स्पीतीची सायकलवारी

संकीर्ण

स्पीतीची सायकलवारी

- इंद्रजित खांबे

"आप कहाँ से हो?"
मी म्हणालो, "महाराष्ट्र से!"
"आप को तो इतने बडे बडे पहाड देखने की आदत नहीं होंगी। आपको डर नहीं लगता इन पहाडों से?"
"बिलकुल नही। आप जैसे दोस्ताना लोग हैं तो डर किस बात का?"
"हां, वो तो ठीक हैं। लेकीन जैसे जैसे आगे बढोगे वैसे वैसे आप को लोग नहीं मिलनेवाले। खुद का खयाल रखना।"

सायकलवरनं स्पीती व्हॅलीचा प्रवास सुरू केल्यावर पहिल्याच दिवशी एका गावात दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या मुलीबरोबरचे हे संवाद. ह्या वारीची ही फक्त सुरूवात होती. हा निसर्ग आणि लोकांचं जगणं आपल्याला जितकं रोमँटिक वाटतंय तेवढं ते नाहीये हे प्रवास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं कळत गेलं.

Expedition या शब्दाचा अर्थ आहे शोधयात्रा. स्पीती या नावाला Expedition हा शब्द गेल्या दहा वर्षांत चिकटलाय. याची कारणं बरीच आहेत. स्पीतीमध्ये फिरताना महाकाय दगडांवर वेगवेगळ्या प्रवाशांनी स्पीती Expedition हे रंगवून ठेवलेलं सर्रास दिसतं.

expedition

पण खरंच ही शोधयात्रा असते का? बुलेट किंवा स्पोर्टस् कार उडवत नेमका कोणता शोध पर्यटक घेत असावेत? असा सवाल वारंवार माझ्या डोक्यात येत होता. खरं तर ही स्पीतीवारी सुरू करण्यापूर्वीच हा प्रश्न वारंवार डोक्यात फिरत होता. स्पीतीला जाण्याचं मी ठरवलं ते एकाच कारणामुळे. ते म्हणजे सायकलप्रवास. माझा सायकलिस्ट मित्र अभिजीत कुपटे यानं ही प्रवासाची संकल्पना मांडली आणि मी लगेच त्यासाठी तयारही झालो. सायकल ही अद्भुत गोष्ट आहे. The bicycle is a curious vehicle. Its passenger is its engine असं एक वाक्य हल्लीच वाचण्यात आलं आणि ते मनोमन पटलंही. सायकलमुळे आपल्या जगण्याचा वेग मंदावतो. आजच्या वेगवान काळात आपण कित्येक गोष्टींच्या सखोल अनुभूतीपासून वंचित असतो हे सायकलनं प्रवास केल्यावर जाणवतं. रस्त्यावरून सायकलिंग करत असताना आजूबाजूचं निरीक्षण करता येतं. काही मजेशीर दिसलं, तर पटकन सायकल थांबवता येते. चारचाकीतून प्रवास करताना जशी गाडीची केबीन आपल्या नजरेला अडथळा निर्माण करते तसं सायकलवरून होत नाही. सायकलवरून समोरचा निसर्ग आपल्याला त्याच्या भव्यतेसह अनुभवता येतो. चारचाकीच्या इंजिनचा आवाज नसतो की तिच्या इंटेरीअरचा वास. नैसर्गिक आवाजांच्या आणि वासांच्या सोबतीनं प्रवास चालू राहातो आणि हेच सायकलप्रवासाचं मोठं संचित असतं. या सर्व गोष्टींमुळे मी या प्रवासाबाबत प्रचंड उत्साहित होतो. चंदिगडपर्यंत विमानाने पोहोचायचं. मग शिमला मार्गे नारखंडा या गावांपर्यंत गाडीनं पोहोचायचं आणि नारखंडातून प्रवास सुरू करून किन्नोर व्हॅली आणि स्पीती व्हॅलीमार्गे आठ दिवसांनी मनालीपर्यंत पोहोचायचं असा एकंदरीत दौरा आखलेला होता. वाटेत वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम होता आणि सोबत नवीन मित्रमंडळीही. सर्व तयारी करून एकदाचं आमचं फ्लाइट चंदिगडमध्ये उतरलं आणि आम्ही शिमलामार्गे नारखंडापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. जसजसं शिमला जवळ येऊ लागलं तसतसं आपल्या डोक्यात या शिमला-मनालीसारख्या ठिकाणांबद्दल जो रोमँटिसिझम तयार झालाय तो मोडला जाणार आहे याची जाणीव होऊ लागली.

चंदिगडमध्ये भयाण उकाडा होता. असं वाटत होतं, की मे महिन्याच्या मध्यावर मराठवाड्यातच उतरलोय की काय! पाच ते सहा तासांचा प्रवास करून गाडी जसजशी शिमल्याजवळ पोहोचायला लागली तसतसं रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक वाढायला लागलं. आजूबाजूला प्रचंड जंगलतोड दिसायला लागली. 'रोझा' सिनेमात पाहिलेलं शिमला ते हेच का असा प्रश्न पडू लागला. कुठायत त्या हसीन वादियाँ आणि चिनारची झाडं. आजूबाजूला दिसत होतं ते फक्त सिमेंट काँक्रीटचं जंगल.

सिमेंट काँक्रीटचं जंगल
शिमल्यातील बेसुमार जंगलतोड करून बांधलेली हॉटेलं.

पर्यटनाच्या नावाखाली झालेला निसर्गाचा ऱ्हास. का येत असतील लोकं इथं? किती बकाल आहे हे? असं वारंवार डोक्यात येत होतं. रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचा खच दिसायला सुरुवात झाली. टिपीकल पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असतात तसे त्याच त्या प्रकारचे शोभेच्या वस्तूंचे, कपड्यांचे स्टॉल होते. खंगलेले आणि धुळीने माखलेले याक नावाचे प्राणी होते ज्यांवर बसून पर्यटक फोटो काढत होते. दुपारच्या सुमाराला आमची गाडी शिमल्यात पोहोचली आणि आम्ही भयानक अशा ट्रॅफिकमध्ये अडकलो. गाडी इंच-इंच पुढे सरकत होती आणि पूर्ण वातावरण गाड्यांच्या धुरानं आणि वासानं भरून गेलं होतं. साधारण दीड-पावणेदोन तासांनी आमची त्यातून सुटका झाली आणि आम्ही संध्याकाळपर्यंत नारखंडाला पोहोचलो. नारखंडा जसजसं जवळ येऊ लागलं, तसतसा वातावरणातला गारठा वाढू लागला. आजूबाजूला पहाड दिसू लागले. त्या पहाडांत सफरचंदांच्या बागा दिसू लागल्या. शेतात येणाजाणारे गावकरी दिसू लागले आणि आमच्याही जिवात जीव आला. नारखंडात पोहोचलो तेव्हा चांगलाच गारठा होता. चार-पाच किलोमीटरची एक सायकलराईड घेऊन आम्ही दुसऱ्या दिवसाच्या प्रवासासाठी तयार झालो होतो.

नारखंडा सफरचंदाच्या बागा
नारखंडातील थंड संध्याकाळ आणि हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारे डोंगर आणि सफरचंदाच्या बागा.

दुसऱ्या दिवशी सकाळी थंड वातावरणात आम्ही नारखंडा ते रामपूर या ६० किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास तसा सोपा होता कारण पहिले ३० किलोमीटर हा सरळ उतार होता. त्यामुळे फार दमछाक नव्हती. घाटातली नागमोडी वळणं घेत आमच्या सायकली उतरत होत्या. घाटात ठिकठिकाणी मधमाशांची शेती दिसत होती. या भागात मधमाशांची शेती केली जाते. छोट्या आकाराच्या लाकडी पेटीमध्ये मधमाशा पाळल्या जातात. याला मधमाशांची कॉलनी म्हणतात.

मधमाश्यांच्या वसाहती मधमाश्यांच्या वसाहती

रस्त्याच्या कडेला मधमाश्यांच्या वसाहती आणि फळबागांमध्ये वस्तीला असलेल्या मधमाश्या.

या मधमाशांपासून मध तर मिळतोच आणि त्याचबरोबर शेतीमध्ये परागीभवनासाठी यांचा फार उपयोग होतो. विशेषतः फळबागांमध्ये. त्यामुळे जेव्हा फळं लागण्याचा सीझन असतो तेव्हा या मधमाशांच्या पेट्या शेतांमध्ये महिन्याभरासाठी मुक्कामी असतात. आपल्याकडे खतासाठी शेळ्या बसवतात तसंच. या मधाची चवही थोडी वेगळी असते. रस्त्याच्या कडेला छोटे स्टॉल लावून या मधाची विक्रीही सुरू होती. पूर्ण हिमाचलमध्ये मला ठिकठिकाणी ही मधमाशांची शेती दिसली. दुपारपर्यंत आम्ही रामपूरमध्ये पोहोचलो. सकाळी नारखंडामधून जेव्हा सायकल चालवायला सुरूवात केली तेव्हा १०0 डिग्रीच्या आसपास तापमान होतं आणि दुपारी नारखंडात पोहोचलो तेव्हा ते ४० डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं. स्पीतीतलं हवामान हे असं कमालीचं टोकाचं आहे. सतत बदलत रहाणारं. कडाक्याच्या गर्मीत सायकल चालवत असताना अचानक वातावरण ढगाळ होत असे आणि गार वारा अंगाला झोंबत असे.

दुसऱ्या दिवशी आम्ही रामपूरवरून सकाळी प्रवास सुरू केला आणि आमचा मुक्काम असणार होता टापरी या गावात. हा साधारण ७० किलोमीटरचा प्रवास होता पण कालच्या पहिल्या दिवसापेक्षा थोडा खडतर. कारण हा पूर्ण रस्ता डोंगरात एका बाजूला खाच मारून बनवलेला त्यामुळे खाली दगड आणि डोक्यावरही दगडांची कमान अशी अवस्था. सायकलवरून प्रवास असल्यामुळे डोक्यावर कधी दगड पडेल की काय अशी सततची भीती.

दगडी पहाड कोरून बनवलेला धोकादायक रस्ता. दगडी पहाड कोरून बनवलेला धोकादायक रस्ता.

दगडी पहाड कोरून बनवलेला धोकादायक रस्ता. डोक्यावर धोकादायक दगडांची महिरप.

वाटेत ठिकठिकाणी दर्‍यांमध्ये गुरं मरून पडल्याचा वास येत होता. या पट्ट्यात रस्त्याच्या कडेला काकडी विकणारे बसलेले असतात.

दगडी पहाड कोरून बनवलेला धोकादायक रस्ता. दगडी पहाड कोरून बनवलेला धोकादायक रस्ता.

खास हिमाचलमध्ये मिळणारी खिरा काकडी आणि विविध फळं.

या काकडीला स्थानिक भाषेत 'खिरा' असं म्हणतात. आपण महाराष्ट्रात जी काकडी खातो त्यापेक्षा ही आकाराने मोठी, फुगीर आणि भरपूर रसाळ. या काकडीला पुदिना आणि मिरचीची तिखट चटणी लावून विकतात. रस्त्याने आजूबाजूला खूप ठिकाणी कोल्ड्रिंकच्या अर्धा लिटरच्या बाटल्या पडलेल्या दिसत होत्या. सुरवातीला वाटलं, की त्या पर्यटकांनी टाकल्या असतील. पण नंतर लक्षात आलं, की तिथं बनणारी चुल्ली नावाची स्थानिक दारू या बाटल्यांमधून विकली जाते. ही दारू बनते जर्दाळूपासून. जर्दाळू एकदा पिकले, की फार काळ टिकत नाहीत. मग त्यांपासून ही दारू बनवली जाते. स्थानिक बाजारात ती पन्नास ते शंभर रूपये लिटर या भावानं मिळते. रस्त्याच्या कडेला काम करणारे स्थलांतरित कामगार ती पितात. एकतर तिथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत ही दारू शरीराला उर्जा देत असावी. यासोबतच तांदूळ, बाजरी, सफरचंद यांच्याही दारू इथं बनतात आणि विकल्या जातात. दिवसभराचा प्रवास करून आम्ही संध्याकाळी टापरी या टुमदार गावात पोहोचलो. अतिशय छोटुकलं आणि शेजारून बेभान वाहणाऱ्या नदीच्या काठावर हे गाव वसलेलं होतं. बर्‍यापैकी थंडी होती. गावात छोटेखानी हॉटेल आणि दारूचे गुत्ते होते. सर्व आवराआवरी करून आम्ही पुढच्या प्रवासाची तयारी करून झोपी गेलो.

तिसऱ्या दिवसाचा प्रवास होता तो किन्नोर घाटीमधून. हा अत्यंत खडतर असा प्रवास कारण या पूर्ण मार्गात रस्ता बांधकाम चालू होतं. सुरुंग लावून दगड फोडले जात होते आणि त्यांतून हा रस्ता बनत होता. गेल्या काही वर्षांमध्ये स्पीती व्हॅलीत जो पर्यटकांचा ओघ वाढलाय त्याचा विचार करता इथले रस्ते फार छोटे होते, त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम सातत्यानं चालू आहे. मध्येच एकदोन ठिकाणी भयानक वेगानं वाहणार्‍या नदीवरच्या लाकडी पुलावरून जायचं होतं.

सतत सोबत करणारी सतलज
सायकलनं प्रवास करताना सतत सोबत वाहणारी सतलज नदी.

हे पूल ओलांडताना काळजाचा ठोका चुकत असे. खडतर अशा या घाटरस्त्याच्या मध्यातच एक गृहस्थ बिस्किटं, चिप्स, चॉकलेटं अशा वस्तू विकायला बसला होता. या ठिकाणी याचा माल कोण विकत घेणार म्हणून मला कुतूहल वाटलं. अधिक चौकशी केल्यावर कळलं, की त्याचं नाव गौरीशंकर होतं आणि तो मूळ यूपीचा होता.

गौरीशंकर
ब्लास्टिंगच्यावेळी रस्ता बंद होऊन ट्रॅफिक जॅम झाल्यावर व्यवसाय करणारा गौरीशंकर

"साब, हररोज ये रास्ता दोपहर को १ बजे से लेकर तीन बजे तक बंद रहता इस दौरान ब्लास्टिंग का काम होता हैं और गाडीयों की लंबी क़तार लग जाती है। यही मेरे धंदे का टाईम हैं। इस दो घंटे में हजार रूपयों की बिक्री कर लेता हूँ. बाकी टाइम मैं नजदीकी गाँव मे जा कर धंदा करता हूँ।". कोणाच्या व्यवसायाचं काय मॉडेल असू शकतं हे पाहून मी चकीतच झालो. गौरीशंकरसारखे अजून कित्येक लोक मला व्हॅलीत भेटले. व्हॅलीतली गावं फार दूरदूर आहेत. लोकवस्ती कमी आहे. इथं बरेचसे यूपी-बिहारचे लोक येऊन अशी छोटीमोठी कामं करून पोट भरतात. या पूर्ण खडतर आणि धुळीने माखलेल्या किन्नोर घाटीतून सायकल हाणत सर्व टीम संध्याकाळी पूह या गावी पोहोचली. इथून पुढच्या प्रवासात आता झाडं विरळ होत जातात आणि ऑक्सिजनची कमतरता प्रकर्षानं जाणवायला लागते.

चौथ्या दिवसाचा प्रवास होता तो पूह ते नाको. आता आम्ही खऱ्या अर्थाने स्पीती व्हॅलीत होतो. भव्य डोंगरदऱ्या, कमालीची उष्णता आणि त्याच वेळी गार वारा असं विचित्र वातावरण. या पूर्ण प्रवासात तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागत नाही. ठिकठिकाणी ग्लेशिअर्स वितळून वाहत आलेल्या, हिमनद्यांच्या पाण्याचे छोटेमोठे झरे तुम्हांला दिसतात. हे पाणी अतिशय स्वच्छ असतं आणि अगदी पिण्यायोग्य तापमानाचं असतं. बहुसंख्य लोक हेच पाणी पितात.

ग्लेशियर पिण्याचं पाणी
ग्लेशियर वितळून जागोजागी वाहणारे धबधबे. स्थानिक हेच पाणी पिण्यासाठी वापरतात.

कित्येक गावकर्‍यांच्या घरात चोवीस तास हे पाणी वाहत असतं. हिमनद्यांमधून आलेलं पाणी घरामागे एका सिमेंटच्या टाकीत वळवायचं आणि तिथून ते घरात घ्यायचं अशी इथली पद्धत. काही झरे हे मोठे धबधब्यासारखे असतात. गमतीचा भाग असा, की कित्येक प्रवासी आपली चारचाकी गाडी थेट या धबधब्यांखाली घेवून जातात आणि ती पुढे-मागे करून लखलखीत धुवून काढतात. नाको गाव जसजसं जवळ येऊ लागलं तसतसं खडतर जगणं काय असतं ते कळू लागलं. ऑक्सिजन फार विरळ होत गेला. खूप धाप लागायला लागली. रस्त्याच्या बाजूला बारा ते पंधरा वयोगटातील तीन शाळकरी मुलं भेटली. ती घरी जाण्यासाठी गाडीची वाट पहात होती. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळलं, की बरेचदा त्यांना खाली गावात जायला किंवा गावातून वर शाळेत यायला गाडी मिळत नाही. मग ही मुलं दरी उतरून खाली जातात. यासाठी त्यांना तासभर लागतो.

शाळा सुटल्यावर गाडीची वाट पाहणारे शाळा सुटल्यावर गाडीची वाट पाहणारे.

शाळा सुटल्यावर गाडीची वाट पाहणारी मुलगी आणि दरी उतरून जाणारा एक १४ वर्षांचा मुलगा.

या अशा खडतर परिस्थितीमुळे इथली माणसं फार चिवट आहेत. या पूर्ण भागात क्वचितच स्थूलपणा असलेली व्यक्ती पहायला मिळते. इथले पोलीसही शारीरिक दृष्ट्या फिट, काटक आणि सुदृढ दिसले. याचं कारणच मुळात इथली खडतर जीवनशैली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इथं गाड्या फार नाहीत कारण गाड्या पेट्रोल खूप जाळतात आणि धूर खूप निघतो. त्यामुळे बरेच लोक जवळचं अंतर चालतच पार करतात. अशाच रस्त्याच्या एका वळणावर नेगी नावाचे सत्तरीतले गृहस्थ भेटले. ते खालच्या गावातून पहाड चढून वर आले होते जिथं ते रात्रपाळीसाठी वॉचमन म्हणून नोकरी करतात. वयाच्या सत्तरीतही त्यांची शरीराची ठेवण आणि फिटनेस कमाल होता.

राखणदाराची नोकरी करणारे सत्तरीचे नेगी नावाचे गृहस्थ
राखणदाराची नोकरी करणारे सत्तरीचे नेगी नावाचे गृहस्थ

नाको गाव कमालीचं सुंदर होतं. गावातल्या सर्व घरांवर रंगीबेरंगी झेंडे फडकत होते आणि त्यावर संध्याकाळचा सूर्यप्रकाश पडून एक माहौल तयार झाला होता. गावात एक छोटेखानी तलाव होता आणि एक सुंदर बौद्ध मॉनेस्ट्रीदेखील होती. हवेत चांगलाच गारठा होता. गावकरी शेतात काम करण्यात गुंग होते.

नाको गावातील संध्याकाळ
नाको गावातली संध्याकाळ

नाकोतले शेतात काम करणारे शेतकरी
नाकोतले शेतात काम करणारे शेतकरी

पाचव्या दिवसाचा प्रवास होता नाको ते ताबो. या प्रवासात पहिले २० किलोमीटर हा थेट उतार होता. सायकलचं पॅडल एकदाही मारायची गरज नाही असा हा उतार. पण म्हणून काही हा प्रवास सोपा ठरत नाही. रस्ता निमुळता, थंडी आणि वारा याचा सामना करावाच लागतो. हात गारठतात आणि त्यामुळे सायकलच्या हँडलची पकड ढिली होण्याचा धोका असतो. हे २० किलोमीटर उतरायला फारफार तर अर्धा तास लागतो. पण गंमत अशी, की नाको आहे जवळपास १३ हजार फुटांवर आणि २० किलोमीटरचा उतार मारून ज्या समदू या गावात तुम्ही पोहोचता ते गाव आहे ८ हजार फुटांवर. यावरून अंदाज येईल, की हा किती तीव्र उतार आहे तो.

नाकोतून समदू या गावापर्यंत घेऊन जाणारा उताराचा रस्ता.
नाकोतून समदू या गावापर्यंत घेऊन जाणारा उताराचा रस्ता.

त्यामुळे वळणांवर जीव मुठीत घेऊन सायकल चालवावी लागते. थोडी जरी चूक झाली तरी थेट दरीत जाण्याची भीती. समदू या गावात पोहोचून आम्ही पहिले चहाचा ठेला शोधला. हात गारठलेले होते त्यामुळे थोडा आराम करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. समदू ते ताबो या प्रवासात आजूबाजूला सफरचंदांच्या बागा होत्या. इथं अवजड मालवाहतुकीसाठी गाढवांचा आणि खेचरांचा वापर केला जातो. विशेषतः घरबांधणीच्या कामात दगड, वाळू इत्यादीच्या वाहतुकीसाठी. पहाडी भाग असल्यामुळे इथं बऱ्याच ठिकाणी गाड्या पोहोचत नाहीत. या खेचरांना एकदा ती घरबांधणीची जागा दाखवून आणायची.

अवजड मालवाहतूकीसाठी वापरली जाणारी गाढवं अवजड मालवाहतूकीसाठी वापरली जाणारी गाढवं

अवजड मालवाहतूकीसाठी वापरली जाणारी गाढवं

खेचरांचा मालक फक्त माल भरून देतो आणि पुढचा प्रवास ही खेचरं स्वतः करतात असा सगळा मजेदार प्रकार. नाको ते ताबो या प्रवासादरम्यान अजून एक मजेशीर प्रकार अनुभवास आला. रस्त्यावर मध्यभागी काही कामगारांनी एक कापड अंथरलं होतं. त्यावर एका प्लास्टिकच्या डब्यात एक रानफुलांचं झाड होतं. शेजारी काही नोटा होत्या. अधिक चौकशी केल्यावर कळलं, की त्या नोटा येणाऱ्याजाणाऱ्या प्रवाशांनी ठेवल्यात.

शेजारच्या गावातली वरात अडवण्यासाठी रस्त्यावर झोपलेले कामगार शेजारच्या गावातली वरात अडवण्यासाठी रस्त्यावर झोपलेले कामगार

शेजारच्या गावातली वरात अडवण्यासाठी रस्त्यावर झोपलेले कामगार

त्याचबरोबर शेजारच्या गावात एक लग्न होतं. त्या लग्नाचं वर्‍हाड या रस्त्यानं जाणार होतं. मग शुभशकून म्हणून वर्‍हाडी मंडळींना हे कामगार लोक अडवतात आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करतात असा सगळा प्रकार. पुढे गेल्यावर ज्या घरात हे लग्न होतं ते घर आम्हाला दिसलं. इथं अशी पद्धत आहे, की लग्नघरातील काही मंडळी रस्त्यावरून येणाजाणार्‍या सर्वांना अडवून जेवणाचा आग्रह करतात. आम्हांलाही तसा आग्रह झाला. मग आम्ही त्या घरात जाऊन पाहुणचार घेऊन बाहेर पडलो.

लग्नघरातील पाहुणचार. पाहुणचारासाठी जमलेले ग्रामस्थ लग्नघरातील पाहुणचार. पाहुणचारासाठी जमलेले ग्रामस्थ

लग्नघरातील पाहुणचार. पाहुणचारासाठी जमलेले ग्रामस्थ

विविध सामाजिक स्तरांतली लोकं एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत होते. हे सर्व आवरून संध्याकाळी मुक्कामाला ताबोमध्ये पोहोचलो. ताबोमध्ये १३०० वर्षं जुनी मॉनेस्ट्री होती.

१३०० वर्षं जुनी ताबोतील मॉनेस्ट्री १३०० वर्षं जुनी ताबोतील मॉनेस्ट्री

१३०० वर्षं जुनी ताबोतील मॉनेस्ट्री

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून या मॉनेस्ट्रीला भेट दिली. विविध वयोगटातले बौद्ध भिख्खू आजूबाजूला वावरत होते. त्यातील काही साफसफाई करत होते.

मॉनेस्ट्रीमध्ये साफसफाई करणारे बौद्ध भिख्खू
मॉनेस्ट्रीमध्ये साफसफाई करणारे बौद्ध भिख्खू

मजेशीर गोष्ट अशी घडली, की दोन पंधरा-सोळाच्या वयोगटातील भिख्खूंमध्ये साफसफाई करण्यावरून भांडण जुंपलं. मी हे दूरून पहात होतो. हे दोघेही जण एकमेकांना बारीक आवाजात लैंगिक आशयाच्या शिव्या देत होते. मला हा प्रकार मजेशीर वाटला. हे बौद्ध भिख्खू अतिशय लहान वयात इथं येतात. ते काही स्वेच्छेने येत नाहीत. त्यामुळे जसजसं ते वयात येऊ लागतात, तसतसं नैसर्गिक लैंगिकतेला आवर घालणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे त्या अशा प्रकारे बाहेर पडत असतात. पण कदाचित या गोष्टीचा टॅबू असल्यामुळे त्या उघडपणे बोलल्या, चर्चिल्या जात नाहीत.

सहाव्या दिवसाचा प्रवास होता तो ताबो ते किब्बर. ताबोपासून पुढच्या सर्व पट्ट्यात या सिझनमध्ये जंगली गुलाब फुललेले दिसतात. अतिशय वैराण अशा लँडस्केपवर ही गुलाबी रंगाची फुलं फार सुंदर दिसतात.

जंगली गुलाबाची झुडपं जंगली गुलाबाची झुडपं जंगली गुलाबाची झुडपं

जंगली गुलाबाची झुडपं

त्यांचा मंद सुगंध आसमंतात पसरलेला असतो. या सुरमा फुलांचा वापर लोकांच्या रोजच्या जगण्यातही होतो. लोकं या फुलझाडांच्या सावलीत आराम करतात. दुपारचं जेवण जेवतात.

जंगली गुलाबाच्या झुडपांखाली विश्रांती घेणारे कामगार
जंगली गुलाबाच्या झुडपांखाली विश्रांती घेणारे कामगार

या प्रवासात वाटेत एका ठिकाणी स्थानिक कामगार जेवण करताना दिसले. सायकल थांबवली आणि त्यांच्यात सामील झालो. हे सर्व जण जवळच्याच गावातले होते. त्यांनी जेवायचा आग्रह केला आणि मलाही तेच हवं होतं. कोणत्याही प्रवासात जर स्थानिक पदार्थांची चव चाखायची असेल तर मजूर आणि शेतकरी यांच्यासोबत जेवण करणे हा मला सर्वोत्तम पर्याय वाटतो. दहा-बारा मजुरांचा जर गट भेटला, तर प्रत्येकाच्या डब्यात वेगळा पदार्थ असतो. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचं जेवण चाखायला मिळतं आणि त्याची चव ही अस्सल ग्रामीण असते जी हॉटेलमध्ये मिळेल याची खात्री नाही.

स्पीती जेवण स्पीती जेवण
स्पीती

स्थानिक कामगारांसोबतचं जेवण

या कामगारांसोबत मला पहिल्यांदा स्पीती रोटी खायला मिळाली. पिझ्झा बेस ज्या प्रकारचा असतो तशा प्रकारची ही जाड पण कमालीची मऊसूत रोटी असते. त्यासोबत विविध प्रकारच्या भाज्या आणि शेवटी गरम चहा असा सगळा बेत जुळून आला. हा पूर्ण रस्ता मातीच्या डोंगरांनी वेढलेला आहे. एका बाजूला दरीतून नदी वाहत असते आणि दुसऱ्या बाजूला मातीच्या डोंगरातून ठिकठिकाणी माती, दगडगोटे खाली पडत असतात.

किब्बर किब्बर

धोक्याच्या ठिकाणांवरील सूचनाफलक आणि रस्त्यावर गडगडत आलेला एक मोठा दगड.

त्यामुळे फार काळ रस्त्यावर रेंगाळायचं धाडस होत नाही. वाटेमध्ये धंकर मॉनेस्ट्रीला भेट देऊन रात्री मुक्कामाला आम्ही किब्बर या अतिशय सुंदर अशा गावात पोहोचलो. माझ्या आयुष्यात पाहिलेल्या हे अतिशय सुंदर आणि पुरातन गावांपैकी हे एक गाव म्हणता येईल. गावात लाकडी दारं-खिडक्या, जमीन असलेली दगडी उबदार घरं होती.

किब्बर किब्बर

किब्बरमधील एक रम्य संध्याकाळ

केसाळ याक फिरत होते. अतिशय शांतता होती. मेंढ्या-बकर्‍या बांधून ठेवलेल्या होत्या. त्यांच्या मलमूत्राचा उग्र वास सर्वत्र पसरलेला होता. मला हा वास खूप आवडतो. माझं बरचसं आयुष्य ग्रामीण भागात गेल्यामुळे असेल, पण हा वास मला ग्रामीण भारताची ओळख वाटतो. रात्री प्रचंड बोचरा वारा सुटलेला होता. या ठिकाणी आमचा सहा दिवसांचा सायकलप्रवास संपला.

किब्बर ते लोसार असा प्रवास आम्ही गाडीतून केला. हा पूर्ण प्रवास चंद्रा नदीच्या खोऱ्यातून, तर कधी पात्रातून, थेट पाण्यातूनच होतो. आजूबाजूला ग्लेशिअर्स असतात आणि वातावरणात प्रचंड शुष्कपणा असतो. हा पूर्ण रस्ता धुळीचा आहे आणि आपलं शरीर धुळीने माखून जातं. हा प्रवास फार पहाटे सुरू करावा लागतो. ऊन जसजसं वाढायला लागतं, तसतसे ग्लेशिअर्स वितळायला लागतात आणि त्याचं पाणी धबधब्यासारखं रस्त्यावर यायला सुरुवात होते.

चंद्रा नदीतून जाणारा रस्ता
चंद्रा नदीतून जाणारा रस्ता

त्यामुळे कित्येकदा हे रस्ते २४ तासांसाठी बंद होतात आणि पर्यटक घाटातच अडकून पडतात. त्यामुळे किब्बर सोडायला जरा उशीर झाला, तर तुम्ही घाटातच अडकून पडण्याची शक्यता असते. हा पूर्ण रस्ता घाटाचा आणि दगडगोट्यांचा. कित्येक ठिकाणी रस्त्यांवर नदीसारखं पाणी वाहत असतं आणि त्यातून गाडी पार करणं हे अतिशय कौशल्याचं काम. या घाट बंद पडण्याच्या भीतीमुळे परतीच्या प्रवासात तुम्हांला एक दिवस जादाचा ठेवावा लागतो, अन्यथा पुढच्या प्रवासाच्या नियोजनात गडबड व्हायची शक्यता असते. हा सर्व घाट उतरण्याचा अनुभव हा हिमालयाचं सौंदर्य अनुभवण्याचा प्रकार असतो.

हिमालयातील लँडस्केप
हिमालयातील लँडस्केप

आजूबाजूला ग्लेशिअर्स; जांभळ्या, निळ्या, पिवळ्या, केशरी रंगाची रानफुलं उगवलेली असतात. त्यांतून ठिकठिकाणी छोटे-मोठे धबधबे वाहत असतात.

रानफुलं धबधबे धबधबा रानफुलं धबधबे धबधबा

हिमालयातील रानफुलं आणि त्यांतून वाहणारे स्वच्छ पाण्याचे धबधबे

धनगर आपल्या शेकडो मेंढ्यांसहित या व्हॅलीतून प्रवास करत असतात. घोडे आणि याक चरताना दिसतात. हा दिवसभराचा घाटरस्ता उतरून आम्ही सर्व मनालीजवळील पनगांह नावाच्या गावात पोहोचलो, जिथं एक दिवस आराम करण्यासाठी ठेवलेला होता. पण हे गाव इतकं सुंदर होतं, की आराम कसला करताय! दुसऱ्याच दिवशी आम्ही पायी चालत हे गाव फिरायचं ठरवलं.

पर्यटक ज्या शिमला-मनालीच्या आकर्षणामुळे येतात, ते शिमला-मनाली कमालीचं बदललंय. पण शिमला-मनाली १०० वर्षांपूर्वी कसं असेल हे पाहायचं असेल, तर पानगांहसारखी छोटी गावं फिरायला हवीत. गावात अतिशय शांतता होती कारण मोठ्या गाड्या ज्यांवरून जातील असे रस्तेच नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा सफरचंद, पेर, लिची, किवी, डाळींब, अलुबुखार या फळांच्या बागा होत्या. बागेतील झाडं अक्षरश: इतकी फळली होती, की फळांच्या वजनाने फांद्या तुटत होत्या. राखण करायला कोणीही नव्हतं आणि चालता चालता तुम्ही अगदी सहज ही फळं तोडून खाऊ शकता इतकी जवळ होती. झाडांखालीही गळून पडलेल्या फळांचा खच पडला होता.

नास्पतींनी लगडलेलं एक झाड
नास्पतींनी लगडलेलं एक झाड

उत्पादन प्रमाणाबाहेर आहे हे लक्षात आल्यावर आम्ही या फळांवर ताव मारायला सुरुवात केली. फळमालकाची परवानगी घ्यावी म्हटलं तर तिथं चिटपाखरूही दिसत नव्हतं. अतिशय टुमदार अशा या गावात आमची ओळख झाली ती सोनम अंगरूप आणि त्यांची पत्नी बुद्धिदेवी अंगरूप यांच्याशी. वाटेत फिरताना त्यांचं अतिशय जुनं घर दिसलं आणि त्यांनी आम्हांला घर पाहायला बोलावलं. हे पूर्णपणे लाकडाचं घर जवळपास ७० वर्ष जुनं होतं. घराची रचना अतिशय सुंदर होती. स्वयंपाकघराच्या मधोमध एक मोठी चूल होती जिच्यामुळे थंडीच्या दिवसांत पूर्ण खोलीत उबदार वातावरण तयार होते. हीच रचना इतर खोल्यांमध्येही होती. सोनम यांनी आम्हाला बऱ्हास या फुलाचं सरबत प्यायला दिलं.

बुद्धिदेवी सोनम अंगरूप आणि त्यांनी दिलेलं बऱ्हास फुलाचं सरबत

बुद्धिदेवी यांचं व्यक्तिचित्र. सोनम अंगरूप आणि त्यांनी दिलेलं बऱ्हास फुलाचं सरबत

विलक्षण चव होती त्याची. बऱ्हास हे फुल हिमालयात उंचावर उगवतं आणि फार दुर्मीळही आहे. सोबत जर्दाळू (स्थानिक भाषेतील नाव खुमानी) खायला दिले. बुद्धिदेवी यांचं वय ८०च्या आसपास होतं आणि अजूनही त्या शेतात तासन्तास काम करतात. त्यांच्या सुनेशी आणि नातसुनेशीही ओळख झाली. त्यादेखील शेतीत मदत करतात आणि थंड वातावरणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज झळकत होतं. याच गावात गीतादेवी नेगी यांचीही ओळख झाली. त्या पट्टू बनवतात. पट्टू म्हणजे दुपट्ट्याचा एक प्रकार. फक्त जास्त उबदार. छोट्या हातमागावर तो बनवला जातो आणि उत्तम दर्जाच्या पट्टूची किंमत दहा हजारांपासून सुरू होते. इथं घरोघरी हे पट्टू बनवण्याचा उद्योग चालतो. या गावात मनसोक्त भटकंती करून आमचा दिवस सफल झाला. इथं आमचा प्रवास संपला आणि त्याच दिवशी रात्री आम्ही खूप साऱ्या आठवणी घेऊन चंदीगडसाठी रवाना झालो.

गीतादेवी नेगी पट्टू बनवण्याचा गृहउद्योग

गीतादेवी नेगी यांचं व्यक्तिचित्र आणि त्यांचा पट्टू बनवण्याचा गृहउद्योग

तर या सर्व प्रवासाने खूप काही शिकवलं. निसर्गाकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. जबाबदारीची जाणीव करून दिली आणि स्पीती व्हॅलीबद्दल जे जबर रोमँटिसिझम असतात ते मोडून टाकले. गेल्या काही वर्षांत स्पीतीमध्ये जो पर्यटकांचा ओघ वाढतोय त्यामागे निसर्गाबद्दलचा रोमँटिक दृष्टीकोन खूप कारणीभूत आहे. बरेचदा आपण निसर्गाच्या ताकदीला कमी लेखत असतो. स्पीतीबद्दलही तेच आहे. स्पीती व्हॅलीमधली टूर म्हणजे बुलेट उडवत जाणं, भव्य लँडस्केपचे फोटो काढणं आणि सोशल मिडियावर फोटो टाकून कौतुक करून घेणं, असा प्रकार झाला आहे. या सर्व प्रकाराला आजच्या भाषेत Expedition असं एक गोंडस नाव आहे. या सर्व प्रकाराचे स्पीतीवर काही बरेवाईट परिणाम होत आहेत. काही परिणाम सामाजिक, आर्थिक आहेत तर काही पर्यावरण आणि शाश्वत विकासाबद्दलचे आहेत. स्पीती व्हॅलीला ओरबाडणं चालू आहे. आणि हे करण्यात सर्वजण पुढे आहेत. उदाहरणच द्यायचं, तर आज कित्येक उत्पादनांच्या जाहिरातींत स्पीती व्हॅलीच्या लँडस्केपचा वापर केला जातो. एखादी दुचाकी किंवा चारचाकी कशी स्पीतीच्या खडतर रस्त्यांवरून वेगाने पळत जाते याचं चित्रण कित्येक जाहिरातींमध्ये केलेलं पाहायला मिळतं. या सर्व प्रकारामुळे पर्यटकांचा जो ओघ व्हॅलीत वाढलाय त्याची किंमत व्हॅलीतील संस्कृतीला आणि निसर्गाला चुकती करावी लागत आहे.

पर्यटन प्लास्टिक अर्जुन अर्जुन

पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या दरीतून काढून विकणारा अर्जुन

आज पर्यटनामुळे कमी कष्टांत पैसा येतोय त्यामुळे स्थानिक तरुण पिढी कष्टाची कामं करत नाही. इथं तरुण मुलं शेतात राबताना दिसत नाहीत. यातूनच व्यसनाधीनता वाढत आहे. रस्त्यात एका दहावीतल्या मुलाशी माझी ओळख झाली. त्यानं माझं नाव विचारून मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेश्ट पाठवली. जेव्हा मी त्याचं प्रोफाईल पिक्चर पाहिलं तेव्हा त्यात लिहीलं होतं, की 'लडकी पटे तो हीर-रांझा, नही तो चरस गांजा'. चरस आणि गांजा हे इथं इतक्या बिनधास्तपणे बोलायचे शब्द आहेत, की सोळा वर्षांचा मुलगाही ते सार्वजनिकरीत्या लिहू शकतो. गांजा हा इतका सहज उपबब्ध असू शकतो हे मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. जिकडे जाल तिकडे रस्त्याच्या दुतर्फा गांजाची पैदास दिसते. तोच प्रकार दारूचा आहे. फळांचं उत्पन्न प्रचंड असल्यामुळे सडलेल्या आणि गळून पडलेल्या फळांपासून दारू बनवली जाते. ही स्वस्त आणि सहज उबलब्ध असल्यामुळे ती सर्वत्र सर्रास दिसते.

या पर्यटकांच्या ओघामुळे व्हॅलीतल्या संसाधनांवर अतिरिक्त भार येतोय. त्यामुळे रस्ते रूंद करणं आणि वाढत्या संख्येतल्या पर्यटकांसाठी रहाण्याची सोय करणं हे ओघाने आलंच.

स्थलांतरित कामगार स्थलांतरित कामगार
स्थलांतरित कामगार स्थलांतरित कामगार

रस्तारुंदीकरणासाठी काम करणार्‍या स्थलांतरित कामगारांचं आयुष्य.

मुळात इथं लोकसंख्या कमी आहे. कित्येक गावं ही ३० ते ५० लोकांचीच आहेत. स्थानिक लोकं कष्टाची कामं करण्यात फार पुढे नाहीत. दिवसभर राबण्यापेक्षा स्वतःच्या जमिनीत दोन चार तंबू टाकून पर्यंटकांची राहायची व्यवस्था केली तरी चांगलं उत्पन्न मिळतं. किंवा एखादं हॉटेलही चालून जातं. एका गावात फार विचित्र अनुभव आला. एका टपरीवजा हॉटेलमध्ये आम्ही तीनचार मित्र शिरलो आणि मॅगी मिळेल का विचारलं. तर यावर हॉटेलमालक भडकला. म्हणाला, "हा कॅफे आहे आणि तुम्हाला मॅगी हवी असेल तर इथून बाहेर पडा आणि ढाबा शोधा. तुम्हांला ढाबा आणि कॅफे यांतला फरक कळत नाही का?" खरंतर त्या हॉटेल मालकाने कॅफे कधी पाहिलाही नसेल. परदेशी पर्यटकांचा लोंढा इथं आहे त्यामुळे भारतीय पर्यटकांशी असं तुच्छतेनं वागलं गेलं असेल. त्याचबरोबर विदेशी पर्यटकांना इतर अमली पदार्थ पुरवून चांगले पैसे मिळतात. या सर्व प्रकारामुळे कष्टाची कामं तरुण पिढी फार करत नाही. त्यामुळे अंगमेहनतीच्या कामासाठी लागणारे मजूर नेपाळ, झारखंड, यूपी-बिहार या भागांतून येतात. कित्येक बायका आपल्या चिमुरड्यांना पाठीशी बांधून दगड फोडायचं काम करत असतात.

दगड फोडणारे कामगार आणि बाजूला खेळणारी त्यांची मुलं
दगड फोडणारे कामगार आणि बाजूला खेळणारी त्यांची मुलं. त्यांच्या डोक्यांवर दगड पडू नये म्हणून केलेला पत्र्याचा आडोसा

लहान मुलं आजूबाजूला खेळत असतात आणि त्यांच्या डोक्यावर दगड पडण्याचा धोका असतो; पण पर्याय नसतो. मुलं चार-पाच वर्षांची होईपर्यंत आईवडिलांसोबत रस्त्याच्या कडेला जगतात आणि एकदा का शाळेत जायला लागली, की मग गावात आपल्या आजीआजोबांसोबत रहातात. आईवडील मुलांना गावी ठेवून इथं काम करत असतात आणि मुलांपासून तुटल्यामुळे त्यांना ज्या मानसिक अवस्थेतून जावं लागत असेल त्याचा विचारही करवत नाही. झारखंडवरून कामासाठी आलेली सितादेवी फावल्या वेळात तिच्या मुलासाठी स्वेटर विणत होती ते पाहून मला गलबलूनच आलं.

गावी असलेल्या मुलासाठी स्वेटर विणणारी झारखंडची सीतादेवी. मुलांना सोबत घेऊन काम करणार्‍या काही स्त्रिया.

या स्पीती सफरीला जाण्यापूर्वी मी इंटरनेटवर काही मुलाखती पहात होतो. त्यावेळी मला लडाखमध्ये राहून शिक्षणात मोठं काम करणाऱ्या सोनम वांगचुक यांची एक मुलाखत सापडली. सोनम वांगचुक म्हणल्यावर बरेच जणांना कोण हे आठवणार नाही पण 'थ्री एडियट्स' या सिनेमातील फुन्सुक वांगडू हे पात्र लगेच आठवेल. असं म्हटलं गेलं, की सिनेमातील हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावरून घेतलंय. पण सत्य परिस्थिती फार वेगळी होती. सोनम वांगचुक यांना मिळालेल्या एका पुरस्कार सोहळ्याला आमीर खान उपस्थित होता. त्यावेळी भाषन करताना सोनम यांनी सियाचीन प्रश्न सोडवून त्यावर होणारा खर्च सरकारने लडांखच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे असं मत मांडलं. आणि या प्रश्नावर सिनेमाच्या माध्यमातून उजेड टाकता येईल असं आमीर खान यांना सुचवलं. परंतु प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच. आमीर खान यांनी फक्त सोनम यांचं पात्र उचललं व 'थ्री एडियटस्'सारखा धंदेवाईक सिनेमा बनवला. या सिनेमानंतर लडाखमध्ये पर्यटकांचा अक्षरशः पूर दिसू लागला. यामुळे लडाखमधील इको सिस्टमवर फार मोठे परिणाम झाले. आता काही जण असाही युक्तीवाद करतील, की वाढत्या पर्यटनामुळे ल़डाखमध्ये विकास झाला असेलच की! परंतु विकास आणि शाश्वत विकास यांत फार मोठा फरक आहे. आज दिवसागणिक लडाखमध्ये प्लास्टिकच्या लाखो बाटल्या आणि इतर स्वरूपात प्लास्टीक जाऊन पडतंय. वाढत्या संख्येतल्या पर्यटकांसाठी लागणारं पाणी, अन्न निर्मितीचा आणि आयातीचाही भार आहेच. सैन्यतळ असल्यामुळे आणि चीनची सीमा जवळ असल्यामुळे इथे रस्ते चांगले आहेत. स्पीतीचे रस्ते त्यामानाने खडतर. परंतु आता स्पीतीतही रस्ते चांगले होऊ लागलेत. त्यामुळे जे चित्र लडाखमध्ये दिसतय ते स्पीतीत दिसायला फार काळ जावा लागणार नाही.

पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे पर्यावरणावरही जटिल परिणाम होत आहेत. वाढती वाहनं जास्त कार्बन डायऑक्साइड सोडतात आणि इथं झाडं कमी असल्यामुळे त्याचा परिणाम थेट तापमान वाढण्यात होतो. गेल्या काही वर्षांमध्ये ग्लेशिअर्स झपाट्याने वितळत आहेत हे स्थानिकांच्या नजरेतून सुटत नाही. वाढत्या पर्यटकांसाठी हॉटेल्सची मागणीही वाढत आहे.

इथल्या ग्रामीण भागात सोप्पीटचे संडास आहेत. म्हणजे संडासाच्या खोलीत एक चौकोनी खड्डा असतो. मलविसर्जन झालं, की पाण्याऐवजी टॉयलेट पेपर वापरायचा आणि शेवटी खोलीतच शेजारी प्राण्यांचं शेण ठेवलेलं असतं ते खोऱ्याने ओढून त्या खड्यात टाकायचं. यामुळे मानवी मलावर एक शेणाचा थर साठतो. या सगळ्याचा उपयोग नंतर शेतीत खत म्हणून केला जातो. पाण्याचीही बचत होते. या भागात झाडं नसल्यामुळे लाकूड फार दुर्मीळ आहे आणि दुरून आणावं लागतं. पण पर्यटक या गोष्टी स्वीकारतील असं नाही. पर्यायाने त्यांच्यासाठी कमोड पद्धतीचे संडास बांधावे लागतात आणि पाणी उपलब्ध करून द्यावं लागतं. याचा परिणाम म्हणजे पर्यावरणावरचा भार वाढतो. हाच प्रकार कमीअधिक प्रकारे सर्व गोष्टींमध्ये होत असतो.

हा सर्व प्रवास गाडीने करण्यात आणि सायकलने करण्यात जमीनआस्मानाचा फरक आहे हे नक्की. या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सायकलमुळे प्रवासाचा वेग मंदावतो आणि निसर्गाचा खूप सखोल आनंद घेता येतो हे नक्की. स्थानिक लोकांनाही सायकलवरून स्पीती फिरणार्‍यांबद्दल जास्तीचा आदर आहे हे जाणवतं. कारण सायकलने प्रवास करणारे व्हॅलीतल्या शांततेवर अतिक्रमण करत नाहीत आणि निसर्गाचंही रक्षण होतं. परंतु जर सायकलने स्पीतीवारी करायची असेल तर शारीरिक फिटनेस उत्तम असणं गरजेचं आहे. हवेत ऑक्सिजन विरळ असल्यामुळे आणि वातावरण सातत्यानं बदलत असल्यामुळे फिटनेस गरजेचाच. त्यामुळे तुम्हाला जर अशी सफर करायची असेल तर योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं.

या लेखाच्या शेवटी अँडी गोल्डवर्थी या माझ्या आवडत्या कलाकाराचं एक उद्धृत मला द्यावंसं वाटतंय. "We often forget that we are nature. Nature is not something separate from us. So when we say that we have lost our connection to nature, we have lost our connection to ourselves." मला वाटतं निसर्ग आणि माणसाचं काय नातं आहे हे इतक्या सपष्टपणे कुणीच मांडलेलं नाही. आणि सायकलने केलेल्या या स्पीतीवारीमुळे मला स्वतःचं शरीर आणि निसर्ग यांचं नातं किती घट्ट आहे याची जाणीव झाली. आणि हेच या स्पीती-सायकलप्रवासाचं संचित आहे असं मला वाटतं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झकास !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0