गेल्या काही महिन्यांत बघितलेल्या मालिका

दीड महिना उलटून गेला, मी एका मोठ्या कन्सलटन्सीमध्ये नोकरीला लागून. नोकरी असणं आणि काम करणं या दोन्हींत फरक आहे, हे मला बरेच दिवस लक्षात आलं नव्हतं. पण जुन्या नोकरीतल्या मैत्रांबरोबर नेहमीप्रमाणे शुक्रवारी जेवायला गेले होते, तिथे एकानं विचारलं, "तू हल्ली कशावर काम करत्येस!"

तो माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान आहे. त्याला मी म्हणाले, "बाळा, पगार मिळवण्यासाठी काम करणं आवश्यक नसतं! ही कंपनी जाम श्रीमंत असणार..."

माझ्या वाक्याचा टोन 'ब्रिजरटन'मधल्या राणीसारखा होता. "Child, hush!" छापाचा. 'ब्रिजरटन' बघताना बरोबर कुणी माझ्या वयाची किंवा मोठी, कर्तबगार (= आगाऊ) मैत्रीण असतं तर किती बरं झालं असतं, हा विचार राहूनराहून मनात येतो. हल्लीच्या नोकरीमध्येही असा विचार बरेचदा मनात येतो. 'ब्रिजरटन' बनवणाऱ्या लोकांच्या मनात ती मालिका बनवताना काय आहे कोण जाणे! मला पदोपदी ती ब्रिटिश राजघराण्याची टिंगल वाटते. ती टिंगल करण्यासाठी काही मसाला पाहिजे म्हणून मध्येमध्ये रोमान्स, ड्रामा, वगैरे. तशीही ती शोंडा राईम्स (Shonda Rhimes) या निर्मातीची मालिका आहे. तिच्या मालिकांमध्ये करमणूक ठ्ठासून भरलेली असते. सुंदर दिसणारे पुरुष असतात, काळे, गोरे, ब्राऊन, सगळ्या वर्णांचे सुंदर पुरुष, ते न चुकता शर्ट काढतात, आणि किमान एक-दोन वयस्कर आणि कर्तबगार बायका असतात, बहुतेकदा काळ्या. कुणाची मिजास नसते त्यांच्यासमोर आगाऊपणा करण्याची! पोलिटिकल करेक्टनेसच्या अक्षावर मालिका खूप उजवीकडे असते, पण करमणूक अजिब्बात कमी पडत नाही. 'ब्रिजरटन' घडतं साधारण १८व्या शतकातल्या, काल्पनिक इंग्लंडमध्ये. तेही बहुतेकसं लंडनच्या सदाशिव पेठेत. उच्चभ्रू लोक राहतात तिथे. या लोकांमध्येही कुणी एलोईजसारख्या मुली असतात; ज्या सुरुवातीला गोंधळलेल्या असतात आणि हळूहळू त्यांना आपला रस्ता निराळा आहे याची जाणीव होते, सवय होते. त्यामुळे होणारी चलबिचल थांबते.

एलोईज ब्रिजरटन
एलोइज ब्रिजरटन

'ब्रिजरटन'च्या आधी 'मार्व्हलस मिसेस मेझल'चा तिसरा सीझन बघितला. मिज ही ज्यू घरातली, सुखवस्तू, लग्न झालेली मुलगी. मुलगीच, तिशीचीही नसेल. आधी ती नवऱ्याला पाठिंबा देण्यासाठी कर्तबगारी दाखवते, आणि मग तो बदफैलीपणा करतो म्हणून 'मिसेस मेझल' नावानं स्वतःच स्टँडप कमिडियन होते. मिज स्वतःच्या ज्यूपणावर, बायकी सवयींवर, कमअस्सल पुरुषांनाही फक्त पुरुष आहेत म्हणून मिळणाऱ्या उजव्या वागणुकीवर, सगळ्यावर विनोद करते. मिसेस मेझल मालिका घडते साधारण १९५०-६०च्या दशकांतल्या न्यू यॉर्कमध्ये. तिच्या आजूबाजूची पात्रंही अतर्क्य आहेत; घरच्यांच्या प्रेमाचा आणि अतिकाळजीचा कंटाळा येत असेल तर ही मालिका जरूर बघाच. 'जग काय म्हणेल' याची सतत काळजी करणारी तिची आई, आणि सासू, जगाची रीतभात फारशी न समजणारे तिचे गणितज्ञ वडील, सतत पैशांचे व्यवहार बघणारा सासरा, बदफैलीपणा केला असला तरीही मिजबद्दल आपुलकी असणारा तिचा नवरा वगैरे पात्रं तिच्या विनोदांपेक्षाही जास्त अतर्क्य, अबसर्ड छापाची परिस्थिती तयार करतात. मिज स्टँडप कॉमेडी करायला सुरुवात करते हे तिच्या घरी नीटसं माहीत नसतं. जगाची काळजी करणारी तिची आई, आणि सभ्यासभ्यपणाची काळजी करणारे तिचे वडील तिचे शो बघायला येतात, आणि नेमकी ती आई-वडलांच्या एकत्र झोपण्यावरच जोक करते. जोक न समजणं, आणि जोक न पचणं यांबद्दल केलेले चांगले विनोद फार दिसत नाहीत.

मिज आणि सुझी
मिज आणि सुझी

मिज विनोदी आहे, तशीच अतिशय स्वकेंद्री आहे; आणि तिच्या व्यक्तिमत्वाला काँट्रास्ट तिची मॅनेजर आहे सुझी. मॅनेजर म्हणून सुझीही कर्तबगार आहे; पण तिचं मुख्य काम आहे मिज यशस्वी कशी होईल याचा विचार करणं. मिज यशस्वी तरच सुझी यशस्वी. मिज लौकिकार्थानं सुंदर, शेलाटी वगैरे आहे, सुझी तिच्या उलट. चुकून आपण सुंदर दिसलो तर, याची तिला भीती वाटत असावी. म्हणूनही मला कधीकधी सुझी जवळची वाटते. आजूबाजूच्या जगात सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा अनेक गोष्टी होत असतात. त्यावर त्या दोघी कायम एक होऊन टिंगल करतात; आपापल्या परीनं मार्ग काढायचा प्रयत्न करतात. माझ्या नोकरीत सध्या मला एकही अशी मैत्रीण नाही याची मला पुन्हापुन्हा आठवण होते. मग मला सुझीची पंचलाईन आठवते. मिज स्टेजवर जायच्या आधी, 'ब्रेक अ लेग' किंवा 'बेस्ट लक' म्हणण्याजागी सुझी तिला म्हणते, 'टिट्स अप'!

तिसरी मालिका बघित्ये 'द ग्रेट'. रशियाची साम्राज्ञी कॅथरिन द ग्रेटच्या आयुष्यातल्या काही सत्यघटना आणि बाकीची अबसर्डिटी भरून राहिलेली मालिका.

डॉनल्ड ट्रंप (म्हणे) बायकांची ३, ८, ९ अशी बायकांची प्रतवारी करतो. बाबांचे एक मित्र म्हणाले होते, "सभ्य आणि असभ्य पुरुषांच्या मनांतले विचार निराळे नसतात. सभ्य पुरुष फक्त त्याबद्दल काही कृती करत नाहीत." समजा ही व्याख्या बदलली तर, विशेषतः राजाच्या बाबतीत. कॅथरिनचा नवरा पीटर असा वागतो. समाजमाध्यमांवर लोक ज्या बालिश पद्धतीनं वाद घालतात, सगळीकडे लोक सत्ताधारी लोकांशी हांजीहांजीपणा करतात, ते सगळं आणखी ताणून सतराव्या शतकातल्या, रशियातल्या सम्राट पीटरच्या साम्राज्यात नेलं आणि त्याला शिवीगाळीची फोडणी दिली तर... हो, शिवाय वर काहीही पवित्र नाही, nothing is sacred आहेच. सम्राट वगैरे लोक वागायला वाईट असतील तर त्यांची हेटाई करणं सोपंच आहे. हा स्वकेंद्री, मूर्ख, आचरट, वगैरे असणारा पीटर एवढा विनोदी आहे की त्याचा राग कुठून येणार! आर्चबिशपाचा सगळीकडे उल्लेख आर्ची. पांढरपेशा, कारकुंडा, भेदरट ऑर्लो सुरुवातीला युद्ध, हिंसेला साफ विरोध करत असतो; पण एकदा परिस्थितीपोटी त्याला एका सैनिकाला मारावं लागतं, मग तो सगळीकडे हिंसा करत सुटतो. आणि हो, या ऑर्लोचं काम करणारा नट भारतीय वंशाचा आहे. 'ब्रिजरटन' आणि 'द ग्रेट' दोन्ही मालिकांमध्ये काळे आणि ब्राऊन लोक आहेत. 'ब्रिजरटन'मध्ये काही अफवांचा आधार घेऊन काही कहाणी रचण्याचा प्रयत्न केला आहे. 'द ग्रेट'चा पायाच अबसर्डपणा आणि कालविसंगती आहे. त्यामुळे कुठल्याही वंशाचे लोक कुठेही दिसण्याबद्दल आश्चर्यही वाटत नाही. मात्र दोन्ही ठिकाणी सत्तास्थानी, केंद्रस्थानी गोरे लोकच आहेत.

द ग्रेट
'द ग्रेट'मध्ये कॅथरिन आणि पीटर

'द ग्रेट'चा पहिला सीझन बघून झालाय. बहुतेक सीझनभर पीटरविरोधात बंड करून, त्याला पदच्युत करून कॅथरिन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार, असा प्लॉट आहे. लेखन, दिग्दर्शन, संपादन, अभिनय सगळी भट्टीच एवढी जमून आलेली आहे की हे बंड कधीही यशस्वी होऊ नये, अशा आशेपोटी मी विकिपिडीयावर कॅथरिनबद्दल थोडी माहिती वाचली. दुर्दैवानं ती सत्तेवर आली होती, तिच्या काळात खरोखर रशियानं सांस्कृतिक, वैज्ञानिक वगैरे प्रगती केली होती. अर्थात, या गोष्टीही कसली तमा न बाळगता, विनोदी पद्धतीनं कशी मांडतील, याबद्दल मला कुतूहल आहेच.

ही मालिका बघायला मैत्रिणीनंच सांगितलं. ही मैत्रीण जवळ राहत नाही; आम्ही एकाच कंपनीत कामही करत नाही. किमान माझी अशी अगोचर मैत्रीण आहे. कोण जाणे, कदाचित ह्या नव्या कंपनीतही कुणी अशी अगोचर मैत्रीण भेटेल, आणि पैसा, सत्ता यांच्यामागे लागलेल्या लोकांच्या गर्दीकडे मला कदाचित सहज दुर्लक्ष करताही येईल.

Huzzah!

ता.क. - येत्या बुधवारी 'रशियन डॉल'चा नवा सीझन येतोय. नताशा लिओनप्रेमी लोकांना पुन्हा तिच्या खरबरीत आवाजात 'का क्क रोच' ऐकायला मिळेल का?

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

छान लिहीले आहेस. सुरेख गोशवारा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0