एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २७

राष्ट्र आणि राज्य

सुधीर भिडे

राष्ट्राची घडणप्रक्रिया कधीच संपत नाही. कारण विघटनकारी प्रक्रिया सतत चालू असतात.

या अठ्ठावीस भागांच्या मालिकेत आपण विचारांची व्याप्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली होती. भाग अठरा, एकोणीस आणि वीसमध्ये आपण १८५७ सालच्या उठावाचा विचार केला. या घटनेतील महत्त्वाचे प्रसंग महाराष्ट्राच्या बाहेरील होते. परंतु उठाव ही घटना इतकी महत्त्वाची होती की त्याचे दूरगामी परिणाम सबंध देशावर आणि पर्यायाने महाराष्ट्रावर झाले. या भागात आपण अजून एक असा विचार करणार आहोत की जो महाराष्ट्रापुरता सीमित नाही. परंतु जो विचार पूर्ण देशाविषयी केला आहे तो महाराष्ट्रालाही लागू होतो.

राष्ट्र आणि राज्य या दोन निराळ्या संकल्पना आहेत. आपण म्हणतो की इंग्रजांचे भारतात राज्य होते. भारत एक राष्ट्र आहे. इंग्रजांचे राज्य असताना भारत इंग्रजी राष्ट्र नव्हते. राष्ट्र आणि राज्य हे दोन शब्द इंग्लिशमधल्या नेशन आणि स्टेट यांचा अनुवाद आहेत. बऱ्याच वेळेला इंग्लिश भाषेत हे शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात. युनायटेड नेशन्स ही संस्था राज्यांची आहे की राष्ट्रांची? भारताच्या बाबतीत विचार करत असताना अजून एक गोंधळ होऊ शकतो. भारतात महाराष्ट्र, गुजरात अशी राज्ये आहेत असे आपण म्हणतो. सध्याच्या आपल्या विवेचनात राज्य हा शब्द त्या अर्थाने वापरलेला नाही. येथे राज्य या शब्दाचा अर्थ इंग्लिशमधील स्टेट असा समजावा. आपण हा विचार करणार आहोत की राष्ट्र आणि राज्य या संकल्पना भारताच्या संदर्भात कशा लागू होतात.

राष्ट्र आणि राज्य

प्रथम या दोन संकल्पना काय आहेत ते समजून घेऊ.

राष्ट्र

मेजर जनरल भिडे यांनी त्यांच्या Internal Security, A Psychological approach, (Page 48, Manas Publications) लिहिले आहे
राष्ट्र म्हणजे एकात्मतेची भावना ज्याचा आधार समान वांशिकता, धर्म, संस्कृती आणि भाषा यावर असतो. राष्ट्र आपले निराळेपण जपू इच्छिते.

गिबर्नो या विचारवंताने राष्ट्राची अशी व्याख्या केली आहे – मानवी समुदाय जो निर्धारित केलेल्या भौगोलिक भागात राहतो, ज्याची संस्कृती समान आहे, ज्या समुदायाच्या इतिहासाच्या जाणिवा एक आहेत आणि एकाच भविष्याची आशा आहे असा समुदाय राष्ट्र बनतो. राष्ट्राच्या कल्पनेत इतिहासाच्या जाणिवा, भूगोल, संस्कृती, भाषा, धर्म, हे सगळेच विचारात येतात. हे मात्र सांगितले पाहिजे की या सर्व गोष्टी पूर्णपणे अनुभवत असलेले राष्ट्र प्रत्यक्षात दिसत नाही. यावरून असे दिसते की गिबर्नो हे मान्य करतात की राष्ट्राच्या सर्व कल्पना अनुभवत असलेले राष्ट्र जवळजवळ अशक्यच आहे.

फ्रेंच विचारवंत रेना यांनी राष्ट्र बनण्यासाठी अजून एक अट विचारात घेतली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सामूहिक विस्मृती राष्ट्र बनण्यास आवश्यक असते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक राष्ट्रांत हिंसाचारानंतरच एकता निर्माण होते. यासाठी असे इतिहास संशोधन, जे काही कटू सत्ये उजेडात आणेल, असे संशोधन न केलेलेच बरे.

राष्ट्र या कल्पनेच्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केल्या त्यात अंतर्भाव झालेले विचार असे –

  • समान वांशिकता, धर्म, संस्कृती, भाषा
  • निर्धारित केलेला भौगोलिक भाग
  • इतिहासाच्या समान जाणिवा
  • समान भविष्याची आशा
  • सामूहिक विस्मृतीची तयारी

गिबर्नो यांच्या मताप्रमाणे वरील सर्व निकष साध्य होणे जवळ जवळ अशक्यच असते.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राष्ट्राचे घडण ही एक प्रक्रिया आहे जी कधीच संपत नाही. याचे कारण असे की विघटनकारी प्रक्रिया सतत चालू असतात. या प्रक्रियांकडे काही दशके जरी दुर्लक्ष झाले तरी राष्ट्र कल्पना धोक्यात येते. ब्रिटन नावाचे राष्ट्र गेली सहा शतके अस्तित्वात आहे. तरी पण तेथे स्कॉटिश लोकांना वेगळे व्हायचे आहे. स्पेनमध्ये अशीच स्थिती आहे. स्पेन हे राष्ट्र चारशे वर्षे अस्तित्वात आहे. पण आज तेथील कॅटलोनिया या प्रांताला स्पेनपासून वेगळे व्हायचे आहे.

ब्रिटन बेटावरचे तीन देश स्पेनमधले कातालोनिया

सिव्हिलायझेशनविषयी असे म्हटले जाते की “सिव्हिलायझेशन घडविण्यास शतके लागतात, तर काही दशकांतच सिव्हिलायझेशनचा नाश होऊ शकतो.“ येथे सिव्हिलायझेशनचा अर्थ फक्त संस्कृती असा होत नाही. सिव्हिलायझेशनच्या कल्पनेत संस्कृतीबरोबर राजकीय आणि शासकीय व्यवस्था, समाजरचना, उद्योग यांचाही समावेश होतो. रोमन सिव्हिलायझेशन आणि रोमन संस्कृती यांत फरक आहे.
वरील वाक्यात सिव्हिलायझेशनऐवजी आपण राष्ट्र हा शब्द घालून असे म्हणू शकतो – राष्ट्र घडविण्यास शतके लागतात, पण काही दशकातच राष्ट्र कल्पना तुटू शकते.

राज्य

राज्याचे सार्वभौम सरकार असते. राज्याच्या निश्चित केलेल्या भौगोलिक सीमा असतात. त्या सीमांचे रक्षण करणे ही त्या सरकारची जबाबदारी असते. त्यासाठी राज्याचे सैन्य असते. राज्याची स्वतःची न्यायसंस्था असते. राज्य स्वतःचे कायदे बनविते. अशा कायद्यांच्या पालनासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी राज्य पोलीस नेमते. आर्थिक व्यवहारासाठी राज्य चलन निर्माण करते.

एक राज्य बनणे हा एक प्रसंग असतो. राज्य बनले की आपोआप त्याचे राष्ट्र बनते असे होत नाही. त्या राज्यामध्ये असा एक घटक असू शकतो की ज्याला त्या राष्ट्राचा भाग आहे असे वाटत नाही.

तीन उदाहरणे

पन्नास वर्षांपूर्वी बांगलादेश अस्तित्वात आला. त्या आधी तो भूभाग पाकिस्तानाचे एक राज्य होते. पण पाकिस्तान या राष्ट्र संकल्पनेचे ते राज्य भाग नव्हते. पाकिस्तान स्टेटमध्ये ईस्ट पाकिस्तान, पंजाब, बलुचिस्तान अशा नावाची राज्ये होती. पण त्या राष्ट्र कल्पनेचा बांगलादेश भाग नव्हते.


पाकिस्तानाचे दोन भाग दाखवणारी टपाल तिकिटे – १९५५

ज्यू लोकांचे स्वतःचे राज्य शतकांपासून अस्तित्वात नव्हते; पण राष्ट्र जिवंत होते जे १९४९ साली राज्य बनले.

यूक्रेन या देशावर मार्च २०२२मध्ये रशियाने आक्रमण केले. युक्रेनचा इतिहास पाहिला तर गेल्या २००० वर्षांत युक्रेनचा प्रदेश एका राजकीय सत्तेखाली – कीवन रूस – दहाव्या शतकात होता. (या रूसचा रशियाशी काही संबंध नाही.) गेली चारशे वर्षे रशिया या भागावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. तरीही युक्रेनचे राष्ट्र आज रशियाशी झुंजत आहे. आज युक्रेनच्या स्टेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देशाचा काही भाग रशियाच्या अधिपत्याखाली गेला आहे. त्या वेळी युक्रेनचे लोक म्हणत आहेत – युक्रेन राष्ट्र रशियाशी युद्ध चालू ठेवेल.

ही उदाहरणे दाखवितात की एक राज्य असून एक राष्ट्र नसू शकते आणि एक राज्य फार काल अस्तित्वात नसताना राष्ट्र म्हणून जिवंत राहू शकते.

पंडित नेहरू आणि राहुल गांधी

राष्ट्र या संकल्पानेबाबतीत नेहरू-गांधी परिवारातील दोन व्यक्तींची वक्तव्ये विचार करावयास भाग पाडतात.

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशाला संबोधित केलेल्या पहिल्या भाषणाची सुरुवात उद्धृत करतो –

Long years ago we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance…

पंडितजी भारताला राष्ट्र (नेशन) असे समजतात. हा उल्लेख ते समजून-उमजून करतात की त्यांनी राष्ट्र आणि राज्य यातील फरक विचारात घेतला नव्हता?

स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षांनी लोकसभेमध्ये पंडित नेहरूंचे पणतू – राहुल गांधी – यांनी असे वक्तव्य केले की भारत हे एक राष्ट्र नाही. प्रश्न असा निर्माण होतो की पंडितजींनी राष्ट्र असल्याचा उल्लेख न समजून केला आणि त्यांचे पणतू – राहुल गांधी यांनीही भारत एक राष्ट्र नसल्याचा उल्लेख पण न समजल्याने केला?
भारताच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी इतिहासाचे प्राध्यापक मुकुल केसवन लिहितात –

We were going to adopt (at the time of independence) this modern concept of a nation, invented in the West. But India was too diverse for the European concept of nation.

(TOI, 14 Aug, 2021)

हे वाक्य असे सुचविते की सत्तेचाळीस सालीही भारत एक राष्ट्र नव्हते.

भारत – १८१८, १९२०, २०२०

राज्य आणि राष्ट्र या काय संकल्पना आहेत हे समजून घेतल्यावर आपण आता हे निकष भारताच्या १८१८ आणि १९२० या काळातील स्थितीला लावू. आता या पार्श्वभूमीवर आपल्याला भारत राज्य आणि भारत राष्ट्र यांविषयी काही प्रश्न विचारावे लागतील –

  • १८१८ साली भारतीय समाज एक राष्ट्र होता का? १८१८ साली भारतीय समाज एक राज्य होता का?
  • १९२० साली काय स्थिती होती?
  • आजची स्थिती काय आहे?

भारतीय समाज १८१८ साली एक राष्ट्र होता का?

जॉन स्ट्रची नावाचे एक गृहस्थ १८४२ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या कॉलेजची परीक्षा पास करून भारतात आय. सी. एस. अधिकारी म्हणून आले. भारतात चाळीस वर्षे काम केल्यावर भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी त्यांनी १८८८ साली एक पुस्तक लिहिले. त्यात ते लिहितात –

भारताबाबत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा कधी एक देश नव्हता. या भूभागात कधी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक एकता नव्हती. पंजाब, बंगाल आणि मद्रासमधील लोकांस असे वाटणे शक्य नाही की ते एकाच महान देशाचे भाग आहेत.

थोडक्यात इंग्रजांना भारत हे कधी एक राष्ट्र होते असे वाटत नव्हते.

विचारवंतांनी राष्ट्र कल्पनेला लावलेले निकष आपण सन १८१८मधील भारतीय समाजास लावू. पहिला निकष म्हणजे समान वंश. भारतीय उपखंडात हजारो वर्षांपासून आक्रमक टोळ्या येत राहिल्या. त्यांच्या सरमिसळीने आपला समाज बनला. पण यात विशेष असे काहीच नाही. जगातील सर्वच देशांतील समाज असे बनले आहेत. भारतात उत्तर-दक्षिण आणि पश्चिम-पूर्व असे अनुवांशिकतेमधले बदल दिसतात. पण सामान्यपणे आपण असे म्हणू शकतो की भारताचा समाजात अनुवांशिकतेच्या दृष्टीने पुष्कळ समानता आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन अशा विविध धर्मांचे लोक १८१८ साली राहात होते, आजही राहतात. आपल्या संस्कृतीतही विविधता होती आणि आहे. पण १८१८ साली महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला रामेश्वरला किंवा काशीला जावे असे वाटणे साहजिक होते. त्यापूर्वी पाहिले तर शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना चार मठ स्थापन केले. जर या भूभागाच्या एकात्मतेची काहीच कल्पना नव्हती तर असे मठ का स्थापन करावेत? आपल्या अनेक भाषा आहेत. पण या भाषांचा उगम एकच आहे. (तमिळ लोक हे मान्य करणार नाहीत.) आपल्या इतिहासाच्या जाणिवांत पुष्कळ समानता आहे. एका विशिष्ट भौगोलिक भागाचा आपण विचार करू शकतो. १८१८ साली आपण समान भविष्याची इच्छा धरत होतो असे म्हणता येत नाही. एकंदरीत पाहता असे म्हणता येईल की १८१८ साली भारताची राष्ट्र कल्पना स्पष्ट नव्हती – धूसर होती.

१८१८ साली भारत एक स्टेट - राज्य होते का? याचे उत्तरही अस्पष्ट आहे. १८१८ साली इंग्रज आणि ५६५ संस्थानिक या देशावर संयुक्तपणे राज्य करीत होते.

आता आपण पाहू की १९२० साली काय परिस्थिती होती?

इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्यामुळे भारतीय समाजात एकात्मता थोडी वाढली होती. संस्थानिकांच्या काळातील व्यवस्था समाज हळूहळू विसरत चाला होता. एक 'इंडियन' ओळख निर्माण होऊ लागली होती. देशभर इंग्रजी आणि हिंदी भाषांचा प्रसार वाढला होता. असे म्हणता येईल की १८१८च्या तुलनेत भारतीय समाज १९२० साली राष्ट्र कल्पनेच्या थोडा जवळ गेला होता.

रेनो यांच्या सामूहिक विस्मृती या कल्पनेचा विचार करू. उदाहरण म्हणून इंग्लंड या राष्ट्राचा विचार करू. रोमन लोक सन ४००मध्ये इंग्लंडमधून निघून गेले. त्यावेळी इंग्लंडमध्ये तीन वंशाचे लोक राहत – उत्तरेला पिक्ट्स, दक्षिणेला केल्ट्स आणि रोमन आणि केल्ट्स यांच्या संकरातून झालेले रोमन ब्रिटिश. त्यानंतर जर्मनीतून एंगल आणि सॅक्सन आले. ते पूर्व आणि दक्षिण किनाऱ्यावर वसले. त्यावेळचे इंग्लंड मधील लोक पश्चिमेकडे वेल्समध्ये गेले. काही लोक उत्तरेकडे पिक्ट्सच्या भागात गेले. बाहेरून आलेले एंगल आणि सेक्सन एकमेकांत मिळून गेले आणि पुढे तेच इंग्लिश या नावाने ओळखले जाऊ लागले. आजचा इंग्लिश समाज अशा मिश्रणाने बनला आहे. आज इंग्लिश समाज पश्चिमेचे केल्ट्स, उत्तरेचे पिक्ट्स आणि पूर्वेचे अँग्लो- सॅक्सन कोण याचे चर्वितचर्वण करण्यात अर्थ नाही, सामाजिक विस्मृती ठेवलेली चांगली, असे वागतात.

भारताची तीच स्थिती आहे. आर्य कोण, अनार्य कोण, द्रविड कोण, आर्यांच्या आधीचे इथले लोक कोण याचा विचार करत समाजात फूट पाडणे हे राष्ट्रकल्पनेच्या विरुद्ध जाईल. इंग्लंडच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे तिथे वंशांचे मिश्रण १५०० वर्षांपूर्वी झाले. भारतात तसेच मिश्रण तीन हजार वर्षांपासून चालू आहे.

या लेखमालेतील माझे बरेचसे लिखाण 'सामाजिक विस्मृती चांगली' या प्रमेयाच्या विरुद्ध जाते. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात पुरोहितांची जी वागणूक राहिली त्यामुळे समाजाचे नुकसान झाले असे मत मी व्यक्त केले आहे. आपण असे म्हणू शकतो की ही जुनी दुखणी आता कशाला उकरून काढता! सर्वांनी तो काल विसरून जाणे चांगले. प्रश्न हा आहे की पुरोहितांच्या वागण्यामुळे ज्यांना हा त्रास झाला ते समाजातील घटक हा कालखंड विसरण्यास तयार आहेत का? याबाबत असे म्हणता येईल की विस्मृतीसाठीही काही काळ जावा लागतो. एखाद्या देशाचा विचार करता हा काल दोन-तीन दशके सहज असू शकतो.

१८१८पासून १९२० या कालखंडात राज्य कल्पनेत थोडा बदल झाला. असे बरेच कायदे झाले जे संस्थानांसह देशभर लागू झाले. असे समजता येईल की १८१८च्या तुलनेत १९२०मध्ये आपण एक राज्य आणि एक राष्ट्र या दोन्ही कल्पनांच्या जवळ गेलो आहोत.

आज काय स्थिती आहे? खऱ्या अर्थाने भारत १९५० साली एक राज्य बनले जेव्हा एक संविधान देशभर लागू झाले. राष्ट्र या कल्पनेविषयी काय म्हणता येईल? १९२०च्या तुलनेत २०२० साली राष्ट्र कल्पना जास्त स्पष्ट झाली होती.

बऱ्याच विचारवंतांचे असे मत आहे की राष्ट्राची पाश्चिमात्य देशात निर्माण झालेली कल्पना भारताला लावणे योग्य नाही. या बाबत योगेन्द्र यादव लिहितात,

गांधी आणि नेहरू यांनी ही कल्पना अमान्य केली की भारताच्या एकात्मतेसाठी वैविध्य घालविणे जरूर आहे. त्यांनी युनिटी इन डायव्हर्सिटी ही कल्पना मांडली. अशा प्रकारे भारताने जगापुढे एक स्टेट-नेशनचे नवीन मॉडेल ठेवले आहे. एक राजकीय प्रणाली निरनिराळ्या सांस्कृतिक अस्मितांबरोबर राहू शकते.

(Blog in News 18, 2013)

निष्कर्ष

राष्ट्र आणि राज्य या निराळ्या संकल्पना आहेत. भारताच्या बाबतीत विचार केला तर असे दिसते की १८१८ साली या दोन्ही कल्पना अस्पष्ट होत्या. १९२०पर्यंत देशाने एक राज्य आणि एक राष्ट्र या दिशेने प्रगती केली होती. भारत १९५० साली एक राज्य बनला आणि एक 'इंडियन आयडेंटिटी’ तयार झाली होती. काही विचारवंतांच्या मते नेशनची पाश्चिमात्य कल्पना भारताला तशीच्या तशी लागू करणे योग्य नाही.

पुढच्या भागात – भाग २८मध्ये – एकोणिसाव्या शतकातील राजकीय स्थितीचा विचार करू.

मागचे भाग –

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव
भाग २० – १८५७चा उठाव – झाशीतील घटना
भाग २१ – शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात
भाग २२ – सांस्कृतिक क्षेत्रातील बदल
भाग २३ – आर्थिक संस्था आणि उद्योग
भाग २४ – शेती आणि दळणवळण
भाग २५ – सैन्य, आरमार आणि शस्त्रास्त्रे

भाग २६ – शासकीय संस्था

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

हा लेखदेखिल आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

नेहमीप्रमाणे हाही लेख आवडला.

मागच्या लेखात शासकीय संस्था कशा निर्माण होत गेल्या त्याचा आढावाही आवडला. या संदर्भात जॉन मेनार्ड केन्सवर अलिकडे वाचताना एक कळले की, १९०३ साली जेव्हा केन्सची भारताच्या ट्रेझरी ऑफिसमध्ये निवड झाली तेव्हा ते एक मानाचे पद मानले जात असे. केन्स तिथे फारसा रमला नाही दोन वर्षांनी त्याने राजीनामा दिला. पण त्याचे भारताच्या अर्थव्यस्थेशी निगडीत लेखन/प्रबंध येत राहिले. अर्थात केन्स विद्वान होता. तो नुसताच अर्थतज्ञ, नव्हता पण एक प्रॅक्टिशनर इव्हेस्टरही होता (वॉरन बफेच्या आधिच्या पिढीतला). शिवाय त्याला कलेची पण चांगली जाण होती. त्याने काही कवडीमोल भावाने विकत घेतलेल्या पेंटीग्ज/आर्टवर्क ची किंमत आज मिलिअन्स डॉलर्स मध्ये आहे. असे असले तरीही, काही अर्थतज्ञांच्या मते केन्सने दुसर्‍या युद्धाचा खर्च निभावण्यासाठी बंगाल प्रांतात ज्या इन्फ्लेशनरी पॉलिसिज राबवायचा सल्ला दिला त्यामुळे १९४३ च्या बंगालच्या दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0