विषाणूच्या गोष्टी

विषाणूच्या गोष्टी

सुरवासुरवातीला
सॅनिटायझर वापरणे,
पुरुषांनी शू केल्यावरही साबणाने हात धुणे,
दरवाजे कोपराढोपरांनी, लाथाबुक्क्यांनी ढकलून उघडणे,
शिंकताखोकताना नाकातोंडावर काहीतरी धरणे,
हाताशी काही नसताना स्वतःच्या काखेत शिंकणे, खोकणे,
मनगटाने घाम, नाक पुसून शेखॅंड न करणे,
मामुली सर्दी झाली, खोकला आला, तरी "बरं नाहीये का? घरी जा बरं" असं म्हणून त्या व्यक्तीच्या आणि त्याहून जास्त इतरांच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त करणे,
या सगळ्या सवयी हास्यास्पद मानल्या जात.
त्यांची टिंगलटवाळी केली जात असे.
'ओ एनाराय, पुरे तुमची स्वच्छता' म्हणून त्या व्यक्तीला हिणवले जात असे.

तेव्हा भारतीयांना त्यांच्या प्रतिकारशक्तीवर अतोनात भरवसा होता.
गरीब लोक तर म्हणजे उकिरड्यावजा स्थितीत राहून कोणत्याही जिवाणूविषाणूशी तोंड द्यायला सज्ज आहेत अशी श्रीमंतांची श्रद्धा होती.
लोक कुपोषित आहेत याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती हा किरकोळ तपशील अलाहिदा.
'शेखॅंड टाळा, वायरसला आळा'
अशी एक घोषणा होती.
'नमस्कार करा करा कर लेंगे, विषाणूमुक्ती लेंगे'
अशीही घोषणा पुण्यातल्या कुठल्याशा भिंतीवर कुणी वाचल्याचे सांगतात.
सोबत आलं, लिंबू, ज्येष्ठमध, बेहडा, हिरडा, बेल, तुळस, लवंग, दालचिनी, कापूर, तुरटी, निलगिरी सगळ्यांनी निरनिराळ्या प्रमाणांत व्हॉट्सॅपवर धुमाकूळ घातला होता.
सांबारामुळे आपण इम्यून आहोत असा दक्षिणेचा सूर होता.
त्यात रस्समवाल्यांचा वेगळा गट होता.
लसणीचा नंबर संख्येमुळे खरेतर वरचा होता,
पण लसणीवर सर्व जातींचं ऐक्य साधता येईना.
त्यात चिनी लोकही लसूण खातात, त्याचं काय?
हा मुद्दा त्रासदायक ठरला.
मग 'शाकाहार उत्तम आहार' या चाकोरीत गाडी रुतली
आणि काही धर्मांनी एकदम उचल खाल्ली.
त्यातले काही जण ते कसे आधीपासूनच पांढरी तोंडझाकणं लावून फिरतात त्याबद्दल सांगू लागले.
प्रत्येकाने एकेक सांस्कृतिक पुरावा आणून आपल्याला काही भीती नाही असा निर्वाळा दिला.

इतकं असूनही पुढे सॅनिटायझर कमी पडू लागले.
उसाच्या मळीपासून सॅनिटायझर तयार करण्यात येऊ लागले.
मागाहून तोंडझाकणांचा तुटवडा आहे, असं कळलं.
तेव्हा हाताशी असलेले रुमाल कामाला आले.
एका निमूट उभ्या असलेल्या हातगाडीवाल्यावर तोंड झाकत नाही म्हणून एक जण चौथ्या मजल्यावरून डाफरताना मी स्वतः पाहिले.
जरा शिंकल्याखोकल्यावर वाळीत टाकतील म्हणून लोक शिंक गिळू लागले.
काहींनी तर म्हणे कायद्याने सज्ञान नसलेल्या देवांच्या मूर्तींची तोंडंही झाकली!
सगळं सांस्कृतिक संचित एका बाजूला नि लस शोधा, लस शोधा असा सूर चोहीकडून ऐकू येऊ लागला.

दरम्यान
थेट वुहानहून विषाणू आणलेल्या,
आखाती इस्लामी देशांतून लोकांची सततची येजा असणाऱ्या,
रजस्वलेला पाहून कोपलेल्या अय्यपाच्या,
गोमांसावर ताव मारणाऱ्या
केरळप्रांती विषाणूची चाल सर्वांत प्रथम मंद झाली होती.

- निमिष साने

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा लेख वैचारिक दिवाळखोरी चे उत्तम उदाहरण आहे.
मानवी शरीरावर रोज किती तरी रोग कारक जिवाणू आणि विषाणू हल्ले करत असतात पण ते सर्व हल्ले शरीर परतवून लावत .
शरीराला ते विषाणू आणि जिवाणू ची ओळख आहे.
साबण लावून,आणि sanitizer वापरून शरीरात विषाणू,जिवाणू प्रवेश करत नाहीत.
हे हास्यास्पद आहे.
हवेत ,पाण्यात,किती तरी रोगकारक जिवाणू ,विषाणू आहेत ते रोज शरीरात प्रवेश करणार असतात पण त्याचा प्रतिकार केल्या मुळे रोग निर्माण होत नाही.
Covid १९ च्या आडून अंध श्रथा पसरवण्याचा उद्योग हा लेख करत आहे.
अजून ह्या विषाणू ची पूर्ण माहिती नाही त्या मुळे प्रतिबंधात्मक उपाय हे योग्य आहेत हे समजणे ही श्रद्धा आहे ते सत्यच आहे हे समजणे पण हास्यास्पद आहे.
शरीराला निरोगी राहण्यासाठी पोषक आहाराची गरज असते आणि तो आहार काय असावा ह्याची माहिती प्राचीन काळापासून आहे.
काढे त्याच प्रकारात येतात .
विशिष्ट प्रकारचे काढे रोग प्रतिकार शक्ती वाढवतात हे सत्य नाही असा विचार फक्त अविवेकी बुध्दी आणि द्वेष ह्या मुळेच व्यक्त केला जावू शकतो.
आधुनिक विज्ञान जिथे पूर्णतः फेल झाले आहे त्या covid १९ काढा पिवून का बरा होत नाही असे विचारणे मूर्ख पणाचे लक्षण आहे.
हिंदू चा काही ही संबंध नसताना मंदिराचा उल्लेख करणे हे धार्मिक द्वेष पसरवणे ह्या मध्येच येते .
अशा वृत्ती ला ऐसी अक्षरे नी थारा देवू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तुम्ही मास्तर आहात का हो? नाही, अत्यंत चुकीची माहिती अत्यंत आत्मविश्वासानं देताय म्हणून विचारतोय.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

साबण लावून,आणि sanitizer वापरून शरीरात विषाणू,जिवाणू प्रवेश करत नाहीत.
हे हास्यास्पद आहे.

अतुल गावंडे हे एक सर्जन (इंग्रजीतले, कापाकापीवाले), पब्लिक हेल्थमधले तद्न्य आहेत.
त्यांच्या चेकलिस्ट मॅनिफिस्टो पुस्तकात त्यांनी सहोदारण हे पुराव्याने सिद्ध केलं आहे की साबण लावून हात धुतल्याने रोगजंतू शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण खूपच कमी होते.

आता तुमचं खरं मानायचं की त्यांचं? तुम्ही जर ह्या दाव्याला पुष्टी म्हणून काही पुरावा दिला तर आम्ही मानू तुमचं हे मत.
पण तोपर्यंत ते निव्वळ हास्यास्पद आहे.
पुढला प्रतिसाद नंतर वाचीन- कारण सुरुवातीलाच तुम्ही हिटविकेट.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0