Skip to main content

मुंबापुरी खाबूगिरी

संकीर्ण

मुंबापुरी खाबूगिरी

- १४टॅन

वडापाव

मायमुंबईत अफाट पायी फिरून फक्त निरनिराळ्या पब्लिकचं निरीक्षण करता करता जी मजा पहायला मिळाली, ती शब्दांत मांडतो आहे. अशा 'मजा'तर बऱ्याच असल्या तरीही साधारण कोणत्याही क्ष रस्त्यावरच्या य स्टॉलवर जमा होऊन खाणारे लोक पाहाणं ही त्यातली सगळ्यात रोचक मजा आहे. ही एक मोठी मालिका करण्याची इच्छा आहे, पाहू कसं जमतंय.

IMG-20180909-083623-151
श्रेय : गौराक्का

मुंबई म्हटलं की वडापाव आलाच. हे समीकरण रूढ कधी झालं माहीत नाही. मुंबईत गेली पन्नास वर्षं तरी वडापाव हे आद्य रस्ताखाद्य आहे. कुठल्याही रस्त्यावर, उपरस्त्यावर, गल्लीत वडापावचे कमीतकमी दोन स्टॉल असतात. चार फुटी टेबलावर, सरासरी मुंबईकराच्या खाद्य-स्वच्छता-ज्ञानासारखीच अंतर्बाह्य काळीकुट्ट कढई, तिच्यात सडकून तापलेलं, कढईच्यावरचं दृष्य ठाय लयीत अस्थिर करणारं तेल, मोठ्ठा झारा फिरवत असणारा, कढईला शोभणारे कपडे घातलेला बुवा, आणि त्याचा अनुयायी पाहिल्यावर तिथे गर्दी जमणार हे नक्की.

त्या कढईत तरंगणारे गोलमटोल पिवळेधम्मक वडे, हिरवी-लाल चटणी, काळपट लाल सुकी चटणी पाहून डोळ्यांत अख्खं रंगचक्र फिरतं. तितक्यात कौशल्यानं बुवा कढईतून झाऱ्यावर साताठ वडे कौशल्यानं पेलत पटकन भांड्यात टाकतात. आरडरी सोडलेल्यांच्या भुका खवळतात. अनुयायी एकाएकी शो ताब्यात घेतो. सरासरी तीन-चार सेकंदात एकेक वडापाव चटणीच्या पर्म्युटेशन्ससकट दणादण पेपरांत गुंडाळायला लागतो किंवा सरळ हातात देऊ लागतो. लोक दोन्ही हातांत ते पूर्णब्रह्म पकडून त्वेषाने चावे घेऊ लागतात. मिठाने माखलेल्या मिरच्यांचा फडशा पडू लागतो.

स्टॉल्सच्या स्टायली पण वेगवेगळ्या आहेत. काही स्टॉल फुलऑन वडा, समोसा, कांदा/बटाटा/मूग/मेथीभजी, 'कटलेस' हे प्रकार ठेवणारे असतात. बहुतेक फक्त वडा, समोसा, कांदा-बटाटा भजी इतकंच ठेवतात. ह्यातला कटलेस प्रकार बाहेर कुठे खायला मिळालेला नाही. कटलेटचा हा अपभ्रंश म्हणजे वड्याचीच भाजी कर्णावर कापलेल्या ब्रेडच्या दोन स्लाईसमध्ये दाबून, बेसनमध्ये घोळवून तळलेला पदार्थ. वडापाव काँपॅक्ट फॉर्ममध्ये.

इथे लोकांच्या निरनिराळ्या लकबी दिसतात.
काही उल्लेखनीय म्हणजे, कागदी प्लेटीत ज्यादा चटणी घेऊन प्रत्येक घास चटणीत न्हाऊ घालून घेणारे. हा प्रकार मला आवडतो. प्रत्येक स्टॉलचं व्यक्तिमत्त्व चटणीत असतं. वड्याचा पोत, सोडा कमी-जास्त इत्यादी दुय्यम गोष्टी. खाताखाता निघायचं असेल तर हा प्रकार अशक्य आहे.

दुसरं म्हणजे घासानिशी अख्ख्या मिरचीचा फडशा पाडणारे. मी ह्यांतही मोडतो. टिपिकल इंडस्ट्रिअल जागांमध्ये, कामगारवर्गबहुल वस्तीत कच्च्या मिरच्या ठेवलेल्या असतात. ह्या प्रकारापासून मी दूर राहतो. मिठानं माखलेल्या, तळलेल्या मिरच्यांवर खास जीव. खातखात निघायचं असेल तर नीट निवडून मोठ्या ३-४ मिरच्या घ्यायच्या, वडापावात सारून त्यांचे देठ तोडून टाकायचे. खाताखाता मिरच्यांचे जबरी खारट-तिखट क्वांटम जे जिभेखाली येतात त्यात आगळीच मजा आहे. पार्सल घ्यायचं असेल तर मिरच्यांची वेगळी पुडी बांधून घ्यावी.

खाणाऱ्यांतले रावण म्हणजे फक्त तिखासुखा चटणीवाले. ह्या लोकांपासून सावध रहावं. गोष्टी अति उग्र आवडणारे हे लोक आहेत. त्या आंबटगोड लाल चटणीशिवाय वडापावाला काही जीव नाही. वडा पुरेसा तिखट नसेल तर आधीच तो स्टॉल काही चालणार नाही. त्यात परत हिरवी तिखट चटणी आणि लसणाची म्हणवून घेणारी कोरडी चटणी फक्त घालून भलताच टिळकसंप्रदायी वडापाव खाण्यात आनंद तो कसला?

काही लोक किळसवाणे असतात. उघड्याच असलेल्या वडा, समोसा, कांदा/बटाटा भजी इत्यादींचा 'ताप बघून' ते किती गरम आहेत ते जोखायचं आणि मागायचं. स्वतः लोकलमधून तीनशे लोकांना, कड्यांना, हँडल्सना हात लावून आलोय इत्यादी कशाचीही पत्रास ठेवायची नाही. ह्या लोकांचे हात कढईतल्या तेलात बुडवून काढले पाहिजेत अशी इच्छा सारखीसारखी होते.

मग थोडे उपप्रकार म्हणजे 'बिनाचटनी'वाले, फक्त चपाती-भाजीसारखे वडापाव खाणारे. नंतर एकाच वडा-समोश्याबरोबर २-३ पाव खाणारे. वडा काढून झाल्यावर बेसनाची पिल्लं जी राहतात तो 'चूरमा' पावाच्या घडीत घालून खाणारे. कीर्ती कॉलेजचा सुप्रसिद्ध वडापाववाला हे भरपूर देतो. असतंही चविष्ट.

फक्त 'सॉफिस्टिकेटेड' स्टॉलवर वडापाव खाणारे. हे लोक सॅम्पल असतात. दुकानं त्याहूनही सॅम्पल. ह्या दुकानांत 'कूपन' घ्यावं लागतं. किंमती दीडपट ते तिप्पट असतात. ते 'पावात वडा भरणार माणूस'ला दिलं की प्लास्टिक ग्लोव्ह्जधारी हा इसम गुळगुळीत पावात चटणी भरून, अती सोडा असलेला वडा कोंबून एका टीपकागदासहित तुमच्याकडे सुपूर्द करणार. चव टाकाऊ असते. वड्यात सोडा प्रचंड. चटण्या मात्र मस्त असतात, पण तिथेच उभं राहून मिरच्या चावत राहण्याचा स्कोप नसतो. नावंच घ्यायची तर दादर छबिलदासचा सुप्रसिद्ध (का ब्रं!) वडा, पार्ल्याचा पार्लेश्वर, गोरेगाव-कांदिवलीचा जैन, मालाडचा एम-एम इ.
22-SM-P-7-food-safari-Ramya-Sarma-G3159-P1-A8-1-22-SM-WADAPAV-2

मला वडापाव आवडतो. समोसा टेस्टेड, ट्राईड, व्हेरिफाईड असेल तर समोसापाव. भजीपाव ऑल टाईम फेव्हरिट. भूक जबरी शमते. कांदाभजी मित्र-नातेवाईक जमवून पावसात खायला भारी. फक्त बटाटाभजी ट्रेक-हाईक, प्रवासात मस्त. बाकी 'मूड' करायचा म्हणजे मस्त तीनचार सरींनंतर असा चारच्या सुमाराला सुखद रिपरिप पाऊस पडावा, रस्ते-सिग्नल-झाडांनी सचैल स्नान करावं, उन्हावर मस्त काजळी चढलेली असावी. असा मस्त आडबाजूचा स्टॉल गवसावा, खमंग लसूण आणि तळणाच्या वासामुळे पोटातल्या कावळ्यांनी ठाय लय पकडावी, आणि अक्षरश: चटके बसणारा गरमागरम वडा हाती पडावा!


मग पिवळा स-चटणु । पावात पसरुनी चुरमा-णू ।
खवळावे स्वाद-गंध अणुरेणु । मुंबईराजु तो ॥

पाणीपुरी

उत्तरेकडील एकमेव गोष्ट जी परत उत्तरेत धाडण्यात कट्टर मराठी माणसांना काडीचाही इंटरेस्ट नाही. शिवाय, हिला अजून मातीचा साज वगैरे नस्त्या सोशालिस्ट गोष्टी चिकटलेल्या नाहीत. ही आणि हिच्या बहिणीही तितक्याच प्रसिद्ध आहेत. हिची उत्तरनामं - गोलगप्पे, पुचका नि काय काय - मुंबईत आक्रमकरीत्या झिडकारली जातात. पाणीपुरी!

वडापावच्या स्टॉलनंतर संख्येत नंबर लागतो तो पाणीपुरी किंवा तथाकथित 'चाट' स्टॉल्सचा. ह्यांत तीन मुख्य प्रकार आहेत. एक साधारण गार्डन व्हरायटी स्टॉल्स, एक सोफिस्टीकेटेड, छांछां दुकानं, आणि खोमचेवाले लोक. कुठल्याही सुस्त संध्याकाळीत प्राण फुंकायचे असतील तर पिवळ्या रगड्याच्या डोंगराखाली लाल फडकं अंथरलेला स्टॉल गाठावा. मस्त एकट्यानं पाणीपुरीवाल्याशी स्पर्धा करत त्या साताठ पुऱ्या संपवाव्यात, आणि मार्गस्थ व्हावं.
panipuri-28-07-2018

पाणीपुरीचा स्टॉल म्हणजे एका टेबलावर स्टीलचा बर्फगार तिखट पाण्याचा हंडा, एक लाल चटणीचं भांडं, उकळत ठेवलेला रगडा, पुऱ्यांच्या पाकिटांची रास, कुरमुरे आणि शेवेचे मोठ्ठे डबे. खंडीभर बाऽरीक चिरलेला कांदा-टोमॅटो आणि कुस्करलेला बटाटा. शेवपुऱ्या दणादण लावत असणारा अध्वर्यू आणि पाणीपुरी बनवायला अतिकसबी अशिष्टण्ट.
स्वामी तिन्ही जगाचा
पाणीपुरीवाल्यापुढे भिकारी.

कोणालाही आपली 'बारी' येईपर्यंत ताटकळत ठेवणारे कसबी कलाकार म्हणजे पाणीपुरीवाले. रगडा-चटणी भरलेली पुरी हिरव्यागार पाण्यात बुचकाळून आपल्या द्रोणात येते. आपण ती अख्खी तोंडात ढकलून मस्त फोडतो. थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात मस्त उधाणलेल्या चवींच्या. मूग असतील तर अजूनच मज्जा. गरम रगडा, आंबटगोड चिंचेची चटणी आणि बर्फगार तिखट पाणी एक अंतस्थ तार छेडतात. मग सुरू होते आपली आणि पाणीपुरीवाल्याची जुगलबंदी. और तिखा म्हणून समेवर येत 'पूरा तिखा' आळवत आपण मैफल आटपती घेतो.

पाणीपुरी, शेवपुरी, दहीबटाटापुरी, रगडापुरी, भेळ आदी फक्त संध्याकाळीच खायच्या गोष्टी आहेत. वडासमोसा नाश्ता म्हणून येतो, वडारोटी करुन त्याचा 'लंच' होऊ शकतो, संध्याकाळी ३ वडापाव वगैरे खाल्ले की रात्रीचं जेवण आणि चहा ह्या दोन्ही गोष्टी आटपतात. पाणीपुरी-भेळेचं तसं नाही. ह्याला मूड जमावा लागतो. वेळ असावा लागतो. अजून पंधरा लोक एकाच वेळी पाणीपुरी खायला असले की अर्ध्या तासाची निश्चिंती असते. भेळ म्हणजे दहा ते पंधरा मिन्टं गेली. ह्या खऱ्या खवैय्यांच्या गोष्टी. इंडल्जन्स इत्यादी.

पाणीपुरी ही 'चांगल्या', 'हायजिनिक', 'सुसंस्कृत' दुकानांतही मस्तच लागते. तिची किंमत मात्र थोडी नेत्रपुऱ्यांत पाणी आणते. इथे जनरली सिंधी पुऱ्या असतात. कामगारांकडे प्लास्टिक ग्लोव्ह्ज जारी. पाणी चार ते पाच अंश सेल्सिअस असतं. चटणी इतकी गोड असते की इथली कसबी मंडळी ती जेमतेम पुरीवर टेकवतात. पाण्यातली खारी बुंदी अजून मजा आणते. ह्या पाणीपुरीनं चक्क पोट भरतं.

पाणीपुरी आवडीने खाणारं पब्लिक साधारण चाळिशीच्या अलिकडचंच. त्यानंतरचे म्हणजे खरे रसिक असतात. पाणीपुरी 'तिखा ही बनाओ' म्हणणाऱ्यांना त्यात एक बैडैस्य वाटतं. पण 'मिडीअम' पाणीपुरीची मजाच निराळी. हे कमअस्सल सगळ्याच पुरी भगिनींना लागू आहे. पाणीपुरी खाताना कांदा मागणारे लोक हे नवशिके समजावेत. पाणीपुरीत कांदा हा रगड्याचा अपमान आहे. मुंग-आलूवाले असाल तर त्याचाही अपमान आहे. कांदा भेळेत, शेवपुरीत सढळ हस्ते असावा. पाणीपुरीनंतर फुकट सूखा पुरी हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीपासून मिळालेला मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर नुसतेच तिखा पानी द्रोणात घेऊन पिणं हे ज्याच्या डोक्यात आलं तोच आद्य होमो सेपिअन अशी वदंता आहे. पाणीपुरी हे तरुणाईच्या क्षणभंगुर चंगळवादाचं शतकानुशतकं प्रतीक आहे. वडापावासारखा ह्यात दिल्या पैशाला पोटभर इत्यादी समाजवाद नाही. "मुंबईत पाणीपुरीला गोलगप्पे, आणि (नीचोत्तम पातळी म्हणजे) गोलगप्पाज् म्हणणाऱ्यांना पायताणानं हाणावं", म्हणणारा नेता हा मुंबईकर तरुणाईचं खरं प्रेरणास्थान होऊ शकतो. रगड्याऐवजी पाणीपुरी आलू-मुंगची खाणारे खरे रसिक. ह्यांची लॉबी वेगळी असते. आजकाल पश्चिम उपनगरांत 'कॉर्न पुरी' मिळते. ह्याच्यातली पाणीपुरी तूफान लागते. पुऱ्या कमालीच्या कुरकुरीत असतात.

भेळ ही खरी चौपाटीवर खायची गोष्ट. मस्त मित्रमंडळ जमवून पुरीनं गप्पांबरोबर हाणत बसायची. भेळ जमेल तेव्हढी तिखट खावी. मजा येते. शेवपुरी, दहीबटाटापुरी हे खरे मुंबईकरांचं leisure food आहे. शेवपुरीची कडक पुरी नुसतीही बेष्ट लागते. तिच्यावरच्या जादुई मिश्रणामुळे आठवडाभर चव तोंडात रेंगाळू शकते. दहीबटाटापुरी ही खरी पुरी भगिनींमधली थोरली. शेवपुरीचे सगळे आयटम पाणीपुरीच्या पुरीत, आणि वरून दही असल्याने ब्रह्मांडाची सैर करवून आणू शकते. ही तीन प्लेटींच्या वर खाणारा मनुष्य केवळ पशू असला पाहिजे.


आजकाल फ्यूजनचा जमाना आहे, त्याबद्दल पुढील भागात येईलच. पण इथे मुद्दाम सांगायची गोष्ट अशी की जैन चाट हे शुद्ध थोतांड आहे. त्यापेक्षा संन्यास घ्यावा. कांदा बटाटा ह्या दोन प्रकारांशिवाय जी पुरीभगिनी बनत असेल ती पालीही चाटत नसाव्यात.

भेळ नेणतां तोंडीं । घातल्या नचि कांदा फोडी ।
जैन मानूनी पुरी । चोपिला भैया ॥
जैन धर्मी हें एक । स्ट्रीटफुडांत आगळिक ।
म्हणौनि नको कौतुक । जैन-चाटचे एथ ॥
किंबहुना पार्था ऐसें । जें जैन स्ट्रीट फूड गा असे ।
तें त्यजिजे विष जैसें । वोकूनीयां ॥

अन्य

ह्या भागात मुंबानगरीच्या उरलेल्या जठराग्नीशामक स्थळांबाबत मी लिहीणार आहे. मुंबईच्या कुठल्याही क्ष रस्त्याच्या य गल्लीत एक वडापाव, एक पाणीपुरीनंतर स्टॉल असतो तो म्हणजे सँडविच किंवा डोश्याचा. पश्चिम उपनगरांत पाणीपुरी आणि सँडविच स्टॉल बव्हंशी एकत्रच असतात. ह्यामागचं लॉजिक माहीत नाही. असो.

सँडविच स्टॉल हा फिटनेस-झॉम्बी लोकांसाठी उत्तम उपाय आहे. आता जे लोक 'लोणी', 'टोमॅटो केचप' वापरतात, त्यांबद्दल मायबाप वाचकहो आपण वाचलं असेलच. तो वेगळा विषय झाला. पण आरोग्याबाबत फारसं 'गिल्टी' न वाटता रस्ताखाद्य चापायचं असेल तर सँडविचसारखा पर्याय नाही. आपला सँडविचवाला फिक्स करून ठेवावा. तो आपल्या बाबतीत सढळहस्ते काकडी-टोमॅटो घालणं, टोस्ट सँडविच अजिबात जळू न देणं इत्यादी एक्स्ट्रा सर्व्हिस देतो. लोक सँडविच 'सादा', 'ग्रिल', 'टोस्ट', 'चीझ' ह्या प्रकारांत खातात. टोस्ट म्हणजे गॅसवर भाजणे आणि ग्रिल म्हणजे इलेक्ट्रिक ग्रिलरमध्ये भाजणे. दोन्हीमधला पौष्टीक फरक मला खरच माहीत नाही. जिज्ञासूंनी खाऊन मलाच सांगावा.

सँडविचवाला म्हणजे साध्या आणि त्रिकोणी ब्रेडच्या मोठ्या चळती, ज्या दुरूनही दिसतात. संध्याकाळी चारनंतर गर्दी फुललेली दिसते. ती रात्री आठ-दहापर्यंत टिकते. रात्रीचं जेवण म्हणजे सँडविच असंही समीकरण काही लोक करतात. मालक ब्रेडवर भरपूर लोणी, हिरवी चटणी, उकडलेला बटाटा पसरवून त्यावर काकडी-टोमॅटो-बीटच्या फोडी अंथरतो. वर दुसरा ब्रेड, लोणी आणि चटणीने माखलेला. हे तो ब्रेडच्या आकाराच्या लोखंडी टोस्टरमध्ये ठेवून भाजायला ठेवतो. हे खमंग खायला मजा येते. हे तो माणूस हॅकसॉ ब्लेडनं सटासट कापतो. त्याच्या टेबलाची हॅकसॉने केलेली हालत पाहून अनुभव जोखता येतो. ह्याबरोबर हिरवी चटणी, केशरी चटणी, केचप इत्यादी मिळतात. शेवही घालतात. ही इथे कुठून आली देवच जाणे. ग्रिल म्हणजे ह्याच्या दुप्पट क्षेत्रफळाचं त्रिकोणी सँडविच मिळतं. हे एक सँडविच खाऊन पोट जबरी भरतं. हे खाल्ल्यावर लोक 'आलू स्लाईस' खातात, जी सूखा पुरी इक्विव्हॅलंट आहे. बेसिकली उकडलेल्या बटाट्याच्या चकतीवर चाट मसाला. सँडविच मुंबापुरीत भलतंच प्राचीन असलं तरी रस्ताखाऊच्या बाबतीत नवंच म्हणावं लागेल.
DSC-6103

असाच अजून एक मस्त आयटम म्हणजे डोसा. इडली-मेदूवडा-डोसा हे मुंबईकरांचे नाश्ता म्हणून रेग्युलर होऊ लागलेत. ह्या तिन्ही बरोबर मिळणारा एक झक्कास आयटम म्हणजे लाल-नारिंगी चटणी, जे सगळे ठेवत नाहीत. डोसा स्टॉलवर एक मोठा आयताकृती तवा. त्यासमोर आडवं गंध लावलेला बुवा. हा एका सेकंदात वाटीने पूर्ण वर्तुळाकृती डोसा रेखतो. पंधरा मिण्टात डोसा तयार असतो. एका कुशल आणि बऱ्याच जुन्या डोसावाल्याने कम्प्लीट असेंब्ली चेनही बनवलेली होती. एक माणूस डोसा टाकणार, एक चाट मसाला-बटर टाकणार, एक स्पेशल जे काय असेल ते. कुरकुरीत खमंग डोसा मस्त लागतो. डोश्यात लई प्रकार. साधा डोसा, मसाला, म्हैसूरादी. 'जिनी' डोसा, 'पनीर चिली' डोसा हे नवीन डोसा-एक्स्क्लूझिव्ह प्रकार आलेले जे सँडविचातही आले. इडली आणि मेदूवडा स्टॉलसमोर अखंड गर्दी असते. डोश्यासमोर फक्त दर्दी.

फ्रँकी हा एक आयटम. मैद्याच्या पोळीत भाज्या आणि सॉस भरून भाजलेला. हा मस्त लागतो. कॉलेजयुवकांमध्ये खास प्रिय. ह्याबद्दल फार काही लिहीण्यासारखं नाही. इतकंच, की आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सगळ्या बंदिशींमध्ये हिच्यात चिकन, मटण, अंडं इत्यादी स्वर लागू शकतात. अगदी स्वस्त आणि तितकाच निरुपयोगी पदार्थ. ह्यात प्रकारच असंख्य असतात. म्हणजे, साधी फ्रँकी म्हणजे 'व्हेज'. नंतर 'नूडल्स'. 'चीज'. 'चीज-नूड्ल्स'. 'शेझवान'. शेझवान-चीज. शेझवान-नूडल्स. शेझवान-चीज नूडल्स. तुम्हाला कळलंय. कॉलेजात जे पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन शिकतो त्याचं खरं उदाहरण. नंतर एक पदार्थ, म्हणजे 'मेयोनेज' किंवा 'मंच्युरिअन' आणायचं आणि हेच खेळायचं. हे आजकाल डोश्यातही होतं. असंख्य डोसे. डोश्यात तर असंख्य प्रकार झालेले आहेत. 'पिझ्झा डोसा'ही पाहिल्याचं स्मरणात आहे.

फ्यूजन हे अलिकडचं पिल्लू आहे. 'कल हो ना हो'मधलं हाटेल काढून बसल्याच्या थाटात 'काहीतरी नवीन पाहिजे' म्हणून प्रत्येक जुन्या गोष्टीत हे आयटम आणणं सुरु आहे. मध्यंतरी 'स्पेशल वडापाव' खाल्लेला. चटण्या, त्यांवर अंथरलेला कोबी, त्यावर वडा आणि वर चीज घालून टोस्ट केलेला वडापाव. ठीकठाक. 'तंदूर मंचुरिअन' फ्रँकी खाल्ली. चक्क मातोश्रींनाही आवडली. ह्यात खरं तंदूर नसून तंदूर फ्लेवरचं मेयोनेज घातलेलं असतं. झकास प्रकार. चीज चिली टोस्ट, पनीर चिली डोसा इत्यादी प्रकारही भन्नाट आणि अतिचविष्ट. ह्या स्पेशल डोशांबरोबर एक भरपूर आणि झक्कास भाजी येते. हे प्रकार तर नक्कीच खाऊन पहावेत.

DSC-1517
श्रेय: गौराक्का

शिवाय दिल्ली स्पेशल कायतरी 'चाप', 'श‌वर्मा' हे प्रकारही जोर धरू लागलेत. शवर्मा हा अप्रतिम असतो. पिटा ब्रेडमध्ये लेबनिज सॉस आणि भरपूर ग्रिल्ड चिकन. जबरी. व्हेज शवर्मा हेही थोतांड आहे.

महत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे सगळं मुंबई खाद्यजीवनाचा एखादा टक्काही नाही. पावभाजी, कुल्फी, मेवाड आईस्क्रीम, खरवससदृश कायतरी पदार्थ, बर्फाचे गोळे, दाबेली, चायनीज्, पॉपकॉर्न, भुर्जीपाव, तंदूर चिकन, सोडा पब इत्यादींना डेडीकेटेड गोष्टी इथे आहेत, ज्यांना मी स्पर्शही केलेला नाही. ह्याशिवाय उल्लेखही न केलेले अनेक पदार्थ असतील ह्याचीही खात्री आहे. सध्यापुरती लेखनसीमा असली, तरी ही 'मुंबापुरी खाबूगिरी' पुढे वाढायला बराच वाव आहे!


यया 'दर्दीत्वा’सीचि पार्था। सायुज्य ऐसी व्यवस्था।
याचि नांवें तिसरी। खाबूगिरी गा॥
परी माझें आराधन। ऐसी-उच्चभ्रूंत होय सोपान।
दिवाळी-अंक हन साधन। गमेन हो॥

विशेषांक प्रकार

चिमणराव Tue, 06/11/2018 - 13:54

दंडवत॥
जिंकलंस गड्या.
फक्त जंत्री नाही तर चटपटीत वर्णन साजेसं. आता घाइघाइत वाचलं, फुटपाथवर हे पदार्थ खातात तसं,पण अजून एक दोन राउंड होतील.
दहीभटाटाटाशेवपुरीच्या तीन प्लेटींचं माहीत नाही पण समोसे चांगले असतील तर एकावेळी दहा सहज खातो. हलके असतात ते.
बाकी गौराक्काचे ( गोरेगावकर) फोटोंसाठी आभार.

अतिशहाणा Tue, 06/11/2018 - 17:08

दाबेलीबद्दल काहीही आलं नाही हे पटलं नाही.

१४टॅन Wed, 07/11/2018 - 12:02

In reply to by अतिशहाणा

दाबेली, ती खाणारे लोक ह्यांबाबत फारतर एखादा परिच्छेद आला असता. म्हणून फार काही लिहीलं नाही. मला पर्सनली शवर्मा, तंदूर-कबाब, हातगाडीवरचं चायनीज (मित्रांसोबत) ह्या गोष्टी प्रचंड आवडतात. पुढे लेख पाडलेच तर नक्की लिहीन.

गौराक्का Tue, 06/11/2018 - 18:10

लै झ्यकास!
पण तू सुखा पुरी रगडेवाला... आणि मी आलूवाल्या सुखा पुरीच्या प्रेमातली आहे... अन्धेरी स्टेशनाबहेर चा पापुवाला तीन तीन सुखा पुरी हातावर टेकवतो... ते ही न मागता... त्याच्यावर आप्लि जिनगानी कुर्बाने...
@अतिशहाणा - दाबेली हे प्रायोरिटी लिस्टित लई खालचं नावे, त्याचं ही आणि माझं ही (गोरेगाव सप्रे समोरचा दाबेली वाला, बोरिवली टी बी झेड समोरचा आणी आम्च्या घराजवळचा सोडून दाबेली खाल्ल्याचं आठवत ही नाही).... आम्हाला लै (पक्षी : २ ते ३) दिवस पौष्टीक खाल्लं की असल्या क्रेविंग्स येतात... प्रमुख्याने पापु... चल बे पापु मारुन येउ ही आम्च्या घरातली आद्य आरोळी आहे.

म्रिन Mon, 12/11/2018 - 17:51

In reply to by गौराक्का

पुण्याची एक मैत्रीण आली होती मागे इथे, तिला शेवपुरी खाऊ घातली. नंतर त्याने सूखा हातात ठेवलं. ती चकित, म्हणाली हे काय? म्हटलं मुंबईत भेळ/पापु/शेपुनंतर सूखापुरी किंवा सूखा भेल मस्ट आहे. आणि सँडविचनंतर आलू. तिच्या कल्पनेबाहेरचं होतं ते.

तिरशिंगराव Wed, 07/11/2018 - 11:03

हे वर्णन वाचल्यावर, मुंबईला परत जावं, असं वाटू लागलं!

anant_yaatree Wed, 07/11/2018 - 11:48

या रस्ताफुडांची होम डिलिवरी देण्याची व्यवस्थापण टपरीवाले करू लागलेत आता.

१४टॅन Wed, 07/11/2018 - 12:03

अचरटबाबाजी, तिरशिंगराव; धन्यवाद.
अनंतयात्री, तुमच्या कलात्मक प्रतिक्रियेसाठी अनंत धन्यवाद!

नंदन Wed, 07/11/2018 - 14:15

भूकमार्क* करून ठेवावा असा धागा. बोरिवलीच्या गोयल शॉपिंग सेंटरमधली दाबेली आणि मूंगभजी, चर्चगेट स्टेशनला उतरून सरळ दक्षिणेकडे चालत राहिलं - तर स्टेशन कॉम्प्लेक्सच्या आतच उजवीकडे मिळणारी फ्रँकी, पार्ल्याचं शर्मा आणि साठ्ये कालिजासमोर लागणाऱ्या सँडविचच्या गाड्या, बांद्र्यातलं एल्को आणि जय, एमएमचे ते मोठ्ठाले भटुरे, गुरुकृपातले छोले-समोसे इ. नेहमीची ठिकाणं आठवली आणि जीभ खवळली!

बाकी फ्युजनचं म्हणाल तर, 'शेजवान पनीर पिझ्झा' सारखा यांगत्से-सतलज-टायबर त्रिवेणी संगम आता फारच जुना झाला असावा; व्होडका पाणीपुरी शॉट्सची इत्यादींचं नावीन्य थोडंफार टिकून आहे.

महत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे सगळं मुंबई खाद्यजीवनाचा एखादा टक्काही नाही.

सहमत आहे. निवांत येऊद्या पुढचे भाग.

*श्रेयअव्हेर: आबा

१४टॅन Wed, 07/11/2018 - 14:29

In reply to by नंदन

आपण मस्त मित्र होऊ शकतो नंदनराव!

चर्चगेट स्टेशनला उतरून सरळ दक्षिणेकडे चालत राहिलं - तर स्टेशन कॉम्प्लेक्सच्या आतच उजवीकडे मिळणारी फ्रँकी

ही फ्रँकी कधी पाहिली नाही, कोणाकडून ऐकलेलंही नाही. एकदा जायला हवं. इथे, म्हणजे चर्चगेटच्या एंट्रन्सच्या अलिकडेच झक्कास सफरचंदाचा ज्यूस मिळायचा. २ महिन्यांपूर्वी हा स्टॉल नाहिसा झालेला होता. स्याड.

पार्ल्याचं शर्मा आणि साठ्ये कालिजासमोर लागणाऱ्या सँडविचच्या गाड्या

बेग टू डिफर हं. पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे. बोरीवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहासमोरची गाड्यांची रांग सँडविचच्या बाबतीत टॉप क्लास.

एमएमचे ते मोठ्ठाले भटुरे

कधी खाल्ले नाहीत, पण वड्याबिड्याचा आकार लक्षात घेता दुकान लुटारू आहे हे माझं मत आहे.

गुरुकृपातले छोले-समोसे

खायचे तर आहेतच. गौराक्कांचं मत प्रचंड विरुद्ध आहे. अंधेरीला 'जसलोक', गोरेगाव पूर्वेला 'गांधी', ह्यांच्यातले फक्त समोसे, आणि कांदिवली महावीर नगरातल्या 'श्रीराम'चे छोले समोसे अगदी धोबीपछाड आहेत.

'शेजवान पनीर पिझ्झा' सारखा यांगत्से-सतलज-टायबर त्रिवेणी संगम आता फारच जुना झाला असावा

अच्छा. म्हाईती नौतं. मी लहान होतो तेव्हा डोशाच्या गाड्याच जवळपास नव्हत्या. उडपी हाटेलांत नेहमीचंच मसाला, चीझ, म्हैसूर, गेला बाजार शेझवान इ. पर्म्यु-कॉम्बी. मलातरी हे आत्ताआत्ताचंच फॅड वाटत होतं.

गौराक्का Wed, 07/11/2018 - 18:19

In reply to by १४टॅन

गुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत टुकार असतात, उकडलेला बटाटा कोण घालतं छोल्यां मध्ये. ओवर्रेटेड नॉनसेन्स.
त्याऐवजी कोणत्याही गुरुद्वारेत जाउन लंगर मध्ये छोले खावेत. सरदार मित्र मैत्रिणी असल्यास जास्त उत्तम.

टॅनुल्या गाड्या आधीपासून होत्या रे बावा.... आईसाहेब कधी जाऊ द्याय्च्या नाहीत... स्वामी आठवतं का तुला...
एम एम ची बुंदी बाकी भारी अस्ते. मंगळवारी तो डिस्काउंट देखिल देतो.. :) :)
बाकी पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे या साठी फिस्ट बंप..

टिन Wed, 07/11/2018 - 20:51

In reply to by गौराक्का

आणि एमेमचा ढोकळा आणि खांडवी (सुरळीच्या वड्या) चांगल्या असतात. लस्सीत 'तो टिपकागद घालतो' असं आम्ही कायम ऐकत आलो, त्यामुळे कधी try केली नाही.

नंदन Sat, 10/11/2018 - 06:39

In reply to by १४टॅन

आपण मस्त मित्र होऊ शकतो नंदनराव!

इन्शाFSM!
तसंही आपल्यासारख्या पश्चिम उपनगरी लोकांनी एक आंतरजालीय दबावगट निर्माण करायला हवाच!

पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे.

अगदीच शक्य आहे. आमचा अनुभव वीस वर्षं (आणि वीस किलो)पूर्वीचा असल्याने अंमळ नॉस्टॅल्जियाचा सेपिया चष्मा लागला असावा.

बोरीवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहासमोरची गाड्यांची रांग सँडविचच्या बाबतीत टॉप क्लास.

व्हय जी, शिवाय सोडावाला/चंदावरकर लेनांत रात्री भरणाऱ्या हातगाड्यावलीतही एक-दोन भन्नाट सँडविच/रगडा-पेटिसच्या गाड्या होत्या.

बाकी गुरुकृपातल्या समोश्यांचे अध:पतन खेदजनक आहे. छोले, कॉम्बो प्लेटचा भाग म्हणून (उदा. समोसे वा पॅटिससोबत) जेव्हा हादडले, तेव्हा त्यांत कधीही बटाटा आल्याचं आठवत नाही. पुन्हा जाऊन खात्री करायला हवी :)

नितिन थत्ते Sat, 10/11/2018 - 07:48

In reply to by नंदन

बाय द वे सामोशात बटाटा नसतो/ नसायला हवा हा समज कुठून आला?

संत श्री लालू यादव यांचं किमान २० वर्षं जुनं वचन आहे......
जबतक रहेगा समोसे में आलू
तबतक रहेगा बिहार में लालू

गौराक्का Sat, 10/11/2018 - 10:11

In reply to by नितिन थत्ते

थत्ते काका विषय समोश्यांमध्ये बटाट्याचा नसून छोल्यांमधल्या बटाट्यांचा आहे.... जरा चाळशी नीट पुसून घ्या म्हणते मी..

नितिन थत्ते Sat, 10/11/2018 - 10:32

In reply to by गौराक्का

१. मेर्कू चाळीशी नय.
२. तू कितने बसरकी? मैं पचपन बरस का !
३. आचरटबाबांची ही कमेंट आणि तुमची कमेंट यात घोळ झाला-
"मध्यंतरी वाटाणे ८०रु किलो झाल्यापासून समोशात बटाटा आला आणि एखादा काजू यावा तसा टणक वाटाणा फुकट येतो. आता वाटाणे स्वस्त झाले तरी ......"
पचपन में अईसा होना लाजमी हय.

राही Mon, 12/11/2018 - 17:44

In reply to by नंदन

पारले पूर्वचा बाबूचा वडा अजूनही चांगला आहे. त्याउलट सांताक्रूझ पश्चिमेचा स्टेशनजवळचा सम्राट मात्र अगदी उतरला आहे. त्या मानाने मॉडर्न मात्र चव, वैविध्य टिकवून आहे. किंमत अर्थात बहुमजली झाली आहे. जवळच एका गल्लीत गुजराती लोकांचा एक जेवणाचा क्लब होता. अप्रतिम. मस्त आणि स्वस्त. मेंबर लोकांना अधिकच स्वस्त. दोन मिष्टे, दोन तिखटे, रोज वेगवेगळ्या कढ्या,सारे, वेगवेगळ्या रुचकर भाज्या आणि जस्सा पाहिजे तस्सा वाफाळता मोकळा बारीक शिताचा भात. अलीकडे काही वर्षे तिकडे जाणे नाही झाले. एस वी रोडवरचे योको मला वाटते उपनगरातले पहिले सिझ्लर्स देणारे हॉटेल असावे. सांताक्रूझलाच पूर्वीच्या रेमंडच्या दुकानानजिक सॅण्डविचेज उत्तम मिळतात. इथे सॅंड्विच मसालासुद्धा मिळतो. तो घरच्या सॅण्डविचमध्ये वापरल्यास टेस्टवर्धन होते. गिरगावला सेंट्रल सिनेमानजीकच्या चाटवाल्याकडेही सॅण्डविचेज भरगच्च आणि उत्तम असतात. पारले पश्चिमेला स्टेशनरस्त्यावर खाऊगल्लीत अनेक प्रकारचे दोसे मिळायचे. एनेम, मिठीबाई, भगुबाई सगळ्या मुलांमुलीच्या गर्दीत इतरांना शिरकावच नसे. डोसा स्प्रिंग रोल , पनीर चीझ, फ्रॅंकी, मयॉनीझ अशी अगदी आणि त्यावेळी नवीन कॉंबिनेशन्स होती, आहेत.पश्चिम उपनगरांत रेल्वेच्या पूर्वेपेक्षा पश्चिमेकडे चवीचे आणि पदार्थांचे वैविध्य अधिक आहे. वांद्रे पूर्वेला हाय्वे गोमांतकची कीर्ती ऐकून आणि गर्दी पाहून आहे.बोरिवलीला एस वी रोडवर अनेक चांगल्या जागा आहेत. गुजराती जिभेला मानवणारे अनेक चाटप्रकार मिळतात. चर्चगेटला स्टेडियमजवळचे के रुस्तम चे साधे आणि अस्सल दुधाचे आइस्क्रीम अजूनही तितकेच लोकप्रिय आहे. पुढे नरिमन पॉइन्टजवळ स्टेटस रेस्टॉरंट चांगले आहे. जवळच अनेक टपरी कम ठेले आहेत जिथे आसपासच्या मध्यमवर्गीय चाकरमान्यांना परवडेल असे चाट वगैरे नाश्त्याचे पदार्थ मिळतात. बॅलार्ड पिअरलाही अशी एक मोठी खाऊगल्ली आहे. तिथेही चाकरमानीफ्रेंड्ली खाणे मिळते. बाकी वीटी क्रॉफर्ड मार्केट परिसरातले बादशहा, सदानंद वगैरे आपापला आब राखून आहेत. बादशहाचा फालुदा मध्यपूर्वेतही प्रसिद्ध आहे म्हणे. मुळात फालुदाच आवडत नसल्याने बादशहाचे दर्शन कमीच घडते.
ताजा खबर किंवा ताक : अलीकडे चेंबूर पूर्वेच्या सद्गुरु पावभाजीची आणि ठाणे पश्चिमेच्या प्रशांत कॉर्नरच्या चाटची महती पश्चिम मुंबईकरांच्या गप्पांत ऐकू येऊ लागली आहे.चाखली नाही अजून. कारण फावला वेळ शेअरबाजारातली चाट खाण्यात जातो.

मला शेअरबाजारातली चाट आणि पावभाजी आवडते.

'न'वी बाजू Mon, 12/11/2018 - 18:17

In reply to by राही

पुढे नरिमन पॉइन्टजवळ स्टेटस रेस्टॉरंट चांगले आहे.

हे आहे अजून???

१९८८ साली, मुंबईत इंटर्नशिप करीत असताना, खिशात क्वचित थोडेबहुत पैसे खुळखुळत असले आणि/किंवा ऑफिसातल्या बुजुर्ग/अनुभवी सहकर्मचाऱ्यांना हुक्की आली, की अनेकदा तेथे जात असे/गेलेलो आहे. बऱ्यापैकी फेवरिट हाँट होता म्हणाना! तो एक, आणि दुसरे ते वूडलँड्ज़. पैकी वुडलँड्ज़ पुढे लवकरच जळून खाक झाले म्हणतात, ते पुन्हा उठलेच नाही.

छान जुन्या आठवणी जाग्या केल्यात. गेले ते (सोशालिस्ट जमान्यातले) दिवस!

वीटी क्रॉफर्ड मार्केट परिसरातले

यास व्हीटी म्हणणे हा शिवसेनोत्तर काळात रस्त्यात गाठून गुंडांकरवी फटकावणीय गुन्हा आहे, याची कल्पना आहे ना? जरा जपून! ('छत्रपती शिवाजी महाराऽऽऽऽऽऽऽज (की जय) टर्मिनस' म्हणायचे!)

नाही म्हणजे, आम्हीही 'व्हीटी'च म्हणतो अजून, अट्टाहासाने. (आणि इंग्रजीत बोलताना 'बॉम्बे'सुद्धा!) पण आम्हाला मुंबईत राहावे लागत नाही (थँक गॉड!), तेव्हा...

..........

तसे इंग्रजीत बोलताना आम्ही पुण्यालासुद्धा अजूनही 'पूना'च म्हणतो. जुन्या सवयी जात नाहीत! पण पुणेकर मनाला वगैरे लावून घेत नाहीत; फार फार तर 'आहे कोणीतरी फ्रीक' म्हणून सोडून देतात. असो चालायचेच.

चिमणराव Thu, 08/11/2018 - 07:33

गुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत टुकार असतात, >>
डीएस हाइस्कूलजवळच राहात होतो. हे गुरुकृपा '७५ च्या आसपास आलं. तेव्हा रुपम थेअटरमध्ये त्याचे समोसे जात.
समोश्याबरोबर छोले*१ असत. समोश्याचं पीठ मालक स्वत: तिंबायाचा दोनदोन तास. अप्रतिम समोसे असायचे. मग भयानक मागणीमुळे तमिळ पोरं कामाला ठेवली. आता चार महिन्यांपूर्वी समोसे नेले. हूं.
थोडक्यात खादाडीचा दर्जा कायम राहात नाही.

* छोले - आंबटपणासाठी आमचूर घालायचे असते परंतू तो काळपट रंग हल्लीच्या सुगृहिणींना आवडत नाही म्हणून टमोटो प्युरी टाकण्याची फ्याशन आली.
मध्यंतरी वाटाणे ८०रु किलो झाल्यापासून समोशात बटाटा आला आणि एखादा काजू यावा तसा टणक वाटाणा फुकट येतो. आता वाटाणे स्वस्त झाले तरी बटाट्याला हलवू शकले नाहीत कारण एकच गोळा बटाटावडा आणि समोशाला वापरतात थोडा फरक करून.
मूगभजी राजस्थानी लोक चांगली बनवतात.

दोनतीन महिन्यांनी लेख अपडेट करत राहा.

म्रिन Mon, 12/11/2018 - 17:49

In reply to by चिमणराव

छोल्यांना काळपट रंग काळ्या चण्यांमुळेही येतो. पण तेच अधिक छान लागतात. पांढऱ्या चण्यांना ती मजा नाही.

चिमणराव Sat, 10/11/2018 - 12:36

बाकी, टानुबा तुझ्या या धाग्यात एक दोन खादाडीवर्णन टाकले तर चालेल ना? उगाच दोन हातगाड्या जवळ नको.

१) रेल्वे स्टेशनातले "शेक" कुणी पिता का?
२) मशिदबंदर स्टेशन तिकिट ओफिसपासची, महाक्ष्मी मंदिरामागची, बोरीवली कृष्णनगर बस जिथे स्टेशनाला सोडते त्यासमोरच्या कळकट टपरीतली मूगभजी कुणी खाल्लीत का?

राही Mon, 12/11/2018 - 15:19

In reply to by चिमणराव

मस्जिदची नाही खाल्लेली. बोरिवली कार्टर रोड ठीक ठाक. महालक्ष्मीच्या देवळामागची अनंत वेळा अनेक टप्प्यांवर, अनेक मोसमांत खाल्ली आहेत. कधी टप्पे जीवघेणे, कधी मौसम जीवघेणा कधी भजी जीवघेणी. अलीकडे मात्र चव पूर्वीसारखी वाटली नाही. अर्थात आता तिथलं काहीच जीवघेणं राहिलं नाही म्हणा. नाही म्हणायला तिथल्या समुद्रातले खडक अनेक वर्षांपूर्वी जीवघेणे ठरले होते म्हणून खाली उतरायच्या वाटेवर प्रवेशबंदी आहे.

बॅटमॅन Mon, 12/11/2018 - 14:03

लेख आवडला. मुंबैच्या खाद्यसंस्कृतीचा हा पैलू मी कधी फारसा एक्स्प्लोअर केलेला नाही. रादर मुंबैच कधी फारशी फिरलो नाही. गेलाबाजार काही अंशी माटुंगा व दादर इतकेच काय ते. तस्मात बाकीचे काही परिचित नव्हते.

पुंबा Mon, 12/11/2018 - 17:25

In reply to by बॅटमॅन

++11
डिट्टो.
मी मुंबईत होतो तेव्हा सकाळी समोसा पाव आणि संध्याकाळी डोसा एवढे दोनच पदार्थ खायचो राव.

म्रिन Mon, 12/11/2018 - 17:45

संध्याकाळी दिवाळीतला खमंग चिवडा खातखात हे वाचलं म्हणून ठीकेय, नाहीतर हापिसच्या बाहेर पडून तातडीने राजूकडची शेवपुरी तरी खावीच लागली असती. गेली सात वर्षं फक्त त्याच्याकडची शेवपुरी खातेय. पाणीपुरी मुलुंड पूर्वेला एका मराठी मुलाच्या गाडीवरची बेष्ट. थंडगार चविष्ट पाणी. आणि कुरकुरीत बुंदी. अहाहा. सँडविचही एका मराठी मुलाच्या स्टाॅलवरचं. दुसरं कुठलं खातच नाही. हा अगदी स्टेशनच्या जवळ, त्यामुळे संध्याकाळी बरंच थांबावं लागतं. मुलुंडला एकविरा स्टाॅलवरचा चुरापाव काॅलेजकन्या/कुमारांमध्ये फार फेमस. बोरिवली पश्चिमेला प्रेमनगरजवळ गोपाळ डोसेवाल्याकडचे डोसे आणि इडली. चटणी तर नुसती चाटावी इतकी भारी. गरमागरम इडल्या किती पोटात जातील याची गणती कठीण.

धर्मराजमुटके Mon, 12/11/2018 - 23:30

मस्तच ! बाकी खाबूगिरीचा लेख "चाय"शिवाय कसाकाय कंप्लीट होऊ शकतो बुवा ?