या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी तर ए०आय० निर्मित कलेचे उदा० योग्य ठरेल - आज ए०आय० मुळे आकार, रंग, प्रकाश यांच्या एकत्रीकरणामुळे जी अभिव्यक्ती साध्य झाली आहे ती मानवीकल्पनेतून जन्म घ्यायला किती वर्षे वाट बघावी लागली असती, याची कल्पना करता येत नाही. आज ए०आय० ची वेगवेगळ्या क्षेत्रात जी आगेकूच चालू आहे, त्याचा पहिला दणका प्रथम शेअरबाजाराला बसतो. युद्ध, संशोधन, आरोग्यसेवा आणि निदान अशा अनेक क्षेत्रात निर्विवादपणे पाय रोवूनही प्रा० केदारे यांना ए०आय० पुरेसा रिअल वाटत नसेल तर त्यांना अपेक्षित असलेला ए०आय० कोणता हे त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक होते. शक्यता-शोधनाची ए०आय० ची अचाट क्षमता मानवाला माहित नसलेल्या वास्तवाचे दर्शन घडवते, याकडे प्रा० केदारे दुर्लक्ष का करतात, हे कळायला मार्ग नाही. दुसरी एक न टाळता येणारी गोष्ट ए०आय० तंत्रज्ञानाने चीनमध्ये परमोत्कर्ष गाठला आहे, याकडे पण प्रा० केदारे दुर्लक्ष करतात.
एक गमतीदार आठवण - चॅटजीपीटीने अवतार घेतल्यावर मला ए०आय०ला वेडेवाकडे प्रश्न विचारायची सवय लागली. एकदा मला घरी कुळथाचे पिठले बनवायची अनिवार इच्छा झाली. पण घरातली आमसुले संपल्यामुळे चिंच घालावी का असा विचार मनात डोकावला. पण ए०आय० ही समस्या कशी हाताळतो हे तपासायची इच्छा निर्माण झाली. मग मला चॅटजीपीटीने चिंच घालून कुळथाचे पिठले अत्यंत चविष्ट बनते असे सांगितले, तेव्हा मात्र मला स्वत:ला चिमटा काढावा लागला. कारण कुळथाच्या पिठल्यात चिंच घालतात हा निर्णय चॅटजीपीटीने कसा केला हे कोडे मला अजुनही सुटलेले नाही.
"हीच कल्पकता (नवनिर्मिती) नव्हे काय?" या प्रा० केदारे यांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
भारत ए०आय० तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणूनही मागे पडेल असे माझे ठाम मत बनले आहे, ते अशाच दृष्टीकोनामुळे...पण माझे ऐकणार कोण?
संदर्भ-
...
'चॅटजीपीटीने (चिंच घातलेले) कुळथाचे पिठले नक्की कधी चाखून बघितले? (की, (चॅटजीपीटीने) (नेहमीप्रमाणेच) दिले ठोकून?)' हा प्रश्न येथे अगदीच अस्थानी ठरावा काय?
(याला एक पळवाट अशी असू शकते, की चॅटजीपीटीला ट्रेनराने जे शिकविले, ते त्याने सांगितले. म्हणजे, या ठिकाणी, हे चॅटजीपीटीचे प्रतिपादन नसून (मानवी) ट्रेनराचे प्रतिपादन होय, नव्हे काय? (चॅटजीपीटीला चिंच घातलेले कुळथाचे पिठले फर्स्टहँड अनुभवण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याकारणाने? (चूभूद्याघ्या.))
परंतु मग याचाच अर्थ, चॅटजीपीटीच्या प्रस्तुत प्रतिपादनावर भरवसा ठेवून कुळथाचे पिठले चिंच घालून करण्याचा निर्णय (मग त्याचे अंतिम फलित बरेवाईट कसेही निघो, परंतु) 'आपल्या आयुष्याचे नियंत्रण दुसर्या कोणत्या तरी माणसाच्या (या ठिकाणी, चॅटजीपीटीच्या ट्रेनराच्या) हातात देण्या'तलाच प्रकार नव्हे काय?
मग यात आणि 'सनातन धर्मा'त नक्की फरक तो काय राहिला?
पण लक्षात कोण घेतो?)
असो चालायचेच.
.
गेले अनेक दिवस हे कुळथाचे पिठले माझ्या आयुष्यात सतत येत आहे. पण मी अजून एकदाही ते खाल्ले नाही (यामुळे मी विशेष काही गमावलेले नाही असं काही जणांनी सांगितलं आहे). माझ्याकडे एक खऱ्या खुऱ्या करंदीकर आडनाव असलेल्या माणसाने, अतिशय प्रमाणबद्ध अशी पाककृती मला दिलेली आहे. त्यात आमसूल हा घटक अत्यावश्यक आहे. तर ती पाककृती वाचून मी बाजारातून कुळीथ पिठी आणली. पण दुर्दैवानं ती कुठेतरी गायब झाली.
आमच्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे. कुळथाचे (आमसूल घातलेले) गरम गरम पिठले + पहिल्या वाफेचा भात आणि पोह्याचा पापड/मिरगुंडं हीच खरी पाकसिद्धी आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही एआयची परीक्षा घेणार नाही.
>> 'आपल्या आयुष्याचे नियंत्रण दुसर्या कोणत्या तरी माणसाच्या (या ठिकाणी, चॅटजीपीटीच्या ट्रेनराच्या) हातात देण्या'
मुळात आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात आहे हाच एक मोठा गैरसमज आहे. आता बघा ना. पाककृती आहे, तेल, तिखट, लसूण, आमसूल सगळं आहे. पण कुळीथ हरवलं!
.
गेले अनेक दिवस हे कुळथाचे पिठले माझ्या आयुष्यात सतत येत आहे. पण मी अजून एकदाही ते खाल्ले नाही (यामुळे मी विशेष काही गमावलेले नाही असं काही जणांनी सांगितलं आहे).
मी खाल्लेले आहे. जेवायला दुसरे काही केलेले नसले, तर आयत्या वेळेस चटकन काहीतरी म्हणून आमच्यात ते करतात.१ बरे लागते, परंतु, त्याकरिता मरावे, इतकेही काही थोर लागत नाही, हे खरेच आहे. (अर्थात, याबद्दल मतभेद असू शकतात.)
त्यात आमसूल हा घटक अत्यावश्यक आहे.
आमच्या घरात (कधीकाळी आणून ठेवलेली) आमसुले बाटलीत भरून ठेवलेली कोठेतरी पडून आहेत, याची मला (आणि बायकोलाही) कल्पना आहे. मात्र, प्रत्यक्षात ती बाटली आणि ती आमसुले ऐन वेळेस सापडणे अशक्य. त्यामुळे, त्या आमसुलांऐवजी कुळथाच्या पिठल्यात बायको नक्की काय घालते, हे तिचे तिलाच ठाऊक!
त्यामुळे, कुळथाच्या पिठल्यात आमसूल हा घटक अत्यावश्यक आहे, याच्याशी मी सहमत नाही.
(किंबहुना, कुळथाच्या पिठल्यात (कुळथाची पिठी वगळता) बाकी काहीही अत्यावश्यक आहे, याबद्दल मी साशंक आहे. (Anything and everything can be substituted.) (हं, तेवढे लसूण असल्यास मात्र शक्यतो बरे.))
तर ती पाककृती वाचून मी बाजारातून कुळीथ पिठी आणली. पण दुर्दैवानं ती कुठेतरी गायब झाली.
(आमच्या घरातल्या आमसुलांप्रमाणेच! चालायचेच.)
उत्तम झाले!
मुळात आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात आहे हाच एक मोठा गैरसमज आहे.
हे बरीक खरे बोललात!२
किंबहुना, जगातल्या किमान एका हिंदू मनुष्याच्या आयुष्याचे नियंत्रण ज्या दिवशी त्याच्या/तिच्या स्वतःच्या हातांत येईल, त्या दिवशी (१) जगबुडी होईल, आणि (त्याहूनही भयंकर म्हणजे) (२) हिंदुधर्म रसातळास जाईल, असा (हिंदुधर्मास) शाप आहे. त्यामुळे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.
असो चालायचेच.
१ म्हणजे, बायको बनवते.१अ (मला बनवता येत नाही, आणि मी त्या फंदात पडतही नाही.)
१अ बायकोचे कार्यस्थळ घरापासून (वाहनाने) पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याकारणाने, ती शक्यतो दुपारच्या जेवणाला घरी टपकते. मी वर्कफ्रॉमहोम करीत असल्याकारणाने, ती घरी येईपर्यंत (माझ्या कार्यस्थळाची बाकीची कामे आटोपून) मी शक्यतो काहीतरी बनवून ठेवतो.१अ१ मात्र, कधीकधी फारच कामात नाहीतर सकाळसकाळच्या मीटिंगांत जर अडकलो, तर ती घरी टपकल्यावर नेमके ऐन वेळेस काहीही बनवलेले नसते. अशा वेळेस फॉलबॅक ऑप्शन म्हणून कुळथाचे पिठले कामी येते, इतकीच काय ती कुळथाच्या पिठल्याची (आमच्यात) महती. चालायचेच.
१अ१ एखादी भाजी, वगैरे.१अ१अ, १अ१ब किंवा, एखादे वेळेस अगदीच नाही जमले, तर गेला बाजार वरणभातबटाट्याचीभाजी. (त्याला काही जास्त अक्कल लागत नाही. कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार, असे पु.ल. म्हणून गेलेलेच आहेत.)
१अ१अ पोळ्या आमच्यात विकतच्या आणतात. यंत्रावर लाटून भाजलेल्या देशी पद्धतीच्या ताज्या गरमागरम चपात्या१अ१अ१ घाऊक भावात पुरविणारे हवे तेवढे देशी पुरवठादार आमच्या अटलांटात आहेत. पंचवीस चपात्यांची दोनतीन पाकिटे आणून फ्रीजमध्ये टाकायची. ती दोन ते तीन आठवड्यांपर्यंत खराब न होता आरामात टिकतात. गरजेप्रमाणे आयत्या वेळेस गरम करून घ्यायच्या. डोक्याला ताप नाही.
१अ१अ१ तॉर्तिय्या नव्हेत. गव्हाच्या देशी चपात्या. (ताज्या गरमागरम!)
१अ१ब एखादी गिळता येण्याजोगी भाजी बनवण्याइतपत मला जमते. (किंवा, बायको चालवून घेते, म्हणू या.)
२ म्हणजे, एरवी खोटे बोलता, असे सुचविण्याचा उद्देश नाही, परंतु तरीही.
अक्वायर्ड टेस्ट
आमच्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे. कुळथाचे (आमसूल घातलेले) गरम गरम पिठले + पहिल्या वाफेचा भात आणि पोह्याचा पापड/मिरगुंडं हीच खरी पाकसिद्धी आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही एआयची परीक्षा घेणार नाही.
भरपूर लसूण आणि थोडे आमसूल घातलेले पिठले खाल्ले आहे. ते मऊ भाताबरोबर (+ तूप) खायला (मला तरी) चांगले लागले. आमच्या घरी ते कधीच होत नसे, पण पुण्यात आल्यावर काही मैत्रिणींच्या कृपेने खायची संधी मिळाली. कुळथाची चव ही अक्वायर्ड टेस्ट असावी असा अंदाज. यू आर नॉट मिसिंग मच वगैरे म्हणणार नाही, ते त्यामुळे.
चूक!
या संकेतस्थळाचे अद्याप संपूर्ण एआयीकरण झालेले नाही. मात्र, 'जणू काही एआयलाच वाहून घेतलेले संकेतस्थळ आहे, असा भास होतो', अशा अर्थाने, 'एआय-सी अक्षरे' हेच नाव संकेतस्थळाकरिता उचित आहे.
(एका मराठी संकेतस्थळाच्या नामकरणातील हिंदीचा हा प्रभाव चिंताजनक आहे खरा. पण लक्षात कोण घेतो?)
तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त…
तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त आहे, पण प्रा. केदारे यांचा मुद्दा वेगळ्याच लेव्हलवर आहे.
ते सध्याच्या AI ला कमी लेखत आहेत असं वाटत नाही. त्याचं म्हणणं इतकंच की आजचा AI मुख्यतः आधीपासून उपलब्ध डेटावर आधारित आहे. तो त्या माहितीचं व्यवस्थित रसग्रहण ऊर्फ अर्क साठवणे असे करून पुढील शब्द, अक्षर, पिक्सेल किंवा आकडा, निर्णय प्रेडिक्ट करतो. हे सर्व आगोदर माहीत असलेल्या माहितीवरून काढलेले निष्कर्ष असतात. ती सर्व माहिती तुम्हाला आणि मला किंवा कोण्या एकट्या मनुष्याला एकत्रित माहीत नसल्याने आपल्याला ते निर्णय किंवा आऊटपुट खूपच आकर्षक वाटतात. आणि असतात देखील.
पण अद्याप AI पूर्णपणे नवीन, मानवाला अजिबात माहित नसलेलं ज्ञान स्वतःहून शोधत नाही. प्राध्यापक केदार यांच्या मते खरी नवनिर्मिती (innovation) तिथेच होते.
ए आय निर्मित चित्रं, कविता, गाणी, चॅट.. , मेडिकल फिल्डमधली कर्तबगारी, हे सगळं खूप इंप्रेसिव्ह आहे पण ते “intelligent use of existing knowledge” आहे, “discovery of unknown” नाही.
VL JEPA बद्दल वाचले नसेल तर अवश्य वाचा. व्हिजन लँग्वेज मॉडेल्स ही देखील अजून उपलब्ध माहितीवरच शिकतात पण तो त्या पुढच्या पायरीकडे जाण्याचा प्रयत्न आहे जिथे AI जग समजून घेऊन अंदाज बांधतो. फक्त पुढचे टेक्स्ट प्रेडिक्ट करण्या ऐवजी आऊटकम प्रेडिक्ट करतो.
पण अजूनही पूर्णपणे स्वतंत्र शोध (true discovery) करणारा AI तयार झालेला नाही.
म्हणून त्यांच्या “real AI yet to arrive” या विधानाचा अर्थ असा घेता येईल की हा पुढचा टप्पा अजून बाकी आहे.
आपण एकवेळ/तात्पुरते तुमचे…
आपण एकवेळ/तात्पुरते तुमचे म्हणणे सत्य मानू या! पण आज मला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. मी स्वत: जे ट्रेडींग मॉडेल तयार करून वापरतो. त्यात वापरलेल्या फिचर्सचा अर्थ ग्रोकला विचारला तेव्हा त्याने ९५% अचूक उत्तरे दिली. आपण परम-बुद्धीमत्तेजवळ पोचलो आहोत की काय, अशी दाट शंका येत आहे. कारण फिचर्स मी स्वत: तयार केलेली असल्याने ती ग्रोकला माहित असण्याची शक्यता शून्य! एकच शक्यता आहे, ए०आय० व्यक्तीगत संगणकावरील डेटा उचलून तो ट्रेनिंग साठी वापरत असेल तर हे होणे शक्य आहे.
श्री० गवि आजचे वैद्यकीय…
श्री० गवि
आजचे वैद्यकीय ज्ञान मृतव्यक्तीला जिवंत करू शकत नाही, म्हणून आपण नाकं मुरडत नाही किंवा असे ही म्हणत नाही की "रिअल मेडीकल नॉलेज इज यट टू कम". आपण उपलब्ध ज्ञान जास्त उपयोगात कसे आणता येईल यावर लक्ष केंद्रित करतो. मला ए०आय० बद्दल पण हेच अपेक्षित आहे.
"ए०आय० फक्त जे अगोदरच माहित…
"ए०आय० फक्त जे अगोदरच माहित असलेले पद्धतशीर पणे सांगतो. पण तो मानवजातीला माहित नसलेल्या गोष्टी सांगू शकत नाही.>>> हे तितकेसे खरे नाहीये. तसे असते तर chatGPT ने आजवर मानवाला न सुटलेले काही गणिती कूट प्रश्न सोडवले नसते.
अजून एक गंमत
कुत्र्यांची हजारो चित्रे पाहून शिकलेला chatGPT कुत्र्याचे चित्र ओळखू लागला. त्याला च्यु बनवणे अगदी सोपे आहे. chatGPTला कसे हॅक करता येते ते मी इथे सांगणार नाही, पण जे चित्र पाहून लहान मुलगा/मुलगी सहय सांगतो हे चित्र कुत्र्याचे आहे त्याच चित्राला chatGPT पांडा म्हणून ओळखतो.
याचा अर्थ सरळ आहे कि chatGPT मानवा सारखा विचार करत नसावा,
तो कसा विचार करतो हे ही आपल्याला माहित नाही.
आपण ज्याची निर्मिती केली त्याची बुद्धी आपल्याला कोडं झालेले आहे.
हे खरोखर भीतीदायक आहे.
तसे असते तर chatGPT ने आजवर…
तसे असते तर chatGPT ने आजवर मानवाला न सुटलेले काही गणिती कूट प्रश्न सोडवले नसते.
कॉम्प्यूट.. ताकद असंख्य पटीने वाढल्याने गाणिती प्रश्न सुटतात. त्यात मूलभूत नवीन विचार आहे असे मानू नये.
तो कसा विचार करतो हे ही आपल्याला माहित नाही.
आपण ज्याची निर्मिती केली त्याची बुद्धी आपल्याला कोडं झालेले आहे.
असं नाहीये हो..
जानेवारी २०२६ मध्ये आता…
जानेवारी २०२६ मध्ये आता ए०आय०च्या मदतीने अनेक दशके न सुटलेल्या एर्डश कोशातील ३ महत्त्वाच्या समस्या ए०आय० च्या मदतीने सुटल्याचे जाहिर करण्यात आले. नील सोमाणी या संशोधकाने एर्डश समस्या क्र० ३९७ जीपीटी ५.२ हे मॉडेल वापरून काही मिनीटात सोडविली. केव्हीन बॅरेटोने आपल्या एका सहकार्याबरोबर एर्डश समस्या क्र० ७२८ आणि ७२९ या समस्या सोडविल्या. गणितातील नोबेल मानले गेलेले फिल्ड पारितोषिक विजेते टेरेन्स टाओ यांच्यामते स्वयंचलित ए० आय० च्या मदतीने मिळवलेले हे यश लक्षणीय आहे.
ref
तर्कतीर्थ ह्यांच्या लेखातून
जानेवारी २०२६ पर्यंत संगणक AI च्या पाशी जसे होते तसेच इतरांच्या पाशीही होते!
…
…म्हणजे वहीच्या कागदात टाचणी खुपसण्यासाठी जेसीबी वापरण्यासारखे आहे.
आमच्यात याकरिता झुरळ मारण्यासाठी एके४७ वापरण्याची उपमा वापरतात. असो.
बाकी, प्रस्तुत संदर्भात समर्पक असेलही, किंवा नसेलही (मला कल्पना नाही. (चूभूद्याघ्या.)), परंतु, हे तत्त्व अंमळ रोचक आहे खरे. (आणि, गंमत म्हणजे, प्रस्तुत संदर्भात या तत्त्वाच्या माझ्या उल्लेखासही ते तंतोतंत लागू पडते.)
असो चालायचेच.
.
होमो डेअस आणि नेक्सस वाचल्यानंतर माझी अशी समज होती की एआय मॉडेल जसं ट्रेन केलंय तसं वागेल. लिबरल-डेमॉक्रॅटिक व्हॅल्यूज दिल्या असतील तर ते तशाच प्रकारची उत्तरं देईल; पण एखादं चायनीज मॉडेल कदाचित वेगळी उत्तरं देईल. गाडी चालवणारी मॉडेल्सही नैतिक प्रश्नांना कसं हाताळायचं हे ज्या पद्धतीने शिकवलेलं असेल त्यानुसार वागतील. त्यामुळे शीतयुद्धातल्या "आयर्न कर्टन" प्रमाणे जगात एकप्रकारचे "सिलिकॉन कर्टन्स" निर्माण होतील असा हरारीचा दावा आहे.
पण मागच्या धाग्यात प्रभुदेसाईंनी सुचवलेलं Anyone Builds It, Everyone Dies हे पुस्तक मात्र ही समज चुकीची आहे असं म्हणतं. त्यात अगदी खोलात जाऊन सांगितलंय की मॉडेल्स शेवटी येतात ग्रेडियंट डिसेंटवर. त्यांची रिझनिंग ही माणसांसारखी नसते. ती ग्रेडियंट डिसेंटच्या नियमांनुसार घडते.
त्यामुळे त्यांचे उत्तर शोधण्याचे मार्ग माणसाच्या विचारशक्तीपेक्षा पूर्ण वेगळे असतात. आणि त्या लाखो कोट्यवधी वेट्सच्या मॅट्रिक्समध्ये नेमकं काय दडलंय हे समजण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. असे हे पुस्तक सांगतं.
सिट्रीनीचा रिपोर्ट तरी इकॉनॉमिक डिझास्टरची भविष्यवाणी करतो. पण हे पुस्तक तर (अगदी उद्याच नाही) पण भविष्यात मानवसमूहच नष्ट होऊ शकतो अशी शक्यता मांडतं. प्रथमदर्शनी हे अवास्तव वाटतं. आणि एक्स्ट्रीम आउटकम किंवा आउटलायर प्रेडिक्शन्स सहसा चुकीच्या असतात असं आपल्याला वाटतं.
या पुस्तकाबद्दलही तसंच वाटतं. एकदम साय-फाय वाटते. पण कदाचित काही तथ्य असेलही. सुरुवातीचा भाग मल्टीडिसिप्लिनरी अॅप्रोचवर आधारित आहे. आणि त्यावर काउंटर आर्ग्युमेंट करायला जीवशास्त्रापासून हॅकिंगपर्यंतचं ज्ञान असावं लागेल. त्यामुळे माझं स्वतःच काही ठोस मत नाही.
पण या पुस्तकामुळे ASI alignment(*) या विषयावर कळलं. एआय कंपन्यांसमोर हे एक मोठं चॅलेंज आहे हेही लक्षात आलं.
(*)"Artificial Superintelligence (ASI) alignment" म्हणजे मानवी बुद्धिमत्तेपेक्षा जास्त क्षमतेचा एआय मानवाच्या उद्दिष्टांनुसार, नैतिकतेनुसार आणि सुरक्षिततेनुसार वागेल याची खात्री करण्याचं आव्हान. कारण ASI माणसांपेक्षा जास्त विचार करू शकतो, जास्त शक्तिशाली होऊ शकतो; त्यामुळे त्याचे उद्दिष्ट जर चुकले तर त्याचे परिणाम अपरिवर्तनीय आणि विनाशकारी ठरू शकतात.
आणि त्या लाखो कोट्यवधी…
आणि त्या लाखो कोट्यवधी वेट्सच्या मॅट्रिक्समध्ये नेमकं काय दडलंय हे समजण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. असे हे पुस्तक सांगतं.
हे समजून घेणं कठीण आहे हे मान्य. पण याचा अर्थ आपण आऊटकम तपासू शकत नाही आणि ड्रिफ्ट किंवा हॅल्युसिनेट होत चाललेले मॉडेल वेळीच ओळखून ते थांबवू शकत नाही असे नव्हे. ह्यूमन इन द लूप महत्वाचा.
ड्रिफ्ट किंवा हॅल्युसिनेट होत असलेला ह्यूमन
ड्रिफ्ट किंवा हॅल्युसिनेट होत चाललेले मॉडेल वेळीच ओळखून ते थांबवू शकत नाही असे नव्हे. ह्यूमन इन द लूप महत्वाचा.
हे बरोबर असेल, पण सध्या तरी असं दिसतंय की किती ह्यूमन्स / एआय इन द लूप लावायचे ते लावा, पण आधी ड्रिफ्ट किंवा हॅल्युसिनेट होत असलेल्या ट्रम्पला आवरा.
अॅन्थ्रॉपिक मायथोस
आज सकाळी डिलबूक मध्ये खालील बातमी वाचली.
अॅन्थ्रॉपिक या कंपनीने तयार केलेल्या मायथोस नावाच्या नवीन A.I. मॉडेलने सायबरसुरक्षेतील उणिवा शोधणे आणि त्यांचा फायदा घेणे यात अत्यंत प्रगत क्षमता दाखवल्या आहेत. हे मॉडेल सार्वजनिक वापरासाठी धोकादायक ठरू शकते, असे कंपनीचे मत आहे. यामुळे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट आणि फेड चेअर जेरोमी पॉवेल यांनी वॉल स्ट्रीटच्या प्रमुखांना बोलावून जोखमींवर चर्चा केली.
जे. पी. मॉर्गनचे ॲसेट मॅनेजर मायकेल सेंबालेस्ट यांनी “Misanthropic” नावाचे विश्लेषण प्रसिद्ध केले, ज्यात मायथोसच्या काही धक्कादायक क्षमतांचा उल्लेख आहे.
मायथोस हे हॅकिंगसाठी डिझाइन केलेले मॉडेल नव्हते, पण त्याने स्वतःहून अत्यंत प्रगत हॅकिंग स्किल्स विकसित केल्या.
मायथोस क्रिप्टोग्राफी, वेब सिक्युरिटी, रिव्हर्स इंजिनिअरिंग, फॉरेन्सिक्स आणि इतर टूल्स वापरून सॉफ्टवेअरमधील उणिवा शोधू शकते आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी वर्किंग एक्स्प्लॉइट कोड तयार करू शकते. मायथोसच्या क्षमतांमुळे सर्वात मोठा अॅलाइनमेंट‑रिस्क निर्माण होऊ शकतो. कंपनीने जाहीर केलेल्या उदाहरणांमध्ये मायथोसने फसवणूक, लपवाछपवी, विघातक कृती (सॅबोटाज) सारखी वर्तनं दाखवली आहेत. रिसर्चरला मायथोस कडून एक ईमेल आला. जरी त्या मॉडेलला इंटरनेट अॅक्सेस नव्हता. मायथोस ने स्वतःच मल्टी‑स्टेप एक्स्प्लॉइट तयार करून इंटरनेट मिळवले, रिसर्चरला ईमेल करून कळवले आणि नंतर सार्वजनिक वेबसाइट्सवर त्याबद्दल शेखी मिरवली.
मायथोस ने स्वतःच मल्टी‑स्टेप…
मायथोस ने स्वतःच मल्टी‑स्टेप एक्स्प्लॉइट तयार करून इंटरनेट मिळवले, रिसर्चरला ईमेल करून कळवले आणि नंतर सार्वजनिक वेबसाइट्सवर त्याबद्दल शेखी मिरवली. >>>>मी इथे AIच्या धोक्याबद्दल लिहित आहे पण समजून कोण घेणार? बालिश बालिश म्हणून किंवा तुमचा डोमेन काय असे फालतू प्रश्न विचारताहेत.
मिथॉस
मिथॉस.. बातमी जुनीच आहे. म्हणजे ६ दिवसांपूर्वीची... आता सी एन एन वर पाहिली.
पोलंडमध्ये राखणदारी करणारे ह्युमनॉइड रोबोट्स…
३–४ वर्षांपूर्वी चॅट‑जीपीटी लाँच झाल्यावर अस्वल यांनी जो धागा काढला होता, तेव्हा एआय इतक्या वेगाने इथपर्यंत येईल असं वाटलंच नव्हतं. फार तर काही व्हाईट‑कॉलर जॉब्सवर परिणाम होईल असं वाटत होतं. ब्ल्यू‑कॉलर जॉब्स सुरक्षित राहतील असं वाटत होतं.
सध्या एचएसबीसीची इन्व्हेस्टर कॉन्फरन्स हाँगकाँगमध्ये सुरू आहे. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणात एआयवर पैसे लावत आहेत. टेक इंडेक्स (नॅसडॅक) पुन्हा वर चढला आहे.
भारत, बांग्लादेश सारख्या देशांना लो‑कॉस्ट लेबर मुळे लेबर‑इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीमध्ये फायदा मिळत होता. पण आता या देशांसाठीही धोक्याची घंटा वाजू लागली आहे. एका बाजूला युद्धाचे ढग दाटले आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवीन तंत्रज्ञान थेट त्यांच्या स्पर्धात्मक फायद्यावरच (कंपिटिटीव्ह अॅडव्हांटेज) घाला घालत आहे.
रोबोंनी ताब्यात घेतला रशियन तळ
या बातमीनुसार युक्रेनने रशियाच्या ताब्यातील काही भाग ताब्यात घेण्यासाठी केवळ मानवरहित वाहने आणि यंत्रमानव वापरले.
Not Soldiers, Ukraine Sends Robots To Frontline, Takes Over Russian Post
भोंडला!
माझ्या या धाग्यावर सर्वांनी छान आणि शांतपणे भोंडला खेळल्याबद्दल सर्वांचे आभार!
"भारत आणि ए०आय०" या विषयावर थोडी "गाणी" (अधिक प्रकाश पडला असता) ऐकायला मिळाली असती तर आवडले असते! :)
पण असो. ए०आय० मुळे संशोधनाला मिळालेला वेग अचंबित करणारा आहे.
https://youtu.be/4kq3lcfROoo?si=u2PvQv1bcmKwdvfs
https://youtu.be/-Y9ODW6Chho?si=6vNFKZ4qbETy3bge
भारतामधून अशा बातम्या कधी ऐकायला मिळणार?
भोंडल्याची गाणी…
"भारत आणि ए०आय०" या विषयावर थोडी "गाणी" (अधिक प्रकाश पडला असता) ऐकायला मिळाली असती तर आवडले असते! :)
म्हणजे कशी? “श्रीऽऽऽकांता कमऽऽऽळकांता अस्सं कस्सं झाऽऽऽलं? अस्सं कस्सं झालं माझ्या नश्शीऽऽऽबी आऽऽऽलं?”-छापाची?
(नाहीतरी भोंडल्याची गाणी म्हणजे कुठेतरी कुठल्यातरी वेड्याने आपली झोपलेली बायको “मेली, मेली!” म्हणून जाळूनच कशी टाकली१, झालेच तर “अस्सं सासर” द्वाडच बाई कसं असतं, नाहीतर “दोन चाबूक अधिक मारा, माझं उष्टं तुम्हीच काढा!”२, असल्याचं छापाची असतात. Are you sure की तुम्हाला तुमच्या धाग्यावर (या विषयासंबंधी) असलीच “गाणी” पाहिजेत? Naysaying, utterly negativistic? Are you quite sure? (तसेही, सध्या येणाऱ्या “गाण्यां”चा सूर याहून काय वेगळा आहे?) Do you really want more (and more) of the same?)
(एखादी गोष्ट मागून घेण्यापूर्वी, आपण नक्की काय मागत आहोत, त्यातून निष्पन्न नक्की काय होऊ शकेल, याचा विचार अवश्य करावा, म्हणतात. (नाहीतर मग भोगावीत आपल्या कर्माची फळे!))
असो चालायचेच.
१ एआयकडून याहून वेगळे काही अपेक्षित असावे काय?
२ करेक्ट मी इफ आय ॲम राँग, परंतु, हे भोंडल्यातलेच गाणे आहे ना?
खरंच.
आता हा पँडोराचा डबा उघडल्यामुळे मला माझा धागा न भरकटवायचा चांगुलपणा सोडून देण्याशिवाय पर्याय नाही.
लहानपणी भोंडला खेळायला खूप बोअर व्हायचं. पण किमान शुक्रवार पेठेत राहत असताना तरी सतत सगळ्यांच्या घरी भोंडल्याला जावं लागायचं. जवळपास एकही गाणं न म्हणता मी दोन घामट हात धरून गोल गोल फिरायचे. याला फक्त दोनच गाण्यांचे अपवाद होते.
१. अरडी गं बाई परडी
त्यात एक सासुरवाशीण रुसून माहेरी आलेली असते. तर तिला न्यायला सासरचे विविध नातेवाईक येतात काहीतरी दागिना घेऊन येतात. प्रत्येक नावडत्या नातेवाईकाला (म्हणजे नवरा सोडून सगळेच) ती त्यांना सांगते
पाटल्या मी घेत नै सांगा मी येत नै
चारी दरवाजे लाव गं सई लाव गं सई
झिपऱ्या कुत्र्याला सोड गं सई सोड गं सई
यात तिचा येत नाही म्हणण्याच्या तडफदारपणा छानच होता. पण एखाद्यावर कुत्रं सोडायचा बहुमान सईला (मैत्रीण असली तरी मी सोयीस्कर अर्थ काढला होता) आहे यामुळे मी या चार ओळी एकदम भारतमाता की जय म्हणावं त्याहीपेक्षा जोरात म्हणायचे.
दुसरं म्हणजे सासर आणि माहेरच्या वैद्यांची तुलना
एका बाईला इंगळी डसते. म्हणून वैद्य बोलवायचा असतो. यात इंगळी डसलेल्या अवस्थेत ती सासर आणि माहेरच्या वैद्यांची तुलना करते (वास्तविक अशा प्रसंगी कुणीही चालवा).
तर
सासरचा वैद्य
त्याला बसायला, लंगडा घोडा बाई लंगडा घोडा
त्याच्या तोंडांत, पादला किडा बाई पादला किडा!
या पुढच्या काही ओळी किती जातीवाचक आणि अपमानास्पद आहेत ते मला नंतर कळलं. पण मला या दोन ओळी फार आवडायच्या. आपल्याला विंचू चावलेला असताना कुणाच्या तरी तोंडांत किडा पादावा असं वाटणं म्हणजे जन्मोजन्मीचा passive aggressiveness पणा दाटून आलेली एखादी सासरी वैतागलेलीच स्त्री असणार. पण "पादला किडा"वाली ओळही भारतमाता की जय पेक्षा जोरात असायची.
…
आता हा पँडोराचा डबा उघडल्यामुळे मला माझा धागा न भरकटवायचा चांगुलपणा सोडून देण्याशिवाय पर्याय नाही.
भोंडल्याचा (आणि भोंडल्याच्या गाण्यांचा) ज़िक्र मुळात खुद्द धागाप्रवर्तकाने केलेला असल्याकारणाने, त्यावरील चर्चा ही विषयास धरून मानता यावी. (आता स्वतः धागाप्रवर्तकानेच लायसन दिलेले आहे, म्हटल्यावर, तुम्ही हात आखडता कशाला घेता? (मी तर तसाही घेत नाहीच. असो.))
होऊन जाऊ द्यात!
प्रत्येक नावडत्या नातेवाईकाला (म्हणजे नवरा सोडून सगळेच)
नवरा तरी आवडता असायचाच का? निदान त्या (म्हणजे, जेव्हा ही भोंडल्याची गाणी रचली गेली, त्या) काळात?
(हं, तसे म्हणण्याचे कन्व्हेंशन होते, ही बाब अलाहिदा. किंबहुना, ही सगळी भोंडल्याची गाणी बोले तो या सगळ्या कन्व्हेंशनांविरुद्ध छुपी (केवळ स्वतःच्या मनाच्या समाधानापुरती) सामूहिक बंडाळी पुकारण्याचाच तर प्रकार नव्हता काय? Kind of like a toothless Women’s Lib? परंतु, ते असो.)
पण एखाद्यावर कुत्रं सोडायचा बहुमान सईला (मैत्रीण असली तरी मी सोयीस्कर अर्थ काढला होता) आहे यामुळे मी या चार ओळी एकदम भारतमाता की जय म्हणावं त्याहीपेक्षा जोरात म्हणायचे.
ते तर झालेच. परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, कुत्रे (कितीही झिपरे झाले, तरीही) असे वाटेल त्याच्या सांगण्याने कोणाच्याही अंगावर जात नाही. त्यामुळे, सईला जर का ते कुत्रे इच्छित लक्ष्यावर प्रभावीपणे सोडायचे असेल (आणि, त्या प्रयत्नांत, ते स्वतःच्याच अंगावर जर ओढवून घ्यायचे नसेल), तर सईची त्या कुत्र्याजवळ प्रचंड वट असणे अत्यावश्यक आहे.
तशी ती (म्हणजे, वट) आहे, हे या पंक्तीतून सूचित होते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.
यात इंगळी डसलेल्या अवस्थेत ती सासर आणि माहेरच्या वैद्यांची तुलना करते (वास्तविक अशा प्रसंगी कुणीही चालवा).
छे छे! असे कसे?
माहेरचा वैद्य म्हणजे विश्वासातला. उलट, सासरचा वैद्य म्हणजे, कोणाला बोलावून आणले असेल, कोणास ठाऊक! डांबीसगिरीने औषध म्हणून विष घातले म्हणजे? (विशेषतः, ज्या काळात एवढ्यातेवढ्या कारणावरून (किंवा, कारणाशिवाय) सुनेची विल्हेवाट लावण्यास सासूसासरे (‘आणि नवरा’ म्हणणार होतो. परंतु, नवरा हा त्या काळात सहसा बच्चा असे; त्याला स्वतःची अशी अक्कल नसे. त्यामुळे, त्याची या बाबतीत जी काही उत्सुकता असेल, तिचे खापर आईवडिलांच्या चिथावणीवर फोडता यावे.) सहसा टपलेलेच असत, त्या काळात?)
(नाही म्हणजे, ते ‘दवा से फ़ायदा होगा, के होगा ज़हर-ए-क़ातिल से, मरज़ की क्या दवा है यह कोई बीमार क्या जाने’ वगैरे सगळे उर्दू काव्यपंक्तींत वगैरे ठीक आहे, परंतु, आमच्या मराठी पोरी या (त्या काळातसुद्धा) त्या मानाने बऱ्याच savvy असाव्यात. (कदाचित, अनुभवातून आलेले शहाणपण? किंवा, पुढचीवर विषप्रयोग, मागची शहाणी?) असो.)
आपल्याला विंचू चावलेला असताना कुणाच्या तरी तोंडांत किडा पादावा असं वाटणं म्हणजे जन्मोजन्मीचा passive aggressiveness पणा दाटून आलेली एखादी सासरी वैतागलेलीच स्त्री असणार.
हेही आहेच. परंतु, याला आणखीही (छुपे) पदर आहेत.
म्हणजे, वैद्यबुवांच्या तोंडात किडा पादायला मुळात वैद्यबुवांच्या तोंडात किडा कशाला असेल? थोडक्यात, ‘वैद्यबुवांच्या तोंडात (अगोदर) किडे पडोत (आणि, त्यावर icing on the cake म्हणून, (त्यानंतर) त्यांपैकी एक जण तेथे पादो)’ अशा स्वरूपाचा हा (काहीसा गुंतागुंतीचा, two-step) आशीर्वाद आहे.
त्याउपर, त्या किड्याचा आकार तो केवढासा? त्याचा औटपुट तो कितीसा असणार आहे? त्यातून वैद्यबुवांना (झालाच तर) तात्कालिक minor annoyance होऊ शकेलही कदाचित, परंतु, त्याहून गंभीर अशी काही इजा वा दुखापत होणे शक्य नाही, हे लक्षात घेता, हे एका प्रकारचे microaggression समजता यावे काय?
(याव्यतिरिक्त, पादणारा किडा हा येथे स्वतःचा (पक्षी: इंगळी डसलेल्या स्त्रीचा) प्रॉक्सी समजल्यास, या भानगडीचा आणखी एक पदर (द्रौपदीवस्त्रहरणातल्याप्रमाणे) लीलया उलगडावा. परंतु, तूर्तास इथेच थांबतो.)
या पुढच्या काही ओळी किती जातीवाचक आणि अपमानास्पद आहेत ते मला नंतर कळलं.
कोणत्या? (नाही म्हणजे, just out of curiosity and merely for the sake of documentation…)
असो.
हातगा
>>>कोणत्या? (नाही म्हणजे, just out of curiosity and merely for the sake of documentation…)
असो.
हे व्हर्जन मी बहुतेक कोल्हापुरात ऐकलं आहे. तिथे भोंडल्याला हातगा म्हणतात. पुण्यात आठवत नाही. पण..
पादला किडा नंतर..
"कसा दिसतो..*रा वानी बाई *रा वानी! असं होतं
आणि माहेरचा वैद्य राजावानी.
पण एकूणच कोल्हापूरच्या आजुबाजूच्या खेड्यांत मी लहान असताना लोक एकमेकांना जातीनेच ओळखायचे. ते "आमच्याकचं" आहे ते "तमक्याचं" आहे. माझ्या मामेभावांच्या तोंडी मी एकाही पुरुषासाठी "तो" हे पुल्लिंगी सर्वनाम ऐकलं नाही. सगळे पुरुष नपुसकलिंगी असायचे. "त्ये बेनं "जैनाचं" हाय. त्याला मटन चालत नाय."
आणि सगळ्या बायका मात्र मी "आलो" मी "गेलो" अशा आपणच पुल्लिंगी होत्या. Which makes sense. कारण बाहेर पुरुष कितीही मिश्या पिळून आले तरी घरी बायकोच्या शिव्याच खायचे. पुरुषप्रधान संस्कृती कोल्हापुरात सर्वनामाने चालते.
…
हे व्हर्जन मी बहुतेक कोल्हापुरात ऐकलं आहे. तिथे भोंडल्याला हातगा म्हणतात.
‘हादगा’ असा पाठभेद ऐकून होतो. ‘हातगा’ नव्यानेच ऐकतोय.
पादला किडा नंतर..
"कसा दिसतो..*रा वानी बाई *रा वानी! असं होतं
आणि माहेरचा वैद्य राजावानी.पण एकूणच कोल्हापूरच्या आजुबाजूच्या खेड्यांत मी लहान असताना लोक एकमेकांना जातीनेच ओळखायचे. ते "आमच्याकचं" आहे ते "तमक्याचं" आहे.
हम्म्म्म्…
परंतु, एके काळी हे बहुधा सामान्य असावे. (Not to justify it, of course, परंतु तरीही.) (आणि, हे केवळ (कोल्हापुरातल्या) ब्राह्मणी समाजापुरते मर्यादित होते, किंवा कसे?)
आणि सगळ्या बायका मात्र मी "आलो" मी "गेलो" अशा आपणच पुल्लिंगी होत्या.
Curiously enough, अशी भाषा मी माझ्या म्याटर्नल आजीच्या तोंडून सर्रास ऐकलेली आहे. मात्र, ती (आजच्या) सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेली, आणि तिचे अर्ध्याहून अधिक आयुष्य मुंबईत, गिरगावातल्या चाळीत गेलेले. कोल्हापुराशी तिचा थेट संबंध बहुधा कधी आला नसावा.
याउलट माझी प्याटर्नल आजी. (बहुधा, माझ्या समजुतीप्रमाणे१) (चूभूद्याघ्या.) कोल्हापुरात वाढली असावी. शिवाय, तिचे अर्धेअधिक आयुष्य कोल्हापुरात गेलेले. परंतु, तिच्या तोंडून कधी अशी भाषा ऐकल्याचे माझ्या स्मरणात नाही.
हे गौडबंगाल काही केल्या समजत नाही.
Which makes sense. कारण बाहेर पुरुष कितीही मिश्या पिळून आले तरी घरी बायकोच्या शिव्याच खायचे.
I seriously doubt if that would have been the rationale, though. असो.
१ तिच्या माहेराकडचे तिचे (माझ्या ऐकीव माहितीतले) बहुतांश नातेवाईक कोल्हापुरात स्थायिक होते, यावरून (तिचे माहेर कोल्हापुरातलेच असावे, आणि) ती कोल्हापुरात वाढली असावी, असा तर्क मी लढवतो. कदाचित चुकीचाही असू शकेल, परंतु, I doubt it.
ब्राह्मण
कोल्हापुरातले ब्राह्मण पुण्यातल्या ब्राह्मणांसारखेच बोलतात. थोडासा accent असतो इतकंच. हे मी ब्राह्मणेतर आम जनतेचे सांगत आहे. माझे आजोबा लिंगायत. त्यांची बरीच शेती होती. आजी ब्राम्हण. ती कोल्हापुरातच वाढलेली पण भाषा पूर्ण वेगळी. पण आजोबांना ब्राम्हण असण्याचे काहीतरी आकर्षण असावे. त्यामुळे पुण्याच्या ब्राह्मणांसारखे शुद्ध बोलायचे. पण राग आला की त्यांच्या तोंडी मूळ गावाकडची भाषा आणि कोल्हापुरात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या शिव्या साधारण पहिल्या दोन किंवा तीन वाक्यांतच ऐकायला मिळायच्या. ते शेतावर गेले की तिथल्या लोकांसारखे बोलायचे. आणि घरी ब्राम्हणी.
माझी सावत्र आजी (जी आमच्या शेतावरच्या घरी राहायची) मात्र पूर्ण कोल्हापुरी बोलायची. तिची आवडती शिवी म्हणजे "तुझी हाडं भरली पोत्यात". मला राग आला की मी कधीकधी मनातल्या मनात का असेना पण राग आलेल्या व्यक्तीला ही शिवी आवर्जून देते. बाकी आजोबांच्या शिव्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत.
मी आलो हा "आम्ही आलो" या आदरार्थी एकवचनाचा अपभ्रंश आहे असं मला अनेकांनी सांगितलं आहे. राजघराण्यात सगळे आम्ही म्हणतात तिथून हा वाक्यप्रयोग आला आहे. पण तो केवळ हिंदू घरांत प्रचलित नव्हता. आमच्या ओळखीतल्या मुसलमान बायकाही असं बोलायच्या. पण त्या घरी दखनी बोलायच्या त्यामुळे हिंदू बायांची भाषा म्हणूनही बोलत असतील.
भारत उपभोगता म्हणून
भारत उपभोगता म्हणून पण ai मध्ये मागे पडेल?
असा ठाम विश्वास.
1) भारतात वॉशिंग मशीन पासुन विमान बनतात ती बिना ai ची बनतात का?माझा ac लावलेल्या वेळात बंद होतो, स्लीप मोड वर टाकला की 1 तास नी 1 डिग्री तापमान वाढवतो.
हे ai च आहे.
फक्त it आणि अँप्स ai नाही it आणि अँप्स hi ai ची lower segment आहेत.
मला ज्वारी काढायची आहे उपटून. जगात असे मशीन नाही म्हणून भारतात नाही.
. ai वाल्या नी 1000 रुपयात मला ज्वारी उपटून काढायचा ai रोबोट द्यावा.
अमेरिकेते पण नाही असा रोबोट.
कुळथाचे पिठले ..... >>"मला…
कुळथाचे पिठले .....
>>"मला चॅटजीपीटीने चिंच घालून कुळथाचे पिठले अत्यंत चविष्ट बनते असे सांगितले.">>
- बरं.
एआइ अंतिम उत्तर देतो यावर विश्वास ठेवल्यास बरोबर.
बाकी आडात नाही तर पोहऱ्यात कुठून? ही म्हण आठवली.