Skip to main content

लवचिकता आणि स्वास्थ्य - २

लवचिकता आणि स्वास्थ्य - २ 
================ 

-राजीव उपाध्ये 

टीप - १ला भाग १७ मार्च रोजी प्रसिद्ध केला आहे. 

स्वास्थ्य म्हणजे काय? 

आधुनिक वैद्यकशास्त्रात स्वास्थ्याची कल्पना स्पष्ट करण्यासाठी दोन महत्त्वाच्या संकल्पनांची मदत घेतली जाते. या दोन्ही कल्पनांमध्ये "संतुलन" ही कल्पना केंद्रस्थानी आहे. या संकल्पनाना - होमिओस्टॅसिस आणि ॲलोस्टॅसिस अशा दोन संज्ञा इंग्रजीत वापरल्या जातात. मला या दोन्ही कल्पनांना मराठीत योग्य प्रतिशब्द न सापडल्याने मूळ इंग्रजी शब्द मी तसेच पुढे वापरले आहेत. 

माझ्या एका डॉक्टर मित्राने मला होमिओस्टॅसिस ही संकल्पना ~३० वर्षापुर्वी समजाऊन सांगितली. आपल्या शरीरात जे स्थिर राहणे अपेक्षित आहे, ते स्थिर राहणे आणि जे फिरत राहणे अपेक्षित आहे ते फिरत राहणे म्हणजे स्वास्थ्य! याला होमिओस्टॅसिस असे म्हटले जाते. उदा० रक्त, प्राणवायु, अन्न हे स्थिर राहणे अपेक्षित नाही, ते प्रमाणात फिरतच राहीले पाहिजेत. ते स्थिर झाले तर स्वास्थ्य बिघडून आरोग्य-समस्या निर्माण होतात. शरीरातील हाडे, सांधे अस्थिर झाले तर गंभीर समस्या निर्माण होतात. तसेच शरीरात काही कारणानी संसर्ग झाला तर तो त्याच भागात नियंत्रणाखाली न राहता पसरला तर समस्या वाढून आरोग्य बिघडते. 

पण शरीरांतर्गत प्रणाली स्थिर नसून त्या सतत बदलणाऱ्या आणि अनिश्चित वातावरणात कार्य करत असतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार "स्थैर्य प्राप्त करणे" महत्त्वाचे ठरते. यामध्ये मेंदू महत्त्वाची भूमिका बजावतो, तो भविष्यातील गरजांचा अंदाज घेतो आणि त्यानुसार शरीरातील जैविक प्रक्रियांमध्ये बदल घडवून आणतो. उदाहरणार्थ, व्यायाम सुरू होण्यापूर्वीच हृदयगती वाढणे किंवा तणावाच्या परिस्थितीत हार्मोन्सचे प्रमाण बदलणे. त्यामुळे आरोग्य म्हणजे लवचिकता आणि जुळवून घेण्याची क्षमता. वेगळ्या शब्दात स्थिर राहणे नव्हे, तर परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता. यासाठी ॲलोस्टॅसिस ही संज्ञा वापरली जाते. 

आवश्यकतेनुसार शरीरांतर्गत व्यवहारात प्रमाणात बदल घडवून आणण्यात शरीराची स्वायत्त-नाडी संस्था महत्वाची भूमिका बजावते. ही प्रमाणात बदल घडवून आणण्याची क्षमता जेव्हा भंगते तेव्हा अनारोग्याची सुरुवात होते. ९९% माणसे समस्या हाताबाहेर गेल्यावर जागी होतात किंवा चुकीचे मार्ग तरी अवलंबतात. आधुनिक जीवनात अनारोग्याला आमंत्रण देणारा एकमात्र प्रभावी घटक म्हणजे दीर्घकाल दूर्लक्षित ताण! 

एक ताजा अनुभव 

नुकत्याच एका जुन्या परिचिताने माझ्याशी संपर्क साधला. अत्यंत बुद्धीमान पण त्याबरोबर येणार्‍या अतिशहाणपणाचे दुष्परिणाम ऐकून माझ्या अंगावर काटा आला. गुंतागुंतीच्या घटस्फोटाने वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. "आला क्षण पूर्णपणे उपभोगा, भविष्याची चिंता करू नका" अशा तत्त्वज्ञानाच्या अतिरेकी प्रभावाने तब्येतीची, तसेच करियरची पूर्ण वाट लागली आहे. मला कुणाच्या खाजगी आयुष्यात अनावश्यक चौकशा करायला आवडत नाहीत, पण कुणी स्वत:हून सांगत सेल तर मात्र मी ऐकायचे काम इमाने-इतबारे करतो. कधीकधी कुणी तरी आपले ऐकून घेते आहे ही भावना पण समस्या सोडविण्यासाठी मदत करते. पण या व्यक्तीने हेकट स्वभावामुळे आपल्या भोवती जे ट्रॅप तयार केले आहेत, ते ऐकून माझ्या आशा मावळल्या. 

या परिचिताच्या गोलगोल कहाण्या ऐकून मी त्याच्या तब्येतीबद्दल काही अंदाज बांधले - उदा० त्यांच्या शरीरात दीर्घकालीन ताणाने स्वास्थ्यरक्षक यंत्रणेचे काम "पूर्णपणे खपलेले" आहे याची मला खात्री पटली. मी ध्यान आणि प्राणायाम करतो, असे मला त्याने सांगितले पण ते किती परिणाम रितीने होते याबद्दल मला शंका होती. 

आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे शरीराची स्वास्थ्यरक्षक यंत्रणा किती कार्यक्षम आहे, हे तपासणे सहज शक्य आहे. त्यासाठी अनेक विश्वासार्ह आणि फोनवर वापरता येणारी ॲप, तसेच परिधानक्षम-साधने उपलब्ध आहेत. त्यांच्या काही मर्यादांमुळे मुख्य प्रवाहातील वैद्यक व्यावसायिक त्याकडे कानाडोळा करतात ही दूर्दैवाची गोष्ट आहे. 

मी या व्यक्तीला आग्रह करून एक ॲप उतरवून घ्यायला लावले. त्याचे शुल्क अतिशय माफक आणि अचूकता समाधानकारक आहे. हे ॲप वापरून परानुकंपी नाडीसंस्थेची कार्यक्षमता "हृगल" (हृदय गतीची लवचिकता) चे मापन करून जाणुन घेता येते. सुदैवाने या व्यक्तीने माझे म्हणणे ऐकले आणि ॲप फोनवर उतरवून मला १ले निरीक्षण कळ्वले. ते बघताच मी हादरलो कारण माझा अंदाज बरोबर ठरला होता. ताणामुळे हृगलवर परिणाम होतो आणि हृगल अतिशय कमी होते. दीर्घकाळा करता हृगल कमी राहात असेल तर प्राणायाम आणि ध्यान तुम्हाला उपयोगी पडत नाहीये आणि ताणाने तुमचे शरीर पोखरले आहे हे निश्चित! अशा व्यक्ती नैराश्य, हृदयरोग, कर्करोग, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक चिकट दुखण्यांना बळी पडतात ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये... 

क्रमश: ...

अबापट Tue, 14/04/2026 - 13:56

या app चे नाव काय ?

'परानुकंपी नाडीसंस्थेची कार्यक्षमता "हृगल" '
याचा अर्थ कळला नाही.

सई केसकर Tue, 14/04/2026 - 14:55

In reply to by अबापट

'>>परानुकंपी नाडीसंस्थेची कार्यक्षमता
The efficiency of the parasympathetic nervous system.
हृगल = हृदय गतीची लवचिकता (जसे मोदीजी NAAM, ROAD, UDAN वगैरे इंग्रजी लघुरूपं असतात तसे हे एक देवनागरी लघुरूप आहे)

आधीचे लेख वाचत चला..

तर्कतीर्थ Tue, 14/04/2026 - 16:35

श्री० बापट,सई केसकर, संगीतप्रेमी हत्ती 

त्या ॲपचे नाव - HRV4Training त्या विषयी अधिक माहिती https://www.hrv4training.com/ इथे मिळेल. वि०सू० सदर ॲप आणि त्याचा निर्माता यांच्याशी माझे कोणतेही हितसंबंध नाहीत. मी अशी अनेक ॲप वापरतो आणि तपासून बघत असतो. त्यात हे मला स्वस्त आणि वापरायला त्यातल्या त्यात सुटसुटीत वाटले. परानुकंपी नाडी, हृगल आणि ताण यांच्या संबंधाचे शास्त्र सांगणे आवश्यक आहे, पण तो भाग रटाळ होऊ शकतो म्हणून तो भाग सध्या पुढे ढकलला आहे. त्यात परत इथे आकृत्या कशा डकवायच्या हे मला समजलेले नाही. असो. 

सई केसकर 

माझ्यावतीने केलेल्या खुलाशाबद्दल धन्यवाद! 

श्री० संगीतप्रेमी हत्ती उत्तेजनपर प्रतिसादाबद्द्ल मन:पूर्वक धन्यवाद!