लोकनाट्यातील विनोदाचे स्वरूप

संकल्पना

लोकनाट्यातील विनोदाचे स्वरूप

-

'लोकवाङ्‌मय' व 'लोककला' ही दोन वेगवेगळी अभ्यासक्षेत्रे असली तरी त्यांचे अनुबंध शोधणे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. लोकवाङ्‌मयात लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार यांचा समावेश प्रामुख्याने होतो. ही भाषासाहित्याची मूळची प्रभुत्व रूपे आहेत असे मी मानतो. एकीकडे ही मौखिक परंपरा विविध मानवी समूह जपण्याचं काम करत होते तर दुसरीकडे नाट्यकलेच्या रूपात लोकरंगभूमी 'लोकनाट्य' आकाराला येत होते. त्यातील 'कला' अभिनयाच्या माध्यमाबरोबर 'शब्द'रूपात, म्हणजे मौखिक स्वरूपाच्या संवादातून बहरत होती. लोकरंजन मौखिक स्वरूपाच्या संवादातून बहरत होते. लोकरंजन, लोक किंवा जनप्रबोधन हे शब्द अलिकडचे आहेत, मात्र करमणुकीसाठी, चार घटका आनंदासाठी लोकनाट्यातून लोकांचे 'मनोरंजन' होत होते. नीतीतत्त्वांचा बोध, आदर्शांची जाणीव करून देताना विनोदाच्या माध्यमातून लोकांच्या प्रवृत्तींवर, मर्मावर बोट ठेवणे व सद्विचारांची जाणीव जागृती करणे यासाठी लोककलाकारांनी उत्स्फूर्तपणे लोकनाट्यात 'विनोद' आणला असावा असे मला वाटते.

लोकनाट्यांच्या सादरीकरणात लेखक, दिग्दर्शक ही भानगडच नसते. त्यामुळे लोककलाकार परंपरेचा व पूर्वसुरींचा मागोवा घेत संवादातून विनोद आणतो. तो उत्स्फूर्त असतो. मात्र महाराष्ट्रीय किंवा मराठी लोकनाट्यात काही बाबतींत मौखिक परंपरा व काही ठिकाणी लोकनाट्यांची लिखित परंपरा निर्माण झाली. या शोधनिबंधातून महाराष्ट्रात सादर होणाऱ्या लोकनाट्यातील विनोदाचे स्वरूप शोधायचे आहे. शोधायचे म्हणजे काही महत्त्वाच्या लोककला-लोकनाट्यातील विनोदांचा परिचय, स्वरूप कसे असते याचा विचार मी करणार आहे.

महाराष्ट्रातील लोकनाट्य :

महाराष्ट्रात सादर होणारे लोकनाट्य हे 'विधीनाट्यातून - लोकनाट्य' अशी वाटचाल करून आजपर्यंत सादर होत आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात, तालुका पातळीवरच्या शहरांतही विविध सण-उत्सव व अन्य काही कारणांनी लोकनाट्य सादर होत असते. मध्ययुगात कधीतरी ही लोकनाट्ये प्राथमिक अवस्थेत असावीत; मात्र इसवी सन बाराव्या शतकानंतर महाराष्ट्रात लोककला-लोकनाट्य, चांगल्या स्वरूपांत आकारल्या आहेत. त्यांपैकी 'सोंग', 'दशावतार', 'लळित', 'भारूड', 'दंडार', 'तमाशा' अशा काही लोकनाट्यातून विनोद कशा स्वरूपात सादर होतो त्याची काही उदाहरणे येथे देतो.

लोककलांचा परिचय करून देणे हा या लेखाचा विषय नसल्याने मी फक्त महाराष्ट्रातील काही निवडक लोकनाट्यांतून विनोदाचे स्वरूप कसे असते, याची उदाहरणे देणार आहे.

'सोंग'लोककलेतील विनोद :

महाराष्ट्रात निवडक ठिकाणीच सादर होणारी 'सोंग' ही लोककला आहे. मध्ययुगीन मराठी साहित्यात तिचा संदर्भ आढळतो. मुकुंदराज यांच्या 'विवेकसिंधू' ग्रंथात - (सुमारे इसवी सन ११८८)
सोंग संपादिता तोखलेपण । नरासी दीजेती वस्त्रभूषणे ॥
तो सोंग लटिका परि ती भूषणे । नरासिची अर्पिती ॥५.२०॥
(५-१८-२१)(१)
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या ओवी-अभंगांतही 'सोंगा'चा उल्लेख येतो. मानवाच्या कल्याण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर 'सो आंगे' - शंभर सोंगांच्या रूपात - अवतरतो. तत्कालिक समाजात धार्मिक कार्यक्रमात सोंगे काढण्याची परंपरा होती. डॉ. मधुकर वाकोडे यांनी यादवपूर्व काळापासून विदर्भात 'सोंगीनाट्य' प्रकार अस्तित्वात असल्याचे स्पष्ट केले आहे(२). विदर्भ, मराठवाडा, कोकणात विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने देव-देवतांची सोंगे काढली जातात. होळी, पंचमी व अन्य लोककलांमध्ये 'सोंग' काढणे किंवा 'नाचवणे' हा प्रकार होता. सोंगकला पुणे जिल्ह्यातील राहू-पिंपळगाव, देलवडी, खामगाव, एकेरीवाडी या दौंड तालुक्यातील गावांतून आजही सादर केली जाते. ही लोककला सादर करण्यामागे मनोरंजन, विधी, समूहभक्ती, नीतीमूल्यांची जपणूक ही प्रयोजने आहेतच, पण ग्रामदेवतेविषयी श्रद्धाभाव प्रकट करणे हेही महत्त्वाचे प्रयोजन असते. मध्यरात्री 'सोंग' लोककला-सादरीकरणाला प्रारंभ होतो. 'नृत्य-संवाद' सादरीकरण यामुळे या कलेला 'नाट्यरूप' प्राप्त होते. प्रत्येक सोंग जेव्हा प्रवेश करते तेव्हा 'संपादली' म्हटली जाते. सूत्रधाराचे आगमन - गायन - वाद्यवादन - निवेदन - सोंगाचे संवाद - पद्यगायन - हा रचनाबंध प्रत्येक सोंगाच्या वेळी असतो. राहू-पिंपळगावात दोन्ही बाजूंनी सोंगाचे आगमन-निर्गमन होते. पाटील, पोतदार, भालदार, पोतराज, गणपती, शारदा, श्रीकृष्ण, भवानी, शंकर यांशिवाय आख्यानानुसार पाचपांडव, खंडोबा, ऐतिहासिक पात्रे ही 'सोंग' लोककला-नाट्यात सादर होतात. या सोंग लोकनाट्यावर बोरी पारधी (केडगांव-दौंड) येथील विठ्ठल सोडनवर यांनी संशोधन केले आहे.

'सोंग' लोकाविष्कारातील विनोद :

पाटील
'सोंग' लोककला नाट्य-संवाद-नृत्य रुपात सादर होताना मनोरंजन केले जाते. सूत्रधार-पाटील यांच्या प्रश्नोत्तरात विनोदी बोलणे होते. काही प्रमाणात ग्राम्य-अश्लील संवादही होतात. त्यातून विनोदनिर्मिती होते. संवादातील उत्स्फूर्तपणा व हजरजबाबीपणा यातून होणारा विनोद त्या-त्या सोंग सादर करणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार असतो. सामाजिक घडामोडी, गावातील एखादी घटना किंवा राजकारण यावर विनोदी पद्धतीने संवाद होतो. ब्राह्मण, सावकार, राजकीय नेते यांच्या स्वार्थी वृत्ती-प्रवृत्तीवर विनोदी भाष्य केले जाते. शिक्षक, वकील, डॉक्टर यांच्यावरही टीकात्मक संवाद होतात ते 'हास्य' निर्माण करतात. एखादे पात्र 'रामराम' म्हणते. तेव्हा 'लाग-लाग' असे समोरचे पात्र म्हणते त्यातून हास्य निर्माण होते.
(वाढीव नोंद : ‘लाग लाग’ यात जुना, अशिष्ट विनोद आहे. यातील व असे विनोद सादरीकरण पाहाताना समजतात.)

पाटील - अरे तुझ्या गावात भाट आला आहे, लौकर ये!
गावभाट - भात आले आहे तर गडी लावून भरडून टाक.

पौराणिक देव-देवता हा सामान्य लोकांच्या आस्थेचा विषय असतो. पण प्रेक्षक म्हणून पार्वती-शंकर नि भस्मासूराचा पुढील संवाद विनोद म्हणून स्वीकारला जातो.
महादेव - अगं ये पार्वती, भस्मासूर येतोय पण त्याचे चालणे वेगळे वाटतेय!
भस्मासूर - महादेवा, तू मला वर दिलास पण मी आज तुझेच भस्म करणार! (पार्वतीकडे वाकड्या नजरेने पाहतो.)
पार्वती - अरे मूर्खा, ज्यांनी तुला वर दिला, निर्माण केला, त्यांचेच भस्म करायला निघालास!
भस्मासूर - पार्वती... तू चूप बैस. बोलून-चालून मी दानव… तुझी लालसा मनात आलीया.
पार्वती - मूर्ख राक्षसा, तुझा निर्माता पित्यासमान, मी मातेसमान असताना असा घाणेरडा विचार करतोस. थांब तुझा काळ जवळ आला आहे.

येथे पात्रे जरी पौराणिक देव-देवता-दानव असली तरी त्यांची भाषा लौकिक पात्रांच्या तोंडी असते तशी वापरली जाते. कामांध पुरुष स्त्रीकडे समाजजीवनात कसे पहातो तसेच भस्मासुराचे वर्तन-बोलणे असते. ज्याने उपकार केले त्यांच्या पत्नीकडेही काही माणसे 'वाईट' नजरेने पहातात व समोरच्या प्रेक्षकांचाही तो अनुभव असतो. या प्रसंगात बोलताना विनोद होतो पण त्यात वास्तव समोर येते त्यामुळे प्रेक्षक अंतर्मुख होतो. 'सोंग' कलेत संपादणी गाण्याच्या स्वरूपात सादर होते. क्वचित प्रसंगी त्यातूनही भारुडाप्रमाणे विनोदनिर्मिती होत असते.

दशावतार

सोंग या लोककला-नाट्य-नृत्य प्रकारात धार्मिक प्रेरणा प्रबळ असली तरी समाजरंजन करणे हा हेतू विनोदातून साधला जातो, कारण या काळात शेतीच्या कामात थोडी उसंत असते. त्यामुळे सामान्य माणसांच्या मनोरंजनाची भूक 'सोंग' कलेतून पूर्ण होते असे श्री. विठ्ठल सोडनवर यांनीही म्हटले आहे.

अलीकडे प्रगत समाज वेगवेगळ्या माध्यमांतून आपला निषेध व्यक्त करतो. मध्ययुगात 'लोकभावना' व्यक्त करण्याची पारंपरिक माध्यमे म्हणजे अशा लोककला-लोकनाट्य! समाजप्रबोधन नीतीतत्त्वाचे मार्गदर्शन करताना विनोदाची हळुवार पखरण करीत, या कलांनी जनमानसांचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्याचे प्रयत्न या लोककलांतील विनोदनिर्मितीतून केले गेले असे माझे स्पष्ट मत आहे.

'लळित' लोकनाट्यातील विनोद :

'सोंग' ही अगदी प्रारंभीची नाट्याविष्काराची पायरी होती. हळूहळू 'सोंगीभारुडे' सादर होऊ लागली. त्यातूनच 'लळित' कलाविष्कार निर्माण झाला. 'लळित' हा नाट्याविष्कार म्हणजे 'सोंग'कलेचा पुढील टप्पा आहे. जिज्ञासूंनी या संदर्भात माझे 'मराठी लोकनाट्य लळित' हा संशोधनपर ग्रंथ अवश्य वाचावा.

'लळित' म्हणजे लीलानाट्य. वेदान्ताचा उपदेश सर्वसामान्यांना समजावा, लोकांची करमणूक व्हावी, प्रबोधन व्हावे हे हेतू 'लळित' सादरीकरणामागे आहेत. लळितात काही ठिकाणी दशावताराची सोंगे आणली जातात. कीर्तनानंतर उत्सवात लळित सादर करण्याची परंपरा मध्ययुगात सुरू झाली. सुलभ विश्वकोशकारांनी म्हटले आहे की, 'ईश्‍वरभक्तीस्तव जी सहा दर्शने व छत्तीस पाखंडे निर्माण झाली त्यांची फोड करून जे ईश्वरप्राप्तीसाठी खटपट करतात, त्यांजवर ईश्वराने प्रसाद करावा, असे लळितरूप नाटक केले जाते व प्रार्थना केली जाते.'

लळित आजच्या काळात देवतेच्या उत्सवातच पाहायला मिळते. 'उत्सवाच्या शेवटी करावयाचा प्रसंग किंवा नाटक म्हणजे लळित.' लीला म्हणजे आठवणी या शब्दावरून लळित म्हणजे खेळ असा शब्द होतो. काही ठिकाणी 'कृष्णलीलांचे वर्णन करणारे ते लळित' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात नवरात्र, रामनवमीच्या उत्सवात शेवटच्या दिवशी शेवटचे मंगलगान म्हणजे 'लळिताचे कीर्तन' होते. कीर्तनकाराने केलेला वेदान्ताचा उपदेश 'लळितकार' नाट्य-संवाद रूपात सादर करतात.

लळित
लळितकला महाराष्ट्रभर आजही सादर केली जाते मात्र अन्य लोकनाट्यांप्रमाणे या कलेची फारशी चर्चा नसते. आजच्या काळात संप्रदाय, पंथीच परंपरा म्हणून लळित कला सादर होते. आंबेजोगाई, अंबड, देऊळगावराजा, खोंडामळी, कोकणातील राजापूर, रत्नागिरी परिसरात एवढेच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील उंब्रज, नारायणगांव, दौंड, शिरूर परिसरात 'लळित' लोककला दरवर्षी सादर केली जाते.

लळित आणि विनोद :

खरे तर प्रतीके, लोककला-लोकनाट्य व विनोद हा स्वतंत्र अभ्यासाचा दीर्घलेखाचा विषय आहे. येथे फक्त काही उदाहरणे देऊन व सोंगानंतर लळित लोककला-नाट्यातील विनोदाचे स्वरूप कसे असते ते थोडक्यात सांगतो.

लळिताचा रचनात्मक बंध पाहिला तर लळित नाट्य 'पदाश्रयी' व 'कीर्तनाश्रयी' आहे. तसेच ते 'आख्यानाश्रयी'पण आहे. सूत्रधार लोकमंचावर आल्यावर - धृपद, गणेशस्तवन, सूत्रधार-विदूषक प्रवेश, पदगायन, भारूड, सोंगांचे आगमन - नृत्य - अभिनय - संवाद - व शेवटी आरती प्रसाद' असे लळित म्हणजे शेवटचे 'मंगलगान'चे स्वरूप आहे. प्रांत व परंपरेनुसार काही बदल आहेत. ते येथे देण्याचे कारण नाही. वाचकांना 'लळित' लोककला-नाट्यांचा रूपबंध वरील वर्णनावरून ध्यानी येईल. यात जेव्हा विविध पात्रे मंचावर येतात. त्यात लौकिक पात्राचा भरणा अधिक असतो. व या पात्रांच्या मुखातूनच विनोदनिर्मिती करणारे संवाद उत्स्फूर्तपणे काही वेळेला 'लळित संहितेनुसार' सादर होतात.

लळित
लळिताच्या सादरीकरणातूनही विनोद-करमणूक होते. सोंगे जेव्हा रंगपीठाकडे येतात तेव्हा 'ब्रह्मोजी राजा, ब्रम्हो' असे म्हणत येतात. गावभाटाचे आगमन उड्या मारीत मारीत होते. 'टरकोजी राजा टरको' अशी आरोळी ते देते. अंबड येथील रामानंद स्वामीच्या मठात जे लळित होते त्याचा अभ्यास डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. संजय देशमुख यांनी केला आहे. लळितातील सोंगाची वेशभूषा, पायजमा, अंगरखे, पागोटे चित्र-विचित्र पद्धतीचे असतात. त्यांना पाहूनच हास्य निर्माण होते. या प्रसंगी जी पदे म्हटली जातात त्यांत अभिजनांवर टीका करणे, त्यांचे व्यंग उघड करणे हे तत्त्व असते. लळिताच्या सादरीकरणात अश्लील शब्दरचनाही केली जाते. वेडा वाघ्या, गावभाट, भांड ही सोंगे रंगपीठावर अश्लील हावभाव करतात. 'उठाऊ सद्बोध लांड, मारू कालकी गांड, अशा ओळी येतात पण यातून ध्वनित होणारा अर्थ अश्लील नसतो, त्यामुळे प्रेक्षक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.

पाटील आणि गावभाट यांच्यातील संवाद पाहा.
पाटील - अरे, तुझी गडबड पुरे झाली. लवकर चल. वेळ होतो.
गावभाट - अरे बाबा, घाई का करतोस? मी आणि बायको यांचे जे नेमधर्म ते केल्याशिवाय कुठे जात नाही.
पाटील - कसले रे तुझ्या बायकोचे नेमधर्म?
गावभाट - नाना माझ्या बायकोचे नेमधर्म काय सांगू?
ती उठली की सुटली केली आंघोळी
आंघोळी केली की चालली आली की जेवली.
जेवली की लागलीच देवपूजा करते.
देवपूजा केली की दात घासते. मग कपाळाला काजळ घालते की सजली डोळ्यात कुंकू तसे मलाही चांगली पगडी घालून भाटापुढे जायला हवे.

पाटील आणि बहिरा, पाटील नि काशी कापडी, पाटील व चाटे शिंपी यांचे संवाद लळितात विनोदी वातावरण निर्माण करतात. कसे ते पाहू.
पाटील - तुम्ही कोण?
चाटे - आम्ही शिंपी चाटे.
पाटील - बगलेत काय?
चाटे - गाठोडे.
पाटील - त्यात काय आहे?
चाटे - जरतारी पांघरूणे.
पाटील - दाखव.
चाटे - घ्या किंवा नका घेऊ पण पाहिल्याचे मोल देणे (गाठोडे सोडतो)
ह्या सखुचा पातळ
ह्या पोरांचा आंगडा
ही घ्या पोराची कानटोपी
ही घ्या सोन्याची कुंची
ही पैठणी साडी नि नागपूरी जोडा
ही चंदेरी पगडी
सखुचो संसार व्होयो तेना घेवचो
नको तेना ठेवचो
सखुचो पोलको व्होयो तेना घेवचो
नको तेना ठेवचो
सखुची कुडी व्होई तेना घेवची
नको तेना ठेवची
अशी लांबड लावतो त्यांच्या बडबडीने, विनोदाने करमणूक होते. जोशीबुवा भविष्य कथनाला येतात. त्यांचे भविष्य पाहा.

चुलीला आग लागेल
पाटा-वरवंटा भांडेल
उखळात मुसळ पडेल
घरात विड्या दारात शिड्या
बायका विड्या ओढतील
हतेर्‍यात माडू जेवणात लाडू
शेजारी साडू तुटकी वहाण
जावई लहान नसावा

पुढे पाटलाला जोशी भविष्य सांगतो ते ही रंजन करते.
जोशी सांगतो -
मागच्या आळीत जेवायला जाऊ नको
अरे नाना तुझ्या सेवेकरता निधी बटकी असतील, पण त्यापैकी एक तुझ्या गळ्यात पडेल.
पाटील - ती कशी असते?
जोशी - ती असेल काळ्या दातांची
बाबर्‍या ओठांची
चिपड्या डोळ्याची
मडक्या एवढ्या डोक्याची
घागरी एवढ्या पोटाची
पायात पेंगडी
कंबरेत कुबडी...

या अतिशयोक्तीपूर्ण विनोदातून वाईट गोष्टींच्या संगतीला जाऊ नको असे लळितकार सांगतात.

पूजा करणारा ब्राम्हण - मंत्र म्हणताना म्हणतो 'अथश्री काफर्ड साहेब वार्षिक समारंभस्य. इंग्लिश यॅस फॅस अवतारस्य, आद्य शके १०२, सालपट साहेब मान संवत्सरे, उर्ध्व याने फुटका नेत्र, शुक्राचार्य म्हणजे शुक्रवार मासे, बोंब मारणे. आजच्या दिवशी सोट्या म्हसोबाची पूजा करावी म्हणजे निसंतान, तळपट, सत्यानाश याची प्राप्ती अनायासे होईल. तिथी हगवण - गुरू - पोटशूळ स्वामी - मृत्यू, वाहन तिरडी, भूमी - स्मशान, भक्ष - लाकडे. फल - नरक प्राप्ती.

या विनोदी पद्धतीच्या भविष्य कथनातील कर्मकांड, पूजाकर्मे यांची खिल्ली उडवली आहे. भटजी पूजा सांगतो. त्यातूनही देवदेवतांच्या पूजाविधीमधील फोलपणा लळितकार लोकांसमोर ठेवत होते.
ही संहिता सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची आहे. यावरून लोकनाट्यांतून समाजाला प्रबोधन करण्याचा हेतू स्पष्टपणे दिसतो.
पाटलाला भटजी पूजा सांगतो -
अहो यजमान, दक्षिणेला फुटकी कवडी ठेवा,
तांबुलावर कुजकी सुपारी
अक्षतेसाठी वाटाणे!
चंदन डांबराचे!
पुष्पार्थे आग्या बोंडाचा पुष्पे समरपयामी
दीपार्थे पासलेट, फुटके टमरेल समरपयामी
नंतर देवाची आरती न करता तो उंदीरमामाची आरती करतो.

मनुष्याने अतिरेकी स्वरूपात धर्माच्या नावाखाली अवडंबर माजवू नये. कर्मकांडावर लळितकार टीका करतात वरील संवादातून विनोद निर्माण होतो हास्य निर्माण होते. पण लौकिक जीवनाचे महत्त्व खुळचट कल्पना, प्रार्थना यात समाजाने अडकू नये असे लळितातून सांगितले आहे.
विस्तार भयास्तव येथे लळितातील विनोदाचे स्वरूप पुरे करूया. यानंतर कोकणातील दशावतार लोकनाट्यात त्यातील विनोदाचा सारांश सांगतो.

दशावतार लोकनाट्य :

'बटबट्या डोळ्यांचो, फटफट्या कानांचो
ह्यो बघ सोनयाळ्यो
झील जालो तो बघ ह्यो बघ खट्याळ्यो
झील जालो तोरे बा ह्यो बघ सोंड्याळो
वरसून दिस्ता बरो वायट तुज्या खायलो.'
नाईक - भटजी महाराज वायट तुजो खायलो म्हणजे काय?
भटजी - नायकानू 'वायट तुजो खायलो' याचा भावार्थ असा की गणपतीचा वाहन उंदीर त्याका म्हटला जाता. कारण काय तर तो वाळत घातलेले कपडे खाता.
नाईक - अहो भटजी महाराज आता उंदीर रागवला, त्याचे सांत्वन करा.
भटजी - आता एक आरती म्हणतय...
जयदेव जयदेव जय उंदीर मामा
गाडग्या मडक्यावरती काय तुजी मजा
मध्यानराती पडली बोक्याची गाठ
संकट निवारी गजानन मोरया
आता माजी पूजा जाली नेवैद्य जालो, आरती आटापली. आता एक बरी आटवन यिली. आवशीबापाशीन नवास केल्यान माका झील जालो तर फुगडी घालीन म्हणान. आता तो नवस तेतुरल्या तेतुर फेडून घेतय. (भटजी फुगडी घालतो.) पाटल्याचे दाराचे फुडल्याक नळे
मेल्ल्या मड्याक गाव काडता गळे
नाईक - अहो भटजी, ही बायकांच्या फुगडीसारखी लाजत मुरडत घातलेली फुगडी चालत नाही. जरा देवाची फुगडी घाला.
भटजी - मिया आतां भुतूर देवाच्या समोर एका पायावरची तांब्यावरची फुगडी घालतय आनि नवास फेडून घेतय.
नाईक - पद म्हणतो - (गणपती नाचतो) पद.

मालवणी मुलखातील दशावतार : सादरीकरण

मालवणी मुलखात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दशावतार सादर केला जातो. प्रत्येक गावात जत्रेच्या निमित्ताने जे दशावतारी नाटक होते त्यात 'विधी नाट्याचा' भाग असतो आणि जत्रेचा हंगाम संपल्यानंतरही हौसेखातर गावकरी मंडळी एखाद्या 'खास' नाट्य मंडळाचा प्रयोग करवून घेतात. त्यात फक्त गणेश आगमन, नाट्याशीर्वाद आणि थेट आख्याननाट्याला सुरुवात होते. या प्रकारच्या निमंत्रण देऊन केलेल्या नाटकात 'आडदशावतार' असतो आणि हा प्रयोग देवळातच होतो असे नाही तो चौकात किंवा सोयीच्या ठिकाणी सादर होतो.

जत्रेतील दशावतार : (धयकाला) - मंचीय आविष्कार

जत्रेतील दशावताराचे जे सादरीकरण होते त्याचे दोन भाग पाडता येतील. एक पूर्वरंग म्हणजेच त्याला 'आडदशावतार' म्हटले जाते व दोन 'उत्तररंग' म्हणजेच आख्याननाटक. त्यालाच 'भाग' असे म्हटले जाते.

रात्री सभामंडपात गर्दीने तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांसमोर उत्सवदेवतेकडे तोंड करून दशावतार रंगमंच सिद्ध होतो. त्यासाठी कोणतेही नेपथ्य नसते. तबला, मृदुंग, चाकी वादकासाठी लाकडी बाक (चोपाळा) ठेवला जातो. त्यावर आवश्यकतेनुसार नाटकातील पात्रे बसतात. शेजारी पायपेटी वादकासाठी खुर्ची ठेवलेली असते. सुमारे १०x१० एवढीच जागा सोडून लहान मुले बसलेली असतात. त्यानंतर स्त्रिया बसतात. मंचाच्या मागे व मंदिराभोवती पुरुषमंडळी बसून किंवा रात्रभर उभे राहून दशावतारी नाटक पाहतात. सर्वसाधारणपणे 'आडदशावतार' पुढीलप्रमाणे सादर होतो.

गणपतीचे रिद्धी वा सिद्धीसह आगमन - पूजा करणार्‍या भटजीचे आगमन - गणेशाचे निगर्मन सरस्वती-आवाहन (पदातून) सरस्वतीचे लाकडी मोर कमरेजवळ एका हाताने धरून केलेले नृत्य-आशीर्वाद ब्रह्मदेव-संकासून - संकासूराकडून वेद हरण - विष्णूचे आगमन - विष्णूला ब्रह्मदेवाच्या हातातील वेद संकासूराने हरण केल्याची माहिती सूत्रधार देतो. विष्णू 'सप्तपातालात जाऊन तुझे वेद तुला परत आणून देतो.' असे वचन देतो. त्यानंतर संकासूराशी विष्णू युद्ध करतो. संकासूराचा वध करून वेद मिळवतो. विष्णू मंगल आशीर्वाद देतो. येथे 'आडदशावतार' संपतो.

'आडदशावतारा'तले काही संवाद

मालवणी मुलुखात या पूर्वरंगाला काही ठिकाणी 'संकासूर आख्यान' असेही म्हणतात. हे आख्यान सर्वच दशावतार नाटकांत जवळजवळ सारखेच असते.

दशावताराची सुरुवात गणपतीच्या नमनाने होते. गजाननाच्या प्रवेशानंतर भटजीचे आगमन होते. पूजा करताना त्याचे बोलणे स्थानिक भाषेतील व विनोदी ढंगाचे असते. रंगमंचावर गणपतीच्या प्रवेशापूर्वी पडदा (चादर) धरली जाते.
भटजीचा प्रवेश - मोरया मोरया वर या वर असे म्हणत येतो.
नाईक - अहो भटजी महाराज, मोरया मोरया हे नामस्मरण झालं. तर वर या वर याचा भावार्थ काय?
भटजी - आयकलांत नायकानु, या संसारात तरून जाण्यासाठी ओर या ओर या असां म्हणतय. हॅ गणपती पूजन आसा नां ता करुक ईलय.
नाईक - मग वाट कसली पाहतां पूजेला सुरुवात करा. अहो भटजी हे काय करताय?
भटजी - तळी बघतय तळी.
नाईक - अहो या ठिकाणी देवाची तळी नजीक आहे.
भटजी - नायकांनु, हयसर मोठी यात्रा भरलीसां. कोनी हातपाय धुल्ले आस्तले कोनी ताँड धुल्ला आस्तला. आता मिया धुतय.
नाईक - अहो भटजी महाराज, पूजेला सुरुवात करा, ढुंगण का हलवित आहात?
भटजी - गांध उजाळतय.
नाईक - अहो, गंध असे म्हणा.
भटजी - आता गंध आसा तूच म्हण. (आचमन करतो) महागणपती नम: चंदनम समर्पयामी, महागणपती नम: पुष्प समर्पयामी, महागणपती नम: अक्षत: समर्पयामी, महागणपती नम: महानैवेद्यं समर्पयामी
नाईक - अहो भटजी महाराज, ही मध्यरात्रीची वेळ आहे. तुम्हाला महानैवेद्य कुठून मिळणार?
भटजी - त्याच्यासाठी बाजाराक पाणी सोडलय.
नाईक - अहो बाजार वाहून जाईल.
भटजी - नायकानु, बाजाराक इतक्या पानी सोडूचय नाय, परतेक वस्तूच्या नावानं पाणी सोडतय. लाडवान समर्पयामी, भज्यान समर्पयामी, खाज्यान समर्पयामी, वडापावन समर्पयामी, येजान समर्पयामी.
नाईक - अहो भटजी महाराज येज म्हणजे काय?
भटजी - अरे खाज्या सोपल्यारं गूळ शिल्लक अस्ताना तेचे पैसे येजाने (व्याजाने) वसूल करतत ना त्याका येज म्हणतातं. देवळान समर्पयामी.
नाईक - अहो भटजी महाराज गाठलं म्हणजे काय हो? कुणी कुणाला गाठलं?
भटजी - तसा कोणी कोणाक गाठल्यान नाय. पन मेवामिठायच्या दुकानात साखरेची गाठली आस्तत ना तका गाठली म्हणतत.
यासारखी चेष्टा मस्करी करून गणपतीची आरती म्हटली जाते. गणपतीचे वाहन जो उंदीर त्याला 'वायट तुज्या खायलो' असे म्हटले जाते.
नाईक - पूजा झाली, नैवेद्य झाला आरती राहिली?
भटजी - आता आरती हुनतय

आडदशावतारातील वेगवेगळ्या पात्रांच्या संवादातून होणार्‍या विनोदाचे स्वरूप पाहिले. त्यानंतर दशावतारातील 'आख्याननाट्य' सुरू होते. या मुख्य आख्यानातही अनेक विनोदी प्रसंगाची गुंफण केली जाते. प्रा. डॉ. नामदेव गवळी यांनी माझ्याच मार्गदर्शनाखाली मालवणी मुलखाच्या लोकसाहित्यावर पीएचडीचे संशोधन केले आहे. त्यांनी दशावतारातील विनोदी पात्रे व त्यातील संवादांवर लिहिले आहे.

कोणत्याही लोककलेत प्रामुख्याने लिखित संहितेपेक्षा सादरीकरण हा घटक महत्त्वाचा असतो. मात्र मौखिक संहिता हा लोककलेच्या सादरीकरणाचा आधार असतो. आज विद्यमान लोककला व लोकनाट्ये ही धार्मिकतेकडे कल असलेली; पण त्याचबरोबर रंजनाचे भरपूर घटक असलेले लोककलाप्रकार कमीअधिक प्रमाणात पहावयास मिळतात. दशावतार लोककलेचा विचार केल्यास दशावताराच्या पूर्वरंगात प्रांरभीचे गणपती-सरस्वतीचे स्तवन, त्यांचे आगमन, नृत्य, ब्रह्मदेव, त्यांची पूजा, दशावताराचे श्रीविष्णूनी केलेले कथन आणि शेवटी आरती हा किमान भाग अद्याप धार्मिकतेचे पारडे जड असल्याचे दर्शवतो. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या वेळात आता घट होऊ लागलेली आहे. पुराणकथांऐवजी लौकिक कथानक सादर करण्याकडे कल वाढलेला आहे. (उदाहरणार्थ, दुर्गेशनंदिनी कादंबरीची कथा.) साग्रसंगीत नाट्यरूपाने सादर करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. पण अगदी पारंपारिक सूत्रधार, संकासूर असे प्रवेश सुरू झाले की लौकिक अनुभव येऊ लागतात. नखशिखान्त काळाबावळा आणि अंतरी नाना कळा असलेला संकासूर चित्रविचित्र देवदेवतांची चेष्टामस्करी करणारा, ब्रह्मदेवाचे वेद चोरणारा याच्या जिवंत अभिनयावर खूष होऊन प्रेक्षकांपैकी कोणीतरी पन्नास रुपयाची नोट कलेवर खूष होऊन देतो तेव्हा संकासूर म्हणतो -

बगालास मां, कसां आसतां तां? ब्रह्मदेवान माजी पोटापाण्याची हत्यारां काढून घेतल्यान. म्हणान मी त्येची इद्याधनाची पोथी चोरलंय नि समिंदरात जावन लपान बसलंय. काय नाय तर म्हांवरा धरून कसां तरी पोट भरी व्हतंय. तर त्या मेल्यान माका थयसूंनय खोंट मारून भायर काढल्यान. आणि असो नरकात ढकलून दिल्यान. हाताक काम नाय, रवाक जागो नाय? उपाशी मराची पाळी यिली. पन म्हंतत नां, असातं माजो हरी तर देयत पायलीभरी... एका हरीन नेल्यान पन हाय दुसर्‍या हरीन हेंच्याकडून चायपानयासाठी पन्नास रुपयाचा बक्षिस यिल्ला आसा. आमच्या गरीबाची कदर केल्याबद्दल त्येंका धन्यवाद. हां तर नायकानु, तुनी मगाशी काय सांगा व्हतास ता कंटावण करा.

यासारख्या संवादातून क्षणापूर्वी जेथे थांबलो तेथून परत कंटिन्यू करायला सांगते; मात्र येथे रसभंग होत नाही. मुळात दशावतार हा लवचिक खेळ. पात्रंही मध्येच प्रेक्षकांशी गप्पा मारतात.

दुसरा एक संवाद प्रसंग पाहता येईल.
जनकाचा दरबार भरलेला असतो, सीतेचे स्वयंवर मांडलेले, देशोदेशीचे राजे स्वयंवरासाठी आलेले, तेव्हा एक राजा म्हणतो, “जनक राजाच्या दरबारात चायपान्याची कायच व्यवस्था नाय काय?”
तेव्हा जनकराजा शेजारच्या गाडीवरून सेवकाकडून चहापानी मागवितो आणि चहापाण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तेव्हा
“नरेंद्रमोदींच्या राज्यात साखर महाग झाली. पेट्रोल महाग झाले!”
“समोरचो बापयो भजी छान तळतो”
असे बोलत राहतात. पौराणिक पात्रांचे असे कालविसंगत बोलणे असले तरी प्रेक्षकांना त्यात वावगे वाटत नाही. लक्ष्मणासह स्टेजवर आलेला राम आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत “थोडा लेट झालो, नायतर हा दशतोंड्या रावण कधीच यमसदनी प्रवेश करता.” असे बोलतो.

अशात-हेच्या संवादप्रसंगांतून, पात्रांच्या वर्तनातून, समकालीन सामाजिक परिस्थितीवर, सामाजिक व्यवस्थेवर औपरोधिक टीकाटीप्पणी केल्यामुळे विनोदनिर्मिती होते व प्रेक्षकांचे रंजन होते. उदाहरणार्थ, 'कांचनगंगा' नाटकातील नाट्यपट येथील लोकजीवनावर भाष्य करते.
सुंगट भोंबील होये काय गे मावशे मावशे
हे बघ आणलय तुझ्यासाठी ताजे मासे
अरे अरे टेंबावयल्या आपी आपी
तुझ्यासाठी हे बघ आणलय कापी कापी
अरे अरे वयल्या घरच्या बापू बापू
तुज्यासाठी सरंगे कितके कापू कापू
अरे अरे वयल्या घरच्या राजू राजू
तुज्यासाठी ईरडा कितकी मोजू मोजू
अशी ही 'कांचनगंगा' दशावतारी नाटकात येणारी गंगा कोळीण व्यवसाय करताना येथील माणसांची नस पकडून कोण किती मासे विकत घेणार याची चौकशी करत असते. 'कांचनगंगा' नाटकात यासारखा येणारा गंगा कोळीणीचा अभिनय हे येथील लोकजीवनाचे पात्र आहे.

समारोप :

पुस्तक पुस्तक

'लोकनाट्यातील विनोदाचे स्वरूप' या लेखातून मी 'सोंग', 'लळित' व 'दशावतार' या तीन लोकनाट्यांतून जी विनोद निर्मिती होते; त्याचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख या तीनही लोकनाट्य-लोककलांच्या सादरीकरणातील विनोदाचे स्वरूप समजावे एवढ्याच हेतूने लिहिला आहे. कृपया वाचकांनी हे ध्यानी घ्यावे.

महाराष्ट्रातील अन्य तमाशा, दंडार, भवाडा, खडी-गंमत इत्यादी लोकनाट्य-लोककलातून लोकरंगभूमीवर विनोद सादर केला जातो. मराठी लोकनाट्य हे विधीशी म्हणजे संप्रदाय, धर्मश्रद्धा यांच्याशी अनुबंधित आहे. त्यामुळे लोकनाट्य सादरीकरणातील विनोदाला लोककलाकार फार महत्त्व देत नाहीत; मात्र आवश्यक तेथे प्रेक्षकांना 'हास्यरसाची' मेजवानी देऊन ते नात्यात रंजकता आणतात. करमणूक आणतात व हलक्या फुलक्या ग्राम्य किंवा सरळसाध्या विनोदी संवादांतून हास्य अर्थात आनंदप्राप्ती होते.

उरलेल्या लोकनात्यातील विनोदाचे स्वरूप कसे असते ते सांगण्यास मी उत्सुक आहेच मात्र विस्तारभयास्तव ते टाळले आहे. गेली अनेक वर्षे 'मराठी माणूस विनोदापासून दूरदूर जात आहे. अधिक गंभीर, रूक्ष जीवन त्याच्या वाटेला येत आहे. मात्र नागर जनांपेक्षा ग्रामीण भागातील लोक या पारंपारिक प्रसारनात्यांमुळे अधिक आनंदाचे क्षण जगतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख माफक माहितीपूर्ण आहे. जी माहिती आहे, ती शहरी वाचकासाठी नवीन आहे. तसेच अशी माहिती देणार्‍यांना गाठणे नि त्यांच्याकडून लिहून घेणे हे दिव्य असते ह्याची जाणीव आहे. म्हणूनच त्याचे महत्त्व अधिक आहे. अशी व्यक्ती मिळवल्याबद्दल अभिनंदन.
परंतु..
लेखात निक्षून बजावल्याप्रमाणे उदाहरणांपुरताच आवाका असल्याने लेखाची मर्यादा समजून घेता येते. लेखकाकडे लेख लिहिण्याची सफाई नाही, हही समजून घेता येते. त्याची गरजही नसते. परंतु अशाच ठिकाणी संपादकीय संस्कार फार कळीचे ठरतात. ह्या लेखावर मुशोचा सोडाच; संपादकीय हात अजिबातच फिरला नसल्याने लेख फार गचाळ झाला आहे. लेखकाशी थोडं अधिक बोलून लेखाला थोडा आकार देता आला असता. तसं करता येणं शक्य नसलं, तरी आहे ती स्थिती नक्की सुधारता आली असती. अनेकदा वेळेअभावी जमणार नसेल तर त्यासंबंधी एखादे टिपण टाकून लेख सावरून घेता येतो. तसं काहीही इथे आढळत नाही.

उदाहरणादाखल पुढील काही वाक्ये अशा संपादकीय संस्कारांअभावी निरर्थक किंवा विनोदी झाली आहेत -

. मानवाच्या कल्याण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर 'सो आंगे' अवतरतो.

. एखादे पात्र 'रामराम' म्हणते. व्हा 'लाग-लाग' असे समोरचे पात्र म्हणते त्यातून हास्य निर्माण होते.

. या कलांनी जनमानसांचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्याचे प्रयत्न या लोककलांतील विनोदनिर्मितीतून कसे गेले असे माझे स्पष्ट मत आहे.

. सुलभ विश्वकोशकारांनी म्हटले आहे की,

. त्यांजवर ईश्वराने प्रसाद करावा असे लळित रूप नाटक केले जाते

. लीला म्हणजे आठवणी या शब्दावरून लळित म्हणजे खेळ असा शब्द होतो.

. सूत्रधार लोकमंचावर आल्यावर - धृपद गणेशस्तवन सूत्रधार विदुषक प्रवेश पदगायन भारूड सोंगांचे आगमन - नृत्य - अभिनय - संवाद - व शेवटी आरती प्रसाद' असे लळित म्हणजे शेवटचे 'मंगलगान'चे स्वरूप आहे.

ह्याखेरीज लेखकाचा परिचय, छायाचित्रांसाठी मथळे, काही संज्ञांचे स्पष्टीकरण (उदा. विधीनाट्य) इ. गोष्टी गायब आहेत. शिवाय ते पहिले छायाचित्र काय हेतूने लेखात आले आहे हेही कळले नाही.

अशा स्वरूपात लेख प्रकाशित झाल्याने लेख व 'ऐसी..' अशा दोन्हींचे मूल्य कमी होते, इतकेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घाई-गडबडीत, या लेखावर मुद्रितशोधन इत्यादी संपादकीय संस्करण व्यवस्थित झालं नव्हतं. ते लक्षात आणून देण्याबद्दल अमुकचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0